मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याला 'तिसरी इनिंग' म्हणणं धाडसाचं होईल पण तरी म्हणतोच.
माझी पहिली इनिंग झाली बोटीवर. त्याबद्दल तुम्ही सविस्तर वाचलं आहेच. दुसरी चालू आहे ती प्रोफेसरीची, ज्याबद्दल थोडंफार वाचलं आहेत. त्यातून एखादेवेळेस तिसरी निर्माण होण्याची शक्यता आहे. ती होईल किंवा नाही, मात्र आत्ताच त्यात मला मजेदार अनुभव आले ते शेअर करणं जरूर आहे.
आमच्या रिसर्च विभागाच्या प्रमुखाची हॉबी आहे डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवणे. व्यवस्थित साउंड डबिंगसह मल्टीकॅमेर्यानी स्टूडिओमध्ये शूटिंग करण्यापासून रेल्वे अधिकार्यांचा डोळा चुकवून रेल्वे स्थानकावर नुसत्या मोबाइलच्या कॅमेर्यानी डॉक्युमेंटरी कशी बनवायची याचं ज्ञान त्याला आहे. आपल्यासारखे त्या बाबतीत अज्ञानीच असतात. मात्र हे अज्ञान आपण मतप्रदर्शनाच्या आड कधीही येऊ देत नाही! आमच्या बेफाट वक्तव्यामुळे त्यानी आम्हाला शिक्षित करायचं ठरवलं. आपल्या कॉलेजच्या स्टाफनी मिळून एक चित्रपट बनवावा असं त्यानी सुचवलं. आणि आम्हाला ती आयडिया पसंत पडली!
तो डायरेक्टर, आम्ही सगळे जण फायनॅन्सर्स (खर्च प्रत्येकी पाच हजार, एकूण पन्नास हजार बजेट), आमच्यातलाच एक जण प्रोड्यूसर, एक लाइन प्रोड्यूसर, एक आर्ट डायरेक्टर, वगैरे, वगैरे, आम्हीच नट/नट्या, पडेल ती हमाली सगळ्यांनीच करायची! पटकथा एका ब्रिटिश लेखकानी लिहिलेली घेतली (जर सिनेमा विकला गेला तर त्याची रॉयल्टी देण्याच्या बोलीवर त्यानी फुकट दिली!). फक्त सिनेमॅटोग्राफर मात्र प्रोफेशनल घेतला!
एका शनिवारी सकाळी पाचला सुरू करून रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत दीड दिवसात चित्रीकरण पूर्ण केलं! दिवसा outdoor, सूर्यास्तानंतर indoor. मधल्या रात्रीत फक्त तीन तास ब्रेक! स्त्री वर्गाची राहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. पुरुषवर्ग शूटिंगच्याच ठिकाणी दोन खोल्यात दाटीवाटीनी भाड्याच्या गाद्यांवर आडवे. पण झोप लागली नाही. अशा ठिकाणी न घोरणार्यांचे हालच होतात!
एडिटिंगच्या वेळेस एडिटरनी आमच्या चुका लपवायचा शक्य तितका प्रयत्न केला. शेवटी तासाभराचा चित्रपट तयार झाला. नाव 'शोहरत - The Trap'. त्यात मी खलनायक आहे. चित्रपटाच्या दर्जाविषयी बोलणंच अशक्य आहे. तो कोणी विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही तो यू-ट्यूबवर टाकला (https://www.youtube.com/watch?v=lziReIKdZxk) आणि ते प्रकरण संपलं.
काही महिन्यांनी मला एका Casting Director चा फोन आला! मला आधी वाटलं कॉलेजमधले बाकीचे प्रोफेसर माझी भंकस करताहेत! पण तसं नव्हतं. त्यानी माझं 'शोहरत- The Trap'' मधलं काम पाहून ही ऑफर दिली होती.
Love Siyappa नावाच्या पिक्चरमध्ये कॉलेजच्या प्रिंसिपलची भूमिका होती. मी 'हो' म्हटलं! काही महिन्यांनी भोपाळला शूटिंग झालं. माझे सीन दोन दिवसात शूट झाले. जाम धमाल आली!
माझ्यासारख्याच चित्रपट बघण्याची आवड नसणार्यांना चित्रपटांकडे जरा तुच्छतेनी बघण्याची सवय असते. ही सवय वाईट आहे अशी उपरती मला आता झाली आहे. याचं कारण असं की जो सीन बघताना अगदी सामान्य वाटतो तो नीट शूट करायला किती खाचखळगे सांभाळावे लागतात याची कल्पना मला या दोन दिवसात आली.
भोपाळ स्टेशनमध्ये गाडी शिरतच होती तेव्हां माझ्या ओळी व्हॉट्सअॅपनी माझ्याकडे आल्या. रात्री मानेवर खडा ठेवून घोकून घोकून पाठ केल्या. माझं कॅरेक्टर हे 'Student Of The Year' मधला समलिंगी (Gay) झाक असलेला प्रिंसिपल जो रिशी कपूरनी साकारला होता त्यासारखं असल्यामुळे त्याला डोळ्यासमोर ठेवून आरशासमोर सराव केला.
लो बजेट चित्रपट असल्यामुळे (एक कोटीच्या आतल्याला 'लो बजेट' म्हणतात म्हणे) प्रत्येकानी स्वतःचेच कपडे आणायचे होते. मी घरून सगळे लांब बाह्यांचे शर्ट, सूट्स आणि टाय घेऊन आलो होतो. ते घेऊन सकाळी टी. टी. एस. आय. नावाच्या कॉलेजमध्ये शूटिंग होणार होतं तिथे हजर झालो. डायरेक्टरला भेटल्यावर (पटकथेचा लेखकही तोच आहे) त्यानी एक धक्का दिला. हा प्रिंसिपल थोडासा गे नसून Unabashed, 'proud to be gay' gay असल्याचं समजलं. जरा विचार केल्यावर लक्षात आलं की हे आपल्या पथ्यावरच पडणार आहे. अर्धवट बायली अभिनयापेक्षा Exaggerated बायली अभिनय करणं जास्त सोपं.
शेजारचा वर्ग रिकामाच होता म्हणून त्यात जाऊन सराव सुरू केला. थोड्या वेळानी खुद्खुदल्याचा आवाज आल्यामुळे वळून बघितलं तर काही मुलं मुली खिडकीतून माझ्या बायली लकबींवर हसत होते! हाडाच्या नटानी लाजायचं नसतं असं कुठेतरी वाचलं होतं.
"मुझे जम रहा है क्या?" मी.
"मस्तै अंकल!"
त्यांना काय माहीत अंकल पूर्णपणे अनभिज्ञ आहे म्हणून?
आर्ट डायरेक्टर आली आणि माझ्या कपड्यांवर एक परिसंवाद झाला! खरं तर माझा सीन सगळं मिळून आठ दहा मिनिटांचाच. माझ्या ऑफिसमध्ये नायिका आणि तिची मैत्रीण येते, माझ्याशी बोलतात, जातात. मग नायक आणि त्याचा मित्र येतात, माझ्याशी बोलतात, जातात. मी सगळा वेळ खुर्चीतच बसलेला. मग माझे कपडे इतके महत्वपूर्ण कसे? त्याचं कारण असं की नायक आणि नायिकेचे कपडे आधीच ठरलेले असतात. माझे कपडे त्यांच्यासारखे असता कामा नयेत आणि clash देखील होता कामा नयेत! नशिबानी माझ्या कपड्यांमध्ये पुलं नी लिहिल्याप्रमाणे टिकाऊ आणि मळखाऊ असे दोनच गुणधर्म असल्यामुळे तिढा पटकन सुटला.
माझ्या शॉटची वेळ झाली आणि भरपूर उकडत असून सुद्धा मी नवरदेवासारखा सूट घालून हजर झालो. आम्हाला शूटिंगसाठी कॉलेजनी त्यांच्या चेअरमनचं ऑफिस दिलं होतं. ऑफिस वातानुकूलित होतं. हुश्श वाटलं. कॅमेरा, दिवे, मायक्रोफोन्स वगैरे लावणं सुरू झालं. खरं तर मला अभिनयातलं ज्ञान नाही, आणि अनुभवही. आजूबाजूला सगळे प्रोफेशनल्स! पहिलाच शॉट. टेन्शन येणं अगदी साहाजिक होतं. मात्र वयाचा एक प्रचंड फायदा असतो. टक्केटोणपे खाऊन स्थितप्रज्ञतेकडे वाटचाल सुरू झालेली असते. ती असायलाच हवी. लाभालाभौ जयाजयौ. अजिबात nervousness आला नाही.
टेबलाच्या एका बाजूला मी, समोर एकापाठोपाठ विद्यार्थी येणार आणि जाणार. मी पूर्णवेळ बसूनच असल्यामुळे हालचाल कमी आणि शिवाय माझ्या फक्त कमरेवरचाच भाग कॅमेर्याला दिसणार. कितीसं अवघड असणार? Little did I know!
लो बजेट चित्रपट असल्यामुळे दोन महत्वाच्या कमतरता होत्या. एक म्हणजे कॅमेरा एकच होता. याचा अर्थ प्रत्येक शॉट कमीत कमी तीनदा घेणं जरूर असतं. दोघांचं संभाषण असलं तर पहिला शॉट बाजूनी घ्यायचा ज्याच्यात मी, नायिका आणि तिची मैत्रीण, तिघंही व्यवस्थित दिसतील. दुसर्यात कॅमेरा माझ्या समोर, या दोघींच्या मध्ये आणि मागे असा की माझा चेहरा मुख्य दिसेल आणि स्क्रीनच्या दोन्ही कोपर्यांत दोघींचे केस पाठीमागूनअगदी थोडेसे दिसतील. तिसर्यात कॅमेरा माझ्यामागे, नायिकेकडे तोंड करून. तीनही वेळा तेच डायलॉग म्हणायचे. एडिटिंगच्या वेळेस एडिटर त्यांना पाहिजे तसं कापून वापरेल.
डायलॉगवरून दुसर्या कमतरतेकडे वळूया.
कित्येक चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये 'डबिंग' हा प्रकार असतो. म्हणजे अभिनय करताना डायलॉग म्हणायचे खरे, पण आवाजाकडे फारसं लक्षं नाही दिलं तरी चालतं. अभिनय व्यवस्थित करायचा. नंतर पुन्हा स्टुडिओ मध्ये तेच डायलॉग ध्वनिमुद्रित करून हा आवाज चित्रफितीत टाकला जातो. लो बजेटमध्ये हे लाड नसल्यामुळे सगळं एकदमच जमलं पाहिजे.
कोणाचंही काहीही चुकलं किंवा हालचालीत वा आवाजात काही कमतरता वाटली की रीटेक! माझ्या डोक्यावर अजिबात केस नाहीत. (God made very few perfect heads. The rest he covered with hair!) "अंकलका सिर चमक रहा है!" सिनेमॅटोग्राफरनी समस्या सांगितली. "मॅट कर दो!" असं फर्मान डायरेक्टरनी काढल्याबरोबर मेकअपमन आला आणि त्यानी माझ्या डोक्यावर बरोब्बर त्याच रंगाची पावडर पफनी लावली. गालाचं हाड, कान वगैरे जे काय चमकत होतं, त्या त्या जागा मॅट फिनिश केल्या गेल्या!
ऑफिसचा ए.सी. एका वेळेस साधारण आठदहा लोक असतील अशा कल्पनेनी बनवलेला आता मात्र केबिनमध्ये कॅमेरा, भगभगीत दिवे, साउंड रेकॉर्डिंग सिस्टिम आणि आम्ही पंधरा जण खचाखच भरलो होतो. जाम उकडायला लागलं!
घामाचा ओघळ आला की आपली अगदी नैसर्गिक reaction असते खिशातून रुमाल काढून पुसायचा. मी खिशाकडे हात नेला की हाकाटी व्हायची! "अंकल, हात मत लगाव!" मेकअपमन क्षणात यायचा, नाजुक हातानी घाम टिपायचा, नवीन पावडर लावायचा, नवा ओघळ येण्याआधी पुढचा डायलॉग संपला पाहिजे! त्यातच बायली हावभाव, मानेला आणि हातांना नाजुक झटके, उंच स्वरात बोलणं, लटका राग! My God, मला लिहितानाच कसंतरी होतंय्.
बोलण्याचा आणखी एक इशू. प्रत्येक पात्राला एक कॉलर माइक दिलेला होता. मात्र तो बाहेर दिसून चालणार नाही. त्यामुळे बनियनला क्लिप केलेला. याचा प्रॉब्लेम असा होतो की आपण हातवारे केले की हालचालीमुळे माइकला शर्ट घासतो आणि 'खस्स्स' असा आवाज येतो. हा आवाज sound technicians नंतर काढून टाकू शकतात. मात्र आपण तेव्हां आपण जर बोलत असलो तर ते दोन आवाज मिसळतात आणि मग ते काढणं अवघड होतं. त्यामुळे असंही लक्षांत ठेवायचं की हलताना बोलायचं नाही आणि बोलताना हलायचं नाही! नकटीच्या लग्नाला . . . . .
बाजूला कॅमेरा असेपर्यंत ठीकच होतं. समोर आल्यावर मात्र माझ्या खर्या परीक्षेला सुरवात झाली. दिवे कॅमेर्याच्या दोन्ही बाजूला असल्यामुळे माझा चष्म्या फारच चमकायला लागला. दिवे खाली, वर, डावे, उजवे करून उपयोग होईना. चष्मा घालून तीन शॉट झाल्यामुळे आता चष्मा काढणं शक्य नव्हतं. मग माझ्या मानेचे वेगवेगळे अॅन्गल्स करून असं ठरलं की मी मान अमुक अंशाच्या वर करायची नाही! थोडक्यात काय, तर मी मान आपण पुस्तक वाचतो तशा अंशात ठेवायची आणि डोळे मात्र समोरच्या विद्यार्थ्यांकडे! तसं एकदा करून बघा! खुन्नस दिल्यासारखं दिसतं. ते चालणार नाही. मान खाली केली की आवाज खर्जात जातो. ते चालणार नाही! स्वर पातळ आणि उंच पाहिजे, हलताना बोलायचं नाही, बोलताना हलायचं नाही. मान डावी-उजवीकडे केलेली चालेल. वर करायची नाही! चेहर्यावरचे भाव आणि हातवारे तर विसरून चालणारच नाही! काल रात्री पाठ केलेले डायलॉग्स विसरून चालणार नाही. आणि हे सगळं घामाचा पुढचा ओघळ यायच्या आधी!
मी यापुढे कुठल्याही सिनेमाला आणि मालिकेला कधीही नावं ठेवणार नाही. शप्पथ!
दोन चार false starts नंतर बर्यापैकी जमायला लागलं आणि फारसे रीटेक न होता चित्रीकरण संपलं. ज्या कॉलेजमध्ये हे शूटिंग चालू होतं त्यांच्या मॅनेजमेंटच्या एका नातेवाईकानी धोशा लावला "मला सिनेमात काम पाहिजे". त्यामुळे त्याला क्लार्क बनवला. असा प्रसंग दाखवला की तो काही कागद माझ्या सहीसाठी आणतो, मी काही जुजबी प्रश्न विचारून त्यांच्यावर सही करतो आणि तो जातो. तो नटवर्य झाला आणि गंगेत घोडं न्हालं! लिहायला एकच वाक्य लागतं पण जागेवर मात्र पुन्हा कॅमेरा, लाइट्स आणि साउंड सिस्टिम सेट करणं, त्याच्या आणि माझ्या नवीन ओळी पुन्हा ठरवणं, घोकून घेणं - सगळंच वेळखाऊ.
यात आणखी एक मजेशीर गोष्ट! एका पिण्याचे पाणी विकणार्या कंपनीची जाहिरात देखील यातच करायची होती. जेव्हां कॅमेरा माझ्या समोर होता तेव्हां पाण्याची बाटली माझ्या समोर टेबलावर ठेवली गेली पण बाटलीची उंची कमी पडंत होती. म्हणून तिथेच पडलेला एक लाकडी डस्टर ठेवला आणि त्याच्यावर बाटली. मग ठीक झालं. नायक आणि त्याचा मित्र आलेला असताना मी मित्राचा हात त्याच्या मनाविरुद्ध माझ्या हातात घेतो असा प्रसंग होता. तेव्हां थोडीशी ओढाताण झाली आणि हा डोलारा कोसळला!
म्हणून तो डस्टर फेव्हिक्विक वापरून टेबलावर असलेल्या perspex शीटला चिकटवला . डस्टरला बाटली चिकटवली. काम झालं. शूटिंग संपल्यावर बाटली आणि डस्टर उचकटून काढावे लागले. त्यात perspex शीटचा कपचाच निघाला! चायला!
एकानी शक्कल लढवली की पूर्ण शीट उलटी करूया! फटकन् उलटी केली. अशा काच अथवा perspex शीट खाली नेहमी काही कामाचे प्रिंटाआउट्स् ठेवलेले असतात. त्यातले जे जुने असतात ते कालांतरानी काचेला चिकटलेले असतात. तसा एक प्रिंटाआउट चिकटून वर आला. त्याला खाली ठेवावा म्हणून कोणीतरी काढायचा प्रयत्न केला तर तो टर्रर्रर्रकन् फाटलाच!
"अबे @#%&, तेरे बापका ऑफिस है क्या?" उरलेलं संभाषण ऐकायला मी थांबलो नाही.
हा सिनेमा म्हणजे कॉलेजमधलं प्रेमप्रकरण असल्यामुळे तो "व्हॅलन्टाइन डे" ला प्रदर्शित व्हायचा होता. पण काही कारणानी झालेला नाही. अजून एक महिन्यानी होणार आहे असं ऐकतो.
एका किरकोळ रोलवरून मी 'तिसरी इनिंग' वगैरे कसं म्हणू शकतो? त्याचं गुपित आहे स्वीट टॉकरीणबाईनी केलेल्या विनोदामध्ये. तिचं म्हणणं, "Bollywood needs somebody to fill the vacuum created by the passing of Mr. A.K.Hangal!!"
छान. शुभेच्छा तिसऱ्या
छान. शुभेच्छा तिसऱ्या इनिंगसाठी.
फारच छान ! तुमची बोट या
फारच छान ! तुमची बोट या बंदराला लागावी , हें विधिलिखितच असावं !! शुभेच्छा.
* fill the vacuum created by the passing of Mr. A.K.Hangal!!" ' Sea-gull replacing Hangal !!
( तेवढं जरा सिनेमाचा पास पाठवायचं लक्षात असूंदे! )
आम्ही स्टुडिओबाहेरच टाॅस उडवत ताटकळतोय आणि मधेच घुसून आंत यांची तिसरी इनींगज पण सुरूं झाली !!!
एकदम मस्त!
एकदम मस्त!
Bollywood needs somebody to fill the vacuum created by the passing of Mr. A.K.Hangal!!">>>>
सर्वजण,
सर्वजण,
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!
मी_अनु, You made my day! नट आणि एडिटर सोडले तर 'शोहरत' बघणार्या तुम्ही एकमेव असणार! थॅन्क्स!
प्रसन्न, इच्छा असून वेळेअभावी येणं होत नाही. नवनवीन अनुभव येतील तसा येईनच.
राजसी, दिवसाचे आठ हजार रुपये. पैशाची जरूर असो वा नसो, पैसे घेऊन केलेल्या कामात गुणवत्ता ओतावीच लागते असं माझं मत आहे.
आशुचॅम्प,
भाऊ नमसकर, बरोबर आहे. सगळंच विधिलिखित आहे खरं. आपण दिवसभर वल्ही मारत राहायची मजा घ्यायची! बोट कुठच्या बंदराला जाईल काही सांगता येत नाही.
देवकीताई,
देवकीताई,
धन्यवाद. तुमचा प्रतिसाद २४ फेब्रुवरीचा असूनसुद्धा उशिरा दिसायला लागला!
मस्तच लिहिलय सर. मी एका
मस्तच लिहिलय सर. मी एका कोरियान चित्रपटात प्रेक्षक म्हणून भुमिका केलीय, त्यातच आमचे इतके हाल झाले होते, की तुमचं लेखन अगदी डोळ्यासमोर घडतय अस दिसत होत.
राजसी, दिवसाचे आठ हजार रुपये.
राजसी, दिवसाचे आठ हजार रुपये. पैशाची जरूर असो वा नसो, पैसे घेऊन केलेल्या कामात गुणवत्ता ओतावीच लागते असं माझं मत आहे.--- मस्तच. तुम्ही म्हणताय त्या आचारविचाराला मराठीत integrity म्हणतात
@विजय आणि राजसी, धन्यवाद.
@विजय आणि राजसी, धन्यवाद.
आपण रोजच्या संभाषणात इतके इंग्रजी शब्द सहजगत्या वापरतो की आपल्या लक्षातच येत नाही. मी एकदा फळवाल्याला विचारलं, "नाश्पती कैसे दिया?" त्याला काही कळे ना! मी हातानी त्याला फळ दाखवल्यावर म्हणाला, "ईसको मराठीमे पेअर कहते हैं!"
मराठी मे पेअर ☺️☺️☺️ महान आहे
मराठी मे पेअर ☺️☺️☺️ महान आहे हे
Pages