सवाष्णी घाट, कोंडेश्वर आणि बहिरीचा घाट

Submitted by योगेश आहिरराव on 10 February, 2019 - 01:10

सवाष्णी घाट, कोंडेश्वर आणि बहिरीचा घाट

२ ऑक्टोबर सुट्टीचा मुहूर्त साधून मी आणि सुनील सव्वाआठच्या कर्जत-सांडशी एस टी ने नऊच्या सुमारास सांडशीत उतरलो. मार्च २००६ मध्ये ढाकचा बहिरी केला होता तेव्हा होळीच्या रात्री गावात अनायासे झालेला पाहुणचार व मुक्काम केला ती जिल्हा परिषदेची शाळा त्या समोरील मोठे मोकळे मैदान. त्यावेळी पाहिलेलं आणि आता २०१८! गावात बराच फरक जाणवला. बहुतेक मोठी प्रशस्त घरं, अशाच एका घरासमोर थांबलो. चौकशी पाणी वगैरे झाल्यावर मूळ विषयाला हात घातला. सुरुवातीला घरातल्या मामांना वाटलं आम्हाला बहिरीला जायचं आहे पण सवाष्णी घाटाने वर कोंडेश्वर जाऊन बहिरीच्या घाटाने उतरून सायंकाळी सांडशीत परत असं सांगितल्यावर मामांनी आम्हा दोघांना घाबरवत नन्नाचा पाढा लावला. लांब आहे, खूप चाल पडेल, गवत वाढलं आहे, वाट वरच्या टप्प्यात अवघड आहे आता कुणी फारसे जात नाही. अर्थात या सर्व गोष्टी गृहीत धरून तशी तयारी होतीच. मामांशी चर्चा करून कुणी सोबत येईल का ते पाहू लागलो. "सकाळी थोड लवकर आला असता तर मिळालं असतं कुणी सोबत आता सर्व कामाला निघून गेले तरी बघतो एक जण आहे फार्म हाऊसवर गेला आहे तो आला तर तुमचं काम होईल", असे मामा म्हणाले. त्यांच्या घरातून एक जण त्या माणसाला बोलवायला गेला. दहा पंधरा मिनिटांत दोघे हजर झाले. त्या व्यक्तीला आमचे नियोजन नीट समजवून सांगितले. पुन्हा तेच पाल्हाळ वाट अवघड आहे, रान वाढलंय, खूप चाल आहे, दिवस जाईल... इ. आम्ही म्हणालो, चला तर तुम्ही पाहू जेवढं जमेल तितकं जाऊ. त्या घरातले मामा मध्येच आम्हाला तोडत पैशाचं काय ते ठरवून घ्या. ‘हो ते आम्ही योग्य ते देऊंच’ असे मी म्हणालो.
मामा : तसं नाही, पुण्या मुंबईचे येतात बहिरीचे ८०० ते १००० देतात. काल परवा रांजणगावचा एक ग्रुप होता २५ लोकं होती आपल्याकडेच जेवणाला थांबली.
मी : बरोबर काय ते देणार नाराज नाही करणार
वरील संभाषण ऐकत ती व्यक्ती पटकन बोलून गेली १००० रुपये पडतील. हजार !!!
हागणदारीच्या दुकानदारांनी जथ्थेच्या जथ्थे नेऊन वाट लावल्याचे हे उत्तम उदाहरण. आजवरचा अनुभव पाहता हे काही नवीन नाही. तरी आता आलोच आहोत प्रयत्न म्हणून पैसे कमी करण्यासाठी विनंती केली. पण पठ्ठा काही ऐकेना त्यापेक्षाही मामांना जास्त रस, नको तितकं हस्तक्षेप करत होते. हि लोकं फार्म हाऊसवर, फारतर शेतीकाम किंवा मजुरी करून दिवसाला जास्तीत जास्त ३००- ४०० रुपये मिळवतात. त्यानुसार ४०० रुपये द्यायला आमची काहीच हरकत नव्हती. १००० मग ८०० मग ७०० शेवटी ६५० वर गडी अडून बसला. असाच एक किस्सा ८-१० वर्षापूर्वी बेलपाडा गावात नळीच्या वाटेसाठी झाला होता त्यावेळी पण १२००-१५०० तोंडाला वाट्टेल ते बोलत होते. तेव्हाही मान्य नव्हतेच आणि आताही नाही. बाजारू हागणदारीचे दुकानदार आणि काही नवश्रीमंत स्वतःला ट्रेकर? म्हणून घेणाऱ्या बिनडोक प्रवृत्तीच्या लोकांनी हा पायंडा बहुतेक गावात पाडला आहे. दोष स्थानिक गावकरी यांचा मुळीच नाही. असो... सुनील तर बोलून पडला, "सोड आलोच आहोत तर बहिरी करून येऊ". गावातून बाहेर येत ओढा पार करून कच्च्या रस्त्याने वीस पंचवीस मिनिटात धनगर पाड्यावर पोहचलो.
11_0.jpg
वीस एक उंबर्यांचा हा धनगर पाडा, एक गोष्ट जाणवली ती इथे लहान मुलांचं प्रमाण भारीच जवळपास प्रत्येक घरात एक दोन तरी लहान लहान मुलं होतीच. अशाच एका घरासमोर लहान मुलाला खेळवत सवाष्णी घाटाचा विषय काढला.
तसेही बहिरी आधी झाला असल्यामुळे सोबतीची गरज नव्हती पण जर इथून कुणी आले तर सवाष्णी कोंडेश्वर ठरवल्या प्रमाणे होऊन जाईल. पाड्यातली मोठी माणसं कामासाठी बाहेर दोघं तिघे शाळकरी मुले जमली त्यांना या भागातली सारी माहिती अर्थात त्यांचे राहणेच सह्याद्रीच्या कुशीत ही मुलं तशी रानाची पाखरं. त्यातील एकाला विचारून पाहिले तो काही हो.. ना.. बोलायला तयार नाही. थोड जोर लावून विचारल्यावर त्याची आई चक्क म्हणाली, 'पोरा जा रे घेऊन जा त्यांना सोबत.'
खरंच सांडशी गावातला घडलेला प्रसंग आणि आत्ताची स्थिती यात किती तफावत ! कोण.. काय.. कुठले.. नाव.. गाव.. पैसे.. असं काहीही न विचारता नुसतं डोंगर फिरायला आवडीने आले आहेत या एका गोष्टीवर विश्वास ठेऊन त्या माऊलीने आपल्या मुलाला आमच्या सोबत पाठवायला तयार केले.
चौदा वर्षांचा ईयत्ता नववीत शिकणारा प्रवीण तसा खूपच शांत आणि अबोल. बऱ्याच वेळी आपण स्वतः हून भटकत असताना मध्येच कुणी भेटलं किंवा वाटाड्या घेतल्यावर लगेचच त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो मला तर हा प्रकार मुळीच आवडत नाही. सुरुवातीला शांतपणे घेत हळूहळू त्यांच्याशी संवाद करावा, मग पुढे ते आपल्यात मिसळतात. अर्थात या व्यक्ती त्यांचे भिन्न स्वभाव सवयी वागणं बोलणं हा ही एक वेगळा विषय.
पाडा सोडून निघालो तेव्हा दहा वाजून गेले होते, शेताच्या बांधावर चालत पुढे निघालो ठिकठिकाणी शेतात रात्री पहारा देण्यासाठी मचान सारखी सोय कारण रात्री रानडुक्कर येऊन पिकाची नासाडी करतात त्यासाठी पाड्यातील दोघे तिघे मिळून रात्री तिथेच थांबतात.
समोरच सह्यशिरोधारेवर ढाकचा किल्ला आणि त्याच्या पोटात असलेली बहिरीची गुहा त्याच्या दक्षिणेला मांजरसुंभा ते राजमाची तर उत्तरेला लांबलचक ढाकचे पठार. शेतातली चाल संपवून जंगलात शिरलो, या दिवसात जंगल चांगलेच बहरलेले. सरत्या पावसात विशेषतः ऑक्टोबर महिन्यात ट्रेकची बातच न्यारी. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो, जंगलातले वृक्ष वेली तसेच विविध रानफुले ऐन भरात असतात. उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी वाटेत ओढ्याना असलेले वाहते पाणी ही एक या दिवसातली जमेची बाजू. जंगलातली जवळपास वीस एक मिनिटांची चाल संपून वाट चढणीला लागली. पुढे जात उजव्या हाताला धबधब्याची वाट गेली आम्ही तसेच वरच्या बाजूला चढाई सुरु ठेवली.
बहिरीला जाणारी ही सांडशी गावातून मुख्य वाट त्यामुळे वाटेत जागोजागी खुणा आहेतच. वाटेतल्या छोट्या ओढ्यात ब्रेक घेत पाणी पिऊन पुढे निघालो. प्रवीण तसा शांतच त्याला बोलतं केलं तरी मोजकच बोलणार पण एक मात्र खरं इतक्या कमी वयात या भागातलं बरच काही माहिती विशेषतः त्याचा भूगोल पक्का. बहिरीची हि वाट अतिशय खड्या चढणीची अगदी फर्स्ट गेअर मध्ये एका लयीत. त्यात वारा अजिबात नाही जसजसे वर जात होतो तसा आणखी उन्हाचा तडाखा जाणवत होता, घामाच्या धारांनी पार वाट लागलेली जिथे सावली मिळेल तिथे दम खात पुढे जाणे.
वरच्या टप्प्यात आल्यावर उजवीकडे मान वळवली राजमाचीचे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन व्यवस्थित नजरेत तर मांजरसूंभा हाकेच्या अंतरावर वाटत होता.
20.JPG
एके ठिकाणी ऐ ओ ऐ ओ ऐ ओ कुणीतरी ओरडत होते जवळ गेल्यावर समजलें पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सहा जणांचा ग्रुप होता. दोघे मागे राहून आडव्या वाटेला निघून गेले त्यामुळे चुकामूक झालेली. सकाळपासून निघालेले वाट चुकल्यामुळे अतिरिक्त श्रमाने पार ढेपाळले. छोटा ब्रेक घेत नंतर ती मुलं पण आमच्या सोबत निघाली. धापा टाकत खडी चढण संपवून एकदाचे पदरात आलो. IMG_2027_0.JPG
थोड अंतर जाताच बहिरीची गुहा आणि कळकराय सुळका एकदम स्पष्ट आणि जवळ भासू लागले.
तसे पाहिले तर या बहिरी घाटाची वाट ही उभ्या चढणीची कुठे फार अशी आडवी चाल किंवा खूप मोठा पदर असा नाहीच. त्यामुळे हि घाटाची चढाई टाळण्यासाठी बरेच जण बहिरीला जांभिवली कोंडेश्वर मार्गे येणं पसंत करतात. पदरात मोजून पाच मिनिटे चालले असू पुढे मोठ्या आंब्याच्या झाडाखाली थांबलो. उजवीकडे पुसट पायवाट पदरात गेलेली तीच होती आमची सवाष्णी घाटाची वाट तर सरळ जाणाऱ्या वाटेला पुढे दोन फाटे फुटतात उजवीकडची वाट कळकराय सुळका डावीकडे ठेवून सरळ चढते पुढे त्याच वाटेने ढाक व कोंडेश्वर जाता येते हा झाला बहिरीचा घाट. तर डावीकडची पदरात आडव जात बरोब्बर बाहिरीच्या गुहेखाली आल्यावर वर कातळाला भिडते ती थेट पुढे मग गुहेत. (याच वाटेने २००६ साली आम्ही बहिरीला गेलो होतो) थोडक्यात आम्ही ज्या आंब्याजवळ होतो तो हा पहिला टी जंक्शन. हे सारं त्या मुलांना पण समजवून सांगितले, त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही उजवी मारली. घड्याळात पाहिलं तर बारा वाजून गेलेले, धनगर पाडा ते या आंबा जंक्शन पर्यंत यायला आम्हाला दोन तास लागले. पदरातली चाल पण मस्तच फक्त वारा नव्हता, होती ती आद्रता त्यामुळे पूर्ण घामाघूम होत पुरेपूर ऑक्टोबर हीट अनुभवत होतो. वाटेत सावली पाहून सुका खाऊ खात थोडी विश्रांती घेतली.
99.jpg
आता आमची आडवी वाट साधारण दक्षिण दिशेला, ढाकचा डोंगर मागे पडून पदरातल्या मोकळं वनातून पुन्हा वाट जंगलात शिरली.
वाटेतल्या लहानशा ओढ्याला वाहते पाणी मनसोक्त पिऊन बाटल्यांमध्ये भरून घेतले.
333_1.JPG
उंच उंच झाडी त्यावर बिलगून असणाऱ्या महाकाय वेली. गौराई, कळलावी सारखी फुले वाटेच्या आजूबाजूला डोकावत होती.
जोडीला विविध पक्ष्यांचे आवाज हळद्या, कोतवाल, बुलबुल इतर अनेक पक्षी मध्येच शेकरू या फांदीवरून त्या फांदीवर हे सारं खूपच छान तिघेही काहीही न बोलता शांतपणे फक्त अनुभवत होतो. कमीत कमी सोबती असले तर हा मोठा फायदा नाहीतर मोठी पलटण असेल तर विचारायला नको. बडबड गडबड गोंधळ यात काय जंगल पाहणार.. असो. वाट डाव्या हाताला तिरक्या रेषेत चढू लागली, थोडे वर येताच जंगलातून बाहेर आलो. ढाक आता बराच मागे तर डावीकडच्या कड्याला बिलगून अरुंद पायवाट पुढे गेलेली. वाटेवर गुडघ्या इतपत गवत त्यात खाली बरोब्बर पाहून पुढे सरकत होतो. सुरुवातीचे एक दोन छोटे कातळ टप्पे पार करून आणखी वरच्या पातळीत आलो. डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी मध्ये अती अरुंद अशी वाट त्यात काही ठिकाणी निसरडे टप्पे. जसे जसे वर जात होतो तसे जोडीला दृष्टिभय, काही ठिकाणी तर ट्रेव्हर्स वर एक टप्पा आऊटचा मामला. त्यात भर म्हणजे दुपारचे कडक उन आणि आद्रतेमुळे घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होऊ लागली बरं वाटेत थांबणार तरी कुठे? आधीच अरुंद आणि एक्सपोज वाटेवर जिथे आधाराला काही नाही तिथे सावलीला तर विचारायलाच नको !
55.JPG
जवळपास वीस पंचवीस मिनिटात अंदाजे दीड पावणदोन किमी अंतर असलेली अवघड ट्रेव्हर्सी सावकाश पार करून डावीकडे वळून शेवटची सोपी चढाई करत माथ्यावर पोहोचलो. अगदी जवळच उजव्या हाताला झाडीत दगड मांडलेला टहाळदेव.
झाडाची एखादी छोटी फांदी किंवा काही पानं या देवाला वाहायची, अश्या अवघड अनगड वाटेवरच्या वाटसरूंची हि श्रध्दा स्थानं. मुख्य वाटेवर येताच वाटेचा चौक लागला, डावीकडची वाट ढाक कडे (आमची परतीची वाट) सरळ जाणारी जांभिवली व तोरण गावाकडे तर उजवीकडील कोंडेश्वर मंदिर.
IMG_2124.JPG
मंदिराच्या वाटेने निघालो थोड थांबून कड्यावर जाऊन काही फोटो घेत आम्ही आलो ती वाट पाहू लागलो झाडी भरल्या कड्यात ती वाट शोधणे महाकठीण काम. 001.jpg
पठारावर सोनकीची पिवळी धम्मक फुले खुपच छान त्यात हिरव्या गवताच्या पिवळसर होत जाणाऱ्या छटा त्यावर भिरभिरणारे लहान फुलपाखरं आणि विविध कीटक या साऱ्या वातावरणात एक वेगळाच गंध. त्यात ढगांचा उन सावलीचा खेळ सुरू झाला, अशावेळी तिथून निघावेसे वाटतच नव्हते डोळे मिटून पडून राहिलो. भानावर येत वेळ पाहत पुढच्या पंधरा मिनिटांत कोंडेश्वर मंदिरात दाखल झालो.
003.jpg
काही वर्षांपूर्वी पुरातन दगडी पाषाण मंदिराचा ऑईल पेंट मारून पुढे नव्याने बांधलेला सभामंडप असा जीर्णोद्धार केला आहे. पण मंदिर परिसर प्रसन्न, स्वच्छ व प्रशस्त आजूबाजूला भरपूर मोकळी जागा त्यात हल्ली जांभिवली गावातून इथं गाडी घेऊन येता येते त्यामुळे शनिवार रविवार बरीच वर्दळ असते. महादेवाचे दर्शन घेऊन शांत बसून राहिलो.
त्या थंड शांत निवांत मंदिरातून निघावेसे वाटतच नव्हतं निदान मला तरी मुक्काम करायची खूप इच्छा होती पण सुनीलला काहीही करून आजच घरी परतायचे होते. तसे एकवार सुनीलला म्हणालो सुद्धा तू निघ मी थांबतो इथे, सायंकाळी मस्त पुन्हा कड्यावर फिरून नंतर घरी फोन करून कळवतो. जांभिवली गावातील पुजारी कदम यांनी आमची विचारपूस केली तिघे सवाष्णी घाटाने वर आलो याच त्यांनाही आश्चर्य वाटलं. धनगर पाडा सोडल्यानंतर घाट चढून मंदिरापर्यंत यायला आम्हाला साडेचार तास लागले. पुढचा पल्ला आणखी लांबचा थोडक्यात फिरून जाणारा. चढून यायलाच साडेचार तास तर फिरून उतरत जायला किमान चार तरी लागणारच. घड्याळात पाहिलं तर तीन वाजत होते.
मंदिर ते भीमाशंकर फाटा हा पहिला टप्पा.
भीमाशंकर फाटा ते ढाक फाटा हा दुसरा टप्पा.
ढाक फाटा ते सकाळचे आंबा जंक्शन हा तिसरा टप्पा.
आंबा जंक्शन ते धनगर पाडा पुढे सांडशी हा चौथा टप्पा अशी उजळणी व वेळेचे गणित करून निघालो.
044.jpg
मंदिराजवळच्या कुंडली नदीच्या ओढ्यातून पाणी भरून घेतले पुन्हा एकदा निवांत मुक्काम करायच्या हेतू नक्की येणार. पुजारी काकांनी प्रवीणला संत्रे आणि समोसे दिले, लाजरा बुजरा प्रवीण ते घेईना त्याला जोर लावून सांगितले तेव्हा त्याने घेतले. दुपारचे जेवण बाकी होत, सोबत घरातून आणलेली अंडी त्यामुळे मंदिरातून निघून वाटेत जेवायचं ठरले. सवाष्णी घाटाचा चौक सोडून पुढे मळलेल्या वाटेने ढाककडे निघालो.
थोडक्यात आम्ही आलो त्या वाटेच्या वरच्या माथ्यावरून विरुध्द दिशेने म्हणजेच ढाकच्या वाटेला लोणावळा भीमाशंकर तसेच कोंडेश्वर ढाक यामधील हा क्रेस्ट लाईनला समांतर असा मळलेला रूट. उजवीकडे ओढ्याला वाहते पाणी तिथेच जेवणासाठी थांबलो.
पंधरा वीस मिनिटात आवरून पुन्हा चालू पडलो. छोटे टेपाड चढून पुन्हा सपाटी मग कारवीचे रान पुन्हा वाट मोकळवनात आली डावीकडे कड्यावरून बहिरी आता थोडा जवळ वाटत होता, त्याला चिकटून असलेल्या कळकराय सुळका त्याला वळसा घालून आमची उतराईरची वाट. वाटेतले एक एक टप्पे आणि वेळ पाहत पाय पटापट टाकू लागलो. 066.jpg
मध्येच एके ठिकाणी बिबट्याचे ठसे उमटलेले अंदाज लावला तर अवघ्या काही तासांपूर्वी स्वारी इथून गेलेली असणार. आता जंगलातील वाट पुन्हा खाली उतरू लागली. मंदिरातून निघाल्यापासून बरोब्बर तासाभराने पहिला टप्पा भीमाशंकर फाटा इथे आलो.
IMG_2194.JPG
उजवीकडे वरच्या अंगाला चढणारी वाट कुसुर मार्गे भीमाशंकर जाते डावीकडची वाट ढाक कडे त्याच वाटेने आणखी थोडे खाली उतरत ढाक कोंडेश्वर फाटा या दुसऱ्या टप्प्यात आलो. इथून डावीकडची वाट सांडशीत उतरते तोच बहिरी घाट, सरळ जाणारी वाट कळकराय सुळका आणि ढाक यांच्या खिंडीतून बहिरीच्या गुहेत जाते तर उजवीकडे जाणारी ढाक गावात जाते याच वाटेला खालच्या बाजूला एक वाट ओढ्यात उतरते तशी पटकन ओळखता येत नाही ती पालीचा धोंड जी पलीकडे पेज धनगर पाडा, पालीपोटल, हुमगाव या भागात उतरते याच वाटेने आम्ही गेल्या वर्षी कुठराई घाटाचा ट्रेक केला होता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्या धुंदीत प्रवीणच्या मागे मागे चालू लागलो जसा चढ तीव्र झाला तसे वर पाहिलं तर हा कळकराय आणि ढाकच्या खिंडीत चढवत होता. सांडशीत उतरणारी वाट खाली मागे राहिली. स्वतःवर चिडत आणि प्रवीणला बोलत एकदाचं खिंडीत पोहचलो.
मागे दूरवर कूसुर आणि वांद्रे पठार तर पश्चिमेला कोकणात सालपे माणगाव सांडशी. आता आमच्याकडे दोन पर्याय होते एक तर ही खिंड उतरून थोड आडवं जात बहिरीला न जाता सरळ कड्यातून खाली पदरात उतरणे मग पुन्हा डावी मारून आंबा जंक्शनला येणे हा तोच रूट जो सकाळी सांगितला होता. दुसरा आलो तसे झटपट माघारी जाऊन सांडशी थोडक्यात याच कळकराय सुळक्याला वळसा घालून बहिरीच्या घाटाने उतरणे. तेच आमचे नियोजन होते. वातावरण बदलू लागले ढगांचा गडगडाट सुरू झाला त्यात कधीही पाऊस पडेल अशी स्थिती आधीच सकाळ पासून निघून खूपच दमछाक झालेली त्यामुळे पलीकडे उतरणारा पर्याय बाद करून आल्यापावली खिंड उतरू लागलो. एव्हाना साडेचार वाजून गेले होते पण आकाशात दाटलेल्या काळ्या ढगांमुळे सहा वाजल्यासारखे वाटत होते. झटपट उतरत पुन्हा त्या कोंडेश्वर ढाक फाट्यावर आलो सांडशीकडे उतरणारी वाट धरली आधी २००६ साली याच वाटेने उतराई केली होती.
IMG_2212.JPG
सुरुवातीची दगड धोंड्यांची वाट तीव्र उतरत जंगलात शिरली उजव डाव करत एक एक टप्पे उतरत एकदाचे पदरात आलो काही अंतर जाताच बऱ्यापैकी मळलेली वाट लागली हीच उत्तरेकडे म्हणजे सरळ पुढे जाऊन उजवीकडे वळून थेट बहिरीच्या कड्याला भिडते आणि जर बहिरीला न वळता सरळ पुढे गेले तर याच ढाकला मागे ठेउन वरच्या पठारावर असलेल्या कळकराय वस्तीत जाते. आम्ही अर्थातच डावीकडे वळून बरोब्बर सकाळी जिथे होतो तो आंबा जंक्शन, आमच्या तिसऱ्या टप्प्यात आलो. वेळ पहिली सव्वापाच. चढायला धनगर पाडा ते हा आंबा जंक्शन दोन तास लागले तर उतरायला किमान दीड तास तरी त्यात पाऊस सुरू झाला तर दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. असं झाले तर शेवटची साडेसातची एस टी हुकणार. फार वेळ न दवडता तोंडात चिक्की टाकून घोटभर पाणी पिऊन निघालो.
अधून मधून गडगडाट सुरूच होता त्यात पूर्ण ट्रेक मध्ये नव्हता तो गार वारा सुटला दोन चार थेंब काय ते पडले पाऊस खाली कोकण पट्ट्यात सरकला. वाटेतल्या ओढ्याजवळ मोजून पाच मिनिटे बुड टेकवून सव्वा सहाच्या सुमारास धनगर पाड्यावर आलो. इथून सांडशी पंधरा ते वीस मिनिटे तशीही साडेसात ची एस टी आता मिळणारच. प्रवीणच्या घराबाहेर बसून तांब्या भर पाणी रिकामे केले. त्याच्या घरातली मंडळी वाटच पाहत होती. कळकराय वस्ती तसेच पुढे ढाक टॉप यासाठी यायचं आहेच. पुन्हा एकदा संधिप्रकाशात काहीही न बोलता दोघेही मागे ढाककडे पाहत सांडशीच्या वाटेला लागलो.
सवाष्णी आणि बहिरीचा घाट या दोन सुंदर व मजबूत चाल असणाऱ्या घाटवाटा. सकाळ पासून आमचे वेळेचे नियोजन थोडे गंडलेच त्यामुळे धावपळ बरीच झाली पण एक दिवस घाटावर कोंडेश्वर किंवा बहिरीच्या गुहेत मुक्काम करून या ट्रेकला योग्य न्याय देता येईल.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/10/savashni-kondeshwar-bahiri.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. फोटो हिरवेगार.
पाच खेपा केल्यात. वाट फसून चारदा फिरून परतलो. एकदा पोहोचलो कोंडेश्वरला तिथे एका देवळापाशी ( आता शिमिट ठेवलेल होते) खोपटात रात्री राहून परत आलो कामशेत एसटीने. देऊळ पार बदलून टाकले आहे.
घाटवाटांची नावे माहीत नाही पण ढाक गाव ते कोंडेश्वर पिंजून झालं. बहिरी गुहेत मात्र मला शक्य नाही.
खाली सांडशीतच गाववाला दाखवतो बोटाने वाट तसं जातो आणि परत येतो. "मग काय सापडलं का नाही कोंडेश्वर"?
"नाही. येईन परत."
इथे कुणाला घाई आहे?

छान लिहीलेय, हे कोंडेश्वर म्हणजे बदलापुरचे का??? एकदा गेली होते पावसाळ्यात तेव्हा मंदीर परीसर पुर्ण पाण्याखाली गेला होता.

नाही.
कर्जत स्टेशन पूर्वेकडे एक करंगळीसारखा सुळका व उजवीकडे हत्तीच्या डोक्यासारख्या उंचवट्याचा डोंगर दिसतो त्यावर मागे आहे.

नाही.
कर्जत स्टेशन पूर्वेकडे एक करंगळीसारखा सुळका व उजवीकडे हत्तीच्या डोक्यासारख्या उंचवट्याचा डोंगर दिसतो त्यावर मागे आहे >>> ओह्ह,

कर्जतला कधी गेले नाहीये सो हे माहित नव्हते

छान आहे वर्णन आणि फोटो !!! बिबळ्याचा मुक्त वावर असलेल्या भागात ट्रेक करताना भीती वाटली नाही का ?

पाच खेपा केल्यात. वाट फसून चारदा फिरून परतलो. एकदा पोहोचलो कोंडेश्वरला तिथे एका देवळापाशी ( आता शिमिट ठेवलेल होते) खोपटात रात्री राहून परत आलो कामशेत एसटीने. देऊळ पार बदलून टाकले आहे.
घाटवाटांची नावे माहीत नाही पण ढाक गाव ते कोंडेश्वर पिंजून झालं. बहिरी गुहेत मात्र मला शक्य नाही.
खाली सांडशीतच गाववाला दाखवतो बोटाने वाट तसं जातो आणि परत येतो. "मग काय सापडलं का नाही कोंडेश्वर"?
"नाही. येईन परत."
इथे कुणाला घाई आहे? >>>>
छान अनुभव SRD

१) उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हा तिसऱ्या फोटोतली झाडी आहे तिथे चकवा लागला. कशीतरी वर आलो ती वाट शोधली तेव्हा दोन वाजलेले. मग परत आलो.
२) पुढच्या वेळेस पाऊस संपल्यावर गेलो तेव्हा वाटेचा चढ संपून पठार लागल्यावर दगडांच्या लगोऱ्या रचत पुढे गेलो मग गाववाल्याने सांगितलेला ओढा चढून वर गेल्यावर ते टी जंक्शन आले.
३) ही जागा आणि तेलबैला ते सिद्धगड डोंगर फार चकवा लागतो. आणि वाटेत कुणीच भेटत नाही.
- सावध करण्यासाठी लिहित आहे.

बाकी पहिल्या फोटोचे वाटरकलर फार सुंदर दिसेल.

बिबळ्याचा मुक्त वावर असलेल्या भागात ट्रेक करताना भीती वाटली नाही का ? >>> धन्यवाद गोल्डफिश. कुतुहलयुक्त भिती तेवढ्या पुरती वाटली.