सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.
आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'... किंवा 'अमुक अमुक असं जेव्हा घडतं तेव्हा कुठेतरी सांगावंसं वाटतं की....' किंवा '.... असं आपल्या मनाला जेव्हा कुठेतरी जाणवतं तेव्हा....'. कधी कधी एखादा कवी देखील लिहून जातो की 'हृदयात कुठेतरी हलल्यासारखं वाटतं'. ह्या मंडळींना कदाचित वाटत असावं की ह्या 'कुठेतरी' शिवाय पाहिजे ते गांभीर्य वाक्याला येणार नाही.
कुठेतरी मध्ये ठिकाणाबद्दल एक अनिश्चितता आहे, तर काही जणांना ठिकाणाची निश्चितता मांडायला आवडतं. जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने 'या ठिकाणीच' घडत असतात. 'आज या ठिकाणी आपल्याला भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत... त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे ...' किंवा बोलण्याच्या भरात ह्या वक्त्यांना अचानक संतवचनांची किंवा कवितांची आठवण होते तेव्हा '... याठिकाणी संत तुकारामांनी सुध्दा म्हणून ठेवलेलं आहे...' वगैरे वगैरे.
न्युज चॅनलवर कधी कधी एखादा राजकीय पुढारी चर्चेत भाग घेतो. चर्चा अगदी जोरात चालू असते. मग मध्येच कधीतरी ह्या पुढाऱ्याला त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याची संधी दिली जाते. तेव्हा अगदी हटकून सगळे पुढारी 'निश्चितपणे' शब्द वापरतात. आठवून पहा.. 'आज तुमच्या माध्यमातून मी हे निश्चितपणे सांगू इच्छितो की आमचा पक्ष निश्चितपणे सामान्यांच्या पाठीशी उभा राहील... जंतेचे प्रश्न आम्ही निश्चितपणे मांडू....'.
असाच एक माझा आवडता शब्द म्हणजे 'वगैरे'. खरं तर एकापेक्षा जास्त गोष्टी किंवा कृती असतील तर वगैरे शब्द वापरावा असं व्याकरण सांगतं. पण मी हा शब्द फारच मुक्तपणे वापरतो. 'आज मी खेळायला वगैरे गेलो होतो' इथपर्यंत ठीक आहे.. पण 'आज काय वाढदिवस वगैरे आहे की काय!' हे जरा फारच झालं. वैभव जोशी यांची तर 'वगैरे' शब्दावरून एक संपूर्ण कविताच आहे. आपल्यापैकी अनेकांनी सचिन खेडेकरांनी केलेलं हे सादरीकरण वगैरे पाहिलंच असेल.
मागे मी बेंगलोरला राहत असताना कर्नाटकी हिंदीची अशीच मजा आली होती. (काही अज्ञ लोकांसाठी सूचना - बेंगलोरमध्ये हिंदी बोलतात बर का.) वेटर येऊन विचारायचा - 'सार (म्हणजे sir), क्या होना?' यावर 'मेरे पापा कहते है की मै बडा होकर इंजिनियर बनुंगा' हे उत्तर अपेक्षित नसून 'टी या कापी' हे अपेक्षित असतं. 'छुट्टा होना तो इधर नही, कोई दुसरा दुकानमे पुचना' असं कोणी दुकानदार खेकसायचा. कानडी लोकांबरोबर कधी जनगणमन म्हणलं आहे का? शेवटच्या ओळीत ते 'जनगण मंगळदायक जय हे' असं म्हणतात. 'ळ'चा अभिमान ही तर दक्षिणेतल्या भाषांची स्पेशालिटी! कर्नाटकी हिंदीवर एक आख्खा लेख होऊ शकेल, तो नंतर केव्हा तरी. पण तो 'क्या होना' अजूनही डोक्यातून जात नाही.
इंग्रजी बोलताना अडखळणे टाळण्यासाठी तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर like, की, actually आणि means या शब्दांचा अनवधानाने वापर केला जातो. 'I was telling you... की she is my .... like ... not so favorite singer... means.. actually she is not that bad ... but like ... you know'.
संस्कृत काव्यामध्ये याच प्रकारे वै, च, हि आणि तु हे चार एकाक्षरी शब्द वापरले गेलेले आहेत. 'भोजनान्ते च किं पेयं, जयन्त: कस्य वै सुत:' यासारख्या वाक्यांमध्ये च, वै वगैरे शब्द केवळ ते वाक्य छंदात (मीटरमध्ये) बसवायला मदत करतात. पुढे पुढे हे प्रकार इतके वाढले की केरळ मधल्या 'तोल' नावाच्या संस्कृत कवीने ह्या गोष्टीची खालिल श्लोकात खिल्ली उडवली आहे. -
उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः।
एष आह्वयते कुक्कु च वै तु हि च वै तु हि॥
पहिल्या वाक्यात राजाला उठून तोंड धुवायला सांगताना 'मुखं प्रक्षालयस्व' पर्यंत अर्थ पूर्ण लागतो, मग तो पुढचा 'टः' काय आहे? या वाक्यात (या ठिकाणी) मुखं प्रक्षालयस्व पर्यंत ७ अक्षरे आल्यामुळे वृत्तात एक अक्षर कमी पडतं. दुसऱ्या वाक्यात कोंबडा आरवतो आहे हे सांगताना 'एष आह्वयते कुक्कुट:' असं पाहिजे पण इथे एक अक्षर जास्त आहे. तेव्हा ह्या कवीने दुसऱ्या ओळीतला 'ट:' काढून सरळ पहिल्या ओळीत टाकला. आणि त्यावर कडी म्हणजे 'कोंबडा आरवतो आहे' हे अर्ध्या ओळीत सांगून झाल्यावर पुढे काही सांगावंसं राहिलं नाही, मग उरलेली ओळ कशी पूर्ण करायची? तर ह्या करामती कवीने सरळ 'च वै तु हि च वै तु हि' टाकून दिलं. टीका करावी तर अशी!
असेच आणखी काही विशेष शब्द कुठेतरी विशेषत्वाने वगैरे वापरलेले तुम्हाला माहिती असल्यास या ठिकाणी निश्चितपणे सांगा.
- शंतनु
(हा लेख २०१५ मध्ये लिहिलेल्या माझ्याच ब्लॉगवरून पुनःप्रकाशित)
मस्त लेख. मलाही अगदी इरीटेट
मस्त लेख. मलाही अगदी इरीटेट होतात असे फीलर्स.
ऐक ना.. ने सुरु होणारे संवाद, आजच्या तारखेला,
'एकेक चमचा'चं 'वन वन स्पून'
'एकेक चमचा'चं 'वन वन स्पून'
आज या ठिकाणी - ह्याबद्दल मी
आज या ठिकाणी - ह्याबद्दल मी मराठी दिनाचे टाकणे ह्यात लिहिले होते व ह्या लेखातील मुद्याशीही सहमत आहेच
कुठेतरी - हे क्रिकेट समालोचक 'कहीं ना कहीं 'म्हणतात तिथून घुसले असावे
लेख आवडला
वक्तृत्वकला नसल्यामुळे जागा भरण्यासाठी व कसेबसे समेवर येण्यासाठी जे शब्दप्रयोग निर्माण झाले आहेत त्यांच्यावर कोणीतरी पी एच डी करायला हवी. असा कोणी असलाच तर त्याची मदत करा.
'गणपतिवाहनारिनयने' -- मेक
'गणपतिवाहनारिनयने' -- मेक सेन्स
मी मागे एका मित्राच्या मुलासाठी नाव शोधत होते तेंव्हा सागर म्हणल्यावर 'काहीही काय' आणि अनव म्हणल्यावर 'वा वा' केलेलं आठवतंय
सहज लक्षात आलं मी पण बरेच फिलर वापरते मराठी आणि इंग्लिश मधे बोलताना. फिलर वापरणं न वापरणं हे बहुदा तुमच्या भाषेतल्या फ्लुएन्सीवर ठरत असावं का?
"असा कोणी असलाच तर त्याची मदत
"असा कोणी असलाच तर त्याची मदत करा." -
ते हिंदी इंटु मराठी प्रकार तर अफाट आहे. त्यामुळे हल्ली पोळी 'सोबत' भाजी खातात. 'राहून राहून' असं वाटत रहातं. ते कुठेतरी सुद्धा 'कही ना कही' चं च मराठीकरण आहे.
लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या..
लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या..
मराठीत शब्दशः भाषांतर केलेल्या जाहिराती हा एक स्वतंत्र विषय आहे ! सध्या ती 'हिरो' ची 'शान आहे, इमान आहे' ही मोठ्ठी जाहिरात हे फक्त एक चटकन आठवलेलं उदाहरण. अश्या अनेक किंबहुना सगळ्याच भाषांतर केलेल्या जाहिराती डोक्यात जातात.
रीया, मी तर मराठीत बोलताना पण
रीया, मी तर मराठीत बोलताना पण 'वगैरे' वगैरे वापरतो त्याचा फ्लुएन्सीशी संबंध नसावा. मागे म्हटल्याप्रमाणे माझा गोरा मास्तर पण इंग्रजीत 'बेसिकली' हा फिलर वापरतो.
या फिलर्सना मराठी/ संस्कृतात
या फिलर्सना मराठी/ संस्कृतात पाद ( की पद?) पूरणार्थक म्हणतात ना?
शंतनू, तेच म्हणतेय मी..
शंतनू, तेच म्हणतेय मी.. आपल्याला पुढचा शब्द सुचायला एक क्षण हवा असेल तर आपण फिलर वापरत असु का?
मराठीत फिलर वापरणारे इंग्लिश मधे जास्तच फिलर्स वापरत असतील , फक्त कधी नोटीस नसेल केलं
वावे, पादपूरणार्थक - आवरा!
वावे, पादपूरणार्थक - आवरा! बरोबर आहे तुमचं. हा शब्द बर्याच वर्षांनी ऐकला. च वै तु हि - हे पादपूरणार्थक म्हणून वापरले जातात. या ठिकाणी, कुठेतरी - हे नाहीत.
मराठीत फिलर वापरणारे इंग्लिश मधे जास्तच फिलर्स वापरत असतील >> शक्य आहे! पुण्यात इंजीनियरिंगला असताना एक मास्तर 'इझण्टिट' फार वापरायचे. त्यांनी स्वतःची ओळख पण 'माय नेम इझ अमुक तमुक, इझण्टिट!' अशी करून दिलेली आठवते आहे. आम्ही पुढे पुढे त्यांच्या प्रत्येक इझण्टिट ला टॅली मार्क्स काढायला लागलो. काही वर्षांनंतर आपण स्वतः सुद्धा किती फिलर्स वापरतो हे लक्षात आलं.
आमचे झूलॉजीचे सर “ इन टू धीस
आमचे झूलॉजीचे सर “ इन टू धीस दॅट इज द “ असा भलामोठा फिलर वापरायचे.
लेख आवडला, च वै तु हि ह्या
लेख आवडला, च वै तु हि ह्या प्रकाराबद्दल रोचक माहिती मिळाली
मस्तं लेख! लोक फिलर्स वापरतात
मस्तं लेख! लोक फिलर्स वापरतात. आणि ते ऐकताना इतरांना इरिटेट होतं याची मला माहिती होती. म्हणून मी जाणीवपूर्वक फिलर्स वापरत नाही. फिलर्स न वापरण्याकडे मी नेहमी सजग असतो.
आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे
आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे मास्तर 'येस!?' वापरायचे आणि त्याचा उच्चार ते 'एस' करायचे..
एक दिवस टॅली मार्क वापरून त्यांचे 'एस' मोजले.. अर्ध्या तासाच्या लेक्चरमध्ये तब्बल ६३ वेळा 'एस' वापरलं होतं त्यांनी
मस्त लेख.
मस्त लेख.
'यु नो' हा च वै तु हि अनेक लोक वापरतात. वाक्याची सुरूवात यु नो, वाक्याचा शेवट यु नो! अरे बाबा हाऊ कॅन आय नो, आय डोन्ट नो म्हणून तर तू सांगतोयस ना!
ते isnt it वाले सर आम्हाला पण
ते isnt it वाले सर आम्हाला पण होते बहुदा
पूनम, हो, त्या 'यू नो' ची
पूनम, हो, त्या 'यू नो' ची लागण अनेकांना झालेली पाहिली आहे. आम्ही अशांना 'युनो'चे सदस्य म्हणतो.
रीया, शीओपी का?
'युनो'चे सदस्य >>>
'युनो'चे सदस्य >>>
कवितांमधे असे फिलर शब्द
कवितांमधे असे फिलर शब्द वापरण्याबद्दल अत्र्यांनी बहुधा लिहीले होते - की एकाने "अन्" वापरले की सगळेच जिथेतिथे "अन्" वापरून कवितेची "अन्नान्नदशा" करून टाकतात, असे काहीतरी
आय नो! युनोचे सदस्य
युनोचे सदस्य ना? आय नो!
आपले क्रिकेटर्स उत्तर देताना
आपले क्रिकेटर्स उत्तर देताना बर्याच वेळेस सुरूवात Absolutely ने करतात, यू नो.
छान लेख.
"आपले क्रिकेटर्स उत्तर देताना
"आपले क्रिकेटर्स उत्तर देताना बर्याच वेळेस सुरूवात Absolutely ने करतात, यू नो." - 'या, ऑब्व्हियसली, ... आय मीन' हे खूप वेळा ऐकलय.
आपले क्रिकेटर्स उत्तर देताना
आपले क्रिकेटर्स उत्तर देताना बर्याच वेळेस सुरूवात Absolutely ने करतात, यू नो. >> बॉईझ् प्लेड वेल
फारएण्ड, ते 'अन्नान्नदशा'
फारएण्ड, ते 'अन्नान्नदशा' आवडल्या गेलं आहे!! खरंच काही सुचलं नाही तर अन् चपखल बसतो.
यू नो आणि महेंद्रसिंग धोनीचे
यू नो आणि महेंद्रसिंग धोनीचे खुप जवळचे नाते आहे.... मोजा एकदा!
मलाही वाक्यावाक्याला like
मलाही वाक्यावाक्याला like म्हणायची खुप सवय होती.... Toastmaster's च्या कृपेने मोडली आता ती सवय!
यू नो आणि महेंद्रसिंग धोनीचे
यू नो आणि महेंद्रसिंग धोनीचे खुप जवळचे नाते आहे >> हो. बरेच अहेत युनोचे सदस्य.
Pages