खनिजांचा खजिना : भाग २
भाग १ : https://www.maayboli.com/node/68939
******************************************************
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही ते काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते.
सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.
आहारातील स्त्रोत व प्रमाण:
स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटेल की ‘वरून घातलेले मीठ’ हाच सोडियमचा स्त्रोत आहे. पण तसे नाही. दूध, मांस आणि मासे या नैसर्गिक पदार्थांतही ते आढळते. याव्यतिरिक्त आपण अनेक प्रक्रिया केलेले, साठवलेले आणि खारावलेले पदार्थ मिटक्या मारीत खातो. त्यांत तर सोडियम दणकून असते. ब्रेड, वेफर्स, लोणची, sauces.... यादी तशी संपणारच नाही ! त्यामुळे आधुनिक खाद्यशैलीत आपण सगळेच गरजेपेक्षा जास्तच सोडियम खातो.
रोज नक्की किती सोडियम शरीराला आवश्यक आहे, हा तसा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तसे सरळ नाही आणि त्याबाबत थोडे मतभेदही आहेत. एका अभ्यासानुसार त्याची रोजची खरी गरज ही जेमेतेम अर्धा ग्रॅम आहे. जगभरातील अनेक वंश आणि खाद्यशैलींचा अभ्यास केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक शिफारस केली आहे. त्यानुसार रोजची सोडियमची गरज २ ग्रॅम आहे आणि याचाच अर्थ असा की ५ ग्रॅम मीठ (NaCl) हे पुरेसे आहे. हा जो आकडा आहे त्याला ‘वरची’ पातळी समजायला हरकत नाही. त्यापेक्षा जरा कमीच खाल्ले तर तब्बेतीला ते चांगलेच आहे असा सर्वसाधारण वैद्यकविश्वातला सूर आहे. अतिरिक्त खाल्ले असता आपली तब्बेत बिघडवणाऱ्या “पांढऱ्या विषां”पैकी ते प्रमुख आहे असे प्रतिपादन काही जण करतात.
शरीरातील अस्तित्व आणि कार्य:
शरीरातील ७५% सोडियम हा विविध क्षारांच्या रुपात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतो. शरीरातील एकूण द्रव हे दोन गटांत विभागलेले आहेत:
१. पेशी अंतर्गत द्रव आणि
२. पेशी बाह्य द्रव
सोडियम हा मुख्यतः पेशीबाह्य द्रवांत असतो. रक्त हे प्रमुख पेशीबाह्य द्रव होय. त्यातील सोडियम हा मुख्यतः क्लोराईड व बायकार्बोनेटशी संयुगित असतो. त्याची मुख्य कार्ये अशी आहेत:
१. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक
२. रक्ताचे एकूण आकारमान(volume) स्थिर राखणे
३. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण (pH) स्थिर राखणे
४. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.
शरीरातील चयापचय:
आहारातील सर्व सोडियम रक्तात शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे लघवी, शौच आणि घामाद्वारे होते. त्यांपैकी सर्वात जास्त उत्सर्जन लघवीतून होते आणि ते आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. सोडियमचे घामाद्वारे उत्सर्जन हे अत्यल्प असते. अगदी उष्ण व दमट हवामानात देखील ते विशेष वाढत नाही हे लक्षात घ्यावे. दीर्घकाळ अशा हवामानात राहिल्यास शरीर हळूहळू या प्रक्रियेस जुळवून घेते आणि शरीरातील सोडियमचा समतोल राहतो.
आहारातील मीठ आणि रक्तदाब:
समाजात बहुचर्चित असा हा विषय आहे. त्यातून उच्च-रक्तदाब असणाऱ्यांसाठी तर विशेष महत्वाचा. गरजेपेक्षा जास्त सोडियम रक्तात साठू लागला की त्याबरोबर जास्त पाणीही साठवले जाते. परिणामी रक्ताचे आकारमान (volume) वाढते. त्यातून हृदयावरील भार वाढतो आणि अधिक दाबाने त्याला रक्त ‘पंप’ करावे लागते. त्यातून रक्तदाब वाढतो.
आहारातील सोडीयम आणि रक्तदाब यांचा थेट संबंध (directly proportional) आहे. प्रौढांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की :
१. अधिक सोडियम >>> रक्तदाब वाढणे आणि
२. कमी सोडियम >>>> रक्तदाब कमी होणे.
असे प्रयोग निरोगी आणि उच्चरक्तदाब असलेले, अशा दोघांत करून झाले आहेत आणि त्यातून वरील निष्कर्ष निघतो. साधारणपणे आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी ‘वरून घातलेले’ मीठ आणि प्रक्रियाकृत साठवलेले पदार्थ टाळावेत अशी शिफारस आहे. स्वयंपाकात समाविष्ट मिठाचा मात्र बाऊ करू नये. ते आवश्यकच आहे. (दीर्घ मूत्रपिंड विकाराने बाधित व रुग्णालयात दाखल झालेल्यांबाबत मात्र त्याचे काटेकोर मोजमाप असते).
काही प्रगत देशांत सोडियमचे प्रमाण कमी केलेले खाण्याचे मीठ उपलब्ध असते. हाही एक सोडियम-नियंत्रणाचा उपाय होय.
आजच्या घडीला जगभरातील सुमारे निम्मे प्रौढ लोक उच्चरक्तदाबाने बाधित आहेत. यातून आहारातील सोडियम नियंत्रणाचे महत्व अधोरेखित होते. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये, असे अलिकडील एक संशोधन सांगते.
आहारातील मीठ आणि इतर आजार:
अधिक सोडियमचा करोनरी हृदयविकार आणि Stroke यांच्यातील संबध तपासण्यासाठी बरेच संशोधन झालेले आहे. निष्कर्ष उलटसुलट आहेत. दीर्घकाळ सोडियम अधिक्याने या आजारांचा धोका वाढतो असे म्हणता येईल. तसेच वर्षानुवर्षे असे अधिक्य राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच त्वचा व पचनसंस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतात असा इशारा काही संशोधकांनी दिला आहे.
सोडियमची रक्तपातळी :
निरोगीपणात ती १३५ ते १४५ mmol/L इतकी असते. इथे एक मुद्दा ध्यानात घ्यावा. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, अतिदक्षता विभागातले रुग्ण आणि शस्त्रक्रिया झालेले रुग्ण इत्यादींमध्ये त्याचे महत्व असते. इथे सोडियमबरोबरच पोटॅशियम आणि क्लोराईड यांची एकत्रित मोजणी करतात. या गटाला ‘Electrolytes’ असे म्हणतात.
आता कोणत्या आजारांत ही पातळी कमी/जास्त होते त्याचा आढावा घेतो.
रक्तातील सोडियम कमतरता :
रुग्णालयात दाखल रुग्णांत खूप वेळा आढळणारी ही स्थिती विशेषतः खालील आजारांत दिसते:
१. हृदयकार्याचा अशक्तपणा (failure)
२. मूत्रपिंड विकार
३. तीव्र जुलाब व उलट्या होणे
सोडियम-पातळी कमी होणे हे मेंदूसाठी धोकादायक असते. त्यामुळे या पातळीवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. पातळी १२० च्या खाली गेल्यास ती गंभीर अवस्था असते.
रक्तातील सोडियम अधिक्य:
ही स्थिती तुलनेने कमी रुग्णांत आढळते. मूत्रपिंडाच्या व्यवस्थित कामासाठी Aldosterone व ADH या हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. अनुक्रमे Adrenal व Pituitary ग्रंथींच्या आजारांत ते बिघडते आणि त्यामुळे ही अवस्था येते. वाढत्या पातळीचाही मेंदूवर विपरीत परिणाम होतो. ती १६०चे वर गेल्यास ते गंभीर असते. तेव्हा रुग्ण बेशुद्ध पडतो.
…. तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य – सोडियम. मिठाच्या खाणी, समुद्राचे पाणी आणि संपूर्ण जीवसृष्टीत आढळणारे. आपल्यासाठी जीवनावश्यक आणि आहारात माफक प्रमाणात हवेच. मात्र जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याचा आहारातील अतिरेक मात्र नको.
***********************************************
मीठ वरुन घेण्याची सवय
मीठ वरुन घेण्याची सवय नसल्याने यावर काही बोलू शकणार नाही __/\__
चांगली माहिती , मिळतेय ह्याबद्दल धन्यवाद __/\__
उत्तम मालिका डॉक्टर!
उत्तम मालिका डॉक्टर!
क्रिएटीनीन वाढलं असताना शहाळ्याचे पाणी प्यायला बंदी असते. त्याचे कारण त्यात जास्त प्रमाणात सोडीअम असते असे आहे का?
फक्त सोडीअमची कमतरता असेल (बाकीची खनिजे कमी नसतील) तर एलेक्ट्रल आणि घरी बनवलेले साखर मिठाचे पाणी यात वैद्यकीय दृष्ट्या काही फरक असतो की ते फक्त मार्केटींग आहे?
माधव, धन्यवाद
माधव, धन्यवाद
शहाळ्याचे पाणी प्यायला बंदी असते. त्याचे कारण त्यात जास्त प्रमाणात सोडीअम असते असे आहे का? >>>>
क्रिएटीनीन वाढलं असताना बरेचदा पोटॅशियम ही वाढलेले असते. त्यामुळे शहाळ्यातील पोटॅशियम हा काळजी करण्याचा भाग असतो.
फक्त सोडीअमची कमतरता असेल (बाकीची खनिजे कमी नसतील) तर एलेक्ट्रल आणि घरी बनवलेले साखर मिठाचे पाणी यात वैद्यकीय दृष्ट्या काही फरक असतो की ते फक्त मार्केटींग आहे? >>>>
बरोबर मार्केटिंगच. घरी बनवलेले 'सलाईन' पुरेसे आहे !
छान महिती मिळत आहे.
छान महिती मिळत आहे.
माझ्या आजोबांचा एक लाडका घोडा
माझ्या आजोबांचा एक लाडका घोडा होता. तो गेला त्या दिवशी आजोबांनी मिठ सोडले. त्यामुळे घरातही नकळत सगळेच मिठ कमी खायला लागले.
शाली धन्यवाद.
शाली धन्यवाद.
घोड्याचे दुःख आहे पण पुढे चांगली कौटुंबिक सवय लागली. ☺️
बाजारात वेगवगळी मीठं मिळत
बाजारात वेगवगळी मीठं मिळत आहेत. अतिशुद्ध, समुद्री, सेंधव, आयोडिनयुक्त, हिमालयन पिंक साल्ट. ह्याबद्दल काही?
संदीप,
संदीप,
मिठाचे काही प्रकार : आढावा
१. अतिशुद्ध = NaCl फक्त. इतर ‘मिसळ’ नाही. दिसायला शुभ्र.
२. काळं मीठ ( rock salt.) त्यात इतर खनिजांची मिसळ.
३. आयोडिनयुक्त मीठ : यात K- iodate घालतात. तसेच dextrose हे स्थिरतेसाठी.
४. आयोडिन व लोहयुक्त मीठ.
५. पोटॅशियम व मॅग्नेशियामयुक्त मिठावर लेखात लिहीले आहेच.
मग ह्यातले कुठले मीठ आपल्याला
मग ह्यातले कुठले मीठ आपल्याला / नॉर्मल माणसांना योग्य असते??
विनिता,
विनिता,
आपण शहरवासीयांनी पूर्णपणे आयोडिनयुक्त मीठ वापरावे की नाही? यावर मतभेद आहेत.
आमच्या जवळच्या दुकानात साधे जाडेभरडे मिळते, अगदी स्वस्तात. मी असे करतो की पावसाळ्याचे ४ महिने नवे चकाचक मीठ आणि उन्हाळ्यात साधे जाडेभरडे. त्यांच्या खारटपणात थोडा फरक जाणवतो. पण रासायनिक प्रमाणाबद्दल माहित नाही.
लोहयुक्त मीठ हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना लोहयुक्त समतोल आहार काही कारणाने मिळत नाही.
धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद डॉक्टर
खडे मीठ वापरावे असे म्हणतात, जास्त प्रोसेस केलेल्या मीठातून खनिजे मिळत नाहीत.
+ १
+ १
लहानपणी आठवतंय की तेव्हा घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती. अगदी जाडेभरडे असायचे ते.
लहानपणी आठवतंय की तेव्हा
लहानपणी आठवतंय की तेव्हा घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती. अगदी जाडेभरडे असायचे ते.>>> +१
मीठ सोडण्याबद्दल काही शंका
मीठ सोडण्याबद्दल काही शंका आहेत.
माझ्या वडलांना पाणी उकळून प्यायची सवय होती आणि आहे अजूनही. ते दिवसातून सहा ते आठ तांबे पाणी पीत असत. एव्हढे पाणी का तर काही वर्षांपूर्वी बहुधा बालाजी तांबे किंवा असेच सेलेब्रिटी डॉक्टर असलेल्या कुणाकडून तरी सकाळ मधे किमान आठ लीटर पाणी पिले पाहीजे असे म्हटल्याचे छापून आले होते. कदाचित लेख असावा स्वतंत्र... हे कदाचित १२ ते १५ वर्षांपूर्वीचे.
त्यानंतर इतक्या वर्षांनी सोडीयम कमी होऊ लागले तेव्हां डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून हिस्ट्री खणून काढल्यानंतर असा निष्कर्ष काढला की एव्हढ्या पाण्यामुळे क्षार कमी होतात आणि उकळलेले पाणी पिल्याने क्षारांचा इनटेक अगदी कमी आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण दीड ते दोन लीटर प्रतिदिन एव्हढेच ठेवायला सांगितले आहे.
त्यामुळे एकदम मीठ कमी केलेले चांगले आहे का ?
त्यामुळे एकदम मीठ कमी केलेले
त्यामुळे एकदम मीठ कमी केलेले चांगले आहे का ?>>>>
* नक्कीच नाही. लेखात लिहिल्याप्रमाणे नॉर्मल रक्तदाब असणाऱ्यांनी त्याचा बाऊ करू नये; उठसूठ खारावलेले पदार्थ खाऊ नयेत हे ठीक.
* उच्च दाबवाल्यांनी अधिक बंधन पाळावे.
* ते भरमसाठ पाणी पिणे अयोग्य आहे. तरुण वयात मूत्रपिंडाचे कार्य ठणठणीत असताना त्याने बिघडणार नाही. पण उतार वयात, मधुमेहादि आजार मागे लागल्यावर ते कार्य व्यवस्थित असेलच असे नाही. मग अतिरिक्त पाणी रक्तात साठले की तुलनात्मक सोडियम कमी होतो.
धन्यवाद कुमार १.
धन्यवाद कुमार १.
छानच लेख अस्तात तुमचे डॉ.
छानच लेख अस्तात तुमचे डॉ. शरीराचा समतोल राखायला किती गोष्टी कारणीभूत असतात हे तुमच्या लेखातून कळते.
माझ्या आजीला (वय ८३) शरीरातील मीठ कमी झाल्यामुळे डॉ. नी रिकाम्या कॅपसूल मधून मीठ भरून घ्यायला सांगितलं.
डॉ. नी रिकाम्या कॅपसूल मधून
डॉ. नी रिकाम्या कॅपसूल मधून मीठ भरून घ्यायला सांगितलं. >> आम्हाला एका होमिओपॅथिक डॉक्टरने सांगितले होते असेच. पण मंगेशकरला नैसर्गिक रित्या सोडीयमची लेव्हल वाढू द्यावी असे सांगितले.
अंजली व किरण,
अंजली व किरण,
तुमच्या कुटुंबियांचे अनुभव रोचक व इतरांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यातून सोडियमची कमतरता हा देखील त्रासदायक प्रकार आहे, हे सर्वांच्या लक्षात येईल.
धन्यवाद !
शरीरातील मीठ कमी झाल्यामुळे
.
VB,
VB,
नीट लक्षात घ्या.
१. मग कॅपसुल मध्ये भरुन जरी खाले तरी ते नुसते मिठच झाले की >>>>
त्यांच्या आजीला (वय ८३) शरीरातील मीठ कमी झाल्यामुळे डॉ. नी रिकाम्या कॅपसूल मधून मीठ भरून घ्यायला सांगितलं होते. एरवी नाही कोणी असे घ्यायचे.
२. अजुन एक, वरुन मिठ खाण्याचे नक्की काय दुष्परिणाम होतात >>>>
स्वयंपाकात घातलेले आणि काही पदार्थांत नैसर्गिक असलेले सोडियम आपल्याला पुरेसे असते. म्हणून “वरून” अजून घेत राहिले की ते शरीराला अतिरिक्त होते.
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा याबद्दल धन्यवाद. वाचतोय..
छान आहे लेख. धन्यवाद डॉ.
छान आहे लेख. धन्यवाद डॉ. कुमार
चांगला लेख आणि चर्चा.
चांगला लेख आणि चर्चा.
माझ्या मते पातळ पदार्थात खडे
माझ्या मते पातळ पदार्थात खडे मीठ व बाकीत नेहमीचे बारीक मीठ वापरले तर समतोल साधला जाईल
छान माहितीपूर्ण लेख!
छान माहितीपूर्ण लेख!
( आवांतर : लक्षणे आजाराच्या कारणानुसार असतात. > लक्षणं वगैरे मुळे मला फार गोंधळून जायला होतं. कुठल्याही अना-रोग्यासंदर्भातल्या लक्षणांपैकी काही लक्षणं आपल्यात आहेत असं मला वाटतं. त्यावर माझी एक मैत्रिण गमतीने मला मानसिक आजाराच हे लक्षण आहे आणि त्याचच काव्यात्मक रूप म्हणजे चिंतातूर जंतू असं म्हणते! )
सर्व नवीन प्रतीसादकांचे
सर्व नवीन प्रतीसादकांचे मनापासून आभार !
चांगली व उपयुक्त चर्चा. काहींचे अनुभवकथनही छान.
चिंतातूर जंतू >>>>
यापुढील भाग ३ (Potassium) इथे
यापुढील भाग ३ (Potassium) इथे:
https://www.maayboli.com/node/68990
धन्यवाद!
धन्यवाद!
डॉक्टर, Pre menses शरीरात
डॉक्टर, Pre menses शरीरात प्रचंड water retention होतं, ते कसं टाळायचं? डेट आधीच्या आठवड्यात मीठ पूर्ण टाळलं, अगदी 0% consumption तर उपयोग होईल की अजूनच काही दुष्परिणाम होऊ शकतो? माझं वजन एक दीड किलो वाढतं आणि शरीर खूप bloated असतं. (तेव्हा कोणताही महत्वाचा इव्हेन्ट असेल तर झुलत झुलत जावं लागतं. )
Pages