शीतयुद्धाच्या चरमकाळात सोविएत आणि नाटो राष्ट्रात एकमेकांबद्दल टोकाचा अविश्वास होता. नाटो राष्ट्रांसाठी सोविएत रशियात हेर वा डबल एजंट चालवणे जवळजवळ अशक्य होते. केजीबीची सरकार तसेच समाजावर मजबूत पकड होती. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये देशांतर्गत व देशाबाहेर काम करण्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा होत्या. जसे अमेरिकेत एफबीआय व सीआयए, इंग्लंडमध्ये एम.आय.५ व एम.आय.६ (भारतात आयबी व आर अँड ए.डब्ल्यु.). मात्र सोविएतमध्ये केजीबीच सर्वेसर्वा होती. केजीबी निरंकुशदेखील होती. निकिता क्रुश्चेवच्या स्तालिनला उघड्या पाडणार्या निवेदनांनंतर थोडी शिथिलता आली होती मात्र ब्रेझनेवच्या जवळजवळ वीस वर्षांच्या काळात केजीबी पुन्हा सर्वात शक्तिशाली यंत्रणा बनली. ब्रेझनेव्ह नंतर सर्वोच्च नेता झालेला युरी अँड्रोपोव्ह तर पुर्वाश्रमीचा केजीबी प्रमुख. आणि अश्या वातावरणात इंग्लंडच्या एम.आय.६साठी ओलेग गोर्दिएव्स्की या केजीबीच्या वरिष्ठ अधिकार्याने डबल एजंट म्हणून काम करण्यासाठी होकार दिला. बेन मॅकिंटरचे 'द स्पाय अँड द ट्रेटर' हे शीतयुद्धातील या कदाचित सर्वात परिणामकारक ठरलेल्या डबल एजंटची कहाणी सांगते. आणि अद्भुताहून रम्य कहाणी आहे ही!
ओलेग गोर्दिएव्स्की केजीबी कुटुंबात जन्मलेला. वडिल स्तालिनच्या केजीबीत भरती झालेले साम्यवादावर गाढ विश्वास असलेले अधिकारी, मोठा भाऊ केजीबीचा इल्लिगल एजंट(१) म्हणून जर्मनी तसेच आफ्रिकेत तैनात. पुढे ओलेगची दुसरी पत्नी व त्याच्या दोन मुलींची आईपण केजीबीत अधिकारी असलेल्या दांपत्याची मुलगी. सुरुवातीला ओलेगचाही सोविएत आदर्शांवर व समाजवादावर विश्वास होता. मात्र १९५६च्या हंगेरितील(३) व ६८च्या चेकोस्लावाकियातील(४) सुधारणांचे सोविएत यंत्रणेने रणगाडे व लष्कराच्या सहाय्याने केलेले दमन पाहून त्याचा व्यवस्थेवरील विश्वास उडला. डेन्मार्कमध्ये सोविएत दुतावासात कनिष्ठ केजीबी अधिकारी म्हणून रुजू असताना त्याला पहिल्यांदा एम.आय.६ने गाठले. ओलेगने 'फितुरी'साठी पैसे घेतले नाहीत. सोविएत यंत्रणेविरोधातील त्याची हेरगिरी ही निव्वळ वैचारीक पायावर उभी होती. तो केजीबीमधला किम फिल्बी(२) ठरला. पुढे ओलेग खुद्द इंग्लंडमध्ये केजीबी अधिकारी म्हणून रुजू झाला आणि दोन वर्षात पदोन्नती होत लंडन दुतावासातील केजीबीचा स्टेशन इन्चार्ज (रेझिडेन्टा) म्हणून नियुक्त होणार होता. आणि अचानक त्याला दोन दिवसात मॉस्कोला भेट देण्याचा संदेश आला. ओलेगच्या फितुरीबद्दल केजीबीला माहिती मिळाली का? कशी? ओलेग बाहेर पडला की रशियातच संपला? या व ओलेगच्या प्रवासाबद्दल पुस्तक वाचणे इष्ट.
गुप्तहेर म्हटले की बहुतेकांना परराष्ट्रात जाऊन त्यांची युद्धसज्जता, लष्करी गुपिते, शस्त्रास्त्रे, कट-कारस्थाने याबद्दलची माहिती गोळा करणारे किंवा मग शत्रुराष्ट्रातल्या फुटिरतावादी गटांना, दहशतवाद्यांना मदत करण्याचे काम करणारे हेर आठवतात. हेरगिरीमधले हे एक महत्त्वाचे अंग आहे. पण याच्याच बरोबरीने राजकीय हेरगिरी (स्पायक्राफ्ट) हे तितकेच महत्त्वाचे अंग आहे ज्याबद्दल सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. ओलेग हा असा राजकीय हेर होता. ओलेगने पुरवलेल्या माहितीमुळे माणूस आण्विक अस्त्रांमुळे समूळ नष्ट होण्यापासून वाचला. ओलेगने कम्युनिस्ट नेतृत्व कसे विचार करत आहे याची प्रत्यक्षदर्शी माहिती इंग्लंड व अमेरिकेला दिली. तोवर ब्रेझनेव, अँड्रोपोव व इतर सर्व सोविएत नेतृत्वाचे अमेरिकेच्या आण्विकअस्त्र नितीबद्दल काय मत आहे याची कल्पनाच नव्हती. जेव्हा याची कल्पना आली तेव्हा या देशांनी कोर्स करेक्शन केले ज्याने समूळ विनाशाच्या उंबरठ्यावरून जग परतले. तसेच अँड्रोपोव्हनंतर गोर्बाचेव्ह अध्यक्ष होणार याची कल्पना आल्यावर इंग्लंड व अमेरिकी सरकारांना व मुख्यत्वे मार्गारेट थॅचरना गोर्बाचेवबरोबर मैत्रीपूर्ण व विश्वासाचे संबंध प्रस्थापित करण्यामागे ओलेगचा फार मोठा वाटा आहे.
राजकीय हेरगिरीचे परिणाम दूरगामी व खोल असतात. या पुस्तकात हेरगिरीच्या या अंगाबद्दल खूप माहिती मिळते. डोनाल्ड ट्रंपला निवडून आणण्याआधी थॅचरना ८२च्या निवडणूकीत हारवण्याचे कारस्थान केजीबीने रचले होते. सुदैवाने ते यशस्वी ठरले नाही. कारण थॅचरविरोधातील लेबर पार्टीचा नेता केजीबीचा एजंट होता! त्याला स्वतःला तो कसा वापरला जातोय याची कल्पना किती होती हे गूढच आहे. पण राजकीय हेर शीतयुद्धकालीन वैरादरम्यान किती खोलवर राजकीय यंत्रणेत हस्तक्षेप करू शकत याचे हे उदाहरण आहे. वैचारीक दृष्ट्या जवळच्या पक्षांना/गटांना/एन.जी.ओं.ना त्यांच्या कळत वा नकळत वापरून घेणे हे आजही चालू आहेच. अनेकदा राजकीय पक्ष अश्या संघटना, विरोधी पक्षांवर परराष्ट्रे वा आंतरराष्ट्रीय संघटनांचे हस्तक असल्याचा आरोप करतात जो आपण पक्षीय राजकारणातून केलेले आरोप म्हणून दुर्लक्ष करतो. पण ते आरोप बिनबुडाचेच असतात असेही खात्रीलायक म्हणता येणार नाही.
गुप्तहेर व त्यांचे केस ऑफिसर/हँडलर यांच्यामधले संबंध, गुप्तहेर संस्थेची विश्वासार्हता व दिलेला शब्द पाळण्याप्रती असलेली निष्ठा वा बेफिकीरी, स्वत:च्या देशाविरुद्ध फितुरी करण्यामागे असलेल्या विविध मनोभुमिका याबाबींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. याबद्दल अधिक लिहिले तर पुस्तक न वाचलेल्यांना त्यातल्या थराराचा आनंद मिळणार नाही.
बेन मॅकिंटर हे टाइम्स वृत्तपत्रसमूहात वरिष्ठ पत्रकार/लेखक असून हेरगिरी हा त्यांचा अभ्यासाचा विषय. या प्रकरणात २०-२५ वर्षे प्रत्यक्ष सहभाग असलेल्या अनेकांच्या घेतलेल्या मुलाखती, उपलब्ध कागदपत्रे याआधारे लिहिलेले हे पुस्तक अप्रतिम आहे. आजकाल नॉन-फिक्शन लिहिण्याची एक प्रमाण शैली बनलेली आहे. एका विषयाबद्दल एक दोन परिच्छेद लिहायचे, मग विकिपिडियाप्रमाणे त्याबद्दलची इतर पुस्तके/संदर्भग्रंथ/आंतरजालावरील माहिती देत दोन-चार पाने भरायची आणि मग पुन्हा स्वतःचे अनुभव/विषयाकडे वळायचे. या पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तकाच्या विषयाला धरून राहते आणि विकिपिड्याप्रमाणे माहिती देत बसत नाही. घट्ट सायीप्रमाणे पुस्तक केवळ अन केवळ ओलेगच्या हेरगिरीभोवती बांधलेले राहते.
(१) म्हणजे ज्याला दुतावासात राजनैतिक आधार नाही, पकडले गेला तर परराष्ट्रात दीर्घ कारावास वा देहदंडाची शिक्षा होण्याचा मोठा धोका असतो तो
(२) https://en.wikipedia.org/wiki/Kim_Philby
(३) https://en.wikipedia.org/wiki/Hungarian_Revolution_of_1956
(४) https://en.wikipedia.org/wiki/Prague_Spring
पु प आवडला
पु प आवडला
मस्त! वेगळा धागा काढलात हे
मस्त! वेगळा धागा काढलात हे चांगलं केलंत. पुस्तकं वाचून होतील न होतील, ठाऊक तरी होतील
वाचायला हवे...
वाचायला हवे...
अशी खुप उदाहरणे आहेत. हे अस्र ब-याचदा पपेट रेजिम आणण्यासाठी वापरले गेले आहे.
एक उदाहरण आता पुसट आठवते. ब्रिटिश MP ला Honey Trap मधे फसवून हेरगिरी झाली होती. त्या MP ला सदस्यत्वाचा राजिनामा द्यावा लागला होता..
Utkanthavardhak olakh!
Utkanthavardhak olakh!
आवडला पुस्तक परिचय
आवडला पुस्तक परिचय
स्वतंत्र धाग्याकरता धन्यवाद
आवडलं.
आवडलं.
(आंतरराष्ट्रीय हेरगिरी हा विषय आवडता आहेच.)
छान पुस्तक परीचय टवणे सर.
छान पुस्तक परीचय टवणे सर..धन्यवाद....
आवडलं.
आवडलं.
पुस्तक परिचय आवडला. छान लेख
पुस्तक परिचय आवडला. छान लेख लिहिला आहे. हा विषय सुद्धा आवडणारा आणि नेहमीच कुतूहल असणारा आहे.
मस्त परीचय.
मस्त परीचय.
हे एक चांगलं केलंस. आता तुझ्या लेखनात जाउन पुस्तक परिचय शोधणे सोपे होइल.
आंतरराष्ट्रीय हेरगिरी हा विषय
आंतरराष्ट्रीय हेरगिरी हा विषय आवडता आहेच.)>>>
तू टिंकर टेलर सोल्जर स्पायचे भाषांतर केले आहेस ना?
जॉन लकारने स्पाय अँड द ट्रेटरचे कौतुक केले आहे - one of the best true spy story म्हणून.