चिनई - चीन विषयी

Submitted by प्राचीन on 21 January, 2019 - 02:42

न म स्का र
मी माय बोलीव र न वी न आ हे.
माझा हा खालील लेख एका बँकेच्या २०१९ च्या कँलेंडरमध्ये छापून आला आहे. इथला हा पहिलाच प्रयत्न ...

चिनई (चीनबद्दल)
चायना पोस्टिंग as a country Head हे 2016 च्या डिसेंबरमध्ये जेव्हा वाचले, तेव्हा घरातील आम्हा सगळ्यांची एकच प्रतिक्रिया होती – ”बाप रे!”– नंतरच्या प्रतिक्रिया दारच्या अर्थात परिचितांच्या. उदा: “अमेरिका किंवा लंडन नाही का; गेला बाजार हाँगकाँग तरी !” Foreign Posting म्हणजे पाश्चात्त्य देश हेच समीकरण इथल्यांच्या डोक्यात नि त्यांतही चीनमध्ये बदली म्हणजे विविध प्रतिक्रियांचा अनुभव. करमणूक तर होत होती, त्यांमागची काळजीही जाणवत होतीच..चीनमधील वास्तव्य सुकर होण्यासाठी माहितीच्या महाजालापासून ते व्यक्तिगत अनुभवांपर्यंत अनेक मार्गांनी पूर्वतयारी केली.एकदाचे मलेशियन एअरलाइन्सच्या विमानातून चीनमधील ग्वांगझौ या शहरात दाखल झालो.
द रीगल कोर्ट ह्या 31 मजली इमारतीत निवास असणार होता.जसा काळ पुढे सरकू लागला, तशी ‘अजब’
चीनच्या गजब दुनियेची नि त्याहून गहजब वाटतील अशा नियमांची तोंडओळख होऊ लागली. पण थांबा! तोंडओळख म्हणणे चुकीचे होईल… कारण येथील भाषा मँडरीन- जी अगम्य व दुर्बोध आहे,- त्यामुळे (चिन्यांच्या) इंग्रजीच्या एक वा दोन शब्दांपुरत्या संभाषणातून आकलन होऊ लागले,असे म्हणता येईल. पहिला गहजब तडाखा कस्टम्स मध्येच बसला होता. आपले पोळपाट – लाटणे एवढे ‘विनाशकारी’ असू शकते, नि उदबत्त्या ‘प्रक्षोभक’ असू शकतात, हे तेव्हा ( ह्या वस्तू जप्त झाल्यावर ) कळले.
तर गेल्या काही महिन्यांत चिनी दिनचर्येचे जे दर्शन घडले, समजून घेता आले, ते प्रातिनिधीक नसेलही, परंतु चक्षुर्वैसत्यम् असल्याने विश्वासार्ह नक्कीच आहे. विशेषत: आमच्या ग्वांगझौ शहरापुरते..
ग्वांगझौ हे ग्वांगडन परगण्यातील राजधानीचे शहर. बैजिंगनंतरचा क्रमांक असलेल्या या शहराने चक्क 13 जिल्ह्यांना पोटात सामावले आहे, बैयूनसारखा पर्वत व कॅन्टन टॉवर ही उत्तुंग मनोरा असल्यासारखी संरचना यांना कवेत घेऊन या शहराचा अगडबंब विस्तार झालेला आहे. नुसते ग्वांगझौ पूर्ण पहायचे म्हटले तरी कमीत कमी 150 तरी प्रेक्षणीय स्थळे आहेत! आमच्या डोळ्यांना व हालचालींना भारतीय , तेही डोंबिवलीमधील उलट्या स्पीडब्रेकर्सची सवय.. त्यामुळे सुरुवातीस इथले गुळगुळीत आठपदरी रस्ते, शास्त्रशुद्ध स्पीडब्रेकर्स, इ, पाहून जरा गांगरल्यासारखेच व्हायचे ! स्वच्छता बघून तर डोळे अक्षरश: निवले; कारण दिवसातून दोनदा रस्ते पाण्याने धुतले जातात ! तरीही चिखल वा डबकी नाहीत. निवांत चालण्यासाठी (फेरीवाल्यांसाठी नव्हे) फुटपाथ.. नि कपडे वा चपलांना माती, थुंकी, पानाच्या पिचकार्‍यांची घाण लागेल, याचे भय इथले वाटत नाही ! उंचच उंच इमारती नि त्यांना जणु टुमदारपणाचे आव्हान देत उभी असलेली बंगलीवजा घरेही दिसतात. ग्वांगझौमध्ये दुचाकींना प्रवेश नाही. फक्त चारचाकी, तेही आलिशान वर्गातील ; अपवाद सायकलींचा ! आबालवृद्ध सायकलींवर स्वार होऊन लगबगीने जाताना दिसतात. मध्येच एखादी हिरकणी पाठी वा पुढे छोटुकल्या मुलांना बसवून सायकल चालवत जात असते.
रस्ता ओलांडण्याचे नियम व आपण यांची शाळेनंतर फारकत झालेली असते. मात्र इथे त्यांच्याशी पुन्हा जवळीक करावीच लागते.सिग्नल कोणीच तोडत नाहीत.पोलीस नसला तरी CCTV च्या डोळ्यांची ‘पाखरे’ (खरे तर ‘घार’ म्हणायला हवे) आपल्या ‘भोवती सतत फिरतात’! नजरेच्या टप्प्यात जिथे तिथे हे नजरबाज दिसतात.इथे भारतात असलेल्या पद्धतीविरुद्ध वाहतुकीचा शिरस्ता आहे.म्हणजे उजवीक़डून.. आणि वाहनचालकही डावीकडे बसतो. मेट्रोचं विस्तीर्ण जाळं, 9 ते 12 रेल्वे लाईन्स, बुलेट, ठिकठिकाणी पूल आणि त्यांवर फक्त पादचारी वा वाहने, भिकारी किंवा फेरीवाले नाहीत.. खरे तर विशिष्ट झोनमध्येच फिरते विक्रेते; तेही कमीच. मुळातच राहणीमान स्वस्त आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू माफक दरात, दर्जेदार उपलब्ध असतात. इथे RMB म्हणजे युआन हे चलन असून भारतीय रुपयाच्या दसपट मूल्य आहे. विशेषत: अन्न व कपडे यांचे विविध नमुने माफक किंमतीत मिळतात. हो! ज्या गोष्टीच्या उल्लेखाने इथल्या वास्तव्याबद्दल धास्ती वाटत होती, तसं चित्र स्वकीयांनीच रंगवलं होतं (पूर्वी मुलीला माहेरच्यांकडून पालुपद ऐकावे लागे की ‘तिथे’ गेल्यावर हे होईल नि ते असेल; याच धर्तीवर) .. “ओ चायना! तिथे आता साप,झुरळं,पाली खावे लागतील’’! तर पूर्वीच्या सासर संकल्पनेत जसं हे भय वास्तविक ठरत असे, तसं चीनमध्ये खरोखरंच चालणारा कोणताही सजीव (माणूस वगळून) गट्टम् होतो! हे लोक एकंदरच खाण्याचे फार शौकीन आहेत.मात्र नुसतेच कच्चे,उकडून वा शिजवून.. मसाल्यांचा संस्कार कमीच.चायनीजच्या नावाने आपण भारतात जे काही पाकसंस्कार करतो, त्यांचं नामोनिशाण इथे नाही! सतत चहा पीत तरुण मंडळी कार्यरत असतात.पण तोही खराखुरा हर्बल.म्हणजे विविध रंगरुपाच्या मुळ्या उकळवून चक्क त्यांचा काढा करतात नि घोट घोट पीत असतात.
भारतीय पद्धतीचे अन्नधान्य लहान प्रमाणात का होईना, जवळच उपलब्ध होणे हा एक सुखद धक्का होता.परंतु तिथे Sellers Monopoly. दुकानदाराच्या मनाप्रमाणे वस्तूची किंमत ठरते, तीही प्रत्येक वेळी वेगवेगळी! उदा: तूप पाचपट तर पार्ले जी चा पाच रुपयांचा पुडा पन्नास RMB !
पाण्याचे रिसायकलींग केले जाते.त्यामुळे पिण्याजोगे पाणी विकत आणले जाते वा उकळून वापरतात. इथली हवा इतकी चंचल की घटकेत ऊन तर कधी भुरुभुरु पाऊस.. आणि डिसेंबर- जानेवारीमध्ये थंडी थेट 1 डिग्रीपर्यंत उतरते!
रंगीबेरंगी ओव्हरकोट लपेटून तरीही चिनी मंडळी दिनक्रमात गर्क असतात.फावल्या वेळात व्यायाम,खेळ.. एवढ्या मोठ्या ग्वांगझौमध्ये ठिकठिकाणी बगीचे, मैदाने आणि मोठाली स्टेडियम्स आहेत.अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन जिम असतात, तिथे व्यायामाची तर्‍हेतर्‍हेची उपकरणे व वेगवेगळे खेळ खेळण्याची सोय असते. सारे एकतर नि:शुल्क किंवा खेळण्याची साधने.. तेवढी स्वत:ची न्यायची. शारीरिक तंदुरुस्तीबाबत चिनी लोक फारच सजग असतात. नृत्यही त्याच भूमिकेतून केले जाते. वय, लिंग यांची मर्यादा नाही. सार्वजनिक जागी शिष्टाचार पाळले जातात, तरीही एखादा चिनी नागरीक व्यायाम/ नृत्य करतानादेखील आढळतो. भोवतालचे भान त्यास नसते आणि लोकही त्याचे अवडंबर माजवत नाहीत. किंबहुना आरोग्याबाबत, व्यायामाबाबत आवड असल्यानेच सवडही काढली जाते.
ज्येष्ठांमध्ये असा उत्साह तर तरुणांमध्ये काय विचारता ! सडसडीत बांधा (ही चिन्यांची मक्तेदारी असावी), तुकतुकीत त्वचा, काळेभोर केस, जगप्रसिद्ध लाघवी (काहीजण त्यांना मिचमिचे म्हणतात !) डोळे अशी वैशिष्ट्ये वागवणारी किशोर व तरूण मंडळी.. पेहराव हा ज्येष्ठ व तरूण सार्‍यांचाच आधुनिक व पाश्चात्त्य . मात्र केसांच्या - घरटी,तुरे इ. तर्‍हा तरुणांमध्ये आढळल्या नाहीत.विशेष म्हणजे सार्वजनिक जागी तरी युगुलांचे अश्लाघ्य अशोभनीय वर्तन दिसत नाही. आधुनिकतेची वाट चालतानादेखील पारंपारिक सभ्यता कायम ढेवता येते, ह्याचे हे उत्तम उदाहरण. परस्परांच्या सोबतीने फास्ट फूड चा आस्वाद घेत गप्पा करीत चालणारी युगुले वा मित्रमंडळी जरूर दिसतात. लिव्ह- इन् चं लोण बर्‍यापैकी आहे.तरी प्रोफेशनल भूमिकेतून कार्यसंस्कृती जपली जाते. तसेच बहुतांशी कार्यालये, सेवा इ. ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण खूपच अधिक आहे!
नवववर्ष स्वागत : कम्युनिझमचा प्रभाव अद्याप आसरलेला नसल्यामुळे तरूण पिढी, विशेषत: ग्वांगझौसारख्या मोठ्या शहरांतील – देव धर्म मानीत नाही. इथे स्थायिक झालेले भारतीय – प्रामुख्याने सिंधी उद्योजक मात्र भारतीय परंपरा , सण अगत्याने साजरे करतात. अर्थात चिनी चौकटीत राहून!
चिनी नववर्षाच्या सुरुवातीचे वेध मॉल्सना डिसेंबरपासूनच लागतात ! चांद्रवर्ष पद्धत असल्याने तारीख दरवर्षी बदलते. 2018 चं चिनी नववर्ष 16 फेब्रुवारी पासून सुरू झालं.त्यापूर्वी साधारण पाच दिवस व नंतर दोन दिवस अशी सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी असते.शाळा,इं बंद. दुकाने उघडी असली तरी कर्मचारीवर्ग (कोकणातल्या चाकरमान्यांप्रमाणे) आपापल्या गावी पळतो. मॉल्समध्ये लाल रंगाची उधळण दिसू लागते. शुभसूचक पताका,कंदील, डोअरमॅट;,सजावटीचे सामान, कपडे सार्‍यांवर लाल रंगाचा साज.. बारा प्राण्यांच्या नावाने नवीन वर्षे ओळखली जातात. हे नववर्ष Dog Year आहे तर 2019 हे Pig Year असेल. त्या निमित्ताने रस्ते, घरे अधिकच स्वच्छ करतात. आमच्या इमारतीला तर नुसते न्हाऊ माखूच घातले नाही, तर रंगरंगोटीही झाली.तसेही ग्वांगझौचा नखरा बघायचा, तर रात्रीच! .. कॅन्टनचा झगमगता मनोरा व त्यासभोवार पसरलेले ग्वांगझौ हे चित्तवेधक रंगसंगतीच्या प्रकाशाचा उत्सव रोजच साजरा करीत असते! नवीन वर्षाचं स्वागत करताना ह्या कृत्रिम प्रकाशाच्या वाटांवर पावलं उमटतात, ती लाल रंगाच्या विविध छटा लेवून बसलेल्या नाजूक फुलांची!
जिथे नजर जाईल, तिथे फुलांची बहारदार सजावट.. मला तर त्या दरम्यान ग्वांगझौचं नाव कुसुमावती ठेवावं असं वाटू लागलं..
नववर्षस्वागताच्या काही परंपरा नव्या पिढीने कालबाह्य ठरवून बाद केल्या आहेत.जसे – त्या दिवशी केर- लादी करायची नाही, नाहीतर भाग्यही पुसले जाईल ! किंवा पदार्थ बनवताना डंपलिंग्जना टोक ठेवायचं नाही, अन्यथा गरीबी येते..इ.
असं असलं तरी काही प्रथा आवर्जून पाळल्या जातात. जसे कौटुंबिक स्नेहमेळावा; एरव्ही घरी स्वयंपाक करणे हे शहरातील चिनी कुटुंबात तसं दुर्मिळच; परंतु नवीन वर्षानिमित्त सारे एकत्र जेवतात.घरीच चिकट भाताचे साखर घालून गोलसर केक करतात.किंवा स्प्रिग रोल्स तळतात.कल्पना अशी, की ते जसे सोनेरी दिसतात,तसे नवीन वर्ष सोन्याचे, समृद्धीचे जाईल. डंपलिंग्ज मध्ये आत एखादे नाणे ठेवले जाते; ज्याला ते मिळेल, तो भाग्यवान.(आपल्याकडे डोहाळेजेवणाला अंगठी वा रुपया असतो तसे) गोड केकमुळे नवीन वर्षाचे गोड भाकीत ऐकायला मिळेल, अशी समजूत. कोण करणार हे गोड भाकीत? तर Kitchen Gas God! अर्थात आपली अन्नपूर्णा म्हणू या. नूडल्स हे लांब असल्याने त्यांतून दीर्घायुष्याचा संदेश मिळतो.
परस्परांना लाल पाकीटात पैसे देण्याची पद्धत आहे.त्याला लकी मनी म्हणतात. रक्कम कितीही असू शकते. मूर्तिपूजा न मानणारी नवी पिढी हे सारं मात्र आवर्जून करते! मनात वाटतं, आम्ही भारतीय करतो, तसं हे लक्ष्मीपूजनच नाही का? एकूण काय, सर्वे जना: काञ्चनमाश्रयन्ते। धनलाभ हा सण व पूजेमागचा सनातन सुप्त उद्देश इथेही बघायला मिळतो.एरव्ही इथे जाहीरपणे फटाके उडवायला बंदी असली तरी नववर्षाचं स्वागत करताना तीन माळा तरी लावल्या जातात, अशुभ नष्ट करणे व येत्या शुभ गोष्टींचे स्वागत करणे! गंमत म्हणजे जेवढा फटाक्यांचा आवाज मोठा, तेवढी व्यवसायाची भरभराट होणार, असंही समजलं जातं! ग्वांगझौमध्ये कधी गाडीचा हॉर्नही विनाकारण ऐकायला मिळत नाही आणि ह्या प्रसंगी मात्र असा विरोधाभास!
एकंदरीत सुरुवातीचे काही महिने चिनी माणूस चीनच्या अभेद्य भिंतीसारखा वाटत होता, फारसा मोकळेपणाने न वागणारा, मुळीच मैत्रीपूर्ण नसलेला, असा.. आता ह्या सणाच्या निमित्ताने त्याचे भिन्न रूप पहायला मिळाले. ह्यातील खरा चिनी कोणता, याची उकल करण्याच्या फंदात न पडता, इतर अनेक परदेशस्थ नागरिकांप्रमाणे चिनी जीवनपद्धतीमध्ये रुळण्याचा प्रयत्न करणंच ठीक ! आपल्यासारखीच प्राचीन संस्कृती असणारा हा देश … पण सध्या तरी मित्र म्हणता येणार नाही अशा या भूमीत वास्तव्य करताना पौर्वात्य संस्कृतीचा बारिकसा धागा असा अचानकपणे गवसला, हे मात्र खरं!

 शब्दांकन : प्राची दामले.
 -----------------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.राईस केक, डंपलिंग वगैरे माहिती आवडली.
रस्ते धुणं म्हणजे जरा अती वाटलं.स्मृतिचित्र मध्ये आहे तसं उद्या मीठ पण धुवून घेतील ☺️☺️☺️

छान लिहिलंय.
रस्ते का धुवतात ते कळलं नाही

चांगले लिहिले आहे. खाण्याच्या सवयींविषयी आधी ऐकले होते. चिकन मात्र सगळीकडे मिळते त्यामुळे जरी कोणी नॉनव्हेजिटेरियन नसेल तरी हरकत नाही पण चिकनेटेरीयन असले तरी निभाव लागतो. इन्फ्रास्ट्रक्चर बाबत पाश्चात्य काय किंवा अन्य प्रगत देश काय. फारसा फरक नाही असे जाणवते. ज्या त्या ठिकाणच्या "स्थानिक सांस्कृतिक परंपरा आणि पद्धती" जागतिकीकरणाच्या रेट्यात हळू हळू नामशेष होत चालल्या आहेत. आणि ते साहजिकही आहे. फटाक्यांच्या अवजाबाबत मात्र अजब वाटले.

रस्ते धुणे म्हणजे बेसिकली पाण्याचा टॅंकर पाणी फवारत जातो. यामागे...

१. वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करणे (शक्यतो ज्या भागात बांधकामांच्या साईट्स जास्त आहेत तिथे हे रस्ते धुणे अधिक आढळते)
२. हवेतील आर्द्रता वाढवणे

हि दोन मुख्य करणे आहेत असे ऐकले होते.

मस्त लिहिलंयस..! लास्ट ईयरमधे आम्च्या क्लाएंट्चं बेस लोकेशन ग्वांगझौ होतं तेव्हा आम्ही रोज तिथल्या टीमशी स्काईप कॉल करायचो. हा लेख ग्वांगझौशी संबंधीत असल्याने अवर्जुन वाचला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एप्रिल, रिक, एरीक्,फ्लोरा आणि इतरही बरेच चायनिज टीम मेट्स होते. पण त्या सर्वांच्या नावात 'झाँग' आणि 'झँग' का असायचे हे न उलगडलेलं कोडंच आहे.

Mi आणू - " धन्यवाद. केक इ. गोष्टी स्थायिक झालेल्यांकडून आयात केलेल्या आहेत Happy

*mi anu

दिल्ली मेट्रोचं काम सुरू असताना चाकांना चिखलमाती लागलेले ट्रक्स वगैरे रस्त्यावरून जाऊन रस्ते मळायचे आणि रोज धुतले जायचे असं ऐकलं आहे.
अनिल अवचटांनी अमेरिका पुस्तकात लिहिलंय ना, त्यांच्या ओळखीचे एकजण कॅनडाला जाऊन आले की प्रत्येक वेळी सांगायचे, तिथले रस्ते किती स्वच्छ! आपण रस्त्याला बोट लावलं तर बोटाची माती रस्त्याला लागेल. Lol

१९६० च्या आसपास मुंबई मध्येही नगरपालिकेतर्फे रस्ते धुतले जायचे असे ऐकलेले आठवते.>>>>> हो त्याबद्दल माझी आई नेहमी सांगायची.

लेख छान.

१९६० च्या आसपास मुंबई मध्येही नगरपालिकेतर्फे रस्ते धुतले जायचे असे ऐकलेले आठवते. >>>> आपल्याकडे रस्ते धुतले तर नवल नाही. एक तर धूळ प्रचंड आणि वर थुंकणारे लोक त्याहून जास्त. रस्ते स्वच्छ करायला नुसतं झाडणे पुरणारच नाही.

एका दमात वाचून काढला लेख. चीनच्या डॅाक्यु बऱ्याच पाहिल्यात पण आपल्या डोंबिवलीकरांनी काय बघितलं याची उत्सुकता होती. सामाजिक जीवन आपल्यासारखेच आहे. अर्थव्यवस्था मात्र आता अमेरिकेस घाबरवत आहे.

"कॅाम्युनिस्ट पार्टी पहिली राहिली नाही" हे तिकडचे गाववाले ऐकवतात.

छान लेख. पण दोन फोटो हवेत.

Pages