जंगलजंप. . लेखक : सुशांत झाडगांवकर

Submitted by sushant zadgaonkar on 31 December, 2018 - 02:17

जंगलजंप.
लेखक :सुशांत झाडगांवकर.

मागे दहा वर्षापूर्वी फॉरेस्ट गार्ड होतो तेव्हाची गंमत आहे.
दुपारपासून काही खाल्लं नव्हतं.उन्हाळयात टूरीस्ट गर्दी करतात.जादा जीप्स,गाईड्सची व्यवस्था करता करता दुपारची संध्याकाळ कधी होते कळत नाही.आणि आज तर दिपक गाईडला एका टुरीस्टने मोबाइल सुरू केल्याच्या वादामुळे वाचवायसाठी आम्ही सगळे एकत्र थांबलो होतो. .वाद मिटला.टुरीस्ट धमक्या देऊन निघून गेला.वाघ दिसला असता तर वाद उद्भवला नसता.अमाप खर्च करून येतात लेकाचे पण शिस्त पाळत नाहीत.त्यातून वाघाचं दर्शन झालं नाही की सगळ्यात जवळचं सावज म्हणजे गाईड,किंवा ड्रायव्हर .अरे आम्हालाही बघायचा असतो वाघ.शेकडो वेळा बघूनही न मिटणारी ईच्छा आहे ती.असो.
मी माझ्या खोलीजवळ येईपर्यंत अंधार झाला होता.संध्याकाळी सगळे आपापल्या कामात असतात. .वीज जंगलात अजूनही आली नाही.जन्मभर इथे असेपर्यंत अंधारच असेल सोबती.इतरत्र कुठेही मोडले तरी पर्यावरणाचे नियम जंगलात पाळावेच लागतात.किंवा जास्त प्रकर्षांने पाळले जातात.तरी आमच्या नावानी सतत बोंब करते पब्लिक .
पण छान वाटतं.हवेत उकाडा असतो.घरी पोहचून आंघोळ करावी असं वाटलं तरी पाणी अालं तर,आणि वेळीच भरून ठेवलं तर.रॉकेल असलं तर चहा करता येणार.दुध नसतंच कधी पण खोब्रवेल टाकून किंवा गवती चहा,काळा चहा काय मस्त लागतो.टपरी वरचा चहा सुटला.कधीकधी असं वाटतं,ह्या अश्या तिखाडीचं गवताच्या चहाची टपरी टाकावी. .पण नंतर लक्षात येतं ही सुंदर वनस्पती संपेल.लोकांचं काय,चवीचे भोक्ते. .आवडल्या जिन्नसासाठी वाटेल ती किंमत मोजतील.तिखाडीच्या चहासाठी शंभर रुपये सुद्धा कमी पडतील पण अाधीच दुर्मिळ झालेल्या गवताच्या दुर्भीक्षाचं कारण मी व्हायला नको..तिकडे आमच्या नरनाळ्याच्या जंगलात सारख्या दिसणार्या एकशे दहा जातीच्या गवतापैकी तिखाडीचं गवत फक्त जाणकार ओळखतो.एरवी त्याचा सुगंध आसमंत भारतो पण नेमकं कुठलं तिखाडीचं आहे हे सहज कळत नाही.
. .बघा. .खूप काम झालं भुक लागली की नेमके विचार घर करतातआणी तेवढ्यात घरीसुद्धा पोचलो ते कळत नाही.
मागच्या आठवड्यानंतर ठेवलेल्या मोठ्या तोंडाच्या जाडजूड रांजणामुळे माझ्या खोलीत जायचा रस्ता अरुंद झालाय.पण बाहेर जंगलात पाणी आटलं आहे आणि जंगली प्राण्यांना मिळावं म्हणून आमच्या प्रत्येकाच्या खोलीसमोर रांजण पाण्यानं भरुन ठेवायची आमची जबाबदारी असते. .
या आठवडयात दोन तीनदा बिबट जोडी पाणी प्यायला येऊन गेली आहे.कसं मस्त वाटतं नं.पाणी प्यायला बिबटे ,वाघ,हरीण सगळे पाणी प्यायला आमच्या पडवीत येतात.हेवा वाटतो नं!पण तेव्हा त्यांच्यासमोर जायची सोय नसते फोटो काढणं तर खूपच अशक्य.चुकून कुणाला कळंलं आणी फ्लॅशला घाबरुन जनावर पळालं तर आमची नोकरीच जायची. .मिळाली ती नोकरी टिकवणं जरुरी आहे. कसही असलं तरी आज माझ्या पगारांत घरचं दुध,भाजी किराणा येतो.बाकीचं आई बाबांच्या मिळकतीत होतं. .पण निभतं कसं तरी.
. .आज केवढे विचार आले ह्या खोलीच्या उंबरठयावर . .चला उघडा दरवाजा. .
अंधार बर्यापैकी पडला आहे. .खिश्यातून किल्ली काढून कुलूप उघडताना पायाखाली काळी दोरी कसली आली हे बघतानांच ही श्वापदाची शेपटी आहे हे ही कळेपर्यंत मी पाय वर घेउन पटकन् उघडलेल्या दारातून वाट काढत आंत जाऊन दार बंद करीन तोच गर्रकन ते जनावर वळलं,त्या अपुर्या प्रकाशांत त्याचे डोळे चकाकले टोकदार दाभणीसारख्या मिशा विस्फारल्या. क्षणात एवढं टेंशन आलं की बस्स.आंत बाहेर ,पुढे मागे कळलं तसा चुकवायचा प्रयत्न करत होतो.आम्ही दोघही एकाच वेळी एकमेकांना घाबरुन ओरडायला लागलो आणी मी धाडकन् अचानक दरवाजा बंद केला. .यंत्रवत. .काही कळायच्या पलीकडे माझी परिस्थिती होती.घाम फुटला,श्वास अडकला,धाप लागली, . .
मी किंचाळत होतो त्यापेक्षा दहापट आवाजात ते जनावर डरकाळत होतं तेव्हा लक्षांत आलं की तो बिबट्या होता. .कारण मादी बिबट्याचा आवाज वेगळा असतो.मी दरवाजा बंद केला. .त्यापुढे आमचा जाडजूड पलंग सरकवून ठेवताना माझ्या लक्षांत आलं की ती शेपटी दारातून आंतल्या बाजुस अाली अाहे आणि त्यातून रक्त वहातंय. .माझं ओरडणं कुणाच्या कानी पडणं शक्यच नव्हतं.आतातर मी थकल्याने ते बंदच झालं. .मी काहीही विचार करू शकत नव्हतो.ती एरवी पिळदार लोभस वाटणारी शेपटी अशी जाडजुड असते आणी तिच्यात एवढं बळ असतं ते आज कळलं.दाण दाण ती दरवाज्यावर आपटते आहे.माझी आख्खी खोली गदागदा हलतेय,दार आणि खिडकीची तर वाट लागतेय.माझा आक्रोश आणि बाहेरचा बिबट्याचा आवाज मिसळल्यामुळे लोकं जमले असतील,घाबरले असतील,इतर गार्ड चौकीवर मदत मागायला जात असतील ..त्याची काय गरज आहे . .अरे गलका ऐकून सगळे इकडेच आले असतील.शेपटी अजून जोरात वळवळतेय,त्या जखमेमुळे रक्त वाहतंय . .खोली दुपारच्या उन्हात तापली असेल म्हणून उकाडा प्रचंड आहे.खिडकी उघडायचं तेव्हढं धाडस झालं म्हणा किंवा सुचलं म्हणा,मी त्या अंधारात खिडकीकडे वळलो आणि त्याच वेळी बिबट्याचा आकांताच्या धडपडीत धक्का लागून ते रांजण फुटलं .थंड पाणी वाह्यलं असेल . .त्या स्पर्शानं त्याला बरं वाटलं असेल .क्षणभर काहीसा गोंगाट कमी झाला तसा मी खिडकीतून जोरात ओरडलो तेव्हा शेजारचे दोघ तिघं आले.मला टॉर्च देत म्हणाले "तू टॉर्चचा झोत त्याच्या दिशेनं ठेवत दार उघड. .आम्ही दोन्ही बाजुनी अावाज करत टॉर्च मारुन धावतो.टायमिंग तेवढं घे आणि आम्ही ईशारा करताच दार उघड.
मला अजूनही आठवतं इतके ठोके छातीत पहल्यांदाच पडले असतील.आंघोळीची गरजच नव्हती.ती घामानीच झाली होती.हो असेल. .तुम्ही म्हणता . .तर पँटही ओली झाली असेल. .गंमत आहे काहो?
दोन मिनिटात बाहेर गार्डने शिट्टी वाजवली लगेच मी टेबल बाजुला केला. .पायाला फरशीवरचं चिकट रक्त लागलं. दचकलो.पण दुर्लक्ष केलं.हातच्या टॉर्चचं बटण अॉन केलं.तशीच शिट्टी वाजवून सगळं बळ एकवटून मी दरवाजा उघडला. .टॉर्च फ्लिकर करत राहिलो. .बाहेर जोरात गलका झाला. .मला क्षणभर काहीही कळत नव्हतं. .डोळ्यापुढे अंधेरी आली आणी मी धाडकन् जमिनीवर पडलो.
जाग आली तेव्हा लख्खं चांदणं पडलं होतं.हवेत जरा गारवा आला होता.सगळे माझ्याभोवती बसले होते.पुढे काय असा मोठ्ठा प्रश्न होता. .माझ्या लेखी नोकरी गेल्यात जमा होती.पण बाहेर घडलेलं नाट्य काही वेगळच होतं.
"बिबट्याचा आवाज ऐकून मादी तिथे आली आणि लोकं तिथे असल्याने दुरूनच डरकाळ्या देत राहीली.रांजण फुटायचा आवाज आला तशी ती जोरात पुढे सरसावली.आमच्या प्रत्येकाजवळ टॉर्च असल्यामुळे आणि लगेच सुचलं म्हणून आम्ही तिच्या डोळ्यांवर झोत मारला आणि ती गडबडून परतली.तेवढ्यात तु सुद्धा दार उघडून त्या बिबट्याला मोकळं केलं.
आम्ही सर्वानींच हे सगळं बघितलं आहे.रेंजर साहेबही आले.उद्या चौकशी करतील पण तुला धोका नाहीये".
मी विचार करत होतो साधी नोकरी असते सगळ्यांची पण सतत किती भान ठेवावं लागतं.अशावेळी एक चूक एक हेडलाईन बनू शकते आणि मोठ्या जिकिरीनं लागलेली नोकरी चुटकीसरशी जाऊ शकते.नशिबाचाच भाग असतो पण भान ठेवणं आवश्यक असतं.
मला बक्षीस ?
हो मिळालं नं.बाजुला राहणारी एक आवडती हिरोईन,तेव्हाची कायम माझी बाजू घेणारी,चौकशीत साक्ष द्यायला तयार झालेली,गीता,आता माझी अर्धांगिनी झालीये.
माझं जंगलाचं वेड कायम आहे.आता माझ्या जिप्सी अाहेत.वर्दळ वाढली आहे.वाघांचीअाणि वादांची.ती संपणारी नाहीये तशीच लोकांची जंगलाची ओढही संपणारी नाहीये.आपापल्या मर्यादेत कुणालाच कुणाचाही धोका नाहीये.ती ओलांडली की आपलं नुकसान होतं आणी एखाद्या नतद्रष्टाचं नशीब फळफळतं.नको तो गाजावाजा होतो आणि दुसरीकडे त्याहीपेक्षा मोठा गाजावाजा झाला की जगाचं लक्ष तिकडे जातं.
तोपर्यंत मी ह्या जंगलात फिरणार.तुमची वाट बघत.या कधीतरी,अवश्य या.

(कथानक स्वतंत्र.कधी जंगलात ऐकलेले किस्से आणि त्यांचे झालेले संस्कार असतील तेव्हढेच.)

सुशांत झाडगांवकर.
8600104764
डिसेंबर १८

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद चप्रेष व चित्रगंधा.
जमल्यास माझं ह्यानंतर चं साहित्य वाचून प्रतिक्रिया द्यावी.
मागे चप्रेषची मल्टीटास्क वर प्रतिक्रिया सुचक होती.पण मुंबईकरच कथेचा गाभा होता.युवा प्रोफेशनलस् हा फक्त under current hota.
धन्यवाद .
ब्रेक इव्हन -१९.हे नवं पुष्प सादर केलंय.

छान लिहिले आहे !!! मधेच मला वाटलं तुम्ही त्या बिबळ्याच्या शेपटीला मलम पट्टी करून त्याला सोडता कि काय Happy

<<<<छान लिहिले आहे !!! मधेच मला वाटलं तुम्ही त्या बिबळ्याच्या शेपटीला मलम पट्टी करून त्याला सोडता कि काय >>> Lol Lol Lol