पोटाचा प्रश्न

Submitted by सदा_भाऊ on 25 December, 2018 - 04:10

पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहतो असं कोणातरी व्हाटसॲपीय विद्वानाने म्हणून ठेवलंय. या विधानामधे १००% सत्यता असून मीही त्याचा एक नरबळी आहे. कोणतीही सोंगं करता येतात पण बारीक होण्याचं सोंग करता येत नाही हे तत्वज्ञान अनुभवा वरून सिध्द झालेले आहे. आजकाल मी माझ्या वाढत्या वयाला दोष द्यावा का माझ्या कामाच्या पध्दतीला का माझ्यातल्या आळसाला हा जरी आमच्या घरगुती वादाचा मुद्दा असला तरी वाढते वजन हा निर्विवाद राष्ट्रिय प्रश्न होऊ घातला आहे. दशवर्षीय कन्येपासून पंचषष्ठदश वर्षीय मातोश्री पर्यंत सर्वाना पडलेला हा एक ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नाला अधिक क्लिष्ट करण्याहेतू अजून एक घटना माझ्या आयुष्यात घडली. ऑफिसच्या रूटीन मेडीकल चेकअप मधे माझ्या रक्ताने माझ्या स्वभावातील गोडी दाखवली. आता या घटनेमुळे सौ ने भीतीपोटी माझ्याशी गोड बोलणेच पण सोडून दिले. उगाच निमीत्त नको म्हणे!

या जगात प्रत्येक प्रश्नाला काही ना काही उत्तर नक्की असते असे कोणीतरी म्हणले आहे. पण माझ्या या कूट प्रश्नावर कदाचित जगात सर्वाधिक उत्तरे उपलब्ध असावित. गुगल वर सर्वाधीक शोधलेला प्रश्न म्हणजे “वजन कसे कमी कराल?” आणि गुगल ने सर्वाधिक दिलेले उत्तर म्हणजे “एक आठवड्यात वजन कमी करण्याचे दहा उपाय”. माझ्या घरात माझ्यावर अशा प्रकारचे अनेक उपाय लादले गेले आहेत. माझ्या सहीत संपूर्ण घरादाराने या कार्ययज्ञामधे माझी आहूती दिलेली आहे. आमच्या ओळखीचे एक बरेच वयस्कर डाॅक्टर आहेत. एकदा मी घरच्यांच्या आग्रह वजा बळजबरीमुळे या डाॅक्टरांची पायरी चढलो. पंचाहत्तर ते ऐंशी वयोगटातील या वृध्द इसमाने मला नुसते निरखले आणि ताबडतोब सुतोवाच केले. “तुझ्या आजोबाना बीपी चा त्रास होता. मीच त्याना औषध देत होतो. तुझ्या काकाना पण त्रास होता आणि माझेच औषध त्याना चालू होते.” याचा इथे संबंध काय? या प्रश्ना बरोबर आजोबा आणि काका त्यातून का बरे होऊ शकले नाहीत याचे जणू कोडं उलगडल्याचा उगाचच भास झाला. “तुझ्या वडीलाना पण माझेच औषध चालू आहे. आणि तुलाही रक्तदाब असणार. तू ताबडतोब गोळी चालू कर.” या वाक्याने मात्र मी घाबरलोच. अहो किमान ते मशीन तरी लावून बघा, असं ओरडून सांगण्याची मला इच्छा झाली. “एकतर गोळी चालू कर नाहीतर किमान पंचवीस किलो वजन कमी कर!” असा निर्वाणिचा सल्ला घेऊन मी बाहेर पडलो.

माझ्या या वजनदार आयुष्याची सुरवात झाली जीएम डाएट प्लॅन ने! कोणा एका महा विद्वानाने जीएम कंपनी मधील समस्त जाड्या लोकाना सात दिवसात बारीक करून दाखवल्यामुळे तो प्रयोग माझ्यावर यशस्वी झाल्या शिवाय माझी सुटका नव्हती. रोज कोणत्या तरी एकाच अन्न प्रकारचा माझ्यावर मारा सुरू झाला. त्या दिवशीचा तो खाद्य प्रकार सोडून इतर अन्नाकडं पाहणे सुध्दा गुन्हा ठरू लागला. सुदैवाने या जीवघेण्या खेळाला सात दिवसाची मर्यादा होती. आठव्या दिवशी मी माझे वजन करून पाहीले. छान तीन चार किलो कमी झालेले आढळले म्हणून माझ्या सहीत सर्वच खुश झाले. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दोन वेळ चे जेवण आणि एक नाश्टा या व्यतिरीक्त कधी काळी काही किरकोळ तोंडात टाकलेलं अंगलट आले. जे सात दिवसात गमावले ते महिन्या भरात कमावले.

नवऱ्याच्या बाबतीत बायको इतकी क्रूर कशी काय होऊ शकते का कोणास ठाऊक. माझ्या आहारातून तेलकट, गोड, खारट, चीज, बटाटा, भात अशा पदार्थांचे उच्चाटन करण्यात आले. रोज सकाळ संध्याकाळ शेळी समोर गवताची पेंढी टाकतात त्या प्रमाणे जेवणात काकडी गाजराचे तुकडे टाकण्यात येऊ लागले. मी कर कर आवाज करीत त्या तुकड्यांना जगण्याचे साधन बनवू लागलो. लहानपणी जेवणापुर्वी म्हणत असलेल्या श्लोकाचा अर्थ आत्ता समजून येत होता. “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म!” या सर्व प्रयत्ना नंतर माझे वजन वाढायचे थांबले खरे पण कमी होण्याचे लक्षण दिसेना. यावर मला असेही ऐकवण्यात आले की मी जर मनापासून प्रयत्न केले असते तर वजन पटकन कमी झाले असते. आता हा मनापासून प्रयत्न म्हणजे नक्की कसा, या विचारात कदाचित माझे एक दोन किलो अजून वाढले असावे.

देवानं माणसाला भूके बरोबर जी जीभ दिली आहे ना, तेच त्याचं चुकलंय. एक तर नको तिथं बडबड करायला लावते किंवा नको तितकं खायला भाग पाडते. सर्व गुन्ह्या मागचं कारण म्हणजे ही जीभ! या जीभेला एकदा का चटक लागली की सगळा घोळ होतो. लग्न संमारंभात किंवा ऑफीसच्या पार्टीमधे भोजनास मध्यम वर्गीय न्याय दिला जातो. अन्न वाया न घालवता पोटात भरून घेण्याची संस्कृती खाण्यास भाग पाडते. हलदीराम, चाय हाऊस, राजधानी, बिकानेरी अशा अनेक कंपन्या उत्तमोत्तम चटकदार पदार्थ बाजारात आणतात आणि जीभेला खुणावतात. सर्व रूचकर आणि चमचमीत पदार्थ हे जंक फूड का असतात, हा माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न! आणि हे जंक फुड शरीरास अपायकारक का हा मला टोचणारा प्रश्न आहे. काही लोकांचा मला खरंच हेवा वाटतो. किती पण खा, मुळीच व्यायाम करू नका... शरीर यष्टी सडपातळ कायम! त्याना इतर लाख शारीरिक तक्रारी असतील पण दिसण्यात सडपातळ! मागच्या जन्माचं पुण्यच असेल, अजून काय!

माझ्यावर आता प्रोटीन डाएट चा प्रयोग करण्याचा घरी निर्णय घेण्यात आला. माझ्या आहारातून आधीच तेल, तूप, गोड, आंबट, खारट आणि चविष्ट पदार्थ बाजूला काढले होते. आता दोन वेळची चपाती, दोन वेळचा चहा बिस्कीटे आणि सणवार म्हणून केलेले सर्वसामान्य पदार्थ हाकलण्यात आले. माझ्या समोर आता फक्त उसळी आणि डाळी आदळण्यात आल्या. आज मूग, उद्या मटकी, परवा मसूर तर नंतर चवळी. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या द्विदल धान्याने माझे जठर भरू लागले. यात तब्बल चिमूटभर मीठ घालण्याची परवानगी देऊन जीभेचे चोचले पुरवले गेले. या महत प्रयासा नंतर ही माझे वजन कमी होण्याचे लक्षण दिसेना. जणू वजन काट्यातील काटा अडकून पडला होता. उगाच शंका नको म्हणून मी काही हलक्या वस्तूंचे वजन त्या काट्यावर करून खात्री करून घेतली. पण नेमका काटा ठिकच होता. कोणीतरी माझ्या पत्नी समोर अवास्तव कौतुक केल्यामुळे माझी रवानगी एका निसर्गोपचार केंद्रामधे करण्यात आली. तब्बल दहा दिवसांच्या वास्तव्यामधे माझ्या या नरदेहावर अनेक संस्कार करण्यात आले. दिवसाची सुरवात योगासनाने होऊन, तासभराचा तैल मसाज, चिखलाचा लेप, सुर्याखालचे करपणे, वाफाळलेली होरपळून काढणारी आंघोळ आणि दिवसातून एकदाच मिळणारे मुठभर बेचव अन्न, त्याच्या जोडीला विचीत्र काढे व रस. अशा दिनक्रमात “कुपोषणाने मृत्यू” अशा पेपरात वाचलेल्या बातम्यांचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. चिमूटभर मीठा साठी डोळ्यात अश्रू आणणाऱ्या लोकाना पाहीले आणि गांधीजींना मीठाचा सत्याग्रह का करावा लागला ते समजले. दहा दिवसात जे सात आठ किलो घसरले ते पुढील चार दिवसात भरून निघाले.

या सर्व प्रयत्नां बरोबर आवर्जून उल्लेख करण्यास योग्य विषय म्हणजे माझा व्यायाम! योग्य आहाराला व्यायामाची जोड हवी, असं कोणा एका वेड्यानं म्हणून ठेवलंय आणि स्वत: निवांत झालाय. माझ्या राशीला हा व्यायामाचा ससेमिरा खुप पुर्वी पासूनच लागलाय. लोकाग्रहास्तव मी प्रोफेशनल जिम मधे जाऊन नाव नोंदवले. तिथल्या ट्रेनरच्या कडक शिस्तीत रोज व्यायाम करणं अंगावर येऊ लागले. कितीही घाम आला तरी किंवा थकलो तरी भूत मागे लागल्या प्रमाणे त्या ट्रेड मिल वर चालण्याचा वैताग येऊ लागला. शाळेत असताना सायकलने गावभर हुंदडलो होतो पण आता त्या जिम मधील सायकल वर घाम गाळणे जीवावर येऊ लागले. जिम मधील बाकीच्या कमनीय देहयष्टीच्या तरूणांकडे बघून त्यांचा हेवा वाटू लागला. इतर कमनीय देहां बद्दल इथे चर्चा नको. एकंदरीत जिम नामक विकतच्या दुखण्याचा प्रकार नकोसा वाटू लागला. बऱ्याचदा ऑफिसच्या कामानिमीत्त प्रवास करावा लागे. त्यावेळी झालेली सुटका गोड वाटू लागली. जिमचा आलेल्या कंटाळ्याने नकळत माझ्या हातून जिमचे दरवाजे बंद करून टाकले. रोज एखादा खुन्याला गिळायला घालावे, त्या भावनेने मला दोन वेळचा शिधा मिळू लागला. “पोटाची खळगी फार वाईट!” असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते अगदी पटतं.

अशा सर्व फसलेल्या आणि फसगत झालेल्या प्रयत्नांनंतर योगाभ्यासाने माझा बळी घेण्याचे ठरवले. सौ च्या अथक प्रयत्नां नंतर मी स्वत:ला बळीच्या बकऱ्या प्रमाणे सज्ज झालो आणि एका योगाच्या क्लासमधे नाव घातले. दर शनिवार रविवार एका मोठ्या हाॅल मधे माझ्या सारखे अनेक नवशिके आपापल्या पोटांचा भार सांभाळत कसरत करताना पाहून आपण एकटे नसल्याचे समाधान झाले. या उपर वजन वाढी हा केवळ व्यक्तिगत किंवा खाजगी प्रश्न नसून तो आंतर राष्ट्रिय ज्वलंत प्रश्न घोषित करावा अशी इच्छा पण मी बऱ्याच जणाना बोलून दाखवली. त्यावर सर्वानी माझ्या पोटाकडे पहात दुजोरा दिला. योगाभ्यासा मधे सुरवातीस बराच रस वाटू लागला. आमचे योग गुरू सराईता प्रमाणे शरीर दुमडून विवीध योगासने दाखवू लागले. काही दिवसानी माझ्या लक्षात आले की आपणाला त्यातील १०% सुध्दा जमणे अशक्य आहे. उगाच काहीतरी झटापट करायला गेलो आणि अडकून पडलो तर मदतीसाठी हाक मारण्यासाठी तोंड कोणत्या दिशेला आहे ते पण सापडायचं नाही, अशी अनामिक भीती वाटू लागली. माझे सर्वात आवडते आसन म्हणजे शवासन. बऱ्याचदा थकलेल्या शरीराला डुलका लागे आणि बाकीचे उठून घरी जाऊ लागले तरी निद्रासनातून बाहेर पडणे अशक्य होई. कोणीतरी हलवून उठवले की खजिलपणाने हसण्याचा प्रयत्न करावा लागे. अपराधीपणाच्या भावनेने सर्वांच्या नजरा चोरून स्वत:चेच घर गाठणे नशिबी आले. आठवड्यातील इतर दिवशी युट्यूब वरील शिल्पा शेट्टींच्या मार्गदर्शना खाली धडे घ्यायचे ठरवले. पण तिच्या कडून नक्की कोणता अभ्यास मी करावा असा सांस्कृतिक प्रश्न सौ ला पडल्यामुळे माझा गुरू बदलण्यात आला. आता रामदेव बाबा रोज सकाळी काहीतरी वाकडे तिकडे होऊन माझ्याकडून मर्कटलिला करून घेऊ लागले. घरात मुलांच्या हास्याचा विषय होऊ नये म्हणून खास खबरदारी घ्यावी लागे. तब्बल तीन महिन्यांच्या अथक परीश्रमा नंतर माझे हात निव्वळ गुडघ्या पर्यंत कसेबसे पोचू शकतात याचे शल्य टोचू लागले. अजून पायाचे अंगठे तर भलतेच दूर होते. मी अखेरीस शस्त्रे टाकून शरणागती पत्करली. सौ ने दया दाखवित माझ्या नशिबात तो योग नाही हे ओळखून मला योगसाधने पासून दूर राहण्याची नाखुशीने परवानगी दिली. आता माझ्या अथक परीश्रमामधे रोज पळायला जाणे लिहून ठेवले होते. पहाटे तब्बल सहा वाजता उठून पळायला जाण्याचा कार्यक्रम घडू लागला. या कार्यक्रमामधे मला अनेक नयनरम्य साथीदार दिसल्यामुळे काही दिवस उत्साहात गेले. कालांतराने साखर झोपेला तिलांजली देणे जीवावर येऊ लागले आणि “सबकुछ मिथ्या है” या उपरतीने मी पळण्याचा नाद सोडला.

हा वजनाचा आकडा माझ्या वजन काट्याला फेविकाॅल ने चिकटवल्या सारखा बसून माझ्यावर हसत होता. मी आणि माझ्याहून अधिक म्हणजे सौ मात्र हार मानायला तयार नव्हती. माझ्या मधील बाजीप्रभूंच्या मॅनेत तलवार खुपसायला सिध्द अशा अनेक उत्साही व्यक्ती नावारूपाला आलेल्या आहेत. त्यातील सर्वप्रथम क्रमांक लागतो प्रथितयश श्रीमती दिवेकर यांचा. या बाईंनी भल्या भल्या नट्याना बारीक करून त्यांचे करीयर उंचावून ठेवले आहे. त्यांचे पुस्तक तर हातोहात विकले गेले म्हणे.. आणि त्याना सल्ला विचारण्याची फी जर माझ्या सारख्यानं देण्याचे ठरवले तर सहा महिने पोटाला चिमटा काढावा लागेल. खरंतर त्यातच बारीक होण्याचे रहस्य दडलेय म्हणे. तर त्यांच्या प्रसिध्द झालेल्या पुस्तका नुसार माझ्यावर प्रयोग सुरू झाले. गांधीजींच्या सत्याचे प्रयोगां प्रमाणे हे दिवेकरांचे प्रयोग करू लागलो. दर दोन तासाने खाण्याची पुरचुंडी घशाखाली सोडू लागलो. आॅफीसमधे अशा अनेक पुरचुंड्या घेऊन जाण्याचा थाट पार पडू लागला. मिटींगच्या गजराच्या बरोबरीने पुरचूंडीचा गजर वाजू लागला आणि न चुकता कार्यक्रम उरकू लागलो. या पाठीमागे त्यांनी समजावलेले विज्ञान जरी मला नाही समजले तरी हा दर दोन तासाचा कार्यक्रम सुरवातीस मात्र गंमतशीर वाटला. बऱ्याचदा प्रवासामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे पुरचूंडीचे वेळापत्रक पाळणे अशक्य होऊ झाले. अशावेळी एकदम तीन चार पुड्या सोडल्या जावू लागल्या. अजूनही वजनाचा काटा तसाच कुत्सित हास्य करीत बसला होता.

बदल हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. फक्त माझे वजन याला अपवाद आहे. बऱ्याचदा ते किलोभर वर सरकून बसे पण एखाद्या व्रात्य कार्ट्या प्रमाणे ते खाली उतरायला तयारच होत नव्हते. अशातच मला अजून एका गुरूने रस्ता दाखवला. ते म्हणजे साक्षात डाॅ दीक्षित. एक दिवस माझ्या एका मित्राने माझी दयनीय अवस्था ओळखून मला डाॅ दीक्षितांची क्लिप आणि इतर बरीच माहीती पाठवली. अनेक जण त्यांच्या मार्गदर्शना खाली होत्याचे नव्हते झालेले किस्से ऐकले. आता माझ्या नशिबात दीक्षितांचा अनुग्रह लिहून ठेवला होता. तीन त्रिकाळ खाण्यावरून फक्त दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. निव्वळ पंचावन्न मिनीटात भरपेट जेवण्याची मुभा मिळाल्यामुळे ही एक सुवर्णसंधी चालून आल्याचा आनंद झाला. सुरवातीस थोडे दिवस भरल्यापोटी केवळ दोन वेळच्या आहारावर मला समाधान मानताना पाहून स्वत: बद्दल कौतुक वाटले पण हळूहळू सर्व मर्यादा शिथील होत गेल्या. वजनाच्या काट्यानं थोडीशी माघार घेण्याचे लक्षण दाखवले पण फार कौतुकास्पद किंवा स्फुर्तीदायक बदल दिसेना.

आता मी काही गोष्टी आवर्जून करून बघायच्या ठरवल्यात. दर दोन तासानं पंच्चावन मिनीटे जेवायचे, कोणताही पदार्थ जेवणातून वर्ज्य करायचा नाही. बीपी, शुगर असल्या कोणत्याही भुलथापाना बळी पडायचे नाही. जमेल त्यावेळी पाच सहा किलोमीटर चालून यायचे, पण उगाच अट्टाहास करायाचा नाही. डाॅक्टर च्या दरवाज्याकडे ढुंकूनही पहायचे नाही. मुख्य म्हणजे कोणा बरोबर ही वजन, रक्तदाब, रक्तातील साखर असल्या क्षुद्र व पोकळ गोष्टींवर चर्चा करायची नाही. कोणी खाजवून विषय काढलाच तर सर्रळ दुर्लक्ष करायचे. उगाच फारसं मनाला लावून घ्यायचं नाही. चर्चेसाठी आणि चिंतेसाठी आपल्याकडं मोदी, काँग्रेस किंवा ट्रंप अशा मुद्द्यांची रेलचेल असताना... कशाला उगीच!

[टिप: हा लेख निव्वळ विनोद आणि करमणूकीच्या उद्देशाने लिहला आहे. कृपया वाचकानी मला समदु:खी हळहळ अथवा सहानभुती प्रद संदेश पाठवू नये. पुणेरी पध्दतीने अपमान करण्यात येईल.]

https://thetdilse.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1

~ संदीप कुलकर्णी
+६५ ९८२२ १०६०

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कसलं धमाल लिहीलंय.. घराघरातील अनुभव जणू! Lol

आजकाल मी माझ्या वाढत्या वयाला दोष द्यावा का माझ्या कामाच्या पध्दतीला का माझ्यातल्या आळसाला>> हे फार्फार आवडलं Proud

आता मी काही गोष्टी आवर्जून करून बघायच्या ठरवल्यात. दर दोन तासानं पंच्चावन मिनीटे जेवायचे, कोणताही पदार्थ जेवणातून वर्ज्य करायचा नाही.
>>> हा व्हाट्सएप जोक आहे, आधी वाचला होता.

बाकी लेख छान !!!

धन्यवाद मंडळी. लोभ असावा.

च्रप्स - तशी काही चुक झाली असेल तर माफ करा गरीबाला. _/\_ गोड मानून घ्या.

आमचे योग गुरू सराईता प्रमाणे शरीर दुमडून विवीध योगासने दाखवू लागले. काही दिवसानी माझ्या लक्षात आले की आपणाला त्यातील १०% सुध्दा जमणे अशक्य आहे. उगाच काहीतरी झटापट करायला गेलो आणि अडकून पडलो तर मदतीसाठी हाक मारण्यासाठी तोंड कोणत्या दिशेला आहे ते पण सापडायचं नाही, अशी अनामिक भीती वाटू लागली. ...

जाम हसलो बुवा!!!!

सर्वच पंचेस तूफानी आहेत Happy
खूप आवडले हे लिखाण.

------------

कोणी मायबोलीवरील स्ट्रेस बस्टर धागे संकलित केले असतील तर ह्याची लिंक तेथे आवर्जून जोड़ा अशी विनंती .

कोणी मायबोलीवरील स्ट्रेस बस्टर धागे संकलित केले असतील तर ह्याची लिंक तेथे आवर्जून जोड़ा अशी विनंती .>> डन
पण मूळ लेखाचा संपादन कालावधी निघून गेल्यामुळे प्रतिसादात टाकले आहे
https://www.maayboli.com/node/68130

मस्त लिहिलंय
मीठाचा सत्याग्रह वगैरे पंचेस आवडले
"पिझ्झा, तिरामीसु, ब्लॅक फॉरेस्ट, व्हेज ऑ ग्रॅतीन खाऊन वजन भराभर कमी होईल" असे जेनेटिकली मोडीफाईड जीन(पॅन्ट नाही) अमेरिकेतल्या शास्त्रज्ञानी शोधून काढायची मी वाट पाहतेय ☺️☺️

मंडळ मी भलता आभारी आहे. आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाने माझ्या अंगावर मूठभर मास चढले आणि किलोभर वजन वाढले. तरीपण सौ ने मला लिखाण चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. असाच लोभ असावा.
माझ्या ब्लाॅग ला जरूर भेट द्या. तिथे असे अनेक लेख (धूळ खात) पडलेले आहेत.