आज संध्याकाळी आम्ही भरपूर खेळून दमलो होतो. जेथे आम्ही खेळत असू त्या टेकडीच्या बाजूच्या मैदानाजवळ आणि आमच्या शाळेच्या मागे एक विहीर होती. त्याला एक रहाट होता. मी असे ऐकले होते की ज्या काळात अस्पृश्यता होती त्या काळात आमच्या गावात ज्या विहिरी सर्व जातीच्या लोकांसाठी खुल्या होत्या त्या विहिरींपैकी ही एक विहीर होती. त्याला आम्ही आईची विहीर म्हणत असू.
संध्याकाळी खूप खेळून दमल्यावर आम्ही आईच्या विहिरीवर पाणी पिऊन सुर्यास्ताच्या अगदी काही क्षण आधी टेकडी बाजूच्या मैदानापाशी एका झाडाखाली बसत असू. दादाशी चर्चा, गप्पा गोष्टी त्या वेळी रंगत .
कालचा विषय तसाच अर्धवट राहिला होता. आमच्यापैकी राघू खूप विचार करणारा होता. कोणतीही गोष्ट त्याने डोक्यात घेतली की पटकन तो सोडत नसे. आज त्याने परत कालचा विषय काढला,
'धर्म धर्म करणारे लोक कसे सगळ्या जगाला काही शतके मागे घेऊन जात आहेत... , पुराणातील मढी उकरून कुणाचे भले झाले?', - राघू
ओजस म्हणाला, ' खर तर सर्वांनी आपल्याला ज्यातून सुख मिळेल, आनंद मिळेल तसे वागावे, खूप धर्म धर्म करू नाही'
पंड्या लगेच म्हणाला, ' काल तेजस म्हणाला तसे, सगळे जण वैयक्तिक सुखासाठीच जगत असतील तर श्रेष्ठ कोणाला म्हणायचे?..
सुख का कुणाला फुकट मिळते? आणि कितीतरी जणांच्या जीवनात आयुष्यभर कष्ट सोसून सुद्धा सुखाचे दिवस बघायला मिळत नाहीत.. '
तेजस म्हणाला, ' हो, ते खरंच आहे.. म्हणूनच तर जी व्यक्ती सुखासाठी साधन सामुग्री देते, लोकांना नोकरी देते, प्रेमिकांचे लग्न लावून देते, भुकेल्या लोकांना धन धान्य देते, आजारी लोकांना वैद्यकीय मदत देते.. त्यांनाच श्रेष्ठ मानायला हवं..'
त्यावर ओजस म्हणाला, 'पण हे सगळे तीच व्यक्ती देऊ शकते ज्याकडे धन आहे, सत्ता आहे, स्वतः कडे पुरेशी साधन सामुग्री आहे. मग सत्ता, धन, सामाजिक हक्क ज्याच्याकडे अधिक त्याला श्रेष्ठ मानावे का?'
अश्रफ म्हणाला, 'असं कसं करून चालेल? कायम धनाढ्य व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते हेच समाजात श्रेष्ठ होते का? ख्रिस्तपूर्व काळात तशीच तर परिस्थिती होती.. त्याकाळात रोमन राज्यात सम्राटांनाच देव मानले जात असे. त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जात असे. ख्रिस्ताचे जीवन हेच तर सांगते कि फक्त धनाढ्य सत्ताधीशांना कायम श्रेष्ठ मानू नका. ज्यांनी समाजाचे दुःख दूर करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, स्वतः दुःख सहन केली, सैय्यमी पवित्र जीवन जगला तोच खरा देवाचा पुत्र... मग आपण फक्त ज्याला ज्यातून सुख मिळते त्याने ते करावे एवढे म्हणून सगळा समाज परत ख्रिस्त पूर्व काळात घेऊन जात नाही का?'
ओजस म्हणाला, 'कदाचित अशी व्यक्ती धनवान असेल सुद्धा, एखादा जाणता राजा पूर्वी होऊन गेला तसा यापुढे पण होईल'
आम्ही अश्रफ, ओजस ची चर्चा ऐकत होतो.. दादा पण ऐकत होता. सूर्य मावळून अंधार पडायला लागला होता, आणि आम्ही परत घराकडे चालायला लागलो.
छान आहे
छान आहे