नेमेचि येतो मग फ्लू काळ

Submitted by अश्विनी on 19 January, 2018 - 13:03

अमेरिकेत साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास फ्लू सीझनला सुरूवात होते ते एप्रिल मे पर्यैत ह्याची व्याप्ती असते. डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत त्याची तीव्रता सर्वात जास्त असते.
ह्यावर्षीचा फ्लू सीझन तुलनेने जास्त वाईट असणार आहे असा गाजावाजा सगळीकडे ऐकू येत आहे त्याचे कारण H3N2 हा स्ट्रेन. ह्याची ख्याती 'हॉस्पिटलायझर' अशीच पसरलेली आहे. नेहमीचीच फ्लूची लक्षणे पण जास्त तीव्र आणि जास्त भयानक. हा सीझनही नेहमीपेक्षा एक महिना आधीच चालू झालाय आणि जास्त काळ टिकणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
साधारणपणे फ्लूचा विषाणू सतत परिवर्तित होत असतोच पण H3N2 स्वतःमध्ये इतक्या झपाट्याने बदल करत असतो की विषाणूप्रतिबंधक लशी त्याच्याविरूद्ध तितक्याश्या प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळेच कधी लस जिंकते तर कधी विषाणू.

काय आहेत यंदाच्या फ्लूची लक्षणे?
ताप, सर्दी, थंडी वाजून येणे, खोकला, घश्याला सूज, डोकेदुखी, अंगदुखी आणिअशक्तपणा.
ह्यापैकी सर्व लक्षणे सर्व रूग्णांमध्ये एकाचवेळी असतीलच असे नाही. कमीजास्त प्रमाणात असू शकतात. काहींना मळमळणे, किंवा उलटीचाही त्रास होऊ शकतो.

आयुर्वेदीकदृष्ट्या व्याधिविचारः
वात, पित्त, कफ हे त्रिदोष आणि रस, रक्तादि सप्त धातू हे सम अवस्थेत राहून उत्तम कार्य करत असतील तर विषाणूचा उपद्रव झाला तरी शरीराची प्रतिकार शक्ती त्याला तोंड देऊ शकते. परंतु दोष आणि धातू साम्यावस्थेत नसतील, शरीरात क्लेद आणि आमाची उत्पत्ती झाली असेल तर, पाणथळ आणि दलदलीच्या जमिनीत तण जसे झपाट्याने वाढते तसा अश्या शरीरात विषाणू आपले हातपाय पसरतो. तेच जमिन जर कोरडी ठणठणीत असेल तर तण मूळात रूजतच नाही आणि रूजले तरी पसरत नाही. अश्या वेळी शरीराची प्रतिकार शक्ती विषाणूचा समाचार घेण्यासाठी पुरेशी होते.

फ्लू होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी:
१. फ्लू झालेल्या व्यक्तींपासून दूर राहावे. हस्तस्पर्श टाळावा. त्यांनी हाताळलेल्या वस्तूंनाही स्पर्श करू नये.
२. बाहेरून आल्यावर हात धुवावे.
३. फ्लू झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात जास्त राहू नये. बोलण्यातून, खोकल्यातून ह्या विषाणूचे संक्रमण होत असते.
४. ताजे अन्न, पुरेशी निद्रा घेऊन प्रकृती साम्यावस्थेत ठेवावी.

घरगुती उपचारः
१. सुंठ, मिरे, खडीसाखर बारीक करून तुपातून घेणे
२. तुळस, लवंग, दालचीनी भरडून त्याचा काढा करून, गाळून त्यात मध घालून घेणे
३. हळद, वेलदोडा, साखर दुधात घालून उकळून गाळून पिणे
४. ऑईल डिफ्यूझर असल्यास त्यात निलगिरी तेलाचे थेंब टाकावेत आणि झोपताना खोलीत लावून ठेवावा.
५. कपाळाला सुंठीचा लेप द्यावा (डोकेदुखीसाठी) - परंतु डोळ्यात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

आयुर्वेदीक औषधे:
१. सितोपलादि चूर्ण
२. गुळवेल सत्व
३. महासुदर्शन चूर्ण किंवा काढा

पथ्यः
१. पचायला हलका आणि द्रवाहार घ्यावा. उदाहरणार्थः भाताची पेज, मुगाची पातळ खिचडी, मुगाचे कळण, चिकनचे पातळ सूप
२. शिळे, आंबवलेले, फ्रीझ केलेले, पचायला जड पदार्थ टाळावेत.
३. थंडीत बाहेर जाताना व्यवस्थित गरम कपडे घालावेत.

प्रश्न किंवा शंका: इथे विचारले तरी चालेल किंवा ईमेल करा ‘ashwinisatav@yahoo.com

विशेष सूचना:
हा लेख संदर्भ म्हणून वापरावा.
आपल्या डॉक्टरशी सल्ला मसलत करून उपचार योजना ठरवावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीबद्दल धन्यवाद अश्विनी.
क्रमांक ३ चा घरगुती ऊपचार करत आहे.
हा प्रश्न जरा अस्थानी वाटेल पण तुमच्या मते त्यातल्या त्यात बर्‍या ओवर-द-काऊंटर मेडिसीन्सची नावं सांगता येतील का? सुंठ, बाकी काढे वगैरे सध्या हाताशी नाहीत.

सितोपलादि चूर्ण, तालिसादी चूर्ण अ‍ॅमेझॉनवर आहे.
Indian grocery store मध्ये पण मिळू शकेल.

सुंठ नसेल तर आले किसून, लवंग, दालचिनी भरडून त्याचा काढा केला (दुप्पट पाणी घालून निम्मे उरवायचे.) तरी फायदा होईल. काढा साधारण कोमट झाला की त्यात मध घालायचा. असा दिवसातून ३-४ चमचे घेतला तरी चालेल.

हळदीचे दुध दिवसातून दोनदा घ्यायलाही हरकत नाही.
खोकला असल्यास, कोरफड ( बर्‍याच ग्रोसरी स्टोअर्स मध्ये मिळते) भाजून तिचा गर काढून मध मिसळून घेतला तर लगेच कमी होतो.

वरती दिलेले पथ्य पाळणे आवश्यक आहे.