मरण

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2018 - 05:57

गझल - मरण
=====

का विचारावेस तू, यावे मला का रे मरण
बघ जरा आकाश जेथे पावती तारे मरण

दोन घटनांनीच झाली आमची असली दशा
'जन्म होणे' एक अन दुसरी 'न येणारे मरण'

मी कधी मरणार ह्याची वाट सारे पाहती
मी असा जगतो जणू की पावले सारे मरण

मी तुझ्या गंधाविना शाबूत असतो राहिलो
पण तुझ्यापासून आणत राहिले वारे मरण

काजवे लेवून बुरखे मध्यरात्री हिंडती
मी पिढ्या देतो विजांच्या घेत अंधारे मरण

शेर शेरासारखा का वाटतो हे सांगतो
दोनवेळा पाहिले येऊन जाणारे मरण

एक खिडकी प्यायचे पाणी मला पाजायची
'बेफिकिर' झाली अता ती अन मला प्यारे मरण

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार निराश झालात का हो? मरणाच्या गोष्टी, या तरुण वयात?
अहो, यायचे तेंव्हा येईलच मरण. आत्ता फक्त आला क्षण आनंदात घालवायचा. जुने सगळे विसरून जायचे.
पण तुझ्यापासून आणत राहिले वारे मरण असल्या लोकांपासून शक्यतो दूर रहा, काही नवीन लोकांशी ओळख करून घ्या.
लोक टवाळ म्हणाले तरी चालेल, पण विनोद ऐकणे, करणे सोडू नका. क्षणभर तरी बरे वाटते.
बघ जरा आकाश जेथे पावती तारे मरण - जरा शास्त्रीय दृष्टीने विचार करा. तारे म्हणजे नुसते वायुगोल, त्यांना मरण काय नि जगणे काय? ते राहिले आकाशात. जवळच्या माणसात मन रमवा.