चित्रवीणा

Submitted by मितान on 8 July, 2014 - 13:26

बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला.

कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं.

एकेक कविता वाचायला घेतली. तीन आठवडे केवळ बाकीबाब मनात तरंगत होते. किती अफाट लिहिलंय या माणसानं !

निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !

बोरकरांच्या निसर्गकविता हा अतिशय चित्रदर्शी अनुभव असतो. गोव्याच्या समुद्रासारखी लखलखणारी त्यांची निसर्ग कविता कधी कधी आपला अत्यंत व्यक्तिगत अनुभव बनून जाते.

चित्रवीणा या कवितेचा ठसा मनावर अमीट आहे.

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

एका साध्या भिंतीचे वर्णन कवीच्या लेखनीतून येताना

जिकडेतिकडे गवत बागडे
कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होऊनी अनावर... ! असा साज लेवून येते.
कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांग
पूर्वेला राऊळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे ....

गोव्याचा निसर्ग हा बोरकरांच्या कवितेचा श्वास आहे. तिथला समुद्र कधी सखा होऊन येतो तर कधी लेकरू. गोव्याच्या समुद्राला बिलोरी आरशाची उपमा देत कवी म्हणतो

समुद्र बिलोरी ऐना
सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली
कार्तिक नौमीची रैना ॥.

निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते

एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा

या निळ्या रंगाची फुलपाखरं, निळ्या रंगाचा शिकारा नि निळा कान्हा त्यांच्या अनेक कवितात डोकावतो. एका कवितेत तर आकाश निळी गाय होते !

लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय
थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय

पाऊस तर कवीचा सखा ! पावसाची असंख्य रूपे या कवितांमध्ये येतात.

घन लवला रे घन लवला रे
चारा हिरवा हिरवा रे
वर उदकाचा शिरवा रे
मनातले सल रुजून आता
त्याचा झाला मरवा रे !

हे मरवा झालेलं कवी मन कधी पावसाच्या सरींमध्ये भिजताना गोपी होते ; हरवते; म्हणते-

मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधुनमधून
वनात गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
वेली ऋतुमति झाल्या गं....सरीवर सरी आल्या गं..

सर ओसरल्यावर जणू दृष्टी लख्ख होते नि कवी म्हणतो

सर ओसरली जरा, ऊन शिंपडले थोडे
चमकले गारांपरी शुभ्र प्राजक्ताचे सडे
इटुकल्या पाखराने निळी घेतली गोलांटी
फूल लांबट पिवळे झाली सोन्याची वेलांटी

आकाश, समुद्र, संध्याकाळ आणि रात्र, पहाट, पाऊस, फुलपाखरं, झाडे वेली सगळेच त्यांच्या कवितेत आपल्याला 'दिसतात' ! सागराला उद्देशून एका कवितेत ते म्हणतात-

आनंदाच्या निळ्यापांढर्‍या
लाटा नच मावुनिया पोटीं
तुझ्याच परि मी गात लोळलो
कर्पुरकणिकांच्या या कांठी

तर 'आकाशमाउलीस' ते म्हणतात

कोर बिलोरी तुझ्या कपाळी शिरी मोत्यांची जाळी गं
तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी गं

एका संध्याकाळचे वर्णन करताना शब्द येतात

फांदीसारखी झुकते सांज जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन पेंगुळपांगुळ होते जग
गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो उकत्याझाकत्या काजव्यांसवे

निसर्गाची हे उदात्त वर्णन काहीसे अंतर्मुख करणारे, गोव्याच्या मातीबद्दल अतीव जिव्हाळा नि ममत्त्व दाखवणारे. त्यांच्या मते गोव्याची भूमी चांदण्यांचे माहेर, चांदीच्या समुद्राची नि सोन्याच्या पावसाची.

माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे
त्यात सावित्रीची माया जन्मजन्मांतरी जळे

तिथल्या पालापाचोळ्यावरही त्यांनी उदंड प्रेम केले .
गळण्याआधी या अशाच कवितेतल्या या शब्दांचे लालित्य पहा-

गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळिती पाने
आग लागल्यागत राळांचा फाग खेळिती पाने
उन्हे सांजची सरीसरींनी त्यांत ओतिती सोने
झडती पानेदेखिल होती अमृतभरले दाणे
झडण्याची चाहूल लागतां असा महोत्सव त्यांचा
सण गणुनी पिटितात चौघडा येणार्‍या मरणाचा

मातीत माखलेला नि निळाईत रंगलेला हा कवी खर्‍या अर्थाने निसर्गपूजक होता. त्यांच्या सर्व आकांक्षा या निसर्गाशी जोडलेल्या होत्या.

इतुक्या लवकर येइ न मरणा
मज अनुभवुं दे या सुखक्षणा

असे म्हणत कवी 'मी विझल्यावर' या कवितेत आपली अंतिम इच्छाच जणु व्यक्त करतो.

मी विझल्यावर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाचे थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे
मी विझल्यावर त्या राखेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळित विखुरल्या माझ्या कविता
धरितिल चंद्रफुलांची छत्री
तरीही नसावे असोनी जगी या
निरालंब छांदिष्ट वार्‍यांपरी
कळावे न कोणा कसा पार झालो
भुलावून लोकांस पार्‍यापरी

बोरकरांच्या निसर्गकवितांबद्दल किती किती भरभरून लिहावे ! नव्हे ! त्या कविता अनुभवाव्या. कवितांची विचित्रवीणा दिडदा दिडदा वाजतच राहाते. मनाच्या निळ्या घुमटात घुमत राहते.

आज एवढेच फक्त बोरकरांच्या निसर्गकवितांबद्दल. प्रेमकविता पुन्हा कधीतरी.

इति लेखनसीमा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

ही विसरलात? Happy

'गोव्याच्या भूमीत'मधली ही कडवी अक्षरशः पंचेद्रियांना हाक घालतात -

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कडेकपारींमधुनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर.. फळी फुलांचे सुवास..

चित्रदर्शी लिखाणाचा हा एक नमुना :
सांज दाटली शिरी
परतली घरा भिरी
सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा...

शेवट वाचून हेही आठवलं -
संधीप्रकाशात अजुन जो सोने.. तो माझी लोचने मिटो यावी..||

सुरेख उतरलाय लेख.
बोरकरांच्या प्रेमकवितांतही निसर्ग आहेच.
'या वळवाच्या सरीपरी तू आलिस माझ्या दारी गं'...
किंवा जपानी रमलाच्या रातीतही
'रतिरत कुक्कुटसा कुंडीवर आरोहुनि माड
चोच खुपसुनी फुलवित होता पंख्यांचे झाड'..

किंवा सुनीताबाईंनी अतिशय तरलपणे पोहोचवलेली.. 'तू भेटली नसतीस तर' ही कविताही..
रतन-अबोलीची वेणी माळलेली..... त्यातही निसर्ग ओतप्रोत भरलाय.

त्यांची एक कविता (नक्की आठवत नाही) पण त्यात असे वर्णन आहे की देवाने 'झाडे आणि जनावरे' निर्माण केली
आणि त्यामुळेच आमचे जगण्यातले 'ताप' सह्य झाले.

-चैतन्य दीक्षित

धन्यवाद जाई. साती, जिज्ञासा,आरएमडी !
@ स्वाती_आंबोळे
त्या कविता कशी विसरेन ! त्या नेहमीच म्हटल्या जातात म्हणून इथे घेण्याचा मोह आवरला. Happy
वाचकांकडून अजूनही काही कविता येतीलच याची खात्री आहे.

@ चैतन्य
अरे बोरकरांच्या प्रेमकविता हा तर स्वतंत्र लेखाचा विषय. यात केवळ निसर्गकविता आहेत.

वा!

स्वातींचा प्रतिसाद वाचून बोरकरांचा 'पावलापुरता प्रकाश' हा ललितलेखसंग्रह वाचनात आला होता, तो आठवला. ब्रह्मकमळ उमलण्यावरून (शहाळ्याची?) मलई, सोनचाफ्यावरून फणसाचे गरे.....
हे बोरकरच करू जाणेत. अन्य कुणाच्या लेखनात हे पंचेद्रियांनी भोगणे वाचल्याचे स्मरत नाही.

आहाहा, आहाहा .......

बाकीबाबांची याद जागवल्याबद्दल शतशः आभार ...... Happy

हिरवळ आणिक पाणी

तेथे स्फुरती मजला गाणी

निळीतुनी पांखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी

सुखांत चरती गुरेवासरे

लवेतुनी लहरते कापरे 

हवेतुनी आरोग्य खेळते गार नि आरसपानी

उरी जिथे भूमीची माया

उन्हात घाली हिरवी छाया

सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानी

जिथे अशी समृद्ध धरित्री

घुमति घरे अन पुत्रकलत्री

रमे श्रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्यी

सख्यापरते जिथे न बंधन

स्मितांत शरदाचे आमंत्रण

सहजोद्वारी गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी

ऋतूऋतुंतून जिथे सोहळे

तसेच उघड्यावरी मोकळे

आणि अंगणी श्रृंगाराची निर्मळ अमृतवाणी

माणूस जेथे हवाहवासा

अभंग-ओवीमधे दिलासा

विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी

देव जिथे हृदयात सदाचा

भार मनाला नसे उद्यांचा

सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दु:खे डोळा पाणी हिरवळ आणिक पाणी

तेथे स्फुरती मजला गाणी

- बा. भ. बोरकर

हिरवळ आणिक पाणी

तेथे स्फुरती मजला गाणी

निळीतुनी पांखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी

सुखांत चरती गुरेवासरे

लवेतुनी लहरते कापरे 

हवेतुनी आरोग्य खेळते गार नि आरसपानी

उरी जिथे भूमीची माया

उन्हात घाली हिरवी छाया

सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानी

जिथे अशी समृद्ध धरित्री

घुमति घरे अन पुत्रकलत्री

रमे श्रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्यी

सख्यापरते जिथे न बंधन

स्मितांत शरदाचे आमंत्रण

सहजोद्वारी गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी

ऋतूऋतुंतून जिथे सोहळे

तसेच उघड्यावरी मोकळे

आणि अंगणी श्रृंगाराची निर्मळ अमृतवाणी

माणूस जेथे हवाहवासा

अभंग-ओवीमधे दिलासा

विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी

देव जिथे हृदयात सदाचा

भार मनाला नसे उद्यांचा

सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दु:खे डोळा पाणी हिरवळ आणिक पाणी

तेथे स्फुरती मजला गाणी

- बा. भ. बोरकर

अंगाची लाही लाही होत असतांना अचानक आकाशात ढगांनी गर्दी करावी आणि पावसाच्या सरीवर सरी कोसळून , सारेच वातावरण बदलून, अंगावर गारव्याची शीतल लहर पसरावी असेच लेख वाचून वाटले. कवीवर्य बोरकरांच्या वरील कवितांची नुसती झलक वाचून, सर्वच कविता शोधून वाचण्याची प्रेरणा मनात उमटली आहे. कोणीतरी स्वतंत्र धागा काढला तर किती छान वाटेल.