इकडे कुठे? (ग्रीस ५)

Submitted by Arnika on 1 November, 2018 - 04:09

“एव्ही. एवढंच नाव सांगत्ये मी सगळ्यांना, कारण इंग्लंडमध्ये कोणालाच उच्चार नाही जमत माझ्या नावाचा.” कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात एक मुलगी मला म्हणाली.
“तरी मला खरं नाव सांग; मी म्हणून बघते.” दृष्टद्युम्न म्हणता येतं एवढ्या एका क्वॉलिफिकेशनवर मी विडा उचलला.

तिचं नाव एव्ह्ग़ेनीया. ती मला भेटलेली पहिली ग्रीक मुलगी आणि लंडनमध्ये तिचं नाव म्हणता येणारी तिला भेटलेली मीही पहिलीच. सुरुवातीला कोणी वेगळी भाषा बोलणारं भेटलं की कुतूहल म्हणून चार शब्द शिकव असं आम्ही सगळेच मित्र-मैत्रिणी म्हणायचो. शिकवणाऱ्याचा उत्साहही तितपतच असायचा, आणि हाय-बाय आणि दोन शिव्या शिकून पुढच्या आठवड्यात शिकणारेही सगळं विसरून जायचे. कसं कुणास ठाऊक, पण एव्ह्ग़ेनीयाने आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून हा खेळ अगदी मनावर घेतला होता. दररोज भेटून ती एखादं ग्रीक वाक्य शिकवायची आणि मी लेक्चर चालू असताना तळव्यावर ते मराठीत लिहून घ्यायचे. त्यावेळी मला त्या भाषेशी देणं-घेणं नव्हतं. एकमेकींशी छान पटलं होतं म्हणून ती शिकवेल ते शिकायचा प्रयत्न करायचे मी. त्याच गमतीतून ग्रीक गुळाला भारतीय मुंगळा चिकटला!

कॉलेजच्या पहिल्या महिन्याभरात अजून दहा-बारा ग्रीक मंडळी भेटली. त्यांनी त्यांच्या सोसायटीत ग्रीक नाच शिकायला बोलावलं. मला जेमतेम दहा वाक्य बोलता येत होती आणि संपूर्ण कारभार शुद्ध ग्रीक मधे चालायचा. मला समजावं म्हणून सगळे पहिल्या दिवशी इंग्लिशमध्ये बोलायला लागले. पण घरापासून लांब असताना आपल्या माणसांचा आणि भाषेचा सहवास मिळावा म्हणून एकत्र येऊन ग्रीकमधे बोलणाऱ्या सव्वीस जणांना फक्त माझ्यामुळे इंग्लिश बोलायला लागणं मला अजिबात नको होतं, म्हणून मी म्हंटलं की ग्रीक बोला आणि मला हळुहळू समजावून सांगा. लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावं इतक्या धीराने आणि प्रेमाने प्रत्येक तालमीला त्यांनी मला भाषा समजावली. एव्ह्ग़ेनीयाने ट्रेनमधून येताजातानाही व्याकरणाचे धडे दिले.

मग कॉलेजची तिन्ही वर्ष मी तिथेच रमले. यांची पाहुणचाराची पद्धत, अभ्यासाबद्दलचं प्रेम, एखाद्या जागेला घरपण आणण्याचे संस्कार, भाषा, यांना आजी-आजोबांविषयी असलेलं प्रेम मला पहिल्यापासून खूप ओळखीचं आणि तरीही वेगळं वाटायचं. त्यातून जीव लावणारी माणसं भेटली म्हणून पुढे भाषा शिकावीशी वाटली. मुद्दाम वेगळीच भाषा शिकायची असं मी ठरवलं नव्हतं. ग्रीकचं झालं तसंच फ़ारसीचंही, पण फ़ारसीची अत्ता अत्ता सुरुवात होत्ये. भाषांची श्रीमंती आणि परभाषांतली मास्टरी भारताला किंवा युरोपला नवीन नाहीये. जातील तिथली भाषा शिकणारी किंवा भाषा शिकून वाटेल तिथे जम बसवणारी कितीतरी माणसं आपण रोज बघतो. फक्त ‘ग्रीक बोलणारी भारतीय मुलगी’ हे तितकंसं ऐकायला मिळत नसावं म्हणून बरेचदा अवाजवी कौतुक माझ्या वाट्याला आलंय याची मला पूर्ण जाणीव आहे.

एक गडबड आहे. गेल्या पंधरा वर्षांत माझ्या आणि आजुबाजूच्या मंडळींच्या हे लक्षात आलंय की मी भाषा शिकायला घेतल्यावर तो देश डबघाईला यायला लागतो. इंग्लंडमधली जोरदार मंदी, ग्रीसची गरिबी, इराणमधली क्रांती या सगळ्या माझ्याच चुका आहेत असं वाटायला लागलंय आम्हाला सगळ्यांना. मला आवडलं असतं जर्मनी किंवा जपानसारख्या धनाढ्य देशांची भाषा शिकायला आणि तिकडे जऊन कामं मिळवायला, पण पत्त्यांचा कॅट न पिसता वाटल्यावर सगळे गोटू-राजा-राणी एकालाच जावेत तशी ग्रीक आणि इराणी माणसं मला आली आहेत. शिवाय श्रीमंत देशांच्या भाषा शिकले असते तर तिसऱ्या महायुद्धाची जबाबदारीही माझ्यावर आली असती अशी फुकटची भीती...

सध्या करत्ये ते काम, त्याच्या ठरवाठरवीपासूनच्या या गोष्टी लिहायचा एरवी कंटाळा केला असता मी. शिवाय ग्रीसशी माझं गुळपीठ का आहे हे सारखंच सांगत्ये की कायसं वाटून मी ते टाळत होते, पण खूप जणांनी त्या श्रीगणेशाबद्दल आवर्जून विचारलं. गावातही रोज नव्याने एखादी म्हातारी हेच विचारते म्हणून तो पाढा पुन्हा एकदा वाचत्ये. बाहेर पडून काम करायचं मनात आलं आणि त्यानंतरच्या तीन आठवड्यात माझा बेत पक्का झालेला होता. या घडीला तरी कोणी माझ्यावर दोन वेळच्या जेवणासाठी अवलंबून नाहीये; दोन-तीन महिने काटकसरीने राहिले तर हात पसरायला लागणार नाहीत अशी सोय करण्याची कुवत आहे; आणि नोकरी सोडायला इतकं घाबरावं असा मोठा हुद्दाही नाहीये हे पटल्यावर पुढच्या गोष्टी सोप्या होत गेल्या. Workaway.info नावाच्या साइटवर जगभरातली अनेक कामं शोधता येतात. तिकडे पहिले तीन दिवस बरेच देश शोधून झाले, पण मलाही माहीत होतं की शेवटी मी ग्रीसमध्येच पोचेन.

आता इंग्लंड आणि युरोपचा काडीमोड होऊ घातलाय. मार्च २०१९ पासून कोणत्या देशाशी संबंध बरे राहातायत आणि कोणाशी फाटतंय ते समजायच्या आत युरोप फिरून येण्यासाठी पुष्कळ लोक इंग्लंडमधून बाहेर पडलेत. भरपूर पैसे घालून सगळे देश बघण्यापेक्षा परवडतंय तेवढ्यात माझा आवडता देश तरी बघून घ्यावा म्हणून मी ग्रीसचं काम शोधायचं ठरवलं. ऐन उन्हाळ्यात नको म्हणून सप्टेंबर, ऐन बेटावर नको म्हणून मेनलॅन्ड, पुन्हा पुन्हा ऐन शहरात नको म्हणून अथीनापासून लांब आणि ऐन गर्दीत नको म्हणून सगळ्यांना माहीत नसलेल्या गावात, म्हणजे सिक्यामध्ये यायचं ठरलं. साइटवरूनच इथल्या कुटुंबाशी ओळख झाली आणि त्यानंतर दहा दिवसात माझी तिकिटं काढून झाली होती. फोटोवरून घरं आणि फोनवरून माणसं अशी कितीशी समजतात म्हणा? तरीही मुलांना सांभाळून सबंध होटेल चालवणारी, नगरपालिकेत काम करणारी मालकीण आणि गायक-संगीतकार, अनवट पर्यटनाची कंपनी चालवणारा मालक बघून त्यांचं घर मला हवंहवंसं वाटलं.

आता मुलं सांभाळायची, इंग्लिश शिकवायचं, होटेल चालवायला मदत करायची अशी कामं ऐकून “पण तुझी डिग्री वेगळी आहे ना?” असं विचारणाऱ्यांना काय सांगायचं हे मला कळत नाही. हात-पाय चालू असलेल्या वयात स्क्रीनसमोर बसायचा कंटाळा आला, खुर्चीत बसून मीटिंग ऐकत जागेपणी स्वप्न बघण्यापेक्षा बरं काहीतरी करून शांत झोप लागू शकते असं वाटलं आणि सुदैवाने तसं आयुष्य जगणारी माणसं भेटली म्हणून त्यांच्याकडे आले, इतकंच. आणि या देशाला सध्या कितीही अवकळा आली असली तरी रात्री विमान उतरताना खिडकीतून दिसणारी अथीना मी कितीही वेळा बघायला तयार आहे. त्या एका चित्रासाठी हजारदा इकडे यायला तयार आहे. प्रेमाला लॉजिक नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच छान...लिहित रहा प्लीज......आम्ही वाट बघतो....
फारसीबद्दलचे अनुभव ऐकायला आवडतील....अरेबिक आणि फारसी वेगळ्या आहेत का ?

खूप छान!
गेल्या पंधरा वर्षांत माझ्या आणि आजुबाजूच्या मंडळींच्या हे लक्षात आलंय की मी भाषा शिकायला घेतल्यावर तो देश डबघाईला यायला लागतो. >> Lol
तुला आता कुठली भाषा शिकावीशी वाटत्ये? Wink
ग्रीक गुळाला भारतीय मुंगळा >> Lol

@rockstar, धन्यवाद! फारसी पुरेशी जमली की लिहीन त्याबद्दल कधीतरी Happy अरबी आणि फारसीची लिपी एकच आहे पण भाषा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

@वावे, काय म्हणतेस, कुठली भाषा शिकू? कुणाचा नायनाट करूया यापुढे? Wink

छान लिहिलंय.
तुमच्या आत्मविश्वासाला आणि धाडसाला सलाम.

तुमच्या पत्त्यांचा कॅट न पिसता वाटला तेच योग्य झालं Happy
नाहीतर हे अनवट अनुभव वाचायला मिळाले नसते.
पु भा प्र

छान लिहीलं आहेस ग. ग्रीकबद्दलचं प्रेम तुझ्या लंडन, शाळा इ. लिखाणात डोकवत होतंच ते इथे एकसंध वाचायला मिळालं Happy
Workaway.info बघितली. चांगली आहे साईट. रेटिंग सिस्टिम आहे. अजून तू वेगळी काही तयारी केली होतीस का?

ग्रीक गुळाला भारतीय मुंगळा >> Lol
तुझी प्रत्येक अनुभवाला नवीन पर्स्पेक्टीव घेऊन सामोरे जायची हातोटी निव्वळ अप्रतिम! खूपच फ्रेश लिखाण..वाचायला खूप आवडतय!

छान लिहिलंयस नेहमीप्रमाणेच. तुझं कौतुक आणि हेवाही वाटतो नेहमी!! टीनेज मुलीच्या आईच्या भूमिकेतून वाचल्यावर ' बाप रे अशा कुठल्यातरी आडगावी जाताना हिच्या पालकांना किती काळजी वाटली असेल , सुरक्षिततेची कशी खात्री केली असेल' असेही मनात आले!!

फार छान लिहिला आहेस हा भाग, एकेक पॅरा कोट करावा तर सगळेच पॅरे कोट करावेत असे झालेत Happy
तुझ्याविषयी कित्येकांना कुतुहल आहे, त्यांना शेकडो प्रश्न पडत असतात आणि ते ते प्रश्न विचारतही असतात. 'अर्निका' हे नाव दिसलं की कित्येक ओळखी-अनोळखी नजरा तुझ्यावर रोखलेल्या असतात. यु आर अ स्टार इन युअर ओन वे! तरीही न बिचकता तू किती कॉन्फिडन्टली उत्तरं देतेस. फार आवडतो मला हा तुझा आत्मविश्वास आणि 'कूलनेस' Happy
मे गॉड ब्लेस यु! खूप सार्‍या शुभेच्छा!

एकदम ओघवते लिहितेस. न चुकता लिहित जा.

टीनेज मुलीच्या आईच्या भूमिकेतून वाचल्यावर ' बाप रे अशा कुठल्यातरी आडगावी जाताना हिच्या पालकांना किती काळजी वाटली असेल , सुरक्षिततेची कशी खात्री केली असेल' असेही मनात आले!! >?> +१ असाच विचार येऊन गेला पहिला भाग वाचल्यावर. मग पुढचे भाग वाचल्यावर लक्षात आले कि काळजी करण्याचे एव्हढे कारण वाटले नसावे.

मस्त!!!
अगदीच चाकोरीबद्ध जीवन जगताना फार भारी वाटतं तुझे लेख वाचुन. मजा कर आणि लिहित रहा. Happy

आईबाबांना खूप काळजी वाटते माझ्या वेडेपणाची. मलापण वाटते Wink कारण विश्वास ठेवणं हा माझा चांगला गुण आणि उणीव, दोन्ही आहे. हाॅटेलची चौकशी करून गेले होते मी, पण असं लोकाबरोबर राहाणं म्हणजे शेवटी नशिबावर सोडायलाच लागलं. शिवाय ग्रीसमध्ये ओळखीची दोन घरं असल्याने मी निवांत होते. नाही पटलं तर उठून यायच्या तयारीत! हाॅटेलवर असताना मी कधीच कुठल्या खोलीवर काही कामानिमित्तही जाणार नाही एवढं आम्ही घरी ठरवलं होतं. बाकी खरोखर राम भरोसे Happy
इश् पूनम! थँक यू खूप खूप खूप <3

बहारदार आणि मनमोकळं...खूप आवडलं गं !

मस्त लिहीतेस गं!
तुझ्या धाडसीपणाला सलाम आहे. मुळातच हे असं चाकोरीत न अडकता वेगळंच काहीतरी करावंसं वाटणं / करणं याला हिंमत लागते. हॅट्स ऑफ!

Pages