काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
बाबा बोलता है अब बस हो गया.
बाबा बोलता है अब बस हो गया. कितना पिळोगे यार. ते सिंबासाहेब बरोबर बोलताहेत. बाबा, धाग्याकर्त्याने साॅरी नाही म्हणले तरी इतरांनी धागा गुंडाळायला हरकत नसते असा एक जीआर काढा बघू
मला हायझेनबर्ग ह्या आयडीच्या
मला हायझेनबर्ग ह्या आयडीच्या पोस्ट पटल्या. उगाच किचकट प्रोसेसेस करून ठेवल्या आहेत सगळीकडेच. बँका असोत, हॉटेल बूकिंग असो, सरकारी कामं असोत, नाहीतर अजून काही असो. आणि अमित म्हणतो तसं "Save their own ass" ह्या पलिकडे त्या प्रोसेसेसना काहीही अर्थ नाही, काडीचा उपयोग नाही.
नसला म्हणून काय झाले? मग
नसला म्हणून काय झाले? मग सिग्नलची तरि काय गरज आहे चौकात? उगाच टाइमपास म्हणून लावतात.
हायजेनबर्ग आणि राखी :फिदी:,
हायजेनबर्ग आणि राखी , विमान प्रवास करता का तुम्ही, आंतरराष्ट्रीय/घरगुती? तिकडचे सिक्युरिटी चेक्स पटतात का? वेगवेगळ्या विमानतळांवर वेगवेगळे नियम असतात किंवा एकाच विमानतळावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे नियम असू शकतात. मग ते पटवून घेऊन विमानप्रवास तरीही करता का?
पुर्वी (९/११ च्या आधी) पाहुण्यांनां रिसीव्ह करायला थेट गेटपाशी (डोमेस्टीक प्रवास ) जाता यायचं. आता नाही करता येत तसं. पाळतोच ना आपण जे काही नियम असतील ते?
प्रवास (किंवा हव्या त्या होटेल मध्ये राहता येणं) जास्त महत्वाचा की हुज्जत घालत बसणं हे ज्याने त्याने ज्या त्या वेळेला ठरवावं.
नियम पाळू नका, किंवा मी पाळत
नियम पाळू नका, किंवा मी पाळत नाही असं कुठे म्हटलंय पण मी. त्या नियमांना अर्थ नाही असं म्हणतीये फक्त. OCI च्या वेळी भारतीय कॉन्सुलेट डॉक्युमेंटेशन आणि प्रॉसेस फ्लॉज् च्या किती स्टोर्या होत्या तूच आठव बरं
"Adam ruins everything" नावाच्या Netflix कार्यक्रमात TSA Security Checks कसे बिनउपयोगाचे आहेत ते देखिल डिटेलवार सांगितलं आहे.
>>नसला म्हणून काय झाले? मग
>>नसला म्हणून काय झाले? मग सिग्नलची तरि काय गरज आहे चौकात? उगाच टाइमपास म्हणून लावतात.
Huh? सिग्नलचा संबंध कुठे आला?
पोलिसांनी सक्ती केली म्हणुन त्यांना काहीही त्या माहितीशी घेणं-देणं नसताना व्यावसायिकांनी ती गोळा करणे ह्या गोष्टीत काही चुकीचं नाही वाटत? ह्याची त्या व्यावसायिकांना पण कटकटच आहे ना? आक्षेप फक्त प्रॉसेसेसच्या किचकटपणावर आहे.
वर कुणीतरी पोलिसांनी CCTV ची सक्ती केली असं लिहिलं आहे, ते पण त्यातच येतं.
>> बुकिंग करण्याव्यतिरिक्त
>> बुकिंग करण्याव्यतिरिक्त ईतरांचा आयडी द्यायला नकार द्या (असा आयडी द्या म्हणून कायदा नसेल आणि ही फक्त पोलिस वा हॉटेलवाल्यांची मनमानी असेल तर)... हॉटेल वाल्यांचा बिझनेस बसू द्या... पोलिस आणि हॉटेलवालं काय क्करायचं ते बघून घेतील.
हा हायजेनबर्ग इकडे उंटावर बसून शेळ्यांसाठी "आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान" गात आहे
हायजेनबर्गशी इथे अंशतः सहमत.
हायझेनबर्गशी इथे अंशतः सहमत. अंशत: याचं कारण, त्यांचा मुद्दा अनवांटेड्/अनवारंटेड प्रोसिजरशी आहे - हा माझा समज.
जगात कुठेहि, हॉटेल रुम बुक करताना ज्याच्या नांवावर रुम बुक केलेली आहे त्याची आयडेंटिटि तपासणं जरुरी आहे. या व्यतिरिक्त ती रुम आक्युपाय करणार्यांच्या आयडेंटिटीची सक्ती करणं हे अनाकलनीय आहे. समजा काहि देशद्रोहि/समाजद्रोहि काम त्या हॉटेलमध्ये होणार/झालं असेल तर रुम बुक केलेल्या व्यक्तिच्या डिटेल्स्वरुन संबंधित पर्प्रट्रेटर्स्च्या मुसक्या आवळणं कितीसं कठिण आहे? त्यात काय एव्हढं रॉकेट सायन्स आहे, हे काम फास्टर फेणे पण करु शकेल...
हाबशी सॉर्ट ऑफ सहमत आहे.
हाबशी सॉर्ट ऑफ सहमत आहे.
> त्या हॉटेल मालकाला अटक करणे आणि लहान मुलांचे आयडी मागणे हा तद्दन मूर्ख आणि फालतू प्रकार आहे. > त्या हॉटेल मालकाला अटक करणे हा खरंच मूर्ख प्रकार वाटला मलापण.
===
किरणउद्दीन यांनी मागील कुठल्यातरी पानावर दिलेली रेडिफची लिंकपण चांगली आहे. २०१४ च्या आधीपासूनच मॅरेज सर्टचा आग्रह धारताय्त हॉटेल चालक तसाकाही कायदा नाहीय, होटेल असोसिएशनसुद्धा तसाकाही नियम नाहीय म्हणतेय, पण सगळे हॉटेल हा नियम स्वतःपुरता बनवताय्त आणि पाळताय्त....
हा माझा अनुभ्व, दोन ठिकाणचा.
हा माझा अनुभ्व, दोन ठिकाणचा.
आधी मुंबईचा:
मुंबईत आम्ही नेहमीचे हॉटेल घेतो गेले कित्येक वर्षे. नातेवाईकांकडे रहात नाही. ४-५ वर्षापुर्वी तरी रिसेपशनिस्ट फक्त एकच आयडी विचारायचा. गेल्या काही वर्षापासून तो दोन विचारतो. आम्हाला काहीच प्रॉबलेम नसल्याने दोघांचे पासपोर्ट्च्या प्रिंट घ्यायला देतो. जितकी माणसं असतो त्यांच्या सगळ्यांच्या त्या त्या वेळेला. आणि मुद्दा हा की, माझे लग्नाआधीचेच नाव आहे. पण चांगल्या हॉटेलात आणि त्या त्या भागाची (शहराची) गरज असते बहुधा म्हणून, आम्हाला तरी तुमचे लग्न झालेय का कोणीही विचारले नाहीये.
आयडी दाखवणे हा नियम आहे आणि त्याप्रमाणे वागतो. हॉटेलचा मालक अक्खी फॅमिली ओळखतो तरी आमची हि अपेक्षा चुकीच असेल की , आम्ही थकलो आहोत , तुम्ही ओळखता तर द्या लवकर रूमच्या चाव्या.
इतर ठिकाणी भारतात हेच नियमानुसार केलेय.
आता अक्कल्कोटचा अनुभवः. वर्षे २०१८, महिना मे.
बर्याच वर्षापुर्वी गेले होते. पण स्वतःच्या गाडीनेच आणी ड्रायवर घरचाच. सकाळी जावून लगेच निघालेलो. पण इतक्या वर्षाने गेल्याने जागेचे काहीच आठवत न्हवते पण उगाच डेरींग केली असे झाले. वर एकटीच होते.
ह्यावेळी एका कामासाठी सोलापुरला गेलेले तर एकटीच तिथे गेले. प्रवास तिथल्याच बसने केला. १०:३०-११:०० ला पोचले. म्हणलं, फ्रेश व्हायला रूम घेवुया जे काही एका दिवसाचे पैसे देवून. कारण कशाला लॉजचा धंदा बुडवा.
अतिशय धक्कादायक आणि भितीदायक अनुभव होता.
१) मला अशी माहिती वेगवेगळ्या लॉजने, दिली. त्या भागात एकट्या बाईला वा पुरुषाला रूमच देत नाहित. का? विचारल्यावर सांगितले एकटे लोकं आत्म्हत्या करतात व जोड्या(स्त्री व पुरुष) असतील तर खुन वगैरे होतात. म्हणून पुर्ण माहिती द्यायला लागते . पण एकट्या व्यक्तीला रूम न देण्याचे कारंण मला खरेच कळले नाहि आणि ज्यास्त हुज्जात घालण्यासारखे लोकं न्हव्ते. जितक्या लॉजमध्ये गेले तितक्या. लोकं इतक्या लांब येवून इथे का आत्महत्या करतात वगैरे लॉजिक लावण्यात वेळ न्हवता. दुसरे कारण असे होते, जोड्या येवून कसलेही 'धंदे' करतात. मुली पळून येतात.... ब्ला ब्ला... वगैरे माहिती मिळाली. बोलणारे उर्मट होते. साधं टॉयलेट सुद्धा वापरायला विनंती बरीच केली. घाण होती ते वेगळेच. म्हटलं , पैसे घ्या तेव्हा बाथरूम दिली. मी बोलत असताना, एक पुरुष येवून बोलला, बाई आमच्याबरोबर या, तुम्हाला आमच्या ओळखीचे लॉज देतो पण २००० रुपये पडतील असे सांगणारा होता. पाच-सहा टाळकी उगाच गोळा झालेली. तेव्हा मी लगेच निर्णय घेतला, इथे काही रहाण्यात अर्थ नाही. दरवाज्याची आतले कडी वगैरे बेकार होते.
२) त्या भागात आजूबाजूला गलिच्छपणा व बेसिक सोयींचा अभाव अजुनही आहेच. हे पुढील लिहिलेले, तुलना करण्यासाठी नाहि लिहित आहे पण कोकणात तरी मंदीराच्या आजूबाजूला इतकी घाण, विचित्र नजरेने बघणारी "लोकं" 'मलातरी' दिसली नाहीत. पण, इथे किळस वाटेल असेच वातावरण वाटले. "हा माझा अनुभव आहे". मी दक्षिणेत व पुर्वेत सुद्धा फिरलेय एकटी मंदीरात पण इतका खराब अनुभव नाही. सर्व लॉज अतिशय बकाल पद्धतीने ठेवल्या आहेत. व एकट्या व्यक्तीला देत नाहित हि नवीनच माहिती.
देव कृपेने, एका माणसाने १ ची बस सोलापुरला जाते ती घ्या. आणि तिथून रेल्वे घ्या जी वीटीला सोडेल. पाच मिनिटात दर्शन घेतले व निघाले तिथून.
तर मी काढलेला मतितार्थ असा की,
१)अश्या भागात जाण्याआधी, पुर्ण माहिती काढावी. २) लोकल लोकांबरोबर हुज्जत घालू नये ३) आणि एकटे गेल्यास, तिथे रहाण्याचे टाळावे.
वरच्या लेखातील अनुभवाविषयी, बर्याच जणांनी टिप्पणी केलीय तरी,
१) फोटो कुठे मागितला तर फोनवरून देणे चुकीचेच आहे. त्याचा गैर वापर होवु शकतो. नको तो अर्थ काढला जावु शकतो.
२) पॅनकार्डची कॉपी, पास्पोर्तची कॉपी हाच एक उत्तम मार्ग आहे. त्यावरील फोटो हा फोटोकॉपीमुळे व, आकारमानामुळे हा इतका सहजासहजी वापर होवु शकत नाही.
३) बाचाबाची करून, तिथे रहाणे भितीदायकच आहे. खासकरून त्या अंधार्या खोल्या... वगैरे.
४) पुर्ण दिवसाचे पैसे वगैरे बोलणे केले होते का? असल्यास , हा वाद फक्त कॅन्सल वरून होण्यास काहीच लॉजिक नाहि.
कारण, कॅन्सल किती तासात केले? त्यावेळचे हॉटेलचा सिझन होता का? नुकसान झाले का? हा प्रश्ण होताच.
५) ऑनलाईन बूकिंग मध्ये, पैसे तासानुसार आणि दिवसा प्रमाणे परत करतात. जर दोन दिवसाआधी , रद्द केले तर इतकेच टक्का परत करु वगैरे.
पण इथे नुसती बोलणी सुरु होती. एन्ट्री जरी रजिस्टर मध्ये झाली असली तरी ती काही मिनिटाआधीची होती. मालकाशी फोनवरून बोलुन, त्या काम करणार्या माणसाची बाजू समजावून काम झाले असते. पण ज्या पद्धतीने, त्यांनी आत येवूनच बोलाचा आग्रह केला त्यावरून, इजा करण्याचा इरादा आणि पैसे उकळण्याचा इरादा नाकारता येवु शकत नाही.
तिथे न रहाता निघाले, हाच योग्य निर्णय होता.
हा हायजेनबर्ग इकडे उंटावर
हा हायजेनबर्ग इकडे उंटावर बसून शेळ्यांसाठी "आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान" गात आहे +१
दिवा घ्या !
एखाद्या अनोळखी लहान गावी कुटुंब गेले व हॉटेल वाल्याने प्रत्येकाचा आयडी दिल्याशिवाय रूम न देण्याचा हट्ट धरल तर केवळ तत्वसाठी म्हणून ती रात्र थंडीत एस टी स्तँड वर सहकुटुंब कुडकुडत काढावी काय ?
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हॉटेल च्या ज्या खोलीत झाला ती गुन्ह्याचा पुरावा म्हणून पोलिसांनी सील केली व बरीच वर्षे तशीच होती. त्या रूम मध्ये ढेकूण, डास्, उंदीर झाले. इतकी वर्षे रूम चे भाडे न मिळाल्याने पंचतरांकित होटेल चे झालेले नुकसान वेगळेच. एखाद्या लहान शरातल्या हॉटेल मध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्या केली तर ते "मिटवायला" हॉटेल वाल्यांना बराच खर्च येतो. अशा स्थितीत त्यांनी काय वाटेल ते नियम काढले तरी ते योग्यच आहेत. रिस्क ते घेताहेत.
>>एखाद्या अनोळखी लहान गावी
>>एखाद्या अनोळखी लहान गावी कुटुंब गेले व हॉटेल वाल्याने प्रत्येकाचा आयडी दिल्याशिवाय रूम न देण्याचा हट्ट धरल तर केवळ तत्वसाठी म्हणून ती रात्र थंडीत एस टी स्तँड वर सहकुटुंब कुडकुडत काढावी काय ?
असं कोणीही करणार नाही. एवढं कोणी idealistic नसतं, असू नये.
>>अशा स्थितीत त्यांनी काय वाटेल ते नियम काढले तरी ते योग्यच आहेत
त्यांना हे असे नियम जे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनी उपयोगाचे नाहीत, फक्त पोलिसांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करायला राबवावे लागतात, त्या मूळ मुद्द्यावर आक्षेप आहे. "आमाला आमच्या लायनी परमानं जाउंद्या" म्हटल्यावर आपण सगळे लायनी परमानं जाण्या व्यतिरिक्त काय करू शकतो? पण ती लायनी अनेक क्षेत्रात बदलायला झालीये एवढंच.
पोलिसांच्या धाकाने नियम पाळले
पोलिसांच्या धाकाने नियम पाळले जातात हे भारतात चिरंतन सत्य आहे. खापपंचायत, करणीसेना यांचा विचार कैला तर आहे ही स्थिती गळ्यात आवंढा आणणारी आहे.
मायबोलीवर काही हॉटेल/रेझोर्ट
मायबोलीवर काही हॉटेल/रेझोर्ट/होमस्टे चालवणाऱ्या व्यक्ती असतील त्यांचेही मत या धाग्यावर वाचायला आवडेल.
पासपोर्ट वरून पालकत्व सिद्ध
पासपोर्ट वरून पालकत्व सिद्ध करता येतं, एकमेकांचे नवरा-बायको (मोस्टली) सिद्ध करता येतं तसेच एकमेकांचे भावंड आहोत हे पण सिद्ध करता येतं. रेशन कार्ड सोडून फक्त पासपोर्ट बहुतेक असा कागद आहे.
कचाट्यातून वाचणे नव्हे ,
कचाट्यातून वाचणे नव्हे , सामाजिक सुरक्षेसाठी पोलीसांना सहकार्य करणे. तो पहा तिकडे एक गट केव्हाचा. " अरे काय चल्लय काय. ह्या हाटेले लॉजेस वर कुणाचे नियंत्रण आहे की नाही. पोलीस काय झोपा काढताहेत का? गुन्हेगार चक्क महाबळेश्वरात येउन आठाठ दिवस राहताहेत आणि याना पत्ता नाही. हेही साले पोलीस त्याना सामील. " असे ओरड्ण्यासाठी कधीचा पोजिशन घेउन बसलाय....
भारतात रस्ताच्या मध्यभागी पडलेला दगड उचलणे हेही पोलीसांचे काम असते. कारण तेच , चार दिवसापासून दगड पडलाय पण पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. इथे लाल सिग्नल पडल्यावर तो ओलांडू नका हे सांगायला पुन्हा एक स्वतंत्र पोलीस ठेवावा लागतो. अमेरिकेतही असेच असावे बहुधा. आपण नाय पायली ब्वॉ अमेरिका.
टवणे सर, दामले मास्तर यांना
टवणे सर, दामले मास्तर यांना विनन्ती काकासाहेब गाडगीळांचा ' फौजदार निष्ठा ' हा लेख कुठे वाचायला मिळेल?
" अरे काय चल्लय काय. ह्या
" अरे काय चल्लय काय. ह्या हाटेले लॉजेस वर कुणाचे नियंत्रण आहे की नाही. पोलीस काय झोपा काढताहेत का? ">>>
बरोब्बर बाबा कामदेव. आपले हात झटकण्यासाठी असे नियम बनवून ठेवतात.
पापभिरु लोक ज्यांना वाटते की वीस वर्षांपूर्वीचा फोटो असलेल्या ड्रायव्हर्स लायसन्स वरून हॉटेल स्टाफ व्यवस्थीत आयडेंटि व्हेरिफाय करूनच आत प्रवेश देतात, हॉटेल रेस्टॉरंट मधून हॉटेलवर न उतरलेल्या कुणाला परस्पर रूम मध्ये जाणे/रेसिडेंटने घेऊन जाणे शक्यच नसते अशा लोकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हे कडक नियम खूप उपयोगी पडत असावेत.
कामदेव बाबा कि जय....
कामदेव बाबा कि जय....
हाब यांचे मुद्दे मार्मिक
हाब यांचे मुद्दे मार्मिक यांना मनापासून पटतात. यावेळी त्यांची जागा अन्य आयडी चालवत आहेत.
'गुन्हा टाळणे' हे मोटिव नाहीच
'गुन्हा टाळणे' हे मोटिव नाहीच आहे. काही घडले तर कायद्याच्या/ पोलिसांच्या कचाट्यातुन वाचणे हे मोटिव असावं. >> ते मोटिव आहेच.. शिवाय जर गुन्हा घडलाच तर तो कुणि केला हे कळू शकेल अशी एक शक्यता निर्माण होते (जर आयडी प्रूफ बनावट नसेल तर).
हाबचा ऋ झालाय. :खुप मोठा दिवा
हाबचा ऋ झालाय. :खुप मोठा दिवा:
नाही म्हणजे बर्याच धाग्यावर बघितलं एकटेच खिंड लढावताहेत. सगळ्यांना एकट्याने उत्तरं द्यायची. शिवाय जास्त नाही थोडेच पण हुज्जत घातल्यासरखे प्रतिसाद वाचुन वाटलं हो तसं.
मैने तो हाब और ऋ के बारे मै
मैने तो हाब और ऋ के बारे मै पैलेच बोला था,
हाब हे त्यांनी ज्यांचा आय डी
हाब हे त्यांनी ज्यांचा आय डी धारण केला आहे त्यांच्याप्रमाणे रॅशनल विचार करीत असावेत असं वाटलं होतं......
हाब हे त्यांनी ज्यांचा आय डी
हाब हे त्यांनी ज्यांचा आय डी धारण केला आहे त्यांच्याप्रमाणे रॅशनल विचार करीत असावेत असं वाटलं होतं......>>
ह्या न्यायाने आपण काय विचार करत असाल?
आपले हात झटकण्यासाठी असे नियम
आपले हात झटकण्यासाठी असे नियम बनवून ठेवतात.
>> अगदी बरोबर. धोक्याच्या ठिकाणचे साइन बोर्ड्स , समुद्राकिनारचे येथे पोहू नका, पुढे धोकादायक वळण आहे, निसरडा रस्ता आहे, येथे सेल्फि घेउ नये, डोकावून पाहू नये, गाडेच्या बाहेर हात काढू नये, गाडी सुटन्याच्या वेळेआधी स्थानकावर यावे, विजेच्या खांबांना हात लावू नये, येथे वाहने पार्क करण्यास मनाइ आहे , विजलीका दबाव ४४० वोल्ट्स , रुळावरून रेल्वे मार्ग ओलांडू नये हे सगळे नियम संबंधित आपापले हात झटकण्यासाठीच केलेले आहेत. इव्हन बाप सुद्धा मुलाला सांगतो असे करू नये तसे करू नये ते उद्या मुलाचे नुकसान झाले तर मुलाने बोम्बलू नये की तुम्ही जबाबदारी असताना का नाही सावध केले म्हणून हात झटकण्यासाठीच बाप मार्गदर्शन करत असतो.
सिगरेट गुटख्याच्या पाकीटावर याने क्यान्सर होतो हे छापलेले असते ते हात झटकण्यासाठीच. ' पुन्हा सांगितले नाही असे व्हायला नको म्हणून"
अगदी मायबोलीचे अॅडमिन सुद्धा दुसरे मटेरियल कॉपी करू नये हे ते वाईट , अनैतिक आहे म्हणून सागत नसून उद्या कुणावर कारवाइ कॉपीराइट कायद्याखाली झाली (मास्तराना नोटिफिकेशन गेले कॉपीराईट टाइपल्याबरोबर ) तर तुमच्या बरोबर माबोची केसमध्ये वरात नको म्हणून हात झटकण्यासाठेच माबोने नियम केले आहेत.... जेहेत्तेकालाच्याठायी !!
बाबा कामदेव
बाबा कामदेव
कशाची तुलना कशाशीही !
याची तुलना घरी दाराला कुलूप आणि खिडक्यांना गज यांच्याशीही झालीय, तूम्ही ती यादी आणखी वाढवली एवढेच.
म्हणजे "अमुक नियम योग्य आहेत, तेव्हा सगळेच नियम योग्यच नसणार का?" हे लॉजिक आहे.
एअरपोर्टला रजिस्टर्ड बॅगेज मधून साधी स्पानर्स स्क्रू ड्रायव्हर्सवाली टूलकिट घेऊन जाणाऱ्यांची जरा चौकशी करावी, त्यांचे तिकीट परत एकदा चेक करावे, आणि त्यांचे नाव, फ्लाईट नंबर एक रजिस्टर मध्ये लिहावे असा ही नियम आहे. (हा नेपाळवरून विमान अपहरण झाल्यावर सुरू झाला). हे कशासाठी? विचारले तर "हे आपल्या सुरक्षेसाठीच आहे" हे घसेपिटे उत्तर. (आता बहुतेक एअरपोर्टसवर सेन्ट्रलाईझड बॅगेज स्क्रिनिंग सुरू झाल्याने ही harassment बरीच कमी झालीय).
"कशी काय याने सुरक्षा वाढते? एकतर जे अलाऊड नाही ते घेऊन जाण्यास मनाई करा अलाऊड असेल तर नसता उपद्व्याप कशाला?" असे प्रश्न विचारायचे नाहीत.
विचारले तर प्रतिप्रश्न करायचा "म्हणजे हँड बॅगेज मध्ये असले टूल्स नेऊ नये हा नियमही फालतूच आहे का?"
तेव्हा काहीतरी कारण असेलच ना असे म्हणण्यापेक्षा त्या नियमांमध्ये नक्की कितपत तथ्य आहे, खरेच काय फायदे आहेत ते बघा आणि मग ठरवा योग्य की अयोग्य.
आता केले आहे नियम पाळावे लागतात, तेव्हा पाळतोच.
पण त्यावर विषय निघाल्यावर भाष्य / चर्चा तर करणारच ना.
चांगले केलेले नियम बघा. ताज
चांगले केलेले नियम बघा. ताज हॉटेल वरील हल्ल्या नंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये वाहन आवारात सोडण्यापूर्वी आरशाने गाडी खालचा भाग चेक करणे, डिकी चेक करणे, असाधारण वाटणारे काही दिसले तर तर तपासून बघणे.
हॉटेलच्या आत बॅगेज स्क्रिनिंग करून सोडणे आणि लोकांचे फ्रिस्किंग, मेटल डीटेक्टर चेकिंग करणे.
लिफ्ट मध्ये गेल्यावर रूम की स्वाईप केल्याविना फ्लोअर बटन प्रेस एक्सेप्ट न करणे.
Renaissance पवई मध्ये तर स्निफर्स डॉग्ज होते गाडी/ बॅगेज चेकिंगला. (त्याला बरीच वर्षे झाली, आतापण असतात की नाही माहीत नाही.)
मैने तो हाब और ऋ के बारे मै
मैने तो हाब और ऋ के बारे मै पैलेच बोला था, >> सिंबा,
How is this either related or helpful to the discussion?
Expected better of you..
काही लोकांना नियमामुळे त्रास
काही लोकांना नियमामुळे त्रास झाला कि त्या नियमात दम नसल्याचा, ते सामाजिक जाणिवेतून पाळले जात नसल्याचा साक्षात्कार होत असतो. मात्र द्स-याला त्रास झाला तर नियम कसे योग्य आहेत, ते कसे पाळले पाहीजेत याबद्दल बौद्धीक घेताना ते थकणार नाहीत.
Pages