लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय, आता पुरे ना...
एक पार्टी अन्याय झाला म्हणून धरून बसलीये, दुसरी हे तर नॉर्मल आहे धरुन बसलीये, दोन्ही पार्टीनी आपापल्या बाजू मांडल्या ,आता त्याच त्याच मुद्द्यावर दळण चालू झाले आहे,

हे काय माबो च्या कोर्टात कबुल केले की हॉटेल वाल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे की दंड होणार आहे?

अय, आता पुरे ना...>>>
दुसरा कुठला धागा पेटवा, सगळे तिकडे वळतील.

ओह, लिंगमळा ची बातमी दुःखदायक आहे.त्या सुंदर जागी गेलो होतो तेव्हाच डोक्यात विचार आला होता की इतकी दुर्गम जागा आहे, कोण गेलं, परत आलं का पत्ता लागणार नाही.
लहान मुलांचे आयडी घेणंही आता आवश्यक वाटतं.लहान मुलं पळवून नेण्याचे गुन्हे वाढले आहेत.
एनिवे जगात नसायचं होतं तर मुलीलाही आयडी देण्यात हरकत नव्हती.(हे लोक घरून एकटं निघून येण्याची हिंमत बाळगतात तर थोडे प्रयत्न करून लग्न करून दुसऱ्या ठिकाणी सेट होण्याचे प्रयत्न का करत नाहीत?)

धागाकर्ते काही ऐकून घेण्याच्या मन"स्थितित दिसत नाहीयेत. आपलेही कुठेतरी चुकले असू शकते ह्याचे आत्मपरिक्षण करावे अशी सूचना करतो.

उल्लेखलेला प्रसंगात धागाकर्त्यांकडून बरेच चुकीचे व संशयास्पद वर्तन घडले आहे. हॉटेलवाल्या लोकांची चूक नाही. त्यांना रोज कशाकशा लोकांशी डिल करावं लागतं. काहीही पर्सनल नस्ते त्यांच्या वागण्यात.

सिण्हगड च्या पायथ्याला काही खेड्यात छोट्या छोट्या रूम्स असलेली काही छोटी हॉटेले आहेत. तिथे काही तासासाठी रूम्स उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांच्याकडे घटनेची पुस्तके उपलब्ध असून त्यानुसार ते कोणत्याही मूलभूत अधिकाराचा भंग करत नाहीत. अनावश्यक सयंघोषित रुल्सही दाखवत नाहीत. तिथे जोडप्यातल्या दोघानाच काय पण प्रमुखालाही आय डी प्रूफ मागितला जात नाही. इतकेच काय पण रजिस्तरेही भरून घेतली जात नाहीत . कार्डेही ही स्वॅप केली जात नाहीत. तिथे सीसी टिव्ही क्याम्रेही नाहीत. तिथेले म्यानेजर अपमानजनक वागणूकही कष्टम्बरला देत नाहीत. उलट साहेब आणखी काही पाठवू का असे आदबीने विचारतात.
अशी हाटेले लांडगापुरात, तरसपुरात, श्वानपुरात,पंढरपुत्रात शिरडीत , नाशकात, उपलब्ध असताना असल्या उद्धट हाटिलात जायचे कारणच काय?

अश्या हॉटेल मध्ये नेऊन लोकांचे खंडणी साठी अपहरण आणि खून होऊ शकतो.
आज ते आपल्या ओळखीच्या जोरावर हे सर्व करत असतील, उद्या एक गैरप्रकार/खून झाला की पोलीस परत नाड्या आवळायला कमी करणार नाहीत.

ईथल्या अनेक प्रतिक्रिया खूप जास्त क्राईम पेट्रोल आणि तत्त्सम प्रोग्राम्स बघितल्याचा परिणाम आहे असे वाटते.

त्या हॉटेल मालकाला अटक करणे आणि लहान मुलांचे आयडी मागणे हा तद्दन मूर्ख आणि फालतू प्रकार आहे.

समजा, तुम्ही तुमच्या लहान मुलाबरोबर हॉटेलमध्ये गेलात आणि त्या लहान मुलाचे आयडीप्रूफ देऊ शकला नाहीत... हॉटेल मॅनेजरने लागलीच पोलिस बोलावून 'मला वाटते ह्या बाईंनी ह्या मुलाला किडनॅप केलेले आहे' असे सांगितले आणि मग पुढची सगळी चौकशी तुमच्या गळ्यात पडली तर तुम्हाला त्या हॉटेल मॅनेजरबद्दल काय वाटेल हे जाणून घ्यायला आवडेल.

रूम बूक करणार्‍या माणसाचे आयडी प्रूफ .. मस्ट... त्यानंतर त्या रूममध्यल्या सगळ्याची जबाबदारी त्या माणसाची. ह्याच्याऊपर काहीही मागणे /विचारणे जाचक आहे.

अश्या हॉटेल मध्ये नेऊन लोकांचे खंडणी साठी अपहरण आणि खून होऊ शकतो.>>>
कुणा व्यक्तीचे अपहरण करून तिला हॉटेलमध्ये लपवून ठेवणे महा कठीण असावे.

हाब, लहान मुलांचे प्रूफ मागणे तुम्हाला वाटतो तितका आचरटपणा नाहीये.या केसेस भरपूर घडतात.क्राईम पेट्रोल येण्याच्या आधीपासूनच

मी_अनू
हॉटेलचालक बिझनेस करण्यासाठी हॉटेल ऊघडतात... प्रत्येक पेट्रनला संशयित नजरेणे बघणे आणि + लोकांचे आयडी प्रूफ नसणे म्हणजे गुन्हाच आहे असे समजणे त्यांच्या अधिकारात नाही.

तुम्ही जे लिहित आहात ते fear mongering आहे... आनवश्यक आहे.

मुलगा तुमचा आहे हे कागदोपत्री प्रुव करण्याचे बर्डन तुमच्यावर असणे हे अयोग्य आणि दुर्दैवी आहे.

एक लहान मुल त्याच्या मामा, काका, मावशी, आत्या, आजोबां बरोबर कुठल्याही हॉटेल रूममध्ये राहू शकत नाही... हे अतिशय दुर्दैवी आहे.

हा.ब. , काही वर्षांपूर्वी असे काही नव्हते.विश्वास होताच. इव्हन हॉटेल मालकही विश्वास ठेवत. पण सध्या अगदी जगतिक स्तरापासून गाव स्तरापर्यन्त अविश्वासाचे, गुन्हेगारीसडृश्य वातावरण पसरले आहे. पूर्वी क्राइम ही मानसिक विकृती होती आता तो व्यवसाय झाला आहे. जिथे जीवन संघर्ष तीव्र झाला आहे तिथे तर अधिकच. महाराष्ट्रातले एक समाज सेवक जे की ग्रामीण भागात राहतात (अणा हजारे नव्हेत, भंपक इसम आहे तो. ) एकदा गप्पा मारताना सहज बोलले काही वर्षात महाराष्ट्रात , अपहरण , खंडणी अशी समंतर इंडस्टी उभी रहणार आहे. बिहार सारखी. ' अपहरण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे. मी आश्चर्याने त्याना म्हटले . आता तुमची नाळ समाजाशी अधिक आहे म्हणून विश्वास ठेवावा लागतोय अन्यथा एवढी वाइट स्थिती महाराष्ट्रात नाही हो. ते फक्त हसले. आज ग्रामीण भागात मी बघतो आहे.दहाच वर्षात कल्पनेपलिकडचा समाज निर्माण झाला आहे. त्याचे आकलन झाल्याशिवाय पोलीस असे का वागतात , होटेल वाले असे का वागतात.,याचा उलगडा होणार नाही. साधे उदाहरण : रात्रीच्या वेळी एखाद्या संकटात असलेल्या बाइला रस्त्यावर एकांतस्थळी लिफ्ट देण्याची हिम्मत कोणी दाखवेल काय? अगदी जेन्युइन केस असली तरी. (अमानवीय लोकांचे सोडा...) . त्यामुळे दिवस हे वाढत जाणार आणि बंधनेही !!
रच्याकने, धागाकर्त्याचा प्रॉब्लेम फक्त त्याला मिळालेल्या वागणुकीबाबत आहे असे दिसते म्हनजे आवाज चढणे, हात धरणे वगैरे.

हाब, इथे आयडी प्रूफ बद्दल बोलणारे फिअर मोंगरींग करतायत, हॉटेल माळकांनी गुन्हा आहे अशी वागणूक द्या, संशयाने बघा, हात धरा, पोलीस तक्रार वगैरे हा तुमचा कल्पनाविस्तार आहे.
हॉटेल ऑनलाइन बुकिंग घेतात, बुकिंग मध्ये लिहितात की प्रत्येक व्यक्तीचे प्रूफ आवश्यक.ते नसल्यास ऍडमिशन नाकारतात.सिम्पल ऍज दॅट. प्रूफ न दाखवणाऱ्याला दमदाटी करा, पोलिसांना माहिती द्या वगैरे गोष्टींचे समर्थन कोणीही करत नाहीये.
धागा लेखकांबरोबर घडलेला प्रकार हा हॉटेल कर्मचाऱ्याचा आगाऊपणा आणि इगो आहे.प्रत्येक रोड रेज फाईट मध्ये 'ऍटॅक इज बेस्ट डिफेन्स' वापरले जाते त्यातलीच ही एक उपशाखा आहे.

बाबा,
ते सगळं ठीक आहे... ते थांबवणे पोलिसांचे काम आहे आणि सुरक्षिततेच्या नावाखाली जनरल पब्लिकची हॅरॅसमेंट होऊ नये हे बघणे सुद्धा.
सुरक्षेच्या नावाखाली केलेली हॅरॅसमेंट लोकांना अजून असुरक्षित बनवते हे वैश्विक सत्य आहे.

ज्याच्या नावावर रूम आहे त्याचे ओळखपत्र घेणे योग्य आहे... हॉटेल मालकांना आपण आपली खाजगी जागा कोणाला देत आहोत ते माहित असणे, सीसीटीवी वगैरे जरूरी आहे. मान्य...
पण अशी व्यक्ती जर तिच्या बरोबरच्या व्यक्तींना व्हाऊच करत असेल तर ... नंतर काहीही घडो अथवा न घडो त्याची जबाबदारी त्या एका व्य्कक्तीचीच आहे.

समजा खरोखर किडनॅप केस आहे.. आणि व्यक्तीला लहान मुलाचे प्रूफ देता आले नाही? मग हॉटेल मालकाने काय करणं अपेक्षित आहे? रूम नाकारणार? मग त्याने काय होणार? गुन्हा थांबला का?
समजा रूम बूक करणार्‍या व्य्कतीच्या बरोबरच्या व्यक्तीने त्या व्यक्तीचा खून केला... हे घरात, रस्त्यावर किंवा ईतर ठिकाणी खून होण्यापेक्षा काय वेगळे आहे... त्याचा हॉटेल बुकिंगशी काय संबंध आहे?
प्रूफ घेऊनही ते प्रूफ जर खोटे असेल (किडनॅप सारखी रॅकेट्स चालवणारे खरी प्रूफ न देण्याएवढी डोकेबाज तर असतीलच) मग प्रूफ घेऊनही काय मिळवले... मग प्रूफची सत्यासत्यता तपसण्याचे कामही हॉटेलचालकांवर टाकणार का?
फेक आयडीच्या केसेस ऊघडकीस आल्या मग त्याही पुढे जाऊन थेट फिंगरप्रिंट आणि डीएनए वगैरेही घ्यायचे का?
मग मी_अनू म्हणतील हो ते ही योग्यच आहे... गंमतच आहे सगळी.

रिक्षावाल्यांनीही प्रूफ बघून त्याची कॉपी घेऊनच पब्लिकला रिक्षात बसवायला हवं... मुल तुमचं आहे का? लग्न झालंय आहे का? हेही बघायला हवं.

चोरांकडे गज कापणारे टॉर्च असतील, चोरी होणं अटळ म्हणून खिडक्यांना गज आणि दाराला कुलूप लावायचे की नाही हा घरमालकाचा स्वतःचा निर्णय आहे.

हाब, पण हे चूक आहे हे तू नक्की कोणाला पटवायचा प्रयत्न करतो आहेस? पोलीस हॉटेलवाल्यांना प्रत्येक कस्टमरचा आयडी घ्या असं सांगतात ही फॅक्ट आहे असं (वरील चर्चेवरून आणि बातमीवरून) दिसतं आहे.
त्याने गुन्हे थांबतात का, हॉटेलवरच का - रिक्षात बसताना का नाही हे विचारायचंच तर मग पोलिसांना विचारावं लागेल - त्यावरून इथे लिहिणार्‍यांवर फिअर मॉन्गरिंगचा आरोप कसा काय करता येऊ शकतो?
तसंच मामाबरोबर भाचा राहू शकणार नाही वगैरे कुठून आलं? रिलेशन प्रूव्ह करण्याबद्दल कुठे कायदा/गाइडलाइन आहे? चर्चाप्रस्तावात जो अनुभव मांडला आहे त्यातही मॅरेज सर्टिफिकेट मागितलं नव्हतं, फक्त आयडीजच मागितले होते ना?

पोलीस मूर्खच असतात . मध्ये काय फ्याड काढले की प्रत्येक सोसायटीने सी सी टी व्ही क्यामेरे बसवावेत. आता एक तर सी सी टी व्ही क्यामेर्‍याने सोसायटीच्या लोकांची प्रायव्हसी नष्ट होते. सतत पाळत ठेवली गेल्याचा फील येतो आणि मनःस्वास्थ्य बिघडते. कधी तरी येणार्‍या चोरासाठी २४ तास कुणीतरी वॉच ठेवणे ही कप्ल्पना किती भयप्रद आहे. हो आता सोसायटीला आवडले , पटले, तर स्वतः बसवतील ना कॅमेरे. सक्ती कशासाठी. ? कॅमेरा विक्रेत्याशी हातमिळवणी करून त्यांचा खप वाढवायचे धण्दे. बरे सोसायटीला जर बिन कॅमेर्ञाचे चालणार असेल तर पोलीसांचे काय बा चे जातेय.? चोरीने झाले नुकसान तर सोसायटी मेबरचे होइल. त्याला ते तयार आहेत ना? मग सक्ती कशापाइ? तेही घटनेत नसताना?
आणि एवढे करूनही चोर्‍या कुठे थांबल्यात. ?

वरील लिखाण हे विवेक वेलण्करांचे नसून माझेच आहे ...

"चर्चाप्रस्तावात जो अनुभव मांडला आहे त्यातही मॅरेज सर्टिफिकेट मागितलं नव्हतं, फक्त आयडीजच मागितले होते ना?" - आय-डी नसेल, तर फोटो काढून सेलफोन वर पाठवण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध होता. Uhoh

चोरांकडे गज कापणारे टॉर्च असतील, चोरी होणं अटळ म्हणून खिडक्यांना गज आणि दाराला कुलूप लावायचे की नाही हा घरमालकाचा स्वतःचा निर्णय आहे. >> Lol मग रिक्षाही प्रायवेट प्रॉपर्टीच आहे की... तिथेही आयडीप्रूफ वगैरे द्यावे लागले तर तुमचे काय मत आहे?

हॉटेल ही खाजगी जागा आहे आणि हॉटेल मालक काहीही नियम बनवण्यास पात्र आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
तो बिझनेस आहे.. पैसे कमावण्यासाठी चालवलेला... त्यांच्या क्लायंट्सचे वा पोटेंशिअल क्लायंट्सची हॅरेसमेंट न होणे त्यांचे हक्क जपले जाणे हे बघणे त्यांचे काम आहे जे त्यांच्या हिताचे आहे... आणि एक पेट्रन म्हणून हॉटेलचालकांनी हे करावे ही माझी नक्कीच अपेक्षा असेल.

गुन्हा रोखणे वगैरे हॉटेलचालकांचे काम नाही ते पोलिसांचे आहे... पोलिस सहकार्य मागू शकतात.. पण पेट्र्न्ससाठी जाचक गोष्टी त्यांच्या बिझनेससाठी चांगल्या नाहीत.

पण हे चूक आहे हे तू नक्की कोणाला पटवायचा प्रयत्न करतो आहेस? >> कोणालाच नाही... चर्चा करतो आहे.

त्यावरून इथे लिहिणार्‍यांवर फिअर मॉन्गरिंगचा आरोप कसा काय करता येऊ शकतो? >> आरोप ?? Lol
मी फक्त विरोधी मत मांडले आहे ... 'असे गुन्हे घडतात म्हणून ईथेही ते घडण्याची शक्यता आहेच' असे त्या म्हणत आहेत त्याला प्रतिवाद म्हणून.

एक लहान मुल त्याच्या मामा, काका, मावशी, आत्या, आजोबां बरोबर कुठल्याही हॉटेल रूममध्ये राहू शकत नाही... हे अतिशय दुर्दैवी आहे.
>>> ओळखपत्र देऊन राहा ना. रूम बंद असते, बंद दारामागे काय होईल कोण जबाबदारी घेणार?

ओळखपत्र देऊन राहा ना. रूम बंद असते, बंद दारामागे काय होईल कोण जबाबदारी घेणार? >> जिथे नवरा-बायको आहोत/ मुलगा आहे ते प्रमाणपत्र दाखवून प्रुव करावे लागते तिथे मी ह्या मुलाचा काका, मामा, मावशी, आत्या आहे ह्याचे प्रमाणपत्र कुठे मिळते म्हणे Uhoh
ऊगीच आपलं काय वाट्टेल ते बडबडतात लोक Lol

च्रप्स,
तुम्ही अमेरिकेत राहता ना?
हॉटेल मध्ये चेक ईन करतांना बरोबरच्या सगळ्यांचे ओळ्खपत्र देता का? की फक्त ज्याने रूम बूक केली आहे त्याचेच सांगा पाहू?

हाब, तू हसतो का आहेस? इतरांना वेड्यात काढायला का? कुठले लोक वाट्टेल ते बडबडतायत?
नवराबायको असल्याचं प्रूव्ह करायला कोणी कोणाला सांगितलंय या चर्चेत? काका/मावशी/आत्यांना तसं नातं सिद्ध करणारं प्रमाणपत्र मागितल्याचं कोणी लिहिलंय?

हाब, तू हसतो का आहेस? >> तुमचा "आरोप" शब्द वाचून हसू आले...
इतरांना वेड्यात काढायला का? >> नाही
कुठले लोक वाट्टेल ते बडबडतायत? >> च्र्पस
नवराबायको असल्याचं प्रूव्ह करायला कोणी कोणाला सांगितलंय या चर्चेत? >> कृपया चर्चा पुन्हा वाचा. Happy

"नवराबायको असल्याचं प्रूव्ह करायला कोणी कोणाला सांगितलंय या चर्चेत?" - हे सुद्धा येऊन गेलय मागे. बायकोच्या आय-डी वर माहेरचं आडनाव असल्यामुळे घरून मॅरेज सर्टिफिकेट ची कॉपी फोन वर मागवून (व्हॉट्सअ‍ॅप?) दाखवली वगैरे.

हाब च्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. The system puts the onus on customer to prove his/her innocence, without any suspicion. That's rubbish!

आता चर्चा विस्तारलीच आहे तर आणि एक अ‍ॅनेकडोट...
मध्यंतरी एका लग्नासाठी नागपूरला गेलो होतो. मुंबईहुन निघताना घरच्यांनी मुलांचं आयडी प्रूफ ने सांगितलेलं. मी हाब सारखंच उडवुन लावलेलं, म्हटलं १८ वर्षाखाली आयडी प्रूफ मागणे ही कायद्याची पायमल्ली आहे, आणि मला त्यांची पासपोर्ट/ बर्थ स.फि. कुणालाही द्यायचे नाहीत.
प्रत्यक्ष हॉटेवाल्यांनी बायकोचेही प्रूफ मागितले नाही, सो मुलांपर्यंत विषय आला नाही, पण इथे वाचुन आता 'मेरा भारत महान' सदराखाली काही घेउन जावे असं वाटू लागलंय.
मला बरोबर आठवत असेल तर मुंबई- नागपूर विमान प्रवासातही १८ वर्षांखालील मुलांचे प्रूफ मागितले न्हवते.
देशाबाहेर एक्झिट/ एंट्रीला मात्र मागतात. पालकांपैकी एकच व्यक्ती देशाबाहेर घेउन जात असेल तर दुसर्‍या व्यक्तीची लिखित परवानगी, दुसर्‍या व्यक्तीचं आय्डी ज्यात सही नीट दिसेल ही लागतं. (अर्थात ह्याचं कारण वेगळं आहे)
मुलांचे पासपोर्ट मागितले तर ती त्यांची आयडेंटिटी असते, ती माझी मुले आहेत हे कुठेही प्रुव्ह होत नाही. फक्त लास्ट नेम समान आहे म्हणून घेउन जाऊ देतात बहुतेक. अजुन पर्यंत लॉंग फॉर्म बर्थ स. कोणी मागितलेलं आठवत नाही.

Pages