ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १

Submitted by संजय भावे on 17 October, 2018 - 08:22

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग - १

.

शाळेत शिकत असताना इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकांतून अनेक देशांची ओळख झाली, परंतु ज्याला आवर्जून भेट द्यायचीच अशी ओढ माझ्या मनात निर्माण करणारा देश म्हणजे ईजिप्त. हजारो वर्षांपूर्वी प्रगत असलेल्या संस्कृतीचे अवशेष, अकरा देशांमधून वहाणारी आणि आत्ता आत्ता पर्यंत जगातील सर्वात लांब म्हणून ओळखली जाणारी नाईल नदी, भूमध्य समुद्र (Mediterranean Sea), तांबडा समुद्र (Red Sea), ममी’ज, प्राचीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आणि जागतिक आश्चर्य असलेले पिरामिड्स, भव्यदिव्य मंदिरे ह्या सर्व गोष्टी मला आकर्षित करत होत्या. शेवटी ह्या वर्षाच्या म्हणजेच २०१८ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात माझे ईजिप्त भेटीचे स्वप्न पूर्ण होणारा योग जुळून आला.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आमच्या सौभाग्यवतींना एका कॉन्फरंस साठी दोन आठवडे ग्लासगोला जाण्याचे फर्मान त्यांच्या कार्यालयातून आले, त्यामुळे ह्या कालावधीत मी एकट्याने कुठे जायचं हा उद्भवलेला प्रश्न ईजिप्तला जायचं ह्या उत्तराने क्षणात निकालात निघाला, परंतु नियोजन आणि तयारी साठी जेमतेम ४०-४५ दिवसच हातात होते (त्यात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी पूर्वनियोजित केरळ दौरा होताच). आत्तापर्यंत मित्र मंडळी व कुटुंबीयांबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव होता परंतु एकट्याने परदेशी पर्यटनाला जाण्याची हि पहिलीच वेळ होती.

पॅकेज टूरनी जाणे मला अजिबात आवडत नाही त्यामुळे तो विकल्प बाद होता. मग सुरुवात झाली इंटरनेटवर ईजिप्त बद्दलची शक्यतेवढी माहिती गोळा करण्याला. हे संशोधन सुमारे १० ते १२ दिवस चालले. अनेक वेबसाईटस व ब्लॉग्स वाचून काढले, काही ब्लॉगर्सशी ईमेलवर संवाद साधला त्यांनी त्यांच्याकडची अधिकची माहिती देखील दिली, परंतु हि सगळी माहिती ३ ते ५ वर्षे जुनी होती. महत्वाची अद्ययावत माहिती कुठेच मिळाली नाही जसे कि अंतर्गत प्रवास उदा. रेल्वे, बस, टॅक्सी भाडे व त्यांचे वेळापत्रक तसेच विविध ठिकाणांचे प्रवेश शुल्क इत्यादी.

व्हिसा बद्दलची माहिती देखील अद्ययावत नव्हती आणि दुर्दैवाने ईजिप्त सरकारची भारतीयांना व्हिसा विषयक मार्गदर्शन करणारी कोणतीही अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाहीये. भारतात दोन ठिकाणी व्हिसा साठीचे अर्ज स्वीकारले जातात एक दिल्लीला त्यांच्या दूतावासात (Embassy of Egypt in Delhi) आणि दुसरे मलबार हिल मुंबईला त्यांच्या वाणिज्य दूतावासात (Consulate General of Egypt in Mumbai).

गुगल वर त्यांचे फोन नंबर्स मिळवून मुंबईच्या दूतावासाशी संपर्क साधल्यावर त्यांनी आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती दिली, अर्थात ती सुद्धा अपूर्ण होती हे तिथे अर्ज द्यायला गेल्यावर दुसऱ्या खेपेत समजले तसेच व्हिसा शुल्क हे देखील एकट्याने जाणाऱ्या व्यक्ती साठी अतिरिक्त लागते हे तिसऱ्या खेपेत समजले, पहिली खेप मुंबईतल्या ट्राफिक जाम मध्ये अडकल्याने आणि मलबार हिलला पोहोचे पर्यंत लागणाऱ्या असंख्य सिग्नल्स मुळे झालेल्या केवळ ४ मिनिटांच्या उशिरामुळे वाया गेली होती. अर्ज स्वीकारण्याची वेळ हि सकाळी ९ ते ११ आहे आणि बरोब्बर ११ वाजता त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा बंद होतो.

टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करताना जाण्या येण्याचे विमानाचे तिकीट आणि संपूर्ण वास्तव्य कालावधीच्या हॉटेल बुकिंग कन्फर्मेशनच्या प्रती अर्जासोबत जोडाव्या लागतात म्हणून मग ते काम प्राधान्याने करायचे ठरवले.
कैरो (Cairo), अलेक्झांड्रिया (Alexandria), अस्वान (Aswan), अबू सिंबल (Abu Simbel), लुक्सोर (Luxor) आणि हुरघाडा (Hurghada) हि माझ्यासाठी मस्ट व्हिजिट डेस्टीनेशन्स होती, त्या अनुषंगाने २५ फेब्रुवारी ते १२ मार्च असा १५ रात्री (जाता येतानाच्या विमान प्रवासातल्या दोन रात्री मिळून १५+२=१७ रात्री) आणि १६ दिवसांचा खाली दिल्याप्रमाणे ईजिप्त सफरीचा कार्यक्रम कागदावर तयार झाला.

२४ फेब्रुवारीला रात्री मुंबईहून कैरोला प्रस्थान (Egypt Air)
३ रात्री कैरो. (२५,२६,२७ फेब्रुवारी)
५ रात्री अस्वान. (२८ फेब्रुवारी, १,२,३,४ मार्च)
४ रात्री लुक्सोर. (५,६,७.८ मार्च)
२ रात्री हुरघाडा (९,१० मार्च)
१ रात्र कैरो. (११ मार्च)
१२ मार्चला संध्याकाळी कैरो - मुंबई परतीचा प्रवास (Egypt Air)
१३ मार्चला पहाटे स्वगृही आगमन.

मग makemytrip, yatra, hostelworld, airbnb, tripadvisor व goibibo अशा विविध वेबसाईटवर जाऊन हॉटेल्स चे रीव्ह्युज वाचून आणि टेरिफ कम्पेअर करून शेवटी goibibo वरून विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स बुक केली, ह्या सगळ्यात ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी असे ८ दिवस खर्ची पडले.

१४ फेब्रुवारीला सगळी आवश्यक कागदपत्रे घेऊन मुंबईचे वाणिज्य दूतावास गाठले जे वर म्हणाल्या प्रमाणे बरोब्बर ११ वाजता बंद झाले होते, पहिली खेप वाया गेली होती. परत दुसऱ्या दिवशी गेलो तर तिथल्या अधिकाऱ्याने आणखीन एका कागदपत्राची कमतरता असल्याचे सांगितले, त्याची पूर्तता ११ वाजण्याच्या आत होणे अशक्य होते म्हणून मग परत १६ फेब्रुवारीला परिपूर्ण फाईल घेऊन गेलो, ती तपासल्यावर एकदाचे त्याचे समाधान झाले व त्याने कागदपत्रे व शुल्क स्वीकारून २१ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता व्हिसा घ्यायला येण्यास सांगितले.

२४ फेब्रुवारीला रात्रीची फ्लाईट होती आणि जेमतेम साडेतीन दिवस आधी व्हिसा मिळणार होता त्यामुळे मनात थोडी धाकधूक घेऊनच ठरलेल्या वेळी पुन्हा तिथे पोचलो आणि आधीच्या खेपांमध्ये भेटलेल्या मुंब्रा, भिवंडी किंवा भेंडीबाजारात दिसणाऱ्या टीपीकल मुसलमानी पेहारावातल्या त्या दाढीवाल्या अधिकाऱ्याच्या जागी एक सुंदर ईजिप्शियन तरुणी आणि तिच्या शेजारी बसलेला गोरापान निळ्या डोळ्यांचा सुटा-बुटातला अधिकारी पाहून सुखद धक्काच बसला, अक्षरशः दोन मिनिटांत समोर ठेवलेल्या पासपोर्टस च्या चळतीतून माझा व्हिसा stamped केलेला पासपोर्ट काढून तिने मला दिला व दोघांनी हसतमुखाने माझ्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांचे आभार मानून एका वेगळ्याच आनंदात तिथून बाहेर पडलो.

आता खऱ्या अर्थाने तयारीला लागायचं होतं आणि हातात दिवस होते तीन. ह्या तीन दिवसात जुजबी खरेदी, मनी एक्स्चेंज आणि पॅकींग अशी महत्वाची कामे होती. ह्यापैकी मनी एक्स्चेंज प्राधान्यक्रमात अग्रभागी होते. ईजिप्तचे चलन हे EGP म्हणजे ईजिप्शियन पाउंड आहे आणि एका पाउंडची अधिकृत किंमत तीन रुपये ऐशी पैसे आहे, परंतु एक्स्चेंज करताना तो जवळपास पाच रुपयांना पडतो.

आधी केलेल्या संशोधनातून एक उपयुक्त माहिती मिळाली होती कि इजिप्तला जाताना ईजिप्शियन पाउंडस अगदी जरुरी पुरतेच घेऊन जावे जसे कि एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंतचे टॅक्सी भाडे व अगदी थोडेसे जवळ असावेत म्हणून व बाकी करन्सी अमेरिकन डॉलर्स मध्ये न्यावी. ह्याची तीन कारणे आहेत, एक म्हणजे न्यायला सोपे. १०० डॉलर्सच्या केवळ १६ नोटांमध्ये तुम्ही एक लाख रुपयांहून अधिक रक्कम नेऊ शकता. दुसरे कारण म्हणजे इजिप्तमध्ये अनेक ठिकाणी अमेरिकन डॉलर्स सर्रास स्वीकारले जातात. आणि तिसरे महत्वाचे कारण असे कि मनी एक्स्चेंज मध्ये रुपयाच्या तुलनेत अत्यल्प कमिशन लागते. हि माहिती प्रमाण मानून पहिल्या दिवशी मी केवळ ५०० ईजिप्शियन पाउंडस आणि बाकीची रक्कम अमेरिकन डॉलर्स मध्ये रुपांतरीत करून घेतली (जी अर्थातच फायदेशीरही ठरली).

दुसऱ्या दिवशी आवश्यक ती खरेदी उरकून घेतली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीला दुपारपर्यंत सामानाची बांधाबांध झाली. त्याच रात्री निघायचं होतं, फ्लाईट मध्यरात्री २:५० ची होती पण मेट्रो च्या कामामुळे रोजच होणारा ट्राफिक जाम आणि सिक्युरिटी चेक, इमिग्रेशनला लागणारा वेळ हिशोबात घेऊन अगदी एअर्लाइन च्या सुचनेप्रमाणे चार तास आधी नाही तरी निदान तीन साडेतीन तास आधी पोहोचणे आवश्यक होते म्हणून दहा वाजता एअरपोर्टच्या दिशेने प्रयाण केले.

अपेक्षेप्रमाणे रात्री ११:३० ला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. सगळे सोपस्कार पार पाडेपर्यंत दीड वाजला. बोर्डिंग साठी अजून अर्धा पाउण तास बाकी होता म्हणून थोडावेळ ड्युटी फ्री मध्ये टाईमपास करून मग बोर्डिंग गेट जवळ ते उघडण्याची प्रतीक्षा करत बसलो. सुमारे २:१५ वाजता गेट उघडले, विमानात प्रवेश करून आपल्या आसनावर स्थानपन्न झालो आणि निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा विमानाने मुंबईहून कैरोच्या दिशेने उड्डाण केले.

क्रमश:

संजय भावे

पुढील भाग:

तळटिप: १२ भागांची ही लेख मालिका ‘मिसळपाव डॉट कॉम’ संस्थळावर माझ्या तिथल्या ‘टर्मीनेटर’ ह्या सदस्य नावाने ३ जून २०१८ ते २३ ऑगस्ट २०१८ ह्या कालावधीत आधी प्रकाशित झालेली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्य हॉटेल मधे राहिला?
कोणती प्रवासी वाहने वापरली?
सार्वजनीक वाहतुकिची स्थिती कशी आहे? वापर केला का..?
कोणते जेवण जेवला? कोणती डिश सर्वात जास्त आवडली..?
आणि वरील सर्व मुद्द्यान्ना किती खर्च आला तेही लिहा म्हणजे इजिप्त आपल्या बजेट मधे आहे की नाही हेही समजेल.. Happy

मित आणि DJ आपले मनःपूर्वक आभार.
@ DJ. आपल्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टींचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही कमतरता राहिली असेल तर सुधारणा करीन नंतर.

छान प्रवासवर्णन!

पण व्हिसा मिळण्यागोदर विमान आणि हॉटेलचं बुकिंग करण्याची सक्ती का हे समजले नाही.

@ सचिन काळे - धन्यवाद.

"पण व्हिसा मिळण्यागोदर विमान आणि हॉटेलचं बुकिंग करण्याची सक्ती का हे समजले नाही."
या व्यतिरिक्त बँक खात्यात कमीत कमी ५०,००० शिल्लक दाखवणारे अपडेटेड पास बुक किंवा स्टेटमेंट देखील जोडावे लागते. काही वर्षांपूर्वी पर्यंत भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल मिळत होता बहुतेक २०११ च्या क्रांतीनंतर ती सुविधा बंद करण्यात आली आहे. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या अटी आणि नियम अजून काय Happy
आता व्हिसा मिळण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

  • Original passport and old passports, if any
  • Passport should be valid for at least 6 months from the date of submission of the visa, with a minimum of two blank pages
  • Two copies of the first and last page of your passport
  • Confirmed return Air tickets
  • The visa application form duly filled and signed by the applicant
  • 2 recent passport-size colour photographs taken against a white background with matte-finish (size 35 mm x 45 mm)
  • Covering letter mentioning the details of the travel and the traveler
  • Original bank statements reflecting transactions of the last 6 months with a minimum balance of Rs 50,000 per person, duly attested and signed by a bank official
  • Confirmation of hotel booking mentioning the name and number of hotel
  • No objection letter from the current employer
  • If you are self employed: registration of the company/ partnership deed/ Memorandum of Article (MOA) is required

आणि व्हिसा फी प्रतिव्यक्ती २९००/- रुपये (१० किंवा जास्त जणांचा ग्रुप असेल तर प्रतिव्यक्ती १९००/-रुपये.)

खूप छान आणी उपयुक्त माहिती. आमच्याकडे पण लहानपणापासून इजिप्त बद्दल सर्वांनाच एक सुप्त आकर्षण आहे... नेटफ्लिक्सवर खूप मस्त आणी इंटरेस्टिंग documentory series होत्या इजिप्त आणी एकूणच उत्खनना बद्दल.... त्या सगळ्या मी पहिल्या आणी तेंव्हापासून तर तिकडे जाण्याची इच्छा बळकट होतं आहे.. .. इथे वाचून बरीच माहिती मिळेल ट्रॅव्हलिंग साठी.... धन्यवाद बारीक सारीक डिटेल्स sahre केल्याबद्दल... पु. ले. शु.

सुंदर सविस्तर वर्णन. आम्हाला तयार प्लान, खर्चांचे अंदाज वगैरे सर्व माहिती दिल्याबद्दल आभार. खूपच उपयोगी पडेल.

मस्त मालिका आहे. मी ही मिपावर आधीच वाचलेली आहे पण तिथे प्रतिसाद देता येइना. माझी सोलो ट्रिप रजा न मिळाल्याने कॅन्सल झाली दोन वर्शामागे. पण पिरामिड देखनाइच है. सर्व फोटो छान व लेखन शैली पण प्रासादिक आहे.

त्रीज्या . सोनू आणि अमा आपले मनःपुर्वक आभार.
@ त्रीज्या आणि अमा - तुमच्या ईजिप्त सफरी साठी शुभेच्छा.