बोनेदी बारीर पूजो

Submitted by अनिंद्य on 16 October, 2018 - 08:41

“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.

'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात. महाराष्ट्र आणि बंगाल दोहोंमध्ये असलेल्या अनेकानेक साम्यस्थळांमधले एक उठून दिसणारे साम्य म्हणजे उत्सवप्रियता. त्यात मराठी मनात जे महत्व गणेशोत्सवाचे तेच महत्व बंगालीजनांमध्ये दुर्गोत्सवाचे. हे दोन्ही उत्सव साजरे करण्याची पद्धत, त्यातील उत्साह, जनसामान्यांचा सहभाग, भव्य कलात्मक मंडप, देखावे, पारंपरिक खाद्यपदार्थांची लयलूट, नातेवाईक-मित्रमंडळींचे एकत्र जमणे….. बरेचसे सारखे आहे. माझ्या कन्येच्या शब्दात सांगायचे तर 'बाप्पाज मॉम टेक्स हिज प्लेस अँड शी स्टील्स द शो. आफ्टरऑल शी इज द मॉम, सो शी नोज हाऊ टु'

लहान-थोर-जवळचे-दूरचे-नवीन-जुने नातेवाईक आणि मित्र सगळ्यांनी ठरवून एकमेकांना भेटायचा वार्षिक सोहळा म्हणजे बंगालातील दुर्गापूजा. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गणपती मंडळांसारखीच कोलकात्यात सार्वजनिक दुर्गा मंडळे आहेत. त्याचे भव्य पंडाल, रंगांची उधळण करणारे कलात्मक देखावे, रात्री रंगीबेरंगी रोषणाईने झगमगलेले वातावरण, खाण्यापिण्याची शेकडो दुकाने, सकाळ-संध्याकाळ होणारी पूजा आणि आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळीकडे कोलकातावासियांची अपार गर्दी असे दृश्य सर्वत्र असते.

पण हा झाला सर्वसामान्य लोकांचा वार्षिक दुर्गोत्सव. मी सांगतोय ती कहाणी थोडी वेगळी आहे - कलकत्त्याच्या गर्भश्रीमंत जमीनदारांच्या भव्य महालांमध्ये होणाऱ्या दुर्गोत्सवाची, म्हणजेच 'बोनेदी बारीर पूजो' ची.

पूर्व भारतात अनेक शतकांपासून शाक्तपंथाचा प्रभाव आहे. ईश्वराला शक्तीरूपात पुजण्याची परंपरा अगदी चौथ्या शतकापासून आहे. सहाव्या शतकानंतर अनेक आदिवासी दैवते हळूहळू वैदिक देवतांमध्ये समाविष्ट होऊ लागली आणि काली / चामुंडा अश्या रौद्ररूपिणी देवींचे उग्र स्वरूप उदयाला आले, लोकप्रिय झाले. देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक पशुपक्ष्यांचे बळी-नरबळी पूजाविधीत समाविष्ट होते. मातृरुपी, शांत, लेकुरवाळी वत्सलमूर्ती 'दुर्गा' हे रूप बरेच उशिराने विकसित झाले आहे, साधारण सोळाव्या शतकाच्या शेवटी.

काही मोजक्या धनाढ्यांचे महाल वगळता शारदीय नवरात्रात दुर्गेची 'सारबोजनीन' (सार्वजनिक) पूजा हा प्रकार तर आणखीच उशिरा आला, साधारण अठराव्या शतकाच्या सुरवातीला. तोवर बंगालच्या नवाबाच्या सत्तेला उतरती कळा लागून बंगालातील जमीनदार स्वतंत्र झाले होते. १७५७ चे प्लासी युद्ध जिंकून ब्रिटिशांनी बंगाल ताब्यात घेतला तेंव्हा ह्या श्रीमंत जमीनदार मंडळींनी आपल्या निष्ठा इंग्रजांना वाहिल्या. इंग्रजांशी होणाऱ्या व्यापारामुळे त्यांच्या समृद्धीत आणखी भर पडली आणि त्यांच्या राजेशाही महालांमध्ये भव्य प्रमाणात वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा विस्तार पावली, प्रचंड लोकप्रिय झाली. हीच ती बोनेदी बारीर पूजो..... आजच्या 'सारबोजनीन' दुर्गापूजेचे आद्य रूप.

‘सुमारे दोन आठवडे चालणारा, बंगाली संगीत, नाट्य, लोककला, मनोरंजन, खास लखनौ-अलाहाबाद आणि मुर्शिदाबादहून आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगनांच्या मैफिली, खानपान यांची रेलचेल असलेला वैभवशाली महोत्सव’ असे वर्णन ब्रिटिश दस्तावेजांमध्ये मुबलक आढळते. आज तशी श्रीमंती आणि थाटमाट उरलेला नसला तरी ह्या दुर्गापूजा आपले ऐतिहासिक महत्व आणि पारंपरिक आब राखून आहेत.

जमीनदारांच्या भव्य महालांना बंगालीत 'राजबारी' असे नाव आहे. ह्या पूजा राजबारीतील 'ठाकुर दलान' नामक भव्य देवघरात साजऱ्या होतात, त्यासाठी पंडाल वगैरे बांधल्या जात नाहीत. महिना आधीपासून ठाकुर दलानाच्या साफसफाई आणि नवीन रंगकामाला सुरुवात होते.

पिढ्यांपिढ्यांचे ठरलेले मूर्तिकार ठरलेल्या साच्यात मूर्ती घडवायला घेतात आणि कलकत्त्याच्या कुमारटोलीचा भाग गजबजतो. शहराला दूर्गापूजेची चाहूल लागते. प्रतिमा घडवणारे कलाकार दुर्गप्रतिमेच्या मुखासाठी लागणारी माती सोनागाछी भागातील वेश्यांच्या घरून समारंभपूर्वक आणतात - वारांगना ह्याच खऱ्या 'चिरसोहागिनी' - अखंड सौभाग्यवती असतात ही भावना त्यामागे आहे.

भारतभर शारदीय नवरात्र हा 'नऊ' रात्रींचा सण असला तरी बंगालात दुर्गापूजा पाच दिवसांची असते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी (षष्ठी) राजबारीतील सजवलेल्या ठाकूर दलान मध्ये दुर्गेचे आगमन होते. बरे ही कुटुंबवत्सल दुर्गा एकटी येत नाही, तिच्यासोबत तिचा मोठा लवाजमा असतो - महिषासुराला पायाखाली चिरडणारी दुर्गा, तिचे दोन्ही पुत्र - गणपती आणि कार्तिकेय, सोबतीला लक्ष्मी आणि सरस्वती, क्वचित काही ठिकाणी शंकर सुद्धा सौंना सोबत करायला येतात Happy

दुसरे दिवशी सप्तमीला प्राणप्रतिष्ठेसाठी एक मजेशीर विधी असतो - कोला बहू ! सूर्योदयाच्या आधी केळीच्या कोवळ्या फांदीला गंगास्नान करवून वधूप्रमाणे भरजरी लाल वस्त्रांनी आणि दागिन्यानी सजवले जाते. हेच ते दुर्गेचे 'आत्मरूप' - कोला बहू किंवा केळीच्या पानातील सवाष्ण दुर्गा. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आवाहन केल्यानंतर ह्या फांदीतून दुर्गेचे प्राण मृत्तिकेच्या मूर्तीत अवतरित होतात अशी श्रद्धा आहे. एकदा हे झाले की पुढील चार दिवस उत्सवाला उधाण येते. रोज सकाळ संध्याकाळ पूजा, भोग, 'अंजली' (आरती), नाचगाणे, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल होते.

(अवांतर :- सर्वच दुर्गा कुटुंबीय सुंदर दिसत असले तरी मला ह्यांचा महिषासुर फारच बापुडवाणा वाटतो. तो दैत्य तर दिसत नाहीच, उलट दोन्ही गालात रसगुल्ले भरून आळसावलेला व्रात्य मुलगाच जास्त दिसतो, ते एक असो Happy

बोनेदी बारींपैकी सुबर्ण रायचौधरी परिवाराची दुर्गापूजा कलकत्त्यातच नव्हे तर अक्ख्या बंगाल प्रांतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित दुर्गापूजा आहे. कुटुंब जुन्या काळापासून गर्भश्रीमंत. सुवर्णबाबूंनी कलकत्ता शहर वसवण्यासाठी ब्रिटिशांना स्वतःची जमीन भाड्याने दिली होती, त्यावरून काय ते समजा. त्यांना आद्यपूजक परिवार म्हणून मान आहे. बारीषाच्या त्यांच्या मुख्य राजबारीत थेट १६१० साला पासून दुर्गापूजा होते आहे. प्रमुख राजबारीचे सद्य वारस आता आठ वेगवेगळ्या कुटुंबात विभागले आहेत. त्यांच्यापैकी एक सांगतात - ‘आमच्या दुर्गेला 'संगीतप्रिया' म्हणतात कलकत्त्यात. रात्र रात्रभर चालणारे शास्त्रीय गायनाचे जलसे आणि ते ऐकण्यासाठी लोटलेली दर्दीजनांची गर्दी हे दृश्य आता फार दिसत नाही, पण म्हणून आम्ही आमच्या दुर्गेला संगीत ऐकवत नाही असे नाही. या तुम्ही सप्तमीच्या रात्री, आता राजबारीचे 'नाचघर' नाहीये पूर्वीसारखे, ते कोसळले काही वर्षांपूर्वी. पण त्यानी फरक पडत नाही. बहारदार रबिन्द्र संगीताचा कार्यक्रम आहे इथेच, ह्या ठाकुर दलानमध्ये…..’ गर्वाने ओथंबलेली अशी अनेक विधाने अन्य सदस्यांकडून येतात. खऱ्या माणिकमोत्यांच्या दागिन्यांनी सजलेल्या त्यांच्या दुर्गेचे रूप मात्र फार सोज्वळ.

रायचौधरींच्या राजबारीला जाण्याचा रस्ता अगदीच सोप्पा आहे - डायमंड हार्बर रोड गाठा, गर्दीला न जुमानता बेहाला चौरस्त्याकडे निघा, साखेरबझारच्या अरुंद, गर्दीभरल्या चौकातून के के रॉयचौधुरी रस्त्यावर या. उजवीकडे सबर्ण पारा रोड दिसतो न दिसतो तसे आतमध्ये घुसा. काही पावलांवर अतिप्राचीन द्वादशशिवमंदिर दिसेल. तिथल्या गर्दीतुन वाट काढत काही पावलातच तुम्ही रॉयचौधुरींच्या भव्य ठाकुर दलान मध्ये पोहचाल (दमलात?) त्यांचे स्वतःचे कुटुंब प्रचंड मोठे असल्यामुळे इथे आगंतुकांना प्रवेश नाही, त्यामुळे हा खटाटोप वाया जाण्याची शक्यता आहे.

आगमन आणि विसर्जनाला ब्रिटिश काळापासून खऱ्याखुऱ्या तोफांची सलामी घेणारी राजा नवीनकृष्ण देव ह्यांची शोभाबाझार राजबारी दुर्गा ही पण अशीच एक पुरातन पूजा. स्थापनेचे वर्ष १७५७. कुटुंबीयांमध्ये काही वाद झाल्याने विभक्त झालेल्या दुसऱ्या पातीने समोरच असलेल्या ‘छोटो राजार बारी’ ठिकाणी दुसरी पूजा सुरु केली १७९१ साली.

"आमच्याकडे दुर्गापूजेला आलेल्या पाहुण्यांची यादी भारदस्त आहे. लॉर्ड कलाइव्ह, वॉरेन हेस्टिंग्स, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नेपाळ नरेश महेंद्र, प्रिन्स ऑफ वेल्स, खुद्द रवींद्रनाथ टागोर आमच्या दुर्गेला नमन करायला येऊन गेले आहेत." राजा नबीनकृष्णांच्या सद्य वारसांचा अभिमान आजही शब्दा-शब्दातून ओसंडतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता यथातथाच असली तरी दोन्ही राजबारी बऱ्यापैकी राखल्या आहेत आणि आधी आमंत्रण सुनिश्चित केल्यास दर्शनापुरता प्रवेश मिळण्याची शक्यता आहे इथे.

दुर्गा भोग :

उत्सव आणि खाणेपिणे ह्यांचा अन्योन संबंध आपल्या सर्वांना माहिती आहेच. पोटपूजेशिवाय उत्सवात कसली मजा? सार्वजनिक दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये एक मोठा भाग ह्या 'भोग' (प्रसाद) साठी राखीव असतो. खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश हा प्रसाद बहुतेक ठिकाणी असतो.

पण राजबारींची तऱ्हाच न्यारी. त्यांचा भोग अनेकदा ६० पेक्षा जास्त पदार्थांचा असतो ! घी भात, वासंती भात, मोठ्या परातीच्या आकाराच्या राधावल्लभी (ह्या बंगाल्यांचा रसबोध फारच उच्च दर्जाचा आहे राव - नाहीतर मैद्याच्या पुरीला कोणी ‘राधावल्लभी’ म्हणतं का?) केशरी पुऱ्या, गोडाच्या पुऱ्या, कोचू साग, खिचुरी, जिलबी, मालपुवा, अनेक प्रकारचे वडे, केशर पायेश, संदेश, इंद्राणी, हिरामणी, रसमणी, दुर्गाभोग, रसमोहन, खीरकदम, चमचम, खीरमोहन, कांचागोला, लेडी किनी (हो, मिठाईचंच नाव आहे ते Happy अश्या मनोरम नावांच्या डझनावारी प्रकारच्या बंगाली मिठाया असा भरगच्च मेनू दुर्गेच्या दिमतीला असतो.

शोभाबाझार राजबारीसारख्या काही क्षत्रिय यजमानांच्या दुर्गा ताजा शिजवलेला भात / अन्न खात नाहीत, त्यामुळे खिचुरी बाद होते पण 'भोग'च्या भव्यतेत काही कमतरता नसतेच. ह्या दुर्गे साठी मग आदल्या दिवशी वेगवेगळ्या चविष्ट मिठाया तयार केल्या जातात. ह्यांच्याकडच्या 'मोंडा' मिठाया फार कल्पक आणि त्यांचा आकार भव्य. साधारण पाच पाच किलो वजनाचे पांढरे शुभ्र मोतीचूर लाडू ही इथली खासियत आहे. निमकी, चंदन खीर, तालशांश, चंद्रपुली, पंतुआ, पान गाजा, जोलभरा संदेश …… देब कुटुंबीयांनी सांगितलेली नावे लक्षात ठेवणे अशक्य इतके प्रकार ! काही बोनेदी बारींच्या राजगृहात आलेल्या दुर्गा मीठ खात नाहीत तर काही रुचिपालट म्हणून एक वेळ सामिष भोजन करतात - ‘कोई’ माश्यांचे कालवण ही विशेष सामिष 'भोग' डिश.

बंगाली लोक फक्त 'माछेर झोल आणि भात खातात' हा माझा गैरसमज नेहमीसाठी दूर झाला इतके प्रकार राजबारीच्या कुटुंबीयांनी दाखवले आहेत. दुर्दैवाने हा सगळा सरंजाम बघायला आणि भोग चाखायला मिळणे दुर्लभ आहे, त्यासाठी राजबारीच्या मालकांनी तुम्हाला व्यक्तिगत आमंत्रण द्यायला हवे. Happy

संगीत, रस, गंध, अन्न असा सर्व पाहुणचार भोगून आणि भक्तांना आशीर्वाद देऊन तृप्त मनाने दुर्गा 'बिजोया' म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सासरी जायला निघते. राजबारीचे प्रमुख यजमान 'नीलकंठ' पक्ष्यांची एक जोडी पिंजऱ्यातून मुक्त करतात, त्यांनी स्वर्गात शंकराला दुर्गेच्या आगमनाची पूर्वसूचना द्यावी अशी अपेक्षा असते. आता वन्यजीव कायद्यामुळे खरे नीलकंठ पकडण्यास मनाई आहे, तस्मात रेशमी रुमाल किंवा मातीच्या प्रतिकृती वापरतात.

मग आपल्याकडच्या गणपती विसर्जनासारख्या मिरवणुकांनी कलकत्ता शहर गजबजून जाते. एव्हाना संजय लीला भन्साली आणि तत्सम अन्य चित्रपटकारांमुळे आपल्या परिचयाचा झालेला 'सिंदूर खेला' ह्याच मिरवणुकीत होतो. दुर्गेची पाठवणी करतांना सवाष्ण स्त्रिया तिला रक्तवर्णी टिळा लावतात आणि मग एकमेकांना लाल रंगात माखवतात, एक मिनी रंगपंचमी घडते - पण रंग फक्त लाल आणि सहभाग फक्त स्त्रियांचा. 'पाड' म्हणजेच लाल काठाची पांढरी साडी हा युनिफॉर्म. रुपये पाचशे ते साठ हजार पर्यंत किमतीच्या ह्या साड्या म्हणजे बंगसुंदरींचा जीव की प्राण.

दुर्गा प्रतिमांच्या गंगेत विसर्जनाने उत्सव संपतो. पुढल्या दुर्गापूजेपर्यंत मग ह्या बोनेदी राजबारींमध्ये शुकशुकाट पसरतो. गुरुदेव रबिन्द्रनाथांच्या शब्दात सांगायचे तर - क्लांत दिवस आणि प्राणहीन रात्रींचे सत्र सुरु राहते.

* (लेखनाचे प्रताधिकार सुरक्षित. ह्या लेखातील कुठलाही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.
कधीतरी हे वातावरण प्रत्यक्ष बघायची इच्छा आहे. पाहू कधी योग येतो ते.

छान लेख.

राधावल्लभी म्हणजे नुसती मैद्याची पुरी नाही. तीत उडदाच्या डाळीचं सारण भरलेलं असतं.

@ स्वाती२
@ Ashwini_९९९
@ DShraddha
@ अनिश्का.
@ sulu
@ देवकी
@ शाली
@ असामी
@ राधिका

उत्साहवर्धनासाठी तुम्हा सर्वांचे आभार _/\_

@ मॅगी ,
..............एकदम टागोरांच्या गोष्टीत पोहोचल्यासारखं वाटलं ......
That’s one huge compliment, thank you so much !

सुंदर लिहिले आहे,
हा राजबारी मधला खर्चिक मात्र परंपरागत आणि प्रतिष्ठतेचा उत्सव आणि वंशजांची सध्याची आर्थिक परिस्थिती हा संबंध कळल्यावर परिणिता मधला ललिताचे वडील कर्ज काढून पूजा साजरी करतात त्यातला संबंध कळला.

@ चिनूक्स,

राधावल्लभी म्हणजे नुसती मैद्याची पुरी नाही ......

नवीन माहितीबद्दल आभार !

....लेखातले फोटो ....

फ़ोटो क्रमांक २ आणि ५ (मुनमुन सेन दिसत असलेला) हे माझे मित्र अविजित यांनी काढले आहेत, लेखात तसा उल्लेख नाही. फोटोंवर नाव टाकून पुन्हा इथे प्रकाशित करतो.

आभार !

@ अनया,

तुमच्या इच्छापूर्ती साठी शुभेच्छा

@सिम्बा ,

परिणिता नाही बघितला Sad

सुंदर माहिती.
बंगाली स्त्रिया, त्यांची या सणाबद्दल असणारी भावना, कदाचित प्रसंगी होत असणारी ओढाताण, मानापमान, आजकाल नोकरी व घरकाम करताना होणारी दमछाक याबद्दलही वाचायला आवडले असते.

मी असे ऐकले आहे की बंगालमधे फार सोवळे ओवळे पाळले जाते......ते खरे आहे का? अजूनही पाळतात का?

@ मी_आर्या
@ Nira
@ निलुदा
@ Swara@1
@ अंकु
@ caparna

आभार !

@ आंबट गोड,

....... बंगाली स्त्रिया, त्यांची या सणाबद्दल असणारी भावना, कदाचित प्रसंगी होत असणारी ओढाताण......

त्या बद्दल मला फार माहित नाही. पण सोहळा दुर्गेचा असला तरी पुरुष मंडळी हिरीरीने भाग घेतात, तयारीतही.

'सोवळ्यातील स्वयंपाक' राजबारीत नक्कीच असतो. त्याला 'भियेन' किंवा 'भियेन घर' असे नाव आहे. भोग पूर्ण तयार होत नाही तोवर घरच्या मालकांना सुद्धा ते आचारी स्वयंपाकघरात येऊ देत नाहीत : - ) बाकी कार्यक्रमात फार सोवळे नसते.

Pages