सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ४

Submitted by स्वच्छंदी on 2 October, 2018 - 09:28

काही दिवसांच्या ब्रेक नंतर आणिक दोन नविन शब्दचित्रे घेऊन आलोय. पहील्या तिन भागांच्या लिंक इथे आहेत -

सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.maayboli.com/node/66833
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.maayboli.com/node/66898
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.maayboli.com/node/67132
-------------------------------------------------
सह्याद्रीतील शब्दचित्रे:

गणपती आठवड्यापुर्वीच्या वर्तमानपत्रामधे वाचले होते की ह्या गणपती सिझनला एस्टी मुंबईतून साधारण २२०० जादा गाड्या सोडणार आहे ज्यांचे जवळ जवळ ७५% बुकिंग ऑलरेडी झालेले आहे. हे उत्तम आहेच पण पुढे असेही म्हटले होते की तरीही एस्टी तोट्यात असणार आहे कारण जवळपास सगळ्या गाड्या परत रिकाम्या मुंबईला येतात. वाचता वाचता विचार आला की गेली कित्येक वर्षे हेच ऐकत आलोय की एस्टी तोट्यात आहे तरीही ती संस्था का चालू आहे? केवळ सरकारी आहे म्हणून की अजुन काही. माझ्यामते दोन्ही खरे आहे...

सरकारी संस्था असल्याने एस्टीच्या नफातोट्याचे गणित एकूण सरकारच्या ताळेबंदात पडत असेल खरे पण एस्टी ही व्यवस्था चालू राहायला तिची सामाजीक बांधीलकी हे कारण त्याहून अधिक जास्त आहे असे मला वाटते. आजवर केलेल्या ट्रेक मध्ये एस्टीने केलेले ट्रेक हेच जास्त संख्येने आहेत. किंबहुना ट्रेकरला सह्याद्रीत फिरताना एस्टी एवढा भरवसा दुसर्‍या कसल्याही वाहनावर नाही (नव्हता). त्याच सह्याद्रीतील गावगाड्याशी, रस्त्यांशी एस्टीच्या असलेल्या नात्याविशयी आज थोडेसे -

शब्दचित्र नववे : सह्याद्रीतील लाल परी

आत्ता ह्या क्षणाला वरती लिहिताना जरी मी लाल परी लिहिले असले तरी माझ्यासकट कित्येक लोकांना एस्टी म्हणजे लाल डबाच :). सह्याद्रीतील आडवाटेवरच्या, अंतर्भागातल्या अगदी चार घरांच्या गावात देखील संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेला गेलात तर कदाचीत बाकी काही दिसणार नाही पण एखादा लाल डबा मात्र वस्तीला आलेला दिसेल. आपण आधीच "नसलेल्या" रस्त्यावरून पाठीवरच्या बॅगा सांभाळत ट्रेक करीत कसेबसे पाय ओढत गावात पोचलेलो असतो, तर ही इथे कशी आली असा विचार करत असतानाच एस्टीचे डायवर (असेच म्हणतात गावाकडे Happy ) आणि कंडक्टार (असेच म्हणतात गावाकडे Happy ) गावातच कुणाकडे तरी घरून आणलेले डबे खात बसलेले दिसतील. आपण त्यांना विचारायला जावे की कसे तुम्हीएवढ्या रात्रीचे एवढ्याश्या रोडवरून आलात तर एकतर तंबाखूची पिंक मारून "काय नाय वो, दररोजचेच हाय हे" म्हणून विषय उडवून तरी लावतील किंवा नुसतेच कसेनुसे हसतील तरी. त्या हसण्यातच खरे याचे गमक दडलेले असावे.

बरे हे जे वस्तीच्या फेरीला येतात ते देखील जवळच्या डेपोवरून येतीलच असे नाही किंवा बर्‍याच वेळेला हे असे नसतेच. स्वारगेट ते घोळ, स्वारगेट ते घुटका, महाबळेश्वर ते हातलोट, खेड ते वडगाव, खेड ते अकल्पे, राजगुरुनगर ते अहुपे, राजुर ते कुमशेत, राजुर ते पाचनई, पोलादपुर ते कुडपण, संगमेश्वर ते तिवरे, चिपळूण ते चोरवणे, ठाणे ते कोशींबळे, ठाणे ते पिंपळवाडी ही अशीच काही उदाहरणे. ह्या एस्टीच्या फेर्‍या ह्या सहज जाऊन आलो अश्या नव्हेतच. आता तुमच्यापैकी ज्यांनी ह्या भागात ट्रेक केलेत त्यांना ह्या भागातल्या शेवटच्या वस्तीच्या गावी जाईपर्यंत ड्रायव्हर, प्रवासी आणि एस्टीची काय हालत होत असेल ह्याची पुरेपुर कल्पना येईल. शहरातल्या थोडाफार डांबरी असे म्हणता येईल अश्या रस्त्यावरून सुरु करून एस्टी शेवटच्या ठिकाणाला पोचेपोचेपर्यंत त्या रस्त्यावर डांबर तर सोडाच खडीपण नावाला उरलेली नसते. काही ठिकाणी रस्ताही न उरता एक नावापुरता दगड मातीचा पट्टा उरलेला असतो. मला तर ड्रायव्हर शेजारी बसून त्याच्याच सिट पाठीमागे ट्रेक बॅग ठेवून त्याच्याबरोबर गप्पा मारत अश्या शेवटच्या फेरीला वस्तीच्या ठिकाणी जायला फार आवडते. आपल्याला रस्ता असा काही दिसत नसतो (कारण तसा तो तिथे नसतोच Happy ) पण एक हात स्टिअरींगवर, एका हाताने तंबाखू मळताना, आपल्याशी मोठ्या आवाजात गप्पा मारत असून देखील कान कंडक्टरच्या बेल कडे असताना तो रस्ता त्याला लख्ख दिसत असावा Happy . कारण त्या शिवाय का तो गाडीच्या अंधूक प्रकाशात आपल्याना बरोब्बर गावात आणून सोडतो?? परत वाटेत एखादा जंगलाचा पट्टा आला की खिडकी बंद करून घ्या असे पाठिमागील प्रवाश्यांना जोरात ओरडून सांगतो कारण दोन्ही बाजूची झाडे झुडूपे उघड्या खिडकीतून आतमध्ये येऊन आपल्या गालाशी "काटेरी" सलगी करतात :). मला हे काटेरी अनुभव जरा जास्तच आलेत Happy .

पण कसेही असेना तरी एखाद्या निष्ठेने सेवा करणार्‍या कार्यकर्त्यासारखी एस्टी गावकर्‍यांची सेवा करते. जनरली सकाळी सहा वाजता वस्तीच्या गाड्या आपापल्या डेपोला परत जायला निघतात तेव्हा वाटोवाटच्या थांब्यावरून चढणारी शाळकरी मुले बघीतली की एस्टीचे महत्त्व आणी वस्तीच्या फेरीला तिने घेतलेल्या कष्टाचे कारण आपल्याला कळते. सह्याद्रीतल्या अगदी आतमधील भागातल्या गावाला एस्टीची सोय एकदाच आहे सो सकाळची परतीची बस निघून गेली की संध्याकाळच्या वस्तीच्या फेरीशिवाय त्या गावांचा शहराशी संपर्क असा राहत नाहीच. आता अशी एकदाच येणारी असली तरी संध्याकाळची एस्टी येणार (आणि तेही वेळेवर) हे नक्की कारण त्यातून सकाळचीच शाळेची मुले परत येत असतात. एखाद दुसरा अपवाद सोडला तर मला सह्याद्रीत ट्रेकिंग करताना वेळेबाबतीत एस्टीने सहसा दगा दिलेला नाही. कित्येक वर्षांपुर्वी घाटघरचा रस्ता झालेला नसताना धुआंधार पावसात ती आजनावळेहून वेळेवर आली होती, भर दुपारी कुमठ्यात वेळेवर आली होती, ऑक्टोबर हीट मध्ये वडगावला वेळेवर आली होती, थकुन भागून निजामपुरला बसलो असताना रायगडला न्यायला वेळेवर आली होती अशी अनेक उदाहरणे.

बरे गावाकडची एस्टी देखील काही अगदी फोटोफ्रेम करून ठेवावी अशी नसते. गावातले रस्ते सुरु झाले की खुद्द ड्रायव्हरची सिट देखील जिथे गदागदा हलायला लागते तिथे प्रवाशांची काय कथा Happy . पण कसेही असले तरी आणि आजमीतीला खाजगी वाहनांचे कितीही आव्हान असले तरी एस्टी हेच गावांना जोडणारा दुवा आहे हेच खरे. ह्याच एस्टीच्या वेळेवर गावातले व्यवहार चालतात, निरोप जातात, पोस्टाच्या बॅगा जातात, डबे पोचते केले जातात, खाजगी पार्सलपण जातात. आपण आपल्या ट्रेक बॅग्स पाठीवर चढवून एस्टीची वाट बघत असतो तेव्हा आलेल्या एस्टीमधे कितीही खचाखच भरलेली माणसे असली तरी आपल्यासारख्या अस्सल ट्रेकरला त्यात (त्याच्या बॅगेसकट Happy ) सामावून घ्यायला त्यात कायमच जागा असते. मला "जगह नही, निचे उतरो" ह्या अर्थाचे वाक्य कधीही कुठल्याही कंडक्टरने कुठल्याही ट्रेकमधे (पाठेवरच्या मोठ्या बॅगेकडे बघूनही Happy ) आजपावेतो ऐकवलेले नाही.

एस्टी खरेतर ह्या सह्याद्रीची वाहती संस्था आहे. शहरकेंद्रीत जिवन झाल्यामुळे गावा गावाशी एकमेकांचा संपर्क हा एस्टीमार्फतच व्ह्यायला लागला आणि जिथे त्या डोंगरापलीकडे असण्यार्‍या गावात पुर्वी माणसे सहज चालत जायची ती रस्त्यावरील बसथांब्यावर एस्टीची वाट बघत थांबू लागली. जशी ही डिपेंड्न्सी वाढायला लागली तशी एस्टीला पॅरलल वडाप, टमटम, जिपडी, डुक्कर, सिक्स सिटर, कमांडर अश्या संस्था उभ्या राहिल्या. त्याही ट्रेकरला नेतातच पण खिशाला ओरबाडून. माणसे म्हणजे कोंबून नेण्यासाठीच असतात हे यांचे मुख्य तत्त्व आणि जिपमधील असलेल्या प्रत्येक रिकाम्या जागेत माणूस भरेपर्यंत स्टार्टर मारायचाच नाही हे यांचे व्यापारी तत्त्व. अश्या कमांडर मधून २४ जण जाताना (हे सत्य आहे कारण मीच २४वा होतो Happy ) किंवा अश्या टमटम मधुन १६ लोक जाताना बघीतले तर ह्या गाड्या डिझाईन करणार्‍या लोकांना झिट येईल. तरीही एस्टीच्या बरोबरीने ह्याही खाजगी गाड्या सह्याद्रीत आजकाल सर्रास दिसतात. पण त्याने एस्टीचे महत्व कमी होत नाहीच किंबहूना वडाप अथवा जिपडीमधून चोंबाळलेल्या अवस्थेत पायावर जड ट्रेक बॅग ठेवून दोन गावकर्‍यांच्या मधून चेपून प्रवास केल्यावर एस्टीचे महत्त्व जास्त पटते.

इथे एस्टी बरोबर की खाजगी वाहने, कोण किती फेर्‍या करते, कोण किती आतपर्यंत अगदी वरच्या वाड्यांपर्यंत जाते हे महत्त्वाचे नाहीच आहे. किंबहुना आज वरचे लिहीताना फक्त एस्टीचाच विचार डोक्यात आहे. आजघडीला गाव तिथे रस्ता आणी रस्ता तिथे एस्टी हे समीकरण अल्मोस्ट पक्के आहे. मग ती दिवसातून एकदा येणारी असो किंवा आठवड्यातून तिनदा येणारी असो एस्टीची फेरी ही होतेच. गावागावाला शहराशी जोडणारी ही नाळ फायदा तोट्याचा विचार न करता कायमच धावत आलीय. म्हणूनच स्वारगेट सारख्या अत्यंत व्यस्त बसस्थानकावर जिथे स्वारगेट ते बेंगलोर असा अश्वमेध उभा असतो तिथेच बाजूला स्वारगेट ते मुंबई अशी शिवनेरी उभी असते तिथेच बाजूला स्वारगेट ते कुंबळे असा लाल डब्बा....सॉरी, लाल परीही उभी असते.

-----------------------------------------------

सह्याद्रीतील शब्द्चित्रे:

नुकताच गणपती उत्सव साजरा झाला. येऊ घातलेल्या सणांनी कॅलेंडर भरलेय. घट बसायचे दिवस जवळ येऊ लागलेत. घट बसल्यावर अश्विन नवरात्राच्या शेवटी येणार्‍या दसर्‍याचे वेध ट्रेकर्सना लागायला लागलेत कारण पावसाळा उलटल्यावर सुरु होणार्‍या ट्रेकिंगच्या सिझनला दसर्‍याचा मुहुर्त हा पुर्वीपासूनच साधला जात होता. माझ्याही अनेक ट्रेक्स मधले बरेच ट्रेक दसर्‍याच्या मुहुर्तावर पार पडले आहेत आणि नवनविन ट्रेक्स चे प्लॅनही याच दसरा आणि येणार्‍या सणांना साधून केले गेले आहेत म्हणून विचार आला की यावरच काहीतरी लिहावे. माझे अनेक ट्रेक सणांच्या दिवशीच किंवा त्याच्या एखाद दिवस अलिकडे पलिकडे घडलेत त्यामुळे सह्याद्रीत साजरे होणारे सण जवळून बघायला मिळालेत. आज त्याच्यावरच थोडेफार -

शब्दचित्र दहावे : सह्याद्रीतले सण

सिन असा की मी ढवळे गावात रात्रीचे जेऊन घेतलेय पण घरात कर्ते पुरुष कोणीच नाहीये. रवीचे बाबा ढवळे गावात होळीच्या मांडावर गेलेत तर रवी स्वतः दरे गावात होळीच्या मानाच्या बैठकीसाठी गेलाय. दुसर्‍या दिवशी दोघेही मला तावातावाने सांगताहेत की असे कसे चालेल, होळी भ्रष्ट होणार नाही काय, मोरे नाव मातीत मिसळले, काय पण झाले तरी त्यांना ह्या वर्षी होळिला गावात प्रवेश नाय Sad . प्रकार असा होता की दोन्ही ठिकाणी बिगर मोरे घरांमध्ये लग्न झाली होती आणि जावळी सारख्या मोरे घराण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या (यावर परत कधीतरी एकदा) ठिकाणी त्यांना होळिसारख्या पवित्र सणाला गावकीच्या बाहेर ठेवणे हाच एक उपाय दिसत होता. निमित्त होळीचे पण खरा राग मोरे घराण्याच्या नावाला धब्बा याचाच (हिंदी चित्रपटाप्रमाणे खानदानकी इज्जत मिट्टीमे मिला दी, वगैरे वगैरे... Happy Happy ). माझ्या इतक्या वर्षांच्या ट्रेकिंगमध्ये सह्याद्रीत सर्वात जास्त "अनुभवलेला" सण म्हणजे होळीच Happy .

तसा एकंदरीत माणूस सणप्रियच. एकत्र येणे, आनंद साजरा करणे हे त्याला आवडतेच. त्यात सह्याद्रीसारखा त्याच्या सर्व भुजांनी ओंजळ भरभरून निसर्ग ओतत असताना त्याच्या पायाशी राहणारे गावकरी ही संधी कशी सोडतील. परंपरा आणि आधुनिकता यामध्ये अजुनपर्यंतरी परंपरेला प्राथमिकता देणारी गावातली माणसे बघीतली की जाणवते की इथे गावांमध्ये किती घट्ट ह्या सणपरंपरा रुजल्या आहेत. कॅलेंडर वर्ष जरी जानेवारी ते डिसेंबर असले, पंचांग वर्ष जरी चैत्र ते फाल्गुन असले तरी माझ्या बघण्यात अनुभवण्यात आलेले इथल्या गावकर्‍यांचे वर्ष दसर्‍याला (खरे तर घटस्थापनेला कारण नऊ दिवसातल्या माळा पण तितक्याच जोमाने साजरे करतात इथले लोक Happy ) सुरु होते. कारण उघड आणि स्पष्ट आहे. दसर्‍याला भात कापणीला आलेले असते, पावसाळा सरत आलेला असतो, पाण्याची वानवा नसते, हातात येणार्‍या पैशाच्या आणि घरात भरणार्‍या दाण्याच्या निमित्ताने दसरा जोरात साजरा होतो. सह्याद्रीतले मोकळवणातले गाव असेल किंवा अगदी अंतर्भागातले चार झोपड्यांचे गाव असेल दसरा सण साजरा न करणारे गाव मी तरी कधी बघीतले नाही. पुर्वीच्या काळी अश्या वेळी अश्विन दशमीचे निमित्त साधून मनगटातली रग जिरवायला माणसे बाहेर पडत. हल्ली तसे काही करायचे नसले तरी, आपट्याची पाने आणून, शस्त्रांची पुजाकरून (क्वचीत कधी गावाच्या मुख्य देवाची पालखी सिमेवर नेऊन) दसरा साजरा होतो. अश्याच एका ट्रेक मध्ये मी दसर्‍याला गारजाई देवीला सत्यनारायणाची पुजा बघीतलीय आणि सुरगडाच्या बुरुजावर गावकर्‍यांसोबत भगवा झेंडाही लावलाय Happy .

दसर्‍या नंतर सणांची मालीकाच सुरु होते. दसर्‍या नंतर येणारे तुळशीचे लग्न असो की कार्तिकीची पंढरपुर वारी असो की नरक चतुर्दशी असो की संक्रांत असो प्रत्येक सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे फटाक्यांचा धुर हे समीकरण आपल्याकडे शहरात, पण एखाद दुसरा अपवाद सोडला तर जरी मी कधी दिवाळीत फार ट्रेक केले नाहीत तरी सह्याद्रीतल्या गावात दिवाळी म्हणजे दिव्याच्या अवसेला दिव्याची पुजा, नरक चतुर्दशीला कारेटी (नरकासुर) फोडणे, पाडव्याला गोडाधोडाचे जेवण असाच साजरा होत असेल याची खात्री आहे. म्हणजे फटाके फोडणे गावातल्या लोकांना निषीद्ध नाहीये, दर पाच वर्षांनी कोणीना कोणी जिंकले म्हणून बाहेरचे लोक गावात येऊन हजाराची लड लावतातच पण दिवाळीत ते कमीच Happy . दिवाळी नंतर येणारा संक्रातही हा असाच परंपरागत साजरा होणारा सण.

पण ह्या सगळ्या सणात गणपती, दसर्‍या नंतर सर्वात मोठा सर्वदुर साजरा होणारा सण म्हणजे होळी. जावळी सारख्या काही ठिकाणी तर दसर्‍या पेक्षाही जोरदार साजरा होणारा हाच सण. ह्या सणाला मात्र मला माझ्या ट्रेकिंग दरम्यान अनेक वेळा फार जवळून बघता आले. किंबहुना सणांना जोडून माझे सर्वात जास्त ट्रेक होळीलाच झालेत. होळीला त्यांच्यात सामील होऊन मी नाचलो देखील आहे. होळी नाव असले तरी प्रत्येक ठिकाणी पद्धती मात्र वेगवेगळ्या. मग ते चावंड गावात शाळेतली होळी असेल किंवा हातलोट गावातली असेल किंवा घोणसपुर गावातली असेल किंवा बिरमणी गावातली असेल किंवा खांदेरीची असेल किंवा ढवळ्यातली असेल किंवा दर्‍यातली असेल किंवा गोठवली/पिंपळवाडीतली असेल किंवा घुटका गावातली असेल किंवा कुदळी/कामथ्यातली असेल. इथल्या अश्या आणि अजून बर्‍याच गावातल्या होळीला अथवा एकाद दिवस अलिकडे पलिकडे मी तिथे हजर होतो. आत्ता आत्ता पर्यंत चालू असलेली बळीची प्रथा (काही ठिकाणी अजूनही ती चालू आहे पण तो विषय आज इथे नको) होळीला कशोशीने पाळली जायची, गावातले हेवेदावे उघड व्हायचे, ज्याच्याशी वैर आहे त्याच्या नावाने उघड बोंबा ठोकायच्या, सरण्यार्‍या थंडीला बाय म्हणून आणि येऊ घातलेल्या भाजावळीच्या तयारीला लागायचे, कुठे क्वचीत पावटा, हरभरा, गहू, शेंगदाणा तोडीला आला असेल तर त्या कामाला लागायचे, शिकारीला जायला बंदुकांची साफसफाई करायची, उघडे पडत जाणारे पाणवठे जपायला बंधारे घालायचे अश्या अनेक अनेक घटना होळीच्या भवताली घडत असतात.

सगळे काही वर्षानुवर्षांच्या आखलेल्या नियमात घडत असते. होळीची लाकडे तोडायला रानात जाणार कोण, रचणार कोण, पहीली बोंब ठोकणार कोण, पुजा करणार कोण, पेटवणार कोण सगळे ठरलेले. मी एका ठि़काणी (गावाचे नाव सांगत नाही) घराची वाटणी झाल्याने होळी पेटवणार कोण ह्यावरून दोन घरात झालेला भयंकर वाद बघीतला आहे Happy . बरे होळी म्हणजे गावकर्‍यांच्या दृष्टीने नुसताच सण नव्हे तर त्याचे पण एक रुलबुक असते. होळीला सह्याद्रीतल्या बहुतेक गावात गावदेवाची पालखी बाहेर निघते. पालखी देवळाबाहेर सहाणेवर बसली असेपर्यंत गावात ह्या रुलबुकच्या नियमा बाहेर "कुणालाही" जाता येत नाही. आम्हाला याचा एकदा जबरदस्त फटका बसलाय. हातलोट घाट उतरत असताना हातलोट गावात आणि बिरमणी गावात सहाणेवर पालखी असल्याने तिथल्या नियमानुसार आम्हाला अनवाणी गावाच्या वेशीबाहेरून जंगलातून जायला लागले होते. त्यांना काही नव्हते त्याचे पण असा अनवाणी ट्रेक करून आमची मात्र कंप्लीट वाट लागली होती Happy .

होळी नंतर येणार्‍या चैत्री पाडव्यापासून हनुमान जयंती पर्यंत (गावाच्या सोईनुसार) बहुतांश ठिकाणी हरीनाम सप्ताह होताना मी बघीतलेत. तसा तर सप्ताह हा गावकर्‍यांच्या सोशल इंजीनिअरींगचाच भाग असल्याने वर्षभर तो सण कधीही साजरा होत असतो. आम्हीही ट्रेक दरम्यान बरेच वेळा सप्ताहात भजन म्हणून भंडार्‍याचा लाभ घेतला आहे Happy . पण हनुमान जयंती झाली की सह्याद्रीतल्या गावकरी त्याच्या शेतीच्या कामाला पळतो कारण पुढचे पाच महीने "शेती" हाच एक सण त्याला साजरा करायचा असतो. भाते पेरून, लावणी करून गणपती साजरा करून भाते कापायची वेळ येते त्याच दरम्यान दसरा येऊ घातलेला असतो आणि त्याचे सणांचे ऋतूचक्र पुर्ण होते Happy .

मी वर म्हटल्या शिवायही गावकरी निरनिराळे सण वर्षभर साजरे करत असतातच त्यात पोळा आला, ज्या ठिकाणी मुस्लिम घरे जास्त आणि मशीद आहे त्या ठिकाणी ईद आणि उरुस आला, महाशिवरात्री आणि नवरात्रात होणारे भैरोबा, बिरोबा, जननी, वाघजाई आदि स्थानिक देवतांचे सणही आलेच. सह्याद्रीत उत्तर ते दक्षिण अशी अनेक प्राचीन शंकर मंदीराची माळ बांधलेली आहे त्या ठिकाणी, विशेषतः जिथे शंकर मंदीराचे व्यवस्थापन जंगम समाजाकडे आहे तिथे, महाशिवरात्रीचा उत्सव हा जोरदार साजरा केला जातो अगदी वर्षानुवर्षे तसाच. एकदा अनुभवला"च" पाहीजे असा हा उत्सव असतो.

आता सणांनी आधुनीक व्हावे की नको, गावे आधुनीक झाली, माणसे आधुनीक झाली मग सणांनी पण बदलावे की नको, हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा आणि गावकीचा प्रश्ण आहे. होळीसारख्या सणांमध्ये होणारी गावकीतली भांडणे जोवर जेवणातल्या लोणच्यासारखी आहेत तोवर त्याची अशी मजाही आहे. पण "दुनीया गेली चंद्रावर आणि आम्ही राहीलो डोंगरावर" असे फिलींग न येता अजुनही हे गावातले लोक सण हे तश्याच पद्धतीने साजरे करताहेत जसे त्यांच्या वडीलांनी केले, त्यांच्या आजोबांनी केले, त्यांच्या अनेक पिढ्या पुर्वीच्या लोकांनी केले. त्यांच्या पुढच्या पिढ्या पण हे सण असेच साजरे करतील की नाही काय हे आजच सांगणे कठीण आहे पण जोवर सण समारंभ अजुनही "सहना भवतु, सहनो भुनक्तु" ह्या उद्देशाने केले जातील तोवर ते अश्याच पद्ध्तीने साजरे होतील असे मला वाटते. किंबहुना ते तश्याच पद्धतीने साजरे केले जावेत अशी माझी इच्छा आहे. नाहीतर आदर्शवत असा जाऊद्या हो...पण पुढील पिढीला परंपरा म्हणूनतरी दाखवावा असा एकतरी सण सध्या शहरामधे आपण साजरा करतो काय?

--------------------------------------
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाल परी नामाभिधान आवडलं.
एकदा एका मित्राने एस टी ला लाल डबा म्हटल्यावर रागाने लालेलाल झालेल्या कंडक्टरची आठवण आली. त्याला त्याच्या नोकरीचा, गाडीचा जाज्वल्य अभिमान वाटत होता हे बघितल्यावर तेव्हापासून मी लाल डबा म्हणायचं थांबवलं