भोरप्या नाळ व अनामिक नाळ

Submitted by योगेश आहिरराव on 18 September, 2018 - 02:27

भोरप्या नाळ व अनामिक नाळ

नाळेची वाट आणि नाणदांड घाटाच्या ट्रेकच्या वेळी केवणीत मुक्काम होता. त्यावेळी जिमखोड्याच्या खिंडीतून सुधागड व त्याच्या छोट्या सुळक्यांनी जोडले गेलेले तैलबैलाचे पठार, तसेच या बाजूने पहाताना तैलबैला साईड व्ह्यू मुळे एकच सुळका असल्यासारखा दिसतो.
1 (1).JPG
अगदी डोंगरयात्राचे मुखपृष्ठ. केवणीचे पठार आणि तैलबैला यामधील दरी, सुधागडाच्या टकमक पासून तैलबैलाच्या दिशेने निघालेले सरळसोट कडे, अनेक घळी व नाळा हे सारंच दृश्य लाजवाब. याच भागात तैलबैला कडून दोन पुरातन वाटा 'घोडजीन' आणि 'भोरप्या नाळ' कोकणात ठाकुरवाडी, पाच्छापुर, खंडसांबळे, नेणवली या भागात ये जा करण्यासाठी वापरले जात. आत्ताच्या काळात घाटावर आणि कोकणात दोन्ही ठिकाणी एस टी ची व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्यानंतर या वाटेंचा वापर खुपचं कमी झाला. याच दोन अल्पपरीचीत वाटांचा मागोवा घेण्यासाठी मी, जितेंद्र खरे आणि सुनील चव्हाण आम्ही तिघे सकाळी सकाळी पाच्छापूर ठाकूरवाडीत दाखल झालो. गाडी वाघ मामांच्या अंगणात उभी केली. नाणदांड घाट उतरते वेळी मधल्या टप्प्यात हे वाघ मामा भेटले होते. मामांनी सुरुवातीला ओळखले नाही पण नाणदांड घाटाचा, ओढ्यातला चहा आणि विडीचा किस्सा सांगितल्यावर त्यांची ट्युब पेटली. मग हशा पिकला आणि गप्पा गोष्टींची सुरुवात झाली. भोरप्याचा ठिकाणा माहित होता पण घोडजीन घाटाच्या वाटेबद्दल वाघ मामांना काही सांगता येईना. आम्हाला जेवढं माहीत होतं ते वर्णन केल्यानंतर मामांनी त्या भागातल्या वाटेला ‘उडीदकणा’ म्हणतात असे सांगितले. तसं पाहिलं तर मामांना या भागातील भरपूर माहिती मग ही वाट कुठून आली. कारण आमच्या वर्णनानुसार, मामा सांगत होते ती वाट आणि घोडजीन भौगोलिक स्थानानुसार एकच असणार ! तसेही एकाच वाटेला दोन वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाऊ शकते आणि तशी काही उदाहरणे आहेत. आम्हीही अशीच मनोमन समजूत काढली.
मामांना सोबत येण्यासाठी विचारलं तर म्हणाले, ‘पाच्छापूरात शाळेचे पत्रे लावायचे काम घेतलं आहे. उद्या सोमवार आजच्या आज काहीही करून काम पूर्ण करायचे आहे’. सोबत दोघे तिघे घेऊन वाघ मामा निघून गेले. त्यांच्या घरातून अर्धवट रिकाम्या बाटल्या पुन्हा भरून घेऊन चालू पडलो. नाणदांड घाट तसेच सुधागडसाठी अनेक वेळा तिन्ही ऋतूत इथे येणं झालेलं त्यामुळे हा परिसर तसा परिचयाचा.
ठाकूरवाडीतून नदी पात्रात न उतरता नदीला उजव्या हाताला ठेवत समांतर वरच्या पातळीत चालू लागलो. वाटेत एक वयस्कर मामा लाकूड तोडत होते, त्यांना वाटेबद्दल विचारले, ‘कुठं तैलबैला ना ! हीच वाट गेलीय. कण्यान जावा कण्यांन’. बहुतेक उडीदकणाचं सांगायचे असेल. वाटेच्या सुरुवात पर्यंत तरी आले तर खूप वेळ वाचेल या उद्देशाने त्यांना विचारलं. अगदी क्षणाचा ही विलंब न करता त्यांनी अतिशय उर्मटपणे उत्तर दिले, ‘मला कामं हाईत येळ नाही. पुढं वाट गावणार नाय, तुम्ही चुकशाल’, असा शेरा सुध्दा मारला. खरंच थोडे विचित्र वाटले. तसेही या आधीच्या अनुभवावर, काहीसं वाचलेलं, नकाशा वाचन आणि दिशेनुसार अभ्यास केला होता, मुख्य म्हणजे विना वाटाड्या भटकणे हे काही आमच्यासाठी नवीन नव्हतेच मुळी, असो तर..
सुधागडाला डावीकडे ठेवत पंधरा वीस मिनिटांच्या अंतराने खाली नदी पात्रात धनगरवाडा दिसला तर त्यापलीकडे केवणीत जाते ती नाणदांड घाटाची वाट. सुधागडाचे टकमक टोक खुपच जवळ, थोडा कॅमेरा झूम करून पाहिले तर वर काही मंडळी दिसली. टकमक टोक आणि त्याच्या बाजूच्या घळीतून येणारा ओढा पार करून पुढे निघालो. ओढ्याच्या वरच्या बाजूला थोडे पाणी अजूनही शिल्लक होते. अगदी थोड्या चालीनंतर दोन वाटा, डावीकडची बारीक आणि सुधागडाच्या पायथ्याच्या रानात जाणारी असेल ती सोडून उजवीकडची जख्ख मळलेली वाट घेतली. ठाकूरवाडी सोडल्यानंतर आता पर्यंतची चाल ही थोडी फार चढ उताराची तसेच वाटेला फारसे जंगल ही नाही. त्यात उन्हाळा असल्यामुळे रानातल्या वाटा व्यवस्थित नजरेत येत होत्या. सुमारे तासभर चालल्यानंतर झाडाखाली गुळ चिक्की आणि पाणी पीत पहिला थांबा घेतला.
इथुन सुधागडचा उजवीकडचा भाग त्याला चिकटून असलेले तिवई सुळके स्पष्ट दिसत होते. या पुढची वाट नदीपात्रात न उतरता त्याला अगदी जवळून जात पुन्हा वरच्या बाजूला चढली. नदी पात्राच्या इथल्या भागात थोडे जंगल आणि मस्त पैकी पाणी, येताना इथेच अंघोळ करायची हे आम्ही तिघांनी ठरवून टाकले. आणखी अर्धा तासात सुधागड जिथे तैलबैलाशी जोडला गेला आहे त्या खालच्या भागात आलो. माथ्याकडे बघितल्यावर कड्याला बिलगून छोटे मोठे सुळके तसेच दांड आणि काही घळी. थोडा वळसा घेत, विकीमापियावर घोडजीन वाट जिथे दाखवली आहे त्या नाळेच्या समोर आलो. ठाकूरवाडीतून इथवर येण्यासाठी आम्हाला दोन तास लागले. तिथल्याच एका झाडाखाली बसून घरून आणलेला नाश्ता केला. सकाळी ठाकूरवाडी सोडली तेव्हा माणशी चार लिटर पेक्षा थोडे अधिक पाणी आम्हा तिघांकडे होते, वाटेत कुठेही पाणी मिळणार नाही हे गृहीत धरून होतो. त्यामुळे तैलबैला गावात गेल्याशिवाय पाणी मिळणार नाही हे तितकेच खरे.
बऱ्यापैकी झाडीने झाकलेली ही नाळ चढायला दोन तास पुरेसे होतील, जेमतेम ६००-७०० मीटर चढाई असावी. तसेही केवणी, तैलबैला, आसनवडी, हिर्डी ही ठिकाणं जवळपास सारख्याच उंचीवर. पण सह्याद्रीत बहुतेक वेळा दिसते तसे नसते, याचा प्रत्यय पुढे आम्हाला आलाच. जिथे आम्ही नाश्ता केला तिथून जरी नाळ समोर होती तरी तिथे जाणारी वाट उजवी किंवा डावीकडून असणार त्या नुसार जितेंद्र आणि सुनील दोन्ही बाजूला बघून आले पण वाट अशी नव्हतीच. पुन्हा त्या ठाकूरवाडीहून आलेल्या मळलेल्या वाटेने पुढे निघालो थोडे खाली उतरताच याच नाळेतून आलेला ओढा खालच्या नदीला जाऊन मिळत होता. तो पार करून वाट वर वळसा घेत भोरप्या नाळेच्या दिशेने जात होती. थोडे पुढे जात वाट डावीकडे वळेल किंवा एखादी त्या दिशेने जाणारी वाट मिळेल पण तसे काही झाले नाही. पुन्हा माघार येत ओढ्यात आलो. ओढ्याच्या उजवीकडच्या दांडावर चढलो. त्या भागातले रान नुकतेच जाळलेले दिसत होते काही ठिकाणी तर धूर येत धुगधुग् जाणवत होती. थोड्या उंचीवर आलो तेव्हा सुधागडला चिकटून असलेले सुळके दिसले. तर मागच्या बाजूने येणारी एक वाट, पण पुढे त्या दांडावर बहुतेक ढोर वाटा आणि थोडे फार जंगल. एका ठराविक उंचीवर जात डावीकडे नाळेतला ओढा जवळ आला. ओढा तसाच ठेऊन उजवीकडून चढाई झाडी आणि कड्यामुळे शक्य नव्हती, तर नाळेपलीकडे डाव्या बाजूला सुद्धा सरळसोट कडे. तसेही विकिमापियावर घाटाची खूण याच नाळेची आणि प्रितीच्या लेखात सुद्धा नाळेचा थोडाफार उल्लेख वाचलेला आठवत होत. मनात पहिली शंका आली, ही जर ती नाळ असेल तर घोडजीनची नाळ असे न म्हणता मग घोडजीनची वाट का बरं म्हणत असावेत ? कदाचित थोडीफार चाल ही नाळेतून असावी तसेच या वाटेच्या दोन्ही बाजूला दांड त्यावर सरळसोट सुळक्या सारखे अंगावर येणारे कडे आहेत त्यामुळे कदाचित ठाकूरवाडी परिसरातली मंडळी याला ‘उडीदकणा’ म्हणत असावीत, अशीच स्वतःची समजूत काढत निघालो. नाळेत नेहमी प्रमाणे मोठ मोठ्या दगडांचा खच आणि जोडीला काटेरी झुडपे ते मोठी उंबराची झाडं. नाळेच्या उजवीकडून तर कधी डावीकडून, नाहीच शक्य झाले तर अगदी नाळेतून एक एक टप्पा चढत होतो. मध्येच एखादा मोठ्ठा धोंडा समोर येई मग जसे जमेल तसे त्याच्या आजूबाजूने मार्ग काढायचा. त्यात बरीच छोटी मोठी काटेरी झुडपे, सुकलेले मोडून पडलेल्या छोट्या फांद्या काडक्या जे वाटेत येईल त्याला बाजूला करत वाट तयार करणे हा प्रकार सुरू झाला. सुरुवातीला वाटले, तसेही ही वाट फारशी वापरात नाही त्यात पावसाळ्यानंतर थोडीफार पडझड होऊन आता उन्हाने सुकून हे गचपण वाढले असावे. जसे वर जात होतो तसा चढ तीव्र होत गेला. साधारण निम्मं वर गेल्यावर एक वीस पंचवीस फुटी पॅच आला. डावीकडच्या बाजूने चढणे तसे अवघड नव्हते अगदी गरज भासली तर सोबत घेतलेला रोप सुद्धा वापरू शकत होतो. थोड निरीक्षण केल्यावर त्याच्या उजवीकडून झाडीतून वाट काढता येऊ शकेल असे दिसले तसेच झाडीत शिरत सोबतच्या काठीने काटेरी झुडपे बाजूला सारून त्या पॅच ला बायपास करून वर आलो. या पुढे ही तसेच चित्र होते, दगडांचा खच आणि झाडी झुडपे. गचपणात वाट काढत काटेरी झुडपे बाजूला करत अतिरिक्त श्रम वाढून परिणाम जास्त तहान आणि विश्रांतीचे थांबे वाढत गेले. काही ठिकाणी तर नाळेतून जाणं अशक्य होई, मग उंचीपेक्षा अधिक झुडपात घुसून वाट तयार करावी लागे. यात तिघांची सारखीच दमछाक होत होती. दुसरा मोठ्या पॅच समोर आलो, मोठा जरी असला तरी अवघड मुळीच नव्हता. आतापर्यंत निम्याहून अधिक उंची गाठली होती पण काय माहित मनात वेगळेच विचार सुरू झाले. चर्चा सुरू असताना खरे साहेब बोलून गेले, ही खरचं घोडजीनची वाट आहे ना ? ते ऐकून तर क्षणभर सारे अवसान गळून पडले. सावलीत बसून शांतपणे विचार केला, तसे पाहिले तर खाली सुरुवातीला रान जाळलेलेल्या दांडा पलीकडे कुठल्याही प्रकारच्या वाटेच्या किंवा कोणत्याही मनुष्यखुणा या इथे तरी नव्हत्या. 333_0.JPG
नाळ जरी खूप अवघड नसली तरी कधी काळी वापरात असल्याची खूण नाही तसेच एवढी पडझड होऊन सारा मार्ग कसा बदलू शकतो ? आत्तापर्यंत झालेली दमछाक वेळेचे गणित आणि पुढचा पल्ला हे सर्व गृहीत धरून चर्चेनुसार आम्ही असा निर्णय घेतला, जो वर जितके शक्य होइल तितके पुढे जात राहू. अगदीच एखादा खूपच मोठा टेक्निकल पॅच आला तर त्यावेळी फारशी जोखीम न घेता, स्वतःच्या मर्यादा ओळखून आणि निसर्गाचा मान राखून, आलो तसा परतीचा मार्ग काढायचा. कारण नाळेतली वाट ही पूर्णतः पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली असते, अशावेळी अचानकपणे एखादा टप्पा वाटेत येऊ शकतो. त्यात आतापर्यंतची स्थिती पाहता ही घोडजीन असूच शकत नाही असं आमचे तिघांचेही मत जवळपास झालेच होते. तरी एकदा प्रीती सोबत बोलायचे ठरवले. कारण आधी म्हणालो तसे, तिने ही वाट केली होती आणि तिचा याबद्दल लेखही वाचलेला थोडासा आठवत होता. एक ट्रेकर म्हणून माहिती, अभ्यास आणि नियोजनाचा भाग म्हणून कुठलाही दिखावा, मोठेपणा, इगो सोडून योग्य व्यक्ती सोबत चर्चा जरूर करावी निदान मला तरी त्यात कमीपणा वाटत नाही. दोन तीन वेळा प्रयत्न केला काही संपर्क होऊ शकला नाही. पण अशावेळी अचानकपणे जेव्हा आपण फोन करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण कुठे आहोत, आजूबाजूच्या खुणा ती जागा आपली एकंदरीत स्थिती, हे सारं व्यवस्थित शांतपणे सांगता यायला हवं. नुसतं थोडं इकडे तिकडे भरकटलो म्हणून पॅनिक होत उगाचच याला त्याला फोन लावून गोंधळात पाडू नये. शांत चित्ताने विचार करून निर्णय घ्यावा... असो. पॅच पार करून मी पुढे गेलो, आजूबाजूला वाट काढत मग दोघांना वर यायला सांगितले. जिथे अडेल तिथे पुढे जाऊन वाट करायची मग आवाज द्यायचा. याला दुसरे कारण म्हणजे बहुतेक ठिकाणी असलेले लूज बोल्डर पहिल्या माणसाच्या धक्क्याने ते खाली पडत मग सुरक्षा म्हणून मागच्या व्यक्तीला अंतर ठेवून चालणे भाग होते. जसजसे वर जात होतो तशी नाळ अरुंद होत वरच्या झाडीच्या टप्प्यातून आकाश दिसायला लागले. खाली मागे पहिले तर बरीच उंची गाठली होती, समोर केवणी पठाराचा माथा नजरेत येत होता. अरुंद नाळेत काटेरी झुडूप सोबतीला होतेच अगदी हातावर, कपड्यांवर, मानेवर, सॅकवर ते चेहऱ्यावर सुद्धा वाळलेले गवत, काडक्या, त्यात हाताच्या तळव्यावर बरेच काटे टोचले त्यातले काही काटे दुसऱ्या दिवशी कामावर लॅबमध्ये मायक्रोस्कॉप खाली हात ठेऊन शोधून काढले. शेवटच्या टप्प्यात डावीकडे कड्याला बिलगून खड्या चढणीची वाट होती. क्रॅम्प यायची चिन्ह दिसू लागली, पुढे जात पाणी पिऊन दम खात बसलो. माघून खरें साहेब हळूहळू येत एका लयीत पुढे निघून गेले. उजवीकडून झाडीत शिरत पाच एक मिनिटांत मोठ्याने आरोळी दिली, तैलबैला आला रे, आपण पोहचलो. खरचं ते ऐकून वेगळीच ऊर्जा अंगात आली. नाळेच्या तोंडावरचे झाडीतून बाहेर आलो, समोर तैलबैला पाहून जीवात जीव आला. IMG_1296.JPGजवळच्या एका झाडाखाली बसलो, बसलो म्हणण्यापेक्षा तोंडावर रुमाल ठेवून आडवे झालो. डोक्यात तेच विचार खरचं ही घोडजीन आहे ? जर का विकिमापिया वर हि वाट मार्क करणार्याने खरंच घोडजीन केली असेल तर या अनामिक नाळेने चढणारे बहुतेक आम्ही तिघेच असू. इथून डावीकडे काही बारीक वाटा गेल्या होत्या, दिशेप्रमाणे त्या बाजूला जाऊन एखादी वाट तिकडून वर आली आहे का हे पाहता आले असते पण खरं सांगू तर उन्हामुळे आणि दमलेल्या अवस्थेत जागच हलयाची पण इच्छा होत नव्हती. आरामात तैलबैला गावात जाऊन मुक्काम करून दुसऱ्या दिवशी भोरप्याने उतरू असेही एक मन सांगत होते. दहा पंधरा मिनिटे आरामात पडून राहिल्यावर भानावर येत घड्याळात पाहिले तर दोन वाजून गेले होते. थोडक्यात ठाकूरवाडीतून निघून सहा तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला होता. दोन अडीच तासात चढू म्हणणारी नाळेने चार तासांपेक्षा जास्त वेळ घेतला त्यात तास दीड तास तर आमचा झाडी झुडूप यांच्याशी लढण्यातच गेला. आशा निराशेचे मानसिक हेलकावे खात अतिरिक्त शारिरीक श्रमाने पार ढेपाळून गेलो. त्यामुळे खरंतर सोबत घरातून आणलेले जेवण करायची सुद्धा इच्छा होत नव्हती. त्यात पाण्याचा साठा हा पुढचा मोठा प्रश्न होता, तिघांकडे मिळून जेमतेम अडीच लिटर पाणी आणि अर्धा लिटर ताक उरले होते. पाण्याची अशी अवस्था पाहून भूक ही मरून गेली. तैलबैला गावात जाऊन जेवण करून पाणी भरून पुन्हा माघारी भोरप्याच्या नाळेपर्यंत येण्यासाठी कमीत कमी दिड ते दोन तास सहज गेले असते. तिघांनी एकेमेकांकडे पाहिले आणि लगेच भोरप्या उतरायचा ठराव मंजूर झाला. बरोब्बर अडीच वाजता भोरप्याच्या दिशेने चालू लागलो. तैलबैला डाव्या हाताला ठेवत उजवीकडे क्रेस्ट लाईन पकडून खालच्या दरीतले फोटो काढत मध्ये एके ठिकाणी सुधागडाचा पूर्ण फोटो मिळाला. IMG_1308.JPG
याच नाळेने आम्ही वर आलो. वातावरण फारसे स्वच्छ नव्हते थोडाफार वाहता वारा उन्हाचा तडाखा सौम्य करत होता.
आजुबाजुला नजर फिरवली तैलबैला, मागे उठवलेला सालटरचा डोंगर, आग्नेयेला घनगड मारठाणा, दरीपल्याड केवणी त्यामागे धुसर अंधुक आसनवडी घुटके भागातील म्हतोबाचा डोंगर.
या पठारावर फारशी मोठी झाडं नाहीत, अगदीच छोटी झुडपे आणि जोडीला करवंदाची झाडं मात्र भरपूर, त्यातली काही पिकत आलेली तोंडांत टाकली. तैलबैलातून तसे पाहिले तर चार प्रचलित वाटांनी कोकणात उतरता येते. साधारण वायव्येला असणारी वाघजाई घाटाची वाट, पश्चिमेला सवाष्णी घाट, नैऋत्येला घोडजीनची वाट तर दक्षिणेला भोरप्या नाळ. अनुक्रमे ठाणाळे, नाडसूर, बहिरामपाडा, धोंडसे, पाच्छापूर, ठाकूरवाडी या भागात जाता येते. ब्लॉगर मिटच्यावेळी वाघजाई आणि सवाष्णी या वाटेने जाणे झाले होते.
पठारावरून चालत पाऊण एक तासात तैलबैलाला वळसा घालून गावात जाणारी मुख्य वाट सोडून नाळेचा अंदाज घेत उजवीकडे वळलो. या भागातली खूण म्हणजे नाळेच्या तोंडाशी उभे राहिल्यावर समोर केवणी आणि एकोले यामधील जिमखोड्याची खिंड तर मागे उजव्या हाताला तैलबैला, त्यामधील भैरोबाचे खिंडीतील मंदिर ही दिसत होते. खिंडीत काही लोकं होती त्यांचा आवाज ही स्पष्ट ऐकू येत होता. थोड उजव डाव चाचपडून झाडीतून वाट नाळेत शिरली. सुरुवातीला ही झाडी भरली नाळ पाहून मला ‘पालीचा धोंड’ हीच वाट आठवली.
घड्याळात पाहिलं तर साडेतीन झाले होते. मनाला तयार केले होते आता शरीरावर जबरदस्ती करत नाळ उतरायला घेतली. दहा मिनिटात झाडीच्या टप्प्यातून बाहेर येत बऱ्यापैकी रुंद नाळेतून उतराई. दोन्ही बाजूला समांतर उंच कडे त्यात उजव्या कड्याखाली मोठ मोठे मधमाश्यांचे पोळं, पटकन सावधपणे त्या टप्प्यातून सटकलो.
पाण्याचं नियोजन महत्वाचं त्यानुसार जेव्हा थांबत असू तेव्हा प्रत्येकी दोन दोन घोट पाणी असं करून पाणी पुरवायच होतं. नाळ दक्षिणेला असल्यामुळे आता सूर्य प्रकाश थेट नव्हता पण आधी दिवसभराच्या उन्हामुळे नाळेतील दगड धोंडे प्रचंड तापलेले. हाताला चटके जाणवत होते तसेच ती उष्णता परावर्तित होत प्रचंड उष्मा आणि जोडीला घामाच्या धारा. आधीच शरीरातले पाणी कमी झाले होते त्यात या गरम दमट वातावरणात आणखीनच हाल झाले. नाळ उतरताना पदोपदी घशाला कोरड पडत होती कमी पाण्यात कसतरी निभावून स्वतः ला तसेच एकमेकांना पुढे ढकलत होतो. एके ठिकाणी अगदीच असह्य झाले, एकेकाला क्रॅम्प यायला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रेक वाढले. परिणीती ताक संपून फक्त दीड लिटर पाणी शिल्लक. त्यात खाली नदी पात्रात जिथे सकाळी अंघोळ करायची असे ठरले होते किमान तिथं पर्यंत तरी मजल मारायची होती. त्यासाठी ही नाळ पूर्ण उतरून पुढे घोडजीनचा ? ओढा पार करून सुधागड लगतच्या वाटेवर पोहचायचे होते तो पल्ला आठवूनच अंगावर काटा आला. जर त्या आधीच पाणी संपले तर, जर चुकून वाट भरकटलो किंवा चुकलो तर ? या विचाराने डोकं जड होऊ लागले.
खरंतर भोरप्या नाळ ही अगदीच व्यवस्थित कुठेही तीव्र उतरण नाही महत्वाचे म्हणजे बऱ्यापैकी रुंद आणि वाटेत झाडीचे गचपण नाही. जे सकाळी अनुभवले त्याच्या एकदम विरुद्ध, हीच बाजू आमच्यासाठी सकारात्मक होती. किती राहिले किती उतरलो हे फारसं डोक्यात न आणता पावलं टाकत पुढे सरकत होतो. मध्ये एके ठिकाणी घोघोऽऽ घोघोऽऽ आवाज आला म्हटलं माश्या उठल्या की काय, हे कुठले आणखी नवीन संकट ? नाळेत आजुबाजुला पाहिले तर माश्या कुठेच दिसत नव्हत्या आणि सुरुवातीला पाहिलेलं पोळं बरेच मागे पडले होते. थोड अंतर गेल्यावर वाटेत एका झाडाला चक्क पाण्याची बाटली टांगलेली दिसली ती सुद्धा अर्धी भरलेली.
या रानात अर्धवट वाटेत कोण बरे आले असेल ! आधी वास घेऊन खात्री करून आम्ही तिघांनी त्या बाटलीतले एक एक घोट पाणी पिऊन घेऊन उरलेले पाणी तसेच राहू दिले, न जाणो कुणी असेल आपल्या सारखेच जसे आपल्याला उपयोगी आले तसे त्यालाही उपयोगी पडेल.
नाळेत शिरताना कड्यावरून डावीकडे नाळेला बाहेरच्या बाजूला चिकटलेला एक सुळका दिसतो. साधारण नाळेच्या निम्म्या उंचीवर तो सुळका असेल आता हा सुळका आम्हाला जवळच भासत होता.
444_0.JPG
थोडक्यात अर्धी किंवा त्याहून अधिक उतराई झाली होती हा विचार सुद्धा त्यावेळी खूपच सुखावून गेला. थोड उतरणे आणि क्रॅम्प जाणवल्यावर थांबून कोरड पडलेल्या घशात घोट भर पाणी पुरवून पिणे. खरतर तिघांची अवस्था सारखीच त्यामुळे तिघेही शांत होतो. अगदी असेही वाटून गेले मस्त तैलबैलात राहिलो असतो घरी फोन करून सांगितले असते. उगाच जीवाचे हाल करतोय आपण. पण नाही ! पुन्हा शांत चित्ताने विचार करून असा विचार धुडकावून लावला.
आता पर्यंत शांततेत जो काही निर्णय आम्ही घेतला तो आमच्या अनुभवावर, आप आपसातल्या ट्युनिंग वर तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः वर आणि एक दुसऱ्यांवर असलेल्या भरवश्यावर. त्यामुळे जिद्द चिकाटी संयम कुणाचाही ढळला नाही. तसेही ट्रेक मध्ये सर्वच गोष्टी मनासारख्या दरवेळी घडतीलच असे नाही. अशा वेळी आपणच स्वतः ला सिद्ध करतो. स्वतः ला पुरेपूर ओळखून एका मर्यादेत केलेले साहस फार वेगळी आनंददायी अनुभूती देऊन जाते हे काही वेगळं सांगायला नको आणि हीच तर या खेळाची, आमच्या छंदाची खरी गंमत आहे. वाटेत एका टप्प्यात काही ठिकाणी फांद्या छाटलेल्या, काही जुने कपडे, रिकामी बाटली, काडीपेटीचे खोके, थोड पुढे चूल पेटवल्याच्या खुणा बहुधा गावकरी लाकडं तोडायला किंवा शिकारीसाठी येत असावेत. जसं जसे उतरत होतो तसा नाळेचा उतार सौम्य होत रुंदी वाढत गेली. मला तरी ही नाळ फारच आवडून गेली. मध्ये एका टप्प्यात पाणी दिसले जवळ जाऊन पाहिल्यावर निराशाच झाली, पाणी पूर्ण गढूळ त्यात काही किडे, कोळी मरून पडले होते. आमच्या साठ्यात पिण्यासाठी जेमतेम अर्ध्या लिटर पेक्षा थोडे अधिक पाणी होते. जरी हे पाणी पिण्यालायक नसले तरी ग्लासात भरून चेहऱ्यावर मानेवर कानावर मारून शरीराचे तापमान कमी केले. तसे केल्याने खूपच फरक पडला बऱ्याच वेळ पाणी मारत तसेच बसून राहिलो. डावीकडचा तो सुळका आता बराच उंच वाटत होता त्यानुसार आमची नाळेतली उतराई अंतिम टप्प्यात आली होती पुढे जात आणखी एके ठिकाणी तसेच पाणी. थोडे उतरत वाट मोकळ्या सपाट कातळावर बाहेर आली.
इथून जंगलाच्या कडेने वाट उजवीकडे ठाकूरवाडीच्या दिशेने गेलेली. कातळाच्या दोन्ही छोट्या डोहात पाणी होते. बारकाईने पाहिल्यावर डावीकडून एक बारीक वाहती धार त्या ओढ्यात जात होती. थोड वर गेलो तर तिथं एक खळगं स्वच्छ पाण्याने भरलेले, तळाशी माती होती पण पाणी नितळ स्वच्छ अधून मधून माश्या फुलपाखरे त्यावर येत. अशा वेळी ते पाणी पाहून जो दिलासा मिळाला तो शब्दात मांडणे कठीण.
पाणी न ढवळत सावकाशपणे ग्लासाने अर्ध अर्ध करून दीड लिटर ची बाटली सुनील आणि खरे साहेबांनी पद्धशीरपणे भरली. मनसोक्त पाणी पिऊन पुन्हा भरून घेतली. ही जागा फार सुंदर, नाळेतला हा ओढा पलीकडे दीड दोनशे फूट खाली नदी पात्रात झोकून देत होता. पावसाळ्यात याचे रूप नक्कीच महाकाय असणार. समोर जिमखोड्याची खिंड, केवणीचे पठार, वर डावीकडे मारठाण्याचा डोंगर, खाली नदीकाठचे जंगल आणि सायंकाळचा वाहणारा सौम्य वारा खरंच खूपच सकारात्मक बदल जाणवला. तुमच्याकडचे रिसोर्सेस, वापरायची पद्धत, आणि प्रतिकूल परिस्थिती हा एक चांगला धडा मिळाला. शहरातली पाण्याची नासाडी उदमात चंगळवाद हे पाहिल्यावर चीड येते. आपण फक्त नावाला म्हणतो ‘जल है तो कल है’ पण काही वर्षात खरच अशी भीषण परिस्थिती आली तर !
निघते वेळी पुन्हा पाणी भरून घेत असताना नाळेतून दोघं कातकरी येताना दिसले, त्यापैकी माणसाच्या हातात आम्ही वाटेत झाडाला लटकवलेली पाहिलेली पाण्याची बाटली होती. त्यांना पाहून सुनील पटकन बोलून पडला, ‘सकाळ पासून संध्याकाळ झाली आता कुठं माणसं दिसली’. राम राम शाम शाम झाल्यावर समजले त्याचे नाव कोंडीराम. तो आणि त्याची बायको दोघे ठाकूरवाडीतून नाळेत खेकडे पकडायला गेले होते. त्यांना बाटलीचा किस्सा सांगितला ते हसायला लागले. कोंडीरामच्या सांगण्यानुसार या छोट्या खळग्यातले पाणी फारतर एप्रिल अखेर पर्यंत राहते पुढे मात्र खाली नदी पात्रात पाणी मिळू शकते. कोंडीरामची खेकड्याची पिशवी पूर्ण भरलेली त्यांचा रविवार चांगलाच सार्थकी लागला होता. घोटभर पाणी पिऊन ते झराझर पावले टाकत पुढे निघाले, आम्हीही वेळेचे भान राखत चालू पडलो.
माथ्यापासून पूर्ण नाळ उतरायला आम्हाला दोन तास लागले. खेकड्याची पिशवी पाहून मला वाटेतल्या आवाजाचा संदर्भ लागला, मागे कोकणदांडच्या ट्रेकच्या वेळी दाते नानांनी अश्याच घोघोऽऽ घोघोऽऽ आवाज बद्दल सांगितले होते.
गावकरी नाळेतले डोहातले बिळातले खेकडे पकडण्यासाठी विचित्र आवाज काढतात. तेव्हाही असाच आवाज ऐकला होता. थोडक्यात मघाशी तो आवाज माश्यांचा नसून यांनीच काढलेला असू शकतो.
वाट नदीला डावीकडे ठेवत वळसा घेऊन खालच्या टप्प्यात आली या वाटेवर ही बरेच रान जाळलेले काही ठिकाणी तर पेटते निखारे अजूनही होते. तसेच पुढे जात अजुन खाली उतरत सकाळी ज्या नाळेतून सुरुवात केली त्या ओढ्यात आलो. इथं पर्यंत आमचे आजचे वर्तुळ पूर्ण झाले तर. ओढा पार करून आलो तसेच ठाकूरवाडीच्या वाटेला लागलो. डावीकडे नंतर सकाळी जी जागा अंघोळीसाठी हेरून ठेवली होती तिथे आलो पण प्रचंड दमलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यात वेळेचं बंधन यामुळे फक्त तोंडावर पाणी मारून निघालो. सुधागड आता आमच्या उजवीकडे होता, टकमक टोक मागेपडून सुधागडचा वाटेवरचा जिना स्पष्ट दिसला त्यामागे होते ते मावळतीचे रंग त्याच्या छटा नदी पलीकडच्या केवणीच्या पठारावर चांगल्याच उठून दिसत होत्या. कातरवेळी खडकावर पाठ टेकून खाली नदी पात्रातला धनगर पाडा, अंधारात गुडूप होत जाणारी केवणी आणि सुधागड या मधली दरी. सारं शांतपणे अनुभवत पडून राहिलो, मला तर ट्रेक मधली ही कातरवेळ खूपच आवडते. असो..
आठच्या सुमारास कुत्र्यांचं भुंकणे ऐकत ठाकूरवाडीत दाखल झालो. मामांच्या अंगणात लोटाभर पाणी प्रत्येकानं रिकामे केले. मामा जेवणाचा आग्रह करत होते नम्रपणे नकार देऊन कोरा चहा घेतला. मग कथा कथन ऐकून मामा पण हैराण झाले, आमचे फोटो पाहून स्वत: हून म्हणाले अरे तुमच्या सोबत यायला हवं होतं. आम्ही म्हणालो असू द्या मामा त्या निमित्तानं एक वेगळा मोठा अनुभव मिळाला. ‘घोडजीन’ काय ‘उडीदकणा’ काय ! थोडीच पळून जात आहेत. पुन्हा लवकरच भेटण्याचा वादा करून मामांकडून निरोपाची विडी घेऊन परतीच्या वाटेला लागलो.

अधिक फोटोसाठी ही लिन्क : https://ahireyogesh.blogspot.com/2018/05/bhorpya.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःवरचा विश्वास आणि घेतलेल्या निर्णयावर न कंटाळता , आणि भरकटवणार्या विचारांनी विचलित न होता ठाम राहून मार्ग कापत रहाणे हा , भटकंतीच्या यशाचा पाया असतो.
थोडीशी अनिश्चितता , आणि त्या अनुशंगाने येणारे अनामिक भय हे अशा भटकंतीची विस्मयकारकता वाढवत असतात. एक प्रकारचा यशाचा उन्माद देत असतात.

खूप छान वर्णन. वाचकालाही पूर्ण रपेटीचा धावता अनुभव घेता येतो आहे !!!

झकासच
अशा अनेक अनवट वाटा पायाखालून जावो ही शुभेच्छा.