भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
२९ नोव्हेंबर २०१७ ची थंड सकाळ आणि हिमालयाच्या कुशीत वसलेलं सद्गड गांव! रात्री थंडी खूप होती. रात्री एकदा जाग आली तेव्हा चांगलीच थंडी होती. घर अगदी डोंगरात आणि रानाच्या जवळ वसलेलं आहे. इथले लोक सांगतात की, रात्री वन्य प्राणी इथे फिरतात. त्यांनी शेताला नुकसान पोहचवू नये म्हणून लोक शेतात इलेक्ट्रिक ताराही बसवतात. हिमालयात अनेक ठिकाणी घरातले पाळीव प्राणी- कुत्रा, म्हैस इ. वाघाने उचलून नेणं नेहमीची गोष्ट आहे... सकाळीही मस्त थंडी आहे. हात धुण्यासाठीसुद्धा गरम पाणी वापरावं लागत आहे. ह्या दिवसांमध्ये इथे आंघोळ 'कंपल्सरी' नसते! सकाळच्या थंडीत ऊनात बसून चहाचा आस्वाद घेणं, हाही एक मस्त अनुभव आहे!
रात्री मस्त झोप झाली आणि माझ्या हातांत फार कमी दिवस आहेत. त्यामुळे आज फिरायचं आहे. माझ्या नातेवाईकांकडून थोडी माहिती घेतली की कुठे फिरायला जाऊशकेन. तेव्हा कळालं की, जवळच एक मंदीर आहे- धज मंदीर. इथून डोंगरातला त्याचा कळससुद्धा दिसतो आहे. माझ्या बायकोच्या बहिणीचे पती- नवीनजी त्यांना विचारलं. नंतर तेही तिथे माझ्यासोबत फिरायला यायला तयार झाले. समोरच्या डोंगरावर दिसणारं मंदीर- इथून नक्कीच तीन- चार किलोमीटर दूर असेल आणि पायवाट चढाची असेल. आमच्या दोघांसोबत नवीनजींचा दोन वर्षांचा मुलगा आयुषही यायला तयार झाला. माझ्यासाठी हा एक मस्त ट्रेक असेल! भरपूर चालायचं आहे, त्यामुळे मी स्वेटर न घेता निघत होतो, तेव्हा लोकांनी मला स्वेटर ठेव म्हणून सांगितलं. म्हणाले की, चालतानाही थंडी वाजेल आणि मध्ये घनदाट झाडी असल्यामुळे ऊनही नसेल. त्यामुळे स्वेटर सोबत ठेवलं व नंतर ते फार उपयोगी पडलं.
सद्गड गावातून आणखी दोन- तीनच घरं वर आहेत. निघाल्यावर गवताचे भारे नेणा-या महिला दिसल्या. गावात सगळेच एकमेकांचे परिचित असतात, त्यामुळे नवीनजी त्यांच्याशी बोलले. इथे एक छोटं मंदीरही आहे. इथे अनेक पायवाटा होत्या. त्यातील एक वाट पुढे मंदीराकडे घेऊन जाईल. हळु हळु गांव मागे पडत गेलं आणि वर चढताना पूर्ण गांव दिसत गेलं. आणखी वर चढल्यावर खाली दूरवरून येणारा रस्ताही दिसला. पायवाट काहीशी दगडांनी बांधलेली आहे. धज मंदीर- स्थानिक लोक धज म्हणतात- हे ध्वज मंदीर स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचं आहे. इथे अनेक उत्सव होतात. त्यामुळे पायवाटेवरची 'पगडंडी' चांगली आहे. वर चढताना हळु हळु दूरवरचे हिम शिखर दिसत आहेत! वा! मध्ये एका जागी आरामासाठी बसण्याची सोयही केलेली आहे. जवळ जवळ अर्धं अंतर पार केल्यानंतर पायवाट आणखी कच्ची झाली. आता फक्त मातीची पायवाट आहे. चढ चालूच आहे, पण पायी जाण्यात काहीच अडचण नाही. मध्ये मध्ये किंचित दरीचं एक्स्पोजर आहे, पण तेही नवख्यासाठी. हां, एक नक्की की हाच ट्रेक पावसाळ्यात मात्र खूप कठीण होत असणार. कारण हा सगळा मातीचा रस्ता आहे व इथे पावसामध्ये चालणं बिकट होणार. असो.
मध्ये मध्ये थांबत व फोटो घेत जात राहिलो. नजारे अद्भुत आहेत! अगदी दाट झाडीमधून ही पायवाट जाते. मध्ये मध्ये दिसणारे हिम शिखरांचे नजारे! दूरवरच्या गावांच्या वस्तीच्या खुणा व खालचे काही रस्तेही दिसतात. वर दोन मंदीर आहेत. काही साधूही आहेत. इथे मंदीराकडे हायवेवरून येणारी दुसरी पण एक पगडंडी दिसली. सगळ्या मंदीरात थोडा वेळ फिरलो. इतकं चालूनही आता थंडी वाजते आहे. इथली उंची चांगली असणार. जानेवारीमध्ये बर्फ पडतो. अर्थात् जानेवारीत सद्गडच नाही तर पिथौरागढ़ गावातही बर्फ पडतो.
सगळ्यावर वर असलेल्या मंदीरापासून सगळीकडे अतिसुंदर नजारे दिसत आहेत! नवीनजींनी सांगितलं की, इथून अलमोडाही दिसतं! मुख्य ध्वज मंदीरात घंटा वाजवली. नवीनजी म्हणाले की, ती खाली पूर्ण गावात ऐकू जाते. इथे मोठी यात्रा भरते. त्यामुळे काही खोल्या आहेत. थोडी जागा मुक्कामासाठी आहे. पण हॉटेल व इतर सोयी काही नाहीत. सोबत आणलेली केळी व चिक्की खाल्ली. आता दुपार झाली आहे आणि ढग येत आहेत. लवकरच परत निघालो. उतरताना किंचित कठीण जाईल, कारण काही ठिकाणी पायवाट बरीच कच्ची आहे. पण लवकरच उतरत गेलो आणि हळु हळु जमीन जवळ येत गेली. मी ह्यापेक्षा कठीण असे ट्रेक आधी केल्यामुळे माझ्यासाठी हा ट्रेक एकदमच सोपा पण सुंदर ट्रेक झाला! आणि माझ्या सायकलिंग व रनिंगमुळे थकवा अजिबात आला नाही. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत परत आलो. घर जवळ आलं तसं मुलीला हाक मारली व तीही माझ्या नावाने ओरडत बाहेर आली! पोहचल्यावर जीपीएसवर बघितलं तेव्हा कळालं की, सद्गडची उंची १८०० मीटरहून जास्त आहे व हे मंदीर सुमारे २४०० मीटर उंचीवर आहे. सुमारे पाच किलोमीटरचा हा मस्त ट्रेक झाला.
सद्गडचे स्थान आणि खाली पिथौरागढ़- धारचुला रस्ता
दुपारी थोडा आराम केला. संध्याकाळी गावात फिरणं झालं. सगळं गांव डोंगर चढावर वसलेलं आहे त्यामुळे पायवाट चढते व उतरते. चढावरच वसलेली छोटी घरं आणि शेतं! आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे इथले साधे सरळ लोक! जे खरोखर हिमालयाच्या कुशीत राहतात! आजचा दिवस मस्त जातोय. लवकरच रात्र होईल. थंड व रम्य हवा आणि चहाचा आस्वाद घेणं सुरू राहिलं आणि हळु हळु दिवस संपत गेला. वा!
क्रमश:
पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
अशा अनवट जागी जायला मिळणं हे
अशा अनवट जागी जायला मिळणं हे भाग्यच!
धन्यवाद! हो, भाग्यच!
धन्यवाद! हो, भाग्यच!
मस्त आहे ओळख. हर्पेन म्हणतो
मस्त आहे ओळख. हर्पेन म्हणतो तसे भाग्यवानच आहात तुम्ही.
४थ्या भागाची लिंक गंडली आहे. ती दुरूस्त करा.
काय भारी आहे हे! विशेषतः
काय भारी आहे हे! विशेषतः पहिला फोटो!
धन्यवाद!!
धन्यवाद!!
लिंक दुरुस्त केली आहे.