उंबरा दमदम्या गायदरा आणि जाखमाता
बहुतेक गेल्या वर्षी आमचे सह्यमित्र ‘दिलीप वाटवे’ यांचे उंबरा घाटाचे फोटो पाहिले. मग फोनवर त्यांच्याशी उंबरा घाटाबद्दृल बरीच चर्चा, अगदी तेव्हा पासून भीमाशंकर सिद्धगड भागातला हा घाट करायचे हे मनात होते. मागे त्यानुसार दारा घाटासोबत याला जोडायचे या तयारीनिशी निघालो सुद्धा पण त्या वेळी काही जमून आले नाही. नंतर याच उंबरा बद्दल एक घटना संवेदनशील मनाला चटका लावून गेली.
मग जावं की नाही, हो नाही हो करत शेवटी शनिवारी पहाटे साडेचार वाजता बुलेटला किक मारुन घरातून निघालो, वाटेत ठरलेल्या ठिकाणी ‘जितेंद्र खरे’ यांना घेऊन पावणे सहाच्या सुमारास म्हसा येथे पोहोचलो. बरोब्बर सहा वाजता तिथेच बदलापुरहून ‘सुनिल चव्हाण’ आम्हाला जॉईन झाला. चहासाठी पंधरा वीस मिनिटे तिथेच टाईम पास केला तरी एकही टपरी किंवा हॉटेल उघडले नाही. तसेच जांबुर्डेहून पुढे कच्च्या रस्त्याने बोरवाडीत आलो तेव्हा नुकतेच उजाडले होते. रघुनाथ मामांच्या अंगणात दोन्ही गाड्या लावल्या. सुनील नुकताच पंधरा दिवसांपूर्वी बोरवाडी मार्गे सिध्दगड जाऊन आला होता त्यामुळे रघुनाथ मामांसोबत परिचय होताच. आरामात चहापाणी करून साडेसात वाजता निघालो. जांबुर्डे ते बोरवाडी अंतर ५ किमी तसेच बोरवाडी ते हुतात्मा भाई कोतवाल स्मारक तीन साडेतीन किमी पुर्ण कच्चा रस्ता पण जीप गाडी व बाईक जाऊ शकतील असा. याच स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्या जवळून उंबरा घाटाची चढाई सुरु होते. या आधी दहा बारा वर्षांपूर्वी ‘नारायण अंकल’ सोबत कैक वेळा पावसाळ्यात या धबधब्याच्या परिसरात येणे होत असे, खरंतर त्यावेळी एकदा असेच धबधब्याच्या वरच्या बाजूला फिरत असताना तेव्हा एका गाववाल्याने इथून एक वाट वर घाटाने भट्टीच्या रानात जाते असे सांगितले होते. बघू करूया नंतर, पण जसे हुल्लडबाज दारू पिऊन धिंगाणा घालणारे वाढू लागले तसे आम्ही या भागात जाणे कमी केले.
सिध्दगड डाव्या हाताला ठेवत अगदी विरळ झाडीच्या जंगलातून कच्चा रस्ता, त्यात सकाळचा हवेतला गारवा आणि जोडीला विविध पक्ष्यांचे आवाज. आरामात पाऊण तासात, हुतात्मा ‘भाई कोतवाल’ आणि ‘हिराजी गोमाजी पाटील’ स्मारकाजवळ आलो.
याच ठिकाणी या क्रांतीकारकांना इंग्रजांनी २ जानेवारी १९४३ रोजी गोळ्या घालून ठार मारले.
उजवीकडून चढाई करत धबधब्याच्या वरच्या टप्प्यात पाहिलं तर इथल्या डोहात थोडेफार पाणी, अर्थातच तोंड धुण्यासाठी उपयोगी. तसेच पुन्हा उजवीकडे चढत झाडीभरल्या सोंडेवर आलो, थोडं अंतर जातो तोच उजवीकडून मोहपाडा, भोमळवाडीकडील मळलेली वाट येऊन मिळाली.
या भागात कोसमीची लाल पानांची झाडे भरपूर प्रमाणात. छोटा कातळ टप्पा पार करून वाट उजवीकडे वळाली. समोर आला तो तीस चाळीस फुटांचा तीव्र चढणीचा मुरूमाचा टप्पा थोडक्यात फुल्ल स्क्री पण त्यावर चक्क पावठ्या सारखं खाचा पाडून सोपं केले होते.
तसेच उजवीकडे तिरकी चढाई करत छोटा ट्रेव्हर्स मारुन नाळेतला अगदी सोपा पॅच पार करुन पदरात आलो. मागे वळून पाहिले तर दूरवर आम्ही आलो तो कच्चा रस्ता खाली स्मारक जवळील मोठा धबधबा तर दक्षिणेला मुख्य रांग दारा घाटापासून भीमाशंकरकडे झेपावलेली. खाली अलीकडे मोहपाडा भोमळवाडी तर दूरवर पुसटसा तुंगी. पदरातून डावीकडची वाट फिरून जाखमाता मार्गे सिध्दगडमाचीत जाते. आम्ही दिशेप्रमाणे आडवी उजवीकडील वाट धरली. थोडं अंतर जात नाही तर डावीकडे चक्क गवा चरताना दिसला. सुरुवातीला पहिल्या नजरेत वाटलं मोठा रेडा असेल. पण नीट निरखून पाहिले तर गवाच होता. आमची हालचाल जाणवतात तो झाडीत शिरला. सारं काही मिनिटाच्या आत घडले त्यामुळे फोटो काढायचे ही सुचलं नाही. तसं तो आत शिरल्यावर प्रयत्न केला पण काही जमलं नाही. एकटा होता म्हणून बरे जर कळप राहीला असता तर आमच्या कपाळात गेल्या असत्या ! खरंतर कोयना महाबळेश्वर भागात गवे दिसणं ही मोठी गोष्ट मुळीच नाही पण मुरबाड सिध्दगड या भागात हा गवा कसा आला याचे आश्र्चर्य वाटले. पुढची चाल जरा अधिक सावध न जाणो आणखी काही सामोरे येईल. दहा मिनिटात एका मोठ्या ओढया जवळ नाश्ता करायला थांबलो.
जितेंद्र यांनी घरून तयार करून आणलेले ऑनियन उत्तपाचा दमदार नाश्ता करून जवळपास अर्धा तास विश्रांती घेतली.ओढा पार करून वाट चढणीला लागली. सुरुवातीला पानगळ झाल्यामुळे चालताना नुसता करकर करकर आवाज. थोड वर जात वाट उजवीकडे वळाली आता सुरू झाली पदरातली आडवी चाल. या भागातले जंगल तर वेड लावणारं. भीमाशंकर अभयारण्य मध्ये उत्तरेकडचा सिद्धगड भागातला हा निम सदाहरित जंगलाचा टप्पा. मोठ मोठी झाडे त्यांची उंची, त्यांचे खोड आणि बुंधे. उंची जास्त असल्यामुळे भर दिवसा सूर्य प्रकाश तसा कमीच. त्यात काही ठिकाणी मोठे प्रस्तर आणि शिळा. इथेही वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज त्यात शेकरुचे दर्शन झाले. शेकरू या टप्प्यात आहुपे दुर्ग पर्यंत भरपूर प्रमाणात आढळतात. वीस पंचवीस मिनिटानंतर जंगलातच एक ओढा पार करून वाट वर जात उजवीकडे वळाली. पुढच्या दहा मिनिटात त्या पदरातल्या जंगलातून वाट बाहेर आली. आता इथून पुढचा मार्ग पूर्ण कातळकड्यातून, खडी चढण असलेला अगदी दारा घाटाची झलक. अंदाजे चार एकशे मीटरचा पल्ला बाकी होता. पहिला ट्रेव्हर्स. पलीकडे जात ढासळलेल्या दगडी धोंडा वरुन चढाई. जसे वर जात होतो तसे डावीकडे मोठ्या घळी तर उजवीकडे दारा घाटाच्या दिशेत असलेले सरळसोट कडे फारच भेदक दिसत होते.
साठ सत्तर अंशात कातळात कधी तिरकी तर कधी आडवी तर कधी चक्क छातीवर येणारी वाट अगदी व्यवस्थित टप्प्या टप्प्यात वर घेऊन जाते. ट्रेव्हर्स मारुन मोठ्या ओढ्याजवळ वाट आली. याच ओढ्याच्या वरच्या बाजूला छोटी नैसर्गिक गुहा. आत जाऊन विसावलो. पावसाळ्यात आत बसून, समोर वरून येणारे पाणी पडताना दिसणारं दृश्य काय असेल ! या साठी खास पावसाळा सरतेशेवटी यावे लागणारच. गुहेच्या जवळचा छोटा कातळ टप्पा तो पार करुन ट्रेव्हर्स मारुन पुढच्या कातळात पावठ्या खोदलेल्या. दिसायला अवघड पण प्रत्यक्षात सोपे कातळ टप्पे, पुरेपूर चढाईची मजा घेत घाटाच्या तोंडाशी पोहोचलो.
खाली बोलताना कुणाचा तरी आवाज आला, नीट पाहिलं तर दोन आजोबा आणि एक आजी मस्तपैकी घाट चढून येत होते.
आम्ही शेवटचा सोपा कातळ टप्पा चढून तिथेच जरा वेळ बसून राहिलो. पाच मिनिटांत ते तिघेही वर आले. नेहमी प्रमाणे राम राम शाम शाम. आजीचे वय ७०+ आणि ते दोन आजोबा आजीचे सख्खे भाऊ दोघेही ६५+ वयाने.
आजीचे माहेर बोरवाडी. दोघे भाऊ, बहिणीला तिच्या घरी कोंढवळला सोडायला जात होते. तिथून पुढे भीमाशंकर जाऊन आजच सायंकाळ पर्यंत याच उंबरा घाटाने ते दोघे परतणार होते. काय भारी ना ! घड्याळात पाहिलं तर साडेअकरा होऊन गेले होते. तिघेही आमचा निरोप घेऊन कोंढवळच्या दिशेने निघाले. आम्ही मात्र आणखी पंधरा मिनिटे आराम करून मचाण जवळच्या पाणवठ्यावर आलो.
दोन्ही तळी फारशी स्वच्छ नव्हती, इथल्या पठारावर, भट्टीच्या रानात असलेल्या जनावरांचा हक्काचा पाणवठा. इथूनच पुढे उजवीकडे थोडं अंतर गेल्यावर आहुपे कडून येणारी मोठी वाट भेटते, त्याच वाटेने दीड एक तासात गवांदे वाडी - कोंढवळ तसेच पुढे भीमाशंकर जाता येते. आम्ही उत्तरेकडे गायदरा घाटाच्या वाटेला लागलो. चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या टेकड्या, अधेमध्ये मोकळं रान आणि व्यवस्थित मळलेली पायवाट. वाटेत एक दोन ठिकाणी कोंढवळकडे जाणारे गावकरी भेटले. पंधरा मिनिटांच्या अंतरावर मुख्य वाट सोडून डावीकडे जंगलात जाणारी वाट घेतली जेमतेम पाच पन्नास पावलावर या भागात बारामाही पिण्यायोग्य असणारे ‘वाकीचे पाणी’.
इथून पुढे गायदरा घाट उतरून सिध्दगडमाची पर्यंत या दिवसात कुठेही पाणी मिळणार नाही हे माहित होतं. तसंही सुर्य डोक्यावर आला होता वेळ पाहिली तर सव्वाबारा वाजले होते. त्यानुसार वाकीच्या पाण्याजवळच घरातून आणलेले दुपारचं जेवण उरकून घेतले. गर्द हिरव्या झाडांच्या सावलीत बरेच गार वाटत होते. विविध पक्ष्यांचे आवाज, त्यात बाजूला वेगवेगळे फुलपाखरे.
एक असाच प्रयत्न. ‘ब्लू ओक लिफ’.
दिड तासाचा मोठा ब्रेक घेऊन, इथला ग्रीन ऑक्सिजन अंगात पुरेपूर भरून निघालो अगदी निवांत कुठे ही घाई गडबड नाही. वाकीचे पाणी सोडल्यावर पाच दहा मिनिटात भट्टीच्या रानात शिरलो.
पानगळ सुरू असूनही मोठमोठ्या घनदाट झाडी मुळे फारच प्रसन्न वाटत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवसात भर उन्हातही या भागात असलेला गारवा. ऑक्टोबर २००६ मध्ये नारायण अंकल सोबत केलेला सिध्दगड- गायदरा- कोंढवळ- भीमाशंकर हा ट्रेक आठवला. त्यावेळी पाऊस पडून गेल्यावरही जमा झालेले धुकं त्यात या रानात जिथे तिथे गडद हिरव्या आणि निळ्या रंगाची छटा तसेच पठारावर सोनकी आणि विविध प्रकारच्या फुलांची रैलचैल. तेव्हाच खरंतर या भट्टीच्या रानावर फिदा झालो होतो.
आता ही वेगळी अनुभूती घेत, मी तरी आरामात रेंगाळत पावलं टाकत होतो. दुसरं म्हणजे बरेच फोटो काढले, कसे ही उभा आडवा वाकडा तिकडा कॅमेरा फिरवा या जंगलात फोटो चांगलेच येणार. शेवटची सौम्य चढण संपवून वाट रानाच्या बाहेर आली. डावीकडे दमदम्याचा डोंगर, समोर गायदरा घाटाची वाट तर वायव्येला मुख्य रांगेवर येतोबाचे मंदिर नजरेस पडले. दिशेनुसार घाटाची मुख्य वाट सोडून डावीकडील मोकळवनातून दमदम्याकडे निघालो. बारीक पण बर्यापैकी स्पष्ट वाट. डोंगराच्या थोडं जवळ जात डावीकडे फिरलो. थोडक्यात डोंगर उजव्या हाताला ठेवून वळसा घालून, एका छोट्या ओढ्याच्या उजवीकडून भुसभुशीत माती तर पुढे कारवीतून वाट काढत मुख्य धारेवर आलो. थोडं अंतर गेल्यावर खाली दरीत सिध्दगड दिसला. डोळे बारीक केल्यावर सिध्दगडमाची तिथली काही मोजकीच घरं, नारमातेचे मंदिर तर धारेला चिकटून असलेला राजा सुळका. खाली आम्ही सकाळी आलो तो बोरवाडी कोतवाल स्मारक कच्चा रस्ता. त्या पलीकडे बळीवरा, मोहपाडा, भोमळवाडी, नांदगाव तर दक्षिणेकडे दारा घाटापासून भीमाशंकर पदरगड ते तुंगी पर्यंत. हवा स्वच्छ नव्हती नाहीतर कदाचित मलंगगड माथेरान रांग ही दिसू शकते. तीन हजारहुन अधिक उंचीच्या सिध्दगडापेक्षा थोडी अधिक उंची दमदम्याला लाभली आहे.
त्यामुळे खालच्या पातळीवर दिसणारा सिध्दगड इथून बघणं हा एक वेगळाच अनुभव. याच भौगोलिक स्थानाचा फायदा घेत इंग्रजांनी इथून सिध्दगडावर तोफेने मारा केला होता. कितीही थांबलो तरी मन भरत नाही, पुन्हा यायचं असं ठरवून, आल्यावाटेने उतरलो. वाटेतले मोकळवन पार करुन डावीकडे झाडीत शिरल्यावर एसीत आल्यासारखे वाटले. दहा मिनिटात तो टप्पा उतरून थेट गायदरा घाटाच्या तोंडाशी पोहोचलो.
झाडाखाली सावलीत पुन्हा मोठा ब्रेक घेऊन गायदरा घाटाची घळ उतरायला सुरुवात केली. मोठं मोठे दगड धोंडे त्यातूनच थोडं खाली आल्यावर वाट उजवीकडे वळाली. मुख्य घळीतला ओढा डावीकडे ठेवून व्यवस्थित रचलेली वाट नागमोडी वळणे घेत उतरू लागली. कुठेही तीव्र उतरणं नाही. साधारणपणे दक्षिण उत्तर उतराई असल्याने उन्हाचा तडाखा जाणवत नाही. फार दाट नसला तरी थोडंफार विरळ का असेना झाडोरा या वाटेवर नक्कीच आहे. त्यात सिध्दगडमाची, उचले, नारीवली, जांभुर्डे या भागातील गावकरी अजूनही या वाटेने कायम ये जा करतात. आम्हालाही बरेच जण या वाटेत भेटले. अगदी निवांत तासाभरात गायदरा घाटाची लयबद्ध वाट उतरून पदरात आलो. या भागात ही असेच दोन टप्प्यांतली चढाई उतराई. त्यानुसार सह्यमाथा ते पदर यातील गायदरा घाटाची उतराई झाली होती.
आता पदरातून उजवीकडील साखरमाचीची वाट सोडून डावीकडे सिध्दगडमाचीच्या दिशेने जाणारी वाट धरली. तसे पाहता साखरमाची आणि सिद्धगडमाची पदरात एकाच पातळीवर वसलेले त्यात २००५ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे बराच भाग खचला. अभयारण्य आणि सुरक्षेचा भाग म्हणून या दोन्ही वाड्या दुसरीकडे विस्थापित होत आहेत. त्यात २०१४ ला माळीण दुर्घटनेच्या वेळी साखरमाचीतून आहुप्यात जाणारी तावली घाटाची वाट मोडली. खुद्द सिध्दगडमाचीत मोजकी चार पाच घरे राबती आहेत. सिद्धगडमाची पर्यंत जाणारी पदरातली थोडेफार जंगल थोड मोकळवण अशी मिश्र स्वरुपाच्या वळणा-वळणांच्या वाटेनं पाऊण एक तासात माथ्याकडून येणा-या ओढ्यांच्या तीन मोठ्या घळीपार करून.
उजवीकडे सामोरा आला तो सिध्दगड त्याखाली झाडीत डोकावले ते नारमाता मंदिर. उजवीकडे खाली नारिवली उचले कडे जाणारी प्रचलित वाट सोडून, दरवाज्यातून थेट नारमाता मंदिरात विसावलो.
सिद्धगडमाची, गडाची सातवाहन काळातील गुहा, बालेकिल्ला आमच्या आजच्या नियोजनात नव्हते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर सोबतचा सुका खाऊ खात बसलो. मंदिरात मोठे भुंगे घूंम घूंम करुन नाका तोंडाजवळून जात लाकडाच्या छिद्रात घुसत, बहुतेक ते त्यांचं घर असावं. अगदी असाच अनुभव मागे ढाकोबाच्या लाकडी मंदिरात आला होता. मंदिराच्या परिसरात नव्याने ठेवलेली बसायला बाकं, व्यवस्थित रचलेल्या पुरातन मूर्ती, शिवलिंग, तोफ, आजूबाजची जोती आणि अनेक प्रकारच्या विरगळ तसेच कोरीव शिल्प. एकदम शांत आणि रमणीय परिसर, थोडाफार काय तो पक्ष्यांचा किलबिलाट पण तोही हवाहवासा वाटणारा. तसे पाहता या आधीही सिद्धगडावर तीन वेळा येणं झाले, पण दरवेळी वेगळीच प्रसन्नता लाभते, काय माहित भीमाशंकर अभयारण्य भागातली जादू काही औरच!
दिवसभराच्या तंगडतोड नंतर मंदिरातून निघावेसे वाटत नव्हते घड्याळात पाहिलं तर पाच वाजत होते. हिशोबाने अजुन पंचवीस टक्के पल्ला बाकी होता. अंदाजे दोन हजाराच्या आसपास असलेल्या सिद्धगडमाचीतून खाली उतरायला प्रचलित मार्ग दोन. पहिली सर्वात सोपी आणि सगळ्यांना सोयीची उचले नारिवलीत उतरणारी नारिवली घाटाची वाट तर दुसरी थोडी अवघड दांड्यावरून खड्या चढाईची बोरवाडीची वाट. या दोन्ही वाटा माहीत होत्या, वेगळी वाट म्हणून आम्ही जाखमाता घाटाने उतरायचे ठरवले. थोडक्यात सिद्धगड आणि लिंगी यांच्या खिंडीतून दक्षिणेकडे उतरणारी वाट. मंदिराकडून गडाला उजव्या हाताला ठेवत सिद्धाची लिंगी आणि गड यामधील खिंडीच्या दिशेने निघालो.
पाच दहा मिनिटांची चढाई करत वर खिंडीत येतो तोच डावीकडे साखरमाचीचा डोंगर सायंकाळच्या उन्हात उजळून निघाला होता.
पुढे वाटेत कोरीव पायऱ्या, गडाच्या या पूर्व भागात वरच्या अंगाला मागे काही वर्षांपूर्वी दारु गोळा सापडला ती गुहा तसेच पूर्वी या खिंडीतून वर जाता येत असे. ठराविक टप्प्यात कातळात खोदलेल्या पायऱ्या सहज दिसतात. खिंडीतून पलीकडे दारा घाटापासून भीमाशंकर पर्यंतचा नजारा तर दमदम्याची मुख्य धार खाली झेपावत राजा सुळक्याशी जोडलेली. शे दीडशे फुटांचा खिंडीतला पहिला टप्पा उतरून वाट उजवीकडे वळाली. थोडं अंतर गेल्यावर जंगलात शिरली वाटेत बहुतेक ठिकाणी व्यवस्थित दगडी रचलेल्या पायर्या.
नागमोडी वळणं घेत उतरतो तोच जाखमाताचे जुणे दगडी मंदिर. मंदिराच्या वाटेवरची कमान आणि पायर्या. दर्शन घेऊन निघालो उजवीकडे काही ठिकाणी तटबंदी ढासळलेली तर डावीकडे कड्यात दोन पाण्याची टाकी. त्यातील एक बुजलेले तर दुसरे स्वच्छ पाण्याने भरलेले. थोड्या फार रिकाम्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या.
डावीकडे पदरात जाणारी वाट सोडून खाली उतरणारी मुख्य वाट धरली. थोडक्यात याच डावीकडच्या आडव्या वाटेने पदरातून चालत उंबरा घाटाच्या वाटेला जाता येते. याच पदरात आम्हाला सकाळी गवा चरताना दिसला. (घरी गेल्यावर सिध्दगडवाडी साखरमाची पुनर्वसन योजना यात मदत व काम करणारा रायताचा माझा मित्र ‘अविनाश हरड’ याच्या सोबत या गवा बद्दल बोललो तर त्याने ही पेपरमध्ये आलेली बातमी पाठवली.
खिंडीतून येणार्या ओढ्याला उजवीकडे ठेवत दगड धोंड्याची वाट वळणं वळणं घेत सावकाश उतरत झाडीच्या टप्प्यातून बाहेर आली.
आता पुढे जंगल एकदम विरळ त्यात पानगळ झालेलं. खालचा कोतवाल स्मारक - बोरवाडी रस्ता दृष्टीक्षेपात. शेवटची छोटी मुरूमाची घसरडी उतरण संपवुन रस्त्यावर आलो. ओढ्याजवळ फोटो आणि मागे आम्ही आलो ती वाट. सकाळी जेवढं बोरवाडी ते हुतात्मा स्मारक चाललो त्याच्या बरोब्बर निम्म अंतर आता इथून बोरवाडी पर्यंत होते. सुर्य मावळत होता त्याच्या मावळतीच्या सोनेरी छटा पाहत चालत चालत रमत गमत निघालो. एका वळणावर मागून कुणीतरी हाका मारत होते, पाहिले तर सकाळी भेटलेले दोन्ही आजोबा त्यांच्या बहिणीला कोंढवळला घरी सोडून, चक्क भीमाशंकरला जाऊन उंबरा घाटाने उतरून आता घरी बोरवाडीत परतत होते.
खरंच काय कमाल आहे या वयातही ते इतके क्रियाशील आणि उत्साही. त्यांच्या सोबत बोलत चालत बोरवाडीत आलो तेव्हा सात वाजून गेलेले. जवळपास बारा तासांचा जंगलातला चढाई उतराईचा सुंदर प्रवास संपला होता. बोरवाडीतून बाईक काढताना सारा दिवस चित्रासारखा डोळयांसमोर, त्याची हिच ऊर्जा पुढचे काही दिवस नक्कीच पुरेल.
अधिक फोटोसाठी ही लिन्क : https://ahireyogesh.blogspot.com/2018/03/umbara-damdmya-gaydara-jakhmata...
योगेश चंद्रकांत आहिरे
वाव! सुंदर!
वाव! सुंदर!
धन्यवाद शाली !
धन्यवाद शाली !
मस्तच
मस्तच
सुन्दर वर्णन...
सुन्दर वर्णन...
धन्यवाद निलुदा आणि सावळ्या
धन्यवाद निलुदा आणि सावळ्या
मस्त !!
मस्त !!
विराग धन्यवाद !
विराग धन्यवाद !
वर्णन मस्त !आणि सगळे फोटो पण
वर्णन मस्त !आणि सगळे फोटो पण
जबरदस्त आहे. आधी मला वाटायचं
जबरदस्त आहे. आधी मला वाटायचं कि पावसाळ्यातच ट्रेक ची मजा आहे पण तुझे लेख वाचून मला पटलं आहे कि उन्हाळी ट्रेक ची मजाच वेगळी आहे.
धन्यवाद अजंली
धन्यवाद अजंली
तुझे लेख वाचून मला पटलं आहे
तुझे लेख वाचून मला पटलं आहे कि उन्हाळी ट्रेक ची मजाच वेगळी आहे. >>> धन्यवाद सुमित.... खरतर उन्हाळ्या त योग्य ती काळजी पुरेशी तयारी आणि थोडा भोगौलिक अभ्यास करून सहज शक्य आहे.