या म्हातारपणात त्याला काय हवे होते? त्याने आपल्या पूर्वायुष्याकडे पहिले तेंव्हा त्याला अपवाद वगळता सर्व सुखच दिसले. साध्या भोळ्या आई वडिलांच्या पोटी जन्म. योग्य वयात लग्न. मनासारखी, जीव लावणारी बायको. सोन्यासारखी मुलं. रानात मोती उपजणारी पोटापुरती जमीन. गावात, भावकीत मान. मुलांनी मनावर घेऊन हट्टाने घडवलेली तीर्थयात्रा. काही बाकी राहिले नाही. पण या सगळ्याला नजर लागू नये म्हणून की काय, देवाने एक बोच त्याच्या मनाला लावून ठेवली होती. त्याचा धाकटा मुलगा. तसा धाकटा कामाला, व्यवहाराला, माणुसकीला कशा कशाला कमी पडायचा नाही. रानात राबायला लागला तर थोरल्याला इरेसरीने मागे टाकायचा. रानात कधी कोणतं पीक घ्यायचे याचा अंदाज कधी चुकला नाही त्याचा. पण होता एकदम एककल्ली. वडील सांगताहेत किंवा भाऊ सांगतोय म्हणून कधी ऐकणार नाही. त्याला पटले तरच एखाद्या कामाला हात घालणार. वडीलांनी परोपरीने समजावून सांगीतले “बाळा, चारचौघांचे ऐकावे लागते कधी कधी. असं मनासारखं वागून नाही पार लागत जिंदगी.” पण धाकटा ठाम होता विचारांवर. एक दिवस म्हातारा रानातून आला तोच ‘अंगात कणकण’ घेऊन. हात पाय धुवून ओसरीवर बसला. थोरल्याच्या बायकोने दिलेल्या चहाला जेंव्हा तो नको म्हणाला तेंव्हाच तिच्या लक्षात आले की ‘आज मामांचं काहीतरी बिनसलय.’ तिने रात्री गरम गरम माडगं दिले म्हाताऱ्याला प्यायला आणि अंथरुन घालून म्हणाली “मामा, पडा आज लवकर. सकाळपर्यंत बरं वाटेल.” सकाळी म्हाताऱ्याला जाग आली तिच ग्लानीमध्ये. त्याने डोळे किलकीले करुन पाहीले. अंथरुनाभोवती दोन्ही सुना आणि थोरला चिंतातुर होवून बसले होते.
त्याने खुनेनेच विचारले “धाकटा कुठं आहे?”
इतक्यात धाकटाही वैद्याला घेवून आला. वैद्यबुवांनी बराच वेळ तपासले. कसलेसे चाटन दिले आणि सकाळी परत येतो सांगुन गेले. म्हाताऱ्याला जाणवले की आता देवघरातला ‘गंगाजलाचा गडू’ फोडायची वेळ आली आहे. तो क्षिणसा हसला आणि दोन्ही मुलांना जवळ बोलावून घेतले.
खोल पण समाधानी आवाजात तो मुलांना म्हणाला “हे पहा पोरांनो, फार ईच्छा होती की त्याने ‘चालता बोलता’ न्यावे, त्याने तेही ऐकलं. आता काही राहीलं नाही. मी आयुष्यभर जे काही जमवले त्याची वाटणी करतो त्यात समाधान माना म्हणजे मी सुखाने जातो.”
सगळ्यांनी डोळे पुसत माना डोलावल्या. म्हाताऱ्याने घर, जमीन, दागीने इतरही काही गोष्टी यांची मनाप्रमाणे वाटणी केली. मुलांचा अर्थात वाटणीलाच विरोध होता पण वडीलांच्या ईच्छेपुढे त्यांनी सगळ्याला निमुट होकार दिला.
वडील म्हणाले “आता एकच आणि महत्वाचे राहीले. मी वडीलांकडुन चालत आलेलं आपल्या कुलदेवीचे सगळं मनापासुन केले. आज जे काही आहे ही देवीचीच कृपा. आता याची जबाबदारी दोघांपैकी एकाने घ्यावी अशी माझी फार ईच्छा आहे.”
दोघा भावांनी एकमेकांकडे पाहीले. थोरला काही बोलायच्या आत धाकटा म्हणाला “बाबा, तुम्ही जे म्हणाला त्याला आम्ही होकार दिला. फक्त तुमच्या समाधानासाठी. पण हे ‘देवी’चे काही माझ्याच्याने होणार नाही. ते दादाकडे सोपवा. माझी देवी रानातल्या ढेकळात आहे आणि तिची मी मनापासुन सेवा करतो आहे.”
थोरल्याने जरा रागातच धाकट्याकडे पाहून वडीलांचा हात हातात घेतला “बाबा, मी करीन सगळं आपल्या कुलदेवीचे. तुम्ही काळजी करु नका” ते शब्द ऐकतच म्हाताऱ्याने समाधानाने कुडी सोडली.
दिवस जात होते. थोरला आणि धाकटा आपापल्या रानात राबत होते. पण थोरल्यावर देवीचीही जबाबदारी होती. तिची व्रत-वैकल्ये, उपास, पुजा, वर्षाचे सण, दोन वेळचा नैवद्य यात त्याचा बराच वेळ जाई. या सगळ्यामध्ये त्याचे शेतीकडे आणि स्वतःच्या तब्बेतीकडेही दुर्लक्ष होई. पण वडीलांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधानही त्याला होते. दिवस जाता जाता हळूहळू पालटले. ते छोटे घर पुरेसे पडेना म्हणून धाकट्याने शेतातच टुमदार घर बांधले. त्याला आता शेतावर जास्त लक्ष पुरवता यायला लागले. थोरल्यानेही घर मोकळे झाल्याने देवघर व्यवस्थित बांधून घेतले. फुलांसाठी बाग जोपासली. पुजेमधे, व्रत-वैकल्यांमधे त्याचा जास्त वेळ जायला लागला. पण उपवासांमुळे थोरल्याची तब्बेत ठिक राहीनाशी झाली. परिणामी शेतीकडे त्याचे दुर्लक्ष व्हायला लागले. आर्थीक बाजूही घसरली. रोज काही ना काही अडचण ऊभी राहू लागली. या सगळ्याचा संबंध थोरला “आपल्याकडून देवीचे काहीतरी करायचे राहीले” याच्याशी लावू लागला. कधी पुजेला बेल नव्हते म्हणून मुलगी आजारी पडली. तर कधी नैवेद्य दाखवायचा राहून गेला म्हणूनच धान्याला भाव मिळाला नाही. आज काय तर ‘नको’ ते खावून दर्शन घेतले म्हणून पिकावर रोग आला. तिकडे धाकट्याची दिवसेंदिवस प्रगती होत होती. थोरला वैतागला. देवीचे इतके करुनही थोडे काही चुकले तर देवी शिक्षा का करते आपल्याला? आज त्याने देवीकडे याचे गाऱ्हाणे घालायचे ठरवले. सकाळी अंघोळ करुन त्याने देवीची यथासांग पुजा बांधली, स्तुती स्तवने गायली आणि व्याकूळतेने देवीला हाक मारली. आज देवीने त्याच्या हाकेला ओ दिली आणि प्रकट झाली “बोल बाळ, का हाक मारलीस?”
त्याने नतमस्तक होत विचारले “आई, माझे थोडेही चुकले तर तू मला शिक्षा करतेस. आणि धाकट्याला तुझी साधी आठवणही नाही तरी तु काहीच का करत नाहीस?”
देवी मंद हसली आणि म्हणाली
“तो जर मला मानतच नाही तर त्याला कशी शिक्षा करु मी?”
(मार्मिक लघु कथा)
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे.)
सायो तुमचा तसा समज झाला असेल
सायो तुमचा तसा समज झाला असेल तर त्याचं निराकरण अवघड आहे पण तरी एकदा प्रयत्न करून पाहतो. Because I care.
पहिली कथा मला कळालीच नाही आणि तशी ती अजून काही जणांनाही नाही. मला कळाली नाही म्हणून सोडून दिली.
तेव्हा शालींनी व्यत्यय ह्यांना लिहिले "व्यत्यय, कथा त्रयस्थपणे वाचून त्यातले मर्म समजुन घ्यावे ही अपेक्षा."
मग मी दुसर्या कथेत मर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला पण खास काही जमले/कळले असे वाटले नाही. मग प्रतिसाद वाचून ती थोडी कळाली आणि आवडली सुद्धा.
तिसर्या कथेचेही पुन्हा तीच तर्हा, काहीच कळाली नाही. पण ह्यावेळी लेखकाला विचारावे असे ठरले म्हणून...
मर्म काय म्हणायचे कथेचे?
असा एका ओळीचा प्रश्न विचारला. पण ऊत्तर काही मिळाले नाही. तर तेही सोडून दिले.
पुन्हा चौथी कथाही आजिबातच कळली नाही,
म्हणून प्रश्न विचारून पाठपुरावा केला... तेव्हा शाली म्हणाले
"मार्मीक कथेतलं मर्म काय हा प्रश्नही बराचसा निरर्थकच आहे. "
आता त्यांच्या दोन प्रतिसाद असे गोल गोल फिरवणारे आले म्हणून अजून प्रश्न विचारून पाहिले...पण समधानकारक काही हाती लागले नाही.
आणि आता पाचव्या कथेत पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या झाले जे तुम्ही पाहिलेच.
आता अजून काय लिहिणार.. मी जेन्यूईनली प्रश्न विचारतो आहे असे तीनदा तरी म्हंटलो असेन पण तुम्हाला तसे वाटत नसल्यास माझा नाईलाज आहे.
आता थांबावे हेच बरे. शाली तुम्ही चालू द्या. शुभेच्छा तुम्हाला.
हायला म्ह्णजे चर्चा पण नको
हायला म्ह्णजे चर्चा पण नको करायला. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात हे तरी मानतात ना. मला सुध्धा संस्काराच्या नजरेतून पाहिल्यास गोष्ट पटते आहे. पण लॉजिकली पटत नाहीये. हे म्हणजे तो कायदा वागैरे काही मानत नाही म्हणून त्याला सगळे गुन्हे माफ असे म्हण्या सारखे आहे.
मला न सांगता चूक केली तर काही हरकत नाही पण परवानगी मागाल तर ती मिळणार नाही.. double standard ..
निव्वळ ताणतोय असं वाटायला नको
निव्वळ ताणतोय असं वाटायला नको म्हणुन मी गप्प बसलो. लोकांना आवडतंय तर आवडो बापडं.
हायझेनबर्ग यांच्या भुमिकेशी सहमत. त्यांना कॉर्नर केलं जातंय असं वाटलं म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच.
>> हे म्हणजे तो कायदा वागैरे काही मानत नाही म्हणून त्याला सगळे गुन्हे माफ असे म्हण्या सारखे आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
+१
माझाही हातभार - घेता आलं तर
माझाही हातभार - घेता आलं तर प्रत्येकच कथेत मर्म असतं, म्हणजे प्रत्येक कथा मार्मिक असते (आणि नसतेही).![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
व्यत्यय, हायझेनबर्ग आणि इतर
व्यत्यय, हायझेनबर्ग आणि इतर कोणीही,
ज्यांना दिसतायत/जाणवताय्त त्यांनी वेगवेगळे दृष्टिकोन देत राहावे; शक्य असेल तर न ताणता (ताणले तरी माझी हरकत नाही ;)). आमच्यासारख्या झापडबंदना काहीतरी वेगळे विचारखादय मिळेल.
+
शाली यांनी ही खिंचातान वैयक्तिक न घेता मा.ल.क. टाकत राहाव्यात. कारण पिढयान् पिढ्या ऐकलेल्या, चालत आलेल्या या कथा आहेत आणि चिरफाड 'त्यांची' चालुय. शालींच्या शब्दांकनाबद्दल कोणी काही बोलत नाहीय.
मस्त आहे ही पण कथा.मला माझ्या
मस्त आहे ही पण कथा.मला माझ्या भूतकाळातल्या काही पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यासारखी वाटली.
)
सायोशी सहमत.
(एकंदर मालक६ वर ताणून घ्ययचं नसेल तर शालींनी मालक शीर्षक बदलून 'माशक' करावे म्हणजे मधला मार्ग निघेल
(माझ्या शब्दातल्या कथा)
मला याचा अर्थ असा लावावासा
मला याचा अर्थ असा लावावासा वाटतो....
ज्या गोष्टी "करिता सायास" मिळणार आहेत , त्या कष्ट करूनच मिळतात . त्या देव प्रसन्न होउनही मिळत नाहीत कारण त्या देवाच्या अखत्यारितच नाहीत.
मग देव प्रसन्न करून घ्यायचा नेमका कशासाठी ?
कदाचित अशा गोष्टींसाठी ज्या मनुष्याच्या प्रयत्नाच्या किंवा कुवतीच्या पलिकडेच आहेत.. ज्याला आपण दैव संबोधतो...
उदा : परिक्षेत आपण ऑप्शन ला टाकलेल्या टॉपिकवरच कंपल्सरी प्रष्ण येणे , इंटर्व्हूला जातानाच्या वेळी नेमके अजारी पडणे..
अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडू नयेत म्हणून
किंवा
आपल्यालाच उत्तर उत्तमपणे येत असलेले प्रष्ण पेपरात येणे , सिलेक्ट झालेल्या माणसाने जॉब न स्वीकारल्या मुळे तो आपल्याला मिळणे ... अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडाव्यात म्हणून कदचित.
पशुपत, एकदम असंच काही मनात
पशुपत, एकदम असंच काही मनात आलं.
मस्तच
मस्तच
व्यत्यय, हायझेनबर्ग आणि इतर
व्यत्यय, हायझेनबर्ग आणि इतर कोणीही,
ज्यांना दिसतायत/जाणवताय्त त्यांनी वेगवेगळे दृष्टिकोन देत राहावे; शक्य असेल तर न ताणता (ताणले तरी माझी हरकत नाही ;)). आमच्यासारख्या झापडबंदना काहीतरी वेगळे विचारखादय मिळेल.
+
शाली यांनी ही खिंचातान वैयक्तिक न घेता मा.ल.क. टाकत राहाव्यात. कारण पिढयान् पिढ्या ऐकलेल्या, चालत आलेल्या या कथा आहेत आणि चिरफाड 'त्यांची' चालुय. शालींच्या शब्दांकनाबद्दल कोणी काही बोलत नाहीय.
>> +१
आवडली.
आवडली.
या कथेत अगदी थोडक्यात दोघा
या कथेत अगदी थोडक्यात दोघा भावांच्या व्यक्तिमत्त्वातला फरक सुरुवातीपासूनच स्पष्ट केला आहे.
>>>
त्याने डोळे किलकीले करुन पाहीले. अंथरुनाभोवती दोन्ही सुना आणि थोरला चिंतातुर होवून बसले होते.
त्याने खुनेनेच विचारले “धाकटा कुठं आहे?”
इतक्यात धाकटाही वैद्याला घेवून आला.
<<<
थोरला फक्त काळजी करत बसला, धाकट्याने त्याबाबत वैद्यांना आणायची कृती केली.
थोरल्याला बहुधा आपल्या अंगात धाकट्याइतकं शेतीबाबत कर्तृत्व नाही याची कल्पना असावी. अशी इन्सिक्युअर्ड माणसं स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी जे करतात तेच त्याने केलं - कुळाचार मी पाळेन हे रागारागात सांगितलं.
खरंतर थोरला म्हणून कुळाचार त्याने पुढे चालवणं अध्याहृत होतंच.
कुळाचार पाळणं हेही प्रतीक - गतानुगतिकतेचं. त्यात त्याला वाडवडिलांनी आखून दिलेल्या मार्गावर चालायचं होतं, स्वत:चा असा विचार करायची आवश्यकता नव्हती.
पुढे तो अधिकाधिक दैववादीच होत गेला. सगळ्याच गोष्टींचं खापर देवतार्जनात राहिलेल्या (perceived) उणिवांवर फोडू लागला. आपण प्रयत्नांत काही कसूर केली असेल हे लक्षातच न घेता. अभ्यास केला नाही म्हणून नापास झालेल्या मुलाने 'मी दहाऐवजी जपाच्या वीस माळा केल्या असत्या तर पास झालो असतो' असं समजण्यासारखं.
पण उलट्या बाजूने काही चांगलं झाल्याचं श्रेय त्याने देवीला दिलेलं दिसत नाही.
मग एका क्षणी बहुधा त्याला उपरती झाली. त्याचं देवतार्जन हे 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' यासारखं होतं. तो 'लहानसहान कारणांवरून कोपणारी' देवी पुजत होता म्हणून ती लहानसहान कारणांवरून कोपत होती.
धाकटा असं काही मानत नसल्यामुळे त्याने सगळ्या बर्यावाइटाची जबाबदारी स्वतः घेतली आणि त्याचा दोष देवीच्या कोपाला दिला नाही - दुसर्या शब्दांत, देवी त्याला शिक्षा करू शकली नाही कारण तो तिला मानतच नव्हता.
आता कथा स्पष्ट झाली असेल अशी आशा आहे.
आता यात मार्मिक काय? आपलं जग आपल्या विचारां/विश्वासांनुसार आपणच रंगवत असतो हे निरीक्षण. एकाच परिस्थितीत राहणारी दोन माणसं त्याबद्दल वेगवेगळं बोलताना तुम्ही पाहिली असतील.
'मला कामासाठी फार लांब जावं लागतं' असं एक म्हणेल तर 'अरे कामाला जायचं म्हणजे पिकनिकला गेल्यासारखं वाटतं मला! इतका सीनिक रस्ता आहे!' असं दुसरा एखादा म्हणेल. (हे माझ्या पाहण्यातलं उदाहरण आहे म्हणून पटकन आठवलं.)
'Pain is inevitable, suffering is not' हे वचनही आपण ऐकलं असाल - त्याचाही अर्थ हाच.
आपलं जग आपल्या विचारां
आपलं जग आपल्या विचारां/विश्वासांनुसार आपणच रंगवत असतो हे निरीक्षण. एकाच परिस्थितीत राहणारी दोन माणसं त्याबद्दल वेगवेगळं बोलताना तुम्ही पाहिली असतील.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'मला कामासाठी फार लांब जावं लागतं' असं एक म्हणेल तर 'अरे कामाला जायचं म्हणजे पिकनिकला गेल्यासारखं वाटतं मला! इतका सीनिक रस्ता आहे!' असं दुसरा एखादा म्हणेल. (हे माझ्या पाहण्यातलं उदाहरण आहे म्हणून पटकन आठवलं.)
'Pain is inevitable, suffering is not' हे वचनही आपण ऐकलं असाल - त्याचाही अर्थ हाच.>>>>
११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
किती छान उलगडून सांगितलंत स्वाती जी
खूप आवडलं आणि पटलं !!
मस्त विवेचन.आवडलं.
मस्त विवेचन.आवडलं.
या कथा मी माझ्या आजोबांकडून
या कथा मी माझ्या आजोबांकडून ऐकल्या. त्यावेळी त्यांनी काय पटवून देण्यासाठी सांगीतल्या ते आठवत नाही पण या कथा मनावर चांगल्याच ठसल्या. वर्षापुर्वी मी या कथांचे ईबुक करुन भावाच्या मुलीला दिले. मायबोलीवर टाकाव्यात वाटले म्हणून टाकायला सुरवात केली. प्रतिसादात अनेकांनी काही प्रश्न ऊपस्थित केले. त्याला उत्तर देताना मलाच या कथांचे वेगवेगळे पैलू दिसले. वेगवेगळे अर्थ ऊलगडले. काहींचे प्रतिसाद वाचून वाटले "अरे, अशीही शिकवन मिळतेय या कथेतुन." तर बरेचदा प्रतिसाद वाचताना असे वाटले की कथा ऐकल्या ऐकल्या मला जे वाटलं तसं कुणालाच वाटलं नाही. तर कधी कधी काही प्रतिसाद वाचून वाटले 'अरे हा पण अर्थ छान आहे या कथेचा. आपल्या कसे लक्षात आले नाही?' या कथा मायबोलीवर टाकायचा निर्णय अगदी योग्य ठरला माझा. कुणा कुणाचे नाव घेऊ? प्रतिसादांमुळे मलाच या कथा नव्या अर्थाने, नव्याने कळल्या हे नक्की. काही ठिकाणी प्रतिसाद भरकटलेही, पण तेवढे चालायचेच. 'मार्मीक लघु कथा' नावाने मालीका सुरु केली पण काहीजन शीर्षकातच गुंतले, कथा बाजूलाच राहीली. असो सगळ्यांचे धन्यवाद!
छान उलगडून सांगितलंत स्वाती
छान उलगडून सांगितलंत स्वाती_आंबोळे. छान प्रतिसाद!
mi_anu आता मा.ल.क. नावाने कथा
mi_anu आता मा.ल.क. नावाने कथा मालीका सुरु केलीये तर राहूद्या तेच नाव. कथा महत्वाची.
त्यांना कॉर्नर केलं जातंय>>
त्यांना कॉर्नर केलं जातंय>> काहीही काय व्यत्यय
आपलं जग आपल्या विचारां
आपलं जग आपल्या विचारां/विश्वासांनुसार आपणच रंगवत असतो हे निरीक्षण>> +1
खूप छान समजाऊन सांगितलं स्वाती जी.
शाली आपला प्रतिसाद आवडला. या मालिके वितिरिक्त
ही आपल इतर लेखन आणि लेखन शैली ही खूप आवडते.
आपण म्हणालात ते पटलं, या आणि अश्या अनेक गोष्टी आपण आयुष्यात खूप वेळा ऐकतो. आजी-आजोबा, आई-वडिलाकडून ऐकतो, मग लहान भावंडाना सांगतो, मग आपल्या मुलांना, नातवांना सांगतो. दर वेळेस कथा तीच असली तरी तिचा बोध वेगळा असतो. कारण कारण तो आपल्या त्या वेळेच्या ज्ञान, समज आणि आपल्याला आलेल्या अनुभवावर अवलंबून असतो.
आता जेव्हा मी माझ्या मुलीला ससा आणि कासवाची गोष्ट सांगतो तेव्हा माझा हाच अनुभव असतो. त्यातन मिळणारा मेसेज आताच्या आयुष्यात सुधा उपयोगी आणला जाऊ शकतो. पण त्यासाठी या गोष्टींकडे नवीन दृषटिकोनातून पाहायला शिकले पाहिजे, इतरांचे दृष्टिकोन, विचार समजून घेतले पाहिजे. तरच या गोष्टींचा उद्देश सफल होईल.
पुढील गोष्टींचा प्रतिक्षेत...
थँक्यू बुन्नु!
थँक्यू बुन्नु!
हाब, आतापर्यंत टाकलेल्या (मार्मिक) कथा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहचल्या याचा आनंद आहे.
देव पण त्यांनाच पावतो जे
देव पण त्यांनाच पावतो जे कर्मपण श्रध्देने करतात >> देव पावणे म्हणजे नक्की काय. आर्थिक भरभराट होणे का देवाने प्रसन्न होऊन दर्शन देणे?>>>>>>>>
@ बुन्नु ....देव पावतो म्हणजे कर्माचे चांगले फळं मिळून आत्म समाधान होते...माणूस समाधानी असतो तेव्हांच सुखी होतो
@ स्वाती आंबोळे......खूपच छान
@ स्वाती आंबोळे......खूपच छान समजावून सांगितले आपण... धन्यवाद
@ शाली... आपण खूप छान लिहिता... येवुदे पुढचा भाग
स्वाती तुमची निरिक्षणे आणि
स्वाती तुमची निरिक्षणे आणि विष्लेषण उत्तम आहेत.
पण हे म्हणजे ग्रेसांच्या कवितेचे अर्थ लावण्यासारखे झाले.
कथाकाराला हे सारे अभिप्रेत आहे किंवा कसे अशी शंका वाटते.
कथा इतकेच सांगते कि कर्मा शिवाय केलेली देवभक्ती उपयोगाची नाही.
शाली ,
शाली ,
तुमचे सर्व लेख , कथा मी वाचतो , त्या विचार प्रवर्तक असतात. त्याला साहित्यमूल्यही भरपूर असते.
मुख्य म्हणजे तुमचा इथे लिहिण्यामागचा हेतू उत्तम आहे.
विचारांची देवाण-घेवाण ही महत्वाची !
लिहिते रहा.....
आवडली
आवडली
पुढच्या कथांची लिंक मिळेल का?
पुढच्या कथांची लिंक मिळेल का?
Pages