फारा वर्षांपूर्वी मराठी साहित्यात एक जोशी होऊन गेले. धोंडो भिकाजी जोशी ह्या नावाने वावरणारी ही असामी मनाचा साधेपणा, आणि गमतीशीर अनुभव, ह्यांमुळे सगळ्यांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. तुलनेने स्मार्ट असलेली त्यांची बायको, त्यांची ओव्हरस्मार्ट वाटणारी मुलं, चाळीत राहणारे चाळकरी, हपिसातल्या वल्ली, ही सगळी माणसे अगदी आपल्यातलीच होऊन गेली. पिफमधला `लेथ जोशी' हा चित्रपट पाहताना फार दिवसांनी त्या जोश्यांची आठवण आली, हीच गोष्ट बरेच काही सांगून जाते.
ते जोशी `असामी' होते, हे जोशी थोडे `तसा मी' आहेत. अगदी धोंडू नाव नसलं, तरी ह्या जोश्यांना `दिनू' म्हणावे, असेच ते आहेत. हेही जोशी मध्यमवर्गीय आहेत. पुण्यातल्या एका वाड्यात राहतात. चाळींसारखेच तिथेही सगळे `कॉमन' आहे. ह्या जोश्यांनाही एक स्मार्ट, मोठ्यांच्यात उठबैस असलेली बायको आहे. एक मोठा झालेला शंकर्यासारखा कधीकधी वाह्यातपणा करणारा मुलगा आहे. एक प्रेमळ पण बडबड करणारी आई आहे. त्यांच्या आईचा लकी नंबर ७८८ आहे बरं का! हेही जोशी अनेक वर्षे एकाच हपिसात एकाच मशिनवर काम करत आहेत. अगदी कायकिणी गोपाळरावांसारखे लखलखीत नसले, तरी ह्याही जोश्यांचे एक कायम चालणारे अध्यात्म आहे. हेही जोशी कुटुंबियांपुढे फारसे बोलत नाहीत. एकंदरीत ह्या जोश्यांच्या घरात बरीच गंमत आहे. बायको-मुलगा मॉडर्न म्हणून मस्त जगतात, आजी तिच्या ढंगात टुणटुणीत राहते, आणि ह्या जोश्यांचा मात्र कधीकधी अगदीच `मोरू' होतो, असे एकंदरीत चित्र आहे.
ह्या जोश्यांना त्या जोश्यांसारखा थोडा प्रॉब्लेमही आहे. यंत्रयुग त्यांच्या घरी अचानक दार ठोठावत आले आहे. ह्यांचा प्रॉब्लेम जरा जास्तच सिरीयस आहे खरे तर. लेथ मशीनवर माणूस काही यंत्रांएवढा वेगात जॉब करू शकत नाही. अगदी जोश्यांसारखा वर्षानुवर्षे कला जोपासणारा कलाकारही नाही. इतके जोखमीचे काम इतक्या चोखपणे सांभाळणारे जोशी यंत्राच्या साचीव एकसुरी कामापुढे हतबल आहेत. पण ते यंत्राच्या पूर्णतः विरोधी आहेत, असेही नाही. कारण त्यांनीही आयुष्य एका यंत्राबरोबरच घालवलेले आहे. मग पुढे काय होते? जोश्यांना त्यांच्या आयुष्यातला हरवलेला आनंद पुन्हा मिळतो का? जोश्यांच्या घरचे ह्या सगळ्यामध्ये कशी साथ देतात? की देतच नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
खरे तर चित्रपट महोत्सवात माझा भर बहुतांशी परदेशी चित्रपटांवर होता, पण सबटायटल्स वाचून वाचून कंटाळा आला, म्हणून जरा मराठीकडे वळायचे ठरवले. आणि हा चित्रपट पाहून तो निर्णय योग्यच ठरला. दोन तास निखळ आनंद बर्याच दिवसांनी अनुभवायला मिळाला. ह्या गोष्टीत सुख आहे, दु:ख आहे, जल्लोष आहे, शांतता आहे, सगळे काही आहे. दिग्दर्शक मंगेश जोशी स्वतः `जोशी' असल्याने त्यांना जोशीपण काय असते ते बहुधा चांगलेच ठाऊक आहे, आणि त्यांनी ते प्रत्येक फ्रेममध्ये पुरेपूर उतरवले आहे. सगळीच पात्रे म्हणजे वसंत सरवट्यांच्या कुठल्या तरी कॅरिकेचर्सची जिवंत रूपे असल्यासारखी एन्ट्री घेतात, आणि पुढचे दोन तास मनाचा पडदा व्यापून उरतात. `पंधरा मायक्रॉननी करतो' म्हणताना जोश्यांच्या आवाजातूनच त्यांची छाती कशी फुगली असेल, ह्याची कल्पना येते. `हे स्किलचं काम आहे बॉस' म्हणताना त्यांचा मुलगा मनातल्या मनात कसा हसला असेल, हे जाणवते. जोश्यांच्या बायकोचा मेकओव्हर होताना ती कशी मनातल्या मनात प्रफुल्लित होत असेल, हे तिच्या चेहर्यावर दिसते. ह्यात त्या अॅक्टर्सचे क्रेडिट आहेच, त्याचबरोबर आपल्याला प्रेक्षकांना नक्की काय दाखवायचे आहे, हे दिग्दर्शकाला पूर्ण माहित असल्याशिवाय अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून चित्र उभे करता येत नाही. चित्रपटाचे पार्श्वसंगीतही इतक्या बारकाईने रचले आहे, की बस! असे सगळे धागे कलापूर्णरीत्या एकत्र गुंफले गेले, की मजा आल्यावाचून राहत नाही.
जोश्यांचे काम करणारे चित्तरंजन गिरी ह्यांनी फार न बोलताच ते समर्थपणे पेलले आहे. वर म्हटल्याप्रमाणे पंधरा मायक्रॉनचा प्रसंग, त्याचबरोबर बायकोकडे, मुलाकडे, आईकडे नुसतं बघण्याचे प्रसंग, अशा सगळ्यांतून त्यांचे पाणी किती खोल आहे, ते कळून येते. त्यांचा चेहरामोहराही `तसा मी' असण्याला एकदम फिट आहे. त्यांच्या बायकोचे काम करणार्या अश्विनी गिरी ह्यांचेही काम एकदम चपखल. `आमचे हे म्हणजे शुंभ!' असे अगदी म्हणणार्यातली बायको नाही ही, पण एकदम चटपटीत, नवनवीन गोष्टी शिकायला तत्पर वगैरे असलेली आहे. त्यात मग नवर्याचे नवरेपण काही तिला थांबवेल असे नाही. ते त्यांनी हावभाव आणि बॉडी लँग्वेजमधून छान दाखवले आहे. आजी तर रॉकस्टार आहे ह्या चित्रपटाची. तिच्यामुळे चित्रपटाला वेगळाच कूल कोशंट येतो. अगदी शेवटपर्यंत तो टिकवून धरला आहे. आजीची बडबड वगैरे ऐकून तर एकदम माझ्याच आजीची आठवण झाली. नाटकासिनेमातल्या फंडे मारत बसणार्या आज्यांविषयी माझे मत काही फारसे चांगले नाही, पण ही आजी बेस्ट आहे. ह्या आजीचा लाडका नातू म्हणजे इरसाल वल्ली आहे. ओम भुतकरने घरातल्या सगळ्यांबरोबरच जी केमिस्ट्री बनवली आहे, तीच ह्या घराचा `ग्लू' होऊन जाते. कुठे आजीलाच थोडेसे उकसव, कुठे वडलांनाच कोपरखळी मार, कुठे आईबरोबर नवीन पाककृतीबद्दलच बोलायला लाग, असे करणारा हा मुलगा वेळप्रसंगी हळवादेखील होतो, हे सगळे त्याने मस्त वठवले आहे.
थोडक्यात काय, तर हे लेथ जोशी एकदम सेट जोशी आहेत. पिफसारख्या महोत्सवांत मराठीची मान उंचावर ठेवणारे आहेत. आणि मुख्य म्हणजे मनमिळाऊ आणि कूल आहेत. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा येईल, तेव्हा चुकवू नका. मी तर बहुधा तिकीट काढून पुन्हा एकदा बघेन. ही एक जोरदार असामी आहे!
या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर
या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर सत्यजीत शोभा श्रीराम आमच्या कॉलनीतला मुलगा आहे. जीतू इंजिनिअरिंग नंतर चित्रपटासंदर्भात काहीतरी करतोय असे ऐकले होते आईकडून. आज कळाले तो या चित्रपटाच्या टिममध्ये होता म्हणून.
हा चित्रपट येत्या काही
हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे, असे ऐकले. म्हणून लोकांसाठी हा धागा पुन्हा वर काढतो.
१३ ला ना? अजून प्लॅन नाही ओपन
१३ ला ना? अजून प्लॅन नाही ओपन झाले वाटते. नक्कीच बघायचाय.
हो, १३लाच आहे बहुधा. मला
हो, १३लाच आहे बहुधा. मला नक्की माहिती नाही.
येस्स! परवा पेप्रात सिनेमाची
येस्स! परवा पेप्रात सिनेमाची जाहिरात पाहिल्यावर याच धाग्याची आठवण झाली होती.
सिनेमा पाहायचा आहेच!
पुण्यात हा सिनेमा रीलीज झाला
पुण्यात हा सिनेमा रीलीज झाला आहे आज, पण शोज अगदी कमी आहेत. एक शो आहे प्रत्येक थेटरला. शक्यतो उद्याच बघायचा प्लॅन आहे, पुढच्या आठवड्यात टिकेल असं वाटत नाही
रच्याकने, या सिनेमाच्या प्रमोशनकरता वैभव जोशींनी लिहिलेलं गाणं पाहिलं का? नरेन्द्र भिडेंचं संगीत, जयदीप वैद्यचा आवाज... युट्युबवर आहे. एकदम चपखल गाणं आहे. सिनेमा पहायची उत्कंठा त्यामुळे वाढली.
अरेरे. चांगला आहे सिनेमा. का
अरेरे. चांगला आहे सिनेमा. का असं व्हावं कळत नाही.
प्रमोशनचं गाणं नाही बघितलं. बघतो.
लेथ जोशी अजूनही चालू आहे
लेथ जोशी अजूनही चालू आहे नीलायमला. (अजून एक शो आहे आणखी कुठेतरी)
शुक्रवारी जाईल बहुतेक. चुकवू नये असा अप्रतिम सिनेमा.
संथ पण हादरवून टाकणारे सीन्स असं जबरदस्त काँबिनेशन जमवणं फार कठीण. लेखक, दिग्दर्शक, कलाकार- सार्यांचीच कसोटी. कौल, कोर्ट- अशी फार थोडी उदाहरणं.
---
लेथ जोशीचा शेवट मला भयंकर, हादरा देणारा, हॉरिबली अंगावर येणारा असा वाटला..
आनखीही अर्थ निघू शकतील असं वाटतं आहे. सिनेमा बघितलेल्यांनी शेवटाविषयी आपापलं मत / पर्सेप्शन लिहाल का
(अर्थातच स्पॉयलर टाकून)
परवा रात्री बारा वाजता झी
परवा रात्री बारा वाजता झी युवावर लागला होता. बिना ब्रेक. मला साडेबाराला शोध लागला आणि आपण अर्धा तास एक फालतू मालिका बघण्यात का वेळ वाया घालवला असे वाटले. सलग बघितला मग पहिला अर्धा तास चुकला तरी. अप्रतिम आहे. अनेक प्रसंगातून काही सुचवायचे आहे पण ते मला कळले नाही असे वाटले. जसे दोघे बाप लेक गच्चीवर सिगारेट पीत असतात. जोशी यांच्या भावनांचा कोणी विचार करत नाही असे वाटले पण ते सगळे व्यावहारिक विचार करत होते. त्यांना ते मशीन मिळणार नाही याची कुणकुण आधीच लागली होती. शेवटी मुलगा कोणाला तरी फोनवर सांगत असतो की गाडी मी नाही आईने घेतली पण ती सगळ्यांना मी घेतली म्हणून सांगत आहे, तिला शो ऑफ करायला आवडते वगैरे. हे तो खरे बोलत असतो की खोटे. त्यांच्या मुलाने दोन लाखाचे काम घेतलेले असते त्यात त्याला नुकसान होते की काय काही कळले नाही. जोशी यांना जास्त संवाद नाहीत आणि देहबोली सुद्धा अतिशय संथ दाखवली आहे त्यामुळे घरात ते सगळ्यात जास्त निरस वाटतात. मुलाला ते विचारतात की गाडी कधी शिकलास तेव्हा आई आणि मुलगा दोघेही हसायला लागतात ते का कळले नाही. मुलगा जेव्हा कंपनीत काही दुरुस्त करायला येतो तेव्हा ते अचानक सायकल घेऊन निघून का जातात.
इथेच वाचलं होतं चित्रपटाविषयी आणि बघायची उत्सुकता होती. मध्ये विसर पडला होता आणि अचानक खजिना सापडावा तसा परवा बघायला मिळाला. तू नळीवर आहे की नाही कल्पना नाही. एकदा दाखवला म्हणजे आता परत दाखवतीलच टीव्हीवर.
Pages