"शनिवार माझा आवडीचा….आवडीचा.... आवडीचा... " हे गाणं मी नेहमीच आळवते. सुट्टीचा दिवस हे प्रमुख कारण असलं तरी बाकीची कारणं पण (तितकीच, किंबहुना जास्तच) महत्वाची आहेत.
पहिलं कारण म्हणजे म्हणजे खूप झोपता येतं. सकाळी उठून रोजच्याप्रमाणे leave balance स्तोत्राची उजळणी करून आजही ऑफिसला जावं लागणार असा विचार करत कडवट तोंडाने उठण्याची गरज नसते. दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी समस्त कुटुंबाला उपास असतो! साबुदाणा खिचडी करायला १५ मिनिटे खूप झाली. २ वाजेपर्यंत मस्त timepass करता येतो. २ वाजता दुसऱ्या भुकेची वेळ होते हे सांगायला नकोच!
पण ह्या वेळेस नेहमीच्या ठराविक दिनक्रमात बदल झाला. अस्मादिक साबुदाणा भिजत घालण्यास विसरले. इन्स्टंट साबुदाणे असतात, पण त्याची चव आवडत नसल्याने तो प्रकार रद्द ठरवण्यात आला. वरई आवडत नाही असे शिक्कामोर्तब बहुमताने झाले. मीच एकटी विनातक्रार वरई खाणारी पण अल्पमतामुळे काही चालले नाही. मग सकाळी सकाळी(९ वाजता हो) थालीपीठे करण्याची वेळ येऊन ठेपली. घरात राजगिऱ्याचे पीठ आणि उपासाची इतर मिश्र पीठे उपलब्ध होतीच. ती शोधण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम उरकला. हे प्रकरण जड जाणार असे अस्मादिकांना दिसू लागले होते. पण अहो आश्चर्यम! इतर स्वयंपाकाचा अनुभव असल्यामुळे आणि नशिबाने साथ (non-stick pan)दिल्यामुळे हा थालिपीठांचा development आणि testing कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
नमनाला घडाभर तेल ओतून झाले आहे. तर वाचकहो, किल्ली आज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर शनिवारच्या ह्या(tried and tested) थालिपीठांची कृती सहर्ष सादर करत आहे.
साहित्य :
१. उपासाची पीठे/उपास भाजणी ह्या शीर्षकाने मिरवणारे दुकानात जे काही मिळेल ते घेऊन यावे. त्यात प्रामुख्याने राजगिरा, वरई, साबुदाणा, शिंगाडा ह्या पीठांचा समावेश असतो. बऱ्याचदा तयार भाजणीमध्ये मीठ, लाल तिखट, जिरे हे सुद्धा असतं. ते काय काय आहे ते पाहावं.
अस्मादिकांकडे राजगिरा पीठ होतं. वरई आणि साबुदाणा भाजून त्याला मिक्सिमध्ये फिरवलं. (साधारण किती थालीपीठे करायची आहेत त्यानुसार प्रमाण कमीजास्त करावे)
२. भाजलेल्या दाण्यांचा कूट
३. बारीक चिरून किंवा ठेचून, हिरव्या मिरच्या , चवीप्रमाणे किंवा लाल तिखट(इच्छेनुसार)
४. जिरे, चिमूटभर
५. तुम्हाला उपासाला चालत असेल तर कोथिम्बिर, बारीक चिरून (मी नव्हती टाकली)
६. सैंधव मीठ/ शेंदेलोण चवीनुसार
७. १/२ लहान बटाटे बारीक किसून
८. तूप
९. पाणी
कृती:
अंदाजे ४ थालीपीठे होतील इतपत पीठ मिक्स करून एका टोपात किंवा परातीत घ्यावे. त्यात इतर सर्व साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करावे.
अंदाजे थोडे थोडे पाणी घालत थापता येतील अशा consistency मध्ये मळून घ्यावे. त्याचे प्रत्येक थालीपीठासाठी एक असा गोळा करवून घ्यावा. हातानेच चापट करत गोलाकार बनवावा. तव्याला (नॉन स्टिक पॅन असेल तर उत्तम ) थोडेसे तूप लावून घ्यावे. त्यावर हा पिठाचा गोळा गोलाकार थापत जावा. थापाने ही क्रिया मी डायरेक्ट पॅनवरच करते, खूप जण प्लास्टिक पेपरवर थापून नंतर पॅन मध्ये टाकतात. तसंही चालेल. थालीपीठ लावल्यानंतर त्याला ५-६ छिद्रे पाडून घ्यावी आणि त्यात थोडेसे तूप सोडावे.
झाकण ठेवावे आणि छान उलटसुलट परतून खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजावे.
ही थालीपीठे ताजे घट्ट दह्याबरोबर खावी, अप्रतिम सुख देतात जिव्हेला!
ही झाली माझी कृती!!
तुम्हाला कोणाला आणखीन काही माहित असेल तर सांगावे. नक्की करून पाहीन, पुढच्या शनिवारी !
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------
फोटोशिवाय ती कृती खरी
फोटोशिवाय ती कृती खरी मानण्यात येत नाही ,,
मस्तच!
मस्तच!
- नुसत्या बटाट्याचे थालीपीठ - पोटॅटो रोस्टी/रस्टी सुद्धा सुरेख लागतात चवीला.
- बटाटे किसून त्यात पीठं घालूनही चविष्ट लागेल
- साबुदाणा भिजवून + उकडलेला बटाटा + चवीचा मालमसाला (यात प्रसंगी फोडणीचे वरईचे तांदूळसुद्धा ढकलायचे) असे मिक्स थालीपीठं
- शेंगदाण्याची आमटी उरवणे + भगर + उपासाची पीठं, उकडलेला बटाटा/रताळं आणि चवीचा मालमसाला घालून थालीपीठं
- माझी आजी साबुदाण्याचं गोड थालीपीठ सुद्धा करते. साबुदाणा भिजवून + दाण्याचा कूट + साखर + थोडं ओलं खोबरं हे सगळं जरासं चेचून तुपावर थालीपीठं लावायची. अती नाजूक असतात आणि कधीतरी(च) खायला बरी वाटली मला. घरातल्या गोडघाश्या आणि उपासालासुद्धा नाकार्डेपणा करणार्यांना गप्प करायचा उपाय आहे हा...
मस्त कालच केलं होते आषाढी
मस्त कालच केलं होते आषाढी एकादशी निमित्त .....
मनःपूर्वक आभार प्रिया येवले
मनःपूर्वक आभार प्रिया येवले,योकु,अनिश्का.
@अनिश्का@: नंतर करेन तेव्हा फोटो काढते आणि टाकते, जमतीलच असा विश्वास नव्हता ना !
शनिवार येईलच आता ५ दिवसात
@योक@: भारी variations सुचवलेत तुम्ही ! प्रयत्न करते !
छान च
छान च
छान पाकृय किल्लीताई!
छान पाकृय किल्लीताई! मम्मीला याच रविवारी बनवायला सांगेन!
मनःपूर्वक आभार shital Pawar,
मनःपूर्वक आभार shital Pawar, द्वादशांगुला
"शनिवार माझा आवडीचा….आवडीचा..
"शनिवार माझा आवडीचा….आवडीचा.... आवडीचा... ">>> आपलाही.
उपास करत नाही कधी पण नाष्ट्याला करुन पहायला हरकत नाही. मस्त लागेल असं वाटतय.
फोटो?
फोटो?>>>>नंतर करेन तेव्हा
फोटो?>>>>नंतर करेन तेव्हा फोटो काढते आणि टाकते, जमतीलच असा विश्वास नव्हता ना !
मनःपूर्वक आभार>> शाली
मम्मीला याच रविवारी बनवायला
मम्मीला याच रविवारी बनवायला सांगेन! >>> हे मी "मम्मीला याच रविवारी बनवून देईन!" असं वाचलं.
हे मी "मम्मीला याच रविवारी
हे मी "मम्मीला याच रविवारी बनवून देईन!" असं वाचलं>>> ऐतोबा आहे जुई! भयाण रेसिप्या बनवते फक्त! कृती शून्य!
हे मी "मम्मीला याच रविवारी
हे मी "मम्मीला याच रविवारी बनवून देईन!" असं वाचलं. >> मी बनवलं तर मम्मी काय, आमची क्युटीपण खाणार नै! मलाच एकटीला खावं लागेल!
किल्लीतैची एवढी भारी रेसीपी बिघडवण्याचं कांड नको घडायला, म्हणून मम्मीलाच सांगेन!
बरंय जुई! तू आल्याचा चहा पाज
बरंय जुई! तू आल्याचा चहा पाज आम्हाला
कट्टयावर बोलू
ऐतोबा आहे जुई! >> खरंय खरंय
ऐतोबा आहे जुई! >> खरंय खरंय! मला आयतं खायला आवडतं! आज आईने आम्लेट बनवायला सांगितलेलं पोळीसोबत, त्याऐवजी वडापाव आणून खाल्ले!
बादवे, उपवासाच्या धाग्यावर अंड्याच्या आम्लेटाचं नाव काढलं, तर धागाकर्तीचा उपास मोडत नै ना? घे किल्लीतै!
भयाण रेसिप्या बनवते फक्त! कृती शून्य! >>> हे कांड प्रिय आहेत!
Light 1 >> ५९ वा दिवा!
किल्लीताई मस्तच...
किल्लीताई मस्तच...
मम्मीला याच रविवारी बनवायला सांगेन>>> +1111111
मम्मीला याच रविवारी बनवून देईन!>>>>>>
जुई असल कायतरी करू नको... काकुंची अन्नावरची वासना उडेल आणि तुला पण हाकलून देईल ती..
आपली बासुंदी+जु.खीरची शप्पथ तुला जुई
मनःपूर्वक आभार आदीसिद्धी
मनःपूर्वक आभार आदीसिद्धी
भारीच की...
भारीच की...
मनःपूर्वक आभार मेघा.
मनःपूर्वक आभार मेघा.
चांगली आहे रेसीपी.
चांगली आहे रेसीपी.
बादवे - हे अस्मादिक शब्द फार वापरता तुम्ही. बोलताना पण वापरता का ☺️
मस्तच
मस्तच
मनःपूर्वक आभार अन्जू ,
मनःपूर्वक आभार अन्जू , च्रप्स
@ च्रप्स : अस्मादिक शब्द फार वापरता तुम्ही.>>> आवडतो हा शब्द.. भारदस्त वाटतो.. आपंण मोठे अहोत असा फील येतो
बोलताना पण वापरता का>> नाही हो
तव्यावरचे लावलेले कच्चे
तव्यावरचे लावलेले कच्चे थालीपीठ
वाढुन तयार
यमी
यमी
कसलं यमी दिसतंय
कसलं यमी दिसतंय
माझे पण ऑ टाफे पदार्थ.
माझे पण ऑ टाफे पदार्थ. अस्मादिक चा प्रॉब्लेम मला पण येतो वाचताना. पण नो वरीज. साबु दाणे ताकात भिजवायचे. मग दाकु. किसलेला बटाटा हिरवी मि रची कोथिंबीर मीठ जिरे हे वाटू न घेउन. थालिपीठ लावायचे. बरोबर सायी चे दही. ऑस्सम
मस्त खमंग , खरपूस भाजलेलं
मस्त खमंग , खरपूस भाजलेलं वाटतंय.
कृपया पाककृती लिहताना
कृपया पाककृती लिहताना "लेखनाचा धागा" न वापरता "पाककृती" हा मेनु पर्याय निवडावा. त्यामुळे आपोआप वर्गीकरण करायला मदत होते.
उदा. इथे सगळे उपवासाचे पदार्थ आहेत तिथे हा पदार्थ सापडणार नाही
https://www.maayboli.com/node/2548/by-subject/11/255
https://www.maayboli.com/node/2548/by-subject/11
किल्ली, मस्त रेसिपी आणि फोटो.
किल्ली, मस्त रेसिपी आणि फोटो. नक्की करुन बघेन.
धन्स च्रप्स , अनुजी, अनामिका,
धन्स च्रप्स , अनुजी, अनामिका, अमा, भरत
@ वेमा : संपादन कालावधी उलटुन गेला आहे, 'पाककृती' मध्ये हा धागा हलवाल का?
उपास थाळी.
उपास थाळी.
कोहळ्याचे उपासाचे थालीपीठ(यात वरई आणि राजगिरा पीठ ह्याचे मिश्रण आहे ), बटाटा पापड, चटणी, ओले खोबरे.
कोहळा संपला आता (आमच्याकडे उपासाला चालतो )
Pages