विषय कुठून निघाला ते आता नक्की आठवत नाही पण एका whatsapp ग्रुपवर जावळी, महाबळेश्वर, जावळीचे मोरे अशी काहीशी चर्चा चालली होती आणि मला माझ्या केलेल्या जावळी, महाबळेश्वर भटकंती आठवल्या. त्याच वेळी तिथल्या गावात भेटलेली माणसे आठवली. मग असे वाटले की गेली अनेक वर्षे केलेल्या आणि वेळोवेळी ट्रेक दरम्यान भेटलेल्या व्यक्तींवर लिहावे.
अश्या विचारातून तयार झालेली ही काही शब्द्चित्रे. यात व्यक्तींबद्दल लिहीलेले येईलच पण त्याच बरोबर माझ्या ट्रेकचेही काही संदर्भ येतील. सो एकंदरीत हे गाव, व्यक्ती, परीस्थीतीचे वर्णन आहे म्हणा ना.
-------------------
सह्याद्रीत मुक्तपणे स्वच्छंद फिरताना खेड्यापाड्यातल्या अनेक लोकांबरोबर संवाद साधण्याची वेळ आली किंबहुना असा स्थानीकांबरोबर होणारा संवाद हेच कालांतराने माझ्या ट्रेकींगचे, भटकण्याचे एक कारण झाले. काय मिळाले यातून? पुल एका ठिकाणी म्हणून गेलेत की कुठेही फिरताना मला तिथल्या ठिकांणांएवढीच तिथली माणसे वाचायला आवडतात. तसेच काहीसे माझे झाले असावे. भवातालचे जग अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने नाही तरी राजधानीच्या वेगाने बदलत असताना ही माणसे त्या वेगाने बदललीत का? शहराशी होणारा पुर्वीपेक्षा अधीक सम्पर्क त्यांना शहरी बनवतोय का? जुनी मुळे घट्ट मातीत रुजल्याने दुसरीकडे सहज वक्षारोपण न होणारी ही झाडे, यांचा शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो? याचाही साधारण अंदाज यांच्याशी बोलताना येत गेला. नवीन तंत्रद्यानाने शहर आणि खेडे यातल्या भींतीला जरी अनेक खीडक्या आल्या तरी माझ्यासारख्या अलीकडील माणसाला पलीकडील जग कसे असते याच्या उत्सुकतेनेही मी भरपूर भटकलो. माझ्या आयडीला जागून स्वछंद भटकलो.
ह्याच भटकंतील ही काही शब्दचित्रे.
-------------------
शब्दचित्र पहीले : जिजाबाई जाधव - वाडी बेलदार, किल्ले: महीपतगड
हा किल्ला खरेतर गोनीदांच्या भटकंतीतून प्रकाशात नव्हे हिटलिस्टवर आला. रसाळ-सुमार-महीपत ह्या त्रयीतील हा किल्ला. खरे पाहता त्रयीतील हा सर्वात मोठा, सर्वात बिकट जंगलाचा (हा किल्ल्यावर असलेले अत्यंत घनदाट आणि बिकट जंगल मला फार कमी किल्ल्यावर बघायला मिळाले) आणि तिघांमधला सह्यधारेला डायरे़क्ट जोडलेला किल्ला. वाडी बेलदार ही ह्या किल्ल्याच्या खांद्यावरची वाडी. आत्ता आत्ता रस्ता होतोय पण गेल्यावर्षीपर्यंत इथे यायचे म्हणजे सुमारगड, वाडी-जैतापुर, दहीवली, ओंबळी किंवा वडगाव मधून १.२-२ तासाची पायगाडी करायची. साध्या रुपयाच्या मिरचीसाठी पण ही उस्तवार करायची, सगळ्या ऋतूत. जिजाबाई जाधव असे पल्लेदार नाव असलेली ही मावशी ही उस्तवार गेली कित्येक वर्षे करते आहे.
वयाच्या तिशीत (तिच्या) नवरा साप चाऊन गेल्यावर तिन मुलांचा भार ओढताना करत होती, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही अश्या हत्तीसोंड पावासात पण करत होती, मोठी होणारी मुले प्रथम शिकायला मग नोकरीला मग लग्न होऊन एकामागोमाग घराबाहेर जाताना बघताना पण करत होती आणि वयाच्या साठीला पलीकडील आयुष्य खुणावत असताना पण करते आहे. आत्ता आत्ता विज आलीय तरी गेली कित्येक वर्षे अंधाराची सवय झालेल्या तिला विज असल्याचे कौतुक नाही किंवा नसल्याचे दु:ख नाही. मुलाने कौतुकाने मोबाईल घेऊन दिलाय पण बोलायला "आपली" माणसे नसल्याने बोलायचे कोणाबरोबर, त्यामुळे मोबाईल घरातील खुंटीवर डिस्चार्ज होऊन लटकत असतो.
माझी आणि तिची भेट एकदाच झाली पण फोनवर बोलणे झाले बर्याच वेळा. झाले असे की माझ्या डिसेंबरच्या मेगा रेंज ट्रेकचा शेवट महीपतगडावर होता. एक रात्र वस्तीही होती. वाडीबेलदारचा कोणताही संपर्क मिळाला नव्हता पन तेव्हढ्यात ट्रेक मित्र योगेशने ह्या जिजाबाईंचा आणि तिच्या सिताराम ह्या दिराचा नंबर मिळवून दिला. तिच्याशी चार पाच प्रयत्नानंतर संपर्क झाला. खुल्या दिलाने कधीपण या जेवण करा रहा असा आग्रह झाला. ठरल्याप्रमाणे चकदेवच्या संतोष कडून (ह्याच्या बद्दल लिहीन एकदा), रसाळच्या संदेशचा (ह्याच्या बद्दलपण) पाहूणचार घेत सुमारमार्गे आम्ही जिजामावशीच्या घरी गेलो.
आल्या आल्या या बसा तर उपचार झाला हो, पण स्वच्छ सारवलेल्या निटनेटक्या मांडवाखाली चटई, वर्षअखेरची थंडी (जे जावळीत भटकलेत त्यांना डिसेंबर अखेरच्या जावळीच्या थंडीचा अंदाज येईल ) पळवायला गरम पाणी, प्यायला तांब्याच्या कळशीतून तसेच थंडगार पाणी आणि गुळाचा खडा. ट्रेक भागवटा तिथेच गेला. यथावकाश तिच्या हातातल्या अप्रतीम चवीचे पिठले, भाकरी, उसळ, डाळ, भात आणि पापडाचे जेवण जेवलो. वाढताना चमच्याऐवजी पळी होती यावरून समजले की या घराला माणसांची अॅलर्जी नाही. बाकी साथी अंगणात गप्पा मारत असताना मी मात्र जिजामावशीला थेट चुलीपाशी पापड भाजायला मदत करत होतो. पापड हे निमीत्त पण आमच्या गप्पा काय रंगल्या होत्या म्हणून सांगू. यथावकाश जेवण झाल्यावर शेजारच्या सितारामभाऊंकडे थोडी, थोडी मावशीकडे अशी आमची मंडळी लवंडली आणि पाचेक मिंटात दोन्ही घरांनी घोरण्याची स्पर्धा सुरु केली . मी मात्र कुठेच जागा न मीळाल्याने जिजामावशीच्या ओसरीवरच्या खुराड्याशेजारी स्लिपिंग बॅग पसरली. झाकपाक करून भिंतीपलीकडे मावशी झोपली. सहज विषय सुरु झाला आणी आमच्या गप्पा रंगल्या. आमच्या म्हणजे जिजामावशी बोलत होती आणि मी फक्त हं, हं करत होतो. दुसरे काय करणार हो? तिची कर्मकहाणी सांगत होती (जिवनगाथा असे मी म्हणणार नाही, जिवन संघर्ष म्हणा हवे तर) आणि मी श्रोता होतो.
हो, संघर्ष नाहीतर काय. तिशीतच विधवा झाल्यावर तिन मुले आणि एक मुलगी यांना वाढवण्याची कहाणी, वाडीबेलदार सारख्या दुर्गम भागात राहून जगण्याचा संघर्ष करण्याची कहाणी, उन्हाळ्यात एक कळशी पाण्यासाठी रान तुडवण्याची कहाणी, जंगली श्वापदांपासून घरच्या जनावरांच्या रक्षणाची कहाणी, मुले मोठी होऊन कमवायला घराबाहेर पडली, मुलगी लग्न होऊन सासरी गेली मग एकटी उरलेल्या तिची कहाणी, शहरी हवा लागल्यावर सुरवातील्या महीन्याला दोन येण्यार्या मनीऑर्डर नंतर नंतर दोन महीन्याला एक झालेल्याची कहाणी. घरात विज, मोबाईल सारख्या सुवीधा पण वापरायल्या माणसे नसलेल्याची कहाणी, मुलांची लग्न झालेल्यावर आईच्या ऐवजी बायको प्राधान्य झालेल्याची कहाणी. घरी येतानाच शहरात परतीच्या तारखेचे रीजर्वेशन करून येण्यार्या सुनांची कहाणी.
असे दोन एक तास जिजामावशी बरोबर झालेला तो संवाद कायम लक्षात राहीलेला आहे. झोपता झोपता ति एक वाक्य बोलून गेली - "तुमा पोराना शयराची हवा लागल्येय पन ती हवा मजसारख्या म्हातारीच्या कष्टाने लागेल्य हे तुम्ही लगेच इसरता. जिते जलम झाले त्ये माय इसरता पण लक्श्यात टेवा तुमीपन कधीतरी म्हातारे व्हणारच हाये".
-------------------
शब्दचित्र दुसरे - दगडू जंगम - रायरेश्वर पठार
सह्याद्रीत मनसोक्त भटकंती करताना काहीवेळा माझ्या वाटा अश्या काही घराजवळ जाऊन थांबल्या की त्या घराने माझे स्वागताखेरीज काही दुसरे केले नाही. ऋतू कुठलाही असो, वेळ कुठलीही असो, बरोबर कितीही असो त्या घराचे दरवाजे मला नव्हे तर माझ्यासारख्या कित्येक जणाना कायम उघडे आहेत. आज ज्याच्याविषयी मी साम्गतोय तो म्हणजे रायरेश्वरचा दगडू जंगम.
रायरेश्वर पठार आपल्यापैकी कित्येकांना माहीत असते ते त्यावर असलेल्या शिवालयात छोट्या शिवाजीने पेरायला सुरुवात केलेली स्वातंत्र्याची ठिणगीची जागा म्हणून. पण रायरेश्वरचे महत्त्व एवढेच नव्हे. सातारा, पुणे आणि कोकण या तिघाना जोडणारे एक १६ किमीचे अतीप्रचंड सह्यपठार (टेबललँड), वरती असलेली जैवविविधता, वरून कोसळणारे धबधबे, सर्वांगावर ओरबाडून ओरखडे उठवल्याशिवाय आत शिरु न देणारे कारवीचे जंगल, नाखींदा सारख्या ब्रेथटेकींग जागा, चहूबाजूनी ट्रेकर्सना खुणावणार्या वाटा, पायथ्याला बांदल देशमुख आणी जेधे देशमुख अशी तालेवार घराणी अशी अनेक अनेक वैशीष्ट्ये रायरेश्वराजवळ आहेत.
ह्याच रायरेश्वरच्या पठारावर दगडू रहातो आणि येणार्या माणसांचे आदरातिथ्य करतो. आता तसे म्हटले तर त्याचा हा व्यवसाय नव्हे पण रायरेश्वर मंदीरावरून जंगम वस्तीकडे जाताना याचेच पहीले घर लागायचे म्हणून सगळेजण याच्याच घरी टेकायचे. बरं याचे घरही काही चौखणी नव्हे तर तुफानी वार्या पावसाला तग देऊन झुंजून उरेल, पुरेल अशी या पठारावरची घरे. याचेही तसेच. मी ११-१२ वर्षांपुर्वी जुनच्या पहील्या पावसाला रायरेश्वरला पहील्यांदा गेलो तेव्हा ना कुणा ग्रुप बरोबर गेलो की काही प्राथमीक माहीती गोळा करून गेलो. सहधर्माचे (सह्यधर्माचे म्हणा हवेतर ) चार मित्र गोळा करून रोहीडा-आंबवणे-कोर्ले-रायरेश्वर-केंजळगड असा दोन दिवसांचा प्लॅन ठरवला होता. ठरल्याप्रमाणे कोर्ले गावात संध्याकाळच्या वस्तीच्या गाडीने उतरलो आणी रायरेश्वरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्ता असा नव्हताच (टार रोडचे सुख किंवा काही ठिकाणी दु:ख दुर्गम खेड्यात पोचायचे होते). वरती पोचेपर्यंत दिवस कलला होता. अफाट पसरलेल्या पठारावर कसेबसे रस्ता शोधत मंदीरापर्यंत गेलो आणि बॅग्स ठेवून गप्पात बुडालो.
असंख्य विषय, जिथे राजांनी सवंगड्यांसह स्वधर्म, स्वराज्याचा खेळ मांडायची स्वप्ने रचली त्या सभागृहात ट्रेक वस्ती करण्याची कल्पनाच टेरीफीक रोमांचकारी होती/आहे. सभोवताली अंधारात चुकार काजवे लुकलुकायला लागलेले, येणार्या पावसाची तिसरी घंटा झालेली, हवेत बोचरी थंडी आणि वारा यामधील गारव्याचे वातावरण आणि आमच्या चाललेल्या गप्पा. वाह... असे गप्पात बुडालेले असताना बाहेरून हाक आली, "कोण पावणं"?. आम्ही सहज उत्तरलो "रामराम". अंधारातून दगडू आत आला. सुरुवातीचे नमस्कार, चौकशी झाल्यावर आमच्या इथे बसला आणि सकाळपासून आमच्याबरोबरच होता की काय असा गप्पांमधे सामील झाला. थोड्यावेळाने सहज आम्हाला विचारता झाला की रात्रीच्या जेवणाचे काय? आम्ही म्हणालो की आम्ही डबा आणलेला आहे. त्यासरशी झटकन म्हणाला की ठेवा तो तुमच्याकडेच आणि चला घरी. आम्ही अशी संधी दवडणार नव्हतोच.
मंदीरापास ५ मिनिंटाच्या त्याच्या अंतरावर असलेल्या त्याच्या घरी जेवायला बसलो तेव्हा कळले की आज अधीक मासाच्या धोंड्याचे जेवण आहे. मग काय पुरणपोळी आणि गुळपाणीच्या त्या जेवणाने गप्पांना अजूनच मजा आली. त्याच्या वडीलांशी, वैनींशी, छोट्या ताईशी भरपूर गप्पा झाल्या. दगडू दुसरे दिवशी आमच्या बरोबर केंजळगडापर्यंतही आला. त्याला किराणासाठी खालच्या खवली गावात जायचे होते. ह्या वेळी मात्र त्याचे वेगळे रुप बघायला मिळाले. आत्ता रायरेश्वरला जाणे खुप सोपे झाले असले तरी त्यावेळी ते खचीतच अवघड होते. रस्ते असे नव्हतेच. किराणा खालच्या कोर्ले किंवा खवलीवरून आणायचा, डॉक्टरसाठी खाली उतरायचे, चौथीपुढे शाळेसाठी खाली उतरायचे किंवा शाळा सोडायची (याच कारणाने याला शाळा सोडायला लागली). आजारी, गर्भार सगळे डोलीतून खालीवर करायचे. उन्हात, पावसात, थंडीत. दगडू सांगत होता आम्हाला बदलायचेय पण येणार्या सोयी या गोगलगाईच्या वेगाने येताहेत म्हणायचा. कदाचीत त्याच्याघरासमोरील अंगणातून दुरवर दिसणारा महाबळेश्वरचा झगमगाट यामागचे कारण असू शकेल. आम्हाला केंजळगडावर सोडून तो खाली खवलीच्या वाटेने निघून गेला.
पुढे एखाद वेळेला रायरेश्वरला जाणे झाले तेव्हा कळले कि खिंडीपर्यंत रस्ता झालाय. त्याच्याकडे मोबाईल आल्यावर त्याच्याशी काहीना काही निमीत्ताने संभाषण होत राहीले पण त्याच्या घरी राहण्याची परत वेळ कधी आली नव्हती. ती आली ३-४ वर्षांपुर्वीच्या आमच्या डिसेंबरच्या रेंज ट्रेकमधे. पहील्या दिवशी जावळीतून सुरु करून कोळेश्वर मार्गे जेव्हा दगडूच्या घरी पोचलो तेव्हा १३ तासाची तुफानी तंगडतोड झाली होती, बरोबरीचे निम्मे भिडू गळाले होते आणि आम्ही कसेबसे धडपडत रात्री त्याच्या घरी पोचलो होतो. स्वागत झाले तेच "लई दिसानी आलात, लई जबरी चाल केलीत की हो" अश्या त्याच्या स्वागतानी. जरी रात्रीचे आठच वाजले असले तरी खेड्यामधे ही निजानिजीची वेळ, पण आमच्यासाठी बाबा जागे होते, वैनी जाग्या होत्या. स्वतः दगडूने वैनीना चुलीपाशी मदत करून आम्हाला पिठले भाकरी वाढली त्याच्या चवीला उपमा नाही.
दुसरे दिवशी आम्हाला पाठशीला करून कुदळीला जायचे होते तर सोबत तानाजी जंगमला घेऊन (हा ही एक अवलीया असामी) आमच्या आधी तयार. कुठपर्यंत येशील विचारले तर म्हणतो कुदळी दिसेस्तोवर येतो. म्हणजे हिच चाल ६-७ तासाची झाली आणी तेवढेच तास परत घरी यायला. आणि सांगायचे विशेष म्हणजे हाच दगडू आणि तानाजी कालच हेम आणि राहूल या ट्रेक मित्राना घेऊन नाखींदामार्गे पाठशिलाला सोडुन आला होता. नाखींदाची वाट शोधताना डुकराने केलेल्या खड्ड्यात तोल जाऊन पडला देखील होता आणि आज आमच्या बरोबर परत त्याच वाटेवर यायला तयार झाला होता. म्हटले धन्य आहेस, चल आता.
वाटेने त्याने आणि तानाजीने भरपूर गप्पा मारल्या. गाई गुरांच्या, सापाच्या, बिबट्याच्या, डुकरांच्या, भवतालच्या झाडपाल्याच्या, झाडाच्या खोडाच्या ढोलीत पोळी बांधणार्या आग्यामाशींच्या, कोकणात उतरणार्या वाटांच्या, नाखींदा सारख्या ट्रेकर्सना सदैव खुणावणार्या जागेच्या अश्या अगणीत. वाटेत लागणार्या जननीच्या राईपर्यंत सरळ चाल आहे. इथे ब्रेक घेऊन, असलेल्या एकमेव पाणसाठ्यावर पाणी भरून पुढे निघालो आणी भयानक कारवी आणि जंगलात शिरलो. दगडू आणि तानाजी नसते तर यातून वाट शोधणे आम्हाला अशक्यच होते. यथावकाश पाठशिलाला पोचलो, खाली कुदळीची घरे दिसायला लागली आणि दगडूला निरोप देऊन पुढे निघालो.
ह्या ट्रेक नंतर असाच एक दोनदा त्याच्याशी बोलणे झाले, आता पायर्यांपर्यंत रस्ता झालाय म्हणाला. म्हणाला या एकदा बघायला, राहा. तुम्हाला नाखींदावर नेऊन आणतो, बाबानी काढलेला ढोलीतला मध देतो. शिकारीच्या वाटेने जांभळी गावापाठच्या जंगलात फिरवतो. रायरेश्वरला जायला दगडूला भेटून गप्पा मारणे हेच एक कारण पुरेसे आहे हो.. बाकीची कारणे म्हणजे ते चेरी ऑन केक का काय ते म्हणतात ते :).
मला माहीत आहे की रात्री बेरात्री कधीही रायरेश्वराला जाऊन दगडूला हाक दिली तर घराचे दरवाजे उघडे आहेत आणि वैनींच्या हातच्या पिठल भाकरीचे जेवण मिळेल याची खात्री आहे.
लिहावे की नाही हे विचार करत होतो पण लिहील्याने त्याला काही फरक पडला नसता हे माहीत आहे कारण त्याने हे सत्य स्विकारले आहे. हा आमचा दगडू पायाने पोलियोग्रस्त आहे. टाकणार्या प्रत्येक पावलाला त्याला उजवा हात गुढग्यावर टेकवून चालावे लागते. आमच्या बरोबर तो इतका भटकला पण कधीही त्याने त्याच्या अश्या अवस्थेविशयी तक्रार केली नाही तर आमच्या बरोबरीने चालला. कारण त्याला माहीत असावे की तो दीडक्या पायाने जो चालतो ते भले भले सरळ दोन पायाने चालू शकत नाहीत.
-----------------------------
शब्दचित्र तिसरे : रवी मोरे आणि धोंडीबा मोरे - मु. पो. ढवळे गाव. पोलादपुर, महाबळेश्वर.
"रावसाहेब" मधे पुलं म्हणून गेलेत - "एखादा माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला उत्तर नाही. काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरीचे नाते असल्यासारखी दुवा साधून जातात ". माझे आणि रवी मोरेचे काहीसे असेच झाले असावे.
रवी मोरे ढवळे गावातला. आता ढवळे गाव काही ट्रेकर्समधे अगदीच अपरीचीत नाही. ट्रेकर्सच्या यादीत मानाचे, अगदी वरचे स्थान असलेला ढवळे ते आर्थरसिट असा ढवळे घाट याच गावातून सुरु होतो. कोअर ट्रेकींग करणार्यांचा हा ट्रेक एकतर झालेला असतो किंवा करण्याच्या "टू डू" लिस्टीत तरी असतो. अगदीच हार्ड कोअर ट्रेकर हा ट्रेक जुलैच्या भर पावसाळ्यात करण्याची इच्छा ठेवतो . आता तुम्ही जर हा ट्रेक केला असेल तर हा ट्रेक आणि त्याला जोडून चंद्रगडाचा ट्रेक म्हणजे काय चिज आहे त्याचा अंदाज येईल. दमसास आणि सहनशक्तीची परीक्षा बघणारा, वेड्या वाकड्या व दरीकाठाच्या निमुळत्या पाऊलवाटा, घसरडे ट्रॅवर्स, अल्मोस्ट झीरो ते चार हजार प्लस फुटांची चढाई, किर्र जंगल (ह्याला घनदाट म्हणणे अगदीच किरकोळ आहे ), पावसाळावगळता पाण्याची वानवा आणि अक्खा दिवस खाणारी चाल असा हा ढवळे घाट करणे हेच एक मोठे टास्क आहे. आमचा रवी मोरे आणि त्याचे सत्तरीचे बाबा धोंडीबा मोरे हा घाट वर्षातून २५-३० वेळा तरी करत असावेत. ह्यात चंद्रगडाचा काऊंट नाही :).
रवीची आणि माझी ओळख हल्लीचीच. चार पाच वर्षांपुर्वी जेव्हा होळी सणाच्या दरम्यान जेव्हा पिंपळगड-चंद्रगड-ढवळे-आर्थरसिट-रडातोंडी घाट असा दोन दिवसाचा प्लॅन केला तेव्हा माझा ट्रेकमित्र ओंकारकडून याचा नंबर मिळाला. याच्याशी झालेल्या पहील्या फोनमध्येच कळले की याच्याशी आपले मस्त जुळणार. त्याला फोन केला तेव्हा मला म्हणाला की बिंधास्त घरी जावा मी बाबांशी बोलतो पण मला महाबळेश्वर एरीयातल्या दरे गावात भावकीचे काम आहे त्यामुळे मि तुम्हाला रवीवारी डायरेक्ट घुमटीजवळ भेटतो. जावळी भागातली बारा गाव मोरेंची भावकी हे एक निराळेच इंटरेस्टींग प्रकरण आहे (त्याबद्दल पुन्हा केव्हातरी).
ठरल्याप्रमाणे आम्ही पिंपळगड करून दुपारी पोलादपुर स्थानकावर पोचलो तो ढवळे गाडी लागलीच होती आणि स्वतः रवीपण आम्हाला भेटायला थांबला होता. त्याला घाईघाईतच बाय केले आणि उमरठ वरून १.३० तासाचा प्रवास करून दुपारी मार्चच्या फुफाट्यात दमलेले आम्ही रवीच्या घरी त्याच्या अंगणात पडलोच. सह्याद्रीने स्वतःच्या पोटात काही खास गावे आणि ठिकाणे लपवून ठेवली आहेत. शंखशिंपल्यांतल्या मोती सारखी. त्याच्या अंतर्भागात गेल्याशिवाय, त्याला बिलगल्याशिवाय हे मोती हातास येत नाहीत. ढवळे गाव हा असाच एक टपोरा गोल शुभ्र मोती. रस्ता संपलेल्या ढवळे गावात उभे राहीले की एका नजरेत न मावणारा कॅनव्हास समोर येतो. डावीकडून उजवीकडे फक्त आणि फक्त जंगलच आणि पायाशी वाहणारी (फक्त पावसाळ्यात हो.. बाकी वेळ फक्त गोल गोटे ) ढवळी नदी. अफलातून निसर्ग पण अजाणतेपणी आत शिरल्यास तितकाच निष्ठूरपणे वागणारा.
मार्चचा उकाडा चांगलाच जाणवू लागला होता. वाहणारा वाराही गरम झळा मारत होता. रात्रीची अपूरी झोप, सकाळची पिंपळगडाची चढाई, दुपारचा १.३० तासाचा खड्ड्यांचा प्रवास आणि रवीच्या घरचे गरमागरम पिठले भाताचे जेवण्...परीणाम जेवल्या जेवल्या शुन्य मिनीटात घोरायला लागणे. खरेतर बाबांना सांगून आम्ही चंद्रगडावर जाणार होतो पण कसचे काय आमच्या पैकी कोणीही त्या सारवलेल्या अंगणातून हलायलादेखील तयार नव्हते :). पण कसे काय फासे फिरले आणि त्या तप्त वातावरणात अचानकच वळवाच्या पावशाची झड उठली. झाले आमचा इरादा लगेच बदलला. आम्ही त्याच पावसात तिन-साडेतीन तासात चंद्रगड करून आलो. आजच्या दिवसाचा प्लॅन मोडता मोडता सक्सेस झाला होता :). हाही एक सह्याद्रीचा खेळच.
संध्याकाळी घरी आलो तो कळले की बाबा चावडीवर गेलेत. रवीचे बाबा ढवळ्यातल्या मोरे पंचांपैकी एक. म्हटले आपणपण जाऊया तर रवीची आई म्हटली की नको आज जरा गरमागरम प्रकरण आहे (जास्त डिटेल्स सांगत नाही पण मोरे आणि बिगर मोरे प्रेमप्रकरण होते). संध्याकाळी रवीचे बाबा आले तेव्हा डिटेलमधे कळले. मग मी हिच संधी साधून बाबांजवळ मोरे, जावळी, मोरेंच्या प्रथा, सध्याची अवस्था अश्या अनेक विशयांवर बोलत राहीलो. त्यांच्याकडून मोरे, राव मोरे, बारा गाव मोरे, त्यांच्या प्रथा, रोटी-बेटी, घाट-कोकण फरक, येऊ घातलेले बदल असे अनेक विषयांवर बरीच माहीती मिळाली.
दुसर्या दिवशी सकाळी आर्थरसिटला निघालो तो बाबा आमच्या आधी तयार होते. आता अश्या जंगलात शिरायचे तर त्यांच्यासारख्याच सगळे जंगल पाठ असलेल्या माणसाला बरोबर घेणे म्हणजे डबल फायदाच. सकाळी सातला ट्रेक सुरु केल्यापासून त्यांची अखंड बडबड सुरु होती. विषय अनेक. अगदी जावळीच्या जंगलापासून, त्यात राहणार्या आणि क्वचीतच कधी शहराशी संपर्क करणार्या आदीवासी वस्तीपासून ते महाभारत रामायणापर्यंत त्यांना विषयाला तोटा नव्हता. घरातील पुरुषांचा आणि बायकांचा रोल, पुरुषप्रधान संस्कृती, वाहावत चाललेली नवीन पिढी याबद्दल त्यांचे खास विचार आणि मते होती ( ) ती ऐकायला त्या तशा वातावरणात त्यांच्याच गावरान भाषेत मजाही येत होती. पुढचे चार ते पाच तास तेच बोलत होते आणि आम्ही दमत दमत कसेबसे श्वास घेत त्यांच्या पाठीमागे चालत होतो. बोलता बोलता त्यांच्या कडून कळले की पुर्वी त्यांच्या तरूणपणी ते डोक्यावर हिरड्याची बाजके घेऊन डोंगर चढून कुदळी किंवा जांभळीला जायचे. आम्ही हे इमॅजीनेशनच करुनच हबकलो.. धन्य. साधारण चार तास झाले आणि घुमटीला पोचल्यावर रवी आम्हाला भेटला. तो सकाळी दरे वरून महाबळेश्वर चढून आर्थर उतरून आम्हाला भेटायला आला होता.
पुढे रवीला बरोबर घेऊन आम्ही आर्थरला निघालो पण गप्पांना काही खंड नव्हता. पण आता गप्पांचा ट्रेंड बदलला होता. रवी हा नवीन पिढीचा असल्याने त्याचा सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. मोरे घरांमधील भावकी, त्यांचे तंटे, सणवार, काळानुरूप आवश्यक बदल असे बरेच काय काय. बोलता बोलता आम्ही गाढवमाळ पठारावर आलो त्याला निरोप दिला आणि पुढे आर्थरसिटला निघालो. नंतर फोन केला तेव्हा कळले की त्याला आम्हाला सोडून घरी पोचायला रात्रीचे ८ वाजले होते. हद्द झाली राव! त्या तश्या भयंकर जंगलातून रवी एकटा रात्री एका बॅटरीवर घरी गेला होता. पण त्याच्या दृष्टीने ते काहीच नसावे. जसे आपण शहरात रात्री १२ला स्टेशनवरून घरी जाऊ तसेच बहूदा.
त्या ट्रेकनंतरही माझा रवीशी अधून मधून संपर्क राहीला. एकदम मोकळाढाकळा माणूस. जे आत ते बाहेर. शिकायला शहरात होता तरी शहराचे "प्रदूषण" त्याच्या आरश्यासारख्या मनाला काही डागाळू शकले नाही. सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली ही लेकरे सगळी अशीच घडत असावीत बहुदा. त्याच्या घरी जाणे झाले नाही तरी कधीही गेलो तरी आपलेच घर असल्या सारखे त्याच्या अंगणात बसून गप्पा मारण्याएवढा, त्याच्या आईच्या हातचे गरमागरम पिठले भाकरी उसळ खाण्याएवढा घरोबा मी नक्कीच कमावलाय.
आता त्याच्याबरोबर एकदा ढवळे ते जांभळी असा रूट करायचाय. तो तयार आहेच, योग मला आणायचाय.
---------------------
<क्रमशः>
अशक्य भारी लिखाण आवडले म्हणजे
अशक्य भारी लिखाण आवडले म्हणजे काय आवडलेच!
पुढील अनेक भागांच्या प्रतिक्षेत
फारच सुन्दर रेखाटलीत
फारच सुन्दर रेखाटलीत शब्दचित्रे!! डोळ्यासमोर उभ रहातय सगळ.
अजुन येउ द्यात.
एक विनन्ती! सगळी शब्दचित्रे पुर्ण झाल्यावर एक पुस्तकच काढा!
अगदी सुंदर शब्दचित्रं !!
अगदी सुंदर शब्दचित्रं !!
काही तर (थोडी)रिलेट हि झाली.. मस्तच !
पुढील अनेक भागांच्या प्रतिक्षेत>>+१११
तुमचा हा लेख वाचुन गुगल आणी
तुमचा हा लेख वाचुन गुगल आणी युट्युबवर रायरेश्वर पठार धुन्डाळत असताना
इथे https://www.youtube.com/watch?v=guzoydq1KN0 दगडु जन्गम दिसला. आणि फोन नम्बर ही दिलाय त्याने.
भन्नाट! अहो एक एक
भन्नाट! अहो एक एक व्यक्तीचीत्र स्वतंत्र आणि सविस्तर लिहा हो. मजा येईल वाचायला.
भारीच लिहिलय!
एक सांगु का? तुम्ही
एक सांगु का? तुम्ही ट्रेकर्स लोक, जंगलातुन, डोंगरातुन, दर्या खोर्यातुन हिंडुन जे दैवी अनूभव गोळा करता आणी माणसे जोडता ना! ते आम्हा पांढरपेशांना सहज नाही जमणार! हो, मला खूप आवड आहे दर्या, जंगलातुन हिंडायची. थोडा प्रवास तसा झाला पण आहे. पण तुम्हा सर्वांचा मला चांगल्यासाठी हेवा वाटतो.
फार चांगल्या आणी निर्मळ मनाच्या बाया माणसांची ओळख तुम्ही घडवुन आणलीत त्याबद्दल अनेकोनेक धन्यवाद! अजून येऊ द्या तुमच्या सवडीने.
भन्नाट! अहो एक एक
भन्नाट! अहो एक एक व्यक्तीचीत्र स्वतंत्र आणि सविस्तर लिहा हो. मजा येईल वाचायला.
भारीच लिहिलय!+१
सह्याद्री मधल्या भटकंतीच्या
सह्याद्री मधल्या भटकंतीच्या कथा किंवा गप्पा - आठवणी अतिशय रम्य आणि आनंददायी असतात.
सूर्य - चंद्र , निळे आकाश , माती , झाडे , वेली , निर्झर , गुरे , डोंगर , वस्त्या , गावांबाहेरील मंदिरे , त्यातून झिरपणारे भजनाचे रांगडे स्वर , आणि या निसर्गाचाच भाग असलेली माणसे. ही एक कायमची रंगलेली मैफिल असते.
आवडली तुमची मैफिल....
छान लिहीले आहे. व्यक्ति
छान लिहीले आहे. व्यक्ति डोळ्यासमोर आल्या.
तुम्ही ट्रेकर्स लोक, जंगलातुन
तुम्ही ट्रेकर्स लोक, जंगलातुन, डोंगरातुन, दर्या खोर्यातुन हिंडुन जे दैवी अनूभव गोळा करता आणी माणसे जोडता ना! ते आम्हा पांढरपेशांना सहज नाही जमणार! >>> हा वरचा लेख लिहिणारे पांढरपेशे ट्रेकर आहेत हो.. जमतय सगळ्यांना.. ट्राय तर करुन बघा..
खूप सुरेख शब्दचित्रे .
खूप सुरेख शब्दचित्रे . जिजाबाई ,दगडू आणि रवी डोळ्यासमोर उभे राहिले.
हा लेख वाचायचा कसा काय राहून गेला माहित नाही .