मैत्री - वार्षिक कार्यक्रम २०१८

Submitted by हर्पेन on 4 July, 2018 - 06:55

मैत्रीने मेळघाटात काम करायला सुरुवात करून २१ वर्षे झाली. १९९७ च्या पावसाळ्यात, मेळघाटमधे कुपोषणानं होणारे बालमृत्यू रोखावेत म्हणून मैत्रीने काम सुरु केले. याही वर्षी धडक मोहिमेचे काम चालू झाले आहे. या दरम्यान मैत्रीचे काम चालू असलेल्या गावातले बालमृत्यूंचे प्रमाण तर खाली आलेच पण त्या व्यतिरिक्त ह्या गावांनी शिक्षण, शेती ह्या क्षेत्रांमधेही चांगली प्रगती केली आहे.

पहिली दहा वर्षे सोडता त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी मैत्रीचा एक वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. हा कार्यक्रम म्हणजे मैत्री चे स्वयंसेवक आणि हितचिंतक यांची स्नेहभेट असते. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरलेल्या वर्षातल्या कामांचा आढावा घेणे, नवीन वर्षात करायच्या कामाविषयी स्वयंसेवकांना आणि हितचिंतकांना सुचित करणे अशी कामे केली जातात. नवीन लोकांपर्यंत मैत्रीचे काम पोहोचवणे, त्यांना मैत्रीच्या कामाशी जोडून घेणे हा पण एक उद्देश असतो.

दरवर्षी मैत्री प्रमाणे मैत्रीचा या वर्षीचा वार्षिक कार्यक्रम शनिवार दिनांक १४ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत एस एम जोशी सभागृह, पुणे. येथे आयोजित करण्यात येणार आहे.

नेहेमीप्रमाणे यावेळी केवळ वर्षभरातल्या कामाचा आढावा घेणे आणि नवीन वर्षात करायच्या कामाविषयी सुचना देणे असे न करता मैत्रीचे एक संस्थापक स्वयंसेवक श्री. अनिल शिदोरे, एकंदरितच ह्या सगळ्या प्रवासाविषयी आणि इथून पुढे काय करायला पाहिजे ह्याविषयी त्यांचे म्हणणे मांडणार आहेत.

तरी सगळ्यांनी येण्याचे अगत्य करावे.

काय - मैत्रीचा वार्षिक कार्यक्रम
कधी - शनिवार दिनांक १४ जुलै २०१८
कुठे - एस एम जोशी सभागृह, निवारा वृद्धाश्रमाजवळ, नवी पेठ, पुणे.
केव्हा - संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान.

मैत्री कार्यालय संपर्क
०२०-२५४५०८८२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पुण्यात नसल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही पण मैत्रीच्या या कार्यक्रमासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

वार्षिक कार्यक्रम सुंदर रितीने संपन्न झाला.

या वर्षी या कार्यक्रमाकरता बाहेरील मान्यवर आमंत्रित नव्हते.
मैत्रीचीच अनिल शिदोरे, मुकुंद केळकर, शिरिष जोशी, अशोक धिकार, काळू बेठेकर, ओंकार भोपळे ई. मंडळी व्यासपीठावर विराजमान होती.
अनिल शिदोरे यांनी मैत्रीची गेली २१ वर्षे कशी गेली आणि पुढे काय काय करायचे आहे या संदर्भाने आपले म्हणणे मांडले आणि एकंदरित कार्यक्रमाचे सुत्र संचालनही केले.
शिरिष जोशी यांनी शेतीविषयक हाती घेतलेल्या कार्यक्रमा विषयी माहिती दिली.
अशोक धिकार धडक मोहिमे विषयी बोलले.
काळू बेठेकर हे मैत्रीचे निदान गेली दहा वर्षांपासूनचे कार्यकर्ते, ते मेळघाटातल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत त्यांनी ते सरपंच का झाले आणि त्यानंतरचा अनुभव सांगितला.
ओंकार भोपळे यांनी मैत्रीचे कार्यकर्ते म्हणून पहिल्याच वर्षी काम करताना एक पूल कसा बांधला त्याबद्दल जीवन समृध्द करणारा अनुभव सांगीतला तसेच चालू शैक्षणिक वर्षात मेळघाटात राबवल्या जाणार्‍या मैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी ह्या उपक्रमा विषयी माहिती दिली. https://www.maayboli.com/node/66719

मैत्रीचे अ-नियतकालीक इंद्रधनूचे प्रकाशन ही यावेळेस करण्यात आले.

मुकुंद केळकरांनी रक्तदान नेत्रदान आणि पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरवणे ह्या तीन गोष्टी काळाची गरज बनल्या आहेत आणि त्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्या पातळीवर कार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

जयुताईंनी आभार प्रदर्शन केले आणि नेहेमी प्रमाणे पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top