तुमचा रात्रीचा मेन्यु काय असतो?

Submitted by रश्मी. on 2 July, 2018 - 06:43

दररोज रात्री जेवायला काय करावे हा नेहेमी प्रश्न असतो. जनरली, दुपारची भाजी सगळे खातीलच असेही नसते. सकाळी सगळे नाश्ता करतात, दुपार च्या जेवणासाठी सुकी किंवा पातळ भाजी किंवा उसळ, फुलके / पोळ्या, वरण/ फोडणीचे / आमटी/ सार/ कढी असते. हे तर पोटभर होते, पण प्रश्न येतो रात्रीचा. त्यात घरात जर वाढत्या वयाची मुले / मुली असतील तर आणखीन प्रश्न असतो.

माझ्या कडे आठवड्यात आलटुन पालटुन रात्री थालिपीठ / फुलके + भाजी / तव्यावरचे किंवा पातळ पिठले+ पोळ्या किंवा भात/ खिचडी / चायनीज फ्राईड राईस ( मुलगी व नवरा खातो ) / चिकोले म्हणजे वरणफळे हे मी व सासुबाईच खातो, नवरा व मुलगी या चिकोल्यांचे नाव काढले की पळतात. मग त्यांच्यासाठी परत काहीतरी वेगळे बनवा.

तुम्ही सर्व काय करता? कोणता मेन्यु असतो? वर मी जे लिहीले आहे ते होत असेलच पण तुमचेही प्रतीसाद स्वागतार्ह आहेत. तेव्हा प्लीज सुचवा.

जर आधी कोणी असा धागा विणला असेल तर मला सांगा, म्हणजे मा. अ‍ॅडमीन हा धागा उडवु शकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असू दे कि हा पण धागा. आधीच्या अवल यांच्या धाग्यावर दिवसभरात जेवायला काय करू हे आहे. पण रात्री शकयतो पटकन होणारा, पचायला सोप्पा, वन डिश मिल असेल तर उत्तम असा मेनू हवा असतो. असे मेनू वाचायला आवडतील किंवा गरज आहेच मलाही. मीही नंतर यात भर घालते.

रात्री शकयतो पटकन होणारा, पचायला सोप्पा, वन डिश मिल असेल तर उत्तम असा मेनू हवा असतो. असे मेनू वाचायला आवडतील किंवा गरज आहेच मलाही. +१११११

२ मोठे गाजर आणि एक मोठी काकडी १ टोमाटो यांचा सलाद.
सोबत साधारण १०० ग्राम हिरवे पाले त्यावर हळद, मीरपूड टाकून.
एक ते दोन भाकर्‍या किंवा पोळ्या सोबत वरण, भाजी कधी वरणा ऐवजी पिठले.

ओट्स +आमटी/फोडणी चे वरण+दही + ग्रीन सलाद/कोशिंबीर
ओट्स ऐनवेळेस करते. बाकी आमटी, कोशिंबीर सकाळीच करते, पोळी-भाजी, ब्रेफा बरोबर.

आमची सकाळी, दाल + राईस + सबजी + चपाती,
दुपारी, दाल + राईस + सबजी + चपाती,
रात्री, दाल + राईस + सबजी + चपाती.
(फक्त भाजी बदलत जाते, बाकी तेच!)

सकाळी, आमटी + भात + भाजी + पोळी + कोशिंबीर
दुपारी, पोळी + भाजी + कोशिंबीर
रात्री, आमटी + भात + भाजी + पोळी
(फक्त भाजी बदलत जाते, बाकी तेच!)( आमटी ऐवजी कधीतरी नुसतंच वरण, कधीतरी कांदा, मुळा, टोमॅटो घालून आमटी, किंवा मधूनच दालफ्राय, सांबार, असले प्रकार) रात्री शक्य झाल्यास पालेभाजी आणि ती असेल तर बरोबर ज्वारी/बाजरीची भाकरी, रात्रीच्या भातात पण काही तरी बदल हवा असेल तर कॉर्न राईस, खिचडी, तोंडली भात, मसाले भात, पुलाव असे काही पर्याय..

सकाळी स्वैपाक करतानाच एखादी रस्साभाजी वेगळी संध्याकाळसाठी करून ठेवायची. त्या रगाड्यात वेगळा असा फार वेळ लागत नाही. संध्याकाळी वाटलं आणखी काही हवं तर एखादी कोशिंबीर करायची ताजी. वरण-आमटीबाबत हिम्सकूलने लिहिल्याप्रमाणे हवं असल्यास सकाळच्या वरणाचा पाच मिन्टात होईल असा काहीतरी प्रकार करायचा. हाकानाका...

मी विशिष्ट शहरातल्या विशिष्ट भागात मोठी झालेली असल्याने सकाळचाच स्वैपाक संध्याकाळी - पुरवठ्याला गरम भाकर्‍या / एखादी पालेभाजी किंवा कोशिंबीर/ फार लाड म्हणजे आमटीचे वेगवेगळे प्रकार अशा पद्धतीत वाढले आहे. संध्याकाळी नियमितपणे पूर्णपणे वेगळा स्वैपाक ही माझ्यासाठी अचंब्याची गोष्ट आहे Wink Light 1

आमच्या खानदेशात बहुतेक घरांत

आमच्या खानदेशात बहुतेक घरांत रात्रीचं जेवण म्हणजे खिचडी. अगदी रोज केली तरी चालते.

तेव्हा,
१.

मस्त फोडणीची खिचडी. मुगाची किंवा तुरीची. त्यात कांदे बटाटे शेंगदाणे. असतील नसतील, मूड असेल नसेल तसे. वर कच्च्या तेलाची धार. असलाच तर नागलीचा पापड किंवा बिबडी भाजून. गेला बाजार उडदाचा पापडही काही टोचत नाही. हौशी असलात तर ताकातली मिरची तळून. असंच चिबूडही करतात तळून तोंडी लावायला. (खानदेशातली गुजरात बॉर्डर, कमी तिखट मिर्ची दही मीठ लावून वाळवलेली. पळीत तेल गरम करून त्यात दोन लस्णाच्या पाकळ्या अन या वाळवलेल्या मिरच्या तळायच्या. ऑस्सम!)

खिचडी कधी ताकात, कधी चक्क दूध घालूनही खाल्ली जाते.

खिचडीची खरवड अर्थात भांड्याला खाली 'लागलेली' खरपूस खरड. हा माझा वीक पॉइंट आहे.

उरलीच तर सकाळी पुन्हा याच खिचडीला फोडणी घालून नाश्ता होतो.

बरं नसेल तर 'साधी खिचडी' ही युज्वली तुरीची. फक्त हळदमीठ घालून केलेली. असट खिचडीवर लोणकढ्या तुपाची धार घालून सोबत लसणाचं तिखट (लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ एकत्र कुटून)

२.

भाजी भाकरी.

यातली भाजी म्हणजे पालेभाजी असली, तर सुमारे १०० ग्रॅम भाजी ५ लोकांना पुरेल अशी करतात. अर्थात, भरपूर पाणी, कांदा - लसूण - मिरचीची फोडणी. ही भाजी 'मुरगळलेल्या' अर्थात कुस्करलेल्या ज्वारीच्या गरमागरम भाकरीवर ओतून काला करायचा अन सोबत कांदा फोडून किंवा चटणी तोंडी लावायला घेऊन हाणायचा. भाकरी पाणी पिते. म्हणून बट्टं उर्फ रस्सा पातळच करावा लागतो.

पण भाकर सहसा दुपारच्याला. संध्याकाळी खिचडीच. (इकडे १ असली तर भाकर. अनेक भाकरी. 'तिकडे' भाकरी अन भाकर्‍या होतं.)

३.

दुपारच्या उरवठ्याला पुरवठा.
पिठलं, वेगवेगळ्या फोडणीच्या डाळी. यातली काळी उडीद डाळ फेमस आहे.
सोबत दुपारच्या पोळ्या/भात. कमी पडल्या तर दशम्या, गाकर इ.

४.

डालफळं उर्फ चिखल्या, चिकुल्या उर्फ 'होल व्हीट Maltagliati पास्टा इन स्पायसी लेंटिल सॉस विथ अ डॅश ऑफ ग्राउंडनट ऑइल, सर्व्ह्ड विथ क्रॅक्ड रॉ अन्यन'

मोठी लिस्ट आहे. नंतर लिहिन जमेल तसं.

<<<आमच्या खानदेशात बहुतेक घरांत रात्रीचं जेवण म्हणजे खिचडी. अगदी रोज केली तरी चालते.<<<<
क्या बात,आरारा!! छान सांगितलंत!

आम्हा खांदेशींचा रात्री जास्त पसारा नसतो. खिचडीचा हंडा चढवला की त्याबरोबर कढी, पापडाचा कुस्करा, दुपारची चपाती, लोणचं पापड, शेंदडया तळलेल्या, वांग्याचे काप तळून चालते. दुपारच्या उरलेल्या चपाती/ भाकरीसोबत कच्ची मेथी/ पालक/ कांदापातीचा खुडा असतो. कधी त्यासोबत शेवची भाजी, अंडा भुर्जी, वाटल्या डाळीचं पिठलं, थालीपीठ, बोंबलाची चटणी होतं. मला स्पेशली ताटात वाहात पिठलं आवडतं, कोंबडी पिठल्यापेक्षा!

पाव्हणे जेवायला असले की याच खिचडीबरोबर फिश तळून, खोबऱ्याची आमटीत टाकून नैतर चिकन मटण, अन चपात्या.. काहीही!

सगळे मेनू वाचून मस्त वाटलं.
माझी रूम मेट चोपड्याची होती.हातावर कळणा भाकरी आणि स्पेशल जळगाव वांग्याचं भरीत जबरदस्त करायची.
कळणा रेशो प्रमाणावर भरपूर प्रयोग करून झाले पण तशी तिच्यासारखी टेस्ट अजून जमली नाही.चकोल्या पण सॉलिड आवडतात.सगळ्या कुटुंबा बरोबर शेअर कराव्या लागतात ही एकच जरा प्रॉब्लेम गोष्ट ☺️☺️☺️☺️ एकदा बाहेर धबाधब पाऊस, आणि आत शनिवार रात्री मस्त एकटी असताना चकोल्या करून तुपाबरोबर खाऊन ताट चाटायचेय.अर्थात हे एकच रात्र...परत रविवारी सगळं शेअर करायला फ्यामिली परत यायला हवीच.

शेंदडया= चिबूड = एक तोंडल्यासारखा कडसर काकडीचा प्रकार, बांधावर बहुतेकदा आपोआप उगवणारा. रानभाजी प्रकारातला.

कच्ची मेथी/ पालक/ कांदापातीचा खुडा
<<
सरप्रायजिंगली हा आयटम फार लोकांना ठाऊक नाहीये असं ध्यानी आलंय.
याची सोप्पी रेस्पि टाक पाहू आर्या बैन.

कळणा रेशो

माबो सर्च करा. आहे लिहिलेला. ३त १ ज्वारी:उडीद. खरी चव उरसुर मुळे येते.

रात्रीचं करायला आमच्याकडे कुणालाच वेळ नसे. त्यामुळे एखादी भाजी बाहेरून मागवणे आणि वरण भात किंवा आमटी यावरच वेळ मारून न्यायचो. सीझनप्रमाणे ताक किंवा असे काही जेवणानंतर. पावसाळ्यात वातुळ टाळतो. वांगे नो !
पटकन होणारा पदार्थ म्हणून कार्ल्याच्या पातळ चकत्या तळून. त्याबरोबर भात, पोळी काहीही चालते. अपवाद वगळला तर रात्रीचे जेवण माफक असते. उशीर झाला तर मग दूध गरम करायचे कि झाले. मुलांना मात्र फ्रीजमधली पनीरची भाजी गरम करून द्यायची. रात्री हे असंच असतं आमच्यात,

ईंटरेस्टींग धागा आहे!

माझा रात्रीची जेवायची सर्वसाधारण वेळ साधारण 11 आहे. सध्या बिगबॉसमुळे साडे अकरा झाली आहे. पण रात्री साडेबारा एकपर्यंत जेवणेही माझ्यासाठी नॉर्मल आहे.

1) सातपैकी सरासरी तीन डिनर बाहेरचे खाणेच असते. शक्यतो बाहेर न जाता ऑर्डर केलेले. एकूणच रात्री चमचमीत खायला आवडते. कारण दुपारी ऑफिसवेळेत बोअर खाणे होते. ऑफिसच्या वातावरणात आणि कामाच्या टेंशनमध्ये पंचपक्वान्नांचा आस्वाद घेता येत नाही. ते रात्रीच मजा करत खाणे योग्य हा त्यामागचा विचार.

2) रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने नॉनवेज असते. मला मांसाहार रात्रीच्या जेवणात करायला जास्त आवडतो. याच कारणामुळे बाहेरचे खाणे जास्त होते कारण घरी अंडयाव्यतिरीक्त काही बनत नाही आणि मला अंड्याला नॉनवेज बोलायला अगदीच जीवावर येते. ते दुपारी डब्यातच बरे वाटते

3) नॉनवेज खायचे नसल्यास वेजमध्ये पहिली पसंती चायनीजला असते. अन्यथा पावभाजी, पराठे, डोसा, रोटीशोटी, पनीर स्टार्टर, बर्गर पिझ्झा.. ईत्यादी ईत्यादी बरेच चालते.
सध्याच्या पावसाळी वातावरणात मिक्स पकोडा, मिसळपाव वगैरे पदार्थांचाही बेत घरी वा बाहेरून ऑर्डर करून बनतो.

4) घरच्या जेवणात भात मला लागतोच. त्याशिवाय घरचे जेवल्यासारखे वाटत नाही.

5) रात्रीचे ताक पिऊ नये असे म्हणतात. खरे खोटे माहीत नाही. पण मला ते प्रचंड आवडते ! थंडी पावसाळा असेल तर मोह आवरतो. आणि काही कॉम्बिनेशन सोबत ताक बरोबर वाटत नाही, जसे की चायनीज आणि मासे.. तरी 365 पैकी 200 रात्री ताक पिणे होते. ताक मी पाण्याच्या जागी पितो. म्हणजे जेव्हा ताक पितो तेव्हा पाणी पितच नाही. जेवणाच्या अध्येमध्ये घोट घोट आणि शेवटी उरलेसुरले असे मोठा तांब्याभर ताक लागते. ताक चांगले मिळते म्हणून बरेचदा भगत ताराचंद वा नानूमल भोजराज अश्यांच्या वेज थाली मागवतो. तिथले जेवण कमी खातो पण ताकच दिड बाटली रिचवतो Happy

6) रात्री उशीरा झोपत असल्याने कॉफी पिणे हा छंद कम गरज कम व्यसन आहे. ते सुद्धा मोठा मग भरून लागते. ईतरवेळी मात्र चुकूनही कॉफी गिळवत नाही. हे पेय खास नाईट स्पेशल आहे.
कॉफी सोबत खारी, केक टोस्ट, गूड डे बिस्कीट आणि पोह्याचा चिवडा हे पदार्थ आवडतात.

7) म्यागी ! हा एक स्वतंत्र अध्याय आहे. म्यागी खाण्याचीही सर्वाधिक मजा रात्रीच !

8) कधी कॉफी प्यायचा मूड नसेल तर दूधात फरसाण टाकून खायला आवडते.

एकूणात खाण्याची हौसमौज रात्रीच जास्त होते.
तसेच रात्री अर्धपोटी मला झोप लागत नाही. त्यामुळे रात्री हलका आहार घ्यावा हे कन्सेप्ट मला झेपत नाही.

आताही मुंबईत रात्रीचे अडीच वाजले आहेत. आणि आताही मी कॉफीचा मग सोबत चकणा म्हणून बारीक पिवळी शेवचा आस्वाद घेत घेत वरची पोस्ट लिहिली आहे Happy

कच्ची मेथी/ पालक/ कांदापातीचा खुडा>>>
आमच्यात असा करतात - मेथी किंवा पालक किंवा कांद्याचे पात बारीक चिरून त्यात तिखट मीठ आणि कच्चं तेल घालुन कालवायचं. गरम भाकरी, पालेभाजी/पातळ भाजी बरोबर खायचा.

भभा साहेब,
तुमचा आहार वाचून बकासुर ही लाजेल. किती ते वैविध्य?

१) ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि पातळ पालेभाजी जसे मेथीची भाजी पातळ पालक, आंबटचुका
पिठले आणि भाकरी
२) दशम्या - हिरवाय पालेभाज्या घालून, दुधीच्या भोपळ्याच्या
३) दूध शेवाळ्या
४) मसालेभात
५) ठेचा आणि भाकरी
६) डोसा आणि बटाट्याची भाजी
७) मिश्र पिठाची धिरडी
८) उकडशेंगोळे – ज्वारीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, हिंग, जिरं घालून भिजवा. त्याचे शेंगोळे करा. नेहमीसारखी फोडणी करून त्यात ठेचलेला भरपूर
लसूण घाला. तो लाल झाला की थोडी हळद. तिखट घाला. भरपूर पाणी ओता. उकळी आली की शेंगोळे घाला. शिजवा. वरून लसणाची चटणी
आणि तूप घालून खा.
९) मिसळ – मटकीची, मुगाची किंवा कुठलीही उसळ जराशी पातळ आणि मसालेदार करा. वरून हवं असल्यास फरसाण किंवा घरी केलेला चिवडा,
बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, कोथिंबीर घालून खा. हवा असल्यास बरोबर ब्रेड घ्या.
१०) सँडविच -
दही डिप सँडविच १ – दही एखादा तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात कांदा, सिमला मिरची, थोडी सेलरी आणि हिरवी मिरची हे सगळं
बारीक चिरून घाला. त्यात मीठ घाला. हे डिप ब्रेड स्लाइसला लावा. आवडत असल्यास त्यावर थोडा टोमॅटो सॉस घाला. वरून दुसरा स्लाइस ठेवा.
दही डिप सँडविच २ – दही एक तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात वाटलेलं लसूण-मिरची घाला. मीठ-मिरपूड घाला. बारीक चिरलेली
सिमला मिरची घाला. हे डिप लावून सँडविच करा.
टोस्टेड सँडविच – ब्रेडला पुदिना चटणी लावा. वर उकडलेला बटाटा आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवा. वर किसलेलं चीज घाला. मीठ-मिरपूड घाला. दुसरा
स्लाइस ठेवून सँडविच करा. टोस्टरमध्ये बटर लावून टोस्ट करा.
चिकन सँडविच – श्रेडेड बोनलेस चिकन उकडा. ब्रेडला रेडीमेड मेयोनीज लावा. त्यावर किसलेला कोबी घाला. त्यावर उकडलेलं चिकन घाला.
मीठ-मिरपूड घाला.

रात्री बरेचदा ज्वारीची भाकरी, तव्यातल मिरची कोथिंबिर घातलेले पिठलं, तोंडी लावायला पापड, कांदा किंवा
लोणचं, भात

वरण भात, भाकरी, भाजी
आमटी भात, पोळी किंवा भाकरी,
पातळ भाजी, भाकरी
कढी, भात, पोळी
पालेभाजी, भाकरी
शनिवारी बरेचदा मसालेभात (खिचडी) दही, प्पापड किंवा इडली चटणी
किंवा मिक्स डाळीचे वडे, चटणी, सांबर

तोंडी लावणं मस्ट! Happy

१०) सँडविच -
दही डिप सँडविच १ – दही एखादा तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात कांदा, सिमला मिरची, थोडी सेलरी आणि हिरवी मिरची हे सगळं
बारीक चिरून घाला. त्यात मीठ घाला. हे डिप ब्रेड स्लाइसला लावा. आवडत असल्यास त्यावर थोडा टोमॅटो सॉस घाला. वरून दुसरा स्लाइस ठेवा.
दही डिप सँडविच २ – दही एक तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात वाटलेलं लसूण-मिरची घाला. मीठ-मिरपूड घाला. बारीक चिरलेली
सिमला मिरची घाला. हे डिप लावून सँडविच करा.
टोस्टेड सँडविच – ब्रेडला पुदिना चटणी लावा. वर उकडलेला बटाटा आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवा. वर किसलेलं चीज घाला. मीठ-मिरपूड घाला. दुसरा
स्लाइस ठेवून सँडविच करा. टोस्टरमध्ये बटर लावून टोस्ट करा.
चिकन सँडविच – श्रेडेड बोनलेस चिकन उकडा. ब्रेडला रेडीमेड मेयोनीज लावा. त्यावर किसलेला कोबी घाला. त्यावर उकडलेलं चिकन घाला.
मीठ-मिरपूड घाला.

<<

हे सँडविचच्या धाग्यावर हलवा

न्याहारी आणि दुपारचे जेवण यात चपाती, भाकरी किंवा घावन आणि भाजी याचा जास्त करून याचा मारा असल्याने आणि कोकणी बाणा/पणा राखण्यासाठी रात्रीच्या जेवणात आमच्याकडे चपाती-भाकरी नसते.
१. आमटी/आंबट वरण/साधं वरण आणि भात आणि कुठलीही भाजी (तूर, मूग, सालवाले मूग, मसूर, वालाची डाळ अशी कुठलीही आमटी)
२. अंडा /सोडे/सुकट/सुके बोंबील व बटाटा कालवण आणि भात
३. पिठलं भात (कुळीथाचे पिठलं जास्त आवडीचं)
४. वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या: साधी मुगडाळ खिचडी, साल वाल्या मूग डाळीची मसालेदार खिचडी, मसूर डाळीची खिचडी, पालक खिचडी, भाज्या घालून खिचडी
५. इतर कोकणी खिचड्या: बिरड्याचा / वालाचा भात, अक्खे मूग किंवा मसूर भात, मटार भात, सोडे भात, कोळंबी भात,
६. शिळ्या भातापासून- फोडणीचा भात, चायनीज फ्राईड राइस, चिन्च किंवा टोमॅटो भात, दही भात,
७. नूडल्स, पास्ता, नूडल्स सूप, सूप आणि टोस्ट केलेले ब्रेड,
८. वेगवेगळ्या प्रकारचे शॅलोफ्राय कटलेट, सलाड आणि ब्रेड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॅन्डविच
९. पावभाजी, दाबेली, रगडा पॅटिस, टोमॅटो आमलेट, चपात्या जास्त उरल्या असतील तर फ्रँकी किंवा रोल
१०. खूपच कंटाळा आला असेल तर कांदा-तेल-तिखट आणि भात किंवा दूध पोहे खोबर

साधारण या प्रकारात आमचं रात्रीच जेवण असत. पास्ता, नूडल्स, पावभाजी सारखे पदार्थ शक्यतो शनिवारी रात्री केले जातात.

करडईच्या पानांचा कोणी खुडा करते की नाही?
गावाकडे आम्ही स्वतः खुडून करत असू. आमचे गाव लहान खेडे नव्हते पण कोण जाणे, हनुमान मंदिराला जाताना रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजूने कर्डई लावलेली होती, शेतकरी करडई पाने खुडायला कधीच नाही म्हणत नाही, कारण अजून जोमाने वाढते तोडली की.. तसे भाजीबाजारात ही पाने अतिशय स्वस्त मिळायची, पन जून झालेली असायची. मेथी, करडई पाने खुडा गेले कित्येक वर्षात खाल्ला नाही.
हा धागा आवडला आहे.
आमचेकडे रात्री व.भात, पुलाव खिचडी इ.इ. थोडक्यात भातावर भर.
कधीतरी कंटाळा आला की नुस्ते फो. पोहे,उपमा ,
कधी व.फळे.
मुले घराबाहेर पडल्याने चारीठाव, चवीढवीचा स्वै. रात्री होत नाही..

वा! सगळ्यांनी मस्त प्रतीसाद दिले आहेत. Happy मला वाटले की धागा उडाला, कारण मीच तशी विनंती केली होती. धन्यवाद प्रतीसाद देणारे आणी अ‍ॅडमीन यांना.

आरारा व मी आर्या यांचे खानदेशी पदार्थ वाचुन तोंपासु झाले. माझी काकु बट्ट्या आणी वरण खूप छान करते, बाकी भरीत वगैरे तर फर्मास.

घरात पावभाजी व शेवभाजी यांचे मेंबर आम्ही तिघेच, बाकी ज्येष्ठ नागरीक. मग कधी कधी संध्याकाळी ओली व सुकी भेळ तर कधी पाणीपुरी असेल तर जेवण नाहीच. रात्री फक्त कोमट दूध. तिखटामिठाच्या पुर्‍या केल्या की मग लसुण घालुन खोबर्‍याची चटणी वा लोणचे असते. पुर्‍या नाही केल्या तर त्याचेच परोठे केले जातात. कधी मग रवा डोसा + टॉमेटो सॉस वगैरे असते.

धागा बुकमार्क केलाय.

बाकी ऋन्मेष, तू वरचे लिहीलेले वाचुन वाईट वाटले. घरी रात्री ९ पर्यंत येत असशील तर ११ का वाजतात जेवायला? आणी जागरणे पण, त्यातुन चायनीज, पिझ्झा आणी बर्गर? हे कधीतरी कोजागिरी जागवायला ठीक आहे.

एकदा खानदेशात जाऊन मुक्काम करायला पाहिजे, किंवा एखादं फील्डवर्क काढलं पाहिजे म्हणजे निवांतपणे या तोंपासु पदार्थांचा आस्वाद घेता येईल. Proud
मेथीचा खुडा खाल्लाय एका खानदेशी मूळ असलेल्या मैत्रिणीकडे. त्यांचा स्वयंपाक एरवीही फार चविष्ट असतो..

सगळ्यांचेच मेनू छान .
संध्याकाळी भाकरी आणि पातळ भाजी , भात ,कोशिंबीर असते .
कधी बदल म्हणून १)tomato सूपआणि पुलाव , २)कढी आणि मुगाची खिचडी ३) वेज क्लीअर सूप /मंचाव सूप आणि फ्राइड राइस /पास्ता
४)सोलकढी आणि बिर्याणी ५) बटाट्याचे सारण भरून टोस्ट/ पराठे आणि दहीभात ६) ब्रेड आणि मटार उसळ / कांदा बटाटा रस्सा/ शेव भाजी/ मिसळ ७) वेगवेगळे पराठे ८) मसाला डोसा / उत्तप्पा ,चटणी,,सांबार

क्वचित एखादे वेळी घरी सातच्या आत सगळे असू तर मग आमच्याकडे मासवडीचा बेत असतो. नेटवरून शिकून घेतलीय ही वडी. ज्या वेळी आमच्याकडे हा बेत असतो तेव्हां फक्त आमच्यासाठी करून चालत नाही. शेजारची तिन्ही घरं पण मासवडीची वाट बघत असतात. त्याचं म्हणणं नॉन व्हेजच्या थोबाडीत मारेल अशी डिश आहे. मूळची चव माहीत नाही. त्यासाठी खानदेशात जायला हवं एकदा. कुठेतरी नगर रोड ला मिळते म्हणतात. कुणाला माहीत असेल तर कळवा.

पण उशीर झाला रात्री तर खाऊ नये. मासवडीच असं नाही पण पिठलं, वांगे, अभक्ष्य असे कुठलेही पदार्थ किमान पावसाळ्यात तरी रात्री उशीरा खाऊ नयेत.

या दिवसात (पावसाळी) रात्री गरम गरम रस्सम मिळालं तर कधीच ना नसते. मग उशीर झालेला असला तरीही. रस्सम भात माझा फेव्हरीट आहे. मुलांसाठी भाताबरोबर काही तरी वेगळं करावं लागतं. तमीळ पद्धतीचं रस्सम सर्दीसाठी औषध आहे.

रात्री बहुधा सकाळचं काय उरलंय त्यावर ठरतं आमच्याकडे.
एक-दोन वाढपाची पोळी भाजी (बहुधा ही नसते; कारण सकाळच्याला डबे-डुबे असतात म्हणून) असेल तर मग भात-खिचडी पिठल्याचा प्रोग्रॅम असतो. आमच्याकडे कुळीथ नसतातच सो चण्याच्या पिठाचंच पिठलं असतं. त्यात मात्र बदल असतात कधी टोमॅटोच, कधी कांदा-लसणाचं, कधी नुसत्याच मिरची-कोथिंबीर-कढिपत्त्याचं इ.
सकाळी जर शिजवलेलं वरण काढून ठेवलेलं असेल तर त्याचं तर्‍हेतर्‍हेचं फोडणीचं वरण - गरम भात इ.
सगळीच पब्लीक असेल जेवायला तर मग पोळ्या/भाकरी ही घडतात (अर्थात भाजी वगैरेही)

मी न बायडीच असलो तर मग काहीही चालतं आम्हाला, पोहे, उपमा, उकडपेंडी, भात पिठलं, खिचडी, दही-भात; सकाळच्या उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा फोडणीला घालून, वरणफळं (ही फार जास्त प्रमाणात करावी लागतात आणि शेअर करावी लागतात), मिसळ, उसळ-पाव इ. कधी सँडविचचा पण घाट असतो

आमच्याकडे सोम ते शुक्र दुपारचं जेवण हा प्रकारच नसतो. मला त्या दिवशी त्या वेळी जे खायचा मूड असेल ते खाऊन मी कामाला बाहेर पडते. मुलांचे डबे असतात त्यानुळे रात्रीचंच जेवण काय ते. आठवड्यातून २,३ दिवस पोळी, २ भाज्या. शुक्रवार आणि शनिवार रात्र काहीतरी टाईमपास भेळ वगैरे. उरलेल्या वारी जे अवलेबल असेल त्याप्रमाणे डोसे-सांबार, खिचडी कढी, पास्ता किंवा वरण भात्/आमटीभात वगैरे.
जेवणं बिवणं करायचा अती उत्साह नसल्यामुळे फार वेळ किचनमध्ये घालवायला जिवावर येतं.

सूप व ब्रेड, आज कूका नावाच्या वेगळ्याच सिंगापुरी फ्लेवरच्या नूडल्स भेटल्यात त्या बनवून फस्त. हॉस्टेल स्टाइल. . भंभाजी तुम्ही आणून बघा. बिग बजार मध्ये मिळतात. मॅगी पेक्षा वेगळे आहे मटेरिल व फ्लेवर्स. आता घरातील इतर आवरा आवर मोजकी भांडी घासून वगैरे गरम चहा व मारी बिस्कीट.

मला पण रात्री काही करायची आजिबात एनर्जी नसते त्यामुळे सकाळीच बरीचशी तयारी करून जाते. जसे ( लेकीसाठी एक दोन चिकन ग्रिल नाहीतर फ्राय मॅरिनेट) दोस्याचे इडलीचे पीठ असतेच घरचे, हांडवो म मिक्स आ ण ले आहे. ते/ थालीपीठ, ऑटाफे उपासाची शेंगदाणा आमटी, वरीचे तांदूळ व परतलेली बटाटा भाजी तूप जिरे फोडणी वाली.

मटार पोहे, गरम सांजा, शिरा कधी मधी करत असे आता गोड नाही. पण मला स्वतःला घरचे ताजे थोडेसेच पण मीच बनव लेले खायला आव्डते. फारच दमणूक झाली असेल तर काही ऑर्डर करतो. बेहरोज बिर्याणी फॉर टू मागवली की ती नेक्स्ट डे ब्रेफा पण होते. हैद्राबादी असल्याने शेवटचे शीत पण मोजून खातो बिर्याणीतले. व ओ दे ऑल्सो मेक पनीर बिर्याणी करून हसायला येते. देअर इज नो सच थिंग रिअली. ( हलके घ्या. )

डोमिनोज चे स्टफ गार्लिक ब्रेड. हे एक मला बास होते.

मस्त धागा.

रात्री शक्यतो पिठलं भात (मोस्टली कुळीथ, कधी बेसन), आमटी भात, कढी भात. डाळढोकळी, खिचडी (कधी साधी मुगडाळ कण्या किंवा पतंजली पुष्टिहार दलिया भाज्या घालून), भाज्या घालून पास्ता, भाज्या घालून maggie, थालीपीठ, धिरडी, मऊभात सोलकढी, झुणका भाकर (कधी घरी करते भाकऱ्या कधी बाहेरून). पावभाजी, पावसाळ्यात किंवा थंडीत गरम मसाला आमटी भात (नवऱ्याला पाव आवडतात या आमटीबरोबर), कधी टोस्ट sandwitch, मिश्र डाळ भजी त्यासोबत कढी भात किंवा मऊभात. कधी चाट सलाड भेळ. उसळ कळण भात, ति मि पुऱ्या आणि चटणी, कधी पराठे वेगवेगळ्या प्रकारचे, ठेपले, पोळी आणि रस्सा भाजी. बाकी आठवेल तसं लिहेन. सोबत कोशिंबीर, कधी पापड. लोणचे, मिरची, लसणीचं तिखट etc. काहीतरी गोड लापशी, खीर अधूनमधून.

>>आज कूका नावाच्या वेगळ्याच सिंगापुरी फ्लेवरच्या नूडल्स भेटल्यात>> अमा, भेटल्यात? चला, हात धरुन मराठी व्याकरण बीबीवर नेते. Wink

मेथिचा खुडा:- मेथि निवडुन शक्यतो पाने घ्यावित, निट धुवुन निथळुन थोडि सुकी होवु द्यावि मग फार बारिक नाही अशी चिरुन घ्यावी.त्यात बारिक चिरलेला कान्दा, लसणाची नाहितर तिळेची चटणी, तेल्,मिठ घालुन कालवुन घ्यावे जस्ट वाढायच्या आधी २-३ उडदाचे पापड भाजुन त्यात मध्यम चुरुन घालुन हलके कालवायचे... बरोबर गरम भाकरी! ..

मा, भेटल्यात? चला, हात धरुन मराठी व्याकरण बीबीवर नेते. Wink>>> हे हे हे खरेच भेटल्या म्हणजे दिसल्याच नुसत्या. वट्ट दोन पाकिटे आणली बिग बझार मधून काल एक आज एक अश्या हिशेबाने. मला फक्त शिजल्यावर वास घ्यायला मिळाला. लक्सा फ्लेवर व सिंगापूर फ्लेवर आहे. लक्सा जरा खाउ सोई टा इप आहे.

अंजू, स्टफ्ड गार्लिक ब्रेड म्हणजे साधारण एक मोठ्या पराठ्याचा ऐवज आहे. आत मक्याचे दाणे हालापिनो पेपर्स व काही बटर वगैरे असते. खरपूस भाजून देतात. ऑर्डर दिल्यावर फ्रेश करतात. एका वेळी एक भरपूर होतो मला. वरोबर चीजी डिप घे. बरोबर मसाल्याची पाकिटे येतात ती हवी तेव्ढी वापरायची.

इथे नवीन बोनलेस चिकन विंग्स पण मिळू लागले आहेत. व रोस्टेड चिकन विथ बोन्स असतेय ते. बारकी पुडी येते
पण पोट भरीचे स्नॅक्स होतात. मेन म्हणजे रात्री तीन परेन्त डिलीव्हरी असते. स्लीप ओव्हर किंग आहे डॉमिनोज.

Pages