मी सोडून सारी लाज...

Submitted by राजेश्री on 2 July, 2018 - 23:23

मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचले आज....

गेली वर्षभर कोल्हापूरला ऑफिसला जाताना आम्ही गाडी घेऊन जात होतो.मी,दीपाली,वर्षा आणि सविता अशी आमची रोजची गट्टी जुळून आली होती.मग गाडीतून पाऊण ते तासाभराचा प्रवास या प्रवासात आमच्याही नकळत आमच्या सर्वांची ताला, सुरांची गट्टी जमून आली होती. प्रत्येकाची एक एक फर्माईश असायची कधी पूर्ण वेळ गाडीत लता मंगेशकर ऐकायचो,कधी किशोरदा, आर.डी. बर्मन,मोहम्मद रफी अशी मूड वर ऐकली जायची ही गाणी ,कधी यू ट्यूब वर रेडिओ शो असायचे ,कधी एखादा सिनेमा ठरवून त्यातील सर्व गाणी ऐकली जायची.एकदा आम्ही लता मंगेशकर यांनी गायलेली मराठी गाणी ऐकायचे ठरवले आणि हे गाणं ऐकताना खरंच बहरली वीज देहात ...
मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज
की घुंगरु तुटले रे, की घुंगरु तुटले रे

या ओळी सुरू होण्यापूर्वी जे मराठी संगीत सुरू होतं त्यातून पुढे कोणत्या ओळी येतील काही कल्पना न येता संथ लयीत ताल घेतला जातो,मग गाण्यातील बोलानंतर त्याची चाल, त्यातील आवेग क्षणात आपल्या हृदयाचा ठाव घेतो. हे गाणं न बघता ऐकत राहील तरी कुठेतरी आपल्या श्वासांची लय आपल्या नकळत वेगवान होते.आपणही आपल्या नकळत या गाण्याचा ठेका आपल्या पायांनी धरत राहतो.
नंतर आठवणीने हे गाणं मी यू ट्यूब वर पाहिलं मूळ जानकी सिनेमातील हे गाणं आहे.पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत लताजींचा स्वर्गीय आवाज आशा नाईक यांनी केलेल्या नृत्यापेक्षा अभिनयाची अदाकारी,रमेश देव यांचा गाणं बघत असताना चेहेऱ्यावरचा बेमुर्तखोरपणा बेमालूम वटला आहे.हे गाणं जेवढं श्रवणीय आहे तितकंच ते बघणंही आनंददायी आहे.
या गाण्यावर दीपाली सय्यद,मानसी नाईक,सोनाली कुलकर्णी या मराठी नायिका खूप बेभान नाचल्या आहेत.त्यांचे नृत्य बघणे म्हणजे एक मेजवानीच आहे.
हे मूळ गाणं चित्रित व्हायचा मूळ उद्देश त्या सिनेमातील वेगळा असेल.आधीच्या काळात कसं मनोरंजनाची साधने म्हणून स्त्रिया नृत्य करायच्या(त्या जागांना कोठ्या अस म्हणायचे)मग सिनेमातील खलनायक किंवा मग वाया गेलेले नायक दारू पिऊन वैगेरे असा नाच बघायला जायचे.देवदास मध्येही तेच आहे की,असो
तर मला मात्र या सुरवातीच्या ओळी म्हणजे स्त्रियांची Empowerment , स्त्रियांचे सबलीकरण वाटत राहते.आजची स्त्री जग काय म्हणेल या कशाचीच भीड भाड न बाळगता तिने तिच्या कर्तृत्वाच्या दिशा बेभानपणे उधळळ्या आहेत त्याचे हे गाणं कुठतरी प्रतिनिधित्व करते असे वाटत राहते.
इतक्या बेफामपणे तिने सर्वच क्षेत्रात झोकून दिले आहे की या घुंगरु तुटले म्हणजे या क्षेत्रांनाच कुठेतरी मर्यादा आल्या पण स्त्री ची महत्वाकांक्षा मात्र अमर्याद अश्याच आहेत.
बहरली वीज देहांत, उतरले प्राण पायांत
वाऱ्याचा धरुनी हात, अशी बेभान नाचले आज की...
घुंगरू तुटले रे...

मग नृत्य असो वा कोणतेही ध्येय गाठण्याचा मार्ग माझा देह म्हणजेच एक विजेचा कल्लोळ झाला आणि नृत्य करायचे तर ते बेफामच त्यासाठी माझ्या शरीराच्या सर्व क्षमता अगदी प्राणच पायात उतरले आहेत.या ओळींची चाल तर इतकी वेगवान आहे की ऐकताना खरच भान हरपायला होत.आपल्या नकळत विजेची एक लहर आपल्या शरीरातून सर्रकन सरकून जाते.
मन वेडे तेथे जाय, ते जवळी होते हाय
अर्ध्यात लचकला पाय, तरी बेभान नाचले आज की...
घुंगरू तुटले रे...

मग हे जे अनावर मन आहे त्याच्या मागे अशी मी बेफामपणे जात राहतेय.माझे मी पण,सर्वस्व ज्यासाठी झोकुन देऊन मी अविरत साधना करतेय की माझा पाय जायबंदी झाला तरी त्याची पर्वा न करता मी बेभान नाचतेच आहे.
मला वाटत आजच्या वेगवान जगात करियर,घर, संसार लीलया सांभाळणाऱ्या स्त्रियांची गत या गाण्यापेक्षा वेगळी कुठे आहे.कोण वेगवान ट्रेन मागे धावत,कोण बस मागे,कुणी हिरकणी वेगवान गाडी घेऊन जाते,पुन्हा बाजारहाट,पाहुणे,घरातील लोकांच्या अपेक्षांमागे धावणे, मुलांची स्वप्ने स्वतःची म्हणून अखंड धावणे, ऑफिस मधील टार्गेट पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करीत राहणे...अर्ध्यात लचकला जरी पाय तरी माघार मात्र कुणी घेत नाहीच...घेणार नाहीतच....अश्याच बेभान आहेत या रणरागिणी....की घुंगरू तुटले रे....
गीतकार : सुधीर मोघे, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : जानकी (१९७९)

©राजश्री जाधव-पाटील
०३/०७/२०१८

07-59-39-images.jpg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाण्याचा मुखडा
मोहें आई ना जगसे लाज, के इतना जोर से नाची आज,
की घुंगरू टूट गये (पंकज उदास)
बरोबर साधर्म्य दाखवतोय,
पुढची कडवी येत नाहीत त्या गाण्याची.

पूर्वी रेडिओवर सांगली आकाशवाणीवर "आपली आवड" ला जी काही गाणी हमखास लागत त्यातले हे एक होते. पण तुम्ही या लेखात त्याचा आजच्या संदर्भात अर्थ छान लावलाय. "अरे मनमोहना रे मोहना, कळली देवा तुला राधिका रे राधिका रे", "गंध फुलांचा गेला सांगून" हि त्याकाळातली अजून काही अशी खास "आपली आवड" वाली गाणी Happy

मोहें आई ना जगसे लाज... की घुंगरू टूट गये... हे गाणे आशा भोसले, पंकज उधास, अनुराधा पौडवाल, रुना लैला, सपना अवस्थी अशा वेगवेगळ्या गायक/गायिकांनी गायलेले आहे. अगदी २०१६ च्या CABARET मध्ये नीती मोहनने पण गायिलेले दिसून येतेय Happy

जानकी १९७९ चा आहे. मूळ गझल कोणाची व कधीची आहे?