माझी हवामान खात्यातली नोकरी
मी दिवसभर कार्यालयात खूप काम केले होते . संगणकावर हवामानविषयी डेटा पृथ्थकरण करता करता डोके , मान , डोळे सगळ्यांना एखाद्या वादळात सापडल्यागत झिंजोडले होते . मी पालापाचोळ्यासारखा उडत उडत बस स्टॉप कधी गाठला कळले नाही . विचाराच्या तंद्रीत बस मध्ये कधी चढलो ते देखील कळले नाही . कंडक्टर तिकीट तिकीट करत समोर आला . मी दहा रुपये त्याच्या हातावर ठेवले . म्हणालो
" एक कुलाबा ऑब्झरवेटरी "
कंडक्टर " ओ सायेब हवामान खातं वाटतं "
मी बस स्थिर अस्तानाही अर्धा फूट उडालो तसा वर पकडायचा दांडका माझ्या डोक्याला लागला . मी चाचरतच हो म्हणालो .
कंडक्टर " साहेब आपले हवामानाचे अंदाज चुकतात हे माहित होत पण त्याचा सांगणाऱ्यावर एवढा परिणाम होतो माहित नव्हतं. अहो हा ऑब्झरवेटरीचाच स्टॉप आहे "
मला उगाच माझ्या डोक्यावर हवेची दिशा दाखवणारे दिशा दर्शक आणि त्यावर कोंबडे फिरल्याचा भास झाला . मी डोक्यावर हात फिरवून असे काही नसल्याची खात्री केली .
मी चाचरत " सॉरी एक व्हि टी द्या "
मी " व्ही टी " येण्यापूर्वी दहावेळा स्वतःला बजावले व्हि टी ला उतर म्हणून .
एवढ्या प्रयासाने मी बरोबर व्हि टी ला उतरलो व हार्बर लोकल पकडून वडाळ्याला घरी आलो . माझ्या बायकोने आणि मुलानी माझे स्वागत केले . चहा नाष्टा झाला अन मी मुलांबरोबर खेळण्यात रमलो . माझी हवामान खात्याची नोकरी उत्तम चालली होती पण बाहेर काहिसा कुचेष्टेचा विषय होता .
एकदा मी ऑफिसला निघालो तेव्हा माझ्या शेजारच्या तात्याला काही सांगायचे होते म्हणून तो जोरात ओरडून आवाज देत होता " ओ हरडे " मला दोन वेळा त्यांनी आवज दिला मी घाईत होतो . ऐकून न ऐकल्या सारखे केले तेव्हा तो जोरात ओरडला " ओ हवामान हरडे " . मी थांबलो तर तो म्हणतो " छ्त्री विसरलात "
मी " आज पाऊस येणार नाही " मीच काल हवामान अंदाज सांगितला टीव्ही वर .
तात्या खवचटपणे म्हणाला " हो तुमचे अंदाज भारीच एखादा फौजदार चौकित आलेल्या पापभिरुवर कधी गुरकेल अन कधी चहा पाजेल हे जेवढे बेभरोशी तेव्हढेच . किंवा एखादे दिवशी राशीभविष्यात "अचानक धनलाभ असे लिहिले असावे आणि तुमचा खिसा कापला जावा तसे "
मी तात्याचा सल्ला न ऐकता पुढे गेलो अन काय गम्मत त्यात्याची बत्तिसी खरी ठरली . ऑफिस जवळ पोहचलो तसी जोराची सर आली . मी नखशिखांत ओला झालो . दिवसभर पख्याखाली ओले कपडे घेउन बसलो कुडकुडत . अर्ध्या तासाला चहा पीत होते ह्ययपोथर्मिया होवू नये म्हणून .
तशी तात्याची बत्तीसी महा खतरनाक . रणदिव्याचा हनुमंता तात्याची चांगली सरबराई करायचा . तात्या सगळ्या बिल्डिंगला सांगायचा " नशीब काढेल हो पोरगं त्याचा हात कोण धरणार नाही ."
आता हनम्या दिवसभर चौकात उभा राहतो ट्राफिक हवालदार म्हणून. रात्री घरी येताना गळ्यात बांधलेला दुखरा हात घेउन येतो . हनम्याची उनाड पोरं खूश असतात बा ला मारता येत नाही मस्ती केल्यावर म्हणून .
खर तर एक दिवशी मी सांगणार आहे आमच्या निदेशक महोदयास असे एक दोन तात्या आपल्या खात्यात लावून घ्यावेत म्हणजे आपले हवामान अंदाज अंदाज ठरणार नाहीत .
अहो माझ्या काही अचरट मित्रानी तर मला टोपणनावच ठेवलय " अंदाजपंचे दाहोदर्शे " ह्या अंदाजापायी .
मागे केव्हा तरी आमच्या खात्या तर्फे पर्जन्य मापक दिले एका गावाला .
आमचे साहेब म्हणाले " हरडे ते पर्जन्यमापक कसे वापरायचे ते गावकऱ्यांना समजावून सांगा ."
मी त्या आडगावात गावात कसा बसा पोहचलो . ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेलो. तेथे शिपाई होता त्याला पंचाना बोलावायला सांगितले. थोड्याच वेळात बंडूनाना आले . हे बंडूनाना सरपंच होते. उंच धडधाकट गडी . डोळ्यात सरपंच असल्याचा रगेलपणा . मला नमस्कार करतच शिपायावर गुरगुरलं .
" आरं संप्या जा दोन चा घेउन ये हाटेलातनं आन दोन पिलेटी भजी पाव आन "
मी सकाळी लवकर घर सोडले होते त्यामुळे खरपूस भूक लागली होती . खायला मिळणार असे समजले तेव्हा दुष्काळी शेतकऱ्यांना आमच्या खात्याने पाऊस पडेल असे भाकीत केल्यावर धीर यावा त्यापेक्षा जास्त धीर आला . कारण हा अंदाज नव्हता .
आमचा चहा नाष्टा झाला . तोवर एक एक पंच हळू हळू येउ लागले .
कोण डाव्या हाताच्या तर्जनीवर तंबाखू मळत होते . कोण उजव्या हाताने अंगठ्याच्या चिमटीत पकडलेला तंबाखू डाव्या हाताने खालचा ओठ खेचून ठेवत होते . कुणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात यायच्या आधी हातातली बीडी पायाखाली रगडली . दोन महिला पंचानी चावडीसमोर येताच पदर सावरले .
सरपंच म्हणाले "म्या काल पंचाना सांगितल कर्जमाफीच साहेब येणार त्यामुळं समदी येत्याल हातातली व्हतीनव्हती कामं टाकून "
मी "व्हती कामं समजलो पण नव्हती कामं कसी टाकली ते सरपंचांनाच ठाऊक " .
कर्जमाफीची बातमी पंचाकडून फुटली अन आख्खा गाव चावडीपुढ लोटला . लोकांची उत्सुकता गप्प बसू देइना . एक एक गावकरी मधेच काहीतरी निमित्ताने ऑफिसात येउ लागला . जसं जसं बाहेर माहित झालं मी कर्ज माफिचा साहेब नाही तसतसे बाहेर जमावाने सरपंचाला वाहिलेली शेलकी ग्रामीण धुळाक्षरे कानावर पडू लागली .
"ह्याच्या आxx काय बेx बाxx हाय . खोटं कश्याला सांगायच सुताराचं नेटाव चांगलं रमी खेळत व्हतो "
" लै बांडगूळ बेनं "
" आक्करमाशीच हाय "
असं करत करत जमाव पांगला .
आत फक्त पंच उरले .
सरपंच बोलायला उभे राहिले .
सुरवात " बरका मंडळी कार्य करमाच्या सुरवातीला म्या तुमची माफी मागतो ती ह्याच्यासाठी की म्या काल तुमच्या बरुबर खॉटं बोल्ललो . "
"आपल्या गावात आज आल्यालं साहेब कर्जमुक्ती साहेब नसून हवा मान खात्याचं साहेब हैती "
असं म्हटल्या बरोबर बहुतेक पंचाचे ओठ अस्पष्ट हलले अन सर्पंचाना श्रध्दांजली वाहिली गेली .
एका पंचाने दरवाजात जाऊन तोंडातला तार्मरस पचकन बाहेर ढकलला व म्हणाला " काय राव डाय्रेक निवडून येता म्हून लै माजल्यागत करता "
बाकी पंचानी माना डोलावल्या . तसं सरपंच डरकाळलं " जास्ती आघावपणा नको . मागच्याबारीला संडासाचा साहेब आला तवा सगळ्यानला यळ नव्हता . कुणाला अर्जंट तालुक्याला काम , कुणाची म्हैस यणार व्हती , कुणाला देव देव करायच व्हतं , सरपंच काय बिनकाम्या असतोय व्हय " यावर सगळ्यांची दातखीळ बसली .
एक पंच " पण सरपंच हवा मान खातं म्हंजी मान हवा असलेलं खातं आपून तर सगळ्यांचा मान ठिवतो , मंग ही हवा मान खातं काय भानगड ह्ये " .
मला हसू अनावर झालं . सरपंच पुन्हा गरजलं " आरं ते म्हंजी ssss हा हे आसतय ... आपलं ते नस्तय का ते sss पाऊस मोजनी यंत्रं . ... मधी गावाला मिळालं . आंग तीsss " ते सायेब सांगतीलच आता समद्यास्नी . तर हे " हवा मान हरडे " साहेब लय मोट्ट सायेब हैती म्या समद्या गावाच्या तर्फे त्यांना इनंती करतो की त्यांनी आपल्याला चार सबूद सांगावं . जय महराष्ट्र , जय पंदारं . "
" हवा मान हरडे " हे शब्द माझ्या पोटात दंगल करायला लागून " माझ्या डोळ्यासमोर पोटदूखीची " हवाबाण हर्डे " बाटली दिसू लागली . बहुदा भजीपाव पावला . पण मी स्वतःला सावरले . बोलायला उठलो ...
त्याना प्रथम माझे नाव " हवा मान हरडे " नसून माझे आडनाव " हरडे " व ज्या खात्यात नोकरी करतो ते खाते हवामान खाते आहे असे सांगितले . हवामानाचे अंदाज शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरतात हे सविस्तर सांगितले . पाऊस का मोजायचा हे समजावले . मग कसा मोजायचा हे सांगितले . पर्जन्यमापकाच्या खुणांविषयी बोललो . एवढं सगळं सांगेपर्यंत एक हात पोटावरच होता .
सगळं बोलून झाल्याबरोबर पंचाना काही शंका असल्यास नंतर विचारा सांगून मी बाजुच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत झालेल्या शोचालयात गेलो .
परत येइपर्यंत मंडळी पांगली होती फक्त सरपंच व मीच उरलो होतो . मी सरपंचाचा निरोप घेउन एस टी ने मुंबाईला आलो . माझा हवामान खात्यातला पहिला दौरा असा झाला .
एव्हाना मी माझ्या बिल्डींगच्या लहानथोरांचा " हवामान हरडे " झालोय . " हवामान हरडे " तला हवामान शब्द मला ऐकून ऐकून हनुमानासारखा भासू लागला . मी तशीच स्वप्न पाहू लागलोय .
आमचा निदेशक लक्ष्मण झाला आणि त्याचे प्राण ( नोकरी ) वाचवायला मी आकाशात उडतोय . हवामान विषयक माहिती ( संजीवनी ) गोळा करतोय. लक्ष्मण वाचलाय . हवामान खात्याचे अंदाज माझ्या हस्तक्षेपामुळे अचूक येउ लागले . आता आकाशात फुगे सोडून हवामान अंदाज बांधणे बंद झाले . खात्याचे पैसे वाचवले म्हणून माझा जंगी सत्कार होतोय .
माझ्या मुलांना माझ्या पाठीवर बसून हवामानाची माहिती गोळा करायचीय आणि आत्ताच हवामान खात्यात करीयरची सुरवात करायचीय .
माझी बायको शेजारीपाजारी माझ्या शौर्यकथा दूरचित्रवाहिनीवर घातलेल्या मालिकांच्या रतिबासारखीच खपवतेय .
आणि मी ....
मी आईचे आर्जव ऐकतोय " उठ मुकुंदा अरे आज तुला हवामान खात्याच्या मुलाखतीसाठी कुलाब्याला जायचय . "
"अरे आत्ताच रणदिवेंचा हनुमंत नोकरी लागल्याचे पेढे देउन गेला . त्याला म्हणे ट्रॅफीक हवालदार म्हणून नोकरी मिळाली . "
मी स्वतःला चिमटा काढला . मी स्वप्नात नव्हतो . मला हनम्याने पोलिसभर्तीची परिक्षा दिल्याचे आठवले . पण स्वप्नात सुध्दा तात्यांची बत्तीसी खरी ठरल्याचे पाहून मी पण हवामान खात्याच्या मुलाखतीसाठी जाताना तात्याचे पाय धरायचे ठरवले . हवामान खातं खरंतर लोकांना एवढं आवडत नाही . लोक बहुतेकदा कुचेष्टा करतात पण याच खात्यात रुजू होवून मी हे मत बदलू शकेल कदाचित जसजसे तंत्रज्ञान बदलेल तसं आणि लागली नोकरी तर चार लोकात मिरवेल मी हवेवर जगतो म्हणून . मी तसा अम्मळ आळशीच . बाबा लहानपणापासूनच म्हणायचे मुक्या कष्ट करायचे वळण लाव . हवेवर पोट भरत नाही . आता बाबांचे शब्द खोटे ठरविण्याची संधी मी सोडतो का ?
माझी आंघोळ झाली , नाष्टा झाला . मी आईबाबांचे आणि तात्यांचे आशीर्वाद घेउन मुलाखतीसाठी निघालो .
© दत्तात्रय साळुंके
(No subject)
mast!!!
mast!!!
(No subject)
मस्तंय
मस्तंय
वा मस्तच
वा मस्तच
वा! मस्तच
वा! मस्तच
भारीचे.... जमलेला विनोद...
भारीचे.... जमलेला विनोद...
लिखाण आवडलं
लिखाण आवडलं
छान जमलीये.
छान जमलीये.
सर्व प्रतिसादकांचे खूप
सर्व प्रतिसादकांचे खूप धन्यवाद !!!
छान!
छान!
ॲमी धन्यवाद
ॲमी धन्यवाद
जमलंय ☺️
जमलंय ☺️