स्फुट - जातीअंत

Submitted by बेफ़िकीर on 31 May, 2018 - 03:56

स्फुट - जातीअंत

मांगीरबाबासाठी केलेला शिरा मातंगांसोबत

आणि झबरनाथाला कापलेला बोकड 'दगड वडारांसोबत' खाऊनही

माझे ब्राह्मण्य जाता जात नाही आणि जातीयवादी असल्याचा शिक्काही पुसला जात नाही

मोलकरणीने घासलेली भांडी,
पाणी ओतून घरात घ्यायची माझी आजी!

मराठयांच्या मुलांसोबत तर खेळत नाहीस ना, विचारायची माझी आई

पण, शिंपी, सोनार, न्हावी मित्रांनी माझे बालपण शिवले, सोनेरी केले आणि सेटही केले

मुंजीचे वर्ष सोडले, तर कार्य आणि आईचे चौदा दिवस सोडून अंगात जानवे घातले नाही

पंचवीस वर्षे देश फिरलो, कोणाच्याही खांद्याला खांदा लावून, कुठेही, काहीही खात

पहिला बॉस ब्राह्मण, पहिला कस्टमर चांभार, पहिला असिस्टंट महार, पहिला महाविद्यालयीन मित्र धनगर!!

माळी बाईच्या हातचा रस्सा भुरकला, भारती जातीत बसून नाश्ता केला, गुरव विद्यार्थिनीकडे पोटभर जेवलो, कोळी मुलीची फी भरली

पण ब्राह्मण्य आणि जातीयवादी असण्याचा शिक्का, दोन्ही जात नाही

बारमध्ये पेग घेतो तेव्हा माझ्याकडे बघत कोणीतरी म्हणतो

'गोडसेची औलाद आहे ती'

बहुधा काही गोष्टी राहून गेल्या

त्या केल्या की सगळे सुरळीत होईल

भाषा बदलायला हवी

वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे

कदाचित,

तरीही जाणार नाही हा शिक्का

कारण, बहुधा जात हे जगण्याचे एक कारण बनलेले आहे

प्रत्येकाचा अंत म्हणजेच त्याच्या त्याच्यापुरता जाती अंत बहुधा
========

-'बेफिकीर'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अडचणीत आणणाऱ्या 'थेट' प्रश्नांना 'बाळबोध' वगैरे म्हणून टाळणे सोयीस्कर असते ना!

बाकी दुसऱ्याना स्टीरीओटाइप करतो म्हणून टीका करणारे लोक त्याच पोस्टमध्ये स्वता पाहिलेल्या काही मोजक्या उदाहरणांवरुन अगदी टक्केवारी वगैरे देउन सरसकटीकरण करतात तेंव्हा अगदीच हसायला येते

त्यांनी या अनुभवावर लिहूच नये ? इतरही दलित साहित्यिकांनी आपले जेन्युईन अनुभव लिहिले आहेत.>>>>>

लिहिलेय व लिहायला हवे, इतिहासात काय घडले हे पुढच्या पिढीला कळायला हवेच. पण हे अनुभव लिहिणा-याने पुढच्या पिढीच्या मनात त्या अन्याय करणाऱ्या जातीबद्दल अढी व तिरस्कार निर्माण होईल, तिरस्काराला सतत खतपाणी मिळेल हा दृष्टिकोन ठेऊन लिहिले तर जाती नष्ट होणार आहेत का? मनातून जाती घालवा, घालवा म्हणणारे ह्या जाती मनातून कशा नष्ट होणार याबद्दल प्रबोधन करणार आहेत का?

म्हणून म्हटले की दलितांनी त्यांचे अनुभव मांडले की ते जातीयवादी होत नाहीत, ते अनुभव स्मरणात राहतील राहतील याची काळजी घेतली जाते. ही काळजी घेणारे जातीयवादी ठरत नाहीत. तेच ब्राम्हणाने तोंडातून जात हा शब्द जरी काढला तरी तो जातीयवादी ठरतो. हा विरोधाभास दिसतच नाही की तो दिसू नये याची काळजी घेतली जाते.

भरत, आजही काही ठिकाणी तेच सुरू आहे जे 1000 वर्षे सुरू होते. कारण आपल्या जातीच्या बंधनातून पहिल्यांदा कुणी बाहेर पडायचे हा प्रश्न त्या लोकांना एक वेळचे अन्न मिळणार कसे याहीपेक्षा मोठा व महत्वाचा वाटतो. संबंधित अनाडी तर आपली जात सोडायला तयार नसतातच पण जात नकोच म्हणत मध्यस्थी करू पाहणारेही जात बघूनच बाजू घेतात. जर कुणीच जात विसरायला तयार नाही तर जाती नष्ट होणार कशा?

{इतिहासात काय घडले }
हे सगळं फक्त इतिहास नाही, वर्तमानही आहे हेच समजायची तयारी नाहीए.
वर्तमानातही होत असेल तर त्याला तेच जबाबदार हा शहाजोगपणाही आहे.

ब्राह्मण म्हणून आलेल्या द्वेषपूर्ण अनुभवाबद्दल लिहिलं म्हणून जातीयवादी ठरलं हा शुद्ध कांगावा आहे.
स्फुटातल्या शेवटच्या ओळींना कोणतं तत्त्वज्ञान म्हणतात?

मी काहितरी खास आहे, त्यामुळेच मी अल्पसंख्य आहे, आणि देशाच्या सर्व साधन संपत्ती वर माझा पहिला हक्क आहे, असे सर्वांनी समजले तर बेफिकीर होऊन मजेत जगता येईल. जात जमात धर्म निष्ठा अस्मिता ह्यामुळेच स्वाभाविक स्वच्छंद जगणं अशक्य होते आहे.
जय जगत!

वर कित्येकांनी लिहिलेय की घराबाहेर अमुक तमुक करताना जाती लक्षात येत नाही, अमुक एकाने जातीचा उल्लेख केला म्हणजे त्याच्या डोक्यात ती आहे, म्हणून त्याला दुसऱ्याची जात कळली, आम्हाला कद्धी कुणाची जात कळली नाही वगैरे वगैरे वाचून हसायलाच आले.

>>>>>

तुम्ही कुठल्या गाव शहरात राहतात आणि कोणत्या पिढीचे आहात यावर तुम्ही काय प्रकारचे लोकं आणि त्यांचे विचार अनुभवले आहेत यावर हे ठरते.
एका छोट्याश्या गावात आयुष्य गेलेला पन्नास वर्षांचा म्हातारा आणि मुंबईतच लहानाचा मोठा झालेला पंचविशीतील तरुण यांचे जातीयविषयक विचारांत कमालीची तफावत असू शकते हे ते अनुभवल्यावरच समजू शकते.

मला पर्सनली सोशलसाईटवर बागडू लागल्यावरच समजले की महापुरुषांच्याही अमुकतमुक जाती असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी वाटून घेतले आहेत. जर कधी लॉगिन केलेच नसते तर सावरकर कुठल्या जातीचे होते हे न समजताच मी मेलो असतो. प्रत्यक्षात कित्येक लोकं या अज्ञानात मरतही असतील Happy

आता ईथे मी सावरकरांचेच नाव का घेतले म्हणून कोणी भांडायला येऊ नका, गोडसे किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती त्यासंबंधित ईतिहासामुळे माहीत होत्या.

सगळेच भ्रष्टाचार करतात या देशात, मग मी थोडा केला तर काय गहजब झाला... असा सूर जातीयवादाबाबत लावण्यात हशील नाही.
एकदा आपल्या डोक्यातून आपलीच जात गेली की मग बाहेरचे जग जातींच्या नावावर काय धुमाकूळ घालते याबाबत आपल्याला काही देणेघेणे नसते. किंवा आपण प्रत्येक घटनेकडे तटस्थ नजरेने बघू शकतो.

ईथे लेखक जातीभेद पाळतो असा आरोप मला माझ्या आधीच्या पोस्टमध्ये करायचाच नव्हता. उलट ते नाही जातीभेद मानत तर कौतुकच आहे. पण लोकांनी त्यांच्या जातीबद्दल काही बोल्ले तर त्यांना त्रास होतोय कारण ते स्वतःच्या जातीला चिकटून आहेत, स्वतःची जात ते मानतात. ते सोडता आले तर हा त्रासही नाहीसा होईल. विश्वास ठेवा, एक हितचिंतक म्हणूनच हा सल्ला आहे.

मला कल्पना आहे हे अवघड आहे, पण अशक्य नाही.

भन्नाट भास्कर यांनी त्यांच्या सगळ्या पोस्ट्समध्ये नेमके, अचूक, बुल्स आय इ.इ. लिहिलं आहे.
स्फुटाचं शीर्षक जातिअंत आहे. नुसती जात न पाळल्याने, पण मनात ठेवल्याने जात्यंत कसा होणार?
जातीची जाणीव (वर मानसी वैद्य यांनी लिहिलं तसं जात ही लपवायची गोष्ट नसावी)-> जातीय अस्मिता-> जात्याभिमान, जातिभेद (जातिनुरुप भिन्न वागणूक मिळणं) आणि जातिद्वेष हे वेगवेगळे कंगोरे आहेत.

जाता जाता : गोडसेंची अवलाद हे फक्त जातिवाचक असतं की वैचारिक वारश्याच्या संदर्भाने?
गांधीद्वेष, अल्पसंख्यांकांबद्दल संदेह्/चीड/द्वेष, आरक्षणाला विरोध, मांसाहाराबद्दल तुच्छता या लक्षणांच्या जोडीलाच आम्ही जातिभेद पाळत नाही, पण जात मानतो हेही लक्षण दिसत असतं, असं एक निरीक्षण आहे.

वर एक मुद्दा अनेक वेळा मांडला गेलाय की कुणा दलिताने जातिभेदाच्या अनुभवाबद्दल लिहिलं तर ते डोक्यावर घेतलं जातं. माझ्या पाहण्यात अशा अनुभवकथनालाही लेखकाच्या जातिभेदाचंच एक्स्प्रेशन असं लेबल लागलं आहे. वरच्या एका प्रतिसादातही तशाच आशयाचं मत व्यक्त झालं आहे.

<कारण आपल्या जातीच्या बंधनातून पहिल्यांदा कुणी बाहेर पडायचे हा प्रश्न त्या लोकांना एक वेळचे अन्न मिळणार कसे याहीपेक्षा मोठा व महत्वाचा वाटतो> एक वेळचं अन्न मिळणं हा ज्यांच्यासमोर प्रश्न नाही, त्यांना जातिबंधनातून बाहेर पडायला काय अडचण आहे?

<पण हे अनुभव लिहिणा-याने पुढच्या पिढीच्या मनात त्या अन्याय करणाऱ्या जातीबद्दल अढी व तिरस्कार निर्माण होईल, तिरस्काराला सतत खतपाणी मिळेल हा दृष्टिकोन ठेऊन लिहिले तर जाती नष्ट होणार आहेत का? >
माझ्य वाचनातल्या आलेल्या बहुतांश आत्मकथनांत अशी अढी, तिरस्कार निर्माण करण्याचा हेतू दिसत नाही. आता हे वाचणार्‍यावरही अवलंबून असेल की त्याला त्य्यातून काय दिसावं.

जाता जाता : गोडसेंची अवलाद हे फक्त जातिवाचक असतं की वैचारिक वारश्याच्या संदर्भाने?<<<<

म्हणजे इतरांना त्यांच्यातील कोणी फार पूर्वी दुष्कृत्य केले असेल तर त्याची औलाद असे संबोधणे योग्य आहे असे म्हणायचे आहे का?

असा अर्थ तुम्हीच काढू जाणात. गोडसेंनी ज्या विचारांतून ते कृत्य केलं, तेच विचार आपण पुढे नेणं म्हणजे वैचारिक वारसा.
विचार - विचार - विचार.

म्हणजे वैचरीक वारसा हा जातनिरपेक्ष असणार नाही का? म्हणजे सर्व ब्राह्मण गोडसेंच्या विचारांचे असणार असे नाही तर ब्राह्मणेतरही असू शकणार नाही का?

एकदा नक्की सांगा.

तुमच्यासारखंच गोल गोल लिहायचा प्रयत्न करतो.
वैचारिक वारसा जातनिरपेक्ष असू शकतो, पण वारशात मिळालेले विचार जातिनिहाय असू शकतात.

हे गोल गोल नव्हे, थेट आहे

जितके थेट मी विचारले होते तितकेच

फक्त त्यात द्वेषाचा अंश आहे। जो माझ्या प्रश्नात अजिबात नाही

असो, तुमची सुटका करतो

अजून उपरोधिक प्रतिसाद देण्याचा गंभीर प्रयत्न करा

मलाही अशा प्रकारच्या शेरेबाजीला सामोरे जायला लागण्याचा प्रसंग अनेकदा आलेला आहे. सुरुवातीस नाही जमले पण आता मी जो कोणी असे काही म्हणतो त्याला नजरेत नजर मिळवून उत्तर देतो हो मी जशी गोडसेची औलाद आहे त्याचप्रमाणे ना. गोपाळकृष्ण गोखले आणि विनोबा भावे यांचीही औलाद आहे. कित्येक जणांना तर हे दोघे कोण आहेत हे ही माहित नसते. पण चालायचंच. असो.>>>>>>> हर्पेन एकदम बरोबर. सहमत आहे.

बाकी आता लिहीते.

लेख पटला.
पण वाईट अनुभव स्वत:ला पुरोगामी म्हणवुन घेणाऱ्यांकडुनच आलेत. मला माझे सगळे मित्र ब्राम्हण समजतात. त्यातील जे जातपात मानतात त्यांच्याकडुन कधीही त्रास झाला नाही. पण पुरोगामी म्हणवुन घेणारे सतत (अगदि खालच्या थराला जाऊन) टिकाटिप्पणी करतात. पण इथेही जात पात मानणारेच माझ्या बाजुने उभे राहतात. . Happy

साहजिक आहे,
तुम्हाला ब्राह्मण मानणारा (जातपात मानणारा) ब्राह्मण मित्र तुम्हाला वाईट का बोलेल? किंवा( जातपात मानणारा) अ ब्राह्मण मित्र तुम्हाला ब्राह्मण मनात असेल तर साहजिक तुमच्यापुढे दबुन असेल,

जातपात न मानणारे पुरोगामी मित्र ,खटकणार्या गोष्टींबद्दल तुम्हाला तोंडावर ऐकवत असतील, म्हणून तुम्हाला ते त्रासदायक वाटतात

तसं नसतं सिंबा. शाळेत मला पाहील्यावर ( मी ब्राह्मण आहे हे माहीत असलेल्या दोघीजणी ) च्यायचे भटुकडे साले असे बोलणार्‍या मुली मला सिनीअर होत्या. पण मी नाही लक्ष दिले. हे बर्‍याच वेळा झाले. पण माझा या दोघींशी काही संबंध नसल्याने त्यांचा राग पण मला येत नव्हता.

कालांतराने माझ्या ओळखीतुनच यांचे काम झाल्याने त्यांचे चेहेरे मात्र पहाण्या लायक झाले होते. मी काहीच बोलले नाही. त्यांचेच त्यांना अपराधी वाटत असावे.

म्हणूनच म्हणेन की कोणीच कुणाला जात, परीस्थिती यावरुन कमी लेखु नये. ईश्वर प्रत्येकात असतो.

सिंबा तुम्हाला उद्देशुन लिहीले त्याबद्दल राग मानु नका. तुमचा काही संबंध नाहीये पण माझ्या सारखे काही लोक असतात, जे वाद नको म्हणून लांब रहातात, तर काही अरे ला कारे करु शकतात. मी अठरा पगड जातीत राहीले आहे, त्यातुन ब्राह्मणासकट बरेचसे इतर सर्व जातीचे लोक खालच्या थराला कसे जाऊ शकतात ते मी प्रत्यक्ष डोळ्याने बघीतले आहे, त्यामुळे जात, संस्कार या शब्दांवर माझा फारसा विश्वास उरलेला नाही.

शाळेत मला पाहील्यावर ( मी ब्राह्मण आहे हे माहीत असलेल्या दोघीजणी ) च्यायचे भटुकडे साले असे बोलणार्‍या मुली मला सिनीअर होत्या.
>>>>

हे असे खरेच होते. आणि यात मला चिंतेचा विषय वाटतो जेव्हा हे लहान मुले करतात.
काही जाती आहेत ज्यांच्या पूर्वजांवर जातीच्या उतरंडीमुळे तथाकथित उच्च जातीच्या लोकांकडून अन्याय झाला असेल. वा आजही कुठे होत असेल. त्यांच्या मनातील राग हा असा पिढ्यानपिढ्या पुढे सरकत जातो.
याच्या उलटही असते. शाळेत लहानपणी मी माझे ब्राह्मण मित्रही पाहिलेत जे गोडसेच्या विचारांचे समर्थन करायचे, गांधींना शिव्या घालायचे आणि ईतरांना संबंधित पुस्तके वाचायला सांगायचे.
ईथे गांधी विरुद्ध गोडसे यात कोण चूक कोण बरोबर हे तुर्तास बाजूला ठेवूया. पण सहावी सातवीतल्या माझ्या त्या मित्रांना एवढी अक्कल कुठून यायची. गांधीवाद वा सावरकरवाद काय हे समजायचे वय असते का ते खरेच? किंवा वर ज्या भटुकडे साले अश्या बोलणार्‍या शाळकरी मुली आहेत त्यांना ही अक्कल वा त्यांच्या मनात हा द्वेष कुठून येतो? गंमत म्हणजे शाळेतल्या प्रिन्सिपल आणि एकेका बाईंच्या जातीही काही मुलांना ठाऊक होत्या. हे बाळकडू कुठून मिळतात?

वर जे भरत यांनी वैचारीक वारसा शब्द वापरला आहे तो या केसमध्ये पिढ्या दर पिढ्या पुढे पास केला जातो. तो कुठेतरी थांबला पाहिजे. ज्याला तो खरेच थांबावासा वाटतो त्याने याची सुरुवात आपल्यापासून करावी.

माझा आंतरजातीय विवाह झाला आहे. पण तो अपघातानेच. ठरवून असा नाही. म्हणजे मी प्रेमात पडलो ती मुलगी दुसर्‍या जातीची निघाली. त्यातही नेमकी कुठची जात हे आईने मला प्रश्न केल्यावर मी तिला विचारायला गेलो. असो, पण माझ्या जातीची असती तरी तो माझ्यासाठी आंतरजातीय विवाहच असता. कारण मी त्याआधीच कुठलीही जात मानणे सोडून दिले होते. पण बरेच झाले ती माझ्या जातीची नव्हती. नाहीतर तिने तिच्या आणि माझ्या आईवडिलांच्या साथीने आमच्या जातीचा वैचारीक वारसा पुढच्या पिढीत न्यायचा प्रयत्न केला असता. आता झालेय काय, तर माझ्या "उच्च"जातीय पूर्वजांनी तिच्या जातीच्या पूर्वजांवर अन्याय करून ठेवले आहेत. पण एकमेकांना पसंद करत लग्न करताना पूर्वजांचा ईतिहास (किंवा आजही कुठे हे होत असेल तर तो वर्तमानही) आडवा येत नाही हे आम्हाला समजले आहे. त्यामुळे आता आमच्या पुढच्या पिढीत आम्हा दोघांपैकी कोणीही यासंबंधित वैचारीक वारसा पुढे जाणार नाही हेच बघेल. आता मला एवढीच काळजी घ्यायची आहे की उद्या जर माझ्या पोरांचे आजोबा आपल्या मिशीला पीळ मारत छाती फुलवून त्यांना बोलले की आपली जात अमुकतमुक आहे तर त्यांना तिथेच अडवायचे आहे. सध्या तरी माझी याबाबतची मते पाहता ते असे करतील असे वाटत नाही Happy

सर्व जातीचे लोक खालच्या थराला कसे जाऊ शकतात ते मी प्रत्यक्ष डोळ्याने बघीतले आहे, त्यामुळे जात, संस्कार या शब्दांवर माझा फारसा विश्वास उरलेला नाही.
नवीन Submitted by रश्मी.. on 4 June, 2018 - 07:34

बुल्स आय

https://www.youtube.com/watch?v=I_ebwG2DNKU

काही नाही. हा विडियो बघा. होतं काय की तुमच्याआमच्यासारखे अल्पसंख्य (जातपात न मानणारे, न पाळणारे) भरडले जातात.

मराठेशाहीचा अंत होउन ३ जुनला २०० वर्षे झाली. ३ जुन १८१८ मध्ये दुसर्‍या बाजीरावाने इंग्रजांसमोर संपूर्ण शरणागती पत्करली.

आगाऊंचा आगाऊपणा संपत नाही ती आगाऊशाही. Light 1 Proud

पवार, चव्हाण, देशमुख मुख्यमंत्री झाले तर ती मराठेशाही नसते, पण फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ती पेशवाई असते. Proud

माणसाच्या मनातुन जात कधी जात का नाही याचे उदाहरण. माझ्या मैत्रिणीच्या चुलत बहिणीने तिच्या ऑफिस मधल्या मुलाशी लग्न केले, जो मराठा होता आणी मैत्रिण ब्राह्मण. लग्न दोन्हीकडच्यांना मान्य नव्हते, कारण जातीचा इगो. पण लग्न झाल्यावर आम्ही तिला भेटायला गेलो, चहा पाणी झाले. त्या दोघांनी आम्हाला जेवायलाच ठेऊन घेतले. आम्ही चौघांनी ( मी, मैत्रिण, मैत्रिणीचे वडील व आई - मुलीचे काका काकु) बाहेर जाऊन, मिठाई व फळे घेतली.

मैत्रिणीच्या बहिणीने, मनिषाने ( नाव बदलले आहे) रस्साभाजी, ठेचा व भाकर्‍या केल्या. भाकर्‍या पाहुन दाजी ( मेव्हणे) उखडले. काय एवढुल्या बामनावानी भाकर्‍या करतीस गं? आमच्या मराठ्यात नसतात अशा. मोठाल्या घसघशीत असतात, पावण्यांसमोर लाज काढु नकोस. हे ऐकलयावर मनिषा खाली मान घालुन रडायला लागली. कारण नवर्‍याचा असला भडक अवतार पहिल्यांदाच तिने बघीतला होता. मग काका त्यांना रागवले, ते म्हणाले की लग्न करतांना जात आठवली नाही, मग खाण्याच्या वेळेस का आठवली? तुमच्या रितीभाती, खाणे तिला माहीत नाही तर मग शिकवा तिला, येईल सगळे. मग दाजी गप्प !

ही घटना खरी आहे, गाव सातार्‍याजवळचे. मुद्दा हाच आहे की लग्न हे अंतर्जातीय, अंतर्धर्मीय होऊ शकते, पण दोन्हीकडच्यांनी कुठला ईगो न करता संभाळुन घेतले पाहीजे. उगाच मने दुखावण्यात काय हशील?

अगदी ब्राह्मणात सुद्धा देशस्थ - कोकणस्थ वाद होत असतात. एकमेकांना टोमणे मारले जातात. माझ्या माहेरी सुद्धा दोन अंतर्जातीय लग्ने झाली आहेत, ते सुखात आहेत.

एखादा मुद्दा फायद्याचा आहे की अडचणीचा हे कळल्याशिवाय धागामालक काही आक्षेप घेणार नाहीत. त्यामुळे मीच विचारतो, मराठेशाही/पेशवाई चा अंत याचा या धाग्याशी संबंध स्पष्ट कराल का टवणे सर?

माझे सर्वांशी माणूसकीने वागणे हे , तसे वर्तन नैतिकदृष्ट्या योग्य आहे म्हणून आहे तर मग इतरांकडून प्रशस्तीपत्रकाची मला गरजच नाही.>:>>>> आवडलं,पटलं.

Pages