दुरितांचे तिमीर जावो

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काल आमच्या कडे वीज गेली (वीज म्हणजे याना गुप्ता नव्हे) . गेली म्हणजे काय जायचीच होती. आलेली वीज जायचीच. ते लोड शेडींग का काय ते म्हणतात ना त्याचाच परिणाम. वेळ दिवेलागणीची होती हे मूद्दाम सांगायला नको. वीज गेल्यावर नेहेमी सारखाच पोरांचा गोंगाट , तरुणांचा चित्कार असे ध्वनी निघाले. घातलेले फाटके बनीयन काढून मी नेहेमी सारखा चाळीच्या पॅसेज मध्ये जाऊन उभा राहीलो.

" अहो निदान अंगात कपडे घाला" आमची सौ
" अग अंधारात कोण बघतय मला ? "
" तुम्हाला काही समजच नाही. आत्ता लगेच दिवे आले तर ? "
" अग आत्ताशी कुठे गेले आहेत. येतील सावकाशीने. घाई काय आहे "
" मग निदान तो गेल्या आठवड्यात धुतलेला पंचा तरी घ्या आंगावर"
" घेतो घेतो. आता अंधारात कुठे सापडणार आहे?"
" वासावर सापडतो का बघा " अर्धांगीनी संधी सोडत नाही
पॅसेज मधून फिदी फिदी हसण्याचा आवाज येतो.'कोणाय रे' मी ओरडतो. पण अंधारात कोण ते कस दिसणार.

मी मस्त पैकी पॅसेज मध्ये जाऊन उभा रहातो. काळोखात काय दिसणार म्हणून कालच ऐकलेल कुमार गंधर्वांच गाण गुणगुणत रहातो. मध्येच कठड्यावर थाप मारतो. हातवारे करतो. हरकती घेतल्या सारख करतो. इतक्यात बाजूच्या घरातले नाना येतात (नानाच ते. तपकीरीचा वास मला ओळखायला येतो लागलीच. आणि तपकीरीचा वास नाकात शिरायच्या आधी तपकीरच नाकात शिरते आणि मग शिंका मागून शिंका येतात डोक्याच शिंकाळ गदागदा हलत)
" क्या बात बंड्या. काळाच्या मागून आलास रे. आधी आला असतास तर. लोकांनी डोक्यावर घेतले असते रे." नाना मला पेटवतात
माझ्या अंगात 'वीज' संचारते. मी आणिक जोराने हरकती घेतो.
नाना तल्लीन होऊन मान डोलावतात. आणिक मोठ मोठ्याने तपकीरीचे बार भरतात.
" शुक शुक"
मला ऐकायलाच येत नाही. माझ्या ताना चालूच असतात
पण नाना चमकतात. त्यांना हे 'शुक शुक' ओळखीचे वाटते. ते नाकाची तपकीर झटकून टाकतात. बघतो तर नानी नानांना बोलवत असतात. आता प्रत्यक्ष 'सारीकेने ' शुक शुक' करून बोलावल्यावर शुकाची काय बिशाद न जाण्याची.
"आता जरा थांबाल का ? " नाना विचारतात
".... "
" काय नाय हो आमचा बिट्टू बाहेर जायचा हट्ट करत होता काळोखात. तुम्ही मगाशी गात होतात ना तेंव्हा बाहेर बागूल बूवा आलाय पोरांना बोलवायला अस म्हणून त्याला झोपवलाय. आत्ता जराशी झोपलाय. म्हणून म्हणतो जरा गाण थांबवाल काय."
" अ ? हो हो "
वास्तवीक त्यांनी माझ्या हरकतीला 'हरकत' घेतली असती तर अधिक बर झाल असत अस वाटून गेल. पण माझ्या गाण्याने का होईना बिट्टू झोपला हे समाधान मिळाल. मी स्वतःला त्या 'अनाडी ' चित्रपटातल्या मिशीवाल्या व्यंकटेश च्या जागी कल्पून पाहील. ' अब बंड्याका गाना शुरू हुवा है सारे बच्चे सो जायेंगे " अस पोरांच्या आया एकमेकींना सांगताना माझ्या कल्पनेत दिसल्या (मला मिश्या नसल्या आणि माझे वडील प्रोड्युसर नसले तरी काय झाल. हम भी कुछ कम नय) . तितक्यात माझ्या त्या सुंदर स्वप्नात 'तपकीरी' डागाचा सदरा घातलेले नाना आणि त्यांना 'शुक शुक' करणार्‍या नानी घुसल्या आणि त्या सुप्रसिद्ध चित्रपटातले सुप्रसिद्ध संवाद गब्बरी आवाजात म्हणू लागले. स्वप्न माझेच असल्याने मी ते लगेच थांबवतो.

थोडा स्थीरस्थावर होतो न होतो तोच डोळ्यासमोर काजवे चमकतात आणि वीज आली की काय अश्या विचारात असतानाच माझ्या कानावर शिव्यांची लाखोली पडते.
" साल्ल्या लोकांना काय अक्कल नाय. इकडे अंधारात गुपचाप खोलीत मरायच सोडून. बाहेर पॅसेज मध्ये कश्याला कडमडतात. एकतर 'नको' त्या वेळेला वीज जाते. ढॅण्ण"
ढॅण्ण हा आवाज जाहीरातीतला किंवा सिनेमातला नसून कसल्या तरी स्टील किंवा पितळी भांड्याच्या आवाजाचा असतो. आवाजाचा स्त्रोत लक्षात आल्यावर कळते की माझ्या गुडघ्यावर कसल्या तरी भांड्याचा आघात झालेला आहे आणि तो आघात मला येऊन धडकलेले धोंडू धायबर ह्यांनी हेतू पूरस्सर गुडघ्यावर पामोलीन चे भांडे मारून केलेला आहे.
" बेअक्कल, बेवकूफ,बदमिजाज, बद आदत"
" सॉरी सॉरी धोंडोपंत " मी त्यांना 'ब' च्या पूढच्या बाराखडी वर जाऊ देत नाही.
" गुर्र "
धोंडोपंतांच्या हातातला पामोलीनचा डबा आणि त्यांची एकंदर घाई ह्याची योग्य ती सांगड घालून मी त्यांची 'भावना' जाणतो आणि त्यांची इकडेच 'वाट' लागायच्या आधी त्यांना तिकडची वाट देतो.

थोडावेळ शांत उभा राहतो न राहतो तोच .... सुमी (आमची ५ वीतली पुतणी) लाडात येऊन बिलगते. मी ही तीच्या डोक्यावरून हात फिरवतो. तीचा गालगुच्चा घेतो.
" कसेय आमचे माऊ? "
" मस्त एकदम"
" काका "
" काय ? "
" मला २५ रुपये पायजे"
" २५ रुपये??? " तरी बर गॅलरीला कठडा आहे आमच्या नायतर पडलो असतो डायरेक्ट.
" कश्शाला पायजे आमच्या बबडीला?"
" नॅचरल्स च आयस्क्रीम पायजे. एकदम फंडू लागत"
" फंडू म्हणजे ?"
" काय हो काका तुम्ही. फंडू म्हणजे एकदम फटॅक, चाबूक"
कुठून शिकतात पोर असले शब्द कोण जाणे. असले शब्द आम्ही कॉलेजात दूसर्‍या गोष्टींसाठी वापरायचो.
" फटॅक म्हणजे ? "
" कप्पाळ. फटॅक म्हणजे एकदम मस्त "
" अस्स होय."
" मग देताय ना "
"काय ? "
" कमाल करता काका. अहो २५ रुपये"
"२५ रुपये . देइन हा. तुझा सहामाही परीक्षेचा निकाल लागला की नक्की देइन"
" काय हो काका तुम्ही. एकदम बाबांचे भाऊ शोभता"
" शोभतो म्हणजे काय आहेच"
पुढच ऐकायला सुमी थांबत नाही.

इतक्यात आमची सौ बोलवते.
" अहो इकडे या"
" काय ? "
" मगाशी तुम्हाला सांगीतलेल विसरलात? "
" काय ते बनीयन घालायच "
" डोंबल माझ"
" काय झाल ? "
" अहो मगाशी केंद्रावरून दूध आणायला सांगीतलेल ना ? "
" मगाशी ? कधी ? " विसराळू पणा पेक्षा न ऐकल्याच नाटक कधीही सेफ
" तुम्ही म्हणजे ना अस्से आहात"
" अस्से म्हणजे कसे ?" मी पण लाडात यायची संधी सोडत नाय
सौ ते ओळखते आणि बाहेरच्या बाहेर मला ढकलून कापडी पिशवी हातात देते.
" चला लवकर घेउन या दूध. नाहीतर केंद्र बंद होईल. आज खीर करायचीये"
" अग पण पैसे? "
" पैसे ? "
" अहो मगाशी तुम्हाला दिलेले ना ठेवायला ५० रुपये"
" अग हो. ते खुंटीवरच्या शर्टात ठेवलेले वीज जाण्यापूर्वी. जरा पटकन आण बघू."
" हा घ्या शर्ट"
" अग शर्ट आहे. पण पैसे कुठायेत"? "
" कुठे म्हणजे काय ? शर्टाच्या खिश्यात ठेवलेलेत ना मगाशी"
" हो ठेवलेले खरे. पण आत्ता नाहीयेत"
" नाहीयेत म्हणजे ? कसले वेंधळे हो तुम्ही ? "
इतक्यात अचूक वेळ साधून वीज येते. आणि माझा गोरा मोरा चेहेरा बायकोला दिसतो.
चमकून मी पॅसेज मध्ये धावतो तर आमची सुमी आणी तीची मैत्रीण ननी आईस्क्रीम चघळत चघळत येताना दिसल्या. मी काय समजायचे ते समजतो

हताश पणे मी घरातल्या ज्ञानदेव महाराजांच्या तसबीरी कडे पहातो. ज्ञानदेव मला म्हणतात " दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणिजात "

समाप्त

विषय: 
प्रकार: 

हे हे .....भारी रे केदारभौ ! Happy

आहेस कुठे लेका ? प्रोंच्या कविता गेल्या आन तूबी गायबलास का ? Proud