अराजक माजले आहे असे वाटून घेऊ

Submitted by बेफ़िकीर on 23 May, 2018 - 13:55

गझल - अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
========

अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
पुरी धर्मांध करुनी माणसे वाटून घेऊ

विचारांनी वसवलेले शहर जाळून टाकू
पुढे ह्या शांततेचे कोळसे वाटून घेऊ

तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ

विरह दुःखे अबोले त्रास त्रागा आणि अंतर
तुझ्यामाझ्यात अपुली पाडसे वाटून घेऊ

बहुतसे एकमेकातच मिळाले मिसळलेले
निराळे राहिले तितके ठसे वाटून घेऊ

घडो नजरानजर कित्येक वर्षांनी पुन्हा ती
किती करतोय आपण धाडसे! वाटून घेऊ

दुरावा सोड, हो मनमोकळा, बघ अंत आला
जसे वाटायचे पूर्वी तसे वाटून घेऊ

इथे येणार नव्हतो पण मला आले निमंत्रण
इथे आलोच नाही मी असे वाटून घेऊ

किती केले सहन, प्रत्येक मन जपण्यास मीही
तरी मी 'बेफिकिर' आहे कसे वाटून घेऊ

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.!
तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ

दुरावा सोड, हो मनमोकळा, बघ अंत आला
जसे वाटायचे पूर्वी तसे वाटून घेऊ

किती केले सहन, प्रत्येक मन जपण्यास मीही
तरी मी 'बेफिकिर' आहे कसे वाटून घेऊ

हे विशेष आवडले.!

>>>विचारांनी वसवलेले शहर जाळून टाकू
पुढे ह्या शांततेचे कोळसे वाटून घेऊ

तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ>>>क्या बात है!

विरह दुःखे अबोले त्रास त्रागा आणि अंतर
तुझ्यामाझ्यात अपुली पाडसे वाटून घेऊ

बहुतसे एकमेकातच मिळाले मिसळलेले
निराळे राहिले तितके ठसे वाटून घेऊ

घडो नजरानजर कित्येक वर्षांनी पुन्हा ती
किती करतोय आपण धाडसे! वाटून घेऊ

दुरावा सोड, हो मनमोकळा, बघ अंत आला
जसे वाटायचे पूर्वी तसे वाटून घेऊ

एक एक शेर, नितांत सुंदर

अधांतरी, सत्यजित, द्वादशांगुला, उपाशी बोका, असुमो

खूप आभार