सिरियाच्या निमित्ताने तिसर्‍यांदा जग वेठीला धरले जाणार?.......

Submitted by अश्विनी के on 13 April, 2018 - 03:28

सिरिया अजून धुमसतोय... नाही नाही... अजून स्फोटक झालाय. तिथे काहीच विशेष नसलं तरी सगळे हेवी वेट्स त्याच्या भोवती आपल्या अहंकाराचं जाळं स्वतःच विणतायत आणि त्यात स्वतःच अजून गुरफटतायत. असो...

सिरियातील अस्साद राजवटीने आपल्याच जनतेवर दौमा येथे रासायनिक हल्ले केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेने सिरियाच्या विरोधात प्रस्ताव मांडला. नेहमीप्रमाणे रशियाने नकाराधिकाराचा वापर करून अमेरिकेचा प्रयत्न उधळला. ह्या वर्षात तब्बल ४ वेळा रशियाने सिरियाला नकाराधिकार वापरून वाचवलं आहे (एकूण १२ वेळा). ह्यावेळी मात्र अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स गप्प बसले नाहीत. त्यांनी सिरियासोबत चर्चा सुरू केली, जी सिरियावरील हल्ल्याची तयारीही असू शकते. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ह्यांनी फ्रान्समधील संयुक्त पत्रकार परिषदेत, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सिरिया विरोधात कठोर व संघटीत कारवाई करावी असे मत व्यक्त केले. त्यामुळे मित्र देशांनी सिरियावर हल्ला चढवल्यास सौदीसोबत सौदीचे आखातातील यूएई, इजिप्त, कुवैत व बाहरीन हे पण सहभागी होवू शकतात. सिरियावरील हल्ल्याचे शक्यता वाढल्याचे दावे केले जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस ह्यांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत.

युरोपातील हवाई वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या युरोकंट्रोलने भूमध्य सागरावरून प्रवास करणाऱ्या विमानांना इशारा दिला आहे. पुढच्या काही तासांत सिरियावर हल्ले होवू शकतात. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी ह्यांनीही आपल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमांनांना सिरियन हवाई क्षेत्रात शिरण्याबद्दल इशारे दिले होते. त्यामुळे परवा फक्त एकाच विमानाने सिरिया व लेबेनॉनवरून प्रवास केला.

आता अमेरिका आली म्हणजे रशिया आलाच!! सिरियातल्या तार्तूस संरक्षणतळाजवळ आलेल्या यूएसएस डोनाल्ड कूक ह्या अमेरिकेच्या प्रगत विनाशिकेवरून रशियन लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्या. ह्या विनाशिकेवर टॉमहॉक क्षेपणास्त्रे आहेत. हे वृत्त एका तुर्की वृत्तसंस्थेने दिले असले तरी पेंटॅगॉनने फेटाळले आहे. युद्धनौका बर्क क्लास गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे व तार्तूसपासून फक्त १०० किमीवर आहे. अमेरिकेची युएसएस पोर्टर ही दुसरी विनाशिकासुद्धा सिरियाजवळ आली आहे. अर्थात पेंटॅगॉन सांगतंय की तुर्की चुकीचे वृत्त देत आहे.

त्यातच रशियन परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला आहे की अमेरिकेची स्मार्ट क्षेपणास्त्रे सिरियातील रासायनिक हल्ल्याचा तपास सुरू असताना डागली जाणार ती पुरावे नष्ट करण्यासाठीच का? त्या आधी अमेरिकेने आरोप केला होता की रासायनिक हल्ल्याला सिरियन राजवट व ह्या राजवटीच्या सहाय्याला असणारा रशिया जबाबदार आहे. रशियन राजदूत वॅसिली नेबेंझिया ह्यांनी निर्वाळा दिला की हा रासायनिक हल्ला सिरियाने केला नाही, उलट अमेरिकेनेच हे हल्ले केले आहेत. ह्या हल्ल्याचा तपास ऑर्गनायझेशन ऑफ प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स करणार आहे आणि त्या आधीच ह्या हल्ल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी अमेरिकेची स्मार्ट क्षेपणास्त्रे प्रयत्न करणार आहेत. सिरियानेही आरोप नाकारले आहेत. अमेरिकेच्या ड्रोन्सना भरकटवण्यासाठी रशियाने सिरियाच्या भागात जॅमर्सही बसवल्याच्या खर्‍या/खोट्या बातम्या आहेत. ह्या जॅमर्समुळे ड्रोन्सना चुकीची माहिती मिळेल व युद्धासंबंधीचे आडाखे चुकू शकतील.

काही महिन्यांमध्ये सिरियाच्या अस्साद ह्यांनी रशिया, इराण आणि हिजबुल्लाहच्या जोरावर २०११ पासून गमावलेला भूभाग परत मिळवण्यास सुरुवात केल्यामुळे अमेरिका व इतर सहकारी देशांचे इरादे उधळले गेल्याचेही मानले जाते. सिरियातल्या संघर्षाच्या निमित्ताने इराण आपले आखातातील स्थान मजबूत करायच्या मागे आहे. आणि हीच बाब इस्रायल, सौदी अरेबियासह अमेरिकेलाही त्रासाची ठरणारी आहे.

दुसर्‍या बाजूला, अमेरिकेचे माजी उपसंरक्षणदल प्रमुख जनरल जॅक केन ह्यांनी दावा केला आहे की रशिया व इराण हे दोघेही आखातात वर्चस्व आणि सत्ता मिळवण्यासाठी ॲंबिशियस आहेत. त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर युद्धाचा भडका अटळ. जनरल केन ह्यांनी जॉर्ज बुश कारकिर्दीत इराक युद्धासाठी सल्लागार म्हणून काम केले होते. सिरियातील अस्साद राजवटीला हैराण करायचे असेल तर सिरियन वायुसेनेच्या ठिकाणांवर अचूक हल्ले चढवावे लागतील आणि आखातातील युद्धाला रशिया व इराण कारणीभूत असतील. इस्रायलचे लेबेनॉन व हिजबुल्लाह्बरोबर युद्ध पेटले तरी लेबेनॉन आडून इराण युद्धात उडी घेईलच. सोमवारी सिरियात इस्रायलने हवाई हल्ले चढवून लष्करी तळाला टारगेट केले तेव्हा ७ इराणी जवान ठार झाले होते. लगोलग इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी सिरियात दाखल झाले. इराणच्या कारवाईच्या शक्यतेमुळे इस्रायलने आधीच आपली लष्करी सिद्धता वाढवली आहे. इस्रायल सद्ध्या हाय ॲलर्टवर आहे. बेन्जामिन नेत्यान्याहूनी इस्रायलचा घात करणार्यां वर हल्ले चढवू असे इशारेही दिले आहेत.

सिरियावरून कधीही तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडेल अशी परिस्थिती असताना रशियाच्या पुतिन ह्यांनी गेल्या काही दिवसांत काय केलं आहे? ----
- 'आमच्या क्षेपणास्त्रापासून जगातला कुठलाही देश सुरक्षित नाही आणि रशियावर अणुहल्ला झाल्यास रशिया सारे जग भस्मसात करेल' ही धमकी. ह्या धमक्या खर्‍या असल्याचे अमेरिका व ब्रिटनचे वरिष्ठ लष्करी अधिकारी सांगत आहेत.

- ब्रिटनमधल्या रशियन हेर सर्जेई स्क्रिपल ह्याच्यावरील विषप्रयोगानंतर ब्रिटन व अमेरिकेला दिलेली धमकी.

- एकीकडे अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन सिरियावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना आता पुतिन ह्यांनी "जागतीक पातळीवर अराजक माजले असताना विविध देशांतील संबंध विघातक झाले आहेत. तरीही शहाणपण टिकून राहील असा रशियाला विश्वास आहे. त्यामुळे रशिया जागतिक व क्षेत्रिय सुरक्षेसाठी काम करतच राहील" अशी कमेंट केली आहे.

- "अमेरिकेने सिरियावर क्षेपणास्त्रे टाकली तर रशिया ही क्षेपणास्त्रे भेदेलच. सिरियावरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचाच हल्ला" अशी भूमिका.

- सिरियाला वाचवण्यासाठी रशिया जी पावले उचलेल ती आंतररााष्ट्रीय स्थैर्य व सुरक्षेसाठी आवश्यकच असतील. पण रशियाच्या हालचालींवर अमेरिका व मित्रराष्ट्रांनी कारवाई केली तर तो शहाणपणा नसेल कारण त्यानंतर भयानक घडामोडींची मालिकाच सुरू होईल. - हे विधान थंड वाटते पण तसे नाही. अत्यंत विनाशकारी संदेश आहे तो.

- अणुहल्ला झाल्यास स्वतःला सुरक्षित ठेवणारे न्यूक बंकर्स किंवा बॉम्ब शेल्टर्स कसे बनवायचे ह्याची माहिती रशियन टिव्हीवरून दिली जात आहे. सरकार संलग्न 'रोसिया-२४' ह्या वाहिनीने अणुहल्ला झाल्यास बंकरमध्ये लपलेल्यांनी काय काळजी घ्यावी, काय खावे प्यावे ह्याचीही माहिती प्रसारीत केली आहे.

ट्रम्प ह्यांनी सिरियावरील कारवाईची घोषणा केल्यावर अमेरिकेची युएसएस ट्रुमन ही विमानवाहू नौका ९० लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स घेवून भूमध्य समुद्राकडे निघाली. शिवाय टॉमहॉक मिसाईल्स असलेल्या युद्धनौका आहेतच. सिरियाचे अस्साद म्हणजे जनावर आहेत आणि पुढच्या काळात त्यांनाच टार्गेट केलं जाईल असं ट्रम्पनी बजावल्यावर रशियाने अस्साद ह्यांच्या रक्षणासाठी एस-४०० चे संरक्षक कडे (रिंग ऑफ स्टिल - रशियाची अभेद्य हवाई सुरक्षा यंत्रणा) तयार केल्याचं ब्रिटिश माध्यमं सांगत आहेत. रशियाने आधीच जॅमर्स बसवल्यामुळे अमेरिकेच्या रडारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार व अमेरिकेचे हवाई हल्ले रशियाकडून रोखले जातील.

अमेरिकेचे ड्रोन हल्ले रासायनिक हल्ल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी असणार असा रशियाचा आरोप आणि सिरियातल्या दौमामधली रशियाची सैन्य तैनाती दौमामधील रासायनिक हल्ल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी केली गेली आहे असा अमेरिकेचा आरोप. तब्बल ८० बळी गेलेल्या ह्या रासायनिक हल्ल्याच्या मुळाशी सिरियन लष्कर असल्याचा दावाही अमेरिका व मित्रदेश करत आहेत. नक्की कुणाचं पातक आहे हे?
http://www.bbc.com/news/world-middle-east-43747922

ट्रम्प ह्यांनी सिरियावरील हल्ला काही तासांत होईल म्हटलं तरी वेळ सांगितली नाही असा खुलासा ट्विटरवर केला आहे. आखात व युरोपिय देश अमेरिकेला अपेक्षित मदत करत नाहियेत का? कारण ट्रम्प ह्यांनीच म्हटलं आहे की आपल्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने आयएसपासून ह्या क्षेत्राला वाचवले पण तरी कुणी अमेरिकेला थॅन्क्यू म्हटलेले नाही. हे सूचक आहे. जगभरात आयएस किंवा दाईश ह्या दहशतवादी संघटनेने इराक, सिरिया व इतर देशांमध्ये धुमाकूळ घातलेला असताना भयंकर नरसंहार घडवला होता. त्यामुळेच इराक व सिरियातून निर्वासितांचे लोंढे युरोपिय देशांमध्ये दाखल झाले होते. इराक व सिरियानंतर आखातातील इतर देशही आयएसच्या खिलाफतीशी जोडले जातील अशी घोषणा आयएसने केल्यामुळे आखातातील मुख्य देशांवर कमालीचे दडपण होते. ट्रम्प ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे आयएसची पीछेहाट झाली आणि धोका कमी झाला. पण ह्याच्या बदल्यात कुणीही थॅन्क्सहे म्हटले नाहीत.... म्हणजेच ती जाणीव ठेवून आखात व युरोपिय देशांकडून अपेक्षित सहकार्य नाही. तसे असल्यास ती कृतघ्नता ठरते व ह्यापुढे अमेरिका कुठलीही कारवाई कुणाचेही हित/सुरक्षा लक्षात घेवून करणार नाही असाही संदेश जातो.

ट्रम्प ह्यांनी सिरियावरील हल्ल्याची घोषणा केल्यावर अमेरिकेच्या आण्विक 'डूम्स डे प्लेन'ने बुधवारी इलिनॉईसमधून उड्डाण केले. हे प्लेन अणुयुद्धाच्या काळात कमांड सेंटर म्हणून वापरण्यात येते. अमेरिकेचे National Emergency Airborne Command Post म्हणून बोईंग ई-४बी नाईटवॉचचे उड्डाण म्हणजे सिरियावरील हल्ल्याची व महायुद्ध भडकण्याची शक्यता असेल असा दावा केला जातो आहे.

बघू काय होतं ते.

(वरील माहिती इंटरनेट, टिव्ही चॅनेल व वृत्तपत्रातून मिळाली आहे)

Group content visibility: 
Use group defaults

मी तर लहानपणी नॉस्त्रादेमस वाचल्यापासून तिसरया महायुद्धाची आणि जगावर हिंदू धर्म सत्तेची वाट बघतोय Happy

जोक्स द अपार्ट,
लेखात भारताचा कुठेच उल्लेख नाही.
आपल्याशी याचा काहीच संबंध नाही का? उद्या झालेच युद्ध तर आपण त्यात खेचले जाऊ का आणि कसे? तसेच आपल्या भूमीवर प्रत्यक्ष युद्ध होईल का? तसेच ते चीन पाकिस्तान तेव्हा डोके वर काढतील का?
मला तर कल्पनाही करवत नाही.. मुंबईवर हवाई हल्ले झाले तर ....

त्या अनिरुद्ध बापुंना विचारा ना. २०२५ मधे तिसरे महयुद्ध होणार असे म्हण्लेय त्यानी त्यांच्या पुस्तकात. आणि नंतर भारत महासत्ता होणार म्हणे.

>>त्या अनिरुद्ध बापुंना विचारा ना. २०२५ मधे तिसरे महयुद्ध होणार असे म्हण्लेय त्यानी त्यांच्या पुस्तकात. आणि नंतर भारत महासत्ता होणार म्हणे.
अरे वाह! म्हणजे या बाफ चे आयुष्य अजून किमान सात वर्षे तरी आहे... ! Wink
असो. खरे तर रशिया च्या बळावर सिरीया मध्ये असाद ऊड्या मारत आहेत. रशिया सारख्यांना आज च्या परिस्थितीत युध्दाने हरवणे अशक्य नसले तरी त्याची किंमत अश्क्य कोटींची असेल.. त्यापेक्षा आर्थिक मुस्कटदाबी च्या बळाने बरेच काही साध्य होवू शकते. अख्या युरोप व ईतरांना तेल व वायू साठा पुरवण्यावर रशियाची जवळ जवळ सर्व अर्थसत्ता ऊभी आहे. या मुळावर जर घाव घातला तर रशियाची गुर्मी व ऊद्दाम्पणा तिथले लोकच जमिनीवर आणतील.. कारण अर्थसत्ता कोलमडली की अराजक ओघानेच आले. आणि पुतीन व कं ची पैलवानगिरी पुन्हा मोडकळीस आलेल्या रशिया ला वाचवू शकणार नाही. किंबहुना, अण्विक अस्त्रे ही आता डीटेरंट झाली आहेत.. पण आर्थिक निर्बंध मात्र कुठल्याही मानवी विनाशा शिवाय अधिक परिणाम्कारक रित्या आमलात आणता येऊ शकतात.
पण ट्रंप, पुतीन, असाद व ईतर नेते हे सध्ध्या अहंकाराचे महामेरू आहेत.. 'माझ्याकडे तुझ्यापेक्षा अधिक मोठे न्युक्लीयर बटण आहे' असे जगजाहीर करणार्‍या नेत्याकडून कॉमन सेंस ची अपेक्षा ठेवणे फोल आहे. तेव्हा, एक चुकीचे पाऊल आणि मोठी ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्ण एव्हडाच आहे की या चार महामूर्ख व अहंकारी लोकांच्या अधिकाराची किंमत मोजायला आपण तयार आहोत का?

आत्ता फ्रान्सने त्यांच्याकडे सिरियाविरुद्ध पुरावे असल्याचे सांगितले. BBC world news वर UN security council session live दाखवत आहेत. सिरियावरच सेशन चालू आहे.

<<<आपल्याशी याचा काहीच संबंध नाही का? उद्या झालेच युद्ध तर आपण त्यात खेचले जाऊ का आणि कसे? तसेच आपल्या भूमीवर प्रत्यक्ष युद्ध होईल का? तसेच ते चीन पाकिस्तान तेव्हा डोके वर काढतील का?>>>
रशियाने म्हंटले आहे की -
<<<< 'आमच्या क्षेपणास्त्रापासून जगातला कुठलाही देश सुरक्षित नाही आणि रशियावर अणुहल्ला झाल्यास रशिया सारे जग भस्मसात करेल' >>>>
आपण रशियाला सांगूच नाही की भारत याच जगात आहे. ज्युपिटरवर गेलो असे सांगू. Proud Proud
<<<प्रश्ण एव्हडाच आहे की या चार महामूर्ख व अहंकारी लोकांच्या अधिकाराची किंमत मोजायला आपण तयार आहोत का?>>>

प्रश्न विचारलाच आहे तर उत्तर सांगतो - आपण तयार असो वा नसो, आपण काहीहि करू शकत नाही हे सत्य आहे.
<<<अणुहल्ला झाल्यास स्वतःला सुरक्षित ठेवणारे न्यूक बंकर्स किंवा बॉम्ब शेल्टर्स कसे बनवायचे ह्याची माहिती रशियन टिव्हीवरून दिली जात आहे. सरकार संलग्न 'रोसिया-२४' ह्या वाहिनीने अणुहल्ला झाल्यास बंकरमध्ये लपलेल्यांनी काय काळजी घ्यावी, काय खावे प्यावे ह्याचीही माहिती प्रसारीत केली आहे.>>>
हे काही भारतात होणार नाही - भारतातले लोक विद्वान, ते फक्त बोलतात, हलकी कामे करणे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. शिवाय हे काम सरकारने करायला पाहिजे. पण सध्या सरकार गाई वाचवण्यात बिझी आहे. तेंव्हा काही करायचे तर उठून रशियात जावा! तिथे जगला वाचलात तर पुढच्या गोष्टी!
Happy Proud Light 1

अश्विनी के यांनी ही सर्व माहिती संकलित करून इथे मांडली त्यामुळे या विषयाबद्दल बरीच माहिती मिळाली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

आता नेहेमीप्रमाणे वरीलपैकी खरे काय नि खोटे काय हे ठरवणे आपल्या हाती. आमेरिकेत सोपे आहे - जे फॉक्स बघतात ते एका जगात रहातात व जे एमेस एन्बीसी बघतात ते दुसर्‍या जगात - एकाने एक म्हंटले की दुसर्‍याने ते खोटे आहे म्हणायचे.
पण वरील लेखामुळे एकूण काय काय चालले आहे ते तरी कळते.

ट्रम्प आल्यापासून आम्ही सीबिएस लोकल न्यूज बघतो फक्त. Proud येत्या आठवड्यातले वेदर, पोलन्स किती असतील, कुठे रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नल नविन हवे आहेत किंवा आज कसा फनी सॉक्स डे आहे असल्याच फक्त "बातम्या" असतात तिथे Happy

>>प्रश्न विचारलाच आहे तर उत्तर सांगतो - आपण तयार असो वा नसो, आपण काहीहि करू शकत नाही हे सत्य आहे.
असेही आपण काय करतो..?
Happy
गंमत म्हणजे या आपाप्सात भांडणार्‍या कुणाशीच भारताचे थेट वैर नाही... आपण इस्राईल बरोबरच ईराण ला देखिल कवटाळतो. आणि चायना बरोबर धंदेवाईक वाटाघाटी करताना जपान बरोबरही भागीदार्‍या करतो. रशिया तर भारताचा फारच जुना मित्र, नाही का?
तेव्हा आप्ल्यासाठी प्रश्ण एकच ऊरतो की, रशियाचा एखादा अणूबाँब चुकून पाक वर पडला तर? Wink

>>आमेरिकेत सोपे आहे - जे फॉक्स बघतात ते एका जगात रहातात व जे एमेस एन्बीसी बघतात ते दुसर्‍या जगात - एकाने एक म्हंटले की दुसर्‍याने ते खोटे आहे म्हणायचे.
तरिही ट्रंप महाशयांना निवडून देणारी जनता आहेच की. तेव्हा बातमी काहिही असली तरी वाचणारा किंवा पाहणारा त्यातून काय अर्थ काढतो याला जास्त महत्व आहे.

प्रश्ण एव्हडाच आहे की या चार महामूर्ख व अहंकारी लोकांच्या अधिकाराची किंमत मोजायला आपण तयार आहोत का?>>>>> हम है च्चचार च्च्चार चार चतूर. आता चार चतुरांनी मंत्र म्हणून मेलेल्या वाघाला जिवंत नाही केले म्हणजे झाले.

ट्रंप, पुतीन, असाद आणी चौथा कोण किम का ?

अश्विनी, सुयोग्य माहीतीबद्दल अनेक धन्यवाद, पण धडकी भरवलीस की गं बाई!

अमेरिका व इतर पाश्चात्य राश्ट्राना जशी सिरियातल्या लोकाविशयी जशी आनी जितकी काळजी वाटते तशी येमेन्मधल्या लोकाविशयी का वाटत नाही? येमेनमधे देखहजरिजारॉ मेले आहेत सौदी अरेबियाच्या विमानहल्ल्यामुळे आणि मरत आहेत. अमेरिकेला फक्त सौदी अरेबियाला इराणच्या विरुद्ध मदत करायची आहे त्यामुळे हे सर्व पाशिमात्य देश तिकडे काणाडोळा करत आहेत. म्हणुन मला तरी अमेरिकेच्या भुतदयेबद्दल शन्का आहे. असो. हे माझे मत आहे.

>>रशियन राजदूत वॅसिली नेबेंझिया ह्यांनी निर्वाळा दिला की हा रासायनिक हल्ला सिरियाने केला नाही, उलट अमेरिकेनेच हे हल्ले केले आहेत<<

नाहि, ते म्हणतायत कि हल्ला ब्रिटनने केला आहे. (नाहि तरी ब्रिटन अमेरिकेचाच चेला आहे, तेंव्हा एकाअर्थी तुमचं वाक्य बरोबर आहे)

थोडक्यात सध्याची परिस्थिती मेक्सिकन स्टँडऑफ सारखी आहे; पण अमेरिका प्रिएंप्टिव स्ट्राइक करणार नाहि, करु देणार नाहि (अ‍ॅपरंटली मे वाज एक्स्पेक्टिंग क्लियरंस फ्रॉम ट्रंप टु बांब सिरिया)...

ब्रेकिंग न्युज - लगाओ बत्ती...

>> म्हणुन मला तरी अमेरिकेच्या भुतदयेबद्दल शन्का आहे.<<

भूतदया? देर इज ए नु शेरिफ इन टाउन. लोकल रेजिम्स ने अत्याचार करायचे आणि ते आजुबाजुच्या राष्ट्रांनी निस्तरायचे हे दिवस आता संपायची वेळ आलेली आहे. दुष्काळात झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं, यातलं घोडं घ्यायचं कि नाहि याची अक्कल अमेरिकेला हळुहळु यायला लागली आहे...

सिरीयात आत्ता सकाळचे 4 वाजले आहेत, वर उल्लेखलेल्या कुठल्यातरी देशाची विमाने आत्ता तिथे बॉम्बवर्षाव करताहेत व सीरियन जनता ट्विटरच्या साहाय्याने टाहो फोडतेय.

तिथल्या सरकारने स्वतःच्याच जनतेवर केमिकल अटॅक केला. कारण काय? तर जे सरकार सध्या आहे हे तिथल्या काहींना नकोय. ते का नकोय याची कारणे प्रचंड गुंतागुंतीची असू शकतात, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आकालणापालिकडे. हा अटॅक रशियाच्या सल्ल्याने केला असे म्हणत आता फ्रांस अमेरिका व ब्रिटन तिथे बॉम्ब टाकताहेत. हे बॉम्बसुद्धा जनतेवरच पडताहेत. तिथे काय अंदाधुंदी सुरू आहे हे कुणाला माहीत आहे?

US, Allies Launch Strikes In Syria In Response To Chemical Attack

https://www.ndtv.com/world-news/us-allies-launch-strikes-in-syria-in-res...

इथे live updates येत आहेत.

काल आपले पंतप्रधान व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवर प्रदीर्घ चर्चा झाली. रशिया भारताचा जवळचा सहकारी देश अशी ओळख असलेला देश आहे. दोन्ही देशांमध्ये विशेष धोरणात्मक भागिदारी दृढ करण्याबद्दल चर्चा झाल्याचे मोघमात सांगितलं जातंय पण आपले परराष्ट्रमंत्रालय व क्रेमलिनने जास्त माहिती द्यायचे टाळलेय. खरंतर भारताने अमेरिका व रशियाबरोबर एकाच वेळी संबध प्रस्थापित करून आपल्या परराष्ट्र धोरणाचा नेहमीच समतोल साधलाय. त्यामुळे चीन किंवा पाकिस्तानशी रशियाने कितीही सबंध जुळवले तरी भारताला दुखवले नाहिये. त्यामुळे अमेरिका व रशिया दोन्हींवर भारताचा प्रभाव आहेच. ह्या दोन हेवी वेट्समध्ये संघर्ष अजून प्रखर झाला तर भारत महत्वाची भूमिका निभावेल का?

भारताने पॅलेस्टाईनबद्दलची आपली पारंपारिक भूमिका न बदलताही इस्रायलशी चांगले संबंध राखलेच आहेत. खुद्द पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यामुळेच म्हटले होते की पॅलेस्टाईनची समस्या सोडवण्यासाठी इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये भारत महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.

काल ब्रिटनच्या वॉर कॅबिनेटने सिरियावरच्या हल्ल्याला मंजुरी देताना आण्विक पाणबुड्यांनाही हल्ल्यासाठी तयार राहायला सांगितले आहे. ह्या पाणबुड्या आत्ता भूमध्य सागरात आहेत. जवळच असलेल्या सायप्रसमधील (वर योग ह्यांनी दिलेल्या इमेजमधील अक्रोतिरी इथला) त्यांच्या संरक्षणतळाला हाय ॲलर्ट दिला आहे.

अमेरिकेने सुरू केलेल्या हल्ल्यापुर्वीच सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद सिरियातल्या खेमिममधल्या रशियाच्या बंकरमध्ये लपल्याचे कळल्यामुळे अमेरिकेच्या टेहळणी विमानाने त्या भागावरून गस्त घातली. टिपून मारणार की काय!

सिरियन बंडखोर 'फ्री सिरियन आर्मी' अमेरिकेला मिळणार बहुतेक कारण अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अस्साद राजवट मोडल्यास त्यांना अस्सादच्या नियंत्रणातील भूभागावर ताबा घेता येईल. सिरियन राजवट दुबळी पडल्यावर रशियाही वाटाघाटीसाठी तयार होईल असा एफएसएच्या म्होरक्याचा कयास आहे. सिरियात पण जैश अल इस्लाम वगैरे कायकाय संघटना आहेत. घरोघर मातीच्या चुली.

Meanwhile सिरियाच्या लष्कराने त्यांचे लष्करी तळ आधीच रिकामे करून सगळी शस्त्रे रशियाच्या तळावर नेवून ठेवली आहेत.

सिरियन सामान्य जनता तर उगाचच हे सगळं भोगतेय बराच काळ. तिथली मुलं नॉर्मल लहानपण अनुभवणारच नाहीत. सततचे भीतीचे सावट असणार लोकांवर. साधं नीट वसलेलं शहर शिल्लक असण्याचीही शक्यता वाटत नाही मिडियाने दाखवलेल्या फोटोंवरून.

अचूक लक्षवेध घ्यायला सांगितला असला तरी सामान्य जनता उघड्यावरच असणार. त्यांना सोबत घेवून काही अस्साद लपला नसणार. दमास्कसवरच हल्ला केल्यावर उरणार काय?

One time shot - They say "mission accomplished!!" .....

Thanks to Russia for not responding militarily. रशियाने इराणला सोबत घेवून आधी म्हटल्याप्रमाणे केलं असतं तर कठीण होतं सगळं. Organisation for prohibition of chemical weapons त्यांचं काम करणारच आहे. खालील लिंकमध्ये दमास्कसमध्ये आजच्या हल्ल्याबद्दल नागरिकांनी सांगितलं आहे.

Donald Trump Praises Syria Strikes By US, UK, France, Says "Mission Accomplished"

https://www.ndtv.com/world-news/donald-trump-praises-syria-strikes-by-us...

Mission Accomplished.... ट्रम्प ट्विटले.

<< <हे बॉम्बसुद्धा जनतेवरच पडताहेत.>
----- जनतेची कुणाला काळजी आहे ? सामान्य सिरियन जनतेला सोडवण्यासाठी असे हल्ले होत नाही, त्याने काही साध्य होत नाही.

तर..... नक्की काय झालं काल दमास्कस आणि होम्समध्ये?

काल शनिवारी पहाटे अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने सिरियावर १०५ मिसाईल डागली. अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे हा हल्ला रासायनिक शस्त्रनिर्मिती संपवण्यापुरता मर्यादित होता.

भूमध्य समुद्रात असलेल्या अमेरिकेच्या विनाशिकेतून टॉमहॉक आणि बी-१ लान्सर ह्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानातून जॅसम ह्या advanced missiles चे हल्ले करण्यात आले. जॅसम मिसाईल्स Infra Red सेन्सर्सनी आणि स्टेल्थ technologyने सज्ज आहेत. त्यामुळे रशियाच्या सिरियात तैनात असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा ह्या मिसाईल्सचा वेध घेवू शकत नाहीत. अमेरिकेच्या पाणबुडीने काय केले ते वाचनात आले नाही.

सायप्रसमधल्या ब्रिटनच्या तळावरच्या टोर्नेडो विमानांनी स्टॉर्म शॅडो ह्या ५०० किमी अंतरावरचे लक्ष भेदणार्‍या मिसाईल्सचे हल्ले चढवले. भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या फ्रान्सच्या अ‍ॅक्विटेन विनाशिकेनेही मिसाईल्स डागली. यूएई मध्ये तैनात असलेल्या फ्रान्सच्या रफायल विमानांनीही अमेरिकन बॉम्बर्सजोडीने हवाई कारवाई केली.

दमास्कस व दौमा मध्ये रासायनिक शस्त्रनिर्मितीचे तीन मोठे कारखाने बेचिराख केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अजून सिरियन लष्कराचे कमांड सेन्टरही उध्वस्त केले. (इथे मला इराक आठवला. Mass destruction weapons नष्ट करणे हे कारण अमेरिकेने इराकवरील हल्ल्यांसाठी दिले होते. कुठे आहेत ती शस्त्रे कुणास ठाऊक!).

अस्सादने दावा केला की हे असे हल्ले कधीही यशस्वी होणार नाहीत. दमास्कसमध्ये सिरियन नागरिकांनी रस्त्यावर उतरून अस्सादला पाठिंबा दिल्याच्या क्लिप्सही पब्लिश झाल्या.

रशिया व इराणने मात्र पाश्चात्यांचे दावे फेटाळले. रशियाने सिरियाला दिलेल्या पॅटसर एस-१ ह्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने, एस-१२५, एस-२००, बक व क्वादरात ह्या यंत्रणांनी त्यांची ७१ क्षेपणास्त्रे भेदल्याचे रशियन लष्कराने म्हटले आहे. अमेरिका व मित्रदेशांच्या स्मार्ट क्षेपणास्त्रविरोधात यू.एस.एस.आर. च्या काळातली जुनी हवाई सुरक्षा यंत्रणा उपयोगी पडली आणि एस-४०० चा वापर करावा लागला नाही असं पण रशियाने म्हटलंय. अर्थात पेंटॅगॉनने अचूक हल्ल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे रशियाची ही नुसती बढाई आहे की खरोखर त्यांची जुनी यंत्रणा भारी आहे!

कालचा हल्ला अस्सादला उलथवण्यासाठी नसून रासायनिक शस्त्रांपुरता सिमीत असल्यानेच रशिया काल फक्त डिफेन्सिव्ह राहिला असेल का?

Pages

Back to top