मुलाखत : चित्रपटकार आशय जावडेकर

Submitted by स्वाती_आंबोळे on 11 April, 2018 - 09:09

ऑक्टोबर २०१६मध्ये ‘शँक्स’ (Shank's) नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रकाशित झाला. अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत जगभरातून हा ट्रेलर पाहणार्‍यांची संख्या होती चार लाख! "महाराष्ट्रीय शाकाहारी पदार्थ सर्व्ह करणार्‍या अमेरिकेतील एका 'शँक्स' नावाच्या रेस्तराँबद्दलचा माहितीपट" असं या चित्रपटाचं स्वरूप ट्रेलरमधून दिसून येत होतं. तुमच्या-माझ्या अगदी लहानपणापासूनच्या ओळखीचे हे पारंपरिक पदार्थ या ट्रेलरमध्ये इतक्या रसभरित आणि कलात्मक पद्धतीने सादर केलेले होते, की ते पाहून प्रेक्षकांची अक्षरशः भूक चाळवली. 'कुठे आहे हे रेस्तराँ?' अशी विचारणा करणार्‍या निरोपांचा निर्मात्याच्या इनबॉक्समध्ये पाऊस पडला!
खरंतर 'ही कोणत्याही रेस्तराँची जाहिरात नाही' अशी ठळक पाटी त्यात सुरुवातीलाच दिसते. पण त्यानंतर जवळपास अडीच मिनिटं डोळ्यांना जी मेजवानी दिसत असते, त्यामुळे ती पाटी विस्मरणात नाही गेली तरच नवल!

हा चित्रपट निर्माण केला होता सध्या अमेरिकेत डेलावेअरमध्ये राहणार्‍या आशय जावडेकर याने. भारतात जितक्या बोलीभाषा बोलल्या जातात, तितक्याच, किंवा कदाचित त्याहून अधिक खाद्यपरंपरा (cuisines) अस्तित्वात असताना जगाला भारतीय अन्नपरंपरेची असलेली ओळख उत्तरेतील ‘टिक्का मसाला’ नाहीतर मग दाक्षिणात्य 'इडली-दोशा'इतकीच मर्यादित असावी याचं त्याला वैषम्य वाटत होतं. ज्या महाराष्ट्रीय शाकाहारी आहाराचा आस्वाद घेत तो वाढला त्याची ओळख जगाला व्हावी अशी तळमळीची इच्छा आणि अशी रेस्तराँ खरंच प्रत्यक्षात यावीत हे स्वत:शीच रंगवलेलं स्वप्न यांना मूर्त स्वरूप मिळालं 'शँक्स'मध्ये!
चित्रपट ही या तरुणाची भाषा होती, आणि या भाषेत पडद्यावर स्वप्न रंगवण्याचीच बाराखडी असते!

युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच्डी करत असताना आवड / विरंगुळा म्हणून कॉलेजच्या फिल्म लायब्ररीत त्याने चित्रपट पहायला सुरुवात केली, आणि पाहता पाहता या समंधाने त्याला झपाटलं. नाटकं बसवण्याचा पूर्वानुभव त्याला होताच. कॉलेजमध्ये नवीनच सुरू झालेल्या मल्टीमीडिया डिझाइन सेन्टरमध्ये फिल्ममेकिंगसाठी लागणारी अद्यायवत उपकरणं आणि सॉफ्टवेअर्स त्याला प्रत्यक्ष हाताळायला मिळाली. मग त्याने कॉलेजमध्येच फिल्म अ‍ॅप्रिसिएशन आणि फिल्म एडिटिंगचे कोर्सेसही घेतले.

२००८ सालच्या 'यार्ड सेल' नावाच्या तीन मिनिटांच्या लघुपटाच्या निर्मितीपासून सुरू झालेला आशयचा प्रवास बहात्तर मिनिटांच्या शँक्स या फीचर लेन्थ चित्रपटापर्यंत येऊन पोचला आहे. प्रत्येक चित्रपटाच्या निमित्ताने या क्षेत्रातील काहीतरी नवीन तंत्र आत्मसात करायचा त्याचा प्रयत्न असतो. 'यार्ड सेल' संपूर्णपणे एका शॉटमध्ये चित्रित केला गेला आहे, तर 'स्टोरी ऑफ अ यू.डी. स्टुडन्ट' हा युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअरच्या करिअर सर्व्हिसेससाठी केलेला जाहिरातपट हा त्याने अ‍ॅनिमेशन तंत्राने निर्माण केला आहे.

२०१४ साली आलेले 'द स्क्रिप्ट' आणि 'केविन' हे त्याचे इंग्रजी लघुपट Cannes, MIFF(Marbella, Spain), MIFF(Melbourne, Australia) अशा नामांकित जागतिक चित्रपट महोत्सवांत झळकले, तर 'शँक्स'ला मानाचं स्थान मिळालं गतवर्षीच्या Bergamo, Italy इथे झालेल्या फूड फिल्म फेस्टिवलमध्ये!
'शँक्स'चे अमेरिकेतील चित्रपटगृहांत खेळ झालेले आहेत आणि आता अमेरिका आणि इंग्लंडमध्ये तो अ‍ॅमेझॉन स्ट्रीमिंगवर उपलब्ध आहे. आत्तापर्यंत पन्नास हजारांहून जास्त वेळा हा चित्रपट स्ट्रीमिंगद्वारे पाहिला गेलेला आहे.

याव्यतिरिक्त आशय 'सिनेगप्पा' नावाचा पॉडकास्ट प्रकाशित करतो, जो चित्रपटांचा आस्थेनं विचार करणार्‍या रसिकांना नक्की आवडण्यासारखा आहे.

आशयच्या या सगळ्या उपक्रमांबद्दलची माहिती आणि संबंधित दुवे http://www.ashayjavadekar.com इथे सापडतील.

मी: आशय, सर्वात आधी तुझ्या या यशाची नवनवीन शिखरं झपाट्याने पादाक्रांत करत चाललेल्या प्रवासासाठी हार्दिक अभिनंदन आणि मायबोली या व्यासपीठावर तुझं स्वागत!
आशय: धन्यवाद.

Ashay in Circle_0.pngमी: तुझ्या प्रॉडक्शन हाउसचं नाव ‘नॉट जस्ट एन्टरटेनमेन्ट’ आहे - ते का? मनोरंजनापलीकडेही चित्रपटाने - किंवा कोणत्याही कलाकृतीने - काही देऊ करणं तुला अगत्याचं वाटतं का?
आशय: दहाएक वर्षांपूर्वी जेव्हा मी फिल्ममेकिंगबद्दल गांभीर्याने विचार करायला लागलो आणि त्यासंबंधात प्रशिक्षण घ्यायला लागलो, तेव्हा एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तेव्हा विशेषतः हिंदी आणि मराठी भाषांत जे चित्रपट निघायचे, त्यात अनुकरणावरच भर दिसायचा. म्हणजे हिंदी चित्रपट त्याच त्या पठडीतले निघायचे आणि मराठी चित्रपट हिंदीची नक्कल करण्यात धन्यता मानायचे.

खरंतर चित्रपटासंबंधीच्या कितीतरी तांत्रिक बाबी हाताळण्यात तेव्हाही भारतीय तंत्रज्ञ अग्रेसर होते. उदाहरण द्यायचं तर मला आठवतंय त्यानुसार २००६ साली 'क्रॉनिकल्स ऑफ नार्निया ' या सिनेमाला व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतं. 'र्‍हिदम अ‍ॅन्ड ह्यूज’ (Rhythm and Hues) कंपनीच्या भारतातल्या तंत्रज्ञांनी त्यावर काम केलं होतं. मग आपल्याकडे बनणार्‍या चित्रपटांत नवीन कल्पनांची आणि तंत्राची इतकी वानवा का - असं मला वाटायचं.

अर्थात ही दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती, आता आपल्याकडेही नवनवीन प्रयोग होताना दिसतात आणि ते स्वागतार्हच आहे. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटांत तेव्हाही नवीन प्रयोग होत होते, आणि अजून होतात हेही नमूद करायलाच हवं.

तर त्यामुळे आपण जे चित्रपट निर्माण करू, त्यात आपण नवनवीन प्रयोग करत रहायचं, शिकत रहायचं असं तेव्हा माझ्या मनाने घेतलं, आणि त्यातून हे नाव सुचलं. माझ्यासाठी चित्रपट हे केवळ विरंगुळ्याचं माध्यम नाही, तर प्रस्थापित चौकटीच्या बाहेरचा विचार करायची आणि तो विचार तितक्याच अभिनव पद्धतीने मांडायची जागा आहे.

चित्रपटाइतकं प्रबोधनाचं दुसरं परिणामकारक माध्यम नाही हे खरं आहे. इतर कला समजायला काहीएक अभ्यास किंवा पूर्वतयारी लागते. साहित्याचा आस्वाद घ्यायचा तर भाषा यावी लागते. चित्रं किंवा शिल्पं समजून घ्यायला तशी दृष्टी तयार व्हावी लागते. चित्रपट दृक्श्राव्य माध्यम असल्यामुळे त्यातला विचार प्रेक्षकापर्यंत तुलनेने सहजगत्या 'पोचतो', अगदी भाषाही आड येत नाही. पण म्हणून प्रत्येक कलाकृतीने काहीतरी संदेश वगैरे द्यायला हवा असा काही माझा आग्रह नाही. या नावामागचा विचार तो नव्हता.

मी: तुझा पहिला लघुपट हेमिंग्वेच्या अतिलघुकथेवर आधारित आहे, 'द स्क्रिप्ट' रिचर्ड जेम्स यांच्या एकांकिकेवर आधारित आहे, तर 'विरंगुळा' तुझ्या वडिलांच्या कथाकल्पनेतून स्फुरलेला दिसतो. तू कथेच्या शोधात निघतोस की कथा तुला शोधत येतात? 'या कथेत सिनेमा दडलेला आहे' हे प्रथम वाचनातच जाणवतं का? एरवीही विचार करताना गोष्टी व्हिज्युअलाइज करण्याकडे तुझा कल असतो का?
आशय: हो, वाचन करताना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यातही मला गोष्टी व्हिज्युअलाइज करायची सवय आहे, किंवा लागली आहे असं म्हणता येईल. माझा जॉबही मॅन्युफॅक्चरिंगमधला आहे, त्यामुळे त्यातही प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी तो प्रॉब्लेम व्हिज्युअलाइझ करता येण्याचा खूप फायदा होतो.

तुला गंमत सांगतो, मी अमेरिकेत आलो तेव्हा सुरुवातीला अर्थातच भाषेची अडचण यायची. तसंही 'फाडफाड' इंग्लिश काही मी बोलायचो नाही आणि त्यात अ‍ॅक्सेन्टचाही फरक पडायचा. मग मी ती कमतरता इमेजेसच्या आधारे माझं म्हणणं मांडून भरून काढायचो. आता मला वाटतं की ती एक इष्टापत्तीच ठरली, कारण त्यातून माझी ही व्हिज्युअलायझेशनची सवय आणखी विकसित झाली.

मला आठवतंय एका फिल्म फेस्टिवलमध्येही यासंदर्भात चर्चा झाली होती. एखादी कठीण संकल्पना ज्याला अनभिज्ञ प्रेक्षकालाही नीट समजावून सांगता येते, त्यानेच कथाकथनासाठी (स्टोरीटेलिंग) चित्रपटाचं माध्यम निवडावं असा विचार त्यात मांडला गेला होता.

तू 'द स्क्रिप्ट'चा उल्लेख केलास - तो लघुपट ज्या 'ड्रीमिंग' नावाच्या एकांकिकेवर आधारित आहे, ती वाचलीस तर ती बर्‍यापैकी शब्दबंबाळ आहे. त्यातल्या अवकाशाला, नेपथ्याला, त्या पात्रांमध्ये घडून येणार्‍या बदलांना, नाटक या माध्यमाच्या मर्यादा आहेत. मला ती वाचतानाच त्यातल्या सिनेमॅटिक शक्यता ‘दिसायला’ लागल्या होत्या, आणि त्या नाटकापेक्षा कितीतरी अधिक विव्हिड (vivid) आणि निराळ्या पद्धतीने तोच विचार मांडणार्‍या होत्या. तेव्हा त्या अर्थी कथा मला शोधत येतात असं म्हणता येईल.

मी: मग हे तुला डोळ्यांपुढे 'दिसणारं' कथासूत्र एकदा ठरलं की त्यापुढची प्रोसेस कशी असते?
आशय: हा मस्त प्रश्न आहे - कारण माझा चित्रपटनिर्मितीतला सर्वात जास्त वेळ याच टप्प्यावर जातो. मला माझ्या पटकथेची नीट आखीव बांधणी - स्ट्रक्चर - तयार करायला आवडतं. 'लिहायला सुरुवात तरी करू, मग बघू कुठे पोचतंय' - अशी सवलत मी स्वत:ला देत नाही, कारण मग मी भरकटत जाईन अशी मला धास्ती असते.

कथासूत्र निवडलं की पुढची पायरी असते त्यातल्या पाच सर्वात महत्त्वाच्या घटना - प्लॉट पॉइंट्स - आणि त्यांचा क्रम ठरवायची. तू 'सिनेगप्पा' पॉडकास्ट ऐकलास, त्यात उल्लेख आलेले मार्गदर्शक प्रश्न, की या कथेचा नायक (प्रोटॅगोनिस्ट) कुठलं पात्र आहे? या पात्राचं जीवितकार्य, किंवा मी पॉडकास्टमध्ये ज्याला 'जिज्ञासा' शब्द वापरला आहे, ती काय असणार आहे? त्याच्यापुढचं आव्हान (कॉन्फ्लिक्ट) काय असणार आहे, ते द्वंद्व कोणत्या दोन शक्यतांतलं असणार आहे, त्यात अडचणी काय येणार आहेत आणि मग त्यावर ते पात्र कशी मात करणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी निश्चित करतो. हा झाला ढोबळ आराखडा.

हे थोडंसं प्रवासाची आखणी करण्यासारखंच असतं. ट्रिप प्लॅन करताना आधी आपण कोणती ठिकाणं पाहणार आहोत ते ठरवतो, ती काय क्रमाने पाहता येतील हे ठरवतो, मग त्यांमधल्या प्रवासासाठी कोणती साधनं उपलब्ध आहेत त्यांची माहिती काढतो, मग ट्रेन घ्यायची की बस बरी पडेल वगैरे बाबी निश्चित करतो, तसंच.
एकदा मुख्य घटनाक्रम ठरला की रांगोळीसारख्या त्या ठिपक्यांना जोडणार्‍या रेषा आणि त्यात भरायचे रंग ठरवता येतात.
मी सहसा हे सगळं स्प्रेडशीटमध्ये करतो. जसे तपशील भरत जावेत तसे त्या स्प्रेडशीटमधले मुद्दे वाढत जातात - पाचाचे पंचवीस, पंचविसाचे दोनशे असे. पण हा पुढचा सगळा डोलारा उभा राहतो तो त्या पहिल्या पाच प्लॉट पॉइन्ट्सवर. म्हणजे यातल्या कुठल्याही टप्प्यावर तू तीस हजार फुटांवरून जर तो नकाशा पाहिलास तर तुला ते पाच बिंदू स्पष्टपणे दिसायला हवेत.
तसंच या सगळ्या तपशीलवार घटनाक्रमातदेखील कारणं आणि परिणाम यांची साखळी अबाधित राखायची असते. यातली एकही घटना वगळली, तर ही साखळी निखळून पडेल इतकी घट्ट (क्रिस्प) वीण या कथासूत्राची घालता यायला हवी.
एकदा ही आखणी झाली, की मग पुढे त्याचं पटकथेत रूपांतर करणं त्यामानाने सोपं असतं.

मी आणि माझा गौतम पंगू नावाचा मित्र आता गेली साताठ वर्षं पटकथालेखनावर एकत्र काम करत आलोत - आणि ते आम्ही या मी आत्ता वर्णन केलेल्या पद्धतीनेच करतो. प्रेक्षकांना हे बिल्डिंग ब्लॉक्स दिसणार नसतात, पण ते नीट रचले गेले तरच संपूर्ण चित्रपटभर मी प्रेक्षकांचं लक्ष चित्रपटात गुंतवून ठेवू शकतो.
आत्ता या घडीला माझ्याकडे अशा दहाबारा कथांचे या स्वरूपातले आराखडे तयार आहेत.

मी: पटकथालेखनाबरोबरच तुझ्या चित्रपटांत दिग्दर्शन, संकलन अशा विविध प्रक्रियांत तुझा सहभाग असल्याचं दिसतं. यापैकी कुठल्या बाजूवर काम करायला तुला व्यक्तिशः सर्वाधिक आवडतं? कोणती बाजू सर्वात आव्हानात्मक किंवा त्रासदायक वाटते?
आशय: मला संकलनाचं (एडिटिंग) काम करायला सर्वात जास्त आवडतं. मी माझ्या टीमला नेहमी सांगतो की मला संकलनासाठी फूटेज हवं या एकाच कारणासाठी मी चित्रपट बनवतो! (हसतो.)

सहसा चित्रपट नावाजला जातो तेव्हा दिग्दर्शकाचं कौतुक होतं, अभिनेत्यांचं होतं, त्यामानाने संकलकाचं काम उपेक्षित राहतं. पण चित्रपट चांगला होण्यात सिंहाचा वाटा खरंतर संकलकाचा असतो. एडिटिंग टेबलवर चित्रपट घडू किंवा बिघडू शकतो! एका सेकंदात चोवीस फ्रेम्स - इतकं काटेकोर गणित पाळून सृजन घडतं ते तिथे! तिथे चित्रपटाची गती आणि लय (र्‍हिदम) ठरते.

आव्हानात्मक म्हणशील तर सगळीच प्रोसेस तशीच असते! म्हणजे 'प्री-प्रॉडक्शन' स्टेजमध्ये 'कधी एकदा हे करायला घेतो' अशी तगमग होते, प्रॉडक्शनचं काम सुरू झालं की 'हे मी काय डोक्यावर घेतलं, आता हे कसं पूर्ण होणार' म्हणून ताण येतो, आणि पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये 'हा मी काय घोळ घातलाय आणि आता मी तो कसा निस्तरू!' असं वाटायला लागतं! (हसतो.)

त्यात पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये पोचेपर्यंत सगळी व्हेरिएबल्स, सगळ्या शक्यता संपलेल्या असतात. आणि जो काही कच्चा माल आपण तयार केलेला असतो त्यातूनच तो सिनेमा उभा करायचा असतो. तेव्हा मी पुन्हा माझ्या मूळ मुद्द्याकडेच परत येईन, की मुळातच संकलनाची 'दृष्टी' तुम्ही डेव्हलप केली असेल आणि मूळ आराखडा पक्का असेल तर या टप्प्यावर कमी त्रास होतो.

साधं उदाहरण देतो. माझ्या आगामी 'डीएनए' चित्रपटात एक प्रसंग आहे, की एका पात्राला एक फोन येतो. आता या साध्या वाटणार्‍या वर्णनात चित्रपट म्हणून किती निर्णय घ्यावे लागतात! हा शॉट कसा घ्यायचा आहे, वाइड शॉट आहे, की मिड शॉट आहे, की क्लोजअपच हवा, स्थळ-काळ काय असणार आहे, फोन म्हणजे लॅन्डलाइन आहे की स्मार्टवॉच, वगैरे वगैरे.

बरं एका कोणीतरी स्टोरीबोर्ड तयार करताना घेतलेले हे निर्णय मग संपूर्ण टीमला समजावून द्यावे लागतात. माझ्या डोक्यातली व्हिजन, हातात काहीच मटेरियल नसताना टीममधल्या प्रत्येकाच्या मनःचक्षूंपुढे उभी करायची असते, तरच ती तशी पुढे प्रत्यक्षात येऊ शकते. मग त्यासाठी मी हाताने चित्रं काढतो. 'डीएनए'च्या स्टोरीबोर्डसाठी मी बाराशे स्केचेस काढली. चित्रपटात साधारण पाच सेकंदांनी एक शॉट कट होतो. त्या प्रत्येक शॉटचं एक चित्र - असा तो हिशोब होतो. म्हणजे या स्टेजला एखाद्या कॉमिक बुकसारखी कागदावर ही कथा सांगितली जाते.

त्यात वाढीव आव्हान म्हणजे मी काही चित्रकार नाही. मी काहीतरी काटकोळ्या आकृती (स्टिक फिगर्स) काढतो, ती बाई आहे की बुवा हेसुद्धा नीट कळत नसतं. मग मी बाण दाखवून त्याला पात्रांची नावं देतो. चौकोन काढतो आणि ही कार आहे असं म्हणतो. (हसतो.)
ही सगळी धडपड का, तर प्रॉप मास्टरला, कॅमेरामनला, टीममधल्या सर्वांनाच ते दृष्य चित्रपटात कसं दिसायला हवं आहे हे समजणं आवश्यक असतं.

तेव्हा त्या दृष्टीने प्री-प्रॉडक्शन हाच भाग सर्वात दीर्घ, दमवणारा आणि आव्हानात्मक असतो असं मी म्हणेन.

मी: तू तपशीलवार आराखडा निश्चित करण्याबद्दल म्हणालास, त्यावरूनच खरंतर मला पुढचा प्रश्न सुचला. म्हणजे उदाहरणार्थ 'शँक्स' बनवायला लागलेल्या तीन वर्षांपैकी २-३ आठवडेच प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी लागले असा उल्लेख तुझ्या एका मुलाखतीत आला होता. पण तीन वर्षं हा तसा मोठा कालावधी असतो, माणूस रोज काहीतरी नवीन शिकत असतो, बदलत / उत्क्रांत होत असतो. तर इतकं प्लॅनिंग करून काम सुरू केल्यावर एक दिवस काहीतरी खूप आकर्षक किंवा अगदी कम्पेलिंग बदल सुचला असं कधी होतं का? कारण शेवटी ही सगळी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, आणि क्रिएटिव्हिटीला बांध घालता येत नाही. मग तसं झालं तर काय करतोस?

आशय: माझा या बाबतीतला दृष्टीकोन थोडा निराळा आहे. मुळात चित्रपट बनवणं हे टीमवर्क असतं. त्यात सहभागी झालेल्या सगळ्याच प्रतिभावंत लोकांचा वेळ नीट कारणी लावायचा तर प्लॅनिंगला पर्याय नसतोच. आणि मला प्लॅनिंगमुळे बांधलं गेल्यासारखं वाटत नाही, उलट आवश्यक ते निर्णय विचारपूर्वक घेऊन झालेले असले की प्रत्यक्ष काम करताना त्यात वेळ जात नाही आणि क्रिएटिव्हिटीला मोकळीक मिळते असा माझा अनुभव आहे.

उदाहरणच द्यायचं तर माझ्या 'केविन' या लघुपटाचं देता येईल. त्याचा स्टोरीबोर्ड आम्ही नेहमीप्रमाणे तपशीलवार तयार केलेलाच होता, पण प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी उन्नी रवींद्रनाथन हा जो आमचा सिनेमॅटोग्राफर आहे, त्याने काही फार सुंदर शॉट्स सुचवले. एक कॅमेर्‍याच्या मागून त्या घाबरून पलंगाखाली लपलेल्या मुलाच्या केसांवर उजेड पडलेला दिसतो तो शॉट, किंवा बॅटरी पलंगाखालून फिरत असताना खेळण्यातल्या ऑक्टोपसवर प्रकाश पडतो आणि त्याची सावली मागे दिसते तो शॉट, हे माझ्या स्टोरीबोर्डमध्ये नव्हते. मी त्याला तेव्हा म्हटलं 'आधी जे ठरलेले शॉट्स आहेत ते घेऊ आणि मग हे घ्यायचे बघू.’ पण काटेकोर प्लॅनिंगमुळे हे जास्तीचे शॉट्स सुचण्यासाठी आणि घेता येण्यासाठी आवश्यक असणारा निवांतपणा आमच्याकडे होता.

पुढे एडिटिंग टेबलवर ते चित्रण आल्यावर मला तो जे सुचवत होता ते किती परिणामकारक होतं हे दिसलं, आणि मग ते शॉट्स फायनल कटमध्ये येणं अपरिहार्य झालं. आता हे जास्त परिणामकारक वाटेल हे ओळखणं ही त्याची प्रतिभा, आणि तिला वाव मिळाला तो आमच्या प्रॉडक्शनपूर्व प्लॅनिंगमुळे.

मी: 'शँक्स' सिनेमा मी प्रथम माझे मित्र सुधीर (मायबोलीकर आयडी 'एबाबा') यांच्या सुचवणीवरून पाहिला. मग भूक चाळवली म्हणून पुन्हा पाहिला, आणि मग तरीही पोट भरलं नाही म्हणून आणखी एकदा पाहिला. अन्नपदार्थांचं सादरीकरण हा माझ्यासाठी या चित्रपटाचा 'हीरो' आहे!
हे पदार्थ तुझी पत्नी, मधुरा हिने रांधले आहेत असं कळलं - त्यासाठी तिचं विशेष अभिनंदन आणि आभार! फूड डिझायनिंग / फूड फोटोग्राफीचा या चित्रपटासाठी काही खास अभ्यास तुम्ही केला होता का?

आशय: बरोबर, मला आपले महाराष्ट्रीय अन्नपदार्थ हेच या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असायला हवे होते. सहसा एखादा पदार्थ आपल्यासमोर आला की दिसण्याबरोबरच आपल्याला त्याचा सुवास, तापमान वगैरेही जाणवत असतं, घास घेण्याआधीही आपली सगळी ज्ञानेंद्रियं त्याचा आस्वाद घेत असतात, इथे केवळ दृष्यांच्या माध्यमातून त्यांचा अनुभव प्रेक्षकांना द्यायचा हे आव्हान होतं.

नितीश वासुदेवन म्हणून माझा एक सहकारी मित्र आहे. भयंकर उद्योगी प्राणी! अमेरिकेत येण्याआधी चेन्नईत त्याचं स्वत:चं रेस्तराँ होतं. तो फूड क्रिटीक म्हणूनही लिखाण करत असे. शँक्समधलं फूड प्रेझेन्टेशन त्याचं आहे. पदार्थ रांधले मधुराने आणि प्रेझेन्ट केले त्याने. सूप डिश म्हणून सर्व्ह केलेला मसालेभात, किंवा उसळीच्या समुद्रातली पोळीची बोट, या आणि अशा सगळ्या कल्पना आणि करामती त्याच्या.

मला आठवतंय, तो पोळीच्या बोटीचा शॉट घेतला तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते. बोट शिळ्या पोळीची करता येत नाही! मधुराने तेव्हा उठून त्यासाठी ताज्या पोळ्या केल्या.

पण अर्थात चित्रपटात प्रेक्षकाला गुंतवायचं असेल तर नुसती चित्रं दाखवून भागत नाही. त्यातून कुठलीतरी मूलभूत मानवी भावना छेडली जावी लागते. त्यामुळे मग त्याभोवती शशांक आणि त्याची कथा रचली गेली. मजा म्हणजे कथा शशांक झालेल्या मकरंद भावेची, पण त्यात शेफच्या हातांचे जे क्लोजअप्स आहेत ते सगळे नितीशचे आहेत.

मी: खरं सांगायचं तर हे रेस्तराँ वगैरे सगळं काल्पनिक आहे, हे मला प्रथम बघताना लक्षातही आलं नाही. जेव्हा आलं तेव्हा माझा जरा विरसच झाला होता. असे विरस झाल्यामुळे चिडून लिहिलेले काही अभिप्राय मी अ‍ॅमेझॉनवरही वाचले. एका अर्थी ही तुझ्या दिग्दर्शनाला पावतीच आहे, पण प्रेक्षकांना निराश करणं हा काही तुझा हेतू नसणार. मग मुळात हा माहितीपटाचा आकृतीबंध या चित्रपटासाठी वापरायचा तू का ठरवलास?
आशय: आपण मघाशी म्हणालो तसं अन्नपदार्थ हाच या चित्रपटाचा 'हीरो' आहे. मला त्यातून महाराष्ट्रीय पदार्थ, त्यांची वैशिष्ट्यं, आपण पंगतीचं जेवतो तेव्हा ते कसं 'कोर्स मील'च असतं, ताटात कुठल्या क्रमाने पदार्थ वाढले आणि खाल्ले जातात, त्यामागचा विचार काय आहे, हेच सगळं त्यातून दाखवायचं होतं आणि त्यामुळे त्यालाच सर्वाधिक स्क्रीन टाइम मिळणं आवश्यक होतं. ही जर एखादी नाट्यमय कथा म्हणून केली असती तर मग जास्त वेळ आणि महत्त्व त्यातल्या नाट्याला द्यावं लागलं असतं, जे मला करायचं नव्हतं.

दुसरं म्हणजे डॉक्युमेन्टरी म्हणजे वास्तव घटनांवरच आधारित असायला हवी असं काही नसतं. अनेकदा असते हे खरं आहे, पण तसा आकृतीबंध काल्पनिक कथेसाठी वापरूच नये असा काही नियम नाही. ती शेवटी एक कलाकृती आहे, आणि कलाकृती ही सब्जेक्टिव्हच असते. चित्रपटच नव्हे, कोणत्याही कलेतून कलाकार त्याचा एक दृष्टीकोनच मांडत असतो. वास्तव म्हणजे काय? त्या कलाकृतीपुरता त्या कलाकाराचा दृष्टीकोन (पर्स्पेक्टिव्ह) हे एकमेव वास्तव. नाहीतर त्याला आपण वार्तांकन म्हणालो असतो, फिल्ममेकरला पत्रकार म्हणालो असतो. बेस्ट डॉक्युमेन्टरीचं अवॉर्ड बातम्यांना मिळालं असतं!

मी: खरं आहे. खराखुरा माहितीपट वाटावा म्हणून यातले संवाद आधी लिहिले नव्हते, तर अभिनेत्यांनी थीमनुसार उत्स्फूर्तपणे बोललेले होते असंही तुझ्या एका मुलाखतीत वाचलं?
आशय: हो. अभिनेत्यांना फक्त कथानकाची आउटलाइन सांगितली होती, आणि कॅमेरासमोर त्या चौकटीत त्यांच्या अनुभवातून त्यांना जे सुचेल ते बोलायला सांगितलं होतं. तर झालं काय, की प्रत्येक अ‍ॅक्टर सरासरी चारएक तास बोलला. चित्रीकरण संपलं तेव्हा माझ्याकडे एकूण चाळीसपन्नास तासाचं फूटेज जमा झालेलं होतं. आता त्यातून दीड तासाचा सिनेमा कोळून कसा काढायचा हा मोठा प्रश्नच होता! गौतम आणि मी मग त्या सगळ्या फूटेजचं शब्दांकन केलं, त्यावर कुठल्या मिनिटाला कुठला मुद्दा बोलला गेला आहे वगैरे व्यवस्थित लेबल्स लावली, असे दहाबारा निबंध लिहून काढले, मग ते निबंध एडिट केले. आणि मग त्यानुसार अ‍ॅक्च्युअल फिल्म एडिट केली. आता मजा वाटते, पण तेव्हा हा भयंकर व्याप झाला होता. पुन्हा कधी हा असा प्रकार मी करेन असं मला वाटत नाही. (हसतो.)

मी: 'शँक्स'च्या संदर्भात मला आणखी एका बाबीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. चित्रपटातली शशांकची पत्नी आणि भागीदार पॉलीन हिच्या निमित्ताने रेस्तराँ इन्डस्ट्रीतल्या लिंगभेदाकडे तू निर्देश केला आहेस हे मला फार भिडलं. तर त्यासाठी तुझे स्पेशल आभार!
फ्रेन्च cuisine सगळ्या जगात श्रेष्ठ असल्याचं मानणारे लोक आहेत. पॉलीन फ्रेन्च आहे हा योगायोग आहे का?
आशय: नाही, तो योगायोग नाही. तू म्हणालीस तोच नेमका विचार त्यामागे होता. मराठी कुझीनला फ्रेन्च कुझीनसारखंच ग्लॅमरस पद्धतीने दाखवणं - किंबहुना ते तितकंच ग्लॅमरस आहेच हे दाखवणं हाच हेतू होता.

तुला गंमत सांगतो, मी फ्रान्सला गेलो तेव्हा तिथल्या अ‍ॅन्जेलिना नावाच्या रेस्तराँमध्ये फार तारीफ ऐकलेली म्हणून ‘मॉन्ट ब्लॅन्क’ नावाची पेस्ट्री चाखली, आणि त्याची चव थेट पुरणासारखी होती! हा प्रसंग अर्थात शँक्सनंतर घडलेला आहे, पण मुद्दा हा, की असं वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीत श्रेष्ठकनिष्ठ कसं ठरवणार?!
आपले उकडीचे मोदक किंवा पुरणपोळ्या या डेलिकसीज नाहीयेत का? बरं त्यात आपली इतकी प्राचीन संस्कृती. पाच हजार वर्षांत आपण सगळ्याच गोष्टींचा इतका साद्यंत विचार केलेला आहे, की तो जगापर्यंत पोचवायचा तर आपला आपल्यालाच आधी 'डीकन्स्ट्रक्ट' करावा लागतो. शँक्सच्या निमित्ताने आम्हाला आपलीच खाद्यसंस्कृतीचा नव्याने उमगत गेली असं मला वाटलं.

अर्थात मी यात दाखवलेले पदार्थ हा महाराष्ट्रीय पदार्थांचा एक उपसंच आहे. उदाहरणार्थ यात मांसाहारी पदार्थ नाहीत. पण माझा चित्रपट ही माझीच अभिव्यक्ती असायला हवी. कलेची गंमतच ही आहे की ती अभिव्यक्ती जितकी व्यक्तिगत तितकीच स्थलकालातीत होते. द मोअर पर्सनल यू गेट, द मोअर युनिव्हर्सल इट बिकम्स. कारण मूलभूत मानवी भावभावना, संवेदना या जगभरात सारख्याच असतात. मला माझ्या खाद्यसंस्कृतीबद्दल जितका कळवळा वाटतो, जितक्या तीव्रतेने त्या पदार्थांची, त्या वातावरणाची मला आठवण येते, तशी आस्था आपापल्या संस्कृतीबद्दल प्रत्येकच परदेशस्थ व्यक्तीला वाटत असते. तेव्हा तुम्ही तुमची म्हणून सांगितलेल्या गोष्टीची नाळ इतरांशी जुळतेच.

मी: तुझे लघुपट/चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचवता यावेत यासाठी तू काय करतोस? शँक्स चित्रपट - आधी ट्रेलर आणि मग खुद्द चित्रपट - ॲमेझॉन प्राइमवर कसा प्रकाशित केलास?
आशय: लघुपट हे कमर्शियली फार यशस्वी होतात असं नाही. फिल्म फेस्टिवल्समध्ये चित्रपट येणं हे अनेकांना मानाचं वाटतं, पण त्यात अडचण अशी असते की एकतर प्रवेशिका पाठवण्यासाठी शुल्क असतं. म्हणजे मी पहिला जो लघुपट तयार केला, 'द यार्ड', तो उत्साहाने अनेक फेस्टिवल्ससाठी पाठवला, पण त्यामुळे झालं काय, की तो फेस्टिवल्ससाठी पाठवायचं बजेट हे खुद्द त्या लघुपटाच्या बजेटपेक्षा जास्त होतं. बरं, पाठवलेली प्रवेशिका निवडली जाईलच असं नसतं. निवडली गेली तर बरेच फेस्टिवल्स असा नियम घालतात की तिचा पहिला जाहीर खेळ हा त्या फेस्टिवलमधलाच असायला हवा. म्हणजे तिथे दाखवेपर्यंत ती आणखी कुठे प्रकाशित करता येत नाही. आणि त्याला सहा-सहा महिनेसुद्धा लागू शकतात.
आता मी फेस्टिवलसाठी फिल्म पाठवलीच तर मीच आधीच कळवतो की ती दर्जाच्या निकषावर उतरत असेल तर त्यांनी निवडावी, पण मी तिच्या प्रकाशनासाठी थांबणार नाही.

आणि आता याला स्ट्रीमिंगचा फार चांगला पर्याय झपाट्याने लोकप्रिय होतो आहे. जर तुमचा कन्टेन्ट चांगला असला, आणि तो मोठ्या पडद्यावरच बघावा लागेल अशा प्रकारचा नसला, तर लोकांपर्यंत पोचण्याचा स्ट्रीमिंग हा उत्तम मार्ग आहे. मोठमोठी प्रॉडक्शन हाउसेस आता नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनवरून स्ट्रीम करण्यासाठी फिल्म्स तयार करायला लागली आहेत. ब्रॅड पिटचा 'वॉर मशीन' हे ताजं उदाहरण!
अ‍ॅमेझॉनची 'प्राइम डिरेक्ट' ही सर्व्हिस माझ्यासारख्या इन्डिपेन्डन्ट फिल्ममेकर्ससाठी फारच उपयुक्त आहे. नऊ कोटी सब्स्क्राइबर्स आहेत या सर्व्हिसचे! म्हणजे इतक्या लोकांपर्यंत एका फटक्यात तुम्ही तुमचं काम पोचवू शकता!

मग कोणी म्हणेल की यू ट्यूबवर टाकलं तर आणखी प्रेक्षक बघतील. पण यू ट्यूब ही कन्झ्यूमर सर्व्हिस झाली. तुम्ही कष्टाने बनवलेली फिल्म ही आधी एखाद्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवरच यायला हवी, कालांतराने मग यू ट्यूबवर प्रकाशित करता येऊ शकते.

हा झाला वितरणाचा (डिस्ट्रिब्यूशनचा) भाग. दुसरा भाग मार्केटिंगचा. लोकांपर्यंत फिल्म पोचवण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला, पण लोकांना ती फिल्म बघायला उद्युक्त कसं करायचं? ज्यांच्या मागे कुठला मोठा स्टुडिओ नाही, त्या माझ्यासारख्या फिल्ममेकरला ती फळी स्वतः तयार करावी लागते. ते फार मोठं आव्हान आहे - त्याबद्दल बोलायचं तर आपल्याला स्वतंत्र मुलाखत करावी लागेल. आणि ते कामही एक स्वतंत्र फुलटाइम जॉब होऊ शकतो असं आहे.
या सगळ्यात सातत्य टिकवणं हे फार महत्त्वाचं असतं. या आव्हानांमुळे कंटाळून जाऊन चालत नाही.

मी: नुसतं मार्केटिंग हासुद्धा फुलटाइम जॉब होऊ शकतो असं तू म्हणालास. तर पूर्णवेळ चित्रपट निर्मितीत झोकून द्यावं असं कधी वाटतं का? आत्ता कुटुंब, व्यवसाय, आणि हा छंद या सर्वांसाठी वेळ देताना ओढाताण होते असं वाटतं का?
आशय: असं सुदैवाने नाही वाटत मला. त्याचं कारण माझ्या जॉबच्या निमित्ताने मी जे काम करतो किंवा त्यातून जे शिकतो त्याचा उपयोग मला फिल्ममेकिंगमध्ये होतो असं वाटतं, आणि उलटही. साधं उदाहरण देतो, माझ्या जॉब साइटवर आज एक सिनेटर आले होते, आणि त्यांच्याबरोबर भेटायला आणि फोटो घ्यायला उत्सुक असणार्‍या तीनेकशे सहकार्‍यांची शिस्तबद्ध व्यवस्था मी पाहिली. उद्या माझ्या फिल्मच्या सेटवर मला पाचशे एक्स्ट्रॉज मॅनेज करावे लागले तर या अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल.

त्याउलट फिल्मच्या निमित्ताने जी व्हिज्युअलायझेशनची, आपली कल्पना सगळ्या टीमपर्यंत पोचवण्यासाठी परिणामकारक पद्धतीने संवाद साधायची जी सवय मला लागली आहे, त्याचा उपयोग अर्थातच जॉबमध्येही होतो.
तेव्हा माझ्यासाठी फिल्ममेकिंग आणि माझा जॉब या परस्परपूरक गोष्टी आहेत.
आणि खरंतर आत्ताही मी पूर्णवेळ चित्रपटनिर्मितीत नाही, असं मला मुळात वाटतच नाही. कारण ते डोक्यात बॅकग्राउंडला सुरूच असतं. वेळ मिळाला की उतरवून ठेवायचं इतकंच काम उरतं.

मी: चित्रपट/लघुपट क्षेत्रातील तुझे आदर्श कोण आहेत? तुझे आवडते चित्रपट/लघुपट कोणते?
आशय: कित्येक आहेत, एखाददुसरं नाव सांगणं अवघड आहे. स्पीलबर्ग आहे, कोपोल्ला आहे, स्कॉर्सेजी आहे, 'अ‍ॅमेड्यूस' बनवणारा मिलोश फोरमन आहे, डेव्हिड लीन आहे.
स्टॅनली क्यूब्रिकने तर हात घातलेल्या प्रत्येक जॉनरामधले सर्वोत्कृष्ट सिनेमे दिलेत! आणि तेव्हा उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने जे प्रयोग त्याच्या सिनेमांमध्ये करून दाखवले आहेत, त्यांना चमत्कारच म्हणावं लागेल. त्याची व्हिजन अफाट होती!

ख्रिस्तोफर नोलान हे आणखी एक नाव. ज्याच्या चित्रपटांसाठी "मोठा पडदा" लागतोच असा दिग्दर्शक. त्याचे सिनेमे लहान पडद्यावर बघूच नयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितीही अवघड गोष्ट तो पूर्णपणे व्यावसायिक सिनेमातून सांगू शकतो, हे फार मोठं कौशल्य आहे.

मी: सध्या कुठल्या नवीन चित्रपटांवर / प्रोजेक्ट्सवर काम करतो आहेस?
आशय: 'डीएनए' या माझ्या आगामी चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सध्या सुरू आहे. २०१९च्या स्प्रिंगमध्ये तो रिलीज होईल. ही एक विज्ञानकथा आहे. पूर्णपणे निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी त्याच्या डीएनएमध्ये फेरफार करायला सुरुवात झाली तर काय होईल अशी कल्पना आहे. पेरेन्ट होणं म्हणजे फक्त जीन्स ट्रान्स्फर करणं असतं का, असा प्रश्न हा चित्रपट विचारतो. या चित्रपटाच्या पटकथेचं काम सुरू असतानाच मला आणि गौतमला दोघांनाही कन्यारत्नं झाली. पेरेन्ट होणं काय असतं त्याचा जवळून अनुभव त्यामुळे आम्हाला आला, आणि त्याचं प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे असं म्हणता येईल.

तसंच 'सिनेगप्पा' हा जो मी पॉडकास्ट करतो, त्याचाही पुढच्या दोन वर्षांपर्यंत प्रकाशित करायच्या भागांचा आराखडा माझ्याकडे तयार आहे.

त्याव्यतिरिक्त मी आत्ता माझ्या स्वतः च्या एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काम करतो आहे, जेणेकरून मला शँक्स आणि त्यानंतरचे चित्रपट संपूर्ण जगभरात 'पे-पर-व्ह्यू' स्वरूपात दाखवता येतील. अ‍ॅमेझॉन/नेटफ्लिक्स यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून न राहता या बाबतीत आपणच स्वयंपूर्ण व्हायला हवं असा त्यामागचा हेतू आहे.

मी: वा! हे फारच एक्सायटिंग आहे! हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरू होईल तेव्हा आम्हा मायबोलीकरांना त्याबद्दल जरूर सांग - मराठी प्रेक्षकांना, विशेषतः परदेशस्थ प्रेक्षकांना आपल्या भाषेतले चांगले चित्रपट पहायची तहान असते - आणि ते पाहणं सुलभ होणार असेल तर त्यासारखा आनंद नाही!
तुझ्या या सगळ्या नवनवीन प्रयोगांसाठी मायबोलीकरांतर्फे तुला अनेक शुभेच्छा!

तसंच 'डीएनए' पहायला आम्ही सगळे अतिशय उत्सुक आहोत.
आशयः धन्यवाद.

***
विशेष आभार:
शब्दांकन साहाय्य: तृप्ती आवटी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मुलाखत! शॅन्क्स दोन तीन बैठकीत पाहिला होता. फूड प्रेझेन्टेशन मस्त आहे यात, पण तू वर लिहिल्याप्रमाणे असे काही रेस्टॉ. नाहीच म्हटल्यावर विरस झाला होता खरा. पण निदान आता जावडेकरांचा त्यामागचा थॉट क़ळला.
मला स्व्तःला अजूनही फिक्शन फॉर्मॅट + हेच ग्लॅमरस फूड स्टायलिंग असे बघायला जास्त आवडले असते.
जावडेकरांच्या इतर फिल्म्स , पॉडकस्ट बद्दल नव्ह्ते माहित. आता संधी मिळाली की बघेन.

छान मुलाखत!
मला स्वतःला शॅंक्सचा डॉक्युमेंटरी फॉर्मॅट आवडला नव्हता , कुठेतरी ट्रिक झाल्यासारखे वाटले होते. पण आता त्यामागचा विचार कळला. पटला असे म्हणणार नाही पण 'का ?' चे उत्तर मिळाले.
स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा!

मलाही शँक्सचा फॉर्मॅट आवडला नाही. बघताना हे सगळं खरं आहे असं वाटून विश्वास बसत गेला आणि तसं नाही हे कळल्यावर ऑलमोस्ट ‘चिटेड’ फिलींग आलं ते खरंतर अजूनही गेलेलं नाही ही मुलाखत वाचूनही.

मस्त झाली आहे मुलाखत स्वाती आणि सिंडी.
शँक्स बद्दल मला तो काल्पनिक चित्रपट आहे हे माहित होतं. पण मी काही मित्रांकडून 'फसवलं !!' अश्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. Happy
बाकीचे सिनेमे बघायचे आहेत आता.

सिनेगप्पा हा पॉडकास्ट अत्यंत भारी आहे !!! इंजिनियरींगमध्ये साधारण तिसर्‍या वर्षाला जसे ब्रँच प्रमाणे 'थिअरी'चे विषय असतात उदा. Network Theory / Theory of machines / Theory of Structures etc तसं मला हे Theory of Movies वाटलं. अ‍ॅनालिसिसचा पार्ट मस्तच जमला आहे. सिंथेसिस पण कव्हर होणार का हे बघायची उत्सुकता आहे.

आशयला पुढील कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा !! Happy

मुलाखत मस्त. आत अतो शँक्स बघते जमेल तेव्हा. प्रिव्ह्यू पाहिलेला. आता ते खरं नाही हे आधीच माहित आहे ते एक बरं झालं.

शँक्सचा ट्रेलर पाहताना जी excitement वाटली होती तिच्यानंतर ह्यातलं काहीच खरं नाही हे मुलाखत वाचून कळलं आणि एकदम भ्रमनिरास झाला Sad असो!
पॉडकास्ट ऐकून बघेन. आशय जावडेकरांना भरपूर शुभेच्छा!

आज पुन्हा एकदा वाचली मुलाखत. सुरूवातीचा परिचय, प्रश्न आणि ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले आहेत त्या टॉपिक्सचं सिलेक्शन, जावडेकरांनी दिलेली उत्तरं आणि त्या उत्तरांचं तू केलेलं एडिटिंग अशी सगळी भट्टी मस्त जमली आहे. आता शँक्स पण पुन्हा बघणार आहे. मुलाखतीत आलेल्या फिल्म्स पण बघेन लवकरच.

छान जमली आहे मुलाखत!
>>मला स्व्तःला अजूनही फिक्शन फॉर्मॅट + हेच ग्लॅमरस फूड स्टायलिंग असे बघायला जास्त आवडले असते.
+१
>>त्यामुळे त्यालाच सर्वाधिक स्क्रीन टाइम मिळणं आवश्यक होतं. ही जर एखादी नाट्यमय कथा म्हणून केली असती तर मग जास्त वेळ आणि महत्त्व त्यातल्या नाट्याला द्यावं लागलं असतं,
हे नाही पटलं.

मुलाखत मस्त आहे पण मुव्ही फॉर्मेट नाही आवडला. फुड फोटोग्राफीही ट्रेलर मधे आहे त्यापेक्श्या खुप जास्त नाहीये.
मला स्व्तःला अजूनही फिक्शन फॉर्मॅट + हेच ग्लॅमरस फूड स्टायलिंग असे बघायला जास्त आवडले असते. < << +१

अभिप्रायासाठी सर्वांचे आभार.
या मुलाखतीच्या निमित्ताने या हुशार, हुन्नरी, प्रयोगशील आणि दिलखुलास माणसाशी ओळख झाली याचा फार आनंद वाटतो.