बेदम तिहाई...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 28 March, 2018 - 09:28

जिथून वाटा भिन्न जाहल्या
त्या वळणावर उभा जुना मी.
खुणावतो अन् 'ये, ये' म्हणतो
अजून पुढच्या दुज्या कुणा मी.

तशी जुनी तूही वळणावर
तुलाच दिसशिल खुणावताना
..
..
असेच घडते, दोघांमधले
अंतर नकळत दुणावताना.

जुनेपणाचे इतके कसले
गहन-गूढ असते आकर्षण?
नवेपणाला जडत्व इतके,
खरेच असले कसे नवेपण?

असीम काळाचे आवर्तन
नव्या-जुन्याची साधाया सम,
आणि तिहाई 'मी-मी-मी'ची
'तू-तू-तू'ची किंवा बेदम ।

~ चैतन्य

Group content visibility: 
Use group defaults

वा! Happy

छान आहे. पहिली दोन कडवी आवडली. नवेपणाचे जडत्व व ते बेदम वगैरे समजले नाही. बघू पुन्हा वाचून क्लू लागतोय का.

खुप खुप छान कविता !

नवेपणाचे जडत्व व ते बेदम वगैरे समजले नाही. >>>>> +१

मला "अजून पुढच्या दुज्या कुणा मी" यातील दुज्या पण नाही समजलं

नमस्कार,प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
फारएण्ड, आसा-
प्रयत्न करतो.
अजून पुढच्या दुज्या कुणा मी-
इथे जुना 'मी' भविष्यातल्या 'मी'कडे पाहतोय (त्याला खुणावतोय) अशी कल्पना आहे.

नवेपणाला जडत्व- नव्या 'मी' ला जुना 'मी' बोलावतोय, पण नवा मी तिकडे जात नाही. (दोघांतलं अंतर वाढतं तेव्हा, आपण स्वतः आधी कसे छान एकत्र होतो हे वाटतेच, पण पुन्हा तसे छान एकत्र राहण्या- वागण्याच्या दृष्टीने पुन्हा थोडे जुन्यासारखे वागणे मात्र जमत नाही). म्हणजेच नवेपणाला जणू जडत्व आलंय.

बेदम तिहाई- संगीतात तिहाई नावाचा प्रकार असतो हे कदाचित ठाऊक असेलच. एखादी सांगीतिक phrase तीन वेळा पुनरावृत्त करून सम साधली जाते याला तिहाई म्हणतात. बहुतेक वेळा तिसऱ्या आवृत्तीनंतर मध्ये काही क्षणांचा अवकाश असतो आणि मग सम येते.
पण बेदम तिहाईमध्ये मात्र नावाप्रमाणेच मध्ये दम घ्यायलाही उसंत नसते. तिचे तिसरे आवर्तनच मुळी समेवर संपते (म्हणजेच तालाचे पुढचे आवर्तन सुरू होते).
दोघांत अंतर वाढलेलं असलं तरीही काळ हे त्यावर औषध असू शकतं. थोडा काळ गेला की पुन्हा जुन्यासारखं वागणं नव्याने शक्य होऊ शकतं, पण तिथे मी-मी-मी किंवा तू-तू-तू ची बेदम तिहाई येते (म्हणजे समेवर येण्यापूर्वीचा अवकाश मिळत नाही)...म्हणजेच एक तर अहंकार की मीच का स्वतः ला बदलू? किंवा तुझंच चुकतं असा युक्तिवाद पुढे येतो आणि अंतर वाढतच जाते.

व्वा !
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद _/\_

आवडली कविता.
वाचताना "हजार राहें मुडके देखीं, कहींसे कोई सदा न आयी
बडी वफा से निभाई तुमने हमारी थोडीसी बेवफाई" आठवत होतं.

जडत्व : हम अपने पैरों में जाने कितने भंवर लपेटे हुए खडें हैं

आता तुमचा प्रतिसाद वाचताना -
उन्हें ये ज़िद थी के हम बुलाते
हमें ये उम्मीद वो पुकारें

हे आठवलं.

तुमच्या कवितेतले संदर्भ थोडे वेगळे आहेत, पण प्रतीक्/प्रतिमा सारख्याच असल्याने आठवलं.

भरत, एक्झॅक्टली! मलाही काल तेच गाणे आठवले होते. इव्हन त्या वळणावर बद्दल "जहॉ से तुम मोड मुड गये थे..." आठवते.

@भरत, धन्यवाद.
तुम्हाला दोघांना आठवलेली गाणी मी ऐकली नाहीयेत. ऐकतो आता.

Back to top