अनेकदा हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्यावर समोर अन्न येतं आणि केव्हा एकदा जेवायला सुरुवात करू असं होतं. अनेकदा तर शेजारच्या टेबलवर काय आलंय हे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अन्नाचा सुवास हे तिथे एक मुख्य कारण असतं. आजकाल समोर आलेला पदार्थ खाण्यासाठी केवळ तो कसा लागतोय इतकंच पुरेसं होत नाही. तो पदार्थ दिसतो कसा, त्याची मांडणी कशी आहे हे सर्वही महत्वाचं झालंय. त्यात फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांमुळे अन्नाचे फोटो काढून ते सर्वांशी शेअर करणं अजून वाढलं आहे. त्यामुळे दिसण्याला अजूनच महत्व. अगदी थोड्या दिवसांपूर्वी आलेला 'गुलाबजाम' हा चित्रपटच त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचा ट्रेलर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं, कारण काय? तर सर्व पदार्थांची मांडणी. टीव्हीवरही खांद्यपदार्थांवर अनेक कार्यक्रम असतात. एकूण काय 'फूड पॉर्न' हा प्रकार वाढलेला आहे.
हे सगळं लिहिण्याचं कारण सांगेनच पुढे. काही वर्षांपूर्वी, माझी मुलगी दीड वर्षाची असताना भारतात सहा महिने राहून आम्ही अमेरिकेत परतलो होतो. तिला अंगठा चोखायची सवय होती आणि बाकीही काही वस्तू तोंडात घालायची अनेकदा. डॉक्टरकडे पहिल्या भेटीत त्यांनी आम्हाला तिची 'लेड टेस्ट' करायला सांगितली होती. अर्थात इथे ती सर्वच मुलांसाठी केली जाते. आमच्यासाठी ते काळजीचं कारण ठरलं कारण तिच्या शरीरातील 'लेड' चे प्रमाण जास्त निघाले. पुढे अजून रक्ततपासणी केल्यावर खात्री पटली. त्यावेळी पहिल्यांदाच मला हे असं काही असतं हे कळलं होतं. लहान मुलांच्या शरीरातील 'लेड' जास्त असणे हे काळ्जीदायक असते. 'लेड' म्हणजे शिसे या धातूचे कण शरीरात गेल्यावर त्याची विषबाधा होते. आणि त्याचे लहान मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय केले पाहिजे हे आम्ही तपासलं आणि डॉक्टरांनी तिला 'आयर्न सप्लिमेंट' द्यायला सांगितली. लवकरच ती बरीही झाली.
त्याचदरम्यान मी या विषयावर पुढे माहिती काढायला सुरुवात केली. हे लेड जातं कसं शरीरात हे पाहिलं. अनेक ठिकाणी घरातील भिंतींच्या रंगांमध्येही 'लेड' असते. किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या, खेळण्यांच्या रंगातही असू शकते. मुले त्या वस्तू, खेळणी तोंडात घालतात आणि त्यातून हे लेड पोटात जाऊ शकते. पण या सगळ्यांपेक्षा धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे, अन्नातून जाणारे शिसे, अन्नातील भेसळ. हे कसे तर, हळद, तिखट अशा खाद्यपदार्थात रंग चांगला दिसावा म्हणून रंग घातला जातो. आणि त्यातूनही लेड जाऊ शकते.
मला हे वाचल्यावर काळजी वाटू लागली म्हणून मी शोधले की तिखट आणि हळदीतील भेसळ कशी शोधायची. ते पाहून मी तशी टेस्ट घरी केली. गिरणीत कांडून मिळणारी हळद आणि तिखट वापरायला सुरुवात केली. त्या टेस्टबद्दल तुम्हाला नेटवर माहिती मिळेलच. पण साधा उपाय म्हणजे, एका पारदर्शक ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात वरुन हळदीची किंवा तिखटाची चिमट सोडायची. जर भेसळ असेल तर जसे हळद किंवा तिखटाचे बारीक कण पाण्यात खाली जाऊ लागतात तसे तसे त्यातील रंग पाण्यात पसरु लागतो. जर रंग पसरत असेल तर भेसळ आहे. हळद किंवा तिखट शुद्ध असेल तर त्याचे कण पाण्यात उतरताना रंग पसरत नाही. दुकानातून आणलेल्या तिखट हळदीलाही असेच तपासून पहा. पोस्टसोबत काही फोटो लावलेत, त्यातून थोडी कल्पना येईल.
आता हे झाले घरातील पदार्थ. मी भारतात परत आले तेव्हा मला हा अनुभव येऊन गेला होता. त्यामुळे अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर समोरच्या वाटीतील पनीर एकदम रंगीत दिसले किंवा टोमॅटो सूप केशरी दिसले की ते खाण्याची शिसारी येऊ लागली. बिर्याणीच्या वरील थरातील रंगीत भात, तंदुरी चिकनवरचा लाल रंग हे सर्व बघून त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेक वेळा आम्ही बाहेर जाणं टाळू लागलो. सगळ्यात त्रासदायक होते ते म्हणजे चायनीज जेवण. त्याच्यावरील लाल रंग तर एकदम नकोसा वाटतो. मी अनेक केक बघते, ज्यात रंगीत क्रीम असते. आता त्यात खाऊ शकतो असे रंग मिसळले असतात, तरीही अनेकदा ते नैसर्गिक रंग नसतात. त्यामुळे केक घेतानाही शक्यतो चॉकलेट किंवा साधा क्रीम रंग असलेले घेऊ लागले. बिग बझार मध्ये गेल्यावर मुलांसाठी अनेक प्रकारचे रंगीत सिरीयल्स, बिस्किटे मिळतात. त्यातही हे असेच रंग वापरलेले असतात. त्यामुळे एकवेळ दिसायला चांगले नसले तरी चालेल पण साधे सिरीयल्स घ्यावे. अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येत गेल्या आणि खाण्याची निवड बदलत गेली.
खूप दिवसांपासून हे सर्व लिहायचं होतं पण राहून गेलं. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीला घरात तिखट टेस्ट करायला लावले आणि पुन्हा लिहायची आठवण झाली. तर लेखाच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं ना की खाद्यपदार्थ दिसतो कसा यावर आपण खूप लक्ष देतो. अनेकदा एखादी हळद खूप छान रंग देतेय असं वाटलं तर ती तपासून पहा. चुकून जास्त लाल दिसणारी मिरची तर नाहीये ना हे नक्की तपासून घ्या. कारण आजकाल अन्न दिसतं कसं यावर अनेक गोष्टी ठरत आहेत, अगदी छोट्या कार्यक्रमात येणारे केटरर्सचे पदार्थही. त्यामुळे ही भेसळ अजूनच वाढतेय असं वाटतंय. हॉटेलमधील जेवण, बाहेरील खाद्यपदार्थ टाळणं हे तर उत्तमच. अर्थात हे सर्व बंद करणं अतिशय अवघड आहे, पण निदान प्रयत्न केले पाहिजेत. हा लेख लिहिताना पूर्ण रिसर्च लिहिणे हा हेतू नव्हता. तर केवळ या प्रकाराची जाणीव करुन देणे आणि विचार करायला लावणे हा होता. त्यामुळे नक्की या विषयावर वाचून पहा नेटवर आणि हो, निदान आपल्या घरातील जेवणात तरी ही भेसळ कमी होईल किंवा टाळता येईल असा प्रयत्न करा.
भेसळ असलेली मिर्ची पावडरः
घरगुती तिखट
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
टेस्ट करायला पाहिजे
टेस्ट करायला पाहिजे
लेख आणि माहिती, दोन्ही छान
लेख आणि माहिती, दोन्ही छान
खुपच छान लेख माहितीपुर्ण...
खुपच छान लेख माहितीपुर्ण... खरच काहिही खाताना आजकल भितीच असते मनात कि हे जे खातोय ते भेसळीचे तर नाहि ना? अगदि पालेभाजी खातानाहि मनात हजार शंका असतात ..
लेख व माहिती, दोन्ही एकदम छान
लेख व माहिती, दोन्ही एकदम छान. लहानपणी आई हे सगळे कुटून/कांडून आणायची. बर्याच गोष्टी घरीच बनायच्या. आजकाल बाहेर खायची इतकी फॅशन वाढली आहे. ही टेस्ट घरी करून पहायला हवी. धन्यवाद.
माहितीपुर्ण .......
माहितीपुर्ण .......
लेख आणि माहिती, दोन्ही छान!
लेख आणि माहिती, दोन्ही छान!
लेख छान.परवा द्राक्षं खाताना
लेख छान.परवा द्राक्षं खाताना देठाला हिरवा रंग होता तो विचित्र वाटत होता.काय काय आणि कुठे कुठे बघणार या विचाराने स्वाहा केले.
हो , नक्कीच टेस्ट कराय्ला
हो , नक्कीच टेस्ट कराय्ला पाहिजे, माहितीबद्दल धन्यवाद
धन्यवाद! छान लेख. इंजेक्शन
धन्यवाद! छान लेख. इंजेक्शन दिलेली केळी पण जाड सालीची आणी पिवळी धमक असतात. त्या इंजेक्शन मुळे त्याला भयानक घाणेरडा वास येतो. म्हणून ओळखीच्या फळवाल्याकडेच घ्यावी. कलिंगडे ( खरबूज) सुद्धा पूर्ण हिरव्या सालीची घ्यावीत. डिझाईन वाली घेऊ नका. त्याला टोचुनच मोठे करतात.
थोडक्यात अतिशय उपयुक्त माहिती
थोडक्यात अतिशय उपयुक्त माहिती.
मला सुद्धा अती लाल तवंग किन्वा केशरी वगैरे सूप नाही आवडत प्यायला. त्यापेक्षा मी व्हेज क्लियर पिते.
बाकी टेस्ट मी ही करून पाहिन आता घरी.
मी करुन बघितलं हळद आणि तिखट
मी करुन बघितलं हळद आणि तिखट दोन्हीकरता. भेसळ नाही असं दिसलं.
चांगली माहिती. शीर्षक थोडे
चांगली माहिती. शीर्षक थोडे अजून समर्पक हवे होते.
केळी जर संपूर्ण पिवळी, आजिबात काळे डाग नसलेली आणि देठाला हिरवी असतील तर ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असतात.
चांगली माहिती, धन्यवाद.
चांगली माहिती, धन्यवाद.
लेख भेसळीबद्दल आहे आणि विषय
लेख भेसळीबद्दल आहे आणि विषय चांगला आहे, पण शीर्षक अगदी चुकले आहे. त्या शीर्षकाचा आणि लेखाचा अगदीच बादरायण संबंध लावायचा प्रयत्न केला आहे.
धनि, बरोबर आहे. लेख आणि
धनि, बरोबर आहे. लेख आणि शिर्षकाचा संबंध फक्त पहिल्या पॅराग्राफ पुरताच आहे.
पण शिर्षकामुळे त्या शब्दाचा
पण शिर्षकामुळे त्या शब्दाचा अर्थ कळला मला तरी माहीत नव्हतं त्या टर्म ला फूड पॉर्न म्हणतात...
>>बादरायण संबंध लावायचा
>>बादरायण संबंध लावायचा प्रयत्न केला आहे.<<
त्यांना फुड प्रोन (डिसीज) असं म्हणायचं असेल...
चांगली माहिती, धन्यवाद.
चांगली माहिती, धन्यवाद.
छान लेख . बरोबरच आहे की टायटल
छान लेख . बरोबरच आहे की टायटल लेखासाठी.
बायदवे शेवटचा फोटोतला ग्लास ग्रॅव्हिटी डिफायिंग वाटला आधी
चांगली माहिती
चांगली माहिती
केळीच्या बाबतीत इंजेक्शन हा प्रकार माहित नाही
पण केळी पिकवण्यासाठी एक बाटली मिळते. रासायनिक आणि विषारी असते.हे औषध एक टोपण पाण्यात टाकुन त्यात केळी बुडवतात. १२ तासानंतर केळी पिवळीधमक दिसतात. त्यापेक्षा कच्ची केळी विकत घेऊन ती गोणपाट मधे झाकुन ठेवायची उत्तम पिकतात. सफरचंद हि स्वच्छ् धुवुन आणि पुसुन खावीत.
माहितीपूर्ण लेख. असेच लेख
माहितीपूर्ण लेख. असेच लेख लिहित जावा.
फळांमध्ये इंजेक्शन टोचत नसतात. सर्व प्रकारचे ग्रोथ रेगुलेटर्स पाण्यातून दिले जातात.
फळांत इन्जेक्शन टोचणे हे खास मिडियाचे विजुलाय्जेशन आहे.
केळी केमिकलच्या पाण्यात बुडवली जातात. इन्जेक्शन देत नाहीत
भेसळ बिसळ चेक करत नाही. करणार
भेसळ बिसळ चेक करत नाही. करणार नाही. उगा डोक्याला ताप.
ब्रॅन्डेड प्रॉडक्ट्स वापरते ते निर्भेळ असावेत अशी साधी अपेक्शा आणि आशा आहे.
लेखाचं शीर्षक फारच डिसपॉइंटींग आहे. काही मस्त लाळगाळु बघायला मिळेल वाटलं होतं.
किंवा फूड पॉर्नबद्दल माहिती. फूड फोटोग्राफी वैगेरे.
चांगला लेख . धन्यवाद
चांगला लेख . धन्यवाद
फूड पॉर्नचा अर्थ
फूड पॉर्नचा अर्थ अन्नपदार्थांची आकर्षक मांडणी सजावट इत्यादी. अन्नातली भेसळ नव्हे.
>> ब्रॅन्डेड प्रॉडक्ट्स वापरते ते निर्भेळ असावेत अशी साधी अपेक्शा आणि आशा आहे.
सहमत. दुकानातून सुटे कागदाच्या पुडीतून विकले जाणारे अन्नपदार्थ विकत घ्यायचा काळ कधीच मागे पडलाय. ब्रॅन्ड वरून दर्जा कळतो. आता एखाद्या ब्रॅन्डच्या नावाखाली भेसळयुक्त काही विकले जात असेल तर मात्र घोळ आहेच (मध्यंतरी ब्रॅन्डेड दुधाच्या पिशव्यातून नकली दुध भरून विकणारी टोळी पकडली होती). तात्पर्य: सावध असणे कधीही चांगलेच.
मला तरी लेखाचे नाव योग्य
मला तरी लेखाचे नाव योग्य वाटते.
फूड पॉर्न हा शब्द मुळात वापरला गेला तेव्हा त्याला नकारात्मकता होती. भरपूर कॅलरीज, फॅट, साखर असलेल्या पदार्थांंना मार्केट करण्यासाठी, आकर्षक रुपातले फोटो ज्यामुळे खाण्याचा मोह व्हावा , त्यातील वाईट गोष्टींचा विचार बाजूला सारुन केवळ फोटो बघून खायची इच्छा व्हावी म्हणून फूड पॉर्न.
छान लेख आणि माहिती.
छान लेख आणि माहिती.
शीर्षकही छान आहे. त्यातील पॉर्न या शब्दामुळे आत डोकावायचा मोह आवरला नाही.
जिथे भडक आकर्षक रंग दिसतो तिथे मी त्याचे कपडे शिवून टाकतो. अन्न त्या रंगाचे कधीच नसते, नसावे हे समजायची अक्कल आता आली आहे. जेवण चमचमीत असावे, चकचकीत नसावे
मस्त लेख आहे . यातील माहिती
मस्त लेख आहे . यातील माहिती महत्वपूर्ण आहे
छान लिहिलयस विद्या..
छान लिहिलयस विद्या..
लेख आणि माहिती, दोन्ही छान
लेख आणि माहिती, दोन्ही छान
फळांचे व मसाल्यांचे ठीक आहे.
फळांचे व मसाल्यांचे ठीक आहे... तपासणी व ब्रँड किंवा हवाबंद पिशव्यातील माल हे पर्याय आहेत.
पण भाजी मार्केट मधून भाजी घेताना कसे काय तपासणार? अगदी मॉल मधे देखिल भाजी ऊघड्यावरच असते.. विशेषतः green veges..
सर्वसाधारणपणे, कुठल्याही कठीण कवचाची वा सालीची फळे पाण्यात टाकून पाण्याला फळाचा रंग आला तर खोटे रंग व केमिकल्स वापरले आहेत हे लगेच तपासता येते... स्ट्रॉबेरी धुवून बघा.. खोटा रंग असेल तर अक्षरशः खालचे पांढरे कवच दिसते... व पाणी लगेच लाल रंगाचे होते. खोटा रंग नसेल तर अजीबात स्टॉबेरीचा रंग जात नाही.. गेलाच तरी सर्वत्र सारखा जातो.. कुठे कमी अधिक असे होत नाही.
Pages