फूड पॉर्न

Submitted by विद्या भुतकर on 5 March, 2018 - 22:32

अनेकदा हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्यावर समोर अन्न येतं आणि केव्हा एकदा जेवायला सुरुवात करू असं होतं. अनेकदा तर शेजारच्या टेबलवर काय आलंय हे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अन्नाचा सुवास हे तिथे एक मुख्य कारण असतं. आजकाल समोर आलेला पदार्थ खाण्यासाठी केवळ तो कसा लागतोय इतकंच पुरेसं होत नाही. तो पदार्थ दिसतो कसा, त्याची मांडणी कशी आहे हे सर्वही महत्वाचं झालंय. त्यात फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांमुळे अन्नाचे फोटो काढून ते सर्वांशी शेअर करणं अजून वाढलं आहे. त्यामुळे दिसण्याला अजूनच महत्व. अगदी थोड्या दिवसांपूर्वी आलेला 'गुलाबजाम' हा चित्रपटच त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचा ट्रेलर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं, कारण काय? तर सर्व पदार्थांची मांडणी. टीव्हीवरही खांद्यपदार्थांवर अनेक कार्यक्रम असतात. एकूण काय 'फूड पॉर्न' हा प्रकार वाढलेला आहे.

हे सगळं लिहिण्याचं कारण सांगेनच पुढे. काही वर्षांपूर्वी, माझी मुलगी दीड वर्षाची असताना भारतात सहा महिने राहून आम्ही अमेरिकेत परतलो होतो. तिला अंगठा चोखायची सवय होती आणि बाकीही काही वस्तू तोंडात घालायची अनेकदा. डॉक्टरकडे पहिल्या भेटीत त्यांनी आम्हाला तिची 'लेड टेस्ट' करायला सांगितली होती. अर्थात इथे ती सर्वच मुलांसाठी केली जाते. आमच्यासाठी ते काळजीचं कारण ठरलं कारण तिच्या शरीरातील 'लेड' चे प्रमाण जास्त निघाले. पुढे अजून रक्ततपासणी केल्यावर खात्री पटली. त्यावेळी पहिल्यांदाच मला हे असं काही असतं हे कळलं होतं. लहान मुलांच्या शरीरातील 'लेड' जास्त असणे हे काळ्जीदायक असते. 'लेड' म्हणजे शिसे या धातूचे कण शरीरात गेल्यावर त्याची विषबाधा होते. आणि त्याचे लहान मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय केले पाहिजे हे आम्ही तपासलं आणि डॉक्टरांनी तिला 'आयर्न सप्लिमेंट' द्यायला सांगितली. लवकरच ती बरीही झाली.

त्याचदरम्यान मी या विषयावर पुढे माहिती काढायला सुरुवात केली. हे लेड जातं कसं शरीरात हे पाहिलं. अनेक ठिकाणी घरातील भिंतींच्या रंगांमध्येही 'लेड' असते. किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या, खेळण्यांच्या रंगातही असू शकते. मुले त्या वस्तू, खेळणी तोंडात घालतात आणि त्यातून हे लेड पोटात जाऊ शकते. पण या सगळ्यांपेक्षा धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे, अन्नातून जाणारे शिसे, अन्नातील भेसळ. हे कसे तर, हळद, तिखट अशा खाद्यपदार्थात रंग चांगला दिसावा म्हणून रंग घातला जातो. आणि त्यातूनही लेड जाऊ शकते.

मला हे वाचल्यावर काळजी वाटू लागली म्हणून मी शोधले की तिखट आणि हळदीतील भेसळ कशी शोधायची. ते पाहून मी तशी टेस्ट घरी केली. गिरणीत कांडून मिळणारी हळद आणि तिखट वापरायला सुरुवात केली. त्या टेस्टबद्दल तुम्हाला नेटवर माहिती मिळेलच. पण साधा उपाय म्हणजे, एका पारदर्शक ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात वरुन हळदीची किंवा तिखटाची चिमट सोडायची. जर भेसळ असेल तर जसे हळद किंवा तिखटाचे बारीक कण पाण्यात खाली जाऊ लागतात तसे तसे त्यातील रंग पाण्यात पसरु लागतो. जर रंग पसरत असेल तर भेसळ आहे. हळद किंवा तिखट शुद्ध असेल तर त्याचे कण पाण्यात उतरताना रंग पसरत नाही. दुकानातून आणलेल्या तिखट हळदीलाही असेच तपासून पहा. पोस्टसोबत काही फोटो लावलेत, त्यातून थोडी कल्पना येईल.

आता हे झाले घरातील पदार्थ. मी भारतात परत आले तेव्हा मला हा अनुभव येऊन गेला होता. त्यामुळे अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर समोरच्या वाटीतील पनीर एकदम रंगीत दिसले किंवा टोमॅटो सूप केशरी दिसले की ते खाण्याची शिसारी येऊ लागली. बिर्याणीच्या वरील थरातील रंगीत भात, तंदुरी चिकनवरचा लाल रंग हे सर्व बघून त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेक वेळा आम्ही बाहेर जाणं टाळू लागलो. सगळ्यात त्रासदायक होते ते म्हणजे चायनीज जेवण. त्याच्यावरील लाल रंग तर एकदम नकोसा वाटतो. मी अनेक केक बघते, ज्यात रंगीत क्रीम असते. आता त्यात खाऊ शकतो असे रंग मिसळले असतात, तरीही अनेकदा ते नैसर्गिक रंग नसतात. त्यामुळे केक घेतानाही शक्यतो चॉकलेट किंवा साधा क्रीम रंग असलेले घेऊ लागले. बिग बझार मध्ये गेल्यावर मुलांसाठी अनेक प्रकारचे रंगीत सिरीयल्स, बिस्किटे मिळतात. त्यातही हे असेच रंग वापरलेले असतात. त्यामुळे एकवेळ दिसायला चांगले नसले तरी चालेल पण साधे सिरीयल्स घ्यावे. अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येत गेल्या आणि खाण्याची निवड बदलत गेली.

खूप दिवसांपासून हे सर्व लिहायचं होतं पण राहून गेलं. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीला घरात तिखट टेस्ट करायला लावले आणि पुन्हा लिहायची आठवण झाली. तर लेखाच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं ना की खाद्यपदार्थ दिसतो कसा यावर आपण खूप लक्ष देतो. अनेकदा एखादी हळद खूप छान रंग देतेय असं वाटलं तर ती तपासून पहा. चुकून जास्त लाल दिसणारी मिरची तर नाहीये ना हे नक्की तपासून घ्या. कारण आजकाल अन्न दिसतं कसं यावर अनेक गोष्टी ठरत आहेत, अगदी छोट्या कार्यक्रमात येणारे केटरर्सचे पदार्थही. त्यामुळे ही भेसळ अजूनच वाढतेय असं वाटतंय. हॉटेलमधील जेवण, बाहेरील खाद्यपदार्थ टाळणं हे तर उत्तमच. अर्थात हे सर्व बंद करणं अतिशय अवघड आहे, पण निदान प्रयत्न केले पाहिजेत. हा लेख लिहिताना पूर्ण रिसर्च लिहिणे हा हेतू नव्हता. तर केवळ या प्रकाराची जाणीव करुन देणे आणि विचार करायला लावणे हा होता. त्यामुळे नक्की या विषयावर वाचून पहा नेटवर आणि हो, निदान आपल्या घरातील जेवणात तरी ही भेसळ कमी होईल किंवा टाळता येईल असा प्रयत्न करा.

भेसळ असलेली मिर्ची पावडरः
chilli powder test failed (2).png

घरगुती तिखट
IMG_4551.jpgIMG_4552.jpg

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages