प्रकरण १३ ची लिंक:: https://www.maayboli.com/node/65356
प्रकरण 14
गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये जिंतेन्द्र करमरकर खूप काळजी अणि चिंता करत बसला होता. त्याचे कशातच मन लागत नव्हते. समोर टेबलावर लॅपटॉप पडला होता त्यावर स्क्रीन सेव्हर चालू झाले होते आणि जितेंद्रच्या मनावर काळजीचे स्क्रीन सेव्हर चालू झाले होते.
त्याच्या काळजीचे कारण असे होते: “चार थापडा सासूच्या” ऎन रंगात आली असतांना आणि पुढील अनेक एपिसोड्सचे लिखाण स्क्रिप्टसह राजेशकडून लिहून तयार असतांना, अचानक सुप्रियाने फक्त एका एसेमेसद्वारे जितेंद्रला कळवले होते की ती त्या सिरियलशी असलेला करार तोडते आहे. ती सिरियल सोडते आहे!
मध्येच करार तोडल्यावर लागणारी नुकसान भरपाईसुद्धा ती द्यायला तयार होती.
अचानक काय झाले ते कळायला मार्ग नव्हता. कारण ती फोनसुद्धा उचलत नव्हती...
स्क्रिप्ट सुपरवायझर रोशन रोकडे समोर बसला होता. तोही त्याच्याजवळच्या लॅपटॉपवर आणि काही कागदांत डोके आणि डोळे खुपसून बसला होता.
“रोशन! मला काही समजत नाही, काय करायचे पुढे? राजेशला कॉल करावा तर तोही उचलत नाही आहे. पुढील तयार लिखाण आपल्याला पाठवून गावी जातांना तो गावी खुप बिझी असणार असे मला सांगून गेला होता!”
“त्याला कॉल करून फारसा फायदा नाही होणार!” रोशन लॅपटॉप वरून नजर हटवत म्हणाला.
“अरे मित्रा! मग काय करायचे? स्क्रिप्ट तर बदलावी लागणार असं दिसतंय! सिरियल मधल्या सूनेला मरावं लागणार बहुतेक! आपली सिरियल प्राईम टाईम मध्ये प्रसारित होते. लाखो लोक बघतात. लोक ओरडतील आपल्या नावानं. अनेक लोक फक्त सुप्रियासाठी ही सिरियल बघतात. या सुप्रियाचंही काही कळत नाही मला! काही पर्सनल प्रॉब्लेम असणार बहुतेक!”
प्रॉडक्शन कंपनीचा हेड बसला होता...
तो अमराठी होता. डी. के. रेड्डी.
रेड्डी म्हणाला, “तुमी त्या कलाकारला कोर्टात खेचला पाहीजे. आपल्याला संकटात टाकलं तिनं! करारानुसार जरी ती करार मोडल्याचे पैसे द्यायला तयार असली तरी, सिरीयल सोडण्याबद्दल किमान एक महिना आधी तिने सांगायला हवं होतं. फक्त वेळेवर एक एसेमेस पाठवला आणि संपलं? किती नॉन सेन्स आणि अनप्रोफेशनल!”
सुप्रियाला वाचवण्यासाठी जितेंद्र म्हणाला, “अं त्याची अजून गरज वाटत नाही, रेड्डी साहेब! सुप्रिया असं काही करेल असं मलापण वाटलं नव्हतं. मला वाटते प्रथम तिच्याशी संपर्क तर होऊ द्या मग बघू! काय वाटतं? आपण थोडं धीरानं घ्यायला हवं असं मला वाटतं ते बरोबर आहे ना सर? आणि रोशन तू काय म्हणतोस?”
रोशनने गप्प बसणे पसंत केले...
रेड्डीने तिरपे तोंड करून नाईलाजाने जितेंद्रशी संमत असल्यासारखे केले आणि म्हणाला, “ठीक आहे जित! पण तुझ्याकडे काय उपाय आहे? या रोशन कडे आहे का एखादी आयडिया? रोशन? तू याआधी दोन हिंदी सिरियल केल्या आहेस, सांग काय करायचं? सिरीयल ऐन रंगात आली असतानाच हे असं घडतंय!”
स्क्रिप्ट सुपरवायझर रोशन बराच वेळ विचार करून म्हणाला, “एक तोडगा आहे माझ्या मनात! सिरियलमध्ये सूनेचा म्हणजे सुप्रियाचा अॅक्सिडेंट होतो, चेहरा खराब होतो असे दाखवून नंतर डॉक्टर तिची प्लास्टिक सर्जरी करतात असे दाखवू. मग तिच्या ऎवजी दुसरी कलाकार घेऊ!”
“इतकं करण्यापेक्षा सरळ सूचना देऊन टाकू- आजपासून सूनेचा रोल नवी अभिनेत्री करणार!”
“नाही. एकदम नवी अभिनेत्री पब्लिक अशी डायरेक्ट आणि सहजासहजी स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं!”
“मग? तुझ्या म्हणण्याप्रमाणे अॅक्सिडेंटच्या सीनसाठी तरी सुप्रिया आणायची कोठून?”
“मी सांगतो तसे करू. ते खूप सिंपल आहे. दोन जणांच्या बोलण्यात संवाद टाकायचा की सूनेचा अॅक्सिडेंट झाला. मग ते तिला बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले की प्रेक्षकांना तिचा विद्रूप झालेला चेहराच डायरेक्ट दाखवायचा जी सुप्रिया नसेलच. हिंदी सिरियलमध्ये अनेकदा असं केलंय!”
रेड्डी आणि जितेंद्र म्हणाले, “वा! रोशन. क्या आयडीया है! मान गये! स्क्रिप्ट सुपरवाईझ करून करून डोकं भन्नाट चालायला लागलंय तुझं!”
रोशनने दिलेला सल्ला दोघांना पटला.
मूळ कथेत अचानक बदल करून सून स्कूटरवरून खाली पडते आणि चेहऱ्यावर आपटते. चेहरा खराब होतो, असे दाखवण्याचे ठरवले गेले. अर्थात सिरीयल मधले दोन पात्र फक्त तसे बोलतील की असे असे झाले.
हे तर कथेचे झाले, पण आता शोध सुरू होणार होता नव्या अभिनेत्रीचा!
जितेंद्रचा मूड आता थोडा पॉझिटिव्ह झाला होता.
तो म्हणाला, “नवा कलाकार मी निवडणार. माझ्या मनात एक विचार आलाय. आपण अगदी नवीन कलाकाराला घेऊ, जिने अजून कोणत्याच सिरीयल मध्ये काम केले नसेल. आपण अॅड फिल्म मधील एखादी मॉडेल घेऊ. नवा फ्रेश चेहरा जगासमोर आणू. सुप्रियाच्या सिरीयल सोडण्याने जे नुकसान झाले आहे असे आपल्याला वाटते आहे त्याचे आपण संधीत रुपांतर करू!”
रेड्डी, “नवीन मॉडेल? नको जितेंद्र! ती एक रिस्क ठरेल!”
जितेंद्र,” नाही ठरणार! माझ्या मनात आहे एक मॉडेल! खरं तर ती माझ्या मनात सुनेच्या बहिणीच्या रोलसाठी होती जी अजून कथेत प्रवेश करणार आहे, पण तिलाच आता आपण सुनेचा रोल देऊया! आणि सुनेच्या बहिणीच्या रोल साठी नंतर बघू काहीतरी!”
रेड्डी, “ठीक आहे. आता करा बाबांनो लवकर काहीतरी आणि आणा रुळावर गाडी सिरीयलची लवकर!”
रोशन पण थोडा विचारात पडला आणि म्हणाला, “जित, सांगून टाक आता कोण ती नेमकी कलाकार? सांग! ताणू नकोस!”
जितेंद्रने लॅपटॉप पासवर्ड टाकून ओपन केला आणि त्यात एक व्हिडिओ प्ले केला आणि सगळ्यांना दाखवला:
एक मुलगी दंतमंजनने रात्री दात घासते...
पण घरातली लाईट जाते. आई वडील टॉर्च शोधायला धडपडतात पण त्यांना तो सापडत नाही.
अचानक सोळावर सोळा असे बत्तीस दिवे ओळीने चमकतात. ते असतात त्या मुलीचे चमकणारे दात!
मग दातांच्या उजेडात टॉर्च सापडते.
नंतर लाईट येते आणि ती मुलगी हातात “चमको दंतमंजन” घेते आणि म्हणते –
“रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी तुमचे दात चमको दंतमंजन ने घासायचे विसरू नका हं!
चम चमा चम, चमको मंजन!”
मग घरचे सगळे मंजन हातात घेऊन नाचायला लागतात आणि शेजारपाजारचे लोक खिडकीतून हा डान्स पाहू लागतात..
जितेंद्र म्हणाला, “आता हीच मुलगी म्हणजे वैशाली विचारे आपली सिरीयल पण चमकावणार! मी सगळी चौकशी करून ठेवलीय.
फक्त तिच्याशी संपर्क साधून फायनल काय ते ठरवून टाकू! काय सांगता? कशी वाटली आयडीया?”
(क्रमश:)
वाचतेय. चांगले चाललेय कथानक!!
वाचतेय. चांगले चाललेय कथानक!!
वाचतेय. चांगले चाललेय कथानक!!
वाचतेय. चांगले चाललेय कथानक!!>> फक्त भाग थोडे मोठे टाका.
छान चालू आहे कथा
छान चालू आहे कथा