लोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुपचाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल. तर सांगायचा मुद्दा हा की हा बाणेदारपणा हरवत चालला आहे.
आज आपल्याला व्हॉट्सॅपवर कितीतरी प्रकारचे मेसेजेस येत असतात आणि त्यावर मला "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" असे निक्षून सांगावेसे वाटते पण धीर होत नाही कारण सामजिक हितसंबंध! लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण.. सहन करतो न खाल्लेल्या शेंगांची टरफले.. हे विधात्या! तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्याला आम्ही मेसेज करतो ते आम्हाला रिप्लाय करत नाही आणि दुसर्या बाजूला जे आम्हाला मेसेज करतात त्यांना आम्हाला रिप्लाय करवत नाही.. मग हे करुणाकरा... भरकटलेल्या व्हॉटसॅपचे मेसेजेस घेऊन आम्ही कुणाच्या इनबॉक्स्मधे डोके आदळायचे? कुणाच्या.. कुणाच्या कुणाच्या!!
पुरेसा मेलोड्रामा झालेला आहे असे समजून आता मंडळ पुढील चौकात सरकत आहे. भाविकांना नम्र विनंती की त्यांनी शांतता व संयम राखावा. रांगेचा फायदा सर्वांना. ३२ लोकांनी बसावे व १८ लोकांनी उभे रहावे. तर असे शेंगा टरफलवाले मेसेजेस कोणते ते पाहू.
१. कुणीतरी ट्रीपला किंवा घरगुती कार्यक्रमाला गेलेले असते. तिथले किमान ७ तरी फोटो अशा गृपवर टाकतात जिथला एकही माणूस तिथे हजर नसतो. हेच लोक जितक्या गृपवर तुमच्यासोबत असतात त्या सगळ्या गृपमधे हे फोटो आदळतात. - मी ट्रीप/ कार्यक्रमाला आले नाही, मी एवढे फोटो डाऊनलोड करुन वा वा छान लिहीणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).
२. अचानक आलेले ज्ञान! मेसेजेस - यात आरोग्यापासून ते खगोलशास्त्रापर्यंत सगळे शोध कसे आपल्या पुराणांत, वेदांमधे आधीच लागून गेलेले आहेत आणि नासा, अमेरीका कसे लेट करंट आहेत प्रकारचे #थोरभारतीय संस्कृती मेसेजेस. - यांना 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' म्हणायची जाम खुमखुमी येते पण ही म्हातारपणापर्यंत थोपवून धरली आहे कारण तेव्हा जगण्यात 'राम' हवा!
३. फळे आणि भाज्यांचे उपयोग - हे आम्हाला शिक्षण मंडळाने शिकवायचा खूप प्रयत्न केला. तरी डब्यात पडवळ, नवलकोल, सुरण इ भाज्यांना प्रवेश नव्हता आणि आता आमच्या मुलांच्याही डब्यात नसतो. शिवाय रामानंद सागरांनीही आम्हाला (निक्षूनच!) सांगितले आहे की 'होनी को कोई नही टाल सकता'- मग भले आम्ही व्हिटॅमिन डेफिशियन्सीत जगू (एवढंच ना!) पण शेवग्याच्या सालांची चटणी खाणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).
४. राजकीय मेसेजेस - याबददल आपण सोडून सर्वांना सर्वच माहीत असते. त्यामुळे शेंगा आणि टरफलांचा उपयोग नाही. इथे टिळकच पाहिजेत. (पण तेवढं ते बोल्डमधे लिहायचं कमी कराल का? राजकीय घडमोडींबद्दल तुम्ही एवढं भरभरुन लिहीताय यातच काय ते बोल्ड आलं असं मानू.)
५. आज काय स्पेशल फोटो - रोज घरी बनवल्या जाणार्या पदार्थांचे फोटो. हल्ली यात आजूबाजूला पसारा चालत नाही म्हणे. म्हणजे तीही काळजी घेणं आलं. पण यात अगदी शेंगा आणि टरफल पोटेन्शियल आहे! म्हणजे घटक पदार्थ म्हणूनही आणि आपल्याला ज्याची चवही मिळणार नाही ते पाहून रोज ते जीभ बाहेर आलेले स्मायली का बरं टाकायचे म्हणूनही!
6. कोडी सोडवा - हे मेसेजेस म्हणजे वावटळीला निमंत्रण. एकदम 53 मेसेजेस कशामुळे बघायला जावं तर जनता जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखं कोडी सोडवत असते. चित्रं डीकोड करून उत्तर शोधण्याचा हा खेळ आपल्या पूर्वजांनी पूर्वीच खेळून ठेवला आहे.यावर मला स्वतःलाच मुद्दा क्र. 2 टाईप मेसेज लिहायची खुमखुमी येते पण पुन्हा खुमखुमी - म्हातारपण - राम आहेच. (हे चित्रलिपीत द्यायला पाहिजे डिकोड करायला.)
याव्यतिरिक्त रोजचे सुप्रभात, शुभरात्री मेसेजेस, नात्यांचे महत्व मेसेजेस किंवा मुलगी आणि वडीलांमधलं प्रेम सांगणार्या कविता, घरकाम श्रेष्ठ्काम कविता, प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ, इस्कॉन, साईबाबा, कोल्हापूर आणि हजारो देवळांमधली आजची पूजा फोटो अशा विविधतेने नटलेल्या व्हॉटसॅपचा मला मुळीच अभिमान नाही. या परंपरेची पाई'प' होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी मुळीच प्रयत्न करणार नाही. मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा मान ठेवीन पण प्रत्येकाशी सौजन्याने वागणे अवघड आहे. माझा देश आणि देशबांधव यांचे कल्याण तर होतच आहे समृद्धीही होत राहो कारण त्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शेंगा. जय टरफले.
आरं पाईप वाला जोक सांगणार का
आरं पाईप वाला जोक सांगणार का कोणी? लेखक ?
http://man7.org/linux/man
http://man7.org/linux/man-pages/man2/pipe.2.html
एका प्रोसेस कडून दुसरीकडे डेटा ट्रान्स्फर करायला लिनक्स मध्ये हा वापरतात.
धन्यवाद अमित.
धन्यवाद अमित.
पण पाई'प' चा प असा वेगळा ठेवलाय. नक्की लेखकाला हाच अर्थ सांगायचंय का .. क्यूरीयास आहे
मूळ प्रतिज्ञेमधे "पाईक" आहे.
मूळ प्रतिज्ञेमधे "पाईक" आहे. व्हॉट्सॅप वाचणारे अनेक जण आलेले मेसेज पाइप सारखे पुढे पोहोचवतात म्हणून ती कोटी आहे. पाईक शब्दाच्या जागी ते उठून दिसावे म्हणून तो "प" तसा लिहीला असावा.
एका प्रोसेस कडून दुसरीकडे
एका प्रोसेस कडून दुसरीकडे डेटा ट्रान्स्फर करायला लिनक्स मध्ये हा वापरतात.>>ok
मी विचार केला होता कि पाणी इकडून तिकडे नेण्यासठी पाईप वापरतात. तसेच मेसेजेस्चा पाईप
सोनाली, तीच अॅनलॉजी आहे.
सोनाली, तीच अॅनलॉजी आहे.
मस्त लिहील आहे.
मस्त लिहील आहे.
(No subject)
आशुडी : लेख मस्त.
आशुडी : लेख मस्त.
अगदी अभिमन्यू झालाय, कस बाहेर पडायच या वाट्सप मधून.
तीन शाळा, तीन कॉलेजेस, तीन नोकर्या, तीन देश (यात पुन्हा तीन भाषा) या सगळ्यातील आतली, बाहेरची, जनरल वर्तुळं, त्यात आता हाफिसात ऑफिशियल मिडीयम ऑफ कम्युनिकेशनचा दर्जा वाट्सपला.
हा टास्क फोर्स, तो व्हॅल्यू ग्रुप, हा स्पेशल प्रोजेक्ट, त्याच लॉचिंग. छ्या , नुसता लोचा झालाय अगदी.
पण काही म्हणा, निळी खूण खूप उपयोगी आहे. परवा आमच्या ह्या भडकल्या, पोचल्याचा फोन का नाही केला. मी उत्तर देउन गेलो लास्ट सीन तर पाहिलस ना.
निरुपयोगी कचरा... म्हणजे गुड
निरुपयोगी कचरा... म्हणजे गुड मॉर्निंगची फुले, हॅपी अमुक डे तमुक डे चे हारतुरे, सतराशे साठ स्मायलींचा मसाला टाकलेले भडंग - त्यातून वेचून वेचून एकेक शब्द शब्द गोळा करायचा आणि ह्यांचा मेसेज आम्ही वाचायचा म्हणे... तर हा सगळा कचरा इग्नोर करता येतो. नंतर एकगठ्ठा डिलीट करून टाकायचा.
पण गैरसमज पसरवणारे, किंवा चुकीच्या समजुतींवर आधारलेले मेसेजेस इत्यादींना मात्र मी लगेच गुगल करून ते कसे खोटे आहे हे दाखवणारी लिंक शोधतो (आजकाल ती पटकन सापडते सुद्धा, hoax buster इत्यादी साईट्स आहेत) आणि चिकटवून देतो. सुरवातीला लोक माइंड करत पण असे करत राहिल्याने नंतर नंतर असे मेसेज येणे बंद झाले.
भन्नाट लिहिलं आहेस. ग्रुपवर
भन्नाट लिहिलं आहेस. ग्रुपवर हा छळ जबरदस्त चालतो, माझ्या १२ वीच्या वर्गाच्या ग्रुपात रोज महालक्ष्मी च्या पुजेचे फोटो. एखादा अॅडल्ट जोक पडला तर पोरी धुमाकुळ घालणार... मी रामराम ठोकला.. कं टाळा आला असल्या गोष्टीचा
सतराशे साठ स्मायलींचा मसाला
सतराशे साठ स्मायलींचा मसाला टाकलेले भडंग >>> भडंग उपमा जबरी
आशूडी - आणखी एक राहिले. फॉरवर्ड. करता. आलेच. पाहिजे.
परंपरेची पाई'प' >> धमाल !
परंपरेची पाई'प' >> धमाल !
खूप च भारी लिहिलेय....
खूप च भारी लिहिलेय....
सॉलिड लिहिलं आहेसं
सॉलिड लिहिलं आहेसं
हाहाहा डेडली विनोदी लिहीलय!!!
हाहाहा डेडली विनोदी लिहीलय!!! हहपुवा.
मस्त लिहीलय...व्हाॅट्सॲप
मस्त लिहीलय...व्हाॅट्सॲप मेसेजेस मुळे मलाही फार त्रास व्हायचा पण ह्यावर सूड म्हणून मी रोज ५-६ इकडचे तिकडचे फोटोज व्हाॅट्सॲप स्टेटस वर टाकत असते.. चांगला २४ तास त्रास देता येतो
Pages