वलय (कादंबरी) - प्रकरण ८

Submitted by निमिष_सोनार on 2 February, 2018 - 06:03

प्रकरण ७ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65143
----

प्रकरण ८:

सोनीला तिसऱ्या दिवशी तिच्या रूमवरच्या इंटरकॉमवर हॉस्टेलच्या ऑफिसमधून फोन आला.

"आपकी मदर आई है. ऑफिस में बैठी है!"

"आई? आत्ता? अशी अचानक कशी आली?" असा विचार करत ती म्हणाली, "ठ ठीक है, भेज दो उनको अंदर!"

"नही, वे अंदर नही आयेंगी. आपही को बाहर बुलाया है!"

सोनी थोडी साशंक विचारांनी बाहेर जायला निघाली.

“आई जवळ फोन आहे पण तिने फोन केला नाही. मला निघतांना किंवा पोचल्यावर कॉल केला नाही? काय झालं असेल? अशी अचानक का आली ही?”

तिच्या रूम मधून बाहेर निघून ती हॉस्टेलच्या कॉरिडॉरमधून चालू लागली.

हॉस्टेलमधल्या बहुतेक मुली मोकळ्या कपड्यांत इकडून तिकडे फोनवर बोलत फिरत होत्या.

काही जणी आपल्या लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसल्या होत्या तर काही भर दुपारी झोपल्या होत्या.

पायऱ्या उतरून ती हॉस्टेलच्या ऑफिसमध्ये आली. एका बेंचवर आई बसलेली होती. बाजूला एक मोठी सुटकेस ठेवलेली होती आणि बाजूला आणखी एक बॅग!

सोनी दरवाजात दिसताच आई ताडकन उठून उभी राहिली आणि सोनी तिच्या जवळ जाताच तिने सोनीच्या कानाखाली तीन फटाफट लगावून दिल्या.

सोनी त्यातून सावरून काही म्हणणार त्याआधीच तिची आई म्हणाली, “तुझे आमच्याकडे असलेले सगळे उरले सुरले सामान या मोठया सूटकेस मध्ये आहे. जे काय असतील नसतील ते दागिने आहेत. कपडे आणि तुझ्या आवडीच्या वस्तू पण आहेत.”

“अगं आई, काय झालं सांगशील तर खरं? तू अचानक गावाकडून इथे न सांगता का आलीस? आपला पप्प्या काका कसा आहे? शेजारच्या सुलीचं काय चाल्लंय आजकाल?”

“जास्त नाटकं करू नगंस! नाच करता करता नाटकं पण करायला लागलीस व्हंय? लई झालं तुझं नाचाचं कवतीक! नाच काय कमी होता की काय सटवे, म्हणून आता स्वताचे नंगे फोटू टाकाया लागलीस त्या फिन्दऱ्या काळकुंद्र्या इंटरनेटवर?”

मग सोनी पण तिच्या गावाकडच्या मूळ भाषेत बोलू लागली.

“आई, आत्ता लक्षात आलं की कुणी दावला असंल तुला त्यो माझा नंगा फोटू? मला माहीत आहे, पप्प्या काकानंच तुला ते दाखवलं असणार, तुझ्या मनात कायबी वंगाळ घातलं असणार!”

“आगं खुसमटे, निदान त्यानं मला दावलं तरी! तव्हा समजलं की आपली दिवटी डान्सच्या नावाखाली काय दिवे लावते आहे ते!”

“आई, लय शाना झालाय तो काका! त्याला विचार की जरा, त्यो काय करतूया दिवसभर मोबाईल वर?”

“जुबान लडवतेस व्हय चिलटे! आज त्यो काका हाय म्हनून तू एवढी मोठी झाली. नाहीतर तुझा बा गेल्यावर आपल्याला काय काय सहन कराया लागलं व्हतं, ठाव हाय ना? आता त्यो दारू पित फिरतो पन आधी त्यानंच आपल्याला सावरलं. आज तुजा बा असता ना, तर तुझे हे असले नंगे फोटो पाहून जिता मेला असता त्यो!” असे म्हणून ती पदर डोळ्याला लावून अश्रू पुसू लागली.

सोनी शांत होती पण वेगवेगळ्या विचारांनी तिचे डोळे सैरभैर फिरत होते.

ती मनात विचार करू लागली, “मी माहिन्याला पैसे पाठवते ते मात्र कसे गोड लागतात हिला आणि काकाला?”

तिची आई पुढे म्हणाली, “आता बास! तुझा कार्यक्रम आपल्या गावात जे जे लोक पाहात होते त्यांनी तो बघणा सोडलाय! तू आता गावात येऊ नगंस! आलीस तर मी सरपंचाला सांगून बदडून काढायला लावंन तुला! काय समजतीस व्हय स्वताला? यापुढे तुजा आपला आणि गावाचा संबंध संपला! तू, तुझं फिलिम, आनं डान्सचं याड सोडणार नाही, मला ठाव हाय. पण, म्या तुला सोडलं हाय कायमचं!”

“ठीक आहे, फोटोमुळे माझे गावातले हजार वोट गेले तर हरकत नाही, शहरांमधून मला लाखो वोट मिळतील. सांग तुझ्या त्या बुरसटलेल्या विचारांच्या गाववाल्यांना! मला तुमची गरज न्हाय म्हनावं! आनं त्यो काका? त्यो कसला काका गं? माझ्यावर नेहेमी वाईट नजर ठेऊन असतो, त्याला काय बोलत नाय तू? दारु पित फिरतो गावभर! काम थोडं आन् सोंगंच लई हायेत त्याची! मला बी गरज नाय तुमची आन् तुमच्या गावाची!”

“ठीक आहे. पन् लक्षात ठेव पोरी! पस्तावशील तू एक दिवस! लई पस्तावशील. निघते मी आता! हां पण माहिन्याला पैका पाठवायला विसरू नगंस हां!”

“हां हां. जा. जा निघून आन्ं बैस सोबतीला घिऊन त्या काकाला गावातल्या हिरीजवळच्या झाडाजवळ! काय त्यो काका आन्ं काय त्ये गांव! पन एक ध्यानात ठेव! मी तुला पैका देत जाईन! पण तो त्या काकाला द्यायचा नाय, काय? कळलं का? दारूत फुकंल तो सगळा पैसा!”

आई रडत रडत निघून गेली.

तिने एक क्षणसुद्धा मागे वळून पाहिले नाही. सोनीला सुद्धा त्याचे काही विशेष वाटले नाही. कारण तिच्या आईने तिच्या वडलांच्या मृत्यूनंतर तिला हळूहळू दूर केले आणि तिच्या काकाला जवळ केले होते.

सुटकेस घेऊन रूममध्ये जाता जाता तिला एका मागून एक असे अनेक जुने दु:खद प्रसंग आठवायला लागले.

पण ती मनात म्हणाली, “सोनी मॅडम, सावरा स्वतःला! विसरा ते आता आणि आपल्या डान्स काँपिटिशन कडे लक्ष द्या! यु हॅव लाँग वे टू गो!”

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली!!!!
पुलेशु .. छान आहे .. मोठे भाग असतील तर मजा येईल आणखी वाचायला..

ड्रामॅटिक आहे हे सगळ.
जसं एखाद्या डेली सोपचा शॉट शूट होतोय असं वाटतं.
अ‍ॅक्शन म्हतलं की सीन चालु आणि दोनचार नाटकी संवाद झाले की कट.
त्यात आणि डीटेलिंग जास्तच होतंय.
आई आणि सोनीचा संवाद तर काहीतरीच वाटला.

कादंबरी आवडत आहे हे ऐकून आनंद वाटला.

सस्मित म्हणतात की हे ड्रामॅटिक आहे.

खरे आहे.

मुद्दाम ड्रामॅटिक लिहिले आहे.

आणि कादंबरीविषयी आणखी काही शंका आणि गोष्टींचे उत्तर वाचकांना शेवटच्या काही प्रकरणांत मिळेलच.

वाचत राहा.

Happy

सोनी आणि तिच्या आईच्या संवादाबद्दल आणि नीतीमत्तेबद्दल -

कादंबरीच्या सुरुवातीला मी स्पष्ट केले आहे की हि कादंबरी थोडीशी बोल्ड असणार आहे.
सोनी बनकर ची व्यक्तिरेखा लिहितांना माझ्या मनात "राखी सावंत" , "पूनम पांडे" या सारख्या काही व्यक्ती डोळ्यासमोर होत्या.