मागचा भाग : https://www.maayboli.com/node/64260
आम्ही पायवाटेवरून चालायला सुरुवात केल्यावर माझा पोर्टरही मागून यायला लागला.(त्याचे नाव विसरले.) बाकी कोणी पोर्टर घाटीत नव्हते, सगळे त्या मोठया दगडी गुहेत आराम करत होते. मी याला म्हटले की सोबत यायची तशी गरज नाही पण तो तरी आला मागून…
घाटी चढताना दिसलेले हिरवेगार गवती पठार प्रत्यक्षात कमरेएवढ्या उंच झाडांचे दाट जंगल आहे.
आपण दुरून जंगल बघतो तेव्हा झाडे आपल्यापेक्षा खूप उंच असल्याने आपल्याला लांबून बुंध्याची गर्दी दिसते. घाटीतली झाडे आपल्यापेक्षा खूप बुटकी असल्याने आपल्याला लांबून त्यांचे हिरवेगार माथे दिसतात व त्यामुळे पठार पाहतोय असे वाटते.
काही झाडे 5-6 फूट एवढीसुद्धा वाढलेली आहेत पण ती सगळीच फुलझाडे असल्याने खूप नाजूक आहेत. अधून मधून मोठी झाडेही वाढलेली आहेत, पण ती या फुलांच्या भानगडीत न पडता स्वतःचा ग्रुप करून वेगळी राहतात.
उत्तराखंडभर पसरलेल्या शिळा इथेही इथे तिथे पडलेल्या आहेत, ज्याला टेकून आपल्याला आराम करता येतो. काही उत्साही लोक शिळांवर चढून निवांत बसले होते.
घाटीत आमच्या ग्रुपचे लोक फारसे दिसले नाहीत. शामली वगैरे आधीच पुढे निघून गेली होती. त्यांना नदीकिनारी जायचे होते जे तिथून 5 किमी दूर होते. हम वहातक नहीं जायेंगें हे मी पोर्टरला आधीच सांगून टाकले. निदान स्मारकापर्यंत जाऊ असे तो म्हणाला. म्हटले बघू. आमच्या जितके आवाक्यात आहे तितके पाहू.
बाकी गुजराती ग्रुप मधले एखादे चुकार वासरू अधून मधून दिसायचे. रमेशसुरेश अजिबात दिसले नाहीत. बंगलोर ग्रुपपण सगळा गायब. बेंगलोरी नवराबायको एका शिळेवर चढून आराम करत बसलेले. बायको शांत बसलेली त्यामुळे नवरापण निवांत.
मलाही शिळेवर चढून थोडे शायनिंग करायचे होते, पण माझे फोटो काढायला उत्सुक फोटोग्राफर कुणी नव्हतेच तर कसली शायनिंग मारणार.... तरी हातापाया पडून एक फोटो काढून घेतला.
घाटीत टाचणीएवढया बारीक फुलांपासून तळहाताएव्हढ्या मोठ्या फुलांपर्यंत वैविध्य आहे. सगळी फुले एकात एक मिसळून वाढतात, एकात एक गुंतलेली वेगवेगळी फुले एकत्र नांदतात, त्यामुळे खूप लक्षपूर्वक पाहावे लागते. टाचणीएव्हढया फुलांचे प्रत्यक्ष रूप पाहण्याची माझ्या डोळ्यांची क्षमता नसल्याचे मला जाम वाईट वाटत होते. परत घाटीत गेले तर मी सोबत भिंग घेऊन जाणार आहे. आणि फोटो काढायला सोबत जिप्सी हवा. (माझेही एखाद दोन फोटो भिडेखातर काढून देईल बिचारा.)
ह्यात बघा कमीत कमी तीन प्रकारची फुले दिसताहेत. आणि ती काळी फुले आहेत तो पूर्ण गुच्छच टाचणीएवढा आहे. त्यातले प्रत्येक फुल किती मोठे असेल देव जाणे. मुळात फुल कसे दिसते तेही मला नीट दिसू शकले नाही. तिथे भिंग हवे.
ती काळी फुले थोडी जवळून… फोटोत मोठी वाटताहेत, प्रत्यक्षात एक गुच्छ टाचणीएवढा.. हिमालयन थरोवॅक्स thorowax root.
Botanical name : bupleurum candollei.
खालच्या फोटोतल्या फुलाचे नाव माहीत नाही बहुतेक हिमालयन स्ट्रॉबेरी असावी पण त्याच्या वरच्या बाजूला हिमालयन थरोवॅक्स व खालच्या बाजूला लॉंग स्टेम थरोवॅक्स आहेत असा माझा अंदाज आहे.
आणि पिवळी फुले - जॅकमॉंट्स लिगुरिया. Ligularia jacquemontiana
अजून थोडी पिवळी फुले - आनंदी सेनेसीओ Senecio laetus
लांबून पठारासारखी सपाट वाटली तरी घाटीत चढउतार भरपूर आहेत. पुष्पावती ही एक मोठी नदी घाटीतून वाहते, अधून मधून लहानमोठे झरे वाहतात जे त्या नदीला जाऊन मिळतात. लोकांना चालण्यासाठी दगडी पायवाटा बांधल्यात, त्या नागमोडी दगडी पायवाटेवरून चालत फुले पाहत फिरताना खूप मस्त वाटते. झरे कधी मिनी नदीत रूपांतरित होतात. अशा ठिकाणी झऱ्यांवर छोटे पूल बांधलेत.
हा ब्रिज अगदी खेळण्यातला वाटतो ना? तसाच आहे. आणि चालताना कधी पायाखाली येतो कळतही नाही.
यावरून पलीकडे जायचे. एकावेळी एकानेच.
फुलांचा कुंद वास हवेत गच्च भरलेला, आपण मस्त रमतगमत चालतोय, स्वच्छ पाणी खळखळाट करत वाहतेय, वाटले तर तेच पाणी आपण हाताने उचलून थेट पितोय, भुंग्याची व मधमाशांची गुणगुण जोरात सुरू आहे. माणसांचे तुरळक आवाज सोडल्यास इतर कुठलाही मानवनिर्मित आवाज रसभंग करत नाहीये. भुंगे, मधमाश्या, फुले, झाडे, डोंगर, झरे असा रसरशीत जिवंत निसर्ग आजूबाजूला अखंडित हालचाल करत असूनही एक विलक्षण स्तब्धता वातावरणात पसरलीय असे काहीसे नशिले स्वप्नवत वातावरण घाटीत अनुभवास येते. फक्त आमच्या नशिबी होता तसा स्वच्छ सूर्यप्रकाशी दिवस मिळायला हवा.
हा एक झरा, याचे पाणी पिता येते.
मी पोर्टरचा सल्ला विचारून पाणी पीत होते.
हेही वाहते पाणी आहे, डोळ्यांना दिसत नसले तरी
हे पण तिथेच बाजूला
आपण काहीतरी पाहत चालत असतो, चालता चालता वळणावर वळून पुढे गेलो की अचानक काही वेगळाच नजारा समोर उभा ठाकतो. घाटी ही खरेच प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. कॅमेऱ्यात प्रत्येक फुलाचे सौंदर्य बंदिस्त करता येईल पण अशी वेगवेगळी सौंदर्यस्थळे बेगुमानपणे, अनियंत्रित फुललेली पाहणे काय आहे ते अनुभवण्यासाठी मात्र घाटीतच जावे लागेल.
जून ते सप्टेंबर हे चार महिने घाटी पर्यटकांसाठी खुली असते. बाकीचे महिने शुभ्र हिम पांघरून फुलबिया झोपलेल्या असतात. जून महिन्यात बर्फ वितळू लागते व बिया जाग्या होऊन रोपे डोळे चोळत माना उंचावू लागतात. आठ महिने पांढरीशुभ्र असलेली घाटी या महिन्याच्या शेवटी शेवटी हिरवा शेला पांघरून घेतलेली दिसते. जून महिन्यात घाटीला गेल्यास वितळणाऱ्या हिमनद्या म्हणजेच ग्लेशियर्स व वाढत असलेली रोपे दिसतात. जून महिन्यात गोल्डन लिली फुलते जी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसते. आम्हाला अर्थातच दिसणे शक्य नव्हते.
वर पाहिलेले लाल फुल परत एकदा -
हे आहे रुबी सिंकफॉईल. याचे शास्त्रीय नाव Potentilla argyrophylla scarlet starlit.
हे एक रूप
हे खालचे सिल्वर लिफ सिंकफॉईल. शास्त्रीय नाव Potentilla fruicticosa.
त्याची फळे असावीत का ती? किती गोड दिसताहेत..
खाली दिलेय ते जेरॅनियम.
याला हिल जेरॅनियम म्हणतात. Geranium collinum
हे मिडो जेरॅनियम . Geranium Pratense
हेही तेच
अजून एक रूप
ह्या खालच्या गर्दीत हिमालयन बालसम, थरोवॅक्स, जेरॅनियम आणि अजून एक खूप लहान फुल आहे.
खालच्या फोटोतल्या जेरॅनियमला हिंदीत रतनज्योत म्हणतात असे फ्लॉवर्स ऑफ इंडिया सांगतेय. Wallich geranium.
बोटॅनिकल नाव Geranium Wallichianum
हे नेपाळ जेरॅनियम. Geranium nepalense. बाकी जेरनियम च्या तुलनेत खूप लहान. बाकीची साधारण जुन्या मोठया 1 रुपयाएवढी होती, हे चार आण्याचे नाणे
यात हा रंग सुद्धा दिसला.
जुलै - ऑगस्ट हे घाटी पाहायचे खरे महिने. जून मध्ये तरारलेली रोपटी या महिन्यात फुलू लागतात. जुलैच्या सुरवातीपासून एपिलॉबीयम लॅटिफोलियम फुलायला लागते. याला तिथे रिव्हर ब्युटी म्हणतात. मला हे फुल पहावयास मिळाले नाही. नदीच्या आसपासचा भाग या फुलाने पूर्ण भरून जातो व घाटी गुलाबी दिसायला लागते.
गुलाबी रंगात मी ही फुले पाहिली -
ही लौस्वर्ट असू शकतील.
खालचे बहुतेक हिमालय विलो हर्व असावे.
Royle's Willow-Herb,
Botanical name: Epilobium royleanum Hausskn. Epilobium royleanum
ऑगस्टपर्यंत हिम पूर्णतया वितळून गेलेले असते व असंख्य फुले दाटीवाटीने ऊन खात उभी असताना पहावयास मिळतात. फुलांची सर्वाधिक संख्या जरी ऑगस्टच्या मध्यावर पाहायला मिळाली तरी तोवर कित्येक फुलझाडे त्यांचे एका आठवड्याचे आयुष्य जगुन बिया जमिनीत टाकून परत झोपलेली असतात. हे चक्र सतत चालतच असते, त्यामुळे घाटीतल्या फुलांचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर जून ते सप्टेंबर ह्या दरम्यान वेगवेगळ्या वेळी येऊन दरवेळी वेगळी फुले पाहून तो घेता येतो. ब्लु पॉपी हे तिथले एक प्रसिद्ध फुल आम्ही तिथे जायच्या आधीच फुलून गेले होते. अर्थात हेमकुंडच्या रस्त्यावर आम्हाला ते भेटले, पण त्याचे घाटीतले आयुष्य संपले होते.
खाली दिलेली फुले तुऱ्यात येतात. एक फुल नखाएव्हढेही नसेल, अशी असंख्य फुले एका तुऱ्यात असतात.
हा एक तुरा:
फुललेली फुले :
याचे नाव हिमालयन नॉटविड. गर्द गुलाबी दांडा व त्यावर अतिशय फिक्कट गुलाबी फुले. याचे भरपूर पीक आहे घाटीत. अतिशय सुंदर दिसतात ही फुले.
बोटॅनिकल नाव : Persicaria wallichii. फुले किती लहान असतील याचा एक अंदाज.
आम्ही गेलो त्या दिवशी घाटीत फारशी गर्दी नव्हती. आम्ही चालत असताना अधून मधून कोणी भेटायचे. एक स्त्री जी खाली झऱ्याकडे भेटलेली ती परत एकदा वर भेटली. आम्हा दोघींना पाहून तिने दोन मैत्रिणी ट्रेक करताय का विचारले. मला सांगायला थोडा संकोच वाटत होता तरी मी म्हटले आमचा मायलेकींचा ट्रेक आहे. तिने आधी ओSSS असा दीर्घ आवाज काढून भुवया वगैरे उंचावल्या व नंतर तोंड वाकडे केले. म्हणाली, हे माझ्यासोबतही नेहमी होते. मला यात तोंड वाकडे करण्यासारखे काय ते कळेना. तर म्हणे मी आईसोबत असले की लोक आम्हालाही मैत्रिणी समजतात. मी म्हटले ही तर कॉम्प्लिमेंट आहे, यात वाईट काय? तेव्हा उसासा टाकून ती म्हणाली की ही आईसाठी कॉम्प्लिमेंट आहे, पण माझे काय? आईला ती आहे त्यापेक्षा कमी वयाची समजतात ते ठीक आहे पण तिला ज्या काही वयाची समजतात त्याच वयाची मलाही समजतात त्याचे काय? माझ्यासाठी ही कॉम्प्लिमेंट नाही. हा मुद्दा आजवर माझ्या लक्षात न आल्याचे मी मान्य केले. ऐशु अजून तेवढी मोठी न झाल्याने सध्या तरी तिला काही प्रॉब्लेम नाहीय :).
हे अल्पाईन मांजराचे शेपूट alpine कॅट टेल. Phleum alpinum
हे फुलझाड बघून आपल्याइथल्या तालीमखाना ह्या फुलझाडाची आठवण झाली. तेही असेच दिसते. याला व्हर्लफ्लॉवर म्हणतात, शास्त्रीय नाव Morina longifolia. याला अतिशय सुंदर गुलाबी फुले येतात. बहुतेक फुले येऊन गेली आणि नुसते झाड मला भेटले.
आधीच लिहिल्याप्रमाणे घाटीत विविध आकाराच्या व रंगाच्या इंपेशन्स उर्फ बालसमचे अमाप पीक येते. नखाएव्हढी ते बोटाएवढी लांब फुले आणि गुलाबी, पिवळा व पांढरा ह्या तीन रंगांत वेगवेगळे कॉम्बिनेशन हे इतके तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला सहज दिसले. तज्ञ मंडळींना त्यातले अजून काही बारकावे दिसत असणार. एका आठवड्यात गुलाबी बालसम सर्वाधिक फुललेली असते तर पुढच्या आठवड्यात पांढरी तर त्या पुढच्या आठवड्यात पिवळी. इतर सर्व फुलझाडांच्या गर्दीत बालसम डोके वर काढून उंच मिरवत असल्याने लांबून ज्या रंगाची बालसम फुललीय त्या रंगाची ओढणी घाटीने पांघरल्यासारखी दिसते. दर आठवड्यात नवनवीन फुले फुलायचे काम सुरू असल्याने घाटी दर आठवड्याला रंग बदलते. ही हिमालयन बालसम 6 फुटांपर्यंत वाढलेली मी पाहिलीय. याचे आपल्याकडचे भावंड म्हणजे तेरडा जेमतेम दीड फूट वाढतो.
बॉलसमचे काही फोटो:
घाटीत जीचे स्मारक आहे त्या मिस जोन लेगीचे नाव दिलेले बालसम. बोटॅनिकल नाव : Impatiens leggei
हे बहुतेक Meebold's Balsam असावे. Impatiens meeboldii
हे हिमालयन बालसम असावे. लांबी साधारण आपल्या बोटाएवढी. ही दोन फुले एकाखाली एक आहेत.
शास्त्रीय नाव Impatiens sulcata.
हे Rugged Yellow Balsam, Impatiens cristata
घाटीत फुलांच्या जागांचाही एक क्रम आहे. जरी वेगवेगळी फुले एकत्र फुलत असली तरी त्यात एखादया फुलाचे प्राबल्य असते. चालत थोडे पुढे गेले की त्या फुलाचे प्राबल्य कमी होते आणि त्याजागी दुसरे फुल जास्त दिसायला लागते. त्यामुळे एका दिवसात कितीही फिरलो तरी घाटीतली सगळी फुले पाहिल्याचे समाधान काही लाभत नाही. यासाठी एकच उपाय - कुठल्याही टूर ऑपरेटरच्या नादाला न लागता आपले आपण येऊन आठवडाभर इथेच मुक्काम करायचा. टूर ऑपरेटर फक्त एक दिवस घाटी दाखवतात.
घाटीत फिरताना जेव्हा ही मान टाकून पडलेली, सुकल्यासारखी दिसणारी काळी फुले प्रथम दिसली तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, सुकलेली फुले म्हणत. सुकून काळी पडलेली, मिटल्यासारखी दिसणारी अतिशय अनाकर्षक फुले.
ही फुले ताजी असताना कशी दिसत असावीत हा विचार करत असताना अचानक एका फुलातून भुंगा बाहेर पडून दुसऱ्या फुलात घुसला. सुकलेल्या फुलात भुंगा काय करतोय?
मी पोर्टरला विचारले, ये फुल सुख गये है ना?
'नहीं, ये फुल ऐसेही है। हमारे नेपालमेभी ये है।' तो उत्साहाने म्हणाला.
मी नव्याने त्या फुलांकडे पाहू लागले. कुठल्याही बाजूने ही फुले ताज्या फुलांसारखी दिसत नव्हती पण भुंगा इंटेरेस्टेड आहे म्हणजे फुले ताजी व आतमध्ये मध असणार हे निश्चित.
याचे नाव कूट किंवा कुष्ठ. बोटॅनिकल नाव: Saussurea auriculata
वर या फुलांसोबत पांढरी फुले दिसताहेत ती आहेत मिल्क पार्सली. दुधासारखी पांढरी शुभ्र.
मी याला गुपचूप ओवा नाव देऊन टाकले
ही फर्न लिफ मिल्क पार्सली. बोटॅनिकल नाव :Selinum filicifolium
लांबून अशी दिसतात
खालच्या फोटोत बहुतेक दोन जाती एकत्र झालेल्या आहेत.
ही आहेत मोऊंटन अँजेलिका. मी याला बडीशोप नाव दिले
शास्त्रीय नाव Angelica oreadum
हि फुलेही वरच्या मिल्कविड सारखी मोठ्या गुच्छात येतात.
बऱ्याच ठिकाणी झाडे दबल्यासारखी वाटत होती. जणू कोणी तिथे त्या फुलांवर लोळले होते. आमच्या समोर तरी कोणी असा गाढवपणा करताना दिसले नाही. एकतर कोणी लोळले किंवा बसले असावे अथवा वाऱ्यामुळे झाडे दबली असावीत. फुले तोडू नका असे खाली ऑफिसात सांगतात. पण आपल्याकडे मूर्खांचा भरणाच जास्त आहे त्याला काय करणार? माझ्या ऑफिसातली एक मुलगी गेल्या वर्षी घाटीला गेली होती, ती सांगत होती की हेमकुंडच्या वाटेवर मूर्ख लोक ब्रम्हकमळे तोडून, त्यासोबत सेल्फी काढून नंतर ती फुले फेकून देत होते. त्यांना ओरडणारेही काही ट्रेकर्स होते पण फुल एकदा तोडले की गेलेच ते. ही सगळी फुले तिथे फक्त झाडांवर ताजी राहतात. तुम्ही फुल तोडले की पाच मिनिटात ते मान टाकते. मग का तोडावे? डोळ्यांनीच घ्या न हवा तितका आनंद. मालकीहक्कही हवा ही भावना का?
हे आहे ब्लु सॉ थिसल. शास्त्रीय नाव Lactuca brunoniana
हे आहे ब्लॅडर फूल. शास्त्रीय नाव Silene vulgaris
हे आहे फ्लिबेन. शास्त्रीय नाव Erigeron multiradiatus
हे Anaphalis nepalensis चे वेरीएशन आहे असे मला वाटते.
फ्लॉवर्स ऑफ इंडिया वर जरी नेपाळ पर्ली एवरलास्टिंग नाव दिलेय तरी फुलांमध्ये थोडा फरक आहे हे नक्की.
घाटीतून चालताना पायवाटेवरूनच बहुतेक जण चालत होते, अधून मधून फुलांचे जंगल विरळ झाले होते, पायवाट सोडून मी तिथून शक्य तितके आत जाऊन फुले पाहात होते. पण हे सगळीकडे शक्य नव्हते. त्यामुळे पायवाटेवरून चालत दोन्ही बाजूला लांबवरची जितकी फुले दिसतात तितक्यावर समाधान मानणे भाग होते.
कित्येक झाडांची पानेही फुलांसारखा आकार व रंग हेधारण करून मिरवीत होती.
हे अजून एक
घाटीमध्ये फिरत फिरत खूप वेळ गेल्यावर अंगावर पावसाचे बारीक तुषार पडल्यासारखे वाटायला लागले. आता परत फिरायचे का असे पोर्टर विचारायला लागला. घाटीत वरखाली करून ऐशु व मी थोडे थकलो होतो म्हणून आम्ही परत फिरायचा निर्णय घेतला. घाटीत जेवढे आत चालत जाणार तेवढेच माघारी चालत यावे लागते, फिरताना कायम हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आम्ही होतो त्या ठिकाणाहून लांबवर मिस लेगीचे स्मृतिस्थळ दिसत होते पण आम्ही जिथे होतो तिथून ते थोडे खाली असल्याने तिथवर जाण्याइतकी ताकद अंगात नव्हती ना हातात तेवढा वेळ होता. भराभर उतरून तिथपर्यंत जाता आले असते पण परतताना असल्या डोंगराळ व ऑक्सिजन कमी असलेल्या जागी चढ चढणे किती कठीण असते हे ज्ञान केवळ अनुभवाने येते.
हे गोल पानांचे घंटी फुल.
शास्त्रीय नाव Codonopsis rotundifolia
फुल गळून गेले की मागे असे उरते.
हे अजून एक घंटीफुल. ट्रेलिंग बेलफ्लॉवर. Cyananthus lobatus
घाटीपेक्षा खाली उतरताना ही फुले जास्त आढळली.इतकी होती की तेवढा परिसर पूर्ण निळा....
ह्या फुलामागचे बालसम सुद्धा पहा किती वेगळे दिसतेय
काही फुले अनोळखी राहिली.
घाटीतून पाय निघता निघत नव्हता. बघण्यासारखे अजून बरेच काही होते पण निघणे भाग होते. आज सुदैवाने अजिबात पाऊस पडला नव्हता, बऱ्यापैकी ऊन होते. मी सोबत छत्री घेऊनच फिरत होते त्यामुळे पावसाची फारशी भीती नव्हती पण पाऊस पडला तर उतरताना त्रास झाला असता. त्यामुळे जास्त वेळ न घालवता घाटीला टाटा, बाय बाय, फिर मिलेंगे म्हणत आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. जेवढे चालत आत गेलेलो तेवढेच चालत परत त्या दगडी गुहेपर्यंत आलो.
ऐशुचा पोर्टर आमची वाट पाहत बसलेला. त्याची मस्त झोप काढून झालेली व गोळीच्या प्रभावाने त्याचा तापही गेला होता.
पुढे रिकामा पोर्टर, त्याच्यामागे मी व आमच्यामागे ऐशूला घेऊन तिचा पोर्टर अशी वरात घाटी उतरायला लागली. उतरणे सोपे जाईल असा चढताना माझा समज झालेला तो गैर होता हे उतरताना कळले. तरी आम्ही शक्य तितक्या हळू चालत होतो. उतरताना गुढगे व पावलांवर खूप ताण येऊन पायाचे तुकडे पडताहेत असा भास होत होता. खूप ठिकाणी थांबत थांबत मी उतरत होते.
आधीच लिहिल्याप्रमाणे घाटीचा रस्ता फारसा रुंद नाही. काही ठिकाणी तर एका वेळेस दोन माणसे आरामात बाजूबाजूने चालू शकतील, तिसरा मात्र सोबत चालू शकणार नाही इतका अरुंद आहे. रस्ता कसला, दगड टाकून बनवलेली पायवाट म्हणायला हवी. एका बाजूला घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला खोल दरी, रेलिंग्स कुठे आहेत तर कुठे नाहीत. आणि पायवाटेवर ओबडधोबड दगड. पाय बिय सटकला तर गेलो थेट खाली दरीची खोली मोजत. हल्ली कोणी दरीत पडले होते का वगैरे प्रश्न जिभेच्या टोकावर आले होते, महतप्रयासाने आवरले. नैतर आपल्यालाच प्रात्यक्षिक मिळायचे. ह्या दगडांचा काय भरोसा!!! असे असूनही काही तरुण मुले, जी बहुतेक उत्तराखंडातलीच असावीत, धडाधड धावत उतरत होती. मागून हसत ओरडत धावणाऱ्या मंडळींचा आवाज आला की मी जंगलाच्या बाजूला सरकून मंडळींना जागा करून द्यायचे.
घाटीत फिरताना फारसे कोणी दिसले नाहीत पण उतरताना लोक दिसत होते. वाटेत एक बंगाली जोडपे दिसले. चेहऱ्यावरून व हातातल्या लाल पांढऱ्या बांगडीवरून मी ओळखले, शिवाय भाषाही बॉंग. बाबा कंटाळून गेल्यासारखा पुढे पुढे जाऊन थांबत होता आणि बाई प्रत्येक फुलासोबत सेल्फी काढत होती, फुलांचेही फोटो काढत होती. वर घाटीत फोटो काढून पोट भरले नव्हते बहुतेक. बाबाने पायात फ्लोटर्स घातलेले, बाईने चक्क स्लीपर्स. मनात म्हटले, असले धारिष्ट्य पाहिजे. आम्ही मुंबैत अँकल सपोर्टवाले शूज शोधत चार दुकाने फिरलो आणि इथे लोक बिनधास्त स्लीपर्स घालून फिरताहेत. असो.
वाटेवर अशी मोहक पानांची नक्षी दिसत होती.
आम्ही खूपच हळू चालत होतो. घाटीच्या गेटपाशी ठेवलेल्या पालख्यासुद्धा आमच्या मागून येऊन पुढे निघून गेल्या. चालणे म्हणजे कठोर शिक्षाच आहे असे मला वाटायला लागले. ते नेहमीचे 'कुठून झक मारली आणि....' वगैरे डिप्रेसिंग विचार डोक्यात तांडव करायला लागले. पोर्टर हाताला धरून नेत होता आणि पिट्टूत बसायचा आग्रह करत होता. शेवटी नाईलाजाने मी पिट्टूत बसायला तयार झाले. त्या खुर्चीतून मी पडेन अशी सतत भीती वाटत होती. पण तरी पोर्टरने मला बसवले व खुर्ची पाठीवर टाकून निघाला.
पिट्टूत बसले की आपल्याला आपल्या पाठीवर म्हणजे पर्यायाने पोर्टरच्या पाठीवर रेलून बसावे लागते. तसे बसले नाही तर पोर्टरला वजन वाहून न्यायला त्रास होतो. म्हणजे आपण खुर्चीत जवळजवळ साठ अंशाचा कोन करून बसतो. त्या अवस्थेत मग आपली इच्छा असो वा नसो, आकाश पाहात बसावे लागते. जास्त चुळबुळ केली तर पोर्टरला त्रास.
इथे एका बाजूची खोल दरी बघून मला धडकी भरलेली, उगीच बिचारा कुठे अडखळला आणि माझ्यासकट दरीत गेला म्हणजे? मी गुपचूप आकाश बघत बसले. आकाश तसे सुंदर होते. निळ्याशार आकाशात स्वच्छ सफेद ढग अंग पूर्ण पिंजून घेऊन सुखाने वाळवीत निवांत बसले होते. त्यांच्या खाली आकाशात घुसलेली उंच झाडे व त्यांच्या पानांनी केलेली मनोहारी नक्षी. निळ्या पांढऱ्या पार्श्वभूमीवर ही हिरवी काळी नक्षी खुलून दिसत होती.
पण वरचे दृश्य कितीही देखणे असले तरी पायवाट खडकाळ व नागमोडी होती. जुन्या भूत किंवा रहस्यपटात कसे गोल जिने असतात, नायिका घामाघूम होऊन गोल गोल फिरत एकतर चढत किंवा उतरत असते तसे आम्ही गोल गोल फिरत उतरत होतो. खडकाळ रस्त्याने गाडी जात असताना आपल्याला आत कसे गचके बसतात तसेच वर खुर्चीत गचके बसत होते. अर्ध्या तासात मला चक्करायला लागले, एसटीचे गचके खात मी आंबोली घाट उतरतेय असा भास व्हायला लागला. आंबोली घाटात मला हमखास पोटात ढवळायला लागते. त्यामुळे आताही पोटात ढवळणे आलेच... शिवाय पिट्टूत बसून जाताना मागून येणाऱ्या फांद्यांकडे थोडे लक्ष ठेवावे लागते. अर्थात पोर्टर काळजी घेतो, आपल्याला तेवढी भीती नसते पण मला जरा धाकधूक वाटत होतीच.
हे सगळे लक्षात घेऊन मी खाली उतरायचे ठरवले. पोर्टर नको म्हणत होता पण मी उतरलेच. असे गोल गोल फिरून झिंगण्यापेक्षा पायाचे तुकडे पडलेले परवडले. त्याचा हात धरून हळू हळू चालत आले एकदाची खाली. खाली जिथे हेमकुंडचा रस्ता मिळतो तिथे पोर्टरने आम्हाला सोडले. किती पैसे म्हणून विचारल्यावर ऐशुचे चार हजार मागितले. मी म्हटले तीन हजार ठरले होते. आपकी सवारीभी बहोत भारी थी जी म्हटल्यावर काय बोलणार? म्हटले आधीच सांगायचे ना? तेव्हाच सवारी बघून घ्यायची. आम्हा दोघींचे मिळून पाच हजार देते म्हटल्यावर त्या दोघांचा चेहरा पडला. एवढयाने नाही होणार म्हटल्यावर अजून एक हजार काढून दिले. ते दोघे खुश झाले. मीही उगीच गम्मत म्हणून घासाघीस करत होते. पैसे मी तसेही दिलेच असते. मी कदाचित थोडे पैसे जास्त दिले असतील. पण ज्या परिस्थितीत हे लोक काम करतात ते बघता घासाघीस करणे मला जमले नसते.
पोर्टर गेल्यानंतर त्या रस्त्यावर आम्ही बराच वेळ शामलीची वाट पाहात बसून राहिलो. निघायचा विचार करत होतो तोवर शामली खाली आली. तिच्यासोबत रमत गमत आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. वाटेत बाजार लागला. छोटी छोटी ढाबा टाइप हॉटेले होती. गोड पदार्थ जास्त खपत असावेत, परात भरून गुलाबजाम वगैरे बाहेर मांडले होते. शिरस्त्याप्रमाणे दोन्ही पोरींना लगेच भूक लागली. त्यांना गोड नको होते व तिखटात प्रचंड तेलकट सामोसे वगळता इतर जे काही होते त्यात आम्ही खाऊ असे काहीही नव्हते. होय नको करत समोसे छोल्यांवर आडवा हात मारला गेला. मोठ्या कढईत दूध उकळत ठेवले होते. त्याचाही थोडा आनंद घेतला गेला. मी फक्त चहापानावर समाधान मानले. हे हॉटेल नेमके गुरुद्वारासमोर होते. खालून गोविंदघाटावरून चालत येणारे शीख लोक ह्या गुरुद्वारात रात्रीचा मुक्काम करतात व सकाळी उठून हेमकुंडसाहिबला निघतात. इथल्या लंगरमध्ये जाऊन जेवायचा बेत मी जाहीर करताच पोरींनी तो लगेच हाणून पाडला. लंगरमध्ये जेवायचे असे माझे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. हे कसले डोंबलाचे स्वप्न असे बहुमताने ठरल्यामुळे मी गप्प बसले. असो.
ढाब्यातून बाहेर पडल्यावर पुढच्या वळणावर आपले हॉटेल आहे असे स्वप्नरंजन करत शेकडो किलोमीटर पदयात्रा केली तेव्हा कुठे नंदलोकपाल हॉटेल आले. पायाचे तुकडे पडले असल्याने दोन पावले चालले तरी मला वीस किलोमीटर चालल्यासारखे वाटत होते.
हॉटेलात पोचताच रनिंग हॉट वॉटरवाल्याला गाठले व गरमागरम पाण्याने आंघोळ केली. बेक्कार प्रवास करून परतल्यावर आधी कडकडीत पाण्याने अंघोळ करायची. पूर्ण शीण उतरून जातो. मुलींनीही हात पाय धुतले. ऐशूने लगेच बेड गाठला. मीही थोडा वेळ झोपले. मला खरेतर खाली जाऊन फिल्म पहायची होती. तिथल्या एका सेंटरमध्ये घाटीवर बनवलेली एक फिल्म दाखवतात. तीस रुपये प्रति व्यक्ती. घाटीत जायच्याआधी ती नक्की पहा अशा सूचना आम्हाला मिळालेल्या. आदल्या दिवशी पोरी फिल्म बघायला गेल्या तेव्हा मी रूमवर झोपले होते. आज मी फिल्म बघायचा बेत केला पण तोवर पाऊस पडायला लागला. उबदार रूम सोडून त्या बर्फ़ाळ पावसातुन फिल्म बघायला जायलाच हवे का असा विचार मी करत होते. 'यु ट्यूबवर आहे, तू बघ नंतर आरामात' असे शामली म्हणाल्यावर मात्र मी जास्त विचार न करता सरळ बेड गाठला.
साडेआठच्या सुमारास जाग आल्यावर जेवणाच्या दिव्य जागी तोल सावरत गेले. नेहमीसारखे मस्त जेवण होते. सोबत नूडल्स असल्यामुळे पोरीही आनंदाने जेवल्या. तिकडे नूडल्सना चौम्याउ की चाऊमेन असे काहीतरी म्हणतात, नूडल्स म्हणत नाहीत. ऐशु अर्धवट झोपेत जेवली. तिचे अंग थोडे गरम लागत होते, तिला गोळी देऊन झोपवले. शामलीला मात्र जेवल्यावर कॅम्प फायर मध्ये रस होता. तिला तसेही उशिरा झोपायची सवय असल्याने इतक्या लवकर झोप येणे शक्य नव्हते. माझी झोपमोड नको म्हणून रूमला बाहेरून कडी घालून तू कॅम्पफायरला जा असे तिला सांगून मी झोपले. तिची एका ग्रुपबरोबर चांगली गट्टी जमलेली. आम्ही दोघी मात्र अँटीसोशल असल्यासारखे सगळ्यांशी जेवढ्यास तेवढे ठेवले होते आणि मागून गॉसिप करत होतो.
साडेदहाच्या सुमारास मला अचानक जाग आली. आमची रूम तीन माणसांसाठी होती, एक डबलबेड व बाजूला एक सिंगलबेड. सिंगलवर मी झोपायचे, डबलवर पोरी झोपायच्या. तिथे फक्त ऐशु झोपलेली, शामली नाही. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी उठून दरवाजा पाहिला तर बाहेरून कडी. बाहेर पॅसेजमध्ये उघडणारी खिडकी नुसती लोटलेली होती, ती उघडून बघितले तर पॅसेजचा दरवाजासुद्धा लावलेला दिसत होता पण त्याच्या बाहेरून बोलण्याचे आवाज ऐकू येत होते. शामली बहुतेक तिथेच असणार असा अंदाज बांधून मी मोठ्याने चार पाच हाका मारल्या. कुणी उत्तर दिले नसते तर मला खिडकीतून उडी मारून बाहेर जाऊन दरवाजा उघडता आला असता. तिकडे हिमालयात खिडक्यांना ग्रील ब्रिल लावायच्या भानगडी कोणी करत नाहीत; उडी मारून जाण्याइतपत मोठ्या खिडक्या मात्र बिनधास्त बनवतात. पण उडी मारायची वेळ आली नाही. आमचे ग्रुप मॅनेजर शेजारच्याच खोलीत झोपले होते. माझा आवाज ऐकून ते बाहेर आले. काय झालेय हे मी सांगताच त्यांनी दाराची कडी काढली. बाहेर yhai ची पोरटी अजून धिंगाणा घालताहेत हे लक्षात येताच ते एकदम भडकले. साडेनवाला लाईट आउट करायची शिस्त मोडलीच कशी असे म्हणत त्यांनी पॅसेजचे दार उघडून कॅम्पफायरवाल्या मंडळींवर चांगलेच तोंडसुख घेतले. 'शी, कसला बोअर माणूस आहे' म्हणत पाय आपटत शामली परतली. तिला आताही झोप येत नव्हतीच पण बाहेरच्या जगाशी संबंध प्रस्थापित करणारे टीव्ही व मोबाईल हे तिचे दोन्ही सखे बंद असल्यामुळे नाईलाजाने तिला झोपावे लागले.
बाहेर जोरदार पाऊस पडल्याचा आवाज येत होता. माझ्या बेडच्या बाजूची खिडकी थोडीशी उघडीच राहात होती व त्यातून थंडगार हवेची झुळूक आत येत होती. जाड जाड रजायांमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन आम्ही निवांत झोपलो.
उद्या हेमकुंड साहिब यात्रा करायची होती.
पुढचा भाग : https://www.maayboli.com/node/65194
(१. फुलांची नावे फ्लॉवर ऑफ इंडिया वेबसाईट वरून घेतलेली आहेत. कुठे चुकून मी भलतेच नाव दिले असेन तर कृपया सांगा. दुरुस्त करेन.
२. बहुतेक सगळे फोटो ऐशुने आयफोन 7 वर काढलेले आहेत. बाहेरून लिंक देणे अजून जमत नसल्याने मी मायबोलीवर सेव करून फोटो टाकलेत. त्यामुळे मूळ फोटोतली clarity बरीच कमी झालीय. काही फोटो माझ्या मोटो वर काढलेले आहेत. ते सो-सो आहेत :))
मस्त हं ।
मस्त हं ।
बऱ्याच दिवसांनी आला हा भाग !
बऱ्याच दिवसांनी आला हा भाग !
मस्त लिहिलेय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
लंगरमधे एकदातरी जेवायची माझीही खुप इच्छा होती.
ती इच्छा एकदम अमृतसरला सुवर्ण मंदिरातच लंगर जेउन पुर्ण झाली.
Wow मस्त झालाय हा भाग!
Wow मस्त झालाय हा भाग!
फक्त मला क्रोमवरसुद्धा एकही फोटो दिसत नाहीये
मॅगी, मी माबोवरच फोटो स्टोअर
मॅगी, मी माबोवरच फोटो स्टोअर केलेत, दुसरीकडून लिंक दिलेली नाही. त्यामुळे ब्राऊझर कुठलाही असला तरी दिसायला हवेत हा माझा भाबडा विश्वास आहे
सस्मित, मलाही देव बहुतेक तिथेच लंगर जेवू घालणार आहे असे दिसतेय.
साधना, मस्त वर्णन व प्रचि! 9
साधना, मस्त वर्णन व प्रचि! 9 वर्षोंपूर्वी युथ होस्टेलने हा ट्रेक केला होता. आठवणी ताज्या केल्यास... धन्यवाद!
मी म्हटले ही तर कॉम्प्लिमेंट आहे, यात वाईट काय? तेव्हा उसासा टाकून ती म्हणाली की ही आईसाठी कॉम्प्लिमेंट आहे, पण माझे काय? आईला ती आहे त्यापेक्षा कमी वयाची समजतात ते ठीक आहे पण तिला ज्या काही वयाची समजतात त्याच वयाची मलाही समजतात त्याचे काय? >>>>> हे आम्हा मायलेकीं बरोबर ही नेहमी होतं
वा! सुंदर पदभ्रमणाचा सुरेख
वा! सुंदर पदभ्रमणाचा सुरेख वृतांत!! आवडला हे वेगळ्याने सांगायला नकोच. आता तिथलीही स्वप्न दिसू लागतील.
सस्मित, मलाही देव बहुतेक
सस्मित, मलाही देव बहुतेक तिथेच लंगर जेवू घालणार आहे असे दिसतेय.>>>>>>>>> तुमची इच्छा.. नव्हे स्वप्न पुर्ण होवो.
खूप खूप खूप खूप खूप सुंदर लेख
खूप खूप खूप खूप खूप सुंदर लेख..... खूप वाट बघत होते... देखणे फोटो....
मंडळी धन्यवाद. इतका
मंडळी धन्यवाद. इतका फाफटपसारा तुम्ही वाचता
अजून थोडे फोटो टाकायचे आहेत.
वाह! परवाच माझ्या मनात विचार
वाह! परवाच माझ्या मनात विचार आला होता की या मालिकेचा पुढचा भाग कधी येणार!
मस्त आहे हाही भाग.. फोटो आणि वर्णनावरून जराशी कल्पना येते आहे व्हॅलीची.
आता पुढचे भाग लवकर टाका
छान फोटो आणि वर्णन!
छान फोटो आणि वर्णन!
छान लिहिलेय ! या भागात
छान लिहिलेय ! या भागात घाटीच्या भव्यतेची कल्पना येतेय.
छान लिहिलं आहे. इंफॉर्मल
छान लिहिलं आहे. इंफॉर्मल writing मजा येते आहे वाचायला.
लै भारी लिवलंस ...
लै भारी लिवलंस ...
मस्त फोटू....
एक प्रश्न: केळीची रोपं कशी
एक प्रश्न: केळीची रोपं कशी कृत्रिम कल्चरने तयार करतात तशी इथल्या वनस्पतींची करता येतील का? नंतर टेंपरेचर कंट्रोलरूममध्ये वाढवायची. युरोपात खोटी रेन फॅारिस्ट केली आहेत तशी उलट कोल्ड फॅारिस्ट?
अतिशय सुरेख फोटो आणी सुंदर
अतिशय सुरेख फोटो आणी सुंदर वर्णन
वाह!
सुंदर फोटो आणि लेखही ..
सुंदर फोटो आणि लेखही ..
खूप सुंदर वर्णन आणि फोटो ही .
खूप सुंदर वर्णन आणि फोटो ही . मजा आली वाचताना. मोठं लिहिलं असलं तरी कुठे ही कंटाळा नाही आला वाचताना.
मस्तच भाग साधना..
मस्तच भाग साधना..
आता चीनने हमला करण्यापूर्वी आपणपन एकदा घाटी जाऊन याव अस वाटायला लागलय मला..
फुलं मस्तच. जिप असायला हवा होता किंवा तुझ्याजवळ एक DSLR असं वाटल मलापन.
तरी काही काही प्रचि छान आले आहे.
ते टाचणिच्या टोकाएवढे बारीक फुलं बघायचा मोह होतोय. जालावर शोधावे लागतील.
पण तू इतक्या दूर जाउन घाटी चढून उतरून आली त्याचं कौतुक वाटत ..
मला वाचुनच दम लागला ..
पुलेशु.
अरे वा. हा भाग सुद्धा अगदी
अरे वा. हा भाग सुद्धा अगदी छान.
खूप दिवस वाट बघत होते.. आज हा भाग वाचला आणि परत तिकडे जायची इच्छा झाली.
मस्त लिहिलंय अगदी.
मस्त !
मस्त !
शांत , निवांत हिरवा गार लेख!!
शांत , निवांत हिरवा गार लेख!!!
खुप छान साधना!!! एवढे फोटोस आणि त्यांचे ईतकं छान वर्णन..
मस्त!...
मस्त!...
लेखनशैलीचा फॅन झालोय मी!
वाह, मस्तच. फोटो आणि वर्णन
वाह, मस्तच. फोटो आणि वर्णन दोन्ही.
साधना तुझे अनुभव, वर्णन,
साधना तुझे अनुभव, वर्णन, किस्से फुलांचे फोटो सगळ सगळ सुंदर उतरल आहे लेखात. अगदी तिथे जाऊन आल्यासारख वाटल.
मस्त वाटलं वाचून! फोटो सुंदर
मस्त वाटलं वाचून! फोटो सुंदर आलेत.
वा ! मस्त झालाय हा लेख. पुढचा
वा ! मस्त झालाय हा लेख. पुढचा पण पटकन येऊ द्या.
मस्त वर्णन आणि फोटोज ग. तुझी
मस्त वर्णन आणि फोटोज ग. तुझी सगळी सिरिज लिहून पूर्ण झाली की निवांत वाचणार आहे परत एकदा. तेव्हा आता ब्रेक न घेता सगळे लेख टाक. आता मलाही घाटी बघावी अशी इच्छा होऊ लागली आहे. ह्या वर्षी ट्राय करावं का अश्या विचारात आहे.