थ्रिलींग…………….

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 18 January, 2018 - 05:14

थ्रिलींग…………….

"मला न... आयुष्यात असं वेगळं काहीतरी थ्रिलिंग करायचंय...जे आपल्या बापजन्मात कुणी केलं नसेल... पण सांगू का.. काय वेगळं करणार.. अशा काही संधीच नाहीत आपल्या जातीत... पण मी करणार काहीतरी तू बघच .." प्रत्येक भेटीमध्ये तो हे बोलायचाच आणि ती पण निमूटपणे ऐकायची. नक्की काय करणार हे ना त्याला माहित होतं ना तिला. दिवस जात होते, ते दोघे मोठे होत होते... स्वतःच्या पंखांनी उडायचं सामर्थ्य आलं दोघांमध्ये आणि त्यांनी कुटुंब थाटण्याचा निर्णय घेतला. "थ्रिलिंग करायची" कल्पना एव्हाना मागे पडली होती आणि तशातच तिने त्याला दिली गोड बातमी... "चाहूल लागलीय त्यांची?" "कोणाची?" त्याला बायकोची भाषा काही कळेना.. "अहो असं काय करताय...? पिल्लांची..." तो भारावला... एका नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या काळ्या गालांवर लाल लाली चढल्याचा उगाचच त्याला भास झाला. अन............ किती तरी आधी आपण जे थ्रिलिंग करायचं ठरवलं होतं ती वेळ आत्ता आली हे हि समजलं. येस..हो.. आत्ताच... अभी नहीं तो फिर बाद में कब पता नहीं, त्याची विचारचक्र सुरु झाली.

आयुष्यात हीच तर एक वेळ असते आपल्याकडे काहीतरी क्रिएटिव्ह करायची... आपल्या पिल्लांसाठी; नाहीतर नेहमीच तेच ते आहेच... उठा अन पोटासाठी उडाउड करा. संध्याकाळ होताच आराम करून झोपा, नाही...नाही ..नाही... आत्ता तरी असं नाही करायचं. हिला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचं. तिच्या डोळ्यात पाहायचं आणि ऐकायचं, "हो ..नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे उशिरा का होईना केलं काहीतरी" त्याची दुसऱ्या दिवशी उजाडताच शोध मोहीम सुरु झाली... सगळीकडे चाणाक्षपणे फिरून झालं... एका डोळ्याने साऱ्या परिसरावर नजर टाकली...अन हो...हे सगळं करताना डोक्यात ती लहानपणीची आजोबाच्या आजोबांची गोष्ट डोक्यात होतीच , "चिऊचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं... चिऊचं घर गेलं उन्हात वितळून अन पावसात काऊचं घर गेलं वाहून... " म्हणजे हे दोन ऑप्शन झाले बाद. त्याच मनोगत चालूच होतं. गिरक्या घेत घेत बरीचशी झाडं देखील पालथून झाली होती. पण झाडावरच काड्यांचं घरटं म्हणजे अगदीच कॉमन, कसलं थ्रिलिंग नि कसलं काय... मग काय? काय करू? फिरत उडणं आणि उडत फिरणं चालूच होत...अन त्याची नजर गेली ... त्या टीव्ही वर .. CC म्हणजे कॅमेरा कि काय असतो हा... हा लटकतोय इथे मस्तपैकी, वायरींच्या आधारावर... म्हणजे हा खांब हाच विजेचा खांब... ठरलं इथेच बांधायचं घरटं... ते झाडा-बिडाच्या फंद्यात अन फांद्यात नाही अडकायचं... या इथेच हो इथेच बांधायचं... निवांत... मजबूत आहे हा खांब. तो समाधानातच तिच्याकडे झेपावला. तिला त्या खांबापर्यंत घेऊन आला. वायरीवर तिला बसवलं अन स्वतःही बसला " फायनल केली ग जागा... आता काट्या कुटक्या गोळा करायला हव्यात, तू नको...मीच करेन.. तू आराम कर." तिला आजूबाजूला कोणतच झाड दिसेना कि कुठंला आसरा सापडेना ... "हवेत बांधायचं का घर? .." ती त्रासलीच. सकाळपासून भटकून आला आणि आता मस्करी करतोय. "अगं, हवेत कुठे...? या इथे ..हे काय इथे या खांबावर " ... तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं, चोचीजवळ चोच नेली. " श्राद्धयाच्या जेवणात कोणी दारूची वाटी ठेवलेली काय ? ह्या इथे कसं काय बांधायचं घरटं? कोणी बांधली का आपल्या जन्मात...." ती कोपली. तो मात्र शांतच, " तेच तर थ्रिल आहे....." अन त्याने त्याचा एक डोळा तिच्याकडे बघत मिचकावला. ती शहारली, ह्याच्या हट्टापुढे आता काही नाही चालणार. नवऱ्याने ठरवलं, तो काही ऐकणार नाही...थोडी तणतणली आणि त्याला शरण गेली. तो अन ती त्या दिवसापासून बांधकामाच्या तयारीला लागले.

यथावकाश काट्या-कुट्यांचं घरटं त्या विजेच्या खांबावर पक्क झालं. आताशा ती त्यातच राहायची. तीन का चार अंडी तिने दिलेली. त्यावरच बसायची. कधी कधी पंखांना व्यायाम म्हणून एक फेरी मारून यायची. तोपर्यंत तो राहायचा देखरेखीला. कधी कधी दोघेही जायचे पण अगदीच थोड्या वेळाकरता. दिवस लोटले... तीन पिल्लं काव काव करत अन एक कुहू कुहू करत त्या घरट्यातून बोलू लागली . त्यांना दाणी-पाणी भरवून, थोडं मोठ्ठ करून त्या खांबावरचा मुक्काम हलला. तिच्या जीवात जीव आला. अन त्याच्या जीवात अभिमान.... माझ्या पिल्लाना झाडावरच्या शेणा- मेणाच्या घरट्याची गोष्ट नाही ऐकवणार...मी त्यांना ऐकवणार... कथा त्याच्या बापाच्या थ्रिलींगची .. त्यांच्या विजेच्या खांबावरच्या जन्माची...

तो सुखावला अन त्याला पाहून ती अधिकच उजळली.

(उडता उडता त्याने पाहिलं... त्या खिडकीत मयुरी फोन घेऊन उभी होती... " हि आता आपल्याला फेमस करणार.. माझ्या अनोख्या घरट्यावर लिहिणार" ... अन तो अजूनच उंच झेपावला... आकाश ठेंगणं झालेल्या खुशीत.)

©मयुरी चवाथे-शिंदे

20150423_114521.jpg©मयुरी चवाथे-शिंदे
20150423_114506.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त... आवडली....

तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं, चोचीजवळ चोच नेली. " श्राद्धयाच्या जेवणात कोणी दारूची वाटी ठेवलेली >>>>>

हेहे

आवडली!
>>तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं, चोचीजवळ चोच नेली. " श्राद्धयाच्या जेवणात कोणी दारूची वाटी ठेवलेली >>>>> Proud

धन्यवाद.

खरं तर ते घरटं पाहिल्यावर गगनचुंबी इमारती, वृक्षतोड... वगैरे सारखे गंभीर विचारही डोक्यात आले पण लिहायला घेतल्यावर हे असं काहीतरी लिहिलं गेलं, अन आधीचे विचार कुठल्या कुठे पळून गेले.