या वर्षातला पहिला स्नो पडला आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू उमटलं. कधी कधी आपण पाहतोय ते खरंच घडतंय याच्यावर विश्वास बसत नाही. वर आकाशाकडे बघत आहे आणि छोटे छोटे कण एकदम अलगद जमिनीकडे येत आहेत. सुरुवातीचे काही मिनिट ते कण जमिनीवर पडताच विरघळून जातात आणि त्यांचं अस्तित्व राहातच नाही. पण हळूहळू सलग १-२ तास ते येत राहतात. त्यांना पावसासारखा आवाज नसतो की कधी जोरात येणाऱ्या गारांची तीव्रता. अगदी कापसाचे बारीक कण अलगद तरंगत जमिनीवर हळुवार टेकावेत असे ते शांतपणे साचत राहतात. आणि लवकरच एक पांढरा शुभ्र थर गवतावर किंवा रस्त्यावर दिसू लागतो. गेल्या दहा वर्षात माझ्या अमेरीकेतील वास्तव्यात हे असे अनेक 'स्नो फॉल' मी पाहिले असतील पण त्यातील नावीन्य अजूनही जात नाही.
माझ्या कुतुहलात कदाचित माझ्या मराठीपणाचा त्यात मोठा हात असेल. मी हे बोलतेय ते 'प्रत्येक गोष्टीत मराठीपणा कसा आणावा' या सवयीमुळे नाही. विचार करा, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर किंवा पाचगणी यांच्या पलीकडे कधीही काही पाहिले नव्हते. त्यामुळे थंडी थंडी म्हणजे किती असू शकते याचा कधी अनुभवच घेतला नव्हता. हिंदी सिनेमात पाहायचे तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा, हे इतकं छान ऊन असताना तो बर्फ वितळत का नाही? इतका साचून कसा काय राहू शकतो? त्यात भरीला म्हणून हिरोईनचे कपडेही छोटेच त्यामुळे तिथे थंडी असेल अशी कणभरही शंका वाटायची नाही. तेव्हापासून असलेले हे अनेक प्रश्न आणि आकर्षण यामुळे आजही स्नो पडायला लागला की त्याच्याकडे बघत बसावेसे वाटते.
निदान आज माझ्यासारख्या अनेक लोकांची एक शंका तरी दूर करते. स्नो पडतो तेव्हा आणि विशेषतः त्याच्यानंतर खूप थंडी असतेच. हिरोईन च्या कपड्याकडे बघून थंडीचा अंदाज लावू नये. उन्हांबद्दल बोलायचे तर, ते केवळ दिखाव्याचे असते असे म्हणायला हरकत नाही. तापमान शून्याच्या खाली असल्याने ऊन असूनही तो बर्फ वितळत नाही. तापमान शून्याच्या वर जाऊ लागते आणि उन्हाची तीव्रता वाढते तसे तो बर्फ वितळू लागतो. असो. हे झाले प्रश्नांचे उत्तर. पण खरी मजा येते ती स्नो पडताना बघायला आणि त्यानंतरचे बर्फाच्छादित निसर्गसौन्दर्य बघायला. अनेकवेळा सलग दिवसभरही हिमवर्षाव झालेला मी अनुभवला आहे. त्यामध्ये जमिनीवरचा थर वाढत जातो.आणि आक्खे शहर सफेद होऊन जाते. आपल्या घराच्या खिडकीतून जितके दूरपर्यंत पाहता येईल तितके पाहत घरातल्या उबीत बसून राहते. पण कधी ना कधी बाहेर पडायला लागणारच असतं......
बाहेर पडायचं तर ट्रेन, बसने जाण्याचे वेगळे अनुभव तर गाडीने जाण्याचे वेगळे. बाहेर पडताना गाडी असेल तर गाडीच्या वरचा स्नो काढणे, आजूबाजूचा काढणे हे सर्व प्रकार करावे लागतात. हातात खोऱ्यासारखे स्नो-स्क्रॅपर घेऊन गाडीवरचा स्नो ढकलून काढावा लागतो. त्यासाठी हातात कितीही जाड मोजे घातलेले असले तरी हात गारठून जातातच. कधी कधी फुटभरापेक्षा जास्त बर्फ जमलेला असतो. अशावेळी गाडीवरचा काढून भागत नाही, आजूबाजूचाही काढावा लागतो. एकदा एका मोठ्या स्टॉर्म मध्ये ऑफिसमधून बाहेर पडताना कळतंच नव्हतं की माझी गाडी कुठली आहे. एव्हढ्या मोठ्या पार्किंगमध्ये सर्वच गाड्या पांढऱ्याशुभ्र झाल्या होत्या. बराच वेळ साफ केल्यावर कळलं ती माझ्या शेजारची गाडी होती. चिडचिड नुसती.
गाडीत बसणे, ती गरम करून सुरु करणे यासारखी कामे करून एकदाची सुरु झाली की पुढे गाडी चालवणे हेही संकट असतेच. रस्ते तसे भराभर साफ केले जातात तरीही वादळ असेल तर स्नो सलग पडतच राहतो आणि गाडी चालवणे (कार) अतिशय अवघड होऊन जाते. अशाच वेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कदाचित आमच्या हवामान खात्याचे अंदाज दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळेही असेल, आम्ही अशाच वादळात बाहेर पडलो आणि दोन-तीन वेळा आमची गाडीही चालवताना घसरलीही आहे. समोरून सरळ जाणारी गाडी अचानक सरकून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेल्याने झालेले अपघातही पाहिले आहेत. आता शक्यतो स्नो पडला की घरी बसतो. गप्प घरात बसतो. एकूण काय तर सुंदर दिसणाऱ्या या बर्फाची अनेक भयानक रूपेही आहेत.
हायवे वर गाड्या बंद पडून गारठलेले लोक, अपघात, लाईट गेल्यावर हीटिंग बंद पडून लोकांचे होणारे हाल. मी एका प्रोजेक्ट्साठी २ महिने न्यू जर्सीला होते. बसने येऊन जाऊन करायचे. एक बस चुकली की अर्धा तास अशा थंडीत काढायचा म्हणजे नको वाटायचं. त्यात असेच एका वादळानंतर घरातून बाहेर पडले. बसस्टॉपला येईपर्यंत बर्फ बुटात जाऊन त्यांचं पाणी झालं होतं. दिवसभर तसेच ओले झालेले थंड पाय घेऊन ऑफिसात बसावं लागलं होतं. प्रेग्नंट असताना बर्फात घसरून पडायची खूप भीती वाटायची. नवऱ्याचा हात धरून अलगद चालत राहायचे. अर्थात हे सर्व झाल्याला ७-८ वर्षे उलटली. पण प्रत्येक हिवाळ्याच्या अशा अनेक आठवणी आहेत. आणि प्रत्येक वर्षी पावसात जसे आपल्याकडे कवींची भरती येते तशी प्रत्येक स्नो-फॉल मध्ये माझ्या या आठवणींची गर्दी होते. गेल्यावर्षी अनुभवात स्कीईंगची भर पडली होती आणि घरातून दिसणाऱ्या ऊंच ऊंच झाडांवर साचलेल्या बर्फाच्या अविस्मरणीय दृश्यांची.
निसर्गसौन्दर्य म्हणजे तरी काय? आणि तेही किती अविस्मरणीय !! झाडांची सर्व पाने झडून गेलेली असतात त्यामुळे केवळ सुकलेल्या फांद्या राहतात. हळूहळू करत त्या काळ्या फांद्यांवर सफेद बर्फ जमा होतो. थंडीने त्याला काचेसारखी पारदर्शकताही येते. गवत असलेली सर्व जमीन पांढरीशुभ्र झालेली असते आणि त्यात कुठेही असमानता दिसत नाही. इतका एकसलग बर्फ कसा काय साठू शकतो? त्यात चुकून बोटही घालायची इच्छा होत नाही इतके ते पर्फेक्ट असते. चालताना त्यात उठणारी पावलं समुद्राची आठवण करून देतात रेतीसारखे ठसे पाहून. इतके सुंदर दृष्य आणि त्यात डिसेंबर मध्ये येणारा ख्रिस्तमस अजून भर घालतो. ठिकठिकाणी केलेली रोषणाई, दुकानातून लावलेले डेकोरेशन्स, सजलेले डाऊनटाऊन, जिंगल करणाऱ्या बेल्स, टीव्हीवर येणारे ख्रिस्तमसचे चित्रपट, हॉट चॉकलेट, वेगवेगळे कुकीज-केक्स.... अशा अनेक गोष्टी हा ऋतू उजळून टाकतात.
आजपर्यंत अनेकवेळा मी आवडता ऋतू कोणता यावर शाळेत निबंध लिहिलाय. भारतात उन्हाळा, पावसाळा आणि उन्हाळ्याचे आपआपले आवडते-नावडते रूपही पाहिले आहे. पण इथला हिवाळा वेगळाच, स्वतःची वेगळी ओळख दाखवणारा. मुलांना त्यात खेळायला खूप छान वाटते. कधी एकदा बर्फ पडतोय असं झालेलं असतं त्यांना. इतके वर्षे आणि इतक्या आठवणी असूनही बर्फ पडल्यावर बाहेर जाऊन त्याच्यात खेळण्याची उत्स्फूर्त इच्छा उफाळून येत नाही. मुलं हट्ट करतात, त्यांना ढीगभर कपडे घालून बाहेर जाऊ देते. दर थोड्या वेळाने आत बोलावत राहते. बाहेर पडावंच लागलं तर स्वतःही जमेल तितके गरम कपडे घालून जाते. किंवा खूपच सुंदर दिसतंय म्हणून घरातूनच किंवा दारातून फोटो काढून घेते. मुलं समोर आहे त्याचा आनंद घेत असतात. मी मात्र समोर असूनही त्या बर्फाला, चोप्रांच्या चित्रपटांसारखी दुरूनच एन्जॉय करते.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मस्त लेख आणि फोटो.
मस्त लेख आणि फोटो.
स्नो लांबून बघायला किंवा घराच्या बाहेर खेळायला आवडेल.ड्रायव्हिंग नाही बा.
सुंदर लेख आणि फोटो
सुंदर लेख आणि फोटो
सुंदर लेख.
सुंदर लेख.
मस्त लेख. आमच्याकडे स्नो
मस्त लेख. आमच्याकडे स्नो पडतो पण फार साचून रहात नाही. अणि १-२ वेळाच पडतो. ह्यावर्षी मात्र थंडी खूप असल्याने गेले ३-४ दिवस स्नो साचून राहिला आहे.
बराच वेळ साफ केल्यावर कळलं ती माझ्या शेजारची गाडी होती. चिडचिड नुसती. >>
सुंदर लेख आणि फोटो पण. तु
सुंदर लेख आणि फोटो पण. तु अमेरिकेत कुठे असतेस?
छान लिहिले आहे. खरेच बर्फ
छान लिहिले आहे. खरेच बर्फ पडताना छान मॅजिकल वाटते
>>> तु अमेरिकेत कुठे असतेस? <
>>> तु अमेरिकेत कुठे असतेस? <<
फ्लोरिडाला.... नाही तर बर्फा चे (स्नो चे ) इतके कौतुक वाटले असते का?
नव्हे बॉस्टनला
नव्हे बॉस्टनला
माझा झब्बू.
माझा झब्बू - लंडनचा.
रोडवर उभा राहून फोटो काढला तर स्नो येणार पण नाही.
लंडनला फारसा स्नो होत नसतो. पण या वर्षी झाल्याने आणि एवढ्या लवकर झाल्याने उगीचचं आपलं कौतूक.
छान लेख आणि फोटोज ..
छान लेख आणि फोटोज ..
हा एक झब्बू भारतीयांतर्फे... बर्फ बघण्यासाठी असे खडतर मार्गाने धूळ उडवत जावे लागते
बर्फाचे फोटो लांबुनच छान
बर्फाचे फोटो लांबुनच छान वाटतात. आमच्या कडे लेक टाहोला जाव लागत बर्फात खेळायला.
बराच वेळ साफ केल्यावर कळलं ती माझ्या शेजारची गाडी होती. << लोल, मला वाटल फक्त अॅड मधेच अस होत. गाडी साफ करण्या आधी बीप करुन खात्री करुन घेत जा...
एकदा ३६ इन्च स्नो पडू दे, मग
एकदा ३६ इन्च स्नो पडू दे, मग बघू किती आवडतो स्नो ते. म्हणजे तुम्हाला साफ करावा लागत नसेल तर काय प्रश्नच नाही. त्याची मजा आणखीनच.
बाकी, झाडांची चित्रे सुरेखच. च४५ वर्षे दर हिवाळ्यात अनेकदा बघूनहि समाधान होत नाही. विशेषतः पहिल्या फोटोतल्या सारखे रस्ते स्वच्छ असतील तर.
I absolutely dont like snow.
I absolutely dont like snow. Love munbai weathwr. And cherish Goa weather. Sun worshipper by far.
छोड आये हम वो गलीया... मिसिंग
छोड आये हम वो गलीया... मिसिंग स्नो. स्नो मधून गाडी चालवण्याची मजा आणि स्नो थ्रोअरने स्नो फेकायची मजा. स्नो रिमुव्हल सर्विस लावणे, म्हणजे इगोच्या विरुद्ध.
ड्राईव्हवे शॉवल करून काळा कुळकुळीत दिसू लागला की दोन्ही बाजूला जमलेल्या डोंगराच्या मध्ये इतका मस्त दिसतो. त्याचे फोटो काढून होतायत न होतायत तोवर सिटीची गाडी येऊन रस्त्यातला स्नो ... तो पण वेट स्नो.. तुमच्या दारासमोर टाकून जाते की... तिला शिव्या घालत परत कमरेत उसण मारायची तयारी करा.
स्नो जितका आवडतो तितकाच विंटर आवडत नाही. पण तरीही दर उन्हाळ्यात कधी एकदा फॉल संपून विंटर चालू होतोय याचे दरवर्षी वेध लागायचे.
आमितव, मग तुम्ही अशी डायरी
आमितव, मग तुम्ही अशी डायरी लिहिली आहे का?..
>>>डायरी<<<<
>>>डायरी<<<<
सध्या मुक्काम बॉस्टन्ला आहे.
सध्या मुक्काम बॉस्टन्ला आहे. शिकागो, कॅनडा आणि बॉस्टन असा सर्व ठिकाणचा बर्फ पाहून झाला आहे. थंडीचा कंटाला येतो खूप. एकदम डिप्रेसिंग पण वाटतं तरीही पहिल्या 'स्नो' चं अप्रूप जात नाही. म्हणून हा लेख.
सर्वांचे खूप आभार.
विद्या.
डायरी जबरी आहे राज.. मानला
डायरी जबरी आहे राज.. मानला तुम्हाला.. मस्त लिहिलाय
आहाहा सुंदर लेख.
आहाहा सुंदर लेख. हिमवर्षावासारखे तुमच्या मनातून आलेल्या शब्दांचा इथे हळूवार वर्षाव झाला आहे.
मी अमेरिकेतला स्नो फक्त १०
छान लेख.
मी अमेरिकेतला स्नो फक्त १० वर्षापूर्वी लास वेगासला पाहिलाय.. तिथे गेल्या कित्येक वर्षात स्नो झाला नव्हता..
बाकी मी अमांच्या गटात. थंडी-बर्फाच्या ठिकाणी राहण्याची मी कल्पना पण करू शकत नाही..