जिव्हाळ्याच्या गोष्टी

Submitted by विद्या भुतकर on 28 November, 2017 - 23:15

आज पिठलं बनवत होते, गाठीचं, म्हणजे ज्यात बारीक बारीक गाठी दिसतात असं. मला ते घोटलेलं आवडत नाही. असो. तर ते बनवताना त्यात मी भरडलेले शेंगदाणे टाकते. ते माझ्याकडे असलेल्या कुटामधून निवडून टाकत होते. त्यावरून पुढे मग बरंच काही आठवलं. आणि वाटलं 'शेंगदाणे' या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण अजून लिहिलं कसं नाहीये? म्हणून सुरुवातीपासून सुरवात करतेय.

तर शेंगदाणे सासरी आणि माहेरीही जिवाभावाचा विषय. आम्ही शाळेत असताना आमच्या शेतात भुईमूग लावला जायचा. त्यात पावसाळ्यात निघणाऱ्या भुईमुगाच्या विशेष आठवणी आहेत. काढलेल्या शेंगा घरी आल्यावर सुकवणे म्हणजे कठीण काम. कधी बायकांकडून शेंगा काढून आणलेल्या असायच्या तर कधी डहाळ्यांच्या शेंगा तोडून काढलेलंही आठवतं. दारात सुकायला टाकायच्या म्हटलं तरी पावसाकडे सारखं लक्ष ठेवायला लागायचं. पाऊस आला की ती ताडपद्री, पोती पटापट आत उचलून न्यायला लागायची. आणि मग ओल्या झाल्या शेंगा तर कधी भुरा आला की अजून चिडचिड. एकूणच ते चिखल असलेल्या शेंगा म्हटलं की नको वाटायचं. तरीही पावसाळ्यात भाजलेल्या शेंगा खाल्ल्या जायच्याच. Happy

एकदा शेंगा सुकल्या की मग वर्षभर त्याच वापरात यायच्या. शनिवार- रविवारी, आई शेंगा घेऊन बसायची, आम्हाला खूप राग यायचा, पिक्चर बघताना शेंगा सोलायला लागतात म्हणून. पण पिक्चर संपेपर्यंत भांडंभर दाणे होऊन जायचे. शिवाय त्यात शनिवार असेल तर उपवासाच्या खिचडीसाठी कूटही करून व्हायचा. कूट बनवतानाही मला तेव्हाची आठवण येते. दादांना खिचडीत दाण्याचे कण आलेले आवडत नाहीत त्यामुळे त्याच्या खिचडीचा कूट बारीक असतो एकदम. तर सोमवारी आईच्या उपवासाच्या खिचडीत भरडलेला कूट असायचा जो मला आवडतो. असो. ओल्या शेंगा घरी आल्यावर त्या मोठ्या भांड्यामधे मीठ घालून शिजवून, सुकवल्या जायच्या. अशा सुकलेल्या शेंगांचे दाणे इतके भारी लागायचे. दादा नेहमी खायचे आणि अर्थातच आम्हीही. कोरेगांव मध्ये तेलाच्या गिरणही आहेत. एकदा तर दिवाळीला घरच्या शेंगदाण्याचे तेलही बनवून आणले होते. अर्थातच आता घरी शेंगतेल वापरले जात नाहीच, तब्येतीच्या कारणांनीं. पण अशा काही लहानपणीच्या आठवणी शेंगदाण्याचा.

सासरीही जवळजवळ सर्वच भाज्यांत शेंगदाणे किंवा कूट वापरला जातो. बाय द वे, आमच्याकडे 'दाणे' म्हणत नाहीत, 'शेंगदाणे'च म्हणतात. Happy असो. तर नवऱ्यालाही कशातही शेंगदाणे घातलेले चालतात. मला वाटतं जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक पोह्यांमधले शेंगदाणे आवडीने खाणारे आणि दुसरे न खाणारे. Happy मला वाटतं की सतत दाणे तोंडात येत असल्याने पोह्यांची चव जाते, तर नवऱ्याला वाटतं की प्रत्येक घासात दोन-चार दाणे तरी आलेच पाहिजे. त्याचा एक साऊथ इंडियन मित्र म्हणतो की, 'तू काय चहातही शेंगदाणे घालून खाशील'. तर कुठल्या भाज्या किंवा पदार्थांत किती प्रमाणात शेंगदाणे किंवा कूट घातला पाहिजे या गोष्टीवर अनेकवेळा काथ्याकूट होतोच. उदा: उपिटात शेंगदाणे घालायचे की नाही? वाटाणा-बटाटा-फ्लॉवर भाजीत कूट घालायचा की नाही, वगैरे. एकदा एका मैत्रिणीकडे त्याला भेंडीची भाजी आवडली होती. घरी आल्यावर म्हणाला, 'छान झाली होती'. का? तर अर्थातच त्यात कूट घातला होता. Happy सासर जळगावचं असल्याने एक गोष्ट मात्र नक्की सवयीची झाली ती म्हणजे वांग्याच्या भरतात घातले जाणारे शेंगदाणे. आमच्याकडे घालत नाहीत. पण खानदेशी भरीत आवडीने खाते आणि बनवले तरी तसेच बनवते.

इथे माझ्याकडे शेंगदाणे एकदा भाजले की त्याचा लगेचच कूट करावा लागतो, नाहीतर नंतर कूट करायला काहीही शिल्लक राहात नाही. कारण पॅन्ट्री मध्ये त्या डब्याशेजारीच गुळाची ढेपही असते. Happy त्यामुळे भाजतानाच जे काही मिळतील ते. मुलंही शेंगदाणे भाजायला घेतले की एकदम धावत येतात, अर्थातच बाबावर गेलेत हे सांगायची संधी मी सोडत नाही. कूट करण्यातही ठराविक आवडीनिवडी असतात. वर म्हणाले तसे, आईला भरडलेला आवडतो, तर वडिलांना बारीक, सासूबाई दाणे कमी तावावर भाजतात, त्यांना जास्त काळपट रंगाचा कूट आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या दाण्यांचा कूट एकदम सफेद आणि एकसारखा बारीक केलेला असतो. काही लोकांना मायक्रोवेव्ह मध्ये भाजतानाही पाहिले आहे. मला मात्र भांड्यात आणि थोडे जास्त भाजलेले दाणे आवडतात. त्यांच्या कुटामुळे वांग्याची भाजी किंवा सिमला मिरचीची सुकी भाजी वगैरेला छान रंग येतो. नाहीतर कूट सफेद असेल तर भाजीचा रंग ही फिका होतो असे मला वाटते. त्यात, नवऱ्याचं म्हणणं असतं की कशाला ती टरफलं सोलायची, मला मात्र तसाच कूट करणं जमत नाही. अगदीच घाई असेल तरच केला जातो.

अर्थात आमच्या घरात शेंगदाणे किंवा कूट नाही म्हणजे 'आणीबाणी' च आहे असं मानलं जातं हे वेगळं सांगायला नको. काही वर्षांपूर्वी शेंगदाणे खूप महाग झाले होते. अगदी बदाम आणि शेंगदाण्याची किंमत एकच झाली होती. सोळा डॉलरचे ४ पौंड(म्हणजे दोन किलोही नाही). फार वाईट दिवस होते, त्याने घरात शेंगदाणे आणणं कमी झालं नव्हतंच, तरीही झळ लागली होतीच. भारतात गेले की सासूबाई हमखास विचारतात, 'तुला न्यायला कूट करुन देऊ का?'. मी त्यांना सांगत राहते की असतो माझ्याकडे, तुम्ही काळजी करु नका. Happy वडील महाबळेश्वरला गेले की तिथं जे मीठ लावून भाजलेले शेंगदाणे मिळतात ते खास जावयासाठी घेऊन येतात. आणि हो, शेंगदाण्याची सर्व प्रकारची चिक्की. (किती ते लाड त्याचे, वगैरे डोळे फिरवणारा स्मायली टाकला पाहिजे इथे. असो.)

वर सुरुवात करताना म्हटलं होतं ना, माझ्या पिठल्यात भरडलेले शेंगदाणे टाकत होते. तर तुम्हीही टाकून बघा. माझ्या आजोळी सांगलीला जे पिठलं करतात ना त्यात असायचे, तर आईकडे पिठलं भाकरीसोबत बाजूला घेऊन खायचे. मी मात्र त्यातच घालते. तर त्या पिठल्यावरुन इतकं सगळं रामायण लिहिलं. पण असतात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी, ज्याच्या त्याच्या. Happy तुमच्याही असतीलच.

vangi.jpg22228289_1770717909668843_5530077103087189638_n.jpg

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे पण अगदीच ' जिव्हा'ळ्याची गोष्ट आहे शेंगदाणे आणि दाण्याचं कूट ! Happy
मला दाणे आवडतात, पण नवर्याला जरा जास्तच आवडतात Wink

शेंगदाणे म्हणजे जिव्हाळा नुसता जिव्हाळा.
मला पण पोह्यात, उपम्यात शेंगदाणे हवेतच. लाल भोपळ्याची भाजी, गवारीची भाजी, भरली वांगी , ढबु मिरची ह्या भाज्या पण कुटाशिवाय अपुर्ण. साबुदाण्याच्या खिचडीत मला भरड कूट आवडते.
आणि आम्ही पण दाणे नाही शेंगदाणेच म्हणतो.
मी अनेक वर्ष डाएट केलं, भात अत्यंत आवडीचा असून एकेकाळी तो खाणं सोडून दिलं होतं, पण शेंगदाणे सोडणे नो नो Happy

आणि रात्री जेवल्यावर मला रोज काहितरी गोड खायची जाम हुक्की येते, घरी अगदीच काही नसेल तर गुळ शेंगदाणे ऑल टाईम फेव्हरीट. सध्या शेंगदाण्याची चिक्की आहे. वीकेन्डला मुंबई ट्रिप झाली तेव्हा अर्धा किलो आणली. Wink

लेख फारच आवडला.

आमच्याकडे पण अगदीच 'जिव्हा'ळ्याची गोष्ट आहे शेंगदाणे आणि दाण्याचं कूट >> आम च्या कडे सुध्दा

मंद आचेवर पण खरपुस भाजलेले शेंगदाणे, मग त्याचा तसाच खरपुस रंगाचा कुट, लाल भोपळा, मेथी, सि. मि या भाज्या, सा खि, झालच तर कुटात तुप आणि गुळ घालुन केलेले लाडू....................... आहाहा................

मस्तच लिहिलंय... फोटो पण छान... Happy
आमच्याकडे पण अगदीच 'जिव्हा'ळ्याची गोष्ट आहे शेंगदाणे आणि दाण्याचं कूट>>> आमच्याकडे पण... आजसुद्धा खाल्लेत. जास्त वेळ मंद आचेवर भाजले होते छान कडक, एक- एक खातच रहावं, संपूच नये असं वाटतं. Wink

मी पण पिठल्यात थोडा भरडलेला असा कूट घालते. कसे डोक्यात आले माहीत नाही, आपोआपच सवय लागली.

शेंगदाण्याचा कूट आणि गूळ किंवा साखर घालून खाते. मुलाला पण तिच सवय लागली. Biggrin

शेंगदाणे काही गोष्टींत मस्ट आहेत. खमंग काकडी, वेगवेगळ्या कोशिंबीरी, काही ग्रेव्ही वाल्या भाज्या; साखि, पोहे, गूळ-शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू, चटणी, उपासाची आमटी, उपासाची बटाट्याची भाजी इ शेंगदाण्याशिवाय अपूर्ण.
खारे दाणे (तिकडे खरमुरे म्हणतात), भाजके दाणे + गूळ हे फार्फार आवडते स्नॅक्स आहेत.
कोजागिरी पौर्णिमेला आटवलेल्या दुधासोबत भाजलेल्या भुईमूगाच्या शेंगा + भाजलेली तिखट हिरवी मिरची + मीठ + गूळ आणि हो पातळ पोह्यांचा कच्चा चिवडा हे मस्टातले मस्ट आयटेम्स आहेत.

लेख आवडला.
पूर्वी साबुदाण्याच्या खिचडीत कूट आवडत नसे मग आई,माझ्यासाठी पांढरी खिचडी,(लिंबू पिळून ) बनवून बाकी खिचडीत भरड कूट घालायची.
कालांतराने मी खिचडी बनवत असताना शें.कू. केव्हा घालायला लागले माहीत नाही,पण आता जाम आवडते.मात्र भरड कूट नाही आवडत.

माझाही शेंगदाणे वीक पॉईंट आहे. अभ्यासाला बसलो की मोठी वाटीभर भाजलेले दाणे आणि गुळ (२:१ प्रमाण ) घेऊन बसायचो.

मस्तच ... चिक्की तर एक्दम आवडती माझी..ते वांग्याचं भरीत तर एक्दम चमचमीत दिसतंय वाह >>> या तिन्ही गोष्टी खुप आवडतात. चिक्की तर शेंगदाण्याचीच. वांग्याचं भरीत बर्याच वर्षे झाली खाल्लेल नाही..
खारे शेंगदाण्याची आठवण आली नाही तर नवलच.. Happy

वा वा दाणे (आम्ही शेंगदाणे म्हणत नाही हे वेगळे सांगायला नकोच Happy ) अत्यंत आवडता प्रकार आहे. लहानपणी खिशात का-य-म भाजलेले दाणे असायचे. एनसीसी कॅम्प्स, शाळेच्या सहली कुठे ही जाताना मी आईकडून भाजून स्वच्छ सोललेले दाणे मागून घ्यायचे. एकदा गणिताच्या तासाला दाणे खात असताना मी आणि इतर ३ मैत्रिणी पकडल्या गेलो होतो. बाईंनी सगळ्या खानदानाचा उद्धार केला होता Biggrin दाण्याची चिक्की , दाण्याचा कूट+गूळ+तूप असं एकत्र करून त्याचा लाडू, भाजलेल्या किंवा उकडलेल्या शेंगा, दाण्याचा कूट घालून केलेल्या सुक्या खरपूस भाज्या सगळे प्रकार भयंकर आवडतात. पोट्ट्यालाही सुदैवानं आवडतात दाणे. गेल्या वेळी एकटीच भारतात गेले होते तेव्हा पोरानं आजीला स्वच्छ सोललेले दाणे पाठव असं सांगितलं तेव्हा तर मला सुडोमि झालं होतं Proud

तब्येतीमुळे शेंगदाणे सोडले( पित्त होतं). पण कुटाचि चिक्की, अक्खी दाणे ठेवून केलेली चिक्की जीव की प्राण.
एकवेळ जेवण कमी जेवून , मी लहानपणी नित्यनेमाने खायची अभ्यासाला दुपारी बसताना. सवय आईनेच लावली की, अभ्यास दुपारीच केलास की तुझी आवडीची चिक्की बनवून ठेवेन. गुळच वापरून करायची.
नाहितर राजगिरा आणि शेंगदाण्याचे लाडु.
पोह्यातले नाहीच आवडत, चिवड्यातले आणि भडंगमधले शोधून खायचे. उकडलेल्या शेंगा, चणे व खारे भरोच दाणे,
भाजीत मात्र खोबरच. साबुखिचडीत अगदी बारीक कुट.
पिठल्यात टोटल नो.

सर्वांचे आभार. Happy एकूणच मराठी माणसाला शेंगदाणा प्रिय असं म्हटलं पाहिजे. फोटोत मसाले वांग्याची भाजी आहे ती. तेल जरा जास्तच झालं तेव्हा. असो. त्याची रेसिपी दिली असती पण फार कॉमन आहे.
रिया- पिठल्यात दाणे टाकून बघ एकदा. Happy
कुणाला खोबरे आणि गुळावर लिहाय्ची असेल पोस्ट तर वाचायला नक्की आवडेल. Happy

विद्या.

छान लिहलयं!
ऑफिसात दुपारचा खाऊ म्हणुन चिक्की आणली होती.. हा लेख वाचतानाच हात हळूच बॅगेत गेला न खाऊ संपला पण! Proud

खरच शेंगदाणे जिव्हाळ्याचा विषय आहे. स्कॉच घेताना शेंगदाणे नसले की मजा येत नाही.
बाकी पिठले, आमटी बद्धल सहमत !

लेख आणी सगळ्यांच्या आवडी-निवडी मस्त (खुसखुशीत?) आहेत. उकडलेले, भाजलेले, खारे, कुटातले सर्व प्रकारचे शेंगदाणे म्हणजे पु. लं. च्या भाषेत सांगायचं तर भुई आणी मुगाचं एकत्र अद्वैत आहे.

"स्कॉच घेताना शेंगदाणे नसले की मजा येत नाही." - च्रप्स, पसंद अपनी अपनी असली तरी 'स्कॉच' शक्यतो तशीच प्यावी. अगदीच वाटलं तर थोडसं सेल्त्झर, बर्फ घालावा (सोडा नाही). एकदा स्कॉच + सेल्त्झर + थोडा बर्फ असं ट्राय करून बघा, शक्य असेल तर. वीकेंड जवळ आलाय. मौका भी है, दस्तूर भी है| Wink

लहानपणी दाण्याच्या कूटात साखर टाकून खायचो. खुप छान लागायच खायला. बाकी भाजलेले दाणे लगेच कूट करून ठेवावे लागतात हे मात्र अगदी खरे

फेरफटका.. अहो मी स्कॉच मध्ये शेंगदाणे घालून पीत नाही हो ...
जोक्स अपारट.. तुमचं सजेशन नोट केले आहे, नक्की ट्राय करू ☺️

लहानपणी दाण्याच्या कूटात साखर टाकून खायचो.>>
माझ्या धाकट्या बहीणीचा हा उद्योग असायचा. आईने दाणे भाजले की त्यातले मूठभर तिला मिळायचे. निवांत बसून छोट्या खलबत्यात ती कुटायची. मग त्यात साखर घालायची. ती लहान असल्याने कितीही कुटलं तरी त्याची पावडर नाही व्हायची.. जरा भरडच रहायची. मग एका आईस्क्रिम च्या चमच्याने 'पान पराग' करत फस्त करायची. (ती जाहिरात तेव्हा फार फेमस होती, आणि पान पराग चे जाहिरातीत दिसणारे दाणे असेच दिसायचे) एखादा चमचा आयता मला पण मिळायचा !
मस्त लेख आणि प्रतिक्रिया. फिलिंग नॉस्टॅल्जिक Happy

मस्त लेख. पुण्याकडे ते कूट म्हणतात. दाण्याचे कूट. मला पण खरपूस भाजलेले दाणे साल काढून त्याचे कूट भरडसर केलेले आवडते साबुदाणा खिचडीत, भेंड्याच्या परतून भाजीत. गुजरातेत मस्त मोठ्या आकाराची खारी सेंग मिळते लै भारी. पालकाची मुद्दा भाजी करतो तेव्हा कुकर मध्ये डाळ पालक व दाणे उकडून घेतो ते पण छान लागतात. मला पोह्यात व चिवड्यात दाणे आवडतात. दाण्या च्या कुटाचा गूळ घालून केलेला लाडू, तसेच भातुकली खेळताना दोन दाण्यांच्या अर्धुकात मध्ये गूळ ठेपून बसवले ले खेळातले लाडू पण आवडतात
उच्च रक्तदाब व पित्त असल्यास दाणे खाणे कंट्रोल मध्ये हवे. माझे एक काका रोज सरासरी १०० ग्राम दाणे खात. विथ ऑबविअस रिझल्ट्स.

पीनट बटरच मला आव ड्त नाही.