छोटेसे बहीण भाऊ
गेले काही दिवस झाले घरात जोरदार वाद चालू आहेत. आमचे धाकटे चिरंजीव त्यांच्या दीदीच्या शाळेत जायला लागल्यापासून. शाळा सुटली की आम्ही जाईपर्यंत शाळेतच असतात. जिथे मग ते दोघे दोन वेगवेगळ्या रुममधे असतात पण एकमेकांना भेटू शकतात किंवा खेळूही शकतात. आता पहिला आठवडाभर दीदीने समजून घेतलं की भाऊ लहान आहे आणि त्याला आपण सोबत खेळू देऊ. पुढे दोन महिने झाले तरीही तेच चालू राहिल्याने दीदीने आता असहकार पुकारला आहे. मग अर्थातच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळायला येऊन न देणे, रागावणे, आमच्याकडे तक्रार करणे असे प्रकार चालू आहेत. तर चिरंजिवांचे दीदीबद्दल गाऱ्हाणे चालू आहेत. दीदी खेळायला घेत नाही, नीट बोलत नाही, मित्रमैत्रिणींनाहि खेळू देत नाही वगैरे. आता आई-बाबा म्हणून कुणाची बाजू घ्यायची हा मोठा प्रश्न पडला आहे.
खरं सांगायचं तर आमच्या घरात मी सर्वात मोठी असल्याने या सर्व प्रसंगातून मी गेले आहे. बहीण-भाऊ मधल्या सुट्टीत सोबत असणे, किंवा त्यांना शाळेत जाताना-येताना सोबत घेऊन येणे हे केलं आहे. आणि त्याबद्दल राग येऊन अनेकदा आईकडे तक्रार केली आहे. भाऊ लहान असताना आजोबा म्हणायचे की 'त्याला सायकल बसव पण तू सायकल चालवू नकोस, हातात धरून चालत जा'. म्हणजे डबलसीट बसून चुकून तो पडायला वगैरे नको. हे असले प्रकार करताना खूप चिडचिड व्हायची. त्यात भर पावसात, छत्री धरायची, सायकल धरायची की स्वतःला सांभाळायचे की भावाला. अशी तारांबळ व्हायची. हे सर्व आजही सांगताना डोळ्यासमोर येतं. इतकं डोक्यात पक्कं बसलंय.
आता एक आई म्हणून याचा विचार करताना वाटतं, मुलगा लहान आहे, त्याला तेव्हढीच दीदीची सोबत होईल तर किती बरं आहे. अजून नवीन मित्र-मैत्रिणीही नाहीत. बिचारा एकटा बोअर होतो. मग मुलीला सांगायला जावं तर ती म्हणते पण वेगवेगळ्या तुकड्यातील मुलामुलींना एकत्र खेळणं अलाऊड नाहीये. आणि तिचंही बरोबर आहे, त्याने मोठ्या मुलांसोबत न खेळता स्वतः नवीन मित्र बनवले पाहिजेत, नवीन लोकांत कसं वावरायचं शिकलं पाहिजे. शेवटी आम्ही तोडगा काढला, तीन पैकी एकच दिवस त्याने तिच्याकडे जायचं आणि बाकी दिवस नवीन फ्रेंड्स बनवायचे. दोघांनीही 'डील' म्हणून अटी मान्य केल्या. म्हटलं, सुटलो.
मागच्या आठवड्यात एकदा स्वनिक बोलला, "आई आज दीदी माझ्याशी खूप छान वागली.". म्हटलं,"काय केलं?". तर म्हणाला,"मी एकटा बसलो होतो बसमध्ये तर ती येऊन माझ्याशेजारी बसली.". ते ऐकलं आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत. कितीही चिडली तरी दीदीने भावाची काळजी केलीच होती. आणि त्यालाही ते जाणवलं होतं. किती छोट्या गोष्टींनी फरक पडतो या वयात. वाटलं, याच पुढे जाऊन आठवणी बनणार आहेत.
कसं असतं ना? मी लहान असताना कितीही चिडले, तरी आता त्याच आठवणी सोबत आहेत. आणि आता कितीही इच्छा असली तरी तीन वेगवेगळ्या देशातून आम्ही वर्षातून एकदा एकत्र भेटूही शकत नाही.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मागच्या आठवड्यात एकदा स्वनिक
मागच्या आठवड्यात एकदा स्वनिक बोलला, "आई आज दीदी माझ्याशी खूप छान वागली.". म्हटलं,"काय केलं?". तर म्हणाला,"मी एकटा बसलो होतो बसमध्ये तर ती येऊन माझ्याशेजारी बसली.". ते ऐकलं आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत.
>>
माझ्या पण!
मी कधीच अस काही केलं नाही पण माझ्या बहिणीला. मला आवडायचं तिला सगळीकडे घेऊन मिरवायला
भावस्पर्शी!
भावस्पर्शी!
सध्या तरी आमच्याकडे आमची
सध्या तरी आमच्याकडे आमची अडीच वर्षाची नात, तिला बेबी ब्रदर येणार म्हणून खूष आहे. मी माझ्या भावाला हे शिकवेन, ते शिकवेन, डे केअरमधे घेऊन जाईन, ही खेळणी देईन, ही पुस्तके देईन (कारण मी आता मोठी बहिण आहे, ही खेळणी, पुस्तके बेबी ची आहेत!)वगैरे.
खरे तर बेबी ब्रदर जानेवारी २०१८ मधे येणार. त्यानंतर बहुतेक वर्षभर तरी तो काहीहि करू शकणार नाही, तोपर्यंत ही मोठी होऊन काय होईल ते पिढ्या न् पिढ्या होत आले आहे तसेच होईल.
माझा अनुभव थोडा वेगळा आहे.
माझा अनुभव थोडा वेगळा आहे. माझ्या लहान बहिणीच्या वर्ग मेंत्रिणींची माझ्याशी जास्त गट्टी जमायची. पण तिला त्याच विशेष काही वाटत नसे, कारण ती त्यांच्या वर्गातली scholar विद्यार्थिनी होती आणि आम्ही सगळ्या अभ्यासात साधारण.
लेख छान लिहीलाय नेहमी प्रमाणे.
खूप छान लेख...
खूप छान लेख...
छान आहे बहिण भावाची गोष्ट.
छान आहे बहिण भावाची गोष्ट.
(शीर्षक त्या गाण्यावरून आहे ना?....छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ ....आम्ही शाळेत म्हणायचो पण आता पूर्ण आठवत नाही)
छोटेसे बहीण भाऊ, उद्याला
छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देवु !
भावस्पर्शी.
भावस्पर्शी.
सध्या तरी आमच्याकडे आमची अडीच
सध्या तरी आमच्याकडे आमची अडीच वर्षाची नात, तिला बेबी ब्रदर येणार म्हणून खूष आहे. मी माझ्या भावाला हे शिकवेन, ते शिकवेन, डे केअरमधे घेऊन जाईन, ही खेळणी देईन, ही पुस्तके देईन (कारण मी आता मोठी बहिण आहे, ही खेळणी, पुस्तके बेबी ची आहेत!)वगैरे.
खरे तर बेबी ब्रदर जानेवारी २०१८ मधे येणार.
माफ करा, पण बेबी ब्रदर आहे हे कस माहीती. जर बेबी सिस्टर असेल तर... तुमची नात या मुळे नाराज व्हायला नको. आपणच मुलांच्या मनात तुला भाऊ येणार हे ठासायला नको. जेव्हा घरात लहान बाळ येणार असेल तेव्हा त्याच्या उल्लेख केवळ बाळ म्हणूनच केला जावा त्याला तो किंवा ती लावू नये. लहान मुलांवर याचा वेगळा परिणाम होतो.
विद्याजी तुमचा लेख खुप छान. लहानपणिचे दिवस आठवले. मोठी बहीण असलं की लहनांची जबाबदारी त्यांनीच घ्यायची असते असे नेहमी घरून शिकवले गेले.
आवडलं छोटसं लिखाण.
आवडलं छोटसं लिखाण.
माझ्या भाउची आठवण आली. तो सेकंडरी हाय्स्कुल ला आणी मी प्रायमरीत.
रोज मला शाळेत सोबत न्यायचा आणायचा.
माझी शाळा सुटली की मी गेटजवळ उभी रहायचे त्याची वाट बघत.
निरझरा जी.. अमेरिका असेल,
निरझरा जी.. अमेरिका असेल, तिथे आधीच सांगतात जेंडर.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
तीन पैकी एकच दिवस त्याने तिच्याकडे जायचं आणि बाकी दिवस नवीन फ्रेंड्स बनवायचे. >> ही आयडीया भारी आहे. म्हणजे लहान भावाला नविन मित्रमैत्रिणी बनवता येतील आणि मोठ्या बहिणीला जबाबदारीची जाणीव राहिल!!!
छान लेख. मला आमच्या लहानपणाची
छान लेख. मला आमच्या लहानपणाची आठवण आली.
मी आणि माझी धाकटी बहीण. आम्ही दोघे शाळेत असताना एकत्र एकट बरीच वर्षे राहीलो होतो. हज्जार वेळा दोघांनी एकमेकांची काळजी घेतली असेल. पण मला आठवतय काय तर तिने माझ्या डोक्यावर ओतलेल ताकाच भांडं, आणि तिला आठवतय काय तर तू मठ्ठ आहेस तुला काही येत नाही. (ती पीएचडी आणि मोठी शास्त्रज्ञ आहे:) ) हे माझ वाक्य.
पण, आम्ही सोडून, बाकी सर्व, काय शहाण्या सारखी मुल रहात होती, असच म्हणतात.
छोटेसे बहीण भाऊ, उद्याला
छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देवु !
>>बरोबर हेच, धन्यवाद
ही पोस्ट यासाठीच की
ही पोस्ट यासाठीच की प्रत्येकाच्ञा काही ना काही आठवणी अस्तातच यावरुन त्या असं मुलांना पाहिल्या की पुन्हा येतात इत्कंच.
सर्वान्चे आभार.
विद्या.
आमच्या शेजारी दोन भाऊ रहायचे
आमच्या शेजारी दोन भाऊ रहायचे त्यामुळे जरी संध्याकाळी आपापल्या घरी गेलो तरी ते एकमेकांशी खेळू शकायचे. मला भाऊ झाला तेव्हा मला फार आनंद झाला की आता आपल्याला घरी सुद्धा खेळता येईल! पण मी हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला गेले आणि ते इतकुसं लहान बाळ पाहून माझा जोरदार अपेक्षाभंग झाला होता हे पक्के आठवते!! नंद्या४३ यांची पोस्ट पाहून आठवले! It's a blessing to have a sibling
It's a blessing to have a
It's a blessing to have a sibling>>>>>>>>>>> +१
हो च्रप्स. नंद्या
हो च्रप्स. नंद्या अमेरीकेबद्दल्च बोलतायत. निर्झरा, ह्या पाश्च्यात्य देशांमध्ये जेंडर जरी आधी सांगीतले तरी मुलगा-मुलगी हा भेद ते करत नाहीत.
लेख छोटा आहे पण छान आहे. मला
लेख छोटा आहे पण छान आहे.
मुलगा-मुलगी हा भेद ते करत
मुलगा-मुलगी हा भेद ते करत नाहीत.
>>> पण आपले तिथे असलेले लोक करतात ना..
छान लेख
छान लेख
It's a blessing to have a sibling Happy>>>+१११
<<अमेरिका असेल, तिथे आधीच
<<अमेरिका असेल, तिथे आधीच सांगतात जेंडर.>>
कारण नवीन बाळाच्या खोलीला रंग कुठला द्यायचा, कपडे कुठल्या रंगाचे, ब्लँकेट कुठल्या रंगाचे हे मुलगा आहे की मुलगी यावरून ठरते.
समजा मुलगी असेल नि रंग निळा केला खोलीला तर एका दिवसात १७६० वेळा खोचक प्रश्न विचारल्या जातील!
बिच्चारा मुलगा/मुलगी - जवळपास दोन वर्षेपर्यंत त्यांना रंग ओळखताहि येत नाही, पण बाकीच्यांचेच नखरे!