लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट नसतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 November, 2017 - 15:26

आज डॉक्टरकडून निघालो आणि केमिस्टच्या दुकानात शिरलो. रात्रीचे साडेदहा उलटून गेल्याने वर्दळ अशी नव्हतीच. मोजून दोन गिर्‍हाईक. मी आत शिरताच त्यातील एक बाहेर पडले. आता फक्त एक बाई तेवढी होती. सोबत तिचा चारपाच वर्षांचा मुलगा. आणि दुकानातील पोरे.

बाईच्या हातात औषधांची मोठी लिस्ट होती आणि त्या छोट्याची काहीतरी चुळबूळ चालू होती. काही विशेष नाही. आजूबाजूच्या काचेच्या कपाटांमधील वस्तू कुतूहलाने बघत होता. त्याने आपल्याजवळच राहावे म्हणून बाई सारखी ओरडत होती. डाफरल्यासारखेच ओरडत होती. मला तो सूर जास्त भावला नाही. पण नवल म्हणजे दिसायला ती बाई ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टॉप घातलेली एक मॉडर्न मम्मा असली तरी शुद्ध मराठीमध्ये बोलत होती. खरे तर हे एक अत्यंत दुर्मिळ चित्र बघून मला थोडेसे बरेही वाटत होते. पण तिचे ते ओरडणे... ते थोडेसे इरीटेट करत होते.

दुकानातील पोरं त्या छोट्याची मजा एंजॉय करत होती. तसा काही विशेष मस्ती करत नव्हता पण ते एक असते ना, लहान मुल म्हटले की आपण जरा कौतुकाने बघतो. त्यातला प्रकार होता. लहान मुलांनाही अश्यावेळी त्या कौतुकाच्या नजरा झेलायला आणि सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन बनायला आवडते. त्याची मम्मा त्याला पुन्हा पुन्हा जवळ खेचत होती आणि हा पुन्हा पुन्हा त्या काचेच्या कपाटांजवळ जात होता. "आरोह, जाऊ नकोस तिकडे. एकदा सांगितलेले समजत नाही का. ईकडे ये. मार खाशील नाहीतर..." बाईचे ओरडणे चालूच होते.

एकदाची त्या बाईची खरेदी आटपली आणि जाण्याआधी ती मुलाला जवळ घेत स्वेटर कम जॅकेट घालायचा प्रयत्न करू लागली. मुलगा काही कारणामुळे नकार देऊ लागला. तसे तिची सटकली आणि तिने खाडकन त्याच्या एक मुस्कटात मारली. "मगाशी तुला हे घालायचे होते ना, आता का नाटकं करत आहेस?" पुन्हा ओरडली. मुस्कटात मारलेल्या चापटीचा(?) आवाज खणखणीत आला होता. मी स्वत: या बाबतीत मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर बाळगून असल्याने मलाच उगाचच जास्त मारलेले वाटले की काय म्हणून मी दुकानातल्या पोरांचे भाव पाहिले. ते सुद्धा बावरले होते. मगाशी जे हसत त्या मुलाकडे बघत होते ते नजर चोरू लागले. मुलगा रडला नाही, पण हिरमुसला. त्याला या अपमानाची सवय असावी. पण तो देखील आता आमच्यापासून नजर चोरू लागला. बहुतेक त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला होता. वाईट वाटले. जास्त वाईट याचे वाटले की या प्रकारात आपण काही करू शकत नाही किंवा काय करावे हे आपल्याला समजत नाही.

लहान मुलांना मारावे की नाही हा वेगळा विषय झाला. त्यावर कुठे कुठे चर्चा झालीही असेल. त्याबाबत माझे मत जरी मारू नये असे असले तरी ठिक आहे, ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचा त्याचा दृष्टीकोण. शेवटी आईबाप आहेत, पोरांच्या भल्याचाच विचार करणार. पण हे शिस्त आणि संस्कार लावण्यासाठीचे मारणे घराच्या चार भिंती आड नाही का करता येणार? असे चारचौघात मारल्याने लहान मुलांचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जात नसेल का? की लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट असा काही नसतोच??

आज काय करायचे हे मला पटकन सुचले नाही. पण पुढच्यावेळी मात्र मी अश्या आईबापांना नक्की झापणार....
चूभूदेघे,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, चांगला प्रश्न मांडलायेस. लहान मुलांना butt of the joke करणार्या, त्यांचा उगाचच पाणउतारा करणार्या लोकांविषयी मी तुझ्याशी सहमत आहे. केवळ लहान मुलं प्रतिकार / प्रतिवाद करू शकत नाहीत म्हणून त्यांचा गैरफायदा घेणारे मला तरी भेकड वाटतात.

तुझ्या उदाहरणात, आई-मुलगा असल्यामुळे मी लगेच मत व्यक्त नाही करणार. जे पालक - सवय म्हणून किंवा just bad parents म्हणून मुलांना शारिरीक / मानसिक मारहाण करतात, त्यांचा निषेध आहे. कधी काही अपवादात्मक परिस्थितीत किंवा प्रसंगोचित मुलांना शिक्षा करत असतील, त्यांच्याविषयी मात्र मी पटकन निष्कर्ष नाही काढू शकणार.

छान लेख. वैचारीक.

चारचौघात बोललं तरी अपमान वाटतो लहान मुलांना. माफक मस्ती करणारंच मुलं, अति मस्ती करत असेल तर हरकत नाही बोलायला पण मारणे हे पटले नाही मला, पण आता आईची सिच्युएशन काय असेल नेमकी आपण सांगू शकत नाही, पण मी पण बाकी तुम्हा सर्वांसारखीच हळहळलेच असते मारलेलं बघून, मोस्टली म्हणाले असते नका हो मारू त्याला लहान आहे तो. अर्थात मला जजमेंटल नाही व्हायचे पण मारले इतक्या लहान मुलाला आणि तेही मुस्कटात हे बघवले नसतं अर्थात मारणे हेच बघवलं नसतं. तोंडाने म्हणू शकली असती, आता मी मारेन हा असं का करतोस वगैरे पण actually मारायला नको होतं. कदाचित आई आधीच्या कुठल्या त्याच्या गोष्टीमुळे किंवा इतर काही प्रसंगामुळे चिडलेली असेल पण फक्त वाचूनही मी कळवळले मात्र.

खुप मार्मिक प्रश्न आहे आणि हां प्रसंग ईथे मांडून सर्वाना पुन्हा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या लेखासाठी ऋन्मेष ह्यांचे सर्वप्रथम आभार.

मारणे किंवा न मारणे हे प्रसंगानुरूप असू शकते पण ते चार भिंतीच्या आड़ घरी एक्वेळ परवडेल पण असे चार चौघात सार्वजनिक ठिकाणी नकोच . अश्या प्रकाराने किती तरी निगेटिव्ह परिणाम त्या बालमनावर होऊ शकतो आणि त्यातून एकतर त्याचा स्वभाव फार एकलकोंडा आणि कमकुवत मानसिकतेचा बनू शकतो किंवा ह्याउलट अधिकच कोडगा आणि हिंसक मनोवॄत्तीचा सुद्धा घडू शकतो.

अजुन एक सांगवेसे वाटते की गालावर चापट म्हणजे थोडक्यात कानाखाली मारणे हे तर विशेषत्वाने नक्कीच अपमानकारक असते त्या ऐवजी पाठीत धपाटा हां आवाज मोठा पण मार कमी असा प्रकार असल्याने धाक दाखवायचाच तर उपयोगात आणता येईल अर्थात तेही घरीच. कारण रागात आपण चेहऱ्यावर मारू तेव्हा आपला मोठ्या माणसाचा हात त्या छोट्या जीवाच्या जबड़ा, दात, डोळे अश्या ठिकाणी शारीरिक दुखापतिस सुद्धा कारणीभूत ठरू शकते. म्हणजे ह्या घटनेत शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आघात घडत असतात तेव्हा हां प्रकार टाळणे हेच उत्तम !

आधी लेखातील प्रश्नाचं उत्तर: असतो, मुलांना भावना असतात, आणि सेल्फ रिस्पेकटही.

वर दिलेल्या प्रसंगात कदाचित काहीतरी पार्श्वभूमी असणार. जी बाकी लोकांना माहित नसते. त्या वेळी ती गोष्ट छोटी वाटत असली तरी ते 'कलेक्शन ऑफ इव्हेंट्स' असू शकते. त्याबद्दल मी जास्त सांगत नाही. पण
आई म्हणून गेल्या ८ वर्षात नोंद केलेल्या काही गोष्टी:
१. बाहेर असताना शक्यतो हे प्रसंग टाळता आले पाहिजेत. एखादी किमती वस्तू मुलांकडून फुटू नये म्हणून आई-वडिलांना जाम टेन्शन असते. अशावेळी दुकानात जातानाच आम्ही शक्यतो वॉर्निंग देतो की कशालाही हात लावायचा नाही. तरीही लावत असले तर, आमच्याकडे १-२-३ आकडे मोजले जातात. मुलं शक्यतो ऐकतात मग. पण त्यासाठी त्यांना आपण १-२-३ मोजण्याची सवय लागली पाहिजे. मी ३ म्हटलं की तुला टाइम आउट मिळेल असं माहित झाल्याने शक्यतो ३ म्हणायची वेळच येत नाही. यात सर्वात कमी त्रास होतो.
२. तरीही ऐकत नसतील तर मग बाजूला बोलवून सांगितलं जातं. की तू जे करत आहेस ते चूक आहे आणि खपवून घेतलं जाणार नाही. अशावेळी बाजूला घेऊन बोललं तर लोकांच्या समोर असलं तरी मुलांना समाधान असतं की लोकांना ते ऐकू जात नाहीये, इ.
३. हात उचलणे- मुळात हे टाळलंच पाहिजे. घरीही आणि लोकांसमोर तर नाहीच नाही. आता मुले मोठी होत आहेत तसं जवळ जवळ बंदच आहे आणि चुकून खूपच राग आला तर धपाटा मिळतो पाठीत तोही अगदी विरळा. गालावर देणे हे अतिशय अपमानकारक आहे आणि ते कधीच केले नाही पाहिजे.
४. मुलं बरेच वेळा बोअर होतात किंवा भूक लागलेली असते, दमलेली असतात अशावेळी बाहेर रडारड वगैरे होऊ शकते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वेळेत खाऊ घालणे गरजेचे आहे. त्यांची भूक, झोप याची काळजी घेतली तर अनेक प्रसंग टळतात.
५. बरेचदा मुलांनाही माहित असतं की बाहेर गेल्यावर आई काही बोलणार नाही, आपण हट्ट केला तर तो शक्यतो पूर्ण केला जाईल. अशा वेळी त्यांना स्पष्ट शब्दात लोकांसमोरही तोंडी नकार द्यावा लागला तरी चालेल, पण आपल्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतलेला मला आवडत नाही. उदा- काउंटर वर गेल्यावर चॉकलेट मागणे, किंवा मित्र-मैत्रीण समोर असताना फोन मागणे, टीव्ही साठी हट्ट करणे, इ. या सर्व गोष्टींसाठी लोक गेल्यावर नक्कीच बोलतो. पण खूपच नाटक झाले तर त्यांच्यासमोरही सरळ नकार देतो.

विद्या.

सगळ्यात महत्त्वाचं
ती बाई औषधे घ्यायला आली होती, रात्री दहाच्या पुढे - मुलासोबत
म्हणजे घरात कोणीतरी आजारी आहे आणि तिला कोणतीही physical support सिस्टिम (मूल कोणाकडे ठेवेल, कोणीतरी मूल बघेल) असं कोणी त्या क्षणी नाही. घरांत आजारपण चाललेले असेल तर मनःस्थिती पण ठिक नसते.
हात उगारणे / मारणे कितीही चूक असले तरी let us give her a break, this ones.

बाकी, भारतात तरी कोण स्वतः:च्या मुलाशी कसं वागतो ह्यावर टिप्पणी करायचा तुम्हांला काहीही अधिकार नाही. अबे! चल हॅट, आगे जाव! रास्ता नापो इत्यादी गोष्टी ऐकायची आणि तुम्ही नाक खुपसलेत म्हणून एखाद्याचे खूपच सटकले तर थोबाडीत खायची / मारामारी करायची तयारी असेल तर रस्त्यातल्या अनोळखी लोकांच्या parenting methods वर टिप्पणी जरुर करा.

"मुलं आपली आहेत, आपण संस्कार केलेत म्हणून ते आपलं ऐकतात असं काहीही नसतं. ते ऐकतात कारण त्यांच्या अंगात बळ नसतं, इतकंच.." -- श्याम मनोहर. Proud

अर्थात हे मूळ पुस्तकात सार्‍या संदर्भांसकट खास मनोहरी सार्काझम मध्येच वाचले पाहिजे..

कसंय मित्रा, संतश्रेष्ठ सलमान (भाईजान) खान यांनी म्हणून ठेवलंच आहे की.. "मैं करुं तो साला, कॅरॅक्टर ढिला है" !
हेच आपल्या भाषेतल्या काही म्हणी सुद्धा सांगतात -
"दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळ दिसते , पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही",
" देखणी बायको दुसर्‍याची"
"दुरुन डोंगर साजिरे" किंवा
"जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे" वगैरे वगैरे.
या सगळ्या गोष्टी मनुष्य प्राण्याच्या उपजत अश्या 'दुटप्पीपणा' नामक दोषावर बोट ठेवतात.
कसंय.. दुसर्‍याचं पोर गोंडस, त्याच्या खोड्या बाललीला वगैरे वाटतातंच. तेच आपल्या पोराने केलेलं खपत नाही. कारण दुसर्‍याच्या पोराच्या त्या लीला आपल्या समोर काही क्षणात घडल्या असतात, त्या क्षणी त्याच्या आईवडिलांची मनःस्थिती आपल्याला एक त्रयस्थ म्हणून अजिबातच माहित नसते, त्यामुळे काय निष्ठूर आई आहे, कसला निकाळज्या बाप आहे, हे त्या घडीला वाटणं स्वाभाविकच आहे.
तेव्हा.. "तेरे भी दिन आएंगे छोटे.. अच्छा खासा हिल जाएगा"
आता लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट नसतो का? तर का नसतो ! नक्कीच असतो. पण प्रसंगी कठोर, शीस्तशीर वागणे यात सेल्फ रिस्पेक्ट दुखावणे'च' असणे गरजेचे नाही, तर तो ही एक संस्काराचा , लहान मुलांच्या जडणघडणाचा एक भाग पण असू शकतो असं वाटतं.. काय !

कधीच आईवडिलांचा मार/धपाटा न खाल्लेली माणसं इथे प्रतिसाद देत आहेत ते पाहून डोळे भरून आले. आणि हो त्यांनी कधीही मुलांना साधा धपाटा सुध्दा घालू नका असे सांगणे तर खासच. खुपच बालमानसोपचारतज्ञ आहेत माबोवर.

खरंखोट त्यांचं मन जाणे. चालूद्या.

mul' apalya "malakichi" nahit he palakanni lakshat thevale tar we would behave better. Would you do that to your spouse? your mom/dad/siblings, your friends, your neighbours? If not, don't do it to your kids either - that should be rule of thumb. They are small, they are able to defend themselves neither physically nor mentally.. and they are dependent on u (so cant really do much even when u mistreat them).
That's why You should be more careful on how u behave with them.
I once read somewhere - Love comes almost naturally. But do you like your kids? That would determine transactional details of ur relationship with them. And I feel that's true.
Of course - the pattern of behavior of kid, what that parent has gone through that day and many factors will come into picture. Parents are humans too who can make mistakes/ they can lose patience too sometimes.. but hope its nt a pattern.

Also, till a certain age, they don't have control on their physical behavior (eg. a 2 year old is pouring water. U ask him to stop. He doesn't. or he does and starts again. U say he is doing purposely to irritate u. TBut that's not true. he fact is 2 year old may not have complete impulse control. You beating him may not be a good way to teach that control. He can learn that over the period of time from inside- by means of logic, thinking, by love and respect and experience)
Sometimes ur kid will cry a lot.. but u can check if his boundaries are crossed first (eg. Lack of sleep, food and sleep timings, tiredness.), check if something bad has happened and eliminate these reasons before branding the kid. If its one of these reasons, handle them different way. Don't get upset at kids.

I have a kid and I know how they behave, I know tantrums, I know her power tactics.
I am not saying these things theoretically.
I try to follow whatever I have said. There are ways to handle these things.. we should chose carefully.

मी ह्या मुद्यावर मी लहान असल्यापासून लढा दिलेला आहे. आपल्या भारतीय कल्चर मध्ये मुलांच्या भावना समजूनच घेतल्या जात नाहीत. १००% आज्ञाधारक ही आपल्याकडे चांगल्या मुलाची व्याख्या आहे. हे मुळातूनच चूक आहे. ती एक स्वतंत्र व्यक्ति आहे व तिचे स्वतःचे विचार असणारच. त्यात वावगे काही नाही. माइंड ह्ण्ट् र्स ही ने ट फ्लिक्स वरची सीरेअल बघा.

लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट असतो. चारचौघात मारणे, जोरात अंगावर ओरडणे हे टाळायलाच हवे. शिस्त लावण्यासाठी म्हणून एखादा फटका मारण्यात काहीच गैर नाही (तेसुद्धा स्वतःच्या घरात). पण थोबाडीत मारणे, डोक्यावर मारणे, मुलाच्या अंगावर वळ उठतील असे मारणे, किंवा मुलाला कायमची इजा होऊ शकेल अशा ठिकाणी मारणे चुकच आहे!! पालकांना जर राग आला असेल तर मारणे निश्चितच टाळावे कारण रागाने मारले तर खूप जोरात मारले जाते.

बाकी विद्याचा प्रतिसाद पटला. मी शक्यतोवर मुलाला समजावून सांगायचे असेल तर खाली बसून त्याच्या उंचीच्या लेव्हलला जाऊन समजावून सांगते आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो असा माझा अनुभव आहे. उभे राहून त्याच्या उंचीपेक्षा वरच्या पातळीवरून दिलेल्या सूचना तो ऐकत नाही असा पण एक अनुभव आहे Proud

मी शक्यतोवर मुलाला समजावून सांगायचे असेल तर खाली बसून त्याच्या उंचीच्या लेव्हलला जाऊन समजावून सांगते आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो असा माझा अनुभव आहे>>>>>>
Interesting निरीक्षण

मी शक्यतोवर मुलाला समजावून सांगायचे असेल तर खाली बसून त्याच्या उंचीच्या लेव्हलला जाऊन समजावून सांगते आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो असा माझा अनुभव आहे>>>>>>
Interesting निरीक्षण +१.

मी शक्यतोवर मुलाला समजावून सांगायचे असेल तर खाली बसून त्याच्या उंचीच्या लेव्हलला जाऊन समजावून सांगते आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो असा माझा अनुभव आहे>>>>>>
Interesting निरीक्षण + १०००

हे करून बघायला पाहिजे .
माझा लेक पण कधीकधी फार हट्टीपणा करतो . फटकावण्याशिवाय पर्याय नसतो .
चारचौघात टाळते पण कधीकधी पर्यायच नसतो .

से चारचौघात मारल्याने लहान मुलांचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जात नसेल का? की लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट असा काही नसतोच??>>>>> नक्कीच असतो .
माझा लेक पाच सहा वर्शाचा होता . एकदा असाच तमाशा केलेला त्याने , जाम प्रकार झाले . मीपण खूप चिडलेले. एक-दोन रट्टे लगावलेले.
नंतर रात्री झाल्याप्रकाराबद्दल माझी नणंद त्याच्याशी काहितरी बोलत होती .
तेन्व्हा तो तिला बोलताबोलता म्हणाला ,
"मी मारामारी केली म्हणून मम्मा मला ओरडली ते बरोबर आहे . पण नंतर तिने मला, त्या रिक्शावाल्याकाकांसमोर, रिक्शात का मारलं ?म्हणून मला राग आला "

काही मुलं लई ईब्लिस असतात....प्रेमाने सांगितलं तर ऐकत नाही...मग फटक्यांशिवाय गत्यंतर उरत नाही...

आणि आई मुलाच्या नात्यात कसला आलाय सेल्फ रिस्पेक्ट..म्हणजे असं तरी मला वाटतं...कारणाशिवाय कुठलेच आईवडील मारत नाही...

मी शक्यतोवर मुलाला समजावून सांगायचे असेल तर खाली बसून त्याच्या उंचीच्या लेव्हलला जाऊन समजावून सांगते आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो असा माझा अनुभव आहे.>>>+१११

आणि आई मुलाच्या नात्यात कसला आलाय सेल्फ रिस्पेक्ट >>>>>
"मी मारामारी केली म्हणून मम्मा मला ओरडली ते बरोबर आहे . पण नंतर तिने मला, त्या रिक्शावाल्याकाकांसमोर, रिक्शात का मारलं ?म्हणून मला राग आला " +७८६

प्रत्येक लहानमोठ्या सजिवाला सेल्फ रिस्पेक्ट असतो!!!

रिवॉर्ड व पनिशमेंट या दोघांचा रोल महत्वाचा आहे. मुलांना अन मोठ्यांनाही.

Abusive लोक पालक असतात, पण प्रमाण खूप नगण्य. आपल्या पोटाच्या गोळ्याचं चार चौघात मुद्दाम अपमान, मारहाण, वगैरे कुणी सहसा विनाकारण करीत नाहीत.

तेव्हा, कारण नक्कीच असू शकते, उगा फुकट जाजमेंट्स देऊ नयेत.

उदा. त्या चिरंजीवानी पूर्वी कुण्या दुकानात काचेचे कपाट फोडण्याचा पराक्रम केलेला असू शकतो, ज्यामुळे त्याला काचेपासून दूर ठेवणे गरजेचे असू शकते. दिवाट्याने काच फोडल्यानंतर सेल्फवरिस्पेक्टिव्ह कळवळा वाले पैसे भरून द्यायला पुढे सरसावले नसते हे नक्की.

त्याच प्रमाणे अमुकच कपडे घालून दे वरून तोफांड मांडणारे नमुने पाहिल्याशिवाय ती कानाखाली का बसली ते समजणार नाही.

ऋ, छान प्रश्न! लहान मुलांनाही सेल्फ रिस्पेक्ट असतोच, परंतू मला नाही वाटत की आई-वडीलांच्या एखाद्या फटकावण्याने तो दुखावतो. पण हेच फटकावणे चार-चौघांपुढे असेल तर मात्र शक्यता जास्त असते दुखावण्याची. काही मुले खरंचच खूप व्रात्य असतात, सांगून न ऐकणार्या मुलांना अगदी क्वचीतप्रसंगी एखादा फटका ठीक आहे. पण हीच त्यांची समजावयाची पद्धत बनणे चूक आहे. असे म्हणतात की अती मार खावून मूल कोडगे बनते.

असतो पोरांना सेल्फ रिस्पेक्ट आणि माझे मत आहे तो जपायलाही हवा. सुरवातीला एकदोन प्रसंगात पोरे कशी वागतात हे आपणास नक्कीच कळते नंतर चुचकारून , विश्वासात घेऊन, त्यांच्या कलाने घेऊन सांगितले तर नक्कीच ऐकतात असा माझा अनुभव आहे.

ऋन्मेष... खुप छान विषय मान्डलेला आहेस...
वरील चर्चा व काही निरीक्षण या वरुन काही मुद्दे मान्डावेशे वाटता..
१. आपल्या इथे लहान मुलांना त्यांचा स्व:ताचा असा विचार वा मत असते तेच मुळी मान्य नसत :
जेव्हा मुल मोठी होतात (३ पासुन पुढे जवळपास १४ पर्यन्त) त्यांची स्वःताची एक पर्सनॅलीटी बनते बनत असते. ते जे पहातात, निरीक्षण करतात, वाचतात व आजुबाजुच्या वातावरणा प्रमाणे त्याची पर्सनॅलीटी बनते, त्यांची स्व:ताची मत बनवण्याची क्षमता येते.
लहान मुलाना त्याच मत असत हेच मुळी आपल्याला मान्य नसत. आणि जेव्हा आपल्याला ते मान्य नसत तेव्हा मग आपली मत ही त्याच्या वर लादली जातात वा त्याच्या मताची मुस्कटदाबी होते..
२. लहान मुलांना समजत नाही, हा गैरसमज :
जेव्हा आपण हा गैरसमज करुन घेतो कि लहान मुलाना सांगीतलेला समजत नाही तेव्हा आपण चर्चा हा महत्वाचा घटकच बाद करुन टाकतो... आणी चर्चा जेव्हा बाद होते तेव्हा मग "फटके" देणे हा उपाय सुचतो वा सुचवला जातो.. लहान मुलाना आपल्याला जेवढ वाटत त्या पेक्षा खुप आधीक समजत असत. जेव्हा आपण म्हणतो एकाद मुल खुप हट्ट करत, कितीही सांगीतल तरी त्याला समजत नाही वा ते एकुन घेत नाही, तेव्हा नीट निरीक्षण केल असत अस दिसत कि.. त्याना त्यावेळी समजावुन सांगितल गेलेल नसत, त्याच्या वर आपली मत लादलेली असतात (कारण आपण हे गॄहीत धरलेल असत की त्याना स्व:ताच मत नसत). व जेव्हा ते मुल लादल्या गेलेल्या मतांना प्रोटेस्ट करत तेव्हा ते "हट्टी" ठरत. मी या मताचा नाही की प्रत्येक हट्ट पुरवायला हवा, पण त्या वेळी त्याना त्या हट्टाचे परीणाम व काही अल्टरनेटीव सुचवला तर ते एकुन घेतात....

माझी मुलगी ७ ची होईल.. एकदा खरेदीला गेलो असता तिला काही तरी हव होत पण त्या महीन्याच्या बजेट मधे ति खरेदी बसत नव्हती. ती खपच हट्ट करु लागली, सौ पण वैतागली. मला वाटल तिल समजेल का हे मासीक बजेट वगैरे.. पण विचार केला ट्राय करुयात..
मुलीला नीट सांगीतल की माझा जो महीन्यचा पगार आहे त्या मध्ये एवढे पैसे आपण खरेदी वर खर्च करतो. आणि ति जे मागत आहे ते त्या मधे बसत नाही. पण जर तिला ते हव असेल तर तिला एवढी एवढी वाट पहावी लागेल..चालेल का ? तिने क्षण भर विचार केला आणि म्हणाली "प्रोमीस करतोस ना बाबा मग की मला तेव्हा तु ते घेउन देनार?". सांगायचा मुद्दा हा की त्याना "नाही , नको, महाग आहे, ते कशाला हवाय" अस उत्तर देण्या पेक्षा त्याच अल्टरनेटीव आहे का ते सांगाव, त्यांच मत विचारात घ्याव. प्रत्येक वेळी ते जमेलच अस नाही ..पण ट्राय तरी करता येइल..

आजुन खुप आहे..जसा वेळ मीळेल तस लिहतो..

एका कलीगचं चार वर्षाचं पोरगं.
टॅक्सीची काचं उघडीच पाहीजे आणि आईच्या मांडीवर बसून उघड्या खिडकीतून टांग बाहेर काढतंय, ऐकत नाहीय. काच वर केली की ठणाणा बोंबलतंय. स्वत: खाली करतंय टांग परत झोपून टांग बाहेर काढतंय. सगळ्या प्रकारे समजावून लक्ष दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न तीन चार मिनिटापेक्षा टिकत नाहीयत. मध्येच पाय बाहेर काढतंय.
काय करणार आई बाप? भर रहदारीत हे प्रताप चाललेय.

एकदा गाडी सेफ ठिकाणी थांबवून त्याला पाय बाहेर काढू द्यावा, आणि स्वतः काच वर करून 1 2 मिन अडकवून ठेवावा,
चटकन गुण येईल,

त्या अडकलेल्या अवस्थेत आपण गाडी लॉक करून त्याच्या नजरेपासून दूर होण्याचे धैर्य दाखवू शकलो तर तात्काळ गुण येईल.

अहो अनुभवतील शहाणपण आहे हे,
मुलगी पाच साडेपाच वर्षाची झाली, ती गाडीत झोपायची, मग तिला कडेवर घेऊन लिफ्ट, घर दारे उघड वगैरे कठीण जायचे,
पण उठवून चालायला लावली की रडारड करायची, आणि रात्रीच्या शांत वेळी आवाज पूर्ण बिल्डिंग ला ऐकू जायचा,

2 3 वेळ तिला समजावले, पण उपयोग शून्य,
मग एकदिवस वॉर्निंग दिली की तू उठली नाहीस तर गाडीतच झोप, सकाळी उठून घरी ये,
रात्री परत नेहमीचा खेळ सुरू झाला, या वेळी आम्ही गाडी लॉक करून पिलर मागे जाऊन लपलो,
शॉक बसल्या सारखी उठून काच वाजवायला लागली,

परत तिला रात्री उचलायला लागले नाही आहे Happy

बरेच चांगले प्रतिसाद आलेत आणि आवडलेत, कोट करून +७८६ तरी कोणा कोणाला देणार..
अमा यांनी लिहिलेले हे पटलेही आणि पटकन हसायलाही आले <<< १००% आज्ञाधारक ही आपल्याकडे चांगल्या मुलाची व्याख्या आहे. हे मुळातूनच चूक आहे. ती एक स्वतंत्र व्यक्ति आहे व तिचे स्वतःचे विचार असणारच.>>>>

बाकी एक चांगले झाले धागा मुलांना मारावे की न मारावे यावर गेला नाही. कारण सेल्फ रिस्पेक्ट केवळ मारण्यानेच दुखावतो असे नाही. तुम्हाला तुमचा बॉस ऑफिसमध्ये मारत नाही, तरीही जर त्याने ठरवले तर तो तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आपल्या वर्तणूकीने सहज दुखावू शकतो. त्यामुळे मुलांवर देखील आपण बॉसिंग तर नाही ना करत आहोत हे बघणेही गरजेचे आहे.

Pages