माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2015 - 12:28

शिवी म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संतापाच्या भावना व्यक्त करणारे शब्द ...
अशी काहीशी शिवीची व्याख्या ऐकली होती..
बस्स तिलाच खोटे ठरवायचो आम्ही..

जसं ठेच लागल्यावर पटकन तोंडातून अई निघते, जसे कोणी आपल्याला हाक मारल्यावर पटकन आपण ओ देतो, बस्स तसेच .. मित्राला हाक मारताना किंवा त्याच्या हाकेला ओ देताना पटकन तोंडातून शिवी निघायची. मित्रांमध्ये होणार्‍या संभाषणातील दर वाक्यामध्ये, दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यामध्ये, एखादी शिवी मोठ्या खुबीने कुठेतरी पेरलेली असायची. क्रिकेट खेळताना मात्र नेमके उलटे व्हायचे.. अर्रंरर म्हणजे शिव्यांशिवाय बोलायचो असे नाही, तर नुसत्या शिव्या, नुसत्या शिव्याच दिल्या जायच्या.. आणि त्या शिव्यांमध्येच काही शब्द मोठ्या खुबीने पेरून संवाद साधला जायचा.

यात कुठेही राग, संताप, समोरच्याबद्दल द्वेष या भावना दूरदूरपर्यंत नसायच्या. किंबहुना मैत्रीची लेवल या शिव्यांवरून ठरवली जायची. ना कोणी त्या शिव्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा, ना शोधायला जायचा. अर्थात, जेव्हा या वापरायला सुरुवात केली तेव्हा कैक शिव्यांचा अर्थही माहीत नव्हता.

तर या शिवीगाळ प्रकरणात मी साधारण दहाव्या वर्षी फॉर्मला आलो. ईयत्ता चौथी पास होत प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत सरकलो आणि तिथले वारे लागले म्हणू शकता. तिथे आम्ही पाचवी ग्रेडवाले ज्युनिअर आणि आम्हाला धंद्याला लावणारे सहावी ते दहावी सारेच सिनिअर. मी त्यांच्यातच जास्त रमायचो. कारण कुठलाही दुर्गुण समवयीन मित्रांच्या आधी उचलायचा गुण माझ्या अंगी मी बाणवला होता. त्यामुळे आमच्या वर्गात मी ‘गुरू’ आणि ‘महागुरू’ या दोन नावांनी ओळखलो जायचो. शिव्याच नाही तर लैंगिक शिक्षण (जे तेव्हा शालेय अभ्यासक्रमात मिळायचे नाही) मी मोठ्या मुलांकडून घेत माझ्या वयाच्या मुलांमध्ये वाटायचो. हे देखील या पदव्यांमागचे एक कारण होते. मग काय, या इमेजला जपायला भरमसाठ शिव्यांचा सर्रास अन सुलभतेने वापर करणे भागच होते. इथे सुलभता फार महत्वाची. कारण आव आणून शिव्या दिल्यासारखे मी कधीच केले नाही. त्या सहज यायच्या. अर्थात यामागे आमच्या बिल्डींगमधील वातावरणाचाही हात होताच.

वासरात लंगडी गाय शहाणी आणि काशीबाईंपेक्षा देखणी मस्तानी. या न्यायाने मी बिल्डींगमधील एक, किंबहुना एकमेव हुशार मुलगा म्हणून गणला जायचो. जो मुलगा हुशार आहे तो वाया गेलेला नाही या समीकरणानुसार सभ्य मुलगा म्हणूनही ओळखला जायचो. ‘रुनम्या सोबत आहे’ म्हणत माझे नाव घेतल्यास एखाद्याला घरून पिकनिकसाठी परवानगी मिळावी या पठडीतली माझी इमेज होती. आणि ती तशी परवानगी खरोखरच मिळायची म्हणून माझे मित्रही माझी ती फेक इमेज आपापल्या घरी जपायचे. यामागे आमच्या घरचे वातावरणही कारणीभूत होतेच. मी कसाही असलो तरी आमचे घर संस्कारी होते आणि ते बिल्डींगमध्ये सर्वांना माहीत होते.

तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.

पण एक अपवादात्मक किस्सा मात्र आहे जो कायम आठवणीत कोरला गेलाय ..

शाळेतील गोष्ट आहे. दहावीच्या वर्षाची. शारीरीक शिक्षणाचा तास चालू होता. वर्गातल्या वर्गात उंच उडीची परीक्षा चालू होती. एकेक जण हातात खडू घेत भिंतीजवळ जात उंच उडी मारायचा, हातातल्या खडूने निशाण बनवायचा आणि मग त्या आधारे उडी मोजली जायची. माझी उडी मारून झाली होती. ईतरांच्या थोड्याफार बघितल्या आणि मग त्यातील रस संपला तसे मी आपल्याच विचारांत रमलो. ईतक्यात वर्गात अचानक गोंगाट सुरू झाला. कोणीतरी अफाट उंच उडी मारली होती. मी माझ्या तंद्रीतून खडबडून जागे होत चौकशी केली तसे सुशांतने अमुक तमुक उंचीची उडी मारली असे समजले. आकडा खरेच खतरनाक होता. त्यामुळे अबब असे उद्गारवाचक शब्द तोंडातून निघतात तश्या अर्थाची एक शिवी बाहेर पडली. गंमत म्हणजे माझ्या दुर्दैवाने तेव्हाच अचानक सारा वर्ग शांत झाला. माझी शिवी वर्गात खणखणीतपणे दुमदुमली. आणि पुन्हा एकदा शांत झालेल्या वर्गात हास्याचे स्फोट गडगडले. पुढच्याच बाकावर बसलेलो असल्याने बाईंच्या कानापर्यंत नक्कीच ही शिवी पोहोचली असणारच. पण त्यांनी तसे न दाखवता, मुलांनाच प्रतिप्रश्न केला की काय म्हणाला हा रुनम्या. अर्थात कोणी सांगितले नाहीच. बाईंनीही न ताणता मला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले. याचा एकच फायदा झाला, तो म्हणजे पुढील उंच उडीचा कार्यक्रम मला मान फारशी वरखाली न करता बघता आला.

तर आजही शाळाकॉलेजमधील ज्या अवली कारनाम्यांसाठी मी मित्रांना आठवतो, त्या आठवणीत हा किस्साही जोडला गेला.

शिव्यांमध्ये मातृभाषा फार महत्व राखून असते. मलाही मराठीतच जमायच्या. राष्ट्रभाषेतील शिव्यांमध्ये ती मजा नाही यायची. ईंग्लिश तर कधी जमल्याच नाहीत. नाही म्हणायला ईंग्रजी आद्याक्षर एफ पासून सूरू होणारा दोन अक्षरी शब्द मध्यंतरी तोंडात बसला होता. उगाच शायनिंग मारल्यासारखे वापरायचो. एकदोनदा गर्लफ्रेंडसमोर वापरला आणि तिनेही थोबडावून तो सोडवला.

या शिवीगाळीचा जो काही थोडाबहुत अहंकार मनी वसला होता तो हॉस्टेलमधील काही उडाणटप्पू उत्तरभारतीय मुलांसमोर गळाला. आपल्याकडे व्याकरणाचे संस्कार पाळत संधी समास करत शिव्या दिल्या जातात. ज्यांचा थेट अर्थ पोहोचत नाही, पोहोचलाच तरी भिडत नाही. त्यांच्या शिव्या मात्र फोड केलेल्या असायच्या. ज्या ऐकायलाही किळसवाण्या वाटायच्या. देणे तर दूरची गोष्ट.
असो, तर त्यांच्याशी मी कॉम्पिटीशन करायला गेलो नाही हे एक चांगलेच झाले.

आज माझ्या गर्लफ्रेंडला किंवा ऑफिसमधील कलीग्जना मी सांगतो की मी असा आहे वा असा होतो. शिव्यांचे नुसते अर्थच माहीती आहेत असे नसून सफाईतपणे शिवीगाळही करू शकतो. तर त्यांना हे खोटे वाटते. पण मग त्यांचा विश्वास बसावा म्हणून दोनचार सॅंपल शिव्या देण्याचा मोह मी देखील आवरतो.
कारण आज त्या शिव्या खटकतात. शिव्यांच्या या बाजारात आईबहिणींचा उद्धार केला जातो हे खटकते. कारण आज त्या सवयीने सहज येत नसल्याने त्या तोंडात यायच्या आधी त्यांचा अर्थ डोक्यात येतो आणि मग शब्द अडखळतात.

पण या उद्धारावरून आठवले. तीर्थरूपांचा उद्धार करण्याचीही एक पद्धत होती. दहापैकी चार जणांना तरी चिडवायचे नाव म्हणून त्याच्या वडीलांचे नाव असायचे. त्यातही कोणाच्या वडीलांचे नाव शंकर, दिगंबर, पांडुरंग असे धार्मिक असेल तर हमखास त्याच नावाने हाक मारली जायची. लॉजिक शोधायला जाऊ नका पण असे व्हायचे. यातही सोयीनुसार दिगंबरचे दिग्या आणि पांडुरंगचे फक्त पांडू व्हायचे. ज्या कोणाच्या वडीलांचे नाव प्रकाश असेल त्याला तर आयुष्यभरासाठी पक्या हे टोपणनावच पडायचे. माझ्या शाळा, कॉलेज आणि बिल्डींगमधील तीन विविध ग्रूप्समध्ये असे तीन पक्या होते. आणि मी त्यांना पक्या सोडून आजवर कुठलीही दुसरी हाक मारली नाही. याचाही एक किस्सा आहे. विषय निघालाच आहे तर सांगतो,

कॉलेजात असतानाची गोष्ट. सिनेमाचा की अभ्यासाचा प्लान बनत होता. फोनाफोनी चालू होती. सगळ्यांकडेच मोबाईल नसायचा. कोणाचा असला तरी लागेलच याची खात्री नव्हती. तर पक्या म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या एका मित्राचा मोबाईल लागत नव्हता. त्याच्या घरचा नंबर होता म्हणून मी लॅण्डलाईन फिरवला. समोरून त्याच्या आईने फोन उचलला. मी सवयीनेच उच्चारलो, "पक्या आहे का?.."
ती माऊली थोडावेळ गोंधळली. मग म्हणाली, नाही ते आता ऑफिसला गेलेत. आपण कोण? मी फोन कट!

किस्से बाय किस्से आठवले तर बरेच निघतील, पण तुर्तास एवढेच .. कारण सध्या संस्कारक्षम लोकांमध्ये वावरतोय, फार काही लिहिल्यास हा फेकतोय असा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळे ते किस्से माझ्या आत्मचरीत्रासाठी राखून ठेवतो. सध्या माझ्यातील वाईट सवय, दुर्गुण क्रमांक तीन अधोरेखित करायला ईतके पुरेसे ठरावे.

लेख विस्कळीत झालाय खरा, पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे Happy

बस्स आपलाच,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर : 'रांडेचा' अशी, गोनीदांची 'पडघवली' वाचतांना तिथल्या स्त्रियांच्या तोंडी असलेली शिवी आठवते - कोल्हापुरी अन् ह्या शिवी मध्ये 'च' चमच्याचा आणि 'च' चपलेचा असा फरक आहे असं मी तरी समजतो.

>>>> पहिल्यांना मला मनापासून मी भोसरीत लहानाची मोठी झाले याचा अभिमान वाटला <<<< ये हूई ना बात.... (लिंबी असती तर तिने शिव्या द्यायच्या फारशा भानगडीत न पडता सरळ त्या कार्ट्याच्या कानाखाली जाळ काढला अस्ता... (कार्टा ही पण शिवीच ना? Wink ) )
असे कारण असल्यास घालता यायलाच हव्यात शिव्या. पुण्यात कुठे "शिव्यांचा क्लास" नाहीये का? कोकाटे फाड फाड इन्ग्लिश सारखा ? फाड फाड शिव्या? Proud

मला वाटतं शिव्यांचे अर्थ आर्काईव्ह करण्यात अर्थ नसावा. लवकरच मा. अ‍ॅडमिन इथे टाळे लावतील.

लिंबूजी,
कार्टा ही सुद्धा शिवी वाटते काही जणांना. माझा एक माझ्याच वयाचा मित्र मला तसे म्हणालेला. गंमत म्हणजे आम्ही दोघेही कोकणातलेच. त्यामुळे शिवी ही खरेच व्यक्तीसापेक्ष असते या वर माझा त्या दिवशी ठाम विश्वास बसला.

असो, मात्र आपल्या कानाखाली जाळ काढायच्या पोस्टने इथे एका वेगळ्याच वादाला तोंड फोडले आहे.

शिवागाळ जास्त वाईट की मारहाण जास्त वाईट?

मस्त लिहिलंयस Happy
मीसुद्धा सध्या शिव्या देण्यावर कंट्रोल करतेय Proud
यावरून आठवलं,
एकदा मी आणि माझी बहिण गार्डनवरून घरी परत येत होतो. आम्ही ज्या रस्त्यावरून घरी यायचो तिथे 2/3टपोरी मुलांचा एक ग्रुप नेहमी टवाळक्या करत उभा असायचा. तर त्यादिवशी त्यातल्या एकाने माझ्यावर अतिशय घाणेरडी कमेंट पास केली. झालं माझं टाळकं सटकलं. तशीच रागात मागे फिरले आणि भ च्या बाराखडीपासूनच सुरूवात केली आणि बहिण माझ्या पुढची. तिने तर सणसणीत जाळ काढला त्याच्या कानाखाली. तसे ते गडबडले आणि आजूबाजूला लोकं जमतायत पाहून पळ काढला.

हा हा .. मुलींनी शिव्या द्यायला सुरू केल्या की मुलांची नेहमीच जाम तंतरते Proud
आणि मग ते त्यांना वाया गेलेल्या मुली अन कॅरेक्टरलेस कसे ठरवता येईल यासाठी धडपडतात.. Happy

पर्सनली मला मुलींनी शिव्या देऊ नयेत असे वाटते. त्याहून त्यांच्यावर ती वेळ येऊ नये असे वाटते.

ऋ+1
पण भाऊ दिवस फिरलेत आता. घराजवळच इंग्रजी माध्यमीक शाळा आहे. येता जाता बघतो तर ८~१० च्या मुलीपण दर २ वाक्यामागे "भ"कार (मराठी + इंग्रजी ) राजरोसपणे देत असतात.
घोर कलियुग दुसरे काय?

चित्रपट कसा वाटला या धाग्यावरील खालील चर्चा या धाग्यावर हलवलेली आहे. कृपया नोंद घ्यावी.

मला प्लीज फोटोसह डिटेल मेल कराल का?
तसेच शाहरूखने ती कुठल्या चित्रपटात वा सीनमध्ये वापरलेली हा संदर्भ आणि ते सिद्ध करणारे फोटो वगैरे गरजेचे. डोण्ट माईण्ड, अश्या बाबतीत फसवेगिरी फार चालते. >>>>>>
मूळ प्रश्न होता >>>> शाखाचे भोकं पडलेले बनियन आणि चड्डी किती रूपयाला विकत घ्याल ?

मूळ प्रश्नात हे विकायला ऑनलाईन ठेवलेय असा कुठे उल्लेख आहे का ? प्रश्न सिंपल आहे. जर विकायला ठेवले तर कितीला घ्याल. ? यात सिद्ध करण्याचे आव्हान देणे, सीनमधे वापरल्याचे संदर्भ कुठून आले ? त्याने कदाचित जीम मधे वापरून घामाचा वास येतो म्हणून पण टाकून दिले असेल. किंवा गौरी खानने फरशी पुसायला पण वापरायला काढले असेल. असे असंबद्ध प्रश्न विचारून हा धागा का भरकटवता ठेवला आहे ?

मनापासून धन्यवाद शांत माणूस जे धागा वर आणलात
हल्ली असले काही लिहिणे होत नाही. पण जुने लेख वाचायला छान वाटते.
प्रतिसादही वाचून छान वाटले..

मनापासून आभार. छान वाटणार याची खात्री होतीच. या प्रतिसादामुळे स्फुरण आले.
तरी अन्य ठिकाणी चर्चा भरकटत असतील तर अशाच प्रकारे तुम्हाला छान वाटावे म्हणून जुने धागे वर आणत राहीनच, काळजी नसावी.
आगाऊ धन्यवाद.

सर १,२,३ नंतर एकदम ६?
४/५ मध्ये काय असेल याची जबरदस्त उत्सुकता आहे.
मारामारी असेल आणि उर्वरित काय पण?

४/५ मध्ये काय असेल याची जबरदस्त उत्सुकता आहे.
>>>>

माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या
https://www.maayboli.com/node/57095

माझ्या वाईट सवयी ५ - मारामारी
https://www.maayboli.com/node/57269

Pages