माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2015 - 12:28

शिवी म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संतापाच्या भावना व्यक्त करणारे शब्द ...
अशी काहीशी शिवीची व्याख्या ऐकली होती..
बस्स तिलाच खोटे ठरवायचो आम्ही..

जसं ठेच लागल्यावर पटकन तोंडातून अई निघते, जसे कोणी आपल्याला हाक मारल्यावर पटकन आपण ओ देतो, बस्स तसेच .. मित्राला हाक मारताना किंवा त्याच्या हाकेला ओ देताना पटकन तोंडातून शिवी निघायची. मित्रांमध्ये होणार्‍या संभाषणातील दर वाक्यामध्ये, दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यामध्ये, एखादी शिवी मोठ्या खुबीने कुठेतरी पेरलेली असायची. क्रिकेट खेळताना मात्र नेमके उलटे व्हायचे.. अर्रंरर म्हणजे शिव्यांशिवाय बोलायचो असे नाही, तर नुसत्या शिव्या, नुसत्या शिव्याच दिल्या जायच्या.. आणि त्या शिव्यांमध्येच काही शब्द मोठ्या खुबीने पेरून संवाद साधला जायचा.

यात कुठेही राग, संताप, समोरच्याबद्दल द्वेष या भावना दूरदूरपर्यंत नसायच्या. किंबहुना मैत्रीची लेवल या शिव्यांवरून ठरवली जायची. ना कोणी त्या शिव्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा, ना शोधायला जायचा. अर्थात, जेव्हा या वापरायला सुरुवात केली तेव्हा कैक शिव्यांचा अर्थही माहीत नव्हता.

तर या शिवीगाळ प्रकरणात मी साधारण दहाव्या वर्षी फॉर्मला आलो. ईयत्ता चौथी पास होत प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत सरकलो आणि तिथले वारे लागले म्हणू शकता. तिथे आम्ही पाचवी ग्रेडवाले ज्युनिअर आणि आम्हाला धंद्याला लावणारे सहावी ते दहावी सारेच सिनिअर. मी त्यांच्यातच जास्त रमायचो. कारण कुठलाही दुर्गुण समवयीन मित्रांच्या आधी उचलायचा गुण माझ्या अंगी मी बाणवला होता. त्यामुळे आमच्या वर्गात मी ‘गुरू’ आणि ‘महागुरू’ या दोन नावांनी ओळखलो जायचो. शिव्याच नाही तर लैंगिक शिक्षण (जे तेव्हा शालेय अभ्यासक्रमात मिळायचे नाही) मी मोठ्या मुलांकडून घेत माझ्या वयाच्या मुलांमध्ये वाटायचो. हे देखील या पदव्यांमागचे एक कारण होते. मग काय, या इमेजला जपायला भरमसाठ शिव्यांचा सर्रास अन सुलभतेने वापर करणे भागच होते. इथे सुलभता फार महत्वाची. कारण आव आणून शिव्या दिल्यासारखे मी कधीच केले नाही. त्या सहज यायच्या. अर्थात यामागे आमच्या बिल्डींगमधील वातावरणाचाही हात होताच.

वासरात लंगडी गाय शहाणी आणि काशीबाईंपेक्षा देखणी मस्तानी. या न्यायाने मी बिल्डींगमधील एक, किंबहुना एकमेव हुशार मुलगा म्हणून गणला जायचो. जो मुलगा हुशार आहे तो वाया गेलेला नाही या समीकरणानुसार सभ्य मुलगा म्हणूनही ओळखला जायचो. ‘रुनम्या सोबत आहे’ म्हणत माझे नाव घेतल्यास एखाद्याला घरून पिकनिकसाठी परवानगी मिळावी या पठडीतली माझी इमेज होती. आणि ती तशी परवानगी खरोखरच मिळायची म्हणून माझे मित्रही माझी ती फेक इमेज आपापल्या घरी जपायचे. यामागे आमच्या घरचे वातावरणही कारणीभूत होतेच. मी कसाही असलो तरी आमचे घर संस्कारी होते आणि ते बिल्डींगमध्ये सर्वांना माहीत होते.

तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.

पण एक अपवादात्मक किस्सा मात्र आहे जो कायम आठवणीत कोरला गेलाय ..

शाळेतील गोष्ट आहे. दहावीच्या वर्षाची. शारीरीक शिक्षणाचा तास चालू होता. वर्गातल्या वर्गात उंच उडीची परीक्षा चालू होती. एकेक जण हातात खडू घेत भिंतीजवळ जात उंच उडी मारायचा, हातातल्या खडूने निशाण बनवायचा आणि मग त्या आधारे उडी मोजली जायची. माझी उडी मारून झाली होती. ईतरांच्या थोड्याफार बघितल्या आणि मग त्यातील रस संपला तसे मी आपल्याच विचारांत रमलो. ईतक्यात वर्गात अचानक गोंगाट सुरू झाला. कोणीतरी अफाट उंच उडी मारली होती. मी माझ्या तंद्रीतून खडबडून जागे होत चौकशी केली तसे सुशांतने अमुक तमुक उंचीची उडी मारली असे समजले. आकडा खरेच खतरनाक होता. त्यामुळे अबब असे उद्गारवाचक शब्द तोंडातून निघतात तश्या अर्थाची एक शिवी बाहेर पडली. गंमत म्हणजे माझ्या दुर्दैवाने तेव्हाच अचानक सारा वर्ग शांत झाला. माझी शिवी वर्गात खणखणीतपणे दुमदुमली. आणि पुन्हा एकदा शांत झालेल्या वर्गात हास्याचे स्फोट गडगडले. पुढच्याच बाकावर बसलेलो असल्याने बाईंच्या कानापर्यंत नक्कीच ही शिवी पोहोचली असणारच. पण त्यांनी तसे न दाखवता, मुलांनाच प्रतिप्रश्न केला की काय म्हणाला हा रुनम्या. अर्थात कोणी सांगितले नाहीच. बाईंनीही न ताणता मला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले. याचा एकच फायदा झाला, तो म्हणजे पुढील उंच उडीचा कार्यक्रम मला मान फारशी वरखाली न करता बघता आला.

तर आजही शाळाकॉलेजमधील ज्या अवली कारनाम्यांसाठी मी मित्रांना आठवतो, त्या आठवणीत हा किस्साही जोडला गेला.

शिव्यांमध्ये मातृभाषा फार महत्व राखून असते. मलाही मराठीतच जमायच्या. राष्ट्रभाषेतील शिव्यांमध्ये ती मजा नाही यायची. ईंग्लिश तर कधी जमल्याच नाहीत. नाही म्हणायला ईंग्रजी आद्याक्षर एफ पासून सूरू होणारा दोन अक्षरी शब्द मध्यंतरी तोंडात बसला होता. उगाच शायनिंग मारल्यासारखे वापरायचो. एकदोनदा गर्लफ्रेंडसमोर वापरला आणि तिनेही थोबडावून तो सोडवला.

या शिवीगाळीचा जो काही थोडाबहुत अहंकार मनी वसला होता तो हॉस्टेलमधील काही उडाणटप्पू उत्तरभारतीय मुलांसमोर गळाला. आपल्याकडे व्याकरणाचे संस्कार पाळत संधी समास करत शिव्या दिल्या जातात. ज्यांचा थेट अर्थ पोहोचत नाही, पोहोचलाच तरी भिडत नाही. त्यांच्या शिव्या मात्र फोड केलेल्या असायच्या. ज्या ऐकायलाही किळसवाण्या वाटायच्या. देणे तर दूरची गोष्ट.
असो, तर त्यांच्याशी मी कॉम्पिटीशन करायला गेलो नाही हे एक चांगलेच झाले.

आज माझ्या गर्लफ्रेंडला किंवा ऑफिसमधील कलीग्जना मी सांगतो की मी असा आहे वा असा होतो. शिव्यांचे नुसते अर्थच माहीती आहेत असे नसून सफाईतपणे शिवीगाळही करू शकतो. तर त्यांना हे खोटे वाटते. पण मग त्यांचा विश्वास बसावा म्हणून दोनचार सॅंपल शिव्या देण्याचा मोह मी देखील आवरतो.
कारण आज त्या शिव्या खटकतात. शिव्यांच्या या बाजारात आईबहिणींचा उद्धार केला जातो हे खटकते. कारण आज त्या सवयीने सहज येत नसल्याने त्या तोंडात यायच्या आधी त्यांचा अर्थ डोक्यात येतो आणि मग शब्द अडखळतात.

पण या उद्धारावरून आठवले. तीर्थरूपांचा उद्धार करण्याचीही एक पद्धत होती. दहापैकी चार जणांना तरी चिडवायचे नाव म्हणून त्याच्या वडीलांचे नाव असायचे. त्यातही कोणाच्या वडीलांचे नाव शंकर, दिगंबर, पांडुरंग असे धार्मिक असेल तर हमखास त्याच नावाने हाक मारली जायची. लॉजिक शोधायला जाऊ नका पण असे व्हायचे. यातही सोयीनुसार दिगंबरचे दिग्या आणि पांडुरंगचे फक्त पांडू व्हायचे. ज्या कोणाच्या वडीलांचे नाव प्रकाश असेल त्याला तर आयुष्यभरासाठी पक्या हे टोपणनावच पडायचे. माझ्या शाळा, कॉलेज आणि बिल्डींगमधील तीन विविध ग्रूप्समध्ये असे तीन पक्या होते. आणि मी त्यांना पक्या सोडून आजवर कुठलीही दुसरी हाक मारली नाही. याचाही एक किस्सा आहे. विषय निघालाच आहे तर सांगतो,

कॉलेजात असतानाची गोष्ट. सिनेमाचा की अभ्यासाचा प्लान बनत होता. फोनाफोनी चालू होती. सगळ्यांकडेच मोबाईल नसायचा. कोणाचा असला तरी लागेलच याची खात्री नव्हती. तर पक्या म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या एका मित्राचा मोबाईल लागत नव्हता. त्याच्या घरचा नंबर होता म्हणून मी लॅण्डलाईन फिरवला. समोरून त्याच्या आईने फोन उचलला. मी सवयीनेच उच्चारलो, "पक्या आहे का?.."
ती माऊली थोडावेळ गोंधळली. मग म्हणाली, नाही ते आता ऑफिसला गेलेत. आपण कोण? मी फोन कट!

किस्से बाय किस्से आठवले तर बरेच निघतील, पण तुर्तास एवढेच .. कारण सध्या संस्कारक्षम लोकांमध्ये वावरतोय, फार काही लिहिल्यास हा फेकतोय असा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळे ते किस्से माझ्या आत्मचरीत्रासाठी राखून ठेवतो. सध्या माझ्यातील वाईट सवय, दुर्गुण क्रमांक तीन अधोरेखित करायला ईतके पुरेसे ठरावे.

लेख विस्कळीत झालाय खरा, पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे Happy

बस्स आपलाच,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Swatavar kiva lekhavar sanskar karaychya bhangadit padla nahis te thik ahe.

Atachi girl frnd kiva jichyashi lagn karshil n mul jnmala ghalshil tevha tyachyavar matr changle sanskar hotil asa bagh.....nahitar chori, shivigal n tisra pan ajun kaslya vyasanacha dhaga ahe tyat to maahir hoil

ऋन्मेष, छान लिहीलंयस!
तू लिहून दाखवतोयस, इथे असे कित्येक जण असतील जे असे वागूनही वागल्याचे कबूल करणार नाहीत.
आय्याम प्राऊड ऑफ यू!

छान....

मी पुण्याला होस्टेलवर असताना माझा मित्र म्हणजे शिव्यान्ची बॅन्क होती.... कुठलिही शिवी तो दुसर्‍यान्दा न वापरता नॉन स्टॉप काही मिनीटात अनेक अनेक शिव्या देण्याचे कसब बाळगुन होता... रेकॉर्ड होते.

पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे >>

या वाक्यांसाठी तुला दहा गावे इनाम!
Happy

ऋन्मेष, खूप आवडला हा लेख ही.. सहज्,सरळ शब्दात ,मनापासून उतरलेला..

शेवटच्या दोन वाक्यांकरता तुझं कौतुक करावं तितकं कमीये.. बीइंग ऑनेस्ट टू युअरसेल्फ.. हाच तुझा मोठा गुण आहे..

माझ्यामते ऋन्मेषची कल्पनाशक्ती अफाट आहे. एक विषय पकडून त्यावर स्टोरी बनवायची आणि हेच खरं आहे असं लोकांच्या मनात ठसवायचं. खायचं काम नाही.

खायचं काम नाही.
<<
काय सांगताय!
अहो डब्यात डुक्कर आणून खातो तो. तेवढंच नाही तर सोमवार गुरुवारही डब्यात! Wink

स्वतःपुरते वापरल्यास शिव्यांचे उपयोगही बरेच आहेत. बिग्गेस्ट स्ट्रेसबस्टर आहे तो . माझी एक डॉ. मैत्रीण तिच्या मुलांबरोबर शिव्यांच्या भेंड्यासुद्धा खेळते. Happy

असो. एक किस्सा -
माझ्या नवर्‍याला गाडी चालवताना कचकचीत शिव्या देत गाडी चालवायची सवय होती. दोघेच होतो तोवर ठीक होते. पण मग काही वर्षांनंतर आमच्या संसारवेलीवरचे फूल मोटरसायकलच्या पुढच्या टाकीवर बसून आमच्याबरोबर हिंडू-फिरू लागले तेव्हा मी खूप प्रयत्न करून नवर्‍याला शिव्याविरहित गाडी चालवण्याची ताकीद दिली. तर..एक दिवस...समोरून एक माणूस झू..म करून आला..कट मारून गेला. नवर्‍याने मनावर ताबा ठेवला....एक ते दहा आकडे मोजले......राग शांत केला......तेवढ्यात गाडीवरचे बोबडे बालक म्हणाले... तो माणूस ** होता नारे बाबा?

वरचा किस्सा माझ्या बरोबरही घडलाय. आमचं फूल, कळी अवस्थेत असल्या पासून गाडी चालवताना (आणि एकंदरच) 'मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक' पॉलिसी अवलंबली आहे. पण सवय जात नसल्याने आता शिवीगाळ करता येत नाही, शिव्याच गाळून द्यायला लागतात. तरीही "बाबा, नरसाळ्या, रताळ्या म्हणजे काय ?" असले प्रश्न येतात ( ते ही जिथे असे प्रश्न येऊ नये तिथे च !) Happy

ऋ, हे बाकी झ्याक आणि खरंखुरं लिवलेलं वाटतय. छान लिहिलस.
ऐसे (शिव्या देनेकी - सुननेकी) फेजसे तो हम्भी गुजरे है Happy
च्यायला, साल्या, च्यामारी तर आता पण सहज येतात. ह्या शिव्या आहेत हे देखील मनात येत नाही.

स्वतःपुरते वापरल्यास शिव्यांचे उपयोगही बरेच आहेत. बिग्गेस्ट स्ट्रेसबस्टर आहे तो >> अनुमोदन. मी वापर्तो हे , पण मनातच.

आमची शिव्यांमधे पीएचडी झालेली आहे. गरज पडल्यावर शिव्यांचे कावड निसंकोचपणे उघडे करावे.
ज्ञान वाटल्याने वाढते त्याला असे कुलुपाबंद ठेवू नये Wink

अवांतर, आमच्या गल्लीत क्रिकेट खेळणारी मोठी मुले(?) शिवीगाळ,आरडाओरड करत खेळायची.प्रथम वैताग यायचा.कॅच पकड रे अमुक तमुक ऐवजी कॅच घे ********. तोही माणूस आपले नावच ******* असल्यासारखा ऐकायचा,त्याचे हसू यायचे.

मस्त लिहिलंय ऋन्म्या!

खरंच भेंडी-गवारी पासून सुरू झालेले शिव्यांचे शिक्षणाने बघता बघता भची बाराखडी कधी आत्मसात केली ते कळले सुध्दा नाही.

शिव्याशाप द्यायला लागणे, द्यावेसे वाटणे व प्रत्यक्षात देणे, हे कमकुवत मनाचे लक्षण आहे. स्वतःच्या मनाच्या राग, उद्वेग, द्वेष, भिती या भावनांवर जराही काबु नसण्याचे लक्षण आहे.
लहानपणी शिव्यांच्या माध्यमातुन अंगभूत आक्रस्ताळेपणा व्यक्त होण्याने तितके बिघडत नाही असे वाटत असले तरी याची सवय, नुसते शिव्या देण्याची नव्हे, तर शिव्यांमागच्या आक्रस्ताळेपणाची सवय कायम राहून पुढे ती वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर वावरताना महा धोक्याची ठरु शकते. इतकेच काय, ऑफिसमधिल सहकारी/बॉस/हाताखालचे यांचेबाबतही अडचणीचे ठरते.
शिव्या देणे हे "मानसिक उद्रेकास" वाट मिळवुन देण्याचे साधन वाटले तरी दरवेळेस ते तसे असतेच असे नाही. तर दुसर्‍यास उचकविणे, दुसर्‍यास अपमानित करणे, दुसर्‍यास किळस्/घाण वाटेल अशा विविध उद्देशानेही शिव्या दिल्या जातात. एकदा का ही प्रवृत्ती अंगी भिनली की मग समोर कोण आहे याचे भान राहू शकत नाही.
शिव्या देण्याची सवय ही दारुच्या व्यसनाइतकीच घातक आहे असे माझे मत.

लेख नेहमीप्रमाणे ( आता नेहमीप्रमाणे म्हणजे कसा ते स्वतःच ठरवा )

पण "काशीबाईंपेक्षा देखणी मस्तानी" ही कॉमेंट अनावश्यक आणि अस्थानी वाटली.

लिंटिं शी सहमत आहे
चुडीवाले बाबा ही बहुतेक प्रेमचंद ची हिंदीच्या पुस्तकातील धडा आठवला. शिव्या तोंडवळणी पडू नयेत म्हणून गाढवाशी प्रेमाने बोलणारा चुडीवाले बाबा.

रुनम्या,
आपण लxड्या हि शिवी एकमेकांना अगदी येता-जाता देतो.
पण दोनच दिवसांपूर्वी एका मुलीने दुसऱ्या मुलीला लxडी हि शिवी दिली.
फलाटावरच्या सगळ्या प्रवाशांना हसू आवरत नव्हत. Rofl

लिंबूकाका
__/\__

छान लिहलयं

पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे >>

या वाक्यांसाठी तुला दहा गावे इनाम!
स्मित
+ १११११

Pages