सोमवार आणि मंगळवार आला की संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर लवकर जेवण आणि कामे उरकण्याची लगबग चालू होते. कारण ह्या दोन दिवसांत आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील अख्ख्या कुटुंबाची हास्य विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हॉलमधील टीव्ही समोर बैठक बसणार असते. घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकत्रित बैठक जुळवून देणारा कार्यक्रम म्हणजे झी टीव्ही वर ९.३० ते १०.३० ला लागणारा चला हवा येऊद्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम. तसं टीव्ही वर माझ्या मुली श्रावणी, राधा आणि पुतण्या अभिषेक यांच राज्य असत व ते आपल्या वयानुसार लागणारे कार्यक्रम पाहत असतात. पण चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमासाठी मात्र ते आम्हाला टीव्हीचे राज्य एक तासासाठी घरातील सगळ्यांसाठी खुले करून सगळ्यांना सामावून घेतात. ह्या कार्यक्रमाचा आस्वाद एकत्रपणे घेतल्याने ह्या कार्यक्रमाबद्दल मनात आपुलकीचे व मानाचे स्थान निर्माण झाले आहे.
तसं झी मराठी म्हणजे मनोरंजनाचा एक उत्तम खजिना आहे. ह्या खजिन्यातील सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे चला हवा येऊद्या ही मालिका. आठवड्यातील दोनच दिवस लागणारी ही मालिका आठवडाभरच मनोरंजन प्रेक्षकांच्या पोतडीत भरून देते. ह्या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांच्यातील मौल्यवान कलेच जीव ओतून सादरीकरण करत असतात. प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करून आम्हा प्रेक्षकांचा दिवसभराचा थकवा, ताण-तणाव दूर करण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे. ह्या मालिकेचे सूत्रधार निलेश साबळे हे डॉ. असल्याने ते प्रेक्षकांच्या नसा ओळखून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाचे हास्यमय डोसच देत असतात. डॉ. निलेश साबळे यांना प्रसंगावधानाने कलाकार, येणारे मान्यवर व प्रेक्षक यांच्यात समांतर दुवा साधण्याची सूत्रसंचालनाची कला अवगत आहे त्यामुळे कार्यक्रमात कुठेही विचका होताना दिसत नाही तर कार्यक्रम अजून हवा हवासा वाटतो. सूत्रसंचालना बरोबरच त्यांचा कार्यक्रमातील एखाद्या नकलेचा अभिनय हा कार्यक्रमाचा बोनस मनोरंजन ठरतो. लेखन, सादरीकरण, सूत्रसंचालन तसेच अशा हुबेहूब नकला करणे ही तर दैवी देणगीच म्हणावी लागेल.
चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराकडे उत्तम विनोद करण्याची कला आहे. ह्या कलाकारांच्या टीम मध्ये श्रेया बुगडे ही एकटीच स्त्री कलाकार असून तिचा स्टेज वरील वावर आणि अभिनय इतका बिनधास्त असतो की त्या बिनधास्तपणातून तिचा अभिनय जास्त खुलतो. तिची एंट्री म्हणजे चला हवा येऊद्याच वादळच जणू. तिच्या बोलक्या नजरेतही अभिनय ठासून भरला आहे.
चला हवा येऊद्याच मुख्य नायक म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम ही व्यक्ती स्टेजवर उभी राहिली तरी प्रेक्षकांना हसू येत. भाऊचे सगळ्याच पात्रातील अभिनय अगदी सहज आणि नैसर्गिक असतात. कुठेही दुसर्याने हसावं म्हणून ओढाताण नसते. त्यामुळे त्याने केलेल्या विनोदांवर लोक मनापासून पोटभरूनं हसतात. भाऊचा शांताबाई बनून केलेला अभिनय हा दाद देण्यासारखा आहे.माझी पाच वर्षाची मुलगी राधाही भाऊ कदमला नावाने ओळखते व कुठेही भाऊ हे नाव घेतलं की ती पुढे कदम लावते इतका आमच्या घरात चला हवा येऊद्याच पगडा बसला आहे.
भारत गणेशपुरे ह्या कलाकाराची विदर्भातील बोली ही विनोदा बरोबर भाषेतील गोडी निर्माण करते. थुकरटवाडीतील सरपंच, दारूड्या ह्या त्यांच्या भूमिका सगळ्यांनाच आवडतात. किर्तनाद्वारे सामाज जागृती करण्याची कलाही ह्या कलाकारामध्ये आहे.
सागर कारंडे हा कलाकारही अष्टपैलू आहे. त्याच्या विविध अभिनयांतून तो प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, मग तो पोस्टमन काकातील भावनिक अभिनय म्हणा, साडीमधील विनोदी स्त्री अभिनय म्हणा की नाना पाटेकरांची नक्कल म्हणा. अनेकदा तो आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना पोटभर हसवून पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे डोळे पाणावतो. त्याने केलेली मिलिंद गुणाजीची नक्कल अप्रतिम होती.
कुशल बद्रीकेची एंट्रीच हास्याचा लोट घेऊन येतो. त्याचा संपूर्ण अभिनय विनोदी असतो. त्याचे हाव-भाव, नकला, कुठल्याही वेषातील अभिनय निखळ विनोदी मनोरंजनाचा स्पोट असतो.
प्रत्येक कलाकाराकडे हसविण्याचे वेगवेगळे स्किल आहे. कोणाच्याही विनोदात अतिशयोक्ती नसते. स्त्री पात्र करणार्या पुरुषांचा अभिनय अगदी हुबेहूब असतो आणि विशेष म्हणजे त्यात इतर कार्यक्रमात दाखवतात तसा फाजीलपणा नसतो ह्या मालिकेतील साइड अॅक्टरही कधी कधी खूप हसवतात. त्यातील जाडा पिंकी आणि सरड्यासारखे केस असणारा पात्र हे तर मुलांचे आवडीचे झाले आहे. कार्यक्रमाला प्रसंगानुसार म्युझिक, आवाज देणार्या कलाकारांचे कौतुक वाटते. ह्या आवाजांमुळे, म्युझिक मुळेच अभिनय जास्त रंगतो. सगळ्यात जास्त कौतुक वाटत ते वेषभूषा करणार्या वेषभूषाकारांच. एखादं पात्र किती हुबेहूब नटवून देतात ते. ओळखावे लागतच नाही की हा कलाकार कोणाची नक्कल करणार आहे ते.
कार्यक्रमाची रूपरेखाही व्यवस्थित मांडलेली असते. येणारे चित्रपट व नाटके यांची टीम ह्या मालिकेत आणून त्यांची ओळख करून दिल्याने आम्हा प्रेक्षकांना येणार्या चित्रपटांची, नाटकांची व त्यातील कलाकारांची माहिती होते व त्या नाटक, जाहीरातही उत्तम पद्धतीने होते. झी वरीलच रोज घरात वावरणार्या मालिकांतील कलाकार जेव्हा आपल्या मालिकेच्या टीम सोबत येतात तेव्हा त्या भागात एक आपलेपणा जाणवतो आणि त्यांची मिमिक्री केली जाते तेव्हा निर्माण होणारा हास्यस्पोटस्फोट हा अवर्णनीय असतो. चला हवा येऊद्याचे विशेष भागही खरंच विशेष मनोरंजनात्मक असतात. कार्यक्रमात उभारलेली थुकरटवाडी नियमित दाखवत असले तरी तिचा कधीच कंटाळा येत नाही उलट ती कधी अवतरेल ह्याची वाट पाहिली जाते. येणार्या कलाकार पाहुण्यांना खेळ खेळवून त्यांचेही मनोरंजन केले जाते. ते स्टेजवर खेळत असतात पण चढाओढ प्रेक्षकांच्या मनातही होत असते.
ह्या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे स्टेज. प्रसंगाला धरून पाठी उभे केलेले सीन त्या प्रसंगाला एकरूप करण्यात स्टेजचा मोलाचा वाटा असतो. ह्या कार्यक्रमात उभारलेल्या सीन मुळे कार्यक्रमाला चेतना निर्माण होते. मग त्यात सैराट साठी उभारलेली विहीर असो, प्रेस कॉन्फ़रन्स साठी केलेली बैठक असो की इतर स्थळांचे सीन असोत ह्या मालिकेत जीव आणतात.
हा कार्यक्रम आवडण्यामागे अजून एक कारण म्हणजे ह्या कार्यक्रमाने जपलेली सामाजिक बांधिलकी. चांगले सामाजिक कार्य करणार्या संस्था व व्यक्तींना ह्या कार्यक्रमाने मदत, सन्मान देऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले आहे. ठुकरटवाडीत एकाच बुकेने केलेला पाहुणचार ह्यामागेही निसर्गाच्या घटकांची अनावश्यक लूट नसावी हाच असावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व्हाही ह्या उद्देशाने सर्व मान्यवरांना गिफ्ट म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी झाडांची रोपे दिली जातात. म्हणजे दर आठवड्याला कमीत कमी ७-८ झाडांची लागवड ह्या कार्यक्रमामार्फत होऊन हरीत क्रांती होण्यास मदत होत आहे चला हवा येऊद्या मध्ये कधीच राजकारण दिसले नाही. ह्या मालिकेमार्फत विविध सामाज घडवणूकीचे उपयुक्त संदेश दिले जातात.
आता वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर हा कार्यक्रम म्हणजे आजच्या युगातील आम्हा नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत त्रस्त असणार्यांसाठी एक वरदानच आहे. माझ्या मिस्टरांचा वकिली पेशा व समाज कार्य, माझी नोकरीची-घरातील धावपळ, जाऊबाईंच्या दिवसभराच्या घरातील जबाबदार्या, दिरांचे नोकरी, घरातील वडीलधार्यांच्या स्वास्थतेच्या चिंता, मुलांचे अभ्यासाचे दडपण ह्या पासून आम्हा लहान थोर सगळ्यांनाच चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमातून थोडा चेंज मिळून आमच्या मनावरचे ताणतणाव दूर होतात. ह्या टीम मुळे आम्ही मनापासून खळखळून हसतो व आमचे एक तासाचे निखळ मनोरंजन होते. ह्या एक तासामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो व आठवडाभरासाठी उत्साह निर्माण होतो. त्यामुळे चला हवा येऊद्याच्या पडद्यावरच्या व पडद्या मागच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार व हा कार्यक्रम इतक्याच दर्जेदारपणे पुढे चालू राहूदे ह्यासाठी मनापासून शुभेच्छा.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे.
भाऊ कदम अजिबात आवडत नाही.
भाऊ कदम अजिबात आवडत नाही. बाकी सगळे +111
चला हवा येऊद्या ह्या
चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमासाठी मात्र ते आम्हाला टीव्हीचे राज्य एक तासासाठी घरातील सगळ्यांसाठी खुले करून सगळ्यांना सामावून घेतात. >> +११
खरच खळखळुन हसवणारा हा
खरच खळखळुन हसवणारा हा कार्यक्रम.. प्रत्येक कलाकार त्याच्या जागी फिट्ट.. अन जे विनोद एखाद्या व्यक्तीवर केले तर त्या व्यक्तीचा आदर ठेवुनच विनोद केला जातो त्यामुळे कधिही हिनकसपणा वाटत नाहि अगदि निखळ विनोद असतात पोट धरुन हसवणारे... मी झी मराठी याच कार्यक्रमामुळे पाहु लागले.
भारत गणेशपुरे ला विसरलात;
भारत गणेशपुरे ला विसरलात; असेही विदर्भा तील लोक म्हणतात की त्यांच्यावर अन्याय होतो ते उगीच नाही. हलके घ्या.
हल्ली जरा कंटाळवाणा होऊ लागला होता कारण जाहिराती त्यासुध्दा डॉक्टर स्वत: करत असे आणि कित्येक वेळा काही प्रसंग ओढून ताणून जाहिरात करण्या करता घुसडलेले वाटायचे.
बापरे! कुणाचं मत इतकं १८०
बापरे! कुणाचं मत इतकं १८० डिग्रीज विरुद्ध असू शकतं ? इतका बोअर, रटाळ, हीणकस कार्यक्रम आहे तो!
सदैव स्त्री पात्रांचं हिडीस रुप घेऊन विनोदाचा केविलवाणा आणि अयशस्वी प्रयत्न करणारे भाऊ कदम व मंडळी, अति बोअर निलेश साबळे, बेकार स्क्रीप्टींग, सगळंच गंडलेलं....
बंद होतोय ते बरय.... पुन्हा येऊ नका म्हणा डोकं खायला....!!!
नरेन भारत गणेशपूरेवरचा
नरेन भारत गणेशपूरेवरचा अन्याय दूर केला आहे. काही काही प्रयोग होतात कधीतरी कंटाळवाणे पण सगळेच नसतात.
आंबट- गोड, प्रत्येकाची आवड वेगळी असते.
चला हवा येवू द्या आवडता
चला हवा येवू द्या आवडता कार्यक्रम आहे
काही काही प्रयोग होतात कधीतरी
काही काही प्रयोग होतात कधीतरी कंटाळवाणे पण सगळेच नसतात.>> +११
श्रीदेवी बरोबरचा भाग अप्रतिम होता.
छान लिहीले ! पण ह्या
छान लिहीले ! पण ह्या कार्यक्रमात कित्येक वेळा उसने हासु दाखवतात. ते ही वारंवार रिपीट करुन , सहभागी झालेल्या काही मान्यवरांचे तर कित्येक हासण्याचे शॉट रिपीट असत्तात. बघाच एकदा !
मला पण चला हवा येऊ द्या आवडतो
मला पण चला हवा येऊ द्या आवडतो. सगळेच कलाकार उत्तम आहेत, कधी कधी बोअर होतो नक्कीच.
नदी वाहते ची टिम आलेली तेव्हा इतका टाईमपास केला होता या लोकांनी तेव्हा रागच आला होता, पण बाकी खूप मजा येते पाहताना.
मुख्य म्हणजे याच प्रकारचा कपिल शर्मा शो सुद्धा मनोरंजक होता पण त्यात कपिल इतरांवर सतत पर्सनल कमेन्ट्स करायचा ते अजिबात आवडायचं नाही. आता तर कार्यक्रमच बंद पडला, तो ही अशाच काही कारणामुळे असं ऐकून आहे.
त्यान्ची स्त्री पात्र सोडली
त्यान्ची स्त्री पात्र सोडली तर बरेचसे कार्क्रम आवडतात .
भाउ कदम च्या स्त्री भूमिका आणि कुशल बद्रिकेची ती दात पुढे वाली बाई हिडीस वाटते .
सागर कारंडे , स्त्री भूमिका बर्यापैकी सहज निभावतो . साबळेंचा दिलिप प्रभावळ्कर धमाल आहे .
भारत मला सगळ्यात जास्त आवडतो आणि श्रेया तर अफलातून आहे.
काही काही स्कीट्स मस्तच असतात . खळखळून हसायला लावतात . .
काही अगदीच ओढून ताणून असतात .
बर्याचदा , स्कीट्स पहाण्यापेक्शा , कलाकारांची उत्स्फुर्तता बधून पाहूण्यांची रीअॅक्शन जास्त धमाल असते.
आणि तो टाईमपास चा डायरेक्टर
आणि तो टाईमपास चा डायरेक्टर कोण आहे? रवि जाधव ना?
तो आणि अजून एक चश्मा लावणारा साधारण त्या रवी जाधव सारखा दिसणारा, दोघेही मध्यंतरी सतत या कार्यक्रमात दिसायचे, त्यांना पाहून पण कंटाळा आला होता.
अजिबात आवडत नाही चहयेद्या.
अजिबात आवडत नाही चहयेद्या. सुरुवातीला बरा होता नंतर नंतर फार ओढुन ताणुन केलेले विनोद, पुरुष पात्रांनी साडी नेसुन येणं ह्या मुळे नकोसा झाला.
bollywood stars ना या मराठी कार्यक्रमात येऊन आपल्या सिनेमाची जाहिरात करावीशी वाटली हेच काय ते चांगलं.
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!https://goo.gl/ACUU7w
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!https://goo.gl/ACUU7w
सध्या इनोद म्हणजे पुरुषांनी
सध्या इनोद म्हणजे पुरुषांनी महिलांचे कपडे घालुन आचरट बोलत, वाटेल तो धिंगाना घालणे, आणि शारिरीक बाबींवर फाल्तु कॉमेंट मारणं, हेच समिकरण झालय.
हव येउद्या कधिच पाहिला नाही, बाकी कपील (मशहुर गुलाटी सोडला तर बाकी शो भिकारच होता), आणि आता त्याच्या जागेवर दुसरा काहितरी तसाच चालु झालय त्याचे काही एपिसोड पाहिले आणि राम राम ठोकला, त्यापेक्षा पुस्तक वाचणं चांगल वाटतं.
मराठी भाषेत विनोदी कार्यक्रम
मराठी भाषेत विनोदी कार्यक्रम फार क्वचित आवडले आहेत. हवा येउ द्या आवडतो. काही भाग अर्थातच आवडले नाहीत. पण चालाय्चच.
फक्त भाऊ कदम मुळे बघतो... भाऊ
फक्त भाऊ कदम मुळे बघतो... भाऊ रॉक्स..
भारत गणेश ला रिप्लेस केला पाहिजे कोणी, बोर करतो लय..
छान लिहलय. श्रेया बुगडे चं
छान लिहलय. श्रेया बुगडे चं विशेष कौतूक मिमिक्री पण भारी करते ती. ह्यातला आणखी एक बेस्ट पार्ट म्हणजे पोस्टमन काका. अरविंद जगताप यांनी बरेच विचार त्या पत्रलेखनातून मांडलेत.
कोण काय पण म्हणो, आम्हाला तर
कोण काय पण म्हणो, आम्हाला तर जाम आवडतो हा कार्यक्रम..कधीही मूड खराब झाला की नवे, रिपीट, बेस्ट सीन्स, वगैरे मिळेल ते बघुन काढतो. परत परत बघायलाही कंटाळा नाही येत. सर्वांचीच कामे खूप मस्त झाली आहेत. हे हसणं थांबणार असलं तरी पुन्हा नव्या रुपात लवकर यावे ही सदीच्छा! चला हवा येवू द्या!
छान लिहिलेय. बरेच मतांना +७८६
छान लिहिलेय. बरेच मतांना +७८६
काही भाग खळखळवून हसवतात तर काही बोअरही करतात. कदाचित अपेक्षाही जास्त असल्याने होत असावे, पण सातत्याने प्रत्येक भाग सरसच झाला पाहिजे हा अट्टाहास धरण्यातही अर्थ नाही. ओवरऑल चांगलाच आहे कार्यक्रम. विशेष म्हणजे प्रत्येकाची विनोदाची शैली वेगवेगळी आहे. तसेच फोकस एकावर अवलंबून नाही तर दरवेळी भाव खाऊन जाणारा बदलतो.
बाकी मला ती बाई खूप आवडते.
एकूणच मला विनोदी बायका खूप आवडतात.
मुळात त्या अश्या कार्यक्रमात अभावानेच आढळतात. बरेच बायका तर स्वत: जाडे असल्याचा फायदा उचलत त्यावरच विनोद करत तग धरतात. त्यापेक्षा यातली ती मुलगी बरेचदा छान कॅरेक्टर उचलते.
अवांतर - लोकहो जमल्यास या धाग्याच्या निमित्ताने तुम्हाला आवडलेल्या भागांच्या वा स्कीटच्या लिंक शेअर करा ईथे.
शाहरूख या कार्यक्रमात दोनदा
शाहरूख या कार्यक्रमात दोनदा आलाय. आमीर की सलमानही आलेला वाटते. बहुधा आणखीही काही हिंदी कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करायला आले आहेत. हे सांगायचा हेतू धाग्यात शाहरूख आणने नसून एवढाच की बॉलीवूडचे सुपर्रस्टार सुद्धा ईथे आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करायला हजेरी लावतात यावरून या मालिकेची लोकप्रियता आणि तयार झालेला ब्रांड समजतो. नुसते टेलिविजन रेटींगच नाही तर नंतर यूट्यूब हिटसही मिळत असावेत.
फक्त माझ्या अनुभवाप्रमाणे बॉलीवूडचे मोठे स्टार आले की हे लोकं जरा अवघडल्यासारखे वागतात, खुलून येत नाहीत असे वाटते.
अर्थातच... क्लायंट विसीट असली
अर्थातच... क्लायंट विसीट असली की ऑफशोर संकोचनार तसे आहे हे
आपल्या चित्रपटांचे प्रमोशन
आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करायला हजेरी लावतात यावरून या मालिकेची लोकप्रियता आणि तयार झालेला ब्रांड समजतो
ऋन्मेऽऽष >>>
अगदी सहमत... मराठी मध्ये आज पर्यंत अस कुठल्या मालिके मध्ये कोण आलय का?
मालिकेची लोकप्रियता नक्कीच आहे....
आणि तो टाईमपास चा डायरेक्टर कोण आहे? रवि जाधव ना?
तो आणि अजून एक चश्मा लावणारा साधारण त्या रवी जाधव सारखा दिसणारा, दोघेही मध्यंतरी सतत या कार्यक्रमात दिसायचे, त्यांना पाहून पण कंटाळा आला होता.
नवीन Submitted by दक्षिणा >>>>>>>>
रवि जाधव ... मराठी मध्ये उत्तम सिनेमे दिलेत त्याणे...टाईमपास तर पुर्ण करमणुक सिनेमा होता..
आणि आला बराच वेळ म्हणुन काय झाल....!!!
Natarang
Balgandharva
Balak-Palak
Timepass
Coffee Ani Barach Kahi
माझा पण आवडता शो...तसं प्लस
माझा पण आवडता शो...तसं प्लस मायनस सगळ्याच कार्यक्रमात होतंच तसं यातलेही काही पंचेस, बुटक्या माणसावरचे, दारूवरचे विनोद नाही आवडत. कधी कधी खूप हसू येतं, टायमिंग मस्त आहे सगळ्यांचे, श्रेया तर भारीच.
मी सुद्धा सध्या रेग्युलर बघत
मी सुद्धा सध्या रेग्युलर बघत नाही , पण काही वेळा चांगले पंचेस असतात. गेल्या आठवड्यात झालेला पांडू हवालदार वरच स्किट, संपूर्ण पणे कुशल बद्रिके ने उचलून धरलं होत.कुशल त्यात अशोक सराफ चा रोल करत होता. भाऊ कदम दादा कोंडके, भाऊ कदम रटाळ वाटत होता. श्रेया पण छान दिसत होती आणि छोटा डॉन ची पण acting सरस.
बॉलीवूड सेलेब्रिटी आले कि
बॉलीवूड सेलेब्रिटी आले कि अजीबात चांगलं होत नाही स्किट. उगीच त्या कलाकारांच्या चित्रपटा च विडंबन आणि ओढून ताणून जोक्स.
रवी जाधव चे सिनेमे ओव्हर
रवी जाधव चे सिनेमे ओव्हर हायीप असतात... बी पी आणि ती पी 2 अत्यंत फालतू दर्जा होते...
जागुडे अगदी सहमत. थोडिशी
जागुडे अगदी सहमत. थोडिशी अतीशयोक्ती सोडली तर मला जाम आवडतो हा कार्यक्रम. मी तर वाट पहातच असते याची. हिंदी - मराठी तल्या सासु सुना,लफडी, राजकारण, हिंसा याने ठासुन भरलेले कार्यक्रम पहाण्यापेक्षा थोडासा पांचट पणा केव्हाही बरा. असेल हिणकस पण घाटगे आणी सून, भैताड नवरा आणी त्याची लफडी, जयडी-मामी आणी भैय्या,, नंदिता आणी चंदा यात वेळ आणी डोके खपवण्या पेक्षा चला हवा येऊ द्या केव्हाही बरे.
इतका बोअर, रटाळ, हीणकस कार्यक्रम आहे तो!
सदैव स्त्री पात्रांचं हिडीस रुप घेऊन विनोदाचा केविलवाणा आणि अयशस्वी प्रयत्न करणारे भाऊ कदम व मंडळी, अति बोअर निलेश साबळे, बेकार स्क्रीप्टींग, सगळंच गंडलेलं....
बंद होतोय ते बरय.... पुन्हा येऊ नका म्हणा डोकं खायला....!!!>>>>>>>>>>>>>>> मी तर परत सुरु व्हायचीच वाट बघेन.
कार्यक्रम आवडण्यामागे अजून एक कारण म्हणजे ह्या कार्यक्रमाने जपलेली सामाजिक बांधिलकी. चांगले सामाजिक कार्य करणार्या संस्था व व्यक्तींना ह्या कार्यक्रमाने मदत, सन्मान देऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले आहे. ठुकरटवाडीत एकाच बुकेने केलेला पाहुणचार ह्यामागेही निसर्गाच्या घटकांची अनावश्यक लूट नसावी हाच असावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व्हाही ह्या उद्देशाने सर्व मान्यवरांना गिफ्ट म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी झाडांची रोपे दिली जातात. म्हणजे दर आठवड्याला कमीत कमी ७-८ झाडांची लागवड ह्या कार्यक्रमामार्फत होऊन हरीत क्रांती होण्यास मदत होत आहे चला हवा येऊद्या मध्ये कधीच राजकारण दिसले नाही. ह्या मालिकेमार्फत विविध सामाज घडवणूकीचे उपयुक्त संदेश दिले जातात.>>>>>>>>+१११११
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांच्या विविध मतांचे स्वागत.
Pages