सोमवार आणि मंगळवार आला की संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर लवकर जेवण आणि कामे उरकण्याची लगबग चालू होते. कारण ह्या दोन दिवसांत आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील अख्ख्या कुटुंबाची हास्य विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हॉलमधील टीव्ही समोर बैठक बसणार असते. घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकत्रित बैठक जुळवून देणारा कार्यक्रम म्हणजे झी टीव्ही वर ९.३० ते १०.३० ला लागणारा चला हवा येऊद्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम. तसं टीव्ही वर माझ्या मुली श्रावणी, राधा आणि पुतण्या अभिषेक यांच राज्य असत व ते आपल्या वयानुसार लागणारे कार्यक्रम पाहत असतात. पण चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमासाठी मात्र ते आम्हाला टीव्हीचे राज्य एक तासासाठी घरातील सगळ्यांसाठी खुले करून सगळ्यांना सामावून घेतात. ह्या कार्यक्रमाचा आस्वाद एकत्रपणे घेतल्याने ह्या कार्यक्रमाबद्दल मनात आपुलकीचे व मानाचे स्थान निर्माण झाले आहे.
तसं झी मराठी म्हणजे मनोरंजनाचा एक उत्तम खजिना आहे. ह्या खजिन्यातील सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे चला हवा येऊद्या ही मालिका. आठवड्यातील दोनच दिवस लागणारी ही मालिका आठवडाभरच मनोरंजन प्रेक्षकांच्या पोतडीत भरून देते. ह्या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांच्यातील मौल्यवान कलेच जीव ओतून सादरीकरण करत असतात. प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करून आम्हा प्रेक्षकांचा दिवसभराचा थकवा, ताण-तणाव दूर करण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे. ह्या मालिकेचे सूत्रधार निलेश साबळे हे डॉ. असल्याने ते प्रेक्षकांच्या नसा ओळखून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाचे हास्यमय डोसच देत असतात. डॉ. निलेश साबळे यांना प्रसंगावधानाने कलाकार, येणारे मान्यवर व प्रेक्षक यांच्यात समांतर दुवा साधण्याची सूत्रसंचालनाची कला अवगत आहे त्यामुळे कार्यक्रमात कुठेही विचका होताना दिसत नाही तर कार्यक्रम अजून हवा हवासा वाटतो. सूत्रसंचालना बरोबरच त्यांचा कार्यक्रमातील एखाद्या नकलेचा अभिनय हा कार्यक्रमाचा बोनस मनोरंजन ठरतो. लेखन, सादरीकरण, सूत्रसंचालन तसेच अशा हुबेहूब नकला करणे ही तर दैवी देणगीच म्हणावी लागेल.
चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराकडे उत्तम विनोद करण्याची कला आहे. ह्या कलाकारांच्या टीम मध्ये श्रेया बुगडे ही एकटीच स्त्री कलाकार असून तिचा स्टेज वरील वावर आणि अभिनय इतका बिनधास्त असतो की त्या बिनधास्तपणातून तिचा अभिनय जास्त खुलतो. तिची एंट्री म्हणजे चला हवा येऊद्याच वादळच जणू. तिच्या बोलक्या नजरेतही अभिनय ठासून भरला आहे.
चला हवा येऊद्याच मुख्य नायक म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम ही व्यक्ती स्टेजवर उभी राहिली तरी प्रेक्षकांना हसू येत. भाऊचे सगळ्याच पात्रातील अभिनय अगदी सहज आणि नैसर्गिक असतात. कुठेही दुसर्याने हसावं म्हणून ओढाताण नसते. त्यामुळे त्याने केलेल्या विनोदांवर लोक मनापासून पोटभरूनं हसतात. भाऊचा शांताबाई बनून केलेला अभिनय हा दाद देण्यासारखा आहे.माझी पाच वर्षाची मुलगी राधाही भाऊ कदमला नावाने ओळखते व कुठेही भाऊ हे नाव घेतलं की ती पुढे कदम लावते इतका आमच्या घरात चला हवा येऊद्याच पगडा बसला आहे.
भारत गणेशपुरे ह्या कलाकाराची विदर्भातील बोली ही विनोदा बरोबर भाषेतील गोडी निर्माण करते. थुकरटवाडीतील सरपंच, दारूड्या ह्या त्यांच्या भूमिका सगळ्यांनाच आवडतात. किर्तनाद्वारे सामाज जागृती करण्याची कलाही ह्या कलाकारामध्ये आहे.
सागर कारंडे हा कलाकारही अष्टपैलू आहे. त्याच्या विविध अभिनयांतून तो प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, मग तो पोस्टमन काकातील भावनिक अभिनय म्हणा, साडीमधील विनोदी स्त्री अभिनय म्हणा की नाना पाटेकरांची नक्कल म्हणा. अनेकदा तो आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना पोटभर हसवून पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे डोळे पाणावतो. त्याने केलेली मिलिंद गुणाजीची नक्कल अप्रतिम होती.
कुशल बद्रीकेची एंट्रीच हास्याचा लोट घेऊन येतो. त्याचा संपूर्ण अभिनय विनोदी असतो. त्याचे हाव-भाव, नकला, कुठल्याही वेषातील अभिनय निखळ विनोदी मनोरंजनाचा स्पोट असतो.
प्रत्येक कलाकाराकडे हसविण्याचे वेगवेगळे स्किल आहे. कोणाच्याही विनोदात अतिशयोक्ती नसते. स्त्री पात्र करणार्या पुरुषांचा अभिनय अगदी हुबेहूब असतो आणि विशेष म्हणजे त्यात इतर कार्यक्रमात दाखवतात तसा फाजीलपणा नसतो ह्या मालिकेतील साइड अॅक्टरही कधी कधी खूप हसवतात. त्यातील जाडा पिंकी आणि सरड्यासारखे केस असणारा पात्र हे तर मुलांचे आवडीचे झाले आहे. कार्यक्रमाला प्रसंगानुसार म्युझिक, आवाज देणार्या कलाकारांचे कौतुक वाटते. ह्या आवाजांमुळे, म्युझिक मुळेच अभिनय जास्त रंगतो. सगळ्यात जास्त कौतुक वाटत ते वेषभूषा करणार्या वेषभूषाकारांच. एखादं पात्र किती हुबेहूब नटवून देतात ते. ओळखावे लागतच नाही की हा कलाकार कोणाची नक्कल करणार आहे ते.
कार्यक्रमाची रूपरेखाही व्यवस्थित मांडलेली असते. येणारे चित्रपट व नाटके यांची टीम ह्या मालिकेत आणून त्यांची ओळख करून दिल्याने आम्हा प्रेक्षकांना येणार्या चित्रपटांची, नाटकांची व त्यातील कलाकारांची माहिती होते व त्या नाटक, जाहीरातही उत्तम पद्धतीने होते. झी वरीलच रोज घरात वावरणार्या मालिकांतील कलाकार जेव्हा आपल्या मालिकेच्या टीम सोबत येतात तेव्हा त्या भागात एक आपलेपणा जाणवतो आणि त्यांची मिमिक्री केली जाते तेव्हा निर्माण होणारा हास्यस्पोटस्फोट हा अवर्णनीय असतो. चला हवा येऊद्याचे विशेष भागही खरंच विशेष मनोरंजनात्मक असतात. कार्यक्रमात उभारलेली थुकरटवाडी नियमित दाखवत असले तरी तिचा कधीच कंटाळा येत नाही उलट ती कधी अवतरेल ह्याची वाट पाहिली जाते. येणार्या कलाकार पाहुण्यांना खेळ खेळवून त्यांचेही मनोरंजन केले जाते. ते स्टेजवर खेळत असतात पण चढाओढ प्रेक्षकांच्या मनातही होत असते.
ह्या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे स्टेज. प्रसंगाला धरून पाठी उभे केलेले सीन त्या प्रसंगाला एकरूप करण्यात स्टेजचा मोलाचा वाटा असतो. ह्या कार्यक्रमात उभारलेल्या सीन मुळे कार्यक्रमाला चेतना निर्माण होते. मग त्यात सैराट साठी उभारलेली विहीर असो, प्रेस कॉन्फ़रन्स साठी केलेली बैठक असो की इतर स्थळांचे सीन असोत ह्या मालिकेत जीव आणतात.
हा कार्यक्रम आवडण्यामागे अजून एक कारण म्हणजे ह्या कार्यक्रमाने जपलेली सामाजिक बांधिलकी. चांगले सामाजिक कार्य करणार्या संस्था व व्यक्तींना ह्या कार्यक्रमाने मदत, सन्मान देऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले आहे. ठुकरटवाडीत एकाच बुकेने केलेला पाहुणचार ह्यामागेही निसर्गाच्या घटकांची अनावश्यक लूट नसावी हाच असावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व्हाही ह्या उद्देशाने सर्व मान्यवरांना गिफ्ट म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी झाडांची रोपे दिली जातात. म्हणजे दर आठवड्याला कमीत कमी ७-८ झाडांची लागवड ह्या कार्यक्रमामार्फत होऊन हरीत क्रांती होण्यास मदत होत आहे चला हवा येऊद्या मध्ये कधीच राजकारण दिसले नाही. ह्या मालिकेमार्फत विविध सामाज घडवणूकीचे उपयुक्त संदेश दिले जातात.
आता वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर हा कार्यक्रम म्हणजे आजच्या युगातील आम्हा नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत त्रस्त असणार्यांसाठी एक वरदानच आहे. माझ्या मिस्टरांचा वकिली पेशा व समाज कार्य, माझी नोकरीची-घरातील धावपळ, जाऊबाईंच्या दिवसभराच्या घरातील जबाबदार्या, दिरांचे नोकरी, घरातील वडीलधार्यांच्या स्वास्थतेच्या चिंता, मुलांचे अभ्यासाचे दडपण ह्या पासून आम्हा लहान थोर सगळ्यांनाच चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमातून थोडा चेंज मिळून आमच्या मनावरचे ताणतणाव दूर होतात. ह्या टीम मुळे आम्ही मनापासून खळखळून हसतो व आमचे एक तासाचे निखळ मनोरंजन होते. ह्या एक तासामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो व आठवडाभरासाठी उत्साह निर्माण होतो. त्यामुळे चला हवा येऊद्याच्या पडद्यावरच्या व पडद्या मागच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार व हा कार्यक्रम इतक्याच दर्जेदारपणे पुढे चालू राहूदे ह्यासाठी मनापासून शुभेच्छा.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे.
भयाण आणि हिडीस कार्यक्रम.
भयाण आणि हिडीस कार्यक्रम.
उगाचच अति हसणारे लोकं
कसेबसे चार भाग पाहिले. असह्य झाले.
रवी जाधव चे सिनेमे ओव्हर
रवी जाधव चे सिनेमे ओव्हर हायीप असतात... बी पी आणि ती पी 2 अत्यंत फालतू दर्जा होते... >> च्र्प्स अनुमोदन.
बी पी आणि ती पी 2 अत्यंत
बी पी आणि ती पी 2 अत्यंत फालतू दर्जा होते..
>>>>>
या दोन्ही चित्रपटांना एका गटात बसवणे मजेशीर वाटले
जाउदे ऋन्मेऽऽष.... म्हणतात न.
जाउदे ऋन्मेऽऽष.... म्हणतात न....
नाअवडतीच मीठ सुध्दा आळणी....!!
आता कुणी बघत का हा कार्यक्रम.
आता कुणी बघत का हा कार्यक्रम..
कधी बंद झाला आणि पुन्हा केव्हा सुरू झाला ते नाही माहित.. पण अधून मधून यु ट्युब वर हया कार्यक्रमाचे कॉमेडी सीन पहात असते..randomly..
मी हल्लीच २०० नाबाद सेलिब्रेशन आणि वराड निघाले अमेरिकेला..चे काही भाग पाहिले.. आवडले..
तसेच पहाटेच्या शपथ विधी चा
तसेच पहाटेच्या शपथ विधी चा यांनी सादर केलेला भाग पाहिला.. मस्त जमला आहे.
निलेश साबळे ने केलेला अजित दादा आणि राज ठाकरे तर.. मस्तच..!
हास्य जत्रा छान असते हल्ली
हास्य जत्रा छान असते हल्ली असे ऐकलेय.
म्हणजे मी सुद्धा फेसबूकवर काही क्लिप्स बघतो हास्य जत्रेच्या ते छान वाटते.
हवा येऊ द्या बरेच वर्षे पाहिला नाही. चालू आहे का अजून?
सध्या दर्जा खुप खालवला आहे.
सध्या दर्जा खुप खालवला आहे. अगदी बेकार म्हणायला हरकत नाही.
हो असेच ऐकलेय.
हो असेच ऐकलेय.
पण का ते?
कलाकार आणि लेखक बदलले आहेत का?
की आहे त्यांनाच आता काही नवे देता येत नाहीये?
सागर नाही आता. आणि उथळ पाणचट
सागर नाही आता. आणि उथळ पाणचट विनोद झालेत.
आत त्यांनी ब्रेक घ्यावा
प्रकाश तरडे यास ओढून ताणून
प्रकाश तरडे यास ओढून ताणून आणणे, फक्त झी सिनेमा आणि मालिका यांवरच विनोद असतात. त्यांचे संदर्भ माहिती नसले तर विनोद समजत नाहीत.
रटाळ कार्यक्रम आणि हसण्यासाठी ठेवलेले महागुरू.
2017 चा लेख आहे. तेंव्हा छान
2017 चा लेख आहे. तेंव्हा छान वाटायचा हा कार्यक्रम. आता दोनेक वर्ष झाले नाही पहात. खूप रटाळ झाला आणि एकच हास्य एडिटिंग ला 5-6 ठिकाणी वापरलेले लगेच कळते...म्हणजे हसायचे नाही किंवा अरे ह्यात काय विनोद आहे अशा ठिकाणी पण आलेल्या पाहुण्यांनी हसणे शक्यच नाही तिथे पण तेच टाकतात.
अर्थातच खऱ्या एपिसोड मध्ये ते हसलेले नसतात. नाहीतर 5-6 वेळा अगदी तंतोतंत कसे काय हसू शकतात? म्हणजे पाहुण्याचा टेक च्या सुरुवातीला केसांकडे हात जातो आणि हसत हसत एका विशिष्ट अँगलने सोफ्यावर बाजूला पाहुणा पडतो
-- हे कर म्हटलं तरी रिपीट नाही करता येणार.
नंतर त्यांनी meme वर एक भाग केला...पूर्ण आपटला.
त्यात advertising चा भडिमार (ब्रेक मध्ये नाही तर एपिसोड मध्ये पण)
एकूणच डाळ कमी पाणी जास्त झाला हा कार्यक्रम.
हास्यजत्रा बरा वाटतो/ वाटायचा (सध्या ब्रेक वर आहेत ते)
शेवटच्या स्किटला पाहुणे थांबत
शेवटच्या स्किटला पाहुणे थांबत नसावेत असे वाटते. शेवटी सध्या लहान मुलांचा भाग किंवा काही स्पर्धा किंवा छोटे चुटकुले असतात. स्वतःचे प्रमोशन झाले की पाहुणे निघून जातात. मग आधीचे हसण्याचे तुकडे चिकटवतात. भाऊ कदमला जास्त महत्व दिले जाते असे वाटते. कधी चांगला तर कधी रटाळ असतो पण मराठीत असा कार्यक्रम नाही हे खरे. अर्थात तिथेही जे आधीच वट राखून आहेत त्यांनाच संधी मिळत असेल जास्त प्रमोशन करण्याची असे वाटते. संजय जाधव आणि सिद्धार्थ जाधव उगाच नाही परत परत येत. सगळ्यांना समान संधी मिळते की नाही माहित नाही.
आमच्या बिल्डरने एक चित्रपट
आमच्या बिल्डरने एक चित्रपट बनवला होता (निर्माता होता तो)
त्यांना विचारले होत की या कार्यक्रमात प्रमोशन करण्याचा प्रयत्न का करत नाही, तर त्यांनी सांगितलं की जरा जास्तच पैसे मागितले सहभागी करून घ्यायला.
(त्यांच्या बजेटनुसार)
मग तर नाटकवाले काहीच पैसे देत
मग तर नाटकवाले काहीच पैसे देत नसतील कारण नाटकं आधीच तोट्यात चालतात. नवीन लोकांकडून पैसे घेत असतील. जर सगळ्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर चहयेद्यामध्ये दाखवणार काय, स्वजोचे येडगळ हसणे?
तसेच पहाटेच्या शपथ विधी चा
तसेच पहाटेच्या शपथ विधी चा यांनी सादर केलेला भाग पाहिला.. मस्त जमला आहे. >> हो तो एपिसोड फार धमाल जमला होता. अगदी अमेरिकन टीव्हीवर जसे स्किट्स होतात तितक्या चांगल्या दर्जाचे राजकीय विडंबन होते ते. असे फार कमी आहेत आपल्याकडे. काही काही विनोद इतके चपखल जमले आहेत की उपस्थित सेलिब्रिटीज सुद्धा रेकॉर्डेड शो मधे आपण यावर हसून दाद द्यावी की नाही या विचारात असल्यासारखे दिसतात.
त्यातील विविध लोकांच्या हालचाली आता नंतर बदलेल्या स्थितीमधे आणखीनच मजेदार वाटतात. "काका बारामतीकर" चे काम केलेल्या कलाकाराने फार अफलातून काम केले आहे. पुतण्याला "कोठेही जा, पण सांगून जा" म्हणतात ते तेव्हाही विनोदी वाटले होते पण आता तर जास्तच वाटते
https://www.youtube.com/watch?v=75xbBPUGyvc
काका बारामतीकर >>> दीपक
काका बारामतीकर >>> दीपक देशपांडे, झी मराठी वरील हास्यसम्राट चे विजेते
ते politician ची मिमिक्री फॉर छान करतात पण
काका बारामतीकर त्यांचा usp आहे
आमचा सर्वात आवडता भाग :- '
आमचा सर्वात आवडता भाग :- ' कट्यार काळजात घुसली' या सिनेमाचे केलेले विडंबन आणि ते जेव्हा जेव्हा अगदी काल पहिले असले व आज पुन्हा दाखवले तरीही तेवढेच हसतो। एका अवॉर्ड शो मध्ये त्यांनी सादर केला होता त्यात सयाजी शिंदे, नाना पाटेकर व शंकर महादेवन एवढे खळखळून हसत होते कि त्यांना बघून आपल्याला हि हसू येते। स्पेशली त्यात निलेश ने म्हागृनची केलेली एक्टिंग मस्तच।
भयाण आणि हिडीस कार्यक्रम.
भयाण आणि हिडीस कार्यक्रम.
उगाचच अति हसणारे लोकं>>> अगदीच. दर्जा प्रचंड खालावलाय.
हास्य जत्रा एनीटाईम बेटर.
चला हवा येऊ द्या फार काळ बघवत
चला हवा येऊ द्या फार काळ बघवत नाही. फारफार तर १० मिनिटं पाहू शकेन. भाऊ कदमच्या नशिबात हल्ली कायमस्वरुपी साडीच आलेली दिसते.
हास्यजत्रा पर्सनली ह्यापेक्षा बरं वाटतं खूपच. पण तेही समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार सोडून. हल्लीची नवीन तरुण मंडळी खूपच टॅलेंटेड आहेत.
विशाखा सुभेदार गेली ना सोडून?
विशाखा सुभेदार गेली ना सोडून?
हो, नवे लोक सही आहेत.
हो ती गेल्या वर्षी सोडून गेली
हो ती गेल्या वर्षी सोडून गेली. बरं झालं. तिचे आणि समीरचे स्किट्स आचरट असायचे विनोदीपेक्षा. तिने त्याची मुल॑खत घेणं वगैरे सगळं तेच तेच. शिळे विनोद. पण सगळ्यांना कौतुक तर तोंड फाटेस्तोवर करावं लागायचं.
दीपक देशपांडे, झी मराठी वरील
दीपक देशपांडे, झी मराठी वरील हास्यसम्राट चे विजेते >>> थँक्स आबा.
कट्यारवरचा एक भाग मी पाहिला होता - सुबोध भावे आणि शंकर महादेवन आले होते. नाना आणि सयाजी त्या भागात आठवत नाहीत. तो मी पाहिलेला कट्यारचा भागही धमाल होता. भाऊ कदम त्यात पेटी तबल्यासारखी का मृदुंगासारखी वाजवायची अॅक्शन करतो. तेव्हा त्याला हे लोक विचारतात की हे काय करतोय? तर तो म्हणतो मी नेहमी अशीच वाजवतो. मग त्याला सांगतात "आजच्या दिवस अशी (पेटी वाजवण्याची अॅक्शन करत) वाजव".
आधीच भाग खरंच मस्त असायचे.
आधीच भाग खरंच मस्त असायचे.
Pages